त्याचं आणि माझं बजेट आणि क्रयशक्ती
मागच्या दिवाळीत माझ्या परफ्युम्सच्या व्यवसायात सिझन जोरात असताना एक जोडपे आणि त्यांचे सोबत एक ५ वर्षाचा त्यांचा मुलगा आला. यातल्या कुटुंबप्रमुखाला मी ओळखत होतो. तो आमचे जुने गिर्हाईक आहे. त्याचा ठरलेला परफ्युम्सचा ब्रॅंड म्हणजे "चार्ली" हा आहे, ज्याचा रेट प्रति मिली १.५०/- रुपये आहे. त्याने रिकामी बाटली समोर ठेवल्यावर मी न बोलता चार्ली भरणार इतक्यात तो म्हणाला "या खेपेस काहीतरी भारीमधले सेंट द्या बुवा..." मी एक क्षणभर थांबुन त्याच्याकडे बघितलं तर तो चोरट्या नजरेने स्वत:च्या बायकोकडे हसत बघत होता. मी म्हणालो " नक्कीच...फॉर एव्हर चालेल का २.५०/- रुपये वाले" " हो हो" तो आनंदाने म्हणाला. यावर माझ्या नेहमीच्या स्टाईलने मी विचारणा केली, " अरे आज एकदम जोरात दिवाळी खरेदी दिसतेय"...त्यावर तो जे काय बोलला ते थक्क करुन टाकणारं होते. तो म्हणाला " मग काय, यंदा दिवाळी जोरात आहे...हजार रुपये बोनस मिळालाय कंपनीतुन...बायकोला २५०/- ची साडी, पोराला १५०/- चा ड्रेस, चपला, फटाके, मला नवीन एक शर्ट १५०/- चा आणि आता हे नव्वद रुपयाचे सेंट." त्याने यादीच वाचुन दाखवली...आणि मी थक्क झालो....हजार रुपये बोनस म्हणजे त्याच्या क्रयशक्तीची "हाईट" होती. त्याचा हजार रुपये बोनस मिळाल्याचा आनंद मला खटकु लागला....मला क्षणभर त्या आनंदाचा हेवा वाटला.
आज कोणत्याही मॉल मध्ये गेल्यावर किमान कित्येक हजार रुपये उडवुन आपण बाहेर पडतो. डिझायनर जीन्स, ड्रेसमटेरिअल, मुलांना खेळणी, सबवे-मॅक्डोनल्ड-डॉमिनोज मधली खाण्याची चंगळ, एखादा चित्रपट...काही हजार रुपये उडवुन बाहेर पडल्यावरही आपण इतके समाधानी कधीच नसतो हे तुम्हीही कबुल कराल..." अरे हे घ्यायचं राह्यल...यापेक्षा ते बरं होतं...नेक्स्ट टाईम नक्की अमुकच घेऊ...तुला पुढच्या वेळेस काहीतरी अजुन छान घेऊ..." अशी एकमेकांना आणि स्वत:ला आश्वासने देत मुर्खासारखे हजारो रुपये उडवुन सोबत असमाधानाने आपण बाहेर पडतो...हातातल्या चकचकीत जड शॉपींग बॅग्स सांभाळत शेवटी " या खेपेस काही मनासारखे शॉपिंग झालं नाही बुवा" हेच आपले उद्वार असतात बाहेर पडताना....
लिव्हाईज जी जीन्स नसेल तर आपण ऑक्झेंबर्गची जीन्स घेणार नाही...
सबवे बंद असेल तर रामभरोसेचं सॅंडवीच खाणार नाही...
नवा ड्रेस आंगाला आतुन जरा टोचतोय म्हणुन यापुढे मी काही तो घालणार नाही असं निक्षुन बजावणारी आपली मुलगी....
बायोटेकचा साबण मिळत नाही म्हणुन हताश झालो तरी मी तेव्ढ्यासाठी काही लक्स घेणार नाही....
अशा क्रयशक्ती विचित्रपणे वाढवुन शेवटी एका न संपणाऱ्या असमाधानाच्या गर्तेत आपण अडकलो आहोत. आपलं बजेट काय? आपण किती आणि कसला उपभोग घेतोय? आपली क्रयशक्ती आपण कशाला वाढवतोय? खर्च किती वाढताहेत या सगळ्याचा विचारही न करता धो धो खरेदी करायची आणि ती करुनही शेवटी "असमाधान" खरेदी करुन घरी निमुटपणे परत यायचं....नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो. अशावेळी जर हजार रुपयात कुटुंबाला आनंद देणारा कुटुंबप्रमुख बघितल्यावर त्याचा हेवा न वाटला तर नवल....मला त्याला सांगावसं वाटलं.
"अरे कसा रे इतका समाधानी तु? मला शिकवशील का असं समाधान? तुझ्या बायकोला आवडली ती अडीचशेची साडी? तुझ्या मुलाला नाही का टोचत हा दीडशेचा जाडाभरडा शर्ट? त्याला इतकेसे फटाके कसे पुरतील?....याचं अर्थशास्त्र शिकवशील का मला प्लिज?"
- सचिन मधुकर परांजपे ( पालघर)
shared here with permission.
ह्म्म्म
ह्म्म्म
खरंच! अशी काही कुटुंब
खरंच! अशी काही कुटुंब पाहिल्येत मी, ज्यानी स्वतःचे राहणीमान इतके ऊंचावून ठेवलेय, की आता परवडत नसेल तरीही, ते त्यातून बाहेर येऊ शकत नाहियेत (?), किंवा येऊ ईच्छीत नाहियेत !
अर्थात, आमच्यासारख्या काटकसरी मनोवृत्तीला, " काय तुम्ही टीपीकल मध्यमवर्गीय! जरा हात सैल सोडुन खरेदी करा" अशी टिका सहन करावी लागते, पण मला जर महागाच्या वस्तू घेऊन आनंद नसेल मिळत तर मी त्या का घ्याव्या?
खूप छान लेख
खूप छान लेख