मंडळी नमस्कार,
नुकतीच (३०जून रोजी) आषाढी एकादशी झाली. ‘जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि ॥’ असे म्हणत शेकडो वर्षे चालत आलेला वारकर्यांचा हा आनंद सोहोळा. ह्रुदयात वसणारा राम, आकर्षित करणारा किंवा रमविणारा कृष्ण आणि ऐक्य साधणारा परमात्मा स्वरूप विष्णु म्हणजेच हरी अशा अर्थाने अभिप्रेत असलेला वारकरी संप्रदायाचा महामंत्र जय जय राम कृष्ण हरी म्हणत हजारो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरात गेले असतील. या वारकर्यांचे आणि पंढरपूरातले व्यवस्थापन यांतून Event Management चे courses design करता येतील.
याच पंढरपूरच्या वारकर्यांप्रमाणे आपल्या अमेरिकेतल्या वारकर्यांसाठी, म्हणजे तुम्हा उत्तर अमेरिकेतल्या रसिकांसाठी आपली र्होड आयलंडची प्रॉविडन्स नगरी सज्ज होत आहे. ६ जूनला येथील कन्वेंशन अँड व्हिजिटर्स ब्युरोने ’मीडिया डे’ आयोजित केला होता. मी आणि अधिवेशनाचे प्रमुख संयोजक बाळ महाले यांनी त्या दिवशी र्होड आयलंड कन्वेंशन सेंटर आणि हॉटेल्स बरोबरच्या करारांवर सह्या केल्या.
शहराचे महापौर, गव्हर्नरच्या कार्यालयातील सदस्य, मीडिया/माहिती प्रसारणचे लोक आणि पत्रकार तिथे उपस्थित होते. सर्वांनी आमची उत्तम बडदास्त ठेवली.
जगभरात मराठी भाषा बोलणारे सुमारे ८० मिलियन लोक आहेत. ही संख्या इटालियन व पोलिश भाषा बोलणाऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक आहे हे ऐकताच तिथल्या मीडियाच्या भुवया उंचावल्या. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बृ. म. मं.) अधिवेशन हे फक्त आपल्या मराठी समुदायामधे मर्यादित न ठेवता उत्तर अमेरिकन समाजातील मुख्य प्रवाहाने (Main stream) त्याची दखल घ्यावी हा त्या ’मीडिया डे’चा प्रमुख उद्देश होता.
मंडळी तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या अधिवेशनासाठी कॉसमॉस बँक मेगा स्पॉन्सर/प्रायोजक असतील. योगायोगाने ६ जूनला त्यांच्याकडून धनादेशही आला. बँकेचे अध्यक्ष/चेअरमन श्री बुगदे आणि निदेशक/डायरेक्टर श्री जयंत शाळिग्राम यांच्या समवेत आमचे अधिवेशनाच्या कार्यक्रमांचे आयोजन चालू झाले आहे.
माझ्या प्रॉविडन्स भेटीत व्हिजिटर्स ब्युरोच्या सदस्यांनी ब्राउन युनिव्हर्सिटी, अमेरिकेतले पहिले बाप्तिस्ट चर्च, रिव्हरफ्रंट अशा अनेक ठिकाणी फिरवून आणले. इतकेच नव्हे तर प्रॉविडन्समधे मिळणार्या खाद्यपदार्थांपैकी खास अशा फ्राईड कॅलामारीचा आस्वाद घेता आला. अमेरिकेतले हे सर्वात छोटे राज्य असलेले र्होड आयलंड तुम्हा सर्वांवर उत्तम ठसा उमटवणार याबद्दल मला संदेह नाही.
’वा गुरु ’ नाटकाच्या यशस्वी दौर्यानंतर दिवाळी दरम्यान बृ. म. मंडळ तुमच्यासाठी जादूगार रघुवीर यांच्या जादूच्या प्रयोगांचा दौरा आयोजित करीत आहे. लहानपणी त्यांचे प्रयोग बघत आपण मोठे झालो. ह्याच रघुवीर परिवारातील तीन पिढ्या अमेरिकेतील बारा मराठी मंडळात आपली कलाकृती सादर करतील. व्हिसाची अडथळ्याची शर्यत पार पडली की अधिक माहिती देईनच.
जुलैच्या १ तारखेला कॅनडाचा आणि ४ तारखेला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. त्यानिमित्ताने बृहन्महाराष्ट्र्र मंडळ परिवारातील तुम्हा सर्वांना शुभेच्छा. अमेरिकेतील राष्ट्रगीतात म्हणतात Land of the free and home of the braves. त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राशी नाते सांगत मी म्हणेन: ‘Land of the Shree and home of the Devs.’ .
धन्यवाद!
आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com फोन: 302-559-1367