भरलेली खानदेशी मिरची

Submitted by मराठमोळा on 8 July, 2012 - 20:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ही पाकृ माझ्या आजीने सांगितलेली आहे. तिच्या हातच्या जेवणाची फार आठवण होत होती म्हणून रेसेपी मागवुन घेतली आणि ती तुम्हालाही सांगावी असे वाटले.. एकदा नक्की करुन पहा. घ्या मग साहित्य

४-५ खानदेशी किंवा जाड/ मोठ्या मिरच्या ही मिरची कमी तिखट असते. जास्त खाल्ली तरी त्रास होणार नाही
कपभर शेंगदाणे
२-३ लसूण पाकळ्या
जिरे पावडर - २ छोटे चमचे
धने पावडर - २ छोटे चमचे
हिंग - १/२ छोटा चमचा
हळद - १ छोटा चमचा
चवीपुरते मीठ

क्रमवार पाककृती: 

१. मिरचीचे साल खुप जाड असेल तर तव्यावर तेलाचा वापर न करता थोड्या भाजून घ्याव्यात.
२. मिरचीला एका बाजुने मधुन उभी चिरुन त्यातील बिया काढून टाका आणि थोडं मीठ लावून ठेवुन द्या १५-२० मिनिटे
३. शेंगदाणे भाजून घ्या. मिक्सर मधे किंवा खलबत्त्यात शेंगदाणे, हळद, जिरे पावडर, हिंग, मीठ, धने पावडर आणि लसूण चांगले बारीक करुन घ्या. तव्यावर थोडं तेल घालून ह्या मिश्रणाचा गोळा करुन घ्या. किंवा मिश्रणात गरम तेल घाला. लगदा होईलसे बनवा.
४. हे मिश्रण मिरचीत व्यवस्थित भरुन घ्या.
५. तवा गरम करुन त्यावर थोडेसे तेल घाला.
६. ज्या बाजुने मसाला भरला आहे ती बाजू तव्याला लागेल अशा पद्धतीने ठेवा.
७. मसाला लालसर झाल्यानंतर मिरचीची बाजु बदला.
८. थोडा वेळ परता. आणि जेवणाबरोबर तोंडी लावायला ही मिरची घ्या.

403387_384293204951160_69155533_n.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी ५-६ नग
माहितीचा स्रोत: 
आजी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्याच आठवड्यात मराठमोळ्याकडे ही मिरची खाल्ली. मस्त झाली होती! Happy

व्वा...काय आठवण करुन दिलीत! Happy
घरी कालच अशा मिरच्या आणल्यात्...आज लगेच करुन बघते.

मराठमोळा, पण खान्देशी मिरच्या पोपटी रंगाच्या असतात ना? Uhoh इतक्या हिरव्यागार नसतात.

@ आर्या,

अहो खानदेशी मिरच्या मुंबै-पुण्यात लवकर मिळत नाहीत त्या मी ऑस्ट्रेलिया मधे कुठुन आणणार.. Happy
म्हणून इथे ज्या मिळाल्या त्या वापरल्या. Happy हाय काय आणि नाय काय.

ओह्...तुम्ही ऑस्ट्रेलियात खान्देशी मिरची बनवली आहे तर. Happy
माझी आई इतक्या सुक्या नाही करत या मिरच्या. थोड्या पाण्याचा शिडकावा मारते.

अशीच करतो पण दह्यात भिजवून ठेवतो मग गॅसव भाजतो. तडतड उडते व मग शांत झाली की मसाला भरून तव्यावर तळतो. भन्नाट!

तोंपासु....असल्या मिरच्या मिळाल्या की नक्की करून बघणार.
वरणभाताबरोबर खरंच काय चविष्ट लागतील...

@ दिप्स,

१ नंबर.. तुम्ही केलेल्या मिरच्या खुपच मस्त दिसताहेत. Happy

सर्वांचेच धन्यवाद.

सहीच. ऑथेंटिक दिसतेय एकदम. ही मिरची धपाट्यांबरोबर जबरी लागते.
बहुतेक खंडेनवमीला करतात.
शेंगदाण्याच्या कुटाबरोबर किसलेले खोबरे पण छान लागते सारणात.

वॉव.. मी पण आणल्या आहेत मिर्च्या..
दीप्स च्या मिर्च्याही मस्त झाल्यात
रैना.. इस्पेशल टिप करता धन्स गा..