नाथा स्वागताचे भाषण करायला उठला आणि पच्चकन थुंकून एकदा सनमकडे आणि एकदा इतरांकडे बघत म्हणाला.
"ही बाय म्हायरला ग्येल्यालीय... ओढून आन्लीय तवा आलीय... शादी झाली म्हन्ल्यावं वडार झाली ही.. तवा वडाराचं नियम लागू होनार... तवा पंचायत म्हन्ती की हिनं सासर म्हाईर दोन्ही सोडावं.. कोना धनिकाचा आश्रय घ्यावा.. आन र्हावं... यकदा पळून ग्येल्याली पोरगी माघारी घ्येत न्हाईत आपल्यात.. आसं पंचायत म्हनत हाये.. सर्व्यांनी सांगा काय त्ये..."
नाथा खाली बसला आणि तोंडं पाहू लागला. जाणते वडार आणि बाकी गाव उकिडवं बसून घुबडासारखे इकडे तिकडे पाहात होते. सनम मान खाली घालून झाडाखाली उभी होती. भिका वडार डोळे विस्फारून सगळीकडे पाहात होता. मधेच नाथा परत घईघाईत उठला आणि म्हणाला.
"आन वर मला दम देतीय ही... मला म्हन्ली घरातलं बाई मानूस आनायचं न्हाई पंचायतीम्होरं...न्हाईतर बामनांच्या बायाबी आनंल ओढून म्हन्ली... वर माझ्या घरची मंडळीबी ओढून आणंल म्हन्ली मला.."
आता सगळ्याच नजरा विखार घेऊन सनमकडे वळल्या. ती सोन्याच्या रंगाची आणि पोलादाच्या स्वभावाची असली तरी उद्धटपणा खपवून घेण्याचे अनार गावाला कारण नव्हते. निर्णय काय व्हायचा तो वेगळाच, पण ही मुलगी शहाणपणा करत असली तर हिला सरळ केलीच पाहिजे असे प्रत्येकाच्या मनात आले.
हरि वडार हा म्हातारा आजच सनमच्या माहेरी जाऊन आलेला होता. तेथील परिस्थिती लक्षात घेतली तर एकटा झुर्क्या अनार गावात थैमान घालू शकेल हे हरि वडाराला समजत होते. हरि वडार उठला आणि म्हणाला.
"मी तिच्या म्हाईरी जाऊन आलोय... लोक चांगले सच्चे याही हायेत... काय रं भिका? तू बोल की? आनि प्वारगी ल्हान हाये.. तिला यळ द्यायला हवा.. शिकवायला हवी... रानावनात वाढल्यालीय ती... तिला काय कळणार गावचे कायदे? "
हरि खाली बसला तसा नाथा चिडून त्याच्याकडे पाहू लागला. हरिचे प्रस्थ आणि वय दोन्ही मोठे असल्याने नाथा नुसताच वडारांचा प्रमुख म्हणून काही विशेष जोरात बोलू शकत नव्हताच.
भिका उठला आणि आधीच सनम आणि झुर्क्यामुळे अपमानीत झालेला असल्याने आणि अनायासे पंचायत जमलेलीच असल्याने त्याने तोंड सोडले.
"प्वारगी ल्हान हाये व्हय? झाडावरून म्हाईरी जातीय ती झाडावरून.. मान्स रस्त्यावं चालतायत... ही झाडावरून जाती.. सासर्याच्या छातीत काठी हान्ती... दिराला दम द्येती उभा फाडंल म्हून.. सासूला उल्टं ब्वालती... आमाला तिच्या म्हायरी जायला तीन तास लागलंन.. थितं ग्येलो तं ही आत लवंडल्याली... आमाला पाहून वाकली न्हाई का पाया पडली न्हाई का भाईर आली नाय.. आन हिला जायला यक तास लागतो थितं.. झाडावरून जातीय... मानूस म्हनायची का माकड?? जावांना लय बोलली आज सकाळी... पदर घेईना डोक्यावं.. एक तर खालच्या जातीचीय.. वर मारामार्या करतीय... बाईमान्साला शोभ्तं व्हय सासर्याला श्यीगाल करनं? आं?? हिला पंचायतीनं चांगला दंड करावा आन शिक्षा द्याया हवी...."
सनम आयतीच गावासमोर उभी असल्याने बायकासुद्धा तिच्यावरून नजर हटवत नव्हत्या. असं रूपच पाहिलेलं नव्हतं कोणी. तिच्याकडे बघत लोक एकमेकांशी बोलत होते. पंचायतीचे सदस्यही तिच्याकडे बघतच एकमेकांशी आणि समोरच्या गावाशीबोलत होते. तरुण मुलांचंच काय, म्हातार्यांचंही काळीज थडाथडा उडू लागलं होतं. सनमला त्या सगळ्याची जाणीव असली तरी ती नजरेला नजर भिडवत होती बिनधास्त. आणि अशी पाहात होती की पाहणार्याने मान खाली घालावी. तिने तिच्या सासूला आणि जावांना येथे येऊच दिलं नव्हतं. तेवढं मात्र कऊन तिने त्या चौघींची मने जिंकली होती तातुरती का होईना.
हरि वडाराच्या मनात येत होते की भिकाला अक्कल यावी. चार् तासांपूर्वी भिका हे झुर्क्याच्या रानात बोलला असता तर शिकारी कुत्र्यांनी त्याचा कोथळा बाहेर काढून खाल्ला असता. झुर्क्याने नुसता पाय दाबला असता छातीवर तर भिका वडार फासळ्या तुटून मेला असता. हरिची इच्छा होती की भिकाने आता तरी शहाणे व्हावे. एक तर कोणाला समाजाला न विचारत लमाण मुलगी सून करून आणली. आणली ती आणली अन वर असली सुंदर मुलगी आणली. आणि त्यात ती मुलगी माकडाच्या वरताण चपळ. आणि तीच सासर्याला काठीने भोक पाडतीय छातीला. आणि हा असा का बोलतो?
हरि वडार उठला आणि भिकाला चार समजुतीचे शब्द सांगणार तेव्हढ्यात नाथा वडार उसळून बोलला..
"चाचा... तुमचा विषय बोलून झाल्यालाय... आता बाकीच्यांना बोलूद्यात..."
हरि चेहरा पाडून खाली बसला..
तसा वामन्या, म्हणजे भिकाचा मोठा मुलगा उठला. त्याची बायको म्हणून गावात वावरणारी निर्मला सासर्याची दुसरी बायको होती. या वामन्याचे ती नुसतेच नांव आणि कुंकू लावायची. वामन्या गुरकावल्यासारखा सामकडे बघत म्हणाला..
"मला यक सांगा आधी... तुमच्या घरात कत्या सुनेनं आल्यादिवशी दिराला दम दिलाय काय? आय ठोक्ली हिची... हित्तंच मुडदा पाडंल मी तर गावाद्येखत..."
कोणाच्या कल्पनेत येणार नाही असा प्रकार घडला. सनम पाय आपटून हात दिराकडे करत हे एवढे डोळे करून ओरडली...
"तू काय आय ठोकणार माझी??? आ??... स्वतःची बायकू स्वत:च्या बापाखाली निजिवतोयस तू..."
अगंगंगंगं! व्हायचं तेच झालं! दीर गावाची सोबत आहे हे पाहून उसळून एक भला मोठा धोंडा हातात घेऊन तो सनमच्या डोक्यात घालून तिला खलास करण्यासाठी सनमकडे धावला... हा प्रकार अद्भुत वाटला सगळ्यांना... काल आलेली एक लमाणाची पोरगी थोरल्या दिराला आणि सासर्याला गावादेखत शिव्या देत आहे. असले बघण्यात नव्हते त्यांच्या.
आणि त्यानंतर जे झाले ते तर त्यांच्या आधीच्या शंभर पिढ्यांच्या बघण्यात नव्हते...
सनम मागच्या वडावर सर्रकन चढली.. आता तो धोंडा कसा फेकायचा तिच्यावर? नेम चुकला तर स्वतःच्याच अंगावर पडायचा...तिचे ते झाडावर चढणे पाहून भिका उसळून म्हणाला..
"पाह्यलं का ?? पाह्यलं का?? हे आसं झाडावं चढतीय बघा...आस्ली कुटं सून आस्ते व्हय???"
भिकाचे ते बोलणे ऐकून आणखीनच विचित्र प्रकार झाला..... जमलेल्यांपैकी दहा बारा बायका खदाखदा हासू लागल्या.. ते पाहून हरी वडारही खोकत खोकत हासला... आणि मग नाथालाही भिकाच्या सात्विक संतापाचे हसू आले.. आपणच या मुलीला पंचायतीसमोर उभी केलेली आहे हे विसरून नाथा खोखो हसू लागला.. ते पाहून लहान पोरे लांब उभी होती ती खिदळायला लागली.. आणि तरुण पोरे... ज्यांना मिसरूड फुटल्यापासून पंचायतीत बसायची परवानगी मिळालेली होती ती एकमेकांकडे पाहात धोंडा हातात घेऊन उभा असलेल्या आणि अवाक झालेल्या वामन्यावर हसू लागली...
सनमचे ते वडावर चढणे बघून अनार गाव हसू लागले तसा भिका आणि वामन्या गावालाच शिव्या देऊ लागले.. त्या शिव्या ऐकून गाव सातमजली हसू लागले..
बराच वेळ हासणे झाल्यावर हरी वडार उठला... म्हणाला...
"आपन समद्यांनी पाहिले त्यानुसार माझे आसे म्हन्ने हाये... की प्वारगी झाडावं सुळ्ळकन चढतीय... कामं बी करतीय.. स्वतःचा बचाव बी करतीय... प्वारगी हुषार हाये.. भिका वडाराकडं तिला जातीवाचक बोलल्यानं ती पळाली व्हती... न्हायतं ती पळणार न्हाई... काय गं प्वारी???"
हरि वडाराच्या भाषणाचा इतरांबरोबरच नाथावरही परिणाम होऊ लागला होता. पण सनम स्पष्टवक्ती! ती झाडावर बसूनच म्हणाली...
"माझा नवरा हित्तं हाये की?? त्यो निर्णय न्हाई घेऊ शकत काय माझा? काय रं इन्या? श्यीगाल व्हईल काय परत मला? जातीवं कोन बोलंल काय???"
खाली घाबरलेल्या उंदरासारखा बसलेला इन्या टकमक मोठ्यांकडे पाहू लागला.. आता नाथा पुन्हा चिडला..
"बघितलंत काय सर्व्यांनी...??? आं???.. ही नवर्याशीच ब्वालतीय सर्व्यांद्येखत... आस कुटं आस्तं का?"
"तिला आधी खाली उतरवा..." - हातात धोंडा तसाच धरून भडकून वामन्या ओरडला..
त्याचं कोणी ऐकलंच नाही. अजून काही पोरं आणि बायका हासतच होते. पण सनम ती सनमच. ती दाणकन खाली उतरली आणि त्याच हालचालीत दिराच्या हातातला धोंडा आपल्या हाताने उडवत दिराची गचांडी धरत म्हणाली.....
"श्यी दिलीस त्याची मापी माग आधी झाईर... हित्तं समद्यांद्येखत... काय रं नाथा वडारा??? तुझ्या पंचायतीम्होरं श्यी गाल चालतूय व्हय ???"
नाथा चपापला. दीर कसासा सामच्या हातातून सुटला आणि तिलाच फटका द्यायला त्याने हात वर उचलला. त्याचा हात खाली यायच्या आत त्याच्या पोटात लाथ बसल्याने तो तिथेच आडवा झाला. तेवढ्याच सनमच्या गोर्यापान पोटर्या दिसल्याने आता काही पुरुष मंडळी तिच्या बाजूची झाली. दीर वाळू खात होता. हातात एक कांडके घेत आणि पडलेल्या दिराच्या मानेवर पाय दाबत सनम कडाडली.
"मला माग्नी घालून आन्लीय.. पाय धरत आले न्हवत्ये मी .. सून करून घ्या म्हनंत.. बघती तर हितं थोरली जाऊ म्हन्जी सासर्याचीच दुसरी ठेवल्याली.. आन हा मला अक्कल शिकिवतोय... काय रं नाथा???... तुझी बाई तुझ्या बापासंग झोपली म्हनून तू तिला मारलीस आन ती म्हाईरी ग्येली तर पंचायत बसवशील काय??? मी शेवटचं सांगतीय... मला सून केलालयं ना??? आता मी सूनच हितली.. मला मारायचं न्हाई.. श्यी गाल न्हाई आन जातीवं बोलां न्हाई .. यातलं काई झालं तर मी हाये आन त्यो मानूस हाये.. यं इन्या... पटतीय का बघ आस्ली बायको न्हाईतर चाल्ली मी... माझ्या बापाला जड न्हाई... ह्ये सगळे भीक मागत आले आमची सून आमाल द्या तवा दिली बापानं धाडून... न्हाईतर ह्यांचं स्वागत कुत्र्यांनीच क्येलवतं भुंकून.. या गावाची सून हाये मी.. आडवं तिडवं कोन वागलं तर मुळासकट उपटून तोडंल.. सनम म्हन्तात मला... झुर्क्याची सनम"
एकंदर दृष्य म्हणजे हसावे की रडावे असे होते. भिका वडारच्या अब्रूचा फालुदा होताना गाव मिटक्या मारत बघत होते. परस्पर एका घराची इज्जत धुलीला मिळतीय गावासमोर म्हंटल्यावर दुसरा कशाला धावेल तिथे? पण हरी वडार चवताळून उठला.. सनमला ओरडला..
"त्याला सोड पैली.. बाई हायेस का कोन?? न्हाईतं जा म्हायरीच.. ह्ये आसं मारहान करायच आसंल तर म्हायरीच र्हा तू..."
त्यालाही सनम बोलली..
"आन दिरानं धोंडा टाळक्यात घातला आस्ता तं काय म्हननार होतं तुमी चाचा??.. ते कर्तव्यच न्हाय का दिराचं? आं??.. मी म्येलीच आस्ते आत्ता.. झाडावं चढता येतंय म्हून वाचली... त्ये ग्येलं कुटंच... मलाच ओरडताय??"
हेही खरेच होते. आता दोन म्हातार्या बायका उठल्या आणि त्यातली एक नाथाला उद्देशून म्हणाली..
"काय रं नाथा?? भिक्यानं सवता जाऊन सून आन्ली ना थितनं?? मग तिला नीट नको ठिवायला व्हय?? का लग्नाआधी जात न्हव्ती म्हाईत का काय??? सगळं गाव बुंदी ज्येवून ढ्येकरा द्येत व्हतं... तवा जात म्हाईत नव्हती काय??? आन तिनं काय म्हून मार खायचा???"
त्या आज्यांचे धिराचे बोल ऐकून दोन चार तरुण पोरं सनमची बाजू घ्यायला तरतरून उठली.. तेवढेच तिच्याशी दोन शब्द बोलता आले तर जरा घुमवता येतंय का ते बघता येईल या उद्देशाने...
त्यातला एक अमिताभ बच्चनच्या स्टायलीत बोलला...
"गावात जातीवाचक कोन बोल्लं... आन कोन सुनंला मारू लागलं.. तर त्या बाईनं आमाला सांगावं..आमी मुडदंच पाडू असल्यांचे..."
तो कोण आहे हे सनमला माहीत नव्हते. पण ती त्यालाही भडकून बोलली..
"या गावातल्या कोनाकडं मदत मागायचे दीस न्हाई आले झुर्क्याच्या प्वारीवं अजून... माझी मी सशक्त हाये.. तू बस खाली..."
तो खाली बसला. हे प्रकरण झेपणारं दिसत नव्हतं एकंदरीत. तेवढ्यात सनम सगळ्यांना उद्देशून म्हणाली.
"पंचायत संपल्याली हाये.. चला घरला आपापल्या..."
कोण प्रमुख आहे आणि कोण आदेश देतंय यावर सारासार विचारही न करता बायाबापड्या लगबगीने उठल्या तसे सगळेच उठू लागले. नाथा नुसताच बघत बसला. हरी वडारही तंबाखू चोळत निघाला. सनम विन्यापाशी गेली आणि त्याला म्हणाली.
"मला घर्ला घेऊन चल.. तुझ्यासंगं.. तुझी बाय हाये मी... हा अस्सा हात पकड आन घेऊन चल.. ही पंचायत लावलीन मी उधळून कवाच..."
असे म्हणत सनमनेच विन्याचा उजवा हात पकडला आणि नव्या नवरीसारखा विन्या बनियन घालून वीतभर छाडमाड छाती मिरवत सनमबरोबर तिच्या वेगाशी जुळते घेण्याचा प्रयत्नांत फरफटला जाऊ लागला.. ते दृष्य पाहून बायका पसर तोंदाला लावून खदखदत हासत राहिल्या.. भिका आणि वामन्या जळफळत राहिले.. नाथा नुसताच बघत राहिला... आणि तरुण पोरे विन्याच्या सुदैवाचा हेवा करत एकमेकांना डोळे मारू लागली.....
सनम हे प्रकरण गावात आलं त्याच दिवशी इतकं गाजलं की पुढचे एक वर्ष तरी दुसरा काही उद्योग नसता कोणाला! सनमवर बोलण्याशिवाय!
सनम विन्याला ओढत घरात घेऊन आली आणि घरातल्या बायका हादरून ते दृष्य बघतच बसल्या. विन्याचा एक वेगळाच प्रकार झालेला होता. आजवर थोरल्या भावांची दादागिरी आणि लहान असल्यामुळे होणारे तोटे यांच्या पार्श्वभूमीवर सनममुळे त्याचा 'तिचा नवरा असल्याचा आणि घरातील एक महत्वाची व्यक्तीही असल्याचा' पोकळ अभिमान फुलून आला होता..
पंचायतीचे काय झाले बायकांना कळेना.... तर आजवरचा घाबरा ससा विन्या बोटे सगळ्या बायकांच्या तोंडापुढे नाचवत जरब बसेल अशा आवाजात फुत्कारला....
"माझी बाय हाय ही... कोन बोलायचं न्हाई आजपासून हिला.... समजल काय??? न्हाईतर आत्ता आमी दोघांनी पंचायत उधळलीन तसं घर उधळू आपलं... "
बायका हादरून विन्याचा आवेश पाहात असतानाच विन्याची नजर सनमकडे गेली... तिचा चेहरा आनंदाने आणि लाजेने लालेलाल झाला होता.. ही आणखीनच सुंदर दिसत आहे हे पाहिल्याने विन्याला आणखीनच त्वेश चढला आणि त्याने त्याच त्वेषात मागे पाहिले तर...
... खाड...
मोठ्या भावाने.. वामन्याने विन्याच्या श्रीमुखात जोरात भडकावलेली होती...
पन्नास किलो वजनाचा विन्या त्या थपडीने जमीनीवर कोसळला... आता वामन्या शिवीगाळ सुरू करणार तोच सनम त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणाली..
"मगाशी माती खाल्ली ती पुरली नाय का रं भाड्या??? का फिरवू गावात्नं अजून तसंच???"
विन्यासमोर थोरलेपणा करणारा वामन्या तिच्यासमोर मात्र चपापून गप्प झाला कारण आता तिने जर गावात कोणाला सांगितलं असतं की ह्यांनी छळलं.... तर गावाने यांची धिंडच काढली असती...
त्या दिवशीची जेवणे कशीबशी पार पडली... भिका वडर बायकोच्या म्हणजे रत्नीच्या कानात कुजबुजला.. रत्नीने विन्याला सांगितले..
"इन्या.. तू आन सनम आज आतमधी निजा... "
सातव्या आसमानात पोचलेला विन्या गालातल्या गालात स्वतःशीच हासत होता.. सनमचे कामच आवरत नाही म्हणून वैतागलेला होता... पण सनमचीही मनस्थिती काही फर वेगळी नव्हती... तिला अतिशय भीती वाटत होती.. नवरा नवरी काय करत असतील याचा गोंधळ होता तिच्या मनात...
बर्याच वेळाने ती आतल्या खोलीत गेली.. बाहेरच बसलेल्या विन्याला खरे तर घाई झालेली होती... पण मोठी माणसे निजल्याशिवाय आपण कसं आत जायचं असं वाटून तो बसून राहिला.. मग हौसावहिनी त्याला म्हणाली..
"काय म्हुर्त बघायचाय काय आत जायला??? ती घोरायला लागंल इतका यळ लावलात तर..."
सनमपेक्षा दसपट जास्त लाजत विन्या आत गेला आणि त्याने दारच लावले नाही.... बाहेरून त्याची आईच बोंबलली...
"आमी रातचं आत यनार न्हाईओत विन्या निजाया.... कडी लावलीस तरी चालंन"
कसाबसा दारात येऊन विन्या मान खाली घालून कडी लावू लागला..
आत गेला तर सनम मान खाली घालून बसली होती.. तिच्याजवळ बसंत म्हणाला..
"अशी का बसलीयस??"
त्यांची ही पहिलीच रात्र... आणि सनमने उत्तर दिले..
"मग काय उड्या मारू????"
जोरजोरात आलेलं हसू दाबत विन्या तोंडावर हात धरून हसायला लागला बाहेर आवाज जाऊ नये म्हणून..
मग सनमलाही हसू आलं... तीही खुसखुसू लागली...
"तू हास्लीस की लय ग्वाड दिस्तीस..."
"आन मारामारी करत आस्ले तं?"
"त्ये चांगलं न्हाई.. दादाय माझा"
"आन त्याची बायको तुझी वैनी का?"
"तिला आबानं ठिवलीय.."
"आन तुझ्या दादाला कोन मंग???"
"त्यो तिकडं म्हाराच्या वस्तीवं जातो काही यळां..."
"का???"
"तिकडं हाये कोन तरी त्याची.."
"आन सगळे प्येतात ना?"
"मी न्हाई पीत...."
"तंबाखू चोळतूयस की दुपारचा..."
"त्ये आपलं आसंच... " असं म्हणत विन्याने सनमच्या खांद्यावर हात ठेवला..
"हा .. सरक तिकडं... लमान जातीच्या प्वारीला हात लावलान तर बाटशील.."
"मीच आबला म्हनालो झुर्क्याची प्वारगी मला करा.. "
"तू चांगला वागशील न रं??"
"चांगला म्हन्जे???"
"म्हन्जे मला .. मला या लोकांपासून वाचिवशील ना???"
"त्ये काय करनार तुला???"
"तसं न्हाई... उद्या टाकतील बी... लमान हाये म्हून..."
"मंग मी बी यील तुझ्यासंग भाईर..."
सनमने प्रेमाने हसून विन्याकडे पाहिले.. विन्यानेही केव्हाची लागलेली तहान भागवायला तिला जवळ ओढले.. अंधार करून दोघे आडवे होतायत तोच सनम विन्याला खुण करून उठली.. आणि आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत उघडत असणार्या खिडकीच्या फटीतून तिने बाहेर पाहिले... कुजबूज ऐकू येत असल्यानेच ती खिडकीजवळ आलेली होती... आता तिला बाहेरचे दृष्य अर्धवट दिसत होते.. म्हातारा भिका वडार सगळ्यांना समोर बसवून सांगत होता...
"यक म्हैना.. फकत यक म्हैना.. तवर तिला नीट वाग्वा.. मंग .. मंग तिला धडा शिकवू... जित्ती जाळू... जित्ती..द्याचा पदरच प्येटवून.. तिच्यायच्ची लमान साली... आज गावात अब्रू ग्येली.. द्वान वर्षाचं प्वारबी हासतंय आपल्यावं.. तिला जित्ती जाळल्याबिगर अब्रू न्हाय वापस यायची... "
मागून विन्याही उठला तशी सनम लगबगीने त्याला आधीच्या जागेवर हासत हासत आणत म्हणाली..
"मी म्हन्ले भाईर सर्वे नीट झोपू शक्तायत का न्हाई तेवढं बघावं ... आपल्यामुळं गैरसोय नगं.."
"आसं व्हय?? आन आपली गैरसोय?? लय दिस चाललीय की???"
"हा! लय दीस म्हनं.. परवा लगीन झालं..."
"आता बोलत बसू नगं..."
विन्याने सनमला जवळ ओढले.. पहिली रात्री... विन्या पहाट होईपर्यंत तिच्यावर तुटून पडला होता...
... पण विन्याला सर्वस्व बहाल करणारे शरीर मात्र प्रेतवत पडलेले होते... डोळे आढ्याच्या अंधारात गुंतलेले... आणि मन बाहेरच्या खोलीकडे लागलेलं... शरीर मात्र ओरबाडलं जातंय...
रात्रभर एक क्षणही न झोपता पहाटे चारच्या सुमाराला सवयीप्रमाणे साम उठली... तेव्हा विन्या गाढ झोपलेला होता....
या घरात हा एकच आधार होता... ज्याला भिका वडाराचा प्लॅन माहीतही नव्हता.. आणि माहीत झाला असता तर पसंतही पडला नसता..
त्या आपल्या हक्काच्या आधाराकडे पाहात सनमने विन्याच्या कपाळावरून हात फिरवला आणि खोलीचे दार उघडून बाहेर आली तर...
"उठलीबी माझी बया?? ये.. च्या टाकलाय.. बस जरा.."
सासू आईच्या वरताण प्रेमाने बोलत होती... जावा हासत हासत सनमकडे पाहात होत्या.. मुलं आणि पुरुष मंडळी झोपलेलीच होती..
.. हे प्रेम कसले आहे हे सनमला माहीत होते.. तिची आशा आणि भिस्त फक्त एकच होती.. ती म्हणजे आत झोपलेला तिचा नवरा विन्या...
.. पण तिला या क्षणी हे माहीत नव्हते.. की पाचजणांचे मुडदे पाडताना..
... पहिला मुडदा ती विन्याचाच पाडणार होती...
=====================================
-'बेफिकीर'!
(No subject)
धंन्यवाद बेफी. असाच वेग
धंन्यवाद बेफी. असाच वेग राहूद्यात पुढे येणार्या भागांचे
बेफिकीर! छान सनम मार्गाला
बेफिकीर!
छान सनम मार्गाला लागली आता.
म्हणजे कादंबरी.
मस्त...... धंन्यवाद बेफी.
मस्त......
धंन्यवाद बेफी. असाच वेग राहूद्यात पुढे येणार्या भागांचे>>>+१
मस्त....
मस्त....
खुपच छान!!
खुपच छान!!
सहीच........................
सहीच........................
नवीन कादंबरी छान आहे
नवीन कादंबरी छान आहे
भुक्क्कड दिल्लिला गेला का?
लईईईईईईईईईईईईईईई भारी
लईईईईईईईईईईईईईईई भारी राव.......... लवकर येऊ द्या पुढचा भाग....
एक्दम जबरदस्त.... सीनेमासाठि
एक्दम जबरदस्त....
सीनेमासाठि एकदम मस्त कथा...
तेवढ्याच सनमच्या गोर्यापान
तेवढ्याच सनमच्या गोर्यापान पोटर्या दिसल्याने आता काही पुरुष मंडळी तिच्या बाजूची झाली. >
भुक्क्ड....
भुक्क्ड....
झक्कास वेग पकडला आहे कथेने
झक्कास वेग पकडला आहे कथेने लिहित रहा
बेफी..............कुठे गेली
बेफी..............कुठे गेली सनम???????
बेफिकीरजी सनमचा पुढचा भाग
बेफिकीरजी
सनमचा पुढचा भाग लवकर येऊ द्या की राव
भुक्कड कुठे गेला?
भुक्कड कुठे गेला?
कुमारी कमला, अविवाहीत
कुमारी कमला, अविवाहीत आकाशतज्ञांवर लाईन का मारतेस वेळीअवेळी? झोप किंवा ३६४५२ वर प्रतिसाद देत राहा
छान आहे. सर्वे भाग उत्तम आहे.
छान आहे. सर्वे भाग उत्तम आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
बेफिकीर, या कादंबरीची नायिका
बेफिकीर,
या कादंबरीची नायिका म्हणून सनम फार आवडली मला! तिने पाचांचे मुडदे पाडण्याचं वर्णन वाचायला मन अगदी आतुरलंय! रच्याकने : प्रत्येक मुदद्याचा एकेक भाग होणार का? तसं असल्यास पंचपक्वान्नांची मेजवानीच म्हणायला हवी ही कादंबरी!
आ.न.,
-गा.पै.
बेफी आपला निषेध...... सनम
बेफी आपला निषेध...... सनम भुक्कड ला शोधायला गेली का?
लि हि तो
लि हि तो
बेफी आपला संपुर्ण आदर राखुन
बेफी आपला संपुर्ण आदर राखुन मी आपणास कळवु ईच्छीतो की फक्त सनम साठी मी खुपदा पावसात भिजत नेटवर जाऊन आलो पण अजुन काही पुढचा भाग आपण टाकलेला नाही या बद्दल खुप नाराज आहे.
एक वेळ भुक्कड गेला तर जाऊंद्यात पण कमीत कमी सनम तरी आली पाहीजे. तरी आता अजुन वाट पाहायला लाऊ नका. लवकर येऊद्यात पूढचे भाग.
सनम चे पुढ चे भाग कुथे
सनम चे पुढ चे भाग कुथे वाचायल्ला मिळतिल ?