जत्रा

Submitted by आशूडी on 2 July, 2012 - 06:12

दर आषाढी एकादशीला आमच्या गावाचा उरुस असतो. आमचं गाव म्हणजे विठ्ठलवाडी. म्हणजे त्या दिवसापुरतं तरी ते आमचं गाव असतं. एरवी सांगताना आम्ही झोकात आनंदनगर सांगतो. ते एक असोच. तर लहानपणी शाळेला सुट्टी असायची आषाढीला. पण आई बाबांना काय ती नसणार. म्हणजे घरात आम्ही तिघी, दोन आज्ज्या असा 'पाचा लिंबांचा पाचोळा!' शप्पत. आत्ता अचानक स्पष्ट जाणवलं, आम्ही तिघी लहान असू, पण आज्ज्या तर आई बाबानाही सिनियर होत्या. तरी आई बाबा नसले कि आम्हाला घर म्हणजे आपलंच राज्य वाटायचं. आज्ज्या आमच्या टीममध्ये असल्याने असं वाटत असेल कदाचित.

बाहेर पिरपिर, रिपरिप पडणारा पाऊस. शाळेचा अभ्यासही खूप काही चालू झालेला नसायचा. उन्हाळ्यात चिकार खेळून झाल्याने सगळेच खेळ आता कंटाळवाणे झालेले. पावसात कॅरम काढायची हिंमत फक्त बाबांमध्ये. तर त्या आषाढीला सुट्टी असूनही घरी तो साबुदाणा, वरई आणि दाण्याच्या कुटाचे एकसे एक बोरिंग पदार्थ आमच्याकडे पाहून खदखदा हसत असणार. पण दोन दोन आज्ज्यांचा पहारा असताना आमची काय बिशाद ते न खायची! एकूण सगळच उपासिक वातावरण. आनंदी आनंद. अचानक बिल्डीन्गमधल्या पोरांची टूम निघाली चला विठ्ठलवाडीला जाऊया, जत्रा आहे! मग काय आज्ज्यांकडून तात्पुरते पन्नासेक रुपये घेऊन (उपास मोडायचा नाही, एकमेकींचे हात सोडून लांब जायचे नाही, रस्त्याच्या कडेनी जायचे, कडेनी यायचे,रस्ताक्रोस करायचा नाही असा वचनांचा पोवाडा गाउन झाल्यावर मिळालेली बिदागी ), आरडा ओरडा करत, आमची ५-६ जणांची दिंडी जत्रेत.

पावसाने रस्ता ओला चॉकलेटी झालेला, पण झाडे मात्र नवीन ड्रेस घातल्यागत एकदम खुशीत डोलत उभी. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलं आनंदात असतात तशी. लांबूनच विठ्ठलवाडीच्या देवळात मोठ्याने लावलेली देवाची गाणी ऐकू येत असल्याने, शिवाय दिवसभराच्या उपासाचा परिणाम असेल म्हणून आपण एकदम भक्तिभावाने देवाच्या दर्शनाला चाललो आहोत असा आमचा समज झाला आणि आम्ही एकदम ओढीने झपझप पावले उचलायला लागलो. विठ्ठलवाडी एकदम नवरीसारखी नटून थटून बसलेली आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. मंडप काय, पताका काय, झेंडे काय धमाल नुसती. जसजसे वेशीपाशी गेलो तसे अधिकच उत्साही होत चाललो. वेशीवरचा गरूड आज पहिल्यांदाच पाहिला. मोठीच्या मोठी विमाने, उंच आकाशपाळणा,मौत का कुंआ, भविष्य सांगणारा रोबोट सगळे वेशीतून आत गेल्यावर लगेचच दिसले. आम्ही खूप खुश झालो. मुळात आमचे असे कुठले खेडेगाव नसल्याने, ही अशी जत्रा, उरूस पहिल्यांदाच पाहत होतो. चतु:शृंगीला जायचो, पण ते रात्री आई बाबांसोबत. तिथे लाईनमधे उभे राहण्यात इतका वेळ जायचा की जत्रा फिरण्यासाठी पायात ताकदच नसायची.

कुठून बरं सुरुवात करावी? नक्की ठरवण्यासाठी आम्ही बाजूला थांबलो आणि समोरची गर्दी पाहत राहिलो. लोंढेच्या लोंढे आत जात होते, बाहेर जात होते. किंचित धक्का बुक्की होत होती पण सगळे हसत होते. त्यात आमच्यासारखी मुलं होती. पण त्यांना आम्ही कधीच या भागात, जवळपास कुठे फिरतानाही पहिले नव्हते. ते सगळे नवे, वेगळेच लोक होते. पार लांबून कुठून तरी आल्यासारखे. ती सगळी काळी बेंद्री खेडवळ पोरं पाहून पहिल्यांदा आम्हाला बिचकायलाच झालेलं. त्यांचे ते केशरी पोपटी चमचमते कपडे, अगम्य भाषा, नखशिखांत सोनेरी झालेल्या त्यांच्या आया ताया हे पाहून आम्ही गडबडलोच. पेशवे पार्कात पिंजर्‍यातले प्राणी आणि आपण जसे नुसतेच एकमेकांकडे पाहत असतो तसे आम्ही आणि ते एकमेकांकडे बघत राहिलेलो. पण मग आता एवढ्या लांब चालत आलो आहोत, ते ही देवाच्या दर्शनाला, म्हटल्यावर मागे हटून कसं चालेल? आम्ही पण त्या गर्दीत घुसलो. दोन्ही बाजूला असंख्य दुकाने, त्यात असंख्य वस्तू, त्या घेण्यासाठी असंख्य गिर्‍हाईके आणि त्यांची अखंड बडबड. त्या दुकानात बंदुका, धनुष्यबाण, पिसांची टोपी, बाहुल्या, टिक टिक, केमरे, घड्याळे, जीपगाड्या, कार, फुगे.. काय वाट्टेल ती खेळणी दाटीवाटीने होती. नटण्याचे सामान तर विचारू नका. कानातले, गळ्यातले बांगड्या, टिकल्या, क्लिपा, पिना, हेअरबँड, रबर, नेलपेंट, गंध हजारो गोष्टी. आम्हाला अक्षरश: भुरळ पडली. आमच्यापैकी प्रत्येकाला हवी असलेली एकतरी वस्तू प्रत्येक दुकानात असणारच. पण पुढच्या दुकानात आणखी चांगली मिळाली तर? जवळ पैसे तर थोडेच. काही घेऊन, काही न घेऊन आम्ही पुढे पुढे चाललेलो. शिवाय, त्या खेळण्यांमध्येही बसायचे होतेच. एका दुकानात एक रंगीत पाणी आणि त्यात चमचम असलेली लांब काचेची नळी होती. तो माणूस ती सारखी उभी आडवी करत होता. त्याबरोबर तिच्यातली चमचम, चांदण्या मस्त पैकी घरंगळत या टोकापासून त्या टोकाकडे जात होत्या. त्यांची ती खळबळ धावपळ शांत व्हायला कितीतरी वेळ लागत होता की पुन्हा नळी हालणार. परीच्या हातातली जादूची कांडीच! मला ती खूप आवडली. ताई म्हणाली, "काय उपयोग आहे याचा? उगाच काहीतरी घेऊ नकोस!" पण मी हट्टाग्रह केला आणि ती कांडी हस्तगत केलीच. घरी गेल्यावर इतर सगळ्या वस्तूंपेक्षा मला तिचंच जास्त अप्रूप वाटत होतं.

जत्रेत मध्येच हातगाड्यांवर कुल्फी, ती भयानक लाल रंगाची शेव, हिरव्या प्लास्टिक वर ठेवलेल्या पांढर्‍या शुभ्र खरवसाच्या वड्या, भाजक्या शेंगा, खारे दाणे तिखट दाणे लक्ष वेधून घेत होते. आज्जीला दिलेले वचनही स्मरणात होते. पण जत्रेत येऊन काही न खाता जाऊन कसे चालेल? म्हणून मग भाजक्या शेंगा घेतल्या. पावसात त्या गरम गरम शेंगांनी एकदम उबदार वाटले. पाच पाच दहा दहा रुपयाच्या खूप गोष्टी घेतल्या. वेगवेगळ्या चक्रांमध्ये बसलो, आनंदात, घाबरत ओरडाआरडा केला. आम्ही सगळेच जणू उतू जात होतो. तोपर्यंत विठ्ठलाच्या देवळापाशी आम्ही येऊन पोहोचलो होतो. पण दर्शनाची रंग बघून आम्ही मटकन खालीच बसायचे राहिलो. त्या मारुतीच्या शेपटीचे टोक पार वेशीच्या बाहेर कुठेतरी दुमडले होते. आणि आता एवढी खरेदी करून आम्ही दमून गेलो होतो. देवाला बाहेरूनच "देवा आम्हाला माफ कर" असे म्हणत नमस्कार केला आणि घरी आलो. देव खूप दयाळू असतो. त्याने आम्हाला आजवर दरवर्षी माफ केले आहे.

त्यानंतर जवळपास दरवर्षी आम्ही जात राहिलो. मग कॉलेजमध्ये गेल्यावर त्यातली मजा, गंमत कमी झाली आणि ते मागे पडले. नोकरी सुरु झाल्यावर तर सुट्टी नव्हती आणि संध्याकाळी त्या जत्रेमुळे होणार्‍या ट्राफिक जामने डोके उठवले. मधल्या बहिणीचे लग्न झाल्यावर तिचं 'मोठं घर' साक्षात विठ्ठलाच्या देवळासमोर! त्यामुळे आषाढी हा त्यांच्याकडे एखादा सणच! सगळे नातेवाईक येणार, लहान मुलांना घेऊन जत्रेत फिरवून आणणार. उपासाच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल आणि सर्वाना आग्रहाचं आमंत्रण. त्यांचा आग्रह मोडायचा नाही म्हणून तरी तिथे जाऊ लागलो अन मग पुन्हा एकदा जत्रेशी नातं जोडलं गेलं.

परवाच्या आषाढीला सुट्टी आली आणि नेहमी उभ्याउभ्या तोंड दाखवून पळणारी मी खूप वेळ काढून तिथे गेले. ताई पण आली होती. मी येईतो भाचे कंपनीचे कधी आईसोबत, मावशी, काकू, आत्या सोबत, आजी आजोबांसोबत तीन वेळा तरी जत्रेत फिरणे झाले होते. त्यामुळे आम्ही तिघीच जत्रेत फिरायला गेलो. त्याच वस्तू, तीच दुकाने, आणि तशीच गर्दी. आम्ही थोड्या मोठ्या झालेल्या पण तरीही तिथे रमलेल्या. आता खेळण्यांकडे, आकाश पाळण्यांकडे लक्षही नव्हते. एकमेकींसाठी, मुलांसाठी काही न काही घेण्याची जणू स्पर्धाच लागली होती आमच्यात. आता फरक एवढाच होता कि फक्त ताईकडे पैसे नव्हते तर तिघींकडेही पर्स होत्या. पण माझ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे कर्तव्य त्या दोघी प्रामाणिकपणे बजावत होत्या. फार काय भारी नव्हत्या त्या वस्तू, पण जत्रेतून घेतलेल्या म्हणून त्यांचं कौतुक. किती रंगांच्या, डिझाईनच्या बांगड्या घेतल्या, हेयरबंड, क्लिपा, पर्स.. काहीही. आता खेळण्यांमध्ये डॉरेमोन,बाल गणेश, हनुमान यांची भर पडली होती. पण केमेरे, टिकटॉक, गल्ले सुद्धा होते. मला तर मॅडसारखं सगळंच घ्यावंसं वाटत होतं. काही घेऊन काही ठेवून आम्ही जत्रा फिरत होतो. कुणीतरी दहा हजार रोपं वाटायचा संकल्प केला होता. ताई रांगेत थांबून कितीतरी रोपं घेऊन आली. गुलाब, बेल, बटमोगरा, अनंत, जाई काय काय! घरी आल्यावर मुलांना सगळी खेळणी देताना आणि त्यांचा आनंद बघताना आपण मोठे झाल्यासारखं उगाचच वाटलं..

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आई जाणार होती त्यांच्याकडे. आईला सोबत म्हणून माझी पुन्हा जत्रेत यात्रा. मी आणि बहीण हसत हसत आईला म्हणालो, "आई, आम्ही सकाळीच एवढे काय काय घेतले आहे कि आता आणखी काही घेण्याचीही लाज वाटते!" तेव्हा ती आमच्यासोबत आहे तर कसली चिंता! असे तिने आश्वासन देताच आम्ही दुप्पट उत्साहाने त्या गर्दीत घुसलो. सकाळी आमचा सगळा वेळ मुलांसाठीच काय काय घेण्यात गेला असल्याने आता मात्र आई कडून आमच्या तिघींसाठीही कानातले, क्लिप असे बरेच काय काय घेतले. शिवाय आईने नातवंडांसाठी पण पुन्हा आणखी काही घेतले. चंगळ होती बेट्यांची! आम्ही म्हणू ते आई घेत होती. येताना तर चक्क कुल्फी ही! अचानक मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटले. आणि लक्षात आले, आज पहिल्यांदाच आई आमच्यासोबत जत्रेत आली होती!

घरी आल्यावर पाय इतके दुखत होते कि सहलीवरून आलेल्या शाळकरी मुलागत दहालाच झोपून गेले. झोपताना कानात तो पिपाण्यांचा, भक्तीच्या गाण्यांचा, पोरांच्या हसण्याचा, रडण्याचा, विक्रेत्यांचा कोलाहल आणि असंख्य रंगांचे कोलाज डोळ्यासमोर होते. दिवसभरात लक्षही न गेलेला उंच आकाशपाळणा आता अगदी स्पष्ट दिसला. सकाळी लवकरच जाग आली आणि काल घेतलेल्या वस्तू पुन्हा एकदा बघायचा मोह झाला. काही दोन्ही बहिणींनी, आईने घेतलेल्या, काही मी स्वत: घेतलेल्या. त्यांचे ते चमकते रंग पाहून मला पहिल्यांदा जत्रेत गेल्यावर घेतलेल्या त्या जादूच्या कांडीची आठवण झाली. अचानक मोठं आणि अचानक लहान करून टाकण्याची काहीतरी जादू नक्कीच होती तिच्यात!

गुलमोहर: 

Pages