भुजणं

Submitted by अवल on 15 June, 2012 - 01:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोळंबी सोडून इतर कोणतेही मासे. इथे मी ३ बांगडे घेतलेत.
लसणाची एक गड्डी
२ लिंबांइतक्या चिंचेचा कोळ( बांगडा जरा हरवस-स्ट्राँग असतो, म्हणून जास्ती, अन्यथा निम्मा.)
तिखट २ चमचे
मीठ चवी प्रमाणे
हळद १/२चमचा
कांदे २
बटाटे २
तेल २ चमचे

क्रमवार पाककृती: 

मासे स्वच्छ धुवून त्याला हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, लसूण वाटून लावुन ठेवावे.
बटाट्याची साले काढून त्याच्या जरा जाड चकत्या कराव्यात.
कांदे उभे चिरुन घ्यावेत.
जाड बुडाचे पसरट भांडे ( लगडी) किंवा फ्रायपॅन मध्ये तेल टाका. त्यावर बटाट्याचे काप पसरा. तळ पूर्ण झाकला गेला पाहिजे. आता त्यावर कांदा पसरा.
आता त्यावर मसाला लावलेले मासे ठेवा. घट्ट बसणारे झाकण लावा, त्यावर जड वजन जसे बत्ता/ जाड तवा ठेवा. वाफ बाहेर जाऊ नये यासाठी.
आता हे भांडे मंद आचेवर ठेवा. साधारण १५ मिनिटांनी झाकण काढून अगदी हलक्या हातांनी फक्त मासे पलटवा. पुन्हा झाकण, त्यावर वजन ठेवा.
१० मिनिटांनी गॅस बंद करा. झाकण इतक्यात काढू नका.
पानं घ्या.
आता झाकणावरचे वजन काढा. झाकणासह भांडे टेबलावर आणा.
आता झाकण काढा. वाढताना मासा, खालचा कांदा अन खरपुस बटाटा असे एकत्र उचलून वाढा. गरम चपात्या, भाता बरोबर फस्त करा Happy

वाढणी/प्रमाण: 
तिघांनी पुरवून पुरवून खावा :-)
अधिक टिपा: 

भात, सोलकढी बरोबर भुजणं ! अप्रतिम सुंदर. दिसायलाही अन चवीलाही

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक सीकेपी पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.... भुजणे असे असते होय? मी आजवर फक्त गोष्टींमध्ये उल्लेख वाचलेला.. करुन बघायला हवे..

रच्याकने, हे कोळंबीचेही छान लागेल की... कोलंबी नको असे का लिहिले??

वॉव, सह्हीच अवल. मस्तय रेसिपी. आमच्याकडे कधी नाही झाली. Sad

आमच्याकडे निवट्यांचं भुजणं व्हायचं पण ते बटाट्याशिवाय (आणि हळदीशिवाय पण लाल तिखट, ओलं खोबरं घालून. हा एक भारी आयटेम आहे हे नमुद करते.) आणि बटाट्याचं भुजणं व्हायचं ते माश्यांशिवाय.

हे बटाट्याचं भुजणं (कांदे, बटाटे, हिरवी मिरची, हळद, मीठ, ओलं खोबरं, सढळ हातानं घातलेलं तेल) गरमागरम मुगाच्या खिचडीबरोबर मस्त लागतं. बरोबर एक भाजलेला पोह्याचा पापड. Happy

मी आजवर फक्त गोष्टींमध्ये उल्लेख वाचलेला.. करुन बघायला हवे..>> +१. करुन पहायला पाहिजे.
अवल फोटो कुठेय?
मामींचे बटाट्याचे भुजणेही इंटरेस्टींग वाटतय. Happy

1339739603977.jpg

कोळंबी जास्ती वेळ शिजवली की वातड होते, अन बटाटा शिजायला जास्ती वेळ शिजवावे लागते. अन बटाटा,कांद्या शिवाय माश्याचे भुजने होत नाही. म्हणून कोळंबी कटाप Happy

माझ्या सासूबाई सुद्धा भुजण करतात. पण ते खुपच वेगळ्या पद्धतीने. बटाटा, अंड किंवा कोळंबीचा वेगळ्या प्रकारचा रस्सा. तो एक typical authentic पाठारे प्रभू खाद्य प्रकार आहे.

लवकरच त्याची Recipe टाकेन.

हे सुद्धा interesting दिसत आहे. मला fish चालत नाही म्हणून फक्त भाज्यांचे करून पहायला पाहिजे.

अवल.. असं असतं तर भुजणं.. सोबत दिलेला मेन्यू पण तोंपासु आहे ..
मामी .. वाढून ठेव.. आलेच... Happy .. (पण मला वेज नको कै पण Wink )

माझ्या सासूबाई सुद्धा भुजण करतात. पण ते खुपच वेगळ्या पद्धतीने.>
अगदी अगदी. आमच्याकडे पण वेगळ्याच पध्दतीने बनवतात.

अवल.... आजच भुजणं केलं होतं.फक्त बांगड्यांचं नाही तर बोंबलांचं Happy इथे सध्या बोंबिल गर्दी करुन आहेत.
IMG_2370 1.jpg

अवल, आम्ही दैवज्ञ फक्त कोलंबीचेच भुजणे करतो. माशांचे नाही करत. अंशा, काय मस्त फोटो आला आहे. तोंपासु. तु अवलने वर दिलेल्या पद्धतीने केलेस का?

तिव्र निषेध !!!

ईतके कातील फोटो आणि पाक्रु टाकाल तर आमच्या सारख्या बाहेर जेवणार्याच कस होणार ?

एक मासे प्रेमी !!

लिखाण बुकमार्क केले आहे. रविवारी करण्यात येईल!

तोपर्यंत काही शंकांचे उत्तर मिळेल काय?
>>
घट्ट बसणारे झाकण लावा, त्यावर जड वजन जसे बत्ता/ जाड तवा ठेवा. वाफ बाहेर जाऊ नये यासाठी.
<<
१. हे प्रकरण कुकर मधे थोडे शिजवले १ शिटी होईपर्यंत तर चालेल का?

२. ३ बांगडे, म्हणजे साफ करून किती ग्रॅम/किलो साधारणतः?
(आमच्याकडे फक्त गोड्यापाण्यातले -धरणाच्या- मासे मिळतात.)

विद्याक.... मी अवलप्रमाणेच केले फक्त पॅनमधे तेल टाकल्यावर लसूण फोडणीत टाकला व जेव्हा मासे बटाट्यावर लावले तेव्हा हिरव्या मिरचीचे ४ तुकडे त्याबरोबर घातले व भरपुर कोथिंबिर पेरली.
विवेक नाईक.... Happy

मस्त पाकृ अवल! Happy
अंशा, फोटो प्लीज मोठा पोस्टता का?
थंबनेलच इतका जीवघेणा आहे की मोठा फोटो बहुतेक मोक्ष देणार Happy

bhujn.jpg
पाणी थोडं जास्त सुटलं होतं. पण चव सुंदर होती. भुजण्याची ओरिजिनल चव कधीही घेतली नसल्याने ठाऊक नाही, पण ही चव सर्वांना आवडली.
पापलेटचं केलं आहे. (कुकरमधे करण्याबद्दल व माशाच्या क्वांटीटिबद्दल कुणीच गाईड केले नाही. इब्लिस आयडीने जेन्युइन शंका विचारू नयेत असे आहे का?)