अगदी सुरुवातीलाच नमूद केले पाहिजे कि ह्या लेखाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. हा शोधनिबंध नव्हे, आहे केवळ एक तार्किक कल्पनाविस्तार. वाचून सोडून द्यायचा... पण तरीही, कदाचित....
कसं आहे, माणूस हा उत्क्रांतीचा सर्वात प्रगत टप्पा आहे असे आपण (म्हणजे आपणच) सतत घोकत असतो. पण ते कितपत योग्य आहे? उत्क्रांती हा प्रगतीचा समानार्थी शब्द नव्हे. उत्क्रांती म्हणजे जीवनसंघर्षात तगून राहण्यासाठी सजीवांनी निसर्गानुरूप स्वत:त केलेले यशस्वी बदल. उत्क्रांतीमुळेच जिराफाचे पाय आणि मान लांब झाली आणि याक केसाळ झाला. असे परिणाम माणसात दिसत नाहीत. वर्षानुवर्षे वाळवंटात राहून सुद्धा पाणी साठवून ठेवण्याचे कोणतेही एक्स्टेन्शन माणसाकडे नाही. बर्फाळ प्रदेशातल्या माणसाच्या अंगावर लोकर उगवली नाही. मग माणूस उत्क्रांत कसा?
तुम्ही म्हणाल, माणसाची उत्क्रांती त्याच्या मेंदूत दडली आहे. माणसाचा अती-बुद्धीमान मेंदू आणि त्याने लावलेले अचाट आणि अफाट तांत्रिक आणि वैज्ञानिक शोध यांचे तुम्ही दाखले द्याल. मला आपल्या मेंदू बद्दल नितांत आदर आहे. पण हे शोध खरच इतके अचाट आहेत? आज माणूस उडू शकतो, पण त्यासाठी त्याला विमान, विमानतळ, airgas, पायलट, एअर होस्टेस (हा शोध मात्र खरच आकर्षक आहे) अशा अनेक गोष्टींची गरज पडते. त्यातही ह्या फ़्लाईट कधीही रद्द होतात आणि त्यांचे पायलट कधीही संपावर जातात... पक्षी मात्र नुसते पंख पसरले कि उडू शकतात (आणि तेही फुकट). उडण्यासाठी माणसाला करावी लागणारी काळ-काम-वेगाची गणिते पक्ष्यांना करावी लागत असतीलच की. पण ते ही गणिते अद्ययावत संगणक आणि रडारशिवाय निव्वळ अंत:प्रेरणेने करतात. आहे ना गंमत!
आता मधामाशीच बघा, राणीमाशी पोळे सोडून गेली आणि तिने दुसरीकडे घरोबा केला की ह्याच अंत:प्रेरणेच्या जोरावर इतर कामकरी माश्या तिचा माग काढत तिच्यापर्यंत पोचतात. आणि हा संपर्क कुठल्याही मोबाईल नेटवर्कच्या मदतीशिवाय होतो. म्हणजे, राणीमाशीने आपला नवीन पत्ता कामकरी माश्यांना sms केल्याचे ऐकिवात नाही. कुत्रे निव्वळ वासावर कितीही लांबून त्यांच्या घरी परत येतात. रस्त्यावर पत्त्याच्या पाट्या नसतील आणि इतर लोकांची भाषा अवगत नसेल तर माणूस अपरिचित ठिकाणाहून परत येऊ शकेल का?
हं, भाषा... मी तुम्हाला अजून एक मुद्दा पुरवला. भाषा हा माणसाच्या प्रगतीचा महत्त्वाचा पुरावा आहे असे तुम्ही म्हणाल. खरय, जगात जितक्या जमाती तितक्या भाषा सापडतील. अनेक भाषांमध्ये संपन्न, समृद्ध साहित्यही आहे. पण इतकी शब्दसंपत्ती असूनही अगदी जवळच्या दोन माणसांना सुद्धा एकमेकांत संवाद साधता येत नाही, संवादकलेच्या कार्यशाळा घ्याव्या लागतात. म्हणजे माणसाची फक्त भाषा प्रगत झाली, संवाद मागासलेलाच राहिला. ह्याउलट, इतर प्राण्यांना ही शब्देविण संवादु ची कला सहज अवगत झाली आहे. वासरू हंबरलं की गायीला आपोआप पान्हा फुटतो. नुसत्या 'म्याऊ' मधून मनीला बोका काय म्हणतोय ते कळतं. प्रेम प्रकट करण्यासाठी आपण प्रेमपत्र लिहितो. कथा, कादंबऱ्या, नाटक, सिनेमे, हे तर प्रेमाचे कारखाने. आपण प्रेमकविता लिहितो, त्यांना चालीसुद्धा लावतो. आणि तरीही दोन पक्ष्यांमधला प्रणय (पक्षी, पक्ष नव्हे. पक्ष प्रणय न करता फक्त युती करतात) ह्या सर्वांपेक्षा कितीतरी देखणा असतो. तुम्ही म्हणाल पक्ष्यांकडे क्षमताच नाही कादंबऱ्या लिहिण्याची. त्यांना गाण्यातून अभिसार करता येतच नाही. वर्षानुवर्षे कोकीळ एकाच प्रकारे कूजन करतोय. (कोकीळ की कोकिळा?) माणसाने मात्र आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर सुरांचा समुद्र निर्माण केलाय. हं! आहे खर. पण कोकिळेच्या पंचमाची सर ह्या कशाला आहे का? एकही कोकीळ बेसूर गात नाही. (हवं तर देवकीताईंना विचारा) आणि आवाज तयार करण्यासाठी कोकीळबुवा पहाटे तंबोरा घेऊन रीयाझाला बसल्याचं कुणी पाहिलं नाहीये. त्याचा सूर जात्याच परिपूर्ण आहे, कदाचित ह्या सूरसागराचं मंथन त्यांनी पूर्वीच केलय आणि 'कुहू' नावाचं अमृत त्यांच्या हाती लागलय. आपण मग उरलेला समुद्र घुसळत बसलोय!
….आणि तरीही माणूस ह्या सर्वांपेक्षा प्रगत? म्हणजे... असेलही. कारण ह्या लेखाला शास्त्रीय आधार नाही. पण तरी....
तुमची गाडी प्रेमावरून भावनेच्या स्टेशनवर आली असेल. माणूस प्रेम करतो, नाती जोडतो, अख्खी समाजव्यवस्था बनवतो. ह्यापेक्षा जास्त कुठला पुरावा? पण... इथे एक गोम आहे. माणूस अनेक गोष्टीत गुंतून बसतो. मग आपलं माणूस हरवलं की त्याला दु:ख होतं, अपमानाची चीड येते, दुसऱ्याचा हेवा वाटतो. ह्या भावनिक गुंत्यात माणसाचा कम्प्लीट अर्जुन होऊन जातो. आणि मग जीवनाच्या मायामोहातून त्याची सुटका करण्यासाठी साक्षात भगवंतांना अवतार घेऊन गीता वाचावी लागते. प्राण्यांच्या आयुष्यात देवाने अशी लुडबुड केल्याचे ऐकिवात नाही. आणि तरीही ते ही गीता खरोखर जगत असतात. निगुतीने, कष्टाने मोठी केलेली पिल्ले, त्यांच्या पंखात बळ आलं आणि त्याचं आकाश गवसलं की उडून जातात. तेव्हा पक्षी दु:ख करत नाहीत. थोड्याच वेळापूर्वी आपल्याबरोबर बागडणाऱ्या एखाद्या हरणाला वाघाने कंठस्नान घातले की इतर हरणे अश्रू गाळत नाहीत, किंवा 'तूने मेरे दोस्त को मारा, मै तेरा खून पी जाउंगा' असे म्हणत वाघावर झेप घेत नाहीत. ‘त्या हरणाचा वेग वाघापेक्षा कमी होता म्हणून ते मेलं. आपण तर वाचलो, चला!’ इतक्या दोन वाक्यात त्यांची श्रद्धांजली आटपते. वाघ सुद्धा ‘ही हरणं निवांत झालीयेत तर बेगमीसाठी अजून एखादं हरीण आत्ताच मारून घेऊ’, असा रडीचा डाव खेळत नाही. प्राण्यांच्या राज्यात कपट नाही, म्हणूनच गुन्हेही घडत नाहीत. कपाटाचा जन्म मोहातून होतो आणि प्राण्यांना मोह नसतात. ते खऱ्या अर्थाने वर्तमानात जगतात. भविष्य आसक्ती निर्माण करतं. प्राणी मात्र विरक्त असतात. कृष्णाला अभिप्रेत असलेला निष्काम कर्मयोग आपण फक्त अभ्यासतो, प्राणी तो जगत असतात. म्हणजेच, मोक्षाच्या वाटेवरही ते माणसाच्या काकणभर पुढेच आहेत. आणि तरीसुद्धा आपण त्यांच्यापेक्षा प्रगत?? अर्थात हा शोधनिबंध नाही.. पण तरीसुद्धा...
उत्क्रांतीच्या मुद्द्यावर परत यायचं तर इथेही माणूस हा अपवादच वाटतो. इतर प्राण्यांनी स्वत:ला निसर्गाप्रमाणे बदललं. माणूस मात्र निसर्गाला स्वत:प्रमाणे बदलण्याचा अट्टाहास करतोय. म्हणूनच की काय तो निसर्गावर एक ओरखडा बनून राहिलाय. उत्क्रांतीच्या लाटेत नको असलेल्या गोष्टी नष्ट होतात म्हणे. कदाचित करोडो वर्षांपूर्वी इतर प्राण्यांचा मेंदूही माणसासारखा असेल. पण जसजशा त्यांच्या अंत:प्रेरणा जागृत झाल्या तसतशी त्या मेंदूची गरज कमी होत गेली असेल. नंतर एका क्षणी हा प्रगत मेंदू गळूनच पडला असेल. शिल्लक राहिला असेल अंत:प्रेरणा सांधणारा एक छोटासा धागा. आज त्यांचे प्रत्येक इंद्रिय हा एक परिपूर्ण मेंदू असू शकतो. मग वेगळा cerebral cortex हवा कशाला? माणसाने ह्या तथाकथित प्रगत मेंदूला कवटाळून ठेवणं सोडलं तर कदाचित त्यालाही त्याच्या अंत:प्रेरणा गवसतील. मग कदाचित तोही इतरांसारखा आत्ममग्न होईल.
ह्या लेखाला कोणताही शास्त्रीय आधार नाही, हा आहे निव्वळ एक तार्कीत कल्पनाविलास... पण तरी... कदाचित....
--
स्मिता अभ्यंकर
मंजिरी वेदक
(पूर्वप्रकाशितः स्नेहदीप, एप्रिल २०१२, न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळ)
कदाचित करोडो वर्षांपूर्वी इतर
कदाचित करोडो वर्षांपूर्वी इतर प्राण्यांचा मेंदूही माणसासारखा असेल. पण जसजशा त्यांच्या अंत:प्रेरणा जागृत झाल्या तसतशी त्या मेंदूची गरज कमी होत गेली असेल. नंतर एका क्षणी हा प्रगत मेंदू गळूनच पडला असेल. शिल्लक राहिला असेल अंत:प्रेरणा सांधणारा एक छोटासा धागा. आज त्यांचे प्रत्येक इंद्रिय हा एक परिपूर्ण मेंदू असू शकतो. मग वेगळा cerebral cortex हवा कशाला? <<< इंटरेस्टींग!
बाकी लेख (लेखात म्हटल्याप्रमाणे) तार्कीक कल्पनाविलास म्हणूनच वाचला.
मला पण असेच वाटतेय. इतकी
मला पण असेच वाटतेय. इतकी शब्दसंपदा असून माणसामाणसात म्हणावा तसा "सुसंवाद" होताना दिसत नाही.
शास्त्रीय आधार नसला, तरी लेख आवडला.
मनी खुप आवडला लेख.. तार्कीक
मनी खुप आवडला लेख.. तार्कीक आहेत तरीपण मुद्दे खुप पटतात.
(No subject)
अगदी सुरुवातीलाच नमूद केले
अगदी सुरुवातीलाच नमूद केले पाहिजे कि ह्या लेखाला कोणताही शास्त्रीय आधार नाही>>> ह्या वाक्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन, तुमच्या लेखाचा शास्त्रियदृष्ट्या प्रतिवाद करायचा प्रश्नच त्यामुळे निकालात निघाला.
छान लिहिले आहे. शास्त्रीय
छान लिहिले आहे. शास्त्रीय आधार क्लेम न केल्याने जास्त आवडले.
Terry Pratchett चे एक वाक्य आठवले (Equal Rites, 1987) :
Animals never spend time dividing experience into little bits and speculating about all the bits they've missed. The whole panoply of the universe has been neatly expressed to them as things to
(a) mate with,
(b) eat,
(c) run away from, and
(d) rocks.
या सर्वाला अपवाद केवळ उत्क्रांत प्राण्यांचा, म्हणजेच मानव, डॉल्फीन आणि उंदीर.
सुंदर लेख.. आवडला. प्रत्येक
सुंदर लेख.. आवडला.
प्रत्येक घटनेला शास्त्रीय आधार लावण्याची/शोधण्याची अतार्कीकता केवळ मानवच करतो.. इतर सजिव मस्त आनंदात जगत असतात.
कृष्णाला अभिप्रेत असलेला
कृष्णाला अभिप्रेत असलेला निष्काम कर्मयोग आपण फक्त अभ्यासतो, प्राणी तो जगत असतात. म्हणजेच, मोक्षाच्या वाटेवरही ते माणसाच्या काकणभर पुढेच आहेत.
चला, असं वाटणारं आणखी कुणी आहे म्हणायचं. उपासना बीबीत यावर वाद झालेले आहेत.. मनुष्य प्राणी कर्मयोनी असून श्रेष्ठ आहेत, प्राणी हीन आहेत वगैरे तिथे कायम चालु असतं..
पण तिथं 'अस्लं' लिहिलं की अज्ञानी, भ्रमिष्ट, नास्तिक ... असली लेबलं लावून लिहिणार्याला ऑड मॅन आउट करतात...
अप्रतिम लेख, खूप आवडला .विचार
अप्रतिम लेख, खूप आवडला .विचार करायला लावते तुमचे हे लेखन ! धन्यवाद!!!
लेख आवडला. मजेशीर आहे.
लेख आवडला.
मजेशीर आहे.
छान लेख.. आवडला. कल्पनाविलास
छान लेख.. आवडला. कल्पनाविलास असला तरी विचार करायला लावणारा आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मधे एकदा ह्याच कल्पनेवरून सुरु झालेल्या आम्हा मित्रांच्या गप्पा भलत्याच गंभीर विषयावर जाऊन थांबल्या. एकाचं म्हणणं होतं, "मनुष्य सोडून कोणता असा प्राणी आहे ज्याच्यात समलिंगी आकर्षण ही भावना आढळून येते? किंवा माणसातली ती भावना नैसर्गिक असली तर इतर प्राण्यातही का दिसत नाही?" आणि त्यावर दुसर्यानी उत्तर दिलं "कारण मनुष्य प्राण्याचा मेंदू सगळ्यात प्रगत आहे आणि त्यामुळे तो चाकोरीबाहेर विचार करू शकतो म्हणून!!"
आवडला.
आवडला.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृष्णाला अभिप्रेत असलेला
कृष्णाला अभिप्रेत असलेला निष्काम कर्मयोग आपण फक्त अभ्यासतो, प्राणी तो जगत असतात. म्हणजेच, मोक्षाच्या वाटेवरही ते माणसाच्या काकणभर पुढेच आहेत. >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे भारी आहे. असा विचार केला नव्हता. मस्त
आपल्या प्रतिक्रियांबद्दल
आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्ताय.
मस्ताय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वश्रेष्ठ योनी वनस्पती,
सर्वश्रेष्ठ योनी वनस्पती, मध्यम योनी पशु पक्षी, अधम नीच योनी मनुष्य
Dhanyavaad
Dhanyavaad![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम युक्तिवाद म्हणता येईल
अप्रतिम युक्तिवाद म्हणता येईल या लेखाला. मझ्यामते हा कल्पना विस्तार नसुन कटुसत्य आहे.
लेख आवडला .
लेख आवडला .![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तूने मेरे दोस्त को मारा, मै तेरा खून पी जाउंगा'
पण हा पूर्ण पॅरा छान लिहिलाय .>>प्राण्यांच्या राज्यात कपट नाही, म्हणूनच गुन्हेही घडत नाहीत. कपाटाचा जन्म मोहातून होतो आणि प्राण्यांना मोह नसतात. ते खऱ्या अर्थाने वर्तमानात जगतात. भविष्य आसक्ती निर्माण करतं. प्राणी मात्र विरक्त असतात. कृष्णाला अभिप्रेत असलेला निष्काम कर्मयोग आपण फक्त अभ्यासतो, प्राणी तो जगत असतात. म्हणजेच, मोक्षाच्या वाटेवरही ते माणसाच्या काकणभर पुढेच आहेत.
विचार करायला लावते तुमचे हे लेखन ! धन्यवाद!!! +1