सुख म्हणजे नक्की काय हो ? तुम्ही म्हणाल , हीला काय झालं अचानक. एवढा गहन प्रश्न का विचारते आहे ?
नाही , त्याचं काय झालं, कि आत्ता या क्षणी मला काम करायचा अतिशय कंटाळा आला आहे. थाळीत भरपूर काम आहे [in my plate चं शब्दशः भाषांतर] त्यामुळे कायद्याने time-pass करु नाही शकत. येवढ्यातच सर्व servers धडधड खाली पडायला लागले आहेत [down हो] आणि network team ची पळापळ चालू आहे, त्यामुळे अशी न मागताच अचानक सुट्टी मिळाली याचा मला खुप आनंद झालाय.
बाकीचेही माझ्यासारखेच,अगदी असा काय चेहरा केला आहे एकेकाने,की जणू कीत्ती महत्वाची कामं करायची राहीली. असे गंभीर चेहरे करुन हळूच caffe च्या दिशेने सटकताहेत. तशी ही सुट्टी काही मिनिटांचीच,पण त्याच्यातही सुख आहे ना?
कालंच, गेले दोन महिने वाचत होते ते "Shantaram" वाचून संपलं, BTW, त्याविषयी लिहेन एकदा. तर चांगलं काही वाचलं की आनंद होतो की नाही ? त्यातून "Shantaram" मध्ये लेखक Gregory Devid Robert ने माझ्या लाडक्या मुबंईचं इतकं सुरेख वर्णन केलय, अरे हो एकदा मला मुबंई बद्दलही लिहायचं आहे.
आता माझा प्रिया काही दिवसांकरता परदेशी गेलाय, त्यामुळे मन थोडं उदास आहेच, पण तेव्हाच अचानक , ipod वर संदीप खरेचं "कसे सरतील सये,माझ्याविना दिस तुझे,सरताना आणि सांग सलतील ना?" लागलं आणि त्याही मनःस्थितीत ओठांवर हसु आलं. सुख म्हणजे दुसरं काय हो ? कुणावर आपण आणि आपल्यावर कुणी जीव तोडून प्रेम करतो,यातच कीती सुख आहे.
गेल्याच आठवड्यात ऐन office च्या दिवशी ,भुरुभुरु पावसात , central park मध्ये त्याच्याबरोबर हातात हात घालून फिरण्यातलं सुख काही औरच !!!
एखाद्या खास दिवशी मनापासून केलेला खास स्वयंपाक खूप छान झाला,आणि सर्व अगदी पोटभर जेवले की कीती आनंद होतो ?
किंवा, आईची खुप आठवण येत असताना ,तिच्याशी फोनवर बोलूनही समधान झालं नसताना, तिनेच पुर्वी लिहिलेलं पत्र अचानक पर्सच्या तळाला हाती लागतं तेव्हा तर डोळे आनंदाने भरुन येतात.
office च्या वाटेवर गाडीत पु.लं.ची बटाट्याची चाळ ,अंतु बर्वा, नारायण नाहीतर हरीतात्या यांची मजेशीर साथ आणि घरी आल्यावर,अनवाणी पायांनी फिरत असताना हातात वाफाळलेल्या चहाचा कप आणि एकाच वेळी दोन्ही सुपूत्रांचे चाललेले "शाळापूराण" , सुख म्हणजे दुसरं काय ?
अचानक फोन वाजतो आणि पलीकडून भारततून अचानक आलेल्या जुन्या मित्राचा आवाज आणि तो/ती आत्ता आपल्याला भेटू शकते ही बातमी , याहून वेगळे काय असते हो सुख ?
एखादा छानसा सिनेमा पाहीला किंवा मन गुंगवून टाकेल असा संगीताचा कार्यक्रम झाला की वाटतं त्याच धूंदीत रहावं.
मुबंईच्या सुट्टीत ,धो धो पावसात मरीन ड्राईव्ह वरुन चालताना उसळलेल्या समुद्राच्या लाटा अंगावर घेताना तर मन अगदी मोरासारखं नाचू लागतं.मला तर त्यावेळी वाटतं तो माझा लाडका समुद्र मला जवळ घेऊन म्हणतोय "किती दिवसांनी आलीस? कशी आहेस? आमची आठवण येते की नाही?" त्या क्षणी जे सुख मिळतं त्याची तुलना तुमच्या हवाईच्या vacation शी कशी होईल?
आमच्या मुबंईच्या पावसाला कुणी काहीही म्हणो, पण जून मधल्या पहिल्या पावसात गच्चीवर जाऊन, देह्भान विसरुन ओलंचिंब व्हायचं सुख कधी अनुभवलंय तुम्ही?
आणि इथला हिवाळा ?
तो आकशातून पडणारा कापूस ? कित्ती सुरेख दिसतो snow पडत असताना? जेव्हा भरपुर बर्फ पडलेला असतो तेव्हा कधी मध्यरात्री उठून पाहीलयं ? असं वाटतं आकाशात असंख्य चंद्र आहेत आणि ही धरा आपाल्या चांद्ण्याने भरुन टाकताहेत. अश्यावेळी मला कुसुमग्रजांचं प्रुथ्वीचे प्रेमगीत आठवते.
सुर्याची प्रेमयाचना करताना प्रुथ्वी म्हणते,
तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सूधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण....
बर्फ पडून गेल्यानंतर सुर्यदेव आले की चमकणारी झाडे पाहिली आहेत ? वितळलेल्या बर्फाने झालेला काचेचा रस्ता पाहीला आहे, हे नेत्रसुख जितकं ह्र्दयात साठावून ठेवावं तेवढं थोड्च.
सहा महीन्याच्या कडाक्याच्या थंडीनंतर,अजूनही भकास असलेल्या बागेत,हळूच लाजत लाजत उमलणारे Tulips पहाताना मन आनंदाने भरुन येतच ना ?
थोड्क्यात काय,सुख,आनंद प्रत्येक क्षणात लपलेला असतो, पण मग तरिही का आपण एवढा जीवचा आटापिटा करतो सुखाच्या शोधासाठी ? कबूल आहे की paycheck मिळाल्याचं सुखही असतच. फरक एवढाच की, ते धड्पड करुन मिळवायला लागतं आणि ती करत असताना आपण आजूबाजूचे छोटे छोटे सुखाचे क्षण हरवून बसतो. हो की नाही ?
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.