माझे "निवडक दहा" फोटोफिचर (थीम्स)

Submitted by जिप्सी on 5 May, 2012 - 08:14

"काय भन्नाट थीम आहे रे"
"योग्या तोडलसं रे मित्रा.. अक्षरशः तोडलंस"
"तुझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रचिंमध्ये ह्याचा नंबर सर्वात वरचा"
"फोटो आणि शब्द दोन्ही अ फ ला तु न"
"फोटोच्या वर्णनामुळे प्रत्येक फोटो वेगळा भासतोय.."
"जिप्स्या, जबरदस्त फोटो आणि लेखन!!!"
"प्रथम लिखाणाच्या शैलीचे कौतुक करावे की प्रकाशचित्रांचे ? अशा संभ्रमात पाडायला लावणारा हा धागा."
"फोटोग्राफीसाठी नजर लागते आणि आयुष्य जगायला नजरीया."
"अगदी प्रत्येक ओळ सुंदर... परत परत वाचावी आणि प्रिंट काढुन सुविचारांसारखी भिंतींवर चिटकवावी अशीच"
"अप्रतिम ! कल्पना, मांडणी आणि प्र.चि."
जिप्सी, खूप छान प्रचि. आणि त्याहुनही सुंदर फोटोंबाबतचं लिखाण. हॅट्स ऑफ मित्रा!
"प्रचि आणि गाण्यांची सांगड घालण्याची कल्पना खुप आवडली"
"सुंदर थीम आणि अतिसुंदर प्रचि!"
"मस्त कल्पना आणि मांडणी. अतिशय आवडलं"
"सगळेच अप्रतिम..आजपर्यंतच्या तुझ्या सगळ्या प्रचिंमधली सर्वात जास्त आवडलेली थीम"
"तुमच्या छायाचित्रांच्या थीम्स फार सही असतात!!"
"जिप्स्या, अप्रतिम कल्पना, फ़ोटो, कोलाज, कविता, वगैरे वगैरे"
"कौतूक करायला शब्द कमी पडतील इतकी छान कल्पना"

आतापर्यंत फोटो आणि त्याला साजेशी थीम घेउन जितके प्रचि प्रदर्शित केले त्याला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. कित्येक प्रतिसादांमुळेच प्रत्येक वेळेस नविन थीम्स सुचत गेल्या. मायबोलीकरांच उत्स्फुर्त प्रतिसाद हे नेहमी माझ्या नविन थीमसाठी इंधनाचे काम करत असतात. फोटो काढायला जरी मी स्वतःच शिकलो असलो तरी फोटो वाचायला मात्र मायबोलीने शिकवले. Happy. नेहमीच्या फोटोंपेक्षा काहितरी वेगळं देण्याचा माझा प्रयत्न नेहमीच होता, आहे आणि असणार. Happy

बर्‍याच लोकांनी मला विचारले कि तुला ह्या थीम्स सुचतात तरी कशा? फोटो तर प्रत्येकजण काढतो पण तो फार कमी लोकांना वाचता येतो. हे कसं काय सुचतं? तेंव्हा याच सगळ्या थीम्स मला कशा सुचत गेल्या तेच सांगण्यासाठी हा धागा. यात मी माझ्या आवडत्या दहा थीम्सबद्दल बोलणार आहे.

१. आयुष्यावर बोलु काही . . . .
"भटकंतीची आवड पहिल्यापासुनच. सह्याद्रिच्या कुशीत, देवळांच्या परिसरात, समुद्रकिनारी अगदी परदेशातहि मनसोक्त फिरलो. कधी मित्रांसोबत तर कधी फक्त कॅमेर्‍यासोबत. या सर्व भटकंतीमुळे माझ्याहि नकळत फोटोग्राफिचा "तिसरा डोळा" केंव्हा उघडला गेला ते माझे मलाच कळले नाहि. या तिसर्‍या डोळ्याद्वारे मला आता प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसु लागले आहे. अर्थात त्याला साथ मिळाली आहे ती मायबोलीकरांच्या प्रतिसादाची. एखादा वेगळा विषय, नवीन थीम्सद्वारे माझ्या कलाकृती घेऊन मायबोलीवर येऊ लागलो. त्याला प्रतिसादहि तितकाच चांगला भेटत गेला आणि याच प्रतिसादातुन प्रेरणा घेऊन काहि फोटोज मी चक्क वाचायला लागलो आहे......."
मायबोलीवरची माझी अत्यंत आवडती थीम. खरंतर आता हा धागा परत बघताना मलाच विश्वास बसत नाही कि हि कल्पना माझी होती. Happy फोटो आणि त्याद्वारे उलगडत जाणारे आयुष्य अशी हि थीम सहजच सुचत गेली. एके दिवशी शनिवारी काही कामानिमित्त ऑफिसला जावे लागले. काम झाल्यानंतर काही वेळ माझ्या हातात होता. मी काहि फोटो एकत्र केले होते आणि ते "सहजच एकदा क्लिक करताना..." या शिर्षकाखाली प्रदर्शित करणार होतो. अगदी मांडणीही तयार झाली होती, पण त्याच संग्रहातला एक "गोगलगायीचा" फोटो बघुन अचानक हि थीम डोक्यात आली आणि हातात असलेल्या अवघ्या तीन-चार तासात लेखन करून "आयुष्यावर बोलु काही" हा धागा तयार झाला. :-). माझे हे लिखाण आणि फोटो इतके लोकांना आवडेल असं त्यावेळेस वाटलं नव्हत, पण हि थीम प्रचंड लोकप्रिय झाली, इतकी कि बर्‍याच जणांना इमेलमधुनही यायला लागली. कित्येक जणांनी आपल्या ब्लॉगवरही याची लिंक दिली होती. काहिजणांनी स्वतःच्या नावावरही ब्लॉगवर प्रदर्शित केली. Happy इतकंच काय तर एकदा मलाही हे सगळं "must read till end" या शिर्षकांतर्गत एका ईमेलमधुन फॉरवर्ड होऊन आलं होतं. Happy

२. "मुक्त मी . . . . विमुक्त मी"
एकदा हिरानंदानी गार्डनमध्ये गेलो असता एका झाडाचा आणि सावलीचा फोटो काढलेला होता. सगळे फोटो परत चाळत असताना सहजच हि थीम सुचली. मग या थीमसाठी इतर फोटोंचा शोध घेत असतानाच सगळं सहजच सुचत गेलं आणि माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी हि थीम प्रदर्शित केली. यात "निसर्गाचे घटक आणि आपल्या सभोवती असलेल्या कित्येक गोष्टींपासुन खूप काही शिकता येते, फक्त तुमची नजर तेव्हढी तयार असली पाहिजे. त्याच्या सोबतीतच वाईट गोष्टींचा त्याग करून आणि चांगल्या गोष्टींचा स्विकार करावा" या अर्थाची हि थीम होती. अर्थात सगळ्यांनाच आवडली. Happy

३. गुजरा जमाना बचपन का......
माझ्या बर्‍याच थीम्स या सहजच फोटो चाळत असताना सुचलेल्या होत्या, पण हि थीम मात्र आधी सुचली आणि नंतर मी फोटो काढत गेलो. अगदी जिव्हाळ्याच्या या थीमसाठी फोटोहि तसेच शोधत होतो. यातील काहि फोटो मी स्वतः तयारी करून काढले आहे. उदा, पाटी/पेन्सिल आणि श्री, चांदोबा, खेळ मांडला, सापसिडी, चोर शिपाई, आठचल्लस (काचा कवड्या) साठी तर बाजारात जाऊन कवड्या विकत आणल्या होत्या तर गोट्यांचा फोटो राजमाचीला गेलो होतो तेंव्हा काढला (सोबत गोट्या घेऊन गेलो होतो :-)). हि थीम लोकांना आवडेल अशी खात्री होतीच आणि त्याप्रमाणेच या थीमलाही प्रचंड प्रतिसाद मायबोलीकरांकडुन मिळाला.

४. माझ्या मातीचे गायन...
या थीमला मात्र अनपेक्षित प्रतिसाद लाभला. हि थीम आवडेल असं वाटलेलं पण इतकी जास्त आवडेल असं वाटलं नाही. हि थीम पोस्ट केल्यावर अगदी काहि तासातच मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर आली, असं माझ्याबाबतीत पहिल्यांदाच घडलं. Happy (तसं माझ्या बर्‍याच थीम्स मुख्यपृष्ठावर आल्यात पण इतक्या लवकर येण्याची हि पहिलीच वेळ. :-)) जुने गडकोटांचे फोटो बघत असताना या महाराष्ट्रदिनाच्या निमित्त मायबोलीवर काय सादर करता येईल याचा विचार करत होतो तेंव्हा अचानक हि थीम सुचली. अवघ्या दोन दिवसात माझ्या संग्रहातील थीम प्रमाणे एक एक प्रचि निवडत गेलो आणि लक्षात आले कि निवडलेले प्रचि १८० पेक्षा जास्त होते. ते सगळे प्रचि एका भागात देणे शक्य नव्हते आणि मला हि थीम एकाच भागात आणि ते ही महाराष्ट्रदिनाच्या दिवशीच प्रदर्शित करावयाची होती. शेवटी मग फोटोंचे विषयाप्रमाणे कोलाज करून एकुण ४० फोटोंचा हा संच तयार झाला. मराठी गाणी आवडीची असल्याने तीच प्रस्तावनेत गुंफुली. कोलाज असल्याने लोकांना किती आवडेल हि शंकाच होती पण प्रतिसाद पाहता लोकांना आवडल्याचे लक्षात आले. Happy हि थीम बर्‍याच जणांनी प्रतिसादाद्वारे, विपुत आणि प्रत्यक्ष फोन करून आवडल्याचे सांगितले. फक्त दोन दिवसातच हि सगळी थीम तयार झाली.

५. जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है...
"इक प्यार का नग्मा है, मौजो कि रवानी है...जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है" हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. यातील "जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है" हि ओळ अतिशय आवडीची. याच शिर्षकावरून एखादे फोटोफिचर करता येईल का असा विचार करत असतानाच हि थीम सुचली. कर्नाटक भटकंती करत असताना आधीच सुचलेल्या या थीमवरून काही फोटो क्लिक करत गेलो आणि हे फोटोफिचर तयार झाले. माझ्या बहुतेक मित्रांना हि थीम प्रचंड आवडली (जे मायबोलीकर नाहीत, फेसबूकवर हि लिंक अपडेट केली होती. :-).

६. फरक
मायबोलीवरची माझी सगळ्यांना आवडलेली आणि १०० हुन अधिक प्रतिसाद मिळवलेली पहिली थीम. त्यावेळेस मायबोलीवर नविन होतो. जे काहि फोटो होते ते एक एक टाकत होतो. त्यातच मायबोलीवर एकाच धाग्यात जास्त फोटो प्रदर्शित करण्याचे माहित नव्हते. या थीमद्वारे मी पिकासाच्या लिंक देऊन "पावसाळा" आणि "उन्हाळा" या दोन ऋतुतील एकाच ठिकाणचे दोन प्रचि सादर केले होते. एकाच ठिकाणचे सौंदर्य पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात कसे असेल हे दाखवण्याचा प्रयत्न या थीम मध्ये होता. हि देखील सहजच सुचलेली थीम. याच थीमचा दुसरा भागही "पुन्हा एकदा फरक" या नावाने प्रदर्शित केला होता.

७. वेगवेगळी फुले उमलली . . .
मराठी गाणी आणि फोटोग्राफी दोन्ही विषय आवडीचे. त्यामुळे या दोघांची सांगड एकातरी थीममध्ये घालावयाचीचे अशी जबरदस्त इच्छा होती. एकदा रत्नागिरी भटकंतीला गेलो असता पिवळी अबोली दिसली आणि सहजच "ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा" हे गाण मनात आलं. पिवळी अबोली, रंग वेगळा यावरून आपल्याकडे असलेल्या संग्रहातील फुलांचे नाव एखाद्या गाण्यातुन देता आले तर? हि कल्पना सुचली आणि "वेगवेगळी फुले उमलली" हि अजुन एक थीम तयार झाली. यात मी प्रत्येक फुलांची ओळख हि मराठी गीतांमधुन करून दिली आहे. Happy
याचाच दुसरा भाग मी "मानसीचा चित्रकार तो" या नावाने प्रदर्शित केला.

८. मुकी अंगडी बालपणाची......जीर्ण शाल वार्धक्याची
हि अजुन एक थोडी वेगळी थीम. यात मी बालपण आणि वार्धक्य अशा दोन्हीची सांगड घातली होती. यातील प्रत्येक फोटो हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी काढलेला आहे. यावेळी काहि मोजकेच फोटो घेऊन "चेहरे" या शिर्षकांतर्गत प्रदर्शित ते सगळे सादर करणार होतो. पिकासावर फोटो अपलोडही केले होते पण प्रचि रीअरेंज करताना दोन प्रचिंमधील समानता जाणवली आणि "यावर एक थीम होऊ शकते" असा विचार आला. परत सगळे फोटो डिलीट केले आणि त्यातील हे मोजकेच १३ प्रचि घेऊन तासाभरातच वरील थीम मायबोलीवर सादर केली. Happy पण हि थीम आवडेल कि नाही याबाबत शंकाच होती कारण यात मी वार्धक्य थोडे जास्तच करूणपणे मांडले असे माझे मत होते. पण हि थीमही आवडली हे प्रतिसादातुन जाणवले. Happy

९. वासाचा पयला...पाऊस अयला...
पावसाच्या आधीपासुन, आकाशात काळे ढग जमण्यापासुन, पावसाचे थेंब, मोराचा पिसारा, धबधबे, ओली माती, पेरणीपासुन ते शहरात दाखल झालेला पाऊस असा या थीमचा विषय होता. हि थीमही आवडेल असे वाटले होते पण तेव्हढ्या अपेक्षा पूर्ण नाही करता आल्या असे वाटले. या थीममध्ये नक्की काय चुकल तेच समजलं नाही, काहि जणांनी तो शेवटच फोटो नको पाहिजे होता असंही (ईमेलमधुन) सांगितल होतं, पण इथे मला गावाशिवारातुन येणारा पाऊस शहरात कसा सक्रिय होतो हे दाखवायचे होते, कदाचित ते सगळं दाखविण्यात मी कमी पडलो. Happy पण हि सगळी मांडणी, हा विषय मला स्वतःला मात्र प्रचंड आवडला होती. Happy

१०.गाणी तुमची...गाणी "आमची"
विविध भटकंती दरम्यान प्राणी पक्षी यांचे फोटो काढलेले होतेच. ते सगळे एकत्रच काहिहि कॅप्शन न देता प्रदर्शित करणार होतो. प्रचि पिकासावर अपलोडही केले. मायबोली नविन लिखाणावर ब्राह्मणी घारीची लिंक पेस्ट करत असताना माझ्या प्लेलिस्टमध्ये या डोळ्यांची दोन पाखरे...." हे गाणं लागलं. तेच शिर्षक या फोटोला दिले, पण एकाच फोटोला शिर्षक आणि बाकीचे तसेच हे काहि पटत नव्हते म्हणुन मग लगेच फोटोला साजेशी गाणी आठवायला लागलो. मराठी गाण्याची आवड असल्याने पटापट गाणी सुचत गेली आणि हे फोटोफिचर तयार झाले. Happy

या सगळ्या थीम पुन्हा एकदा पहात असताना जाणवलं कि यातील बर्‍याच थीम सहजच सुचत गेल्या तर काहि अगदी ठरवून केल्या गेल्या. या सगळ्या थीम्स कशा सुचत गेल्या हेच सगळं इथे सांगायचे होते. माझ्या काहि काहि थीममध्ये प्रचि रीपीट होत गेले पण त्या फोटोफिचरची तशी मागणी असल्याने मी ही ते प्रदर्शित करत गेलो अर्थात तटी टाकतन. Happy

या व्यतिरीक्त मला माझ्या "गडकोटाचा राजा, महाराष्ट्र माझा", "कुठं कुठं जायचं "भिजायला"....", ""साथ" सागराची", "चैत्रचाहूल" आणि "ये कौन चित्रकार है..." या थीमही आवडलेल्या.

(तटि: थीम फोटोग्राफी करताना माझ्या मनात नेमके काय विचार होते तेच इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात कुठेही जुने धागे उकरून वर आणण्याचा किंवा आत्मस्तुती करण्याचा उद्देश नाही. Happy प्रचि विभागातच या सार्‍या थीम्स असल्याने इथे लिहित आहे. Happy )

गुलमोहर: 

सग्ळ्या आठवताहेत मला.

पण आता असे वाटतेय कि तू त्या विषयात जास्त गुंतावेस म्हणजे मग एकाच फोटोबद्दल, त्याच्या मागच्या
पुढच्या आठवणींबद्द्ल लिहिता येईल.

त्यानुसारच मी तूला, यू ट्यूबवरची हिडन अलास्का हि क्लीप बघायला सूचवले होते.
उत्तम फोटॉ आणि त्यासोबत त्या फोटोग्राफरचे अनुभव असे संकलन आहे ते.

जिप्स्या, जियो!!!

हे काम ब्येस केलस... तुझ्या वर दिलेल्यातल्या काहि थीम्स मी बघितल्या नाहियेत (कश्या मिसल्या काय माहित....) आता सगळ्या परत एकदा बघते Happy

तुला अश्याच छान छान थीम्स सुचोत आणि आम्हाला असेच मस्त मस्त फोटो बघायला मिळोत Happy

थँक्स आणि ऑल द बेस्ट!

जिप्स्या, मस्त लिखाण.(मागे वळून पहाताना.) Happy
तुझ्या सगळ्याच थीम एक से एक आहेत. तुला नेहमीप्रमाणे ____________/\_______________. Happy

हे काम ब्येस केलस... तुझ्या वर दिलेल्यातल्या काहि थीम्स मी बघितल्या नाहियेत (कश्या मिसल्या काय माहित....) आता सगळ्या परत एकदा बघते स्मित>>>>>>>>>लाजो + १.

जिप्सि
|\| यात कुठेही जुने धागे उकरून वर आणण्याचा किंवा आत्मस्तुती करण्याचा उद्देश नाही.\|\
अहो प्रेमात पडल्यावे जसे जुने एसेमेस वाचण्यातही मजा येते ना..तसाच अनुभव पुन्हा हे सरे धागे वाचताना आले..खुप खुप आभार..

जिप्सी, खरच सगळ्या थीम्स एक से एक आहेत...
मी पण काही मिसल्या आहेत.. त्या आता लगेच बघायलाच पाहिजेत ... Happy
पुढे पण नवीन नवीन थीम्स लवकरच बघायला मिळतील अशी खात्री आहे... Happy

कायम स्वरूपी जपून ठेवावा असा हा प्रकाशचित्रे + त्यावरील नेमके भाष्य यांचा देखणा ठेवा. यातील 'भविष्यावर बोलू काही....' हा एकमेव मी न पाहिलेले फोटोफीचर, जे आज या धाग्याच्या निमित्ताने पाहता आले.

जिप्सी यांची कलात्मक दृष्टी जशी चित्रे टिपण्यामध्ये स्पष्ट दिसून येते तद्वतच त्या त्या फोटोवरील त्यांचे मार्मिक टिपणीदेखील त्यांच्या मराठी भाषेच्या सौंदर्यावर असलेली पकड दर्शविते.

(माझे काही समवयस्क मित्र (टंकलेखन येत नसल्याने) इथे केवळ वाचनमात्र म्हणून येत असतात, त्यानीही मला आवर्जून या धाग्यामुळे त्याना झालेल्या आनंदाची भावना जिप्सी याना कळवावी असे सांगितले आहे.....ती जिप्सी याना पोचती झाली असे मी समजतो.)

अशोक पाटील

परत एकदा सगळे प्रची बघितले. सगळ्याच थिम्स छान आहेत पण मला सगळ्यात जास्त आवडलेली
मुकी अंगडी बालपणाची......जीर्ण शाल वार्धक्याची

फोटो काढायला जरी मी स्वतःच शिकलो असलो तरी फोटो वाचायला मात्र मायबोलीने शिकवले>>> नशिबवान आहेस मित्रा. फारच थोडे असतिल ज्यांना ही कला अवगत आहे.

तुझी अशीच प्रगती होत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना ___/|\___

हे लिखाण महत्वाचं, कारण, कलाकाराचा असा कलाकृति मागचा विचार, ते पहाताना आणि मजा आणतो. ह्या थिम्स किंवा नव्या कल्पनांचा संच ( फोटो व लिखाण) घेउन वृत्तपत्र/साप्ताहिकात मालिके करिता संपादकांना भेटता येईल.

फोटो क्लब मधून (उदा. फोटोग्राफिक सोसायटि ओफ इंडिया) राष्ट्रिय - आंतरराष्ट्रिय स्पर्धां (photography salons
) मध्ये भाग घेतोस का?

जिप्सी.. तुझ्या कल्पक दृष्टीचा अविष्कार वाचताना खूप छान वाटलं . या लेखाच्या च्या निमित्ताने पूर्वी मिसलेले प्रचि इथे पाहायला मिळाले मला.. लक्की मी!!! Happy

मला "मुक्त मी . . . . विमुक्त मी" जास्त आवडलं
प्र.चि तर नेहमी प्रमाणे अप्रतीम पण जे काही तिथलं लिखाण तर अजुनच अप्रतिम

गुजरा जमाना बचपनका चे सगळे प्रचि अती अती अप्रतिम Happy

जिप्सी, तु आता लेखक सूध्दा झाला आहेस. मस्त आहे तूझे हे मनोगत आवडले. तूझ्या काही थीम मिस झाल्ञा होत्या आता बघतो.

सर्व थीम सुंदरच त्यात "गडकोटाचा राजा, महाराष्ट्र माझा व माझ्या मातीचे गायन... ह्या माझ्या खास आवडत्या.
कलाकाराला असे विचारु नये पण तरी जिप्स्या तुला कुठली थीम जास्त आवडली Happy

पु.ले.शु.

प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!! Happy

कलाकाराला असे विचारु नये पण तरी जिप्स्या तुला कुठली थीम जास्त आवडली>>>>तसं पाहिलं तर सगळ्याच थीम मला आवडल्यात Happy पण "आयुष्यावर बोलु काही...." सर्वात जास्त आवडलेली थीम. :-)(मीही तसंच टिपीकल उत्तर देतो Proud )

गाणी तुमची...गाणी "आमची" बघताना मला मृण्मयीच्या 'आम्हांलाबी चित्तरगानी होताना' ची आठवण येऊन खूप हसू आलं आणि त्यावर तू कुठलाही वाद न घालता दिलेला तितकाच खेळकर प्रतिसादही आठवला.. Happy

सगळ्याच थीम, फोटो अप्रतिम!!!! हो हो अगदी ,फोटोग्राफी बरोबर तु लेखकही झालास! या थीमचा क्रम मात्र लावता येणे अशक्य. तुझे प्रदर्शन बघण्याची मात्र मनापासुन ईच्छा आहे. बघुया पुढच्या भारतभेटीत जमले तर!

Pages