एक भिजलेला चहा...!

Submitted by बागेश्री on 12 April, 2012 - 08:22

.......पाणी झरत चालले- आज आभाळ फाटले,
पावसाला पावसाने -वर ढगांत गाठले,
पाणी झरत चालले - उभ्या रानाला तहान,
आता किलबिलत आहे, राना.....

सौमित्र कुजबूजत होता... माझ्या जुन्या फिलिप्स च्या टेपरेकॉर्डर वर! बाहेर उन्हाची लाही- लाही होताना, "गारवा" अल्बमने नेहमीच साथ दिलेली... इतकी, की गेल्या २-३ वर्षांत कॅसेट घासून, सौमित्र दोन-दोनदा बोलतोय की काय, असा भास व्हावा!!

रणजित देसाईंची 'अभोगी' कादंबरी वाचत होते, अगदी पालथी पडून, छानपैकी पाय हवेत हलवत!

उन्हाचा त्रास मात्र खरेच सोसवेना, शेवटी उठून पंख्याचा रेग्यूलेटर खच्चून पिळला आणि जेव्हा लयीत डुलत त्याने '५' चा ताल धरला, तेव्हा कुठे हायसं वाटलं.... खोलीत बसणं जरासं का होईना सुसह्य झालं!

आता सौमित्र 'बघ, माझी आठवण येते का?' पर्यंत पोहोचला होता!... ह्या असल्या उन्हांत हा आभासी गारवा जास्त सुखद होता..
उन्हं वाढून- वाढून वाढावीत तरी किती?.. काहिली शब्दाची प्रचिती येईस्तोवर?? आणि हवेतली कळकळही चढत्या आलेखाची!

"अभोगीत" मन फारसं रमेना.. जरा फिल्मी प्रकार वाटू लागला.. वाटलं, सोडावी का अर्ध्यावर? पण; देसाईंच्या साहित्यावर जे निस्सीम प्रेम होतं त्याच्याशी प्रतारणाही करवेना... त्यांच्या ऐतिहासिक साहित्य लिखाणांची पारायणं करून झाल्यावर, जरा वेगळा प्रकार वाचायला घेतला होता!

खरं तर आख्खं उदगीर पालथं घालूनही मला तेव्हा मनासारखं वाचनालय मिळालं नाही, तेव्हा नांदेडवरुनच पुस्तकं आणायची, असं ठरवलं!

आम्ही गेली अनेक वर्ष नांदेडात वास्तव्य करून होतो त्यामुळे भरपूर ओळखी होत्या, वाचनालयचे मालक, बाबांचेच शालेय शिक्षणाच्या काळातील मित्र- तेव्हा मला दरवेळी 'एक' पुस्तक कमाल दोन महिने माझ्या जवळ ठेवण्याची मुभा मिळाली...
आता, पुस्तक उदगीरला न्यायचं आणि आईने दिलेल्या "चिवडा-लाडूच्या" शिदोरीसारखं पुरवत राहायचं, नांदेडच्या पुढील चकरेपर्यंत, असा क्रम!

कॅसेट थांबल्याचा 'कट्टं' आवाज आला, उठून पुन्हा तिच कॅसेट रिवाईंड ला टाकली!

खोलीतील हवादेखील चांगलीच गरमली होती! कळशीतून ग्लासभर पाणी ओतून घेतलं नि आठवण आली, पल्लवीची!! हा तिचा ग्लास होता!... तिच्या बाबांचे तब्बेत बरी नसल्याने ती त्यांना भेटायला नांदेडला गेली होती, पर्यायी माझ्यावर 'एकटीनं' रविवार घालवायची वेळ आली होती..

पुन्हा 'कट्टं'!
रिवाईंड झालेली कॅसेट 'प्ले' करुन मी येऊन बसले पुन्हा, माझ्या लोखंडी पलंगावर! पुस्तक वाचायला!

उदगीरमधील बर्‍यापैकी श्रीमंत कुटुंबाकडे, मी आणि पल्लू पेयिंग गेस्ट म्हणून राहत होतो!

तीन मजली बंगलीची ती ओपन टेरेस खोली- संगमरवरी फरश्यांची- बेडरूम म्हणून बांधलेली, लहानगी पण छानशी! एका बर्नरचा गॅस (पाणी तापविणे किंवा चहा करणे याचसाठी- फोडणी करून भिंती खराब करायच्या नाहीत- असा कडक नियम, घरमालकिणीचा), २-४ डबे- चहापत्ती, चिवडा बिस्कीटांचे, पाणी तापविण्याचं जर्मनचं मोठं पातेलं, एक लोखंडी ऐस-पैस पलंग, वह्या- पुस्तकांची चळत, मोजके काही ड्रेस, फिलिप्सचा टेप आणि पॉकेटमनी मागे टाकत जमविलेल्या कॅसेट्स... एवढाच काय तो संसार!

पलंगावर बसलं की उजव्या हाताला बर्‍यापैकी मोठी खिडकी आणि त्यावर घरमालकिणीने लावलेलं निसर्गचित्र-एकांत टेकडीवरचं दुमजली घर.. टेकडीला वळसा देत वाहणारी नदी आणि न वल्हवलेली होडी.. त्या टेकडीला चढ उतारासाठी अस्पष्ट पायर्‍या!
भिंतीला पोस्टर लावलेले चालते, हे पाहून मी ही पलंगाच्या बरोबर समोरील भिंतीवर गणपती बाप्पाचं भलं-मोठं पोस्टर चिकटवलं होतं!
पितांबर नेसून- मांडी घालून बसलेला-शांत नेत्रांचा तो समर्थ ईश, कायम सोबत असणारा!
इथे- उदगीरला येऊन इंजिनीअरिंग करताना, घराबाहेरचं आयुष्य जगतांना आलेले सारे चांगले- वाईट अनुभव त्याच्या कानावर घालण्याची सवय कधी जडली, नाहीच कळालं!

तिकडे सौमित्र- मिलिंद इंगळेची धर-पकड टेपवर चांगलीच रंगली होती!
आणि मनावर अभोगीची नायिका रेंगाळत! ह्या सार्‍या कादंबर्‍यांमधे अतिसोशिक नायिका का? हा पडलेला नेहमीचा प्रश्न आणि 'भोगले जे दु:ख त्याला..." म्हणत होणारा शेवट तरी का? ह्याचा हिशोब जुळवत बसले होते!

सहज हातातल्या घड्याळीकडे लक्ष गेलं तर, अरे बापरे! ४ वाजत आले होते आणि घरमालकिणीने आजही उपवास घडवला होता!! पुस्तक पुरे आजसाठी- उद्याच्या सबमिशनची तयारी राहिलीये, आज नाईट मारत अभ्यास! तसंही "ईट्स टी टाईम" आज चहा- चिवड्याचंच लंच!

जरा दरवाजा उघडला, तसा तापलेल्या टेरेसवरचा झळाळणारा उष्ण वारा मला धडकून खोलीत शिरला.. तापलं होतं सारं फारच! दरवाजा तसाच ठेवला..

चहा ठेवून जरा तोंडावर पाणी मारून आले, तर......... ऊन दिसेना.. कमाल आहे!! ढगाने सूर्याला हलकेच पंखांखाली घेतलेलं!

क्षणांत निसर्गाचं रुपडं कसं बदलतं असं स्वतःशी म्हणताच, सौमित्र आठवलाच "ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं........ तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो..." वाह्ह! निसर्ग आहेच असा बहूरंगी! शब्द सरसावतातच त्याची हर-एक 'अदा' टिपायला!!

चहा गाळून हातात कप घेऊन बाहेर आले तर छान हवा सुटलेली.. 'कुठेतरी नक्कीच पाऊस पडतोय' असं म्हणत मीच माझ्याशी आनंदित झाले होते!!

सबंध दिवसाची मरगळ, कळकळ मागे पाडली सुटलेल्या गार हवेने... आणि मग जे समोर दिसलंय.. ते निव्वळ शब्दातीत!!

समोर.. लांब... पावसाचा एक पॅच प्रवास करत पुढे सरसावत येतोय... अगदी कुठलीही आगाऊ सूचना न देता, स्वार आपल्या सार्‍या शक्तीनिशी निघाले होते, कक्षेतली सगळी जमीन पादाक्रांत करत करत, जिंकल्याच्या त्वेषात रोंरावत...

हे दृष्य... अगम्य!! अचाट! आणि पुढच्या काही सेकंदात तो इथे असेल, ह्या टेरेसवर- अवती भोवती!!! ही जाणीव मनातून मेंदूपर्यंत पोहोचण्याच्या आतच थेंब अंगावर!! काय अनुभवलं होते ते दृष्य! ती ढगांची फौज, ते तप्त भूमीवरचं विजयी अतिक्रमण! सारंच वर्णनातीत! अगदी मिनीटभरात ती फौज माझ्या डोक्यावरून पार पलिकडे निघूनही गेली, त्यांचा आवाका मोठा होता... कदाचित आणखी बरीच जमीन गंधाळण्यासाठी आसूसलेली असावी..

खोलीतून अगदी योगायोगाने यावेत तसे शब्द..."पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र- चिंब भिजलेला...."
निसर्गाने वळवलेली ती कूस पहात, अनुभव घेत, ओलेत्याने मीही प्यायले एक मस्त 'भिजलेला चहा'!!!

पण खरं सांगतेय,
A cup of tea never tasted so well….. soooo well!!!!

गुलमोहर: 

खूप आभारी आहे सगळ्यांचीच, इतका छान प्रतिसाद दिलात ह्या लिखाणाला म्हणून Happy
आज खूप नविन आयडींनी प्रतिसाद दिलेत, फार छान वाटलं Happy

बागेश्री...... वाचतांना अगदी समोर घडतंय असं वाटलं गं......... अफाट लिहिलं आहेस. फार फार फार आवडलं Happy

आवडले .. पाऊस, चहा व गारवा तिन्ही गोष्टी आवडतात त्यामुळे व अर्थातच लिखाणाच्या शैलीमुळे आवडले..! Happy

बागेश्री, आत्ता इथे बाहेर टिपिर टिपिर चालू आहे... हा तुझा बघता बघता आणि माझा इथला ऐकता ऐकता... चहाच पितेय तर काय...
तुला, तुझ्या भिजलेल्या चहाला शंभर वर्षं आयुष्य!
अगदी माझ्या समोर उभ्या केलेल्या काहिली सकट.... अगदी जियोच!

वाचतांना अगदी समोर घडतंय असं वाटलं गं.....>>> +१
आणि गारवा... अह्हाहा. पण आत्ता ते ऐकायचा धीर नाही होत त्यासाठी जुनची वाट पहावे इष्ट Happy

व्व्वा!!! खुप्पच मस्तं गं..... Happy

'भिजलेला चहा'!!... वाचताना.... भिजायला झालं ना.... Happy

आवडलं.... Happy

छान लिहिले आहेस. वाचुन अनुभवल्यासारखे वाटले. विशेषतः "बाहेर उन्हाची लाही- लाही होताना, "गारवा" अल्बमने नेहमीच साथ दिलेली... इतकी, की गेल्या २-३ वर्षांत कॅसेट घासून, सौमित्र दोन-दोनदा बोलतोय की काय, असा भास व्हावा!!" आवडले.

Pages