माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा –भाग १० (तयारी)

Submitted by अनया on 5 April, 2012 - 12:17

२०११ सालच्या जून-जुलै महिन्यात कैलास-मानसची पवित्र यात्रा करण्याचा योग आला. त्या नितांतसुंदर अनुभवाचे मी माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.

ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!

भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416
भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637
भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261
भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407
भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704
भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889
भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246
भाग ९: गाला ते पुणे: http://www.maayboli.com/node/32565

यात्रेविषयी थोडेसे:

भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार खाते ही यात्रा दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान आयोजित करते. उत्तम प्रकृती आणि भारतीय पासपोर्ट असणे हे गरजेचे आहे. वयोमर्यादा अठरा वर्षे ते सत्तर वर्ष आहे. ह्या अटी पूर्ण करू शकणारा कोणीही भारतीय नागरिक ही यात्रा करू शकतो. नारायण आश्रम ते लीपुलेख हे दोनशे किलोमीटरचे अंतर सात-आठ दिवसात पार करायचे असते.

वैविध्याने नटलेल्या या सर्व प्रदेशाला रौद्र अश्या निसर्गाचे वरदान लाभले आहे. या प्रदेशातून जाताना यात्री आपले देहभान विसरतो. भारत सरकार आणि कुमाऊ मंडळ विकास निगम ह्या यात्रेचे नियोजन अतिशय पद्धतशीर, नेटके करतात. क्रमाक्रमाने वरची उंची गाठली जात असल्याने दिवसेंदिवस आपले शरीर आणि मन यात्रेत समरस होते. विरळ हवेचा त्रास फारसा जाणवत नाही. इतक्या कष्टांनंतर आपण जेव्हा मानस व कैलासच्या परिक्रमा करतो, ती अनुभूती शब्दात वर्णन करणे खरच शक्य नाही. ती सगळ्यांनी आपली आपणच अनुभवायची.

यात्रेसंबंधीची जाहिरात जानेवारी महिन्यात भारतातील सर्व प्रमुख वृत्तपत्रात तसेच दूरदर्शनवर येते. आंतरजालावर http://mea.gov.in/mystart.php?id=5205 इथे माहिती उपलब्ध आहे. अर्जासोबत आपल्या पारपत्राची प्रत, तसेच पोच मिळण्यासाठी आपल्या पत्त्याचे पोस्टकार्ड पाठवावे. पारपत्राची मुदत पुढचे सहा महिने तरी असावी लागते.

आलेल्या अर्जांमधून सोडत काढून यात्रींची निवड होते. जर नवरा-बायकोंनी जोडीने अर्ज केला, तर निवड होण्याची शक्यता वाढते, अशी ऐकीव माहिती आहे. मी घरून एकटीच जाणार हे पक्क असल्याने, ह्या माहितीचा काहीही उपयोग नव्हता. आपली निवड झाल्याचे पत्र आल्यावर पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठवावा लागतो. त्यानंतर आपला अनुक्रमांक, माहितीपुस्तक इत्यादी गोष्टी घरी येतात.

हा सर्व पत्रव्यवहार न विसरता, कुरियरने न करता पोस्टाने करावा.

वैद्यकीय तपासण्या

ह्या यात्रेसाठी शारीरिक व मानसिक क्षमता उत्तम असणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. डोल्मा पासच्या १९,५०० फुटांच्या चढाईसाठी तंदुरुस्ती हवीच. तिथलं वातावरण, लहरी निसर्ग, अचानक उद्भवू शकणाऱ्या अडचणी, थोडीफार गैरसोय तसेच निरनिराळ्या विचारांचे सहयात्री ह्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. त्याचा त्रास करून न घेता, येणाऱ्या अद्वितीय अनुभवाला सामोरं जायला मनही खंबीरच असायला पाहिजे.

दिल्लीमध्ये खालील तपासण्या केल्या जातात.
HB, TLC, DLC, ESR, Blood group with Rh-type, Blood sugar fasting/ PP, Blood Urea, Serum Creatinine, Serum.Bil, S.G.O.T., S.G.P.T., Lipid Profile, Urine RE, Chest X-Ray, T.M.T., E.C.G., Pulmonary Function Test, HbA 1c, Stress-Echo-Test (if recommended by doctor)

प्रत्येक यात्रीसाठी ह्या परीक्षा करणे आणि त्यांचे पत्र अहवाल सोबत असणे, हे अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्या प्रकृतीबद्दल शंका असेल, तर छातीची क्ष-किरण तपासणी आणि स्ट्रेस टेस्ट या सर्वात महत्त्वाच्या परीक्षा तसेच रक्त व लघवीची तपासणी काही महिने आधीच करून घ्यावी. म्हणजे काही जुजबी उणीवा आढळल्यास योग्य उपचार आणि व्यायामाने त्यात सुधारणा करायला संधी मिळेल.
आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी नियमित चालणे आणि झेपतील एवढे सूर्यनमस्कार घातले तरी पुरेसे होते. ज्यांना शक्य आहे, त्यांनी अधून-मधून किल्ले किंवा टेकड्यांवर चढण्याचा सराव जरूर करावा.

बरोबर ठेवण्याची कागदपत्रे

पुढे सहा महिने मुदत असलेले भारत सरकारचे पारपत्र, विदेश मंत्रालयाचे निवड झाल्यासंदर्भातील पत्र. ह्या दोन्हीच्या जास्तीच्या प्रती काढून आपल्या बरोबरच्या प्रत्येक सामानात एक एक प्रत ठेवावी. म्हणजे सामान,मूळ कागदपत्रे गहाळ झाल्यास किंवा इतर काही परिस्थिती उद्भवल्यास ओळख पटवणे सोपे जाते. निवड झाल्यासंदर्भातील पत्राची एक प्रत गुजराथ समाजात गेल्यागेल्या लगेचच मागतात. ती निघताना वरच्या सामानात ठेवावी. जास्तीचे फोटोसुद्धा बरोबर ठेवावेत. अजून काही प्रतिज्ञापत्रे बरोबर घ्यायची असतात. त्याचे नमुने आंतरजालावर तसेच विदेश मंत्रालयाच्या महितीपुस्तकात असतात.

यात्रेला येणारा खर्च

• आपण दिल्लीत पोचल्यापासून ते पुन्हा दिल्लीत येईपर्यंत सगळी सोय कुमाऊ मंडळ विकास निगम करते. त्यासाठी ते २६,०००/- रुपये शुल्क घेतात.

• ह्या मध्ये चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे शाकाहारी जेवण मिळते. ते पुरेसे असते. त्याव्यतिरिक्त आपल्या पैशाने काही खायला घ्यावे लागत नाही (आणि मिळतही नाही!)

• दिल्लीतील विविध इस्पितळात जायला ते बसची व्यवस्था करतात. दिल्ली ते काठगोदाम पर्यंत व्होल्व्हो बस आणि पुढे धारचूलापर्यंत साधी बस असते. येतानाही तशीच व्यवस्था असते. हा खर्च वरील शुल्कात पकडलेला असतो.थोडक्यात म्हणजे एकदा गुजराथ समाजला पोचलो की परत येईपर्यंत जवळपास काही खर्च होत नाही.

• एस.टी.डी. फोन ची सोय जवळपास सर्व कॅम्पवर आहे. त्यासाठी सुट्टे पैसे जरूर न्यावेत. ते फोन आपल्या अपेक्षेपेक्षा खूप स्वस्त असतात. पण मागे लोकांची रांग लागलेली असते, सर्वांनाच घरी खुशाली कळवावीशी वाटते. त्यामुळे जास्त वेळ बोलता येत नाही. केवळ खुशाली कळवण्याच्या एकेका फोनला ३-४ रुपयेच लागतात.

• पोर्टर-पोनीवाल्यांचे पैसे दरवर्षी त्यांची सहकारी संस्था ठरवते. साधारण अंदाजाने त्या दोघांचे, जातायेतानाचे मिळून एकूण २०००० रुपये होतात. हे जरा जास्त वाटतात. पण ते आपली अमाप सेवा करतात. जर आपल्या तंदुरुस्तीची १००% खात्री असेल, तर पोनी नाही केला तरी चालेल. पण निसर्गाचा तडाखा, पाय मुरगळणे, अन्य काही तब्येतीचा त्रास होणे ह्या परिस्थितीत पोनी असलेला केव्हाही चांगला. धारचूला नंतर पोर्टर-पोनी मिळू शकत नाहीत. त्यामुळे ‘पुढे बघू’ अस म्हणता येत नाही!

• चीन सरकार प्रत्येक यात्रीकडून ७५० अमेरीकन डॉलर्स घेते. पैशांच्या मानाने व्यवस्था अगदीच सुमार असते. पण ती गोष्ट आपल्या हाताबाहेरची आहे. तिथल्या पोर्टर-पोनीवाल्यांचे व इतर सटर-फटर खर्चाचे मिळून मी ११०० डॉलर्स नेले होते. मी ‘खरेदी’ पक्षात नसल्याने त्यातील काही मी परतसुद्धा आणले. युवान भारतातून नेता येतात किंवा डॉलर्सचे युवानमध्ये धर्मांतर चीनमध्ये करता येते. तिथले नेपाळी लोक रुपये घेऊन युवान द्यायलाही तयार असतात.

• हे अधिकृत खर्च झाले. त्याव्यतिरिक्त आपापल्या बॅचचा कॉमन फंड असतो. त्याचे आणि चीनमधील अन्नपदार्थांसाठीच्या फूड कमिटीचे मिळून ५००० रुपये.मेडिकलचे ३१०० रुपये, चीनी व्हिसाचे ४०० रुपये होतात.

• असा दिल्ली ते दिल्लीचा खर्च (दोन्हीकडचे पोर्टर-पोनीचा खर्च पकडून) १,२०,००० रुपयांपर्यंत येतो.

बरोबर घ्यायच्या सामानाविषयी

हे मात्र जरा अवघड प्रकरण आहे. महिनाभर जायचं, कडक उन्हाळा ते कडक हिवाळा अशी व्हरायटी. कपडे धुवायला-वाळवायला मिळण्याची आजिबात खात्री नाही. पावसाच्या लहरीवर कपडे बदलावे लागणे, न वाळणे अवलंबून. ह्या सगळ्याचा मनावर खोल परिणाम होऊन आपली सगळी खोली किंवा ते न जमल्यास कपाटतरी उचलून न्यावेसे वाटते!

पण.... आपल्याला २० किलोची मर्यादा असते, हे सतत लक्षात ठेवावे! त्यातल्या त्यात चांगला भाग म्हणजे संपूर्ण बॅचच्या सामानाचे एकत्र वजन केल जात. त्यामुळे थोड ‘उन्नीस-बीस’ खपून जात!

• सामान भरताना बेताच्या आकाराचे दोन-तीन डाग करावे. सामानाची वर्गवारी सोपी जाते. एक बॅग चीनमध्ये लागणाऱ्या सामानाची व दुसरी भारतातल्या सामानाची करावी.

• आमच्यातल्या एका यात्रींनी त्या बॅगसाठी गर्द पिवळ्या रंगाचे जाड प्लास्टिकचे चेनवाले आवरण शिवून घेतले होते. त्यामुळे सामानाच्या ढीगातून आपली बॅग शोधणे त्यांना सोपे जायचे.

• आपल्या कपड्यांची वर्गवारी करून ते वेगवेगळ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरावे. ह्या सगळ्या पिशव्या एका प्रचंड प्लास्टिक पिशवीत घालाव्या. इतक्या अडनेड्या जागी जर सगळे कपडे भिजले, तर खूप अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

• खूप जाडजूड गरम कपडे घेण्यापेक्षा एकावर एक थर घालता येतील असे पातळ कपडे घ्यावेत.

• भयानक उतार उतरताना घालायला नी-कॅप्स जरूर घ्याव्या व त्या आठवणीने आपल्या वरच्या सामानात ठेवाव्या. बाकी कपडे काय घ्यायचे ही यादी महितीपुस्तकात आहेच.

• आपले वापरून झालेले आणि आल्यावर वापरायचे सामान आपण दिल्ली, धारचूला, गुंजी इथे ठेवू शकतो. असे सामान दिल्लीत ठेवल्यास त्याचे पैसे भरावे लागतात. पुढच्या कॅम्पवर ही सोय विनामुल्य होऊ शकते.

• हिमालयातला निसर्ग अत्यंत लहरी आहे. घटकेत ऊन तर घटकेत पाऊस असतो. त्यामुळे पोंचो रेनकोट नेल्यास तो घालणे आणि काढणे सोपे जाते. शिवाय तो हलकाही असतो.

• चीनमध्ये प्रत्येक कॅम्पवर पिण्यासाठी गरम पाणी मिळते. त्यामुळे आपल्याबरोबर चहा-कॉफीचे, सुपचे तयार सॅशे ठेवावेत.

• चीनमधल्या कॅम्पवर मोकळा वेळ बराच मिळतो. वाचायला पुस्तक किंवा पत्ते-उनो सारखा खेळ सोबत ठेवावा.

• चीनमध्ये जेवणाची सोय जरा अशीतशीच असते. त्यामुळे टिकाऊ खाद्यपदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू, खाकरा, गूळपोळी, चीज, लोणचे इत्यादी न्यावे. पूजेसाठी चांदीचे बिल्वपत्र, सुपारी इत्यादी श्रद्धेप्रमाणे न्यावे. नाहीतर ‘दोन हस्तक- एक मस्तक’ आहेच!

• संपूर्ण यात्रेसाठी सुकामेवा, साध्या गोळ्या, खडीसाखर, आवळा सुपारी इत्यादी भरपूर न्यावे. त्या भागातील लहान मुले आपल्याकडे गोळ्या मागतात. त्यामुळे त्या जास्तीच्या न्याव्या आणि रोज एक लहान पुडी खिशात ठेवावी. सुकामेवा सुद्धा लहान-लहान प्लास्टिक पिशवीत भरून न्यावा. म्हणजे रोज खाल्ला जातो. बरोबरच्या यात्रींना तसेच पोर्टर वगैरेंसाठी जास्तीचा मेवा असावा.

• नेहमी लागू शकतील अशी म्हणजे सर्दी-खोकला, ताप, पोट बिघडणे, वेदनाशामक, कफ सिरप जवळ ठेवावी. आमच्याइथे सगळ्यांनी जे जे सुचतील त्या रोगांसाठी भक्कम प्रमाणात औषधे आणली होती. शिवाय भारतातल्या प्रत्येक कॅम्पवर डॉक्टर होतेच. त्यामुळे सगळे यात्री मिळून एका लहान खेड्याची औषधांची गरज भागवू शकतील, अशी परिस्थिती होती!

• लहान स्टीलचा थर्मास जवळ ठेवावा. अती थंडीच्या कॅम्पवर गरम पिण्याचे पाणी मिळू शकते.

• बरोबरचे कपडे जुने, वापरलेले नेल्यास चार चार दिवस वापरून टी-शर्ट टाकून देता येतात. आपलेच ओझे कमी होत जाते.

सामानाची विभागणी साधारण अशी असते.

• जमा करायचे सामान : हे २० किलोपर्यंत असू शकते. हे रोज मिळत नाही, कधीकधी दोन-तीन दिवसही मिळत नाही.

• पोर्टर जवळ द्यायची बॅग: ह्यात कपड्याचा जास्तीचा जोड, वैयक्तिमक स्वच्छतेचे सामान, थोडेफार खाण्याचे सामान, थोडे गरम कपडे, बुटांचा जोड, मोजे असावे. कॅम्पवर घालायच्या चपला, बॅटरी ठेवावी.

• आपल्या खांद्यावरची छोटी सॅक: पारपत्र, डॉलर्स, जास्तीचे पैसे न विसरता ह्यातच ठेवावेत. रेनकोट, पाण्याची बाटली, कॅमेरा आणि थोडा खाऊ असावा. उन्हाची आणि थंडीची टोपी किंवा स्कार्फ घ्यावा. बर्फाच्या प्रदेशात असताना काळा गॉगल जरुरी आहे.

• आपण पोनीवर बसलो नाही, तर बर्याचदा क्र.२ ची बॅग पोनीच्या पाठीवर जाते आणि क्र.३ ची पोर्टरच्या पाठीवर. आपण सुटे चालू शकतो.

सूचना

• ही यात्रा अवघड नक्की आहे. पण अशक्य नाही. बऱ्याच वेळा घाबरवणारी माहिती मिळते. आपण ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हे सूत्र ध्यानात ठेवावे.

• कैलास परिक्रमेच्या पहिल्या दिवशीच ‘कैलास चरणस्पर्श’ इथे जायचे असते. तिथे घोडे येत नाहीत. ते सहा किलोमीटर जाता यावे, म्हणून वाटल्यास आधीचा भाग घोड्यावरून जावे, म्हणजे थकायला होणार नाही.

• आपले शरीर आपल्याला ज्या सूचना देते, त्यांचा आदर करावा. चालताना थकायला झाल्यास घोड्यावर बसण्यात काही कमीपणा नसतो. शेवटी आपण ठीक राहिलो तरच आपली आणि आपल्या सहयात्रींची यात्रा आनंददायक होणार आहे.

• पोर्टर-पोनीवाले आपल्यासाठी जीवापाड कष्ट करतात. त्यांच्याशी नीट बोलावे. काही यात्री त्यांना ‘ ए पोर्टर, इधर आ’ अश्या पद्धतीने बोलावतात. ते टाळावे. परमेश्वरच आपल्याला त्यांच्या रुपाने मदत करत असतो.

• पोनीवाले जेव्हा पोनीवरून खाली उतरायला सांगतात, तेव्हा ते आपल्या आणि पोनीच्या सुरक्षेची काळजी घेत असतात. घोड्याचा पाय घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्या स्थानिक लोकांचे जरूर ऐकावे.

• तिबेटमध्ये जाईपर्यंत आपली पोर्टरशी खूप मैत्री होते. तरीही त्याचे कुठलेही सामान आपल्या सामानातून घेऊन जाऊ नये. तसेच परत येतानाही आणू नये.

• तिबेटमध्ये आपली राजकीय मते मांडू नये. आपण परक्या देशात आहोत, हे सतत लक्षात ठेवावे.

• ही यात्रा आहे, सहल नाही, हे कायम ध्यानात ठेवावे. भारतात हा प्रश्न फारसा येत नाही, पण चीनमध्ये थोडी गैरसोय होते. तेव्हा आपले डोके थंड ठेवावे. सहयात्री तसेच तिथले स्थानिक लोक ह्याच्याशी वाद घालणे, वेडेवाकडे बोलणे, असले प्रकार करू नयेत. अश्या वागण्याने आपण आपल्या देशाची प्रतिमा खराब करत असतो.

• कैलास मानस सरोवर यात्रेला इंडीयन माउंटेनिअरिंग फाउंडेशनकडून मान्यता असल्याने केंद्रीय व राज्य सरकारचे तसेच बँक व निमसरकारी कर्मचार्यांना यात्रा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर विशेष रजा मिळू शकते.

आपली तब्येत उत्तम राखली आणि योग्य ते आणि तेवढेच सामान बरोबर ठेवलेत तर ह्या यात्रेच्या आनंददायक स्मृती तुमची आणि तुमच्या सहयात्रींच्या मनात दरवळत राहतील, ह्यात मला शंका नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनयाजी,
ही सर्व लेखनमाला अतिशय वाचनीय झाली आहे. या भागाची वाट पाहतच होतो. तुमचे मनापासून अभिनंदन आणि सर्व अनुभव अतिशय बारकाईने इथे मांडल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या या शेवटच्या भागाने तुम्ही अमूल्य माहिती दिलेली आहे. पुनश्च एकदा आभार. Happy

अतिशय प्रॅक्टिकल सूचना व सुरेख माहिती.
तुमची सहृदयताही जाणवते या लेखातूनही.
भारताबाहेर पडल्यावर "भारतीय नागरिक" या जबाबदारीनेच वागायला पाहिजे, कुठेही आपल्या वर्तनामुळे देशाची प्रतिमा मलिन व्हायला नको - ही जाण येण्याकरता भारतातच त्याची सवय (अभ्यास) करायला पाहिजे - जबाबदार नागरिक हा प्रकार अंगवळणी पडला की खरं म्हणजे कायद्याच्या बडग्याची गरजच नाही. केवळ सुशिक्षित असून उपयोग नाही - सुजाण नागरिक महत्वाचे - वै. मत.

अनया,तू सगळीच माहिती सविस्तर दिली आहेस.त्यामुळे कुणी जाण्याचा विचार करत असेल तर तुझ्या मालिकेचा नक्कीच फायदा होईल.तू पुस्तक लिहिलेस तर उत्तमच्.मी आत्ताच एड्व्हान्स बुकिंग करते.

धन्यवाद, मी बहुधा direct समारोपाचा भाग वाचला आणि तिथे प्रश्न विचारला fast facts बद्दल....