मसालेदार ,मजेदार वरणफळं...

Submitted by स्मिता श्रीपाद on 2 April, 2012 - 13:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

माझ्या लहानपणी वरणफळे करणे आणि खाणे हा एक सोहळा असायचा...सोहळा अशासाठी म्हटलं कारण हा पदार्थ करायचा म्हणजे त्याची तयारी २-३ दिवस चालायची...आता तुम्ही म्हणाल की हा इतका सोपा पदार्थ आहे..तर त्याची काय तयारी करायची..तर तयारी पदार्थ करण्यासाठी नसुन तो कधी करायचा हा "बेत" करण्यासाठी असायची....

त्याचं काय होतं..की माझ्या आई आणि बाबांना हा प्रकार अजिबात म्हणजे अजिबात आवडायचा नाही..."आमटी आणि पोळीचा काला काय खायचा नुसता..त्यापेक्षा भाज्या खाव्यात भरपुर.." ईति आमच्या मातोश्री..चकोल्या भुरकण्यातलं सुख हिला कधी कळणार,म्हणुन मी हळहळायचे ......मग एखाद्या दिवशी आमची लाडकी आज्जी हा बेत ठरवायची ( आजोळ गावात असल्याचे बरेच फायदे होतात..त्यातलाच हा एक..) मग परत आज्जीकडे जायचं म्हटल्यावर लगेच वरणफळं खाउन हातावर पाणी पडल्यावर लगेच कोण आपापल्या घरी जातंय...शाळेची सुट्टी विचारात घेउन २-४ दिवस तिथेच राहायच्या बेताने ( आणि अजुन २-३ चविष्ट बेत जोडीला ठरवुन..) चकोल्या चा प्रोग्रॅम ठरायचा...

वरणफळं म्हणजे आमटी आणि पोळी यांचा काला नसतो...हे तु आईला पूर्वी का शिकवले नाहीस असं आज्जीला विचारलं की ती म्हणायची..अगं तुझ्या आईला सगळ शिकवलं असतं तर आपल्या या चकोल्या पार्ट्या कशा झाल्या असत्या...? हे ही खरंच होतं बरका....आज्जी,आजोबा,मी आणि माझी धाकटी बहीण आमची मस्त पार्टी असायची...झणझणीत आज्जीस्टाईल चकोल्या,त्यावर भरपूर साजुक तूप,दाण्याची किंवा लसणीची चटणी,पापड-कुर्डया,आणि ताजं ताक असा मेन्यु असायचा....कोण किती मोठयांदा भुरका मारुन चकोल्या हाणु शकतो अशी जणु चढाओढच असायची...चकोल्यांचं भलं मोठं पातेलं बघता बघता खाली जायचं..
आणि या सगळ्या सरंजामाला बाहेर धो धो पडणारर्‍या पावसाचं बॅगराउंड म्युझिक मिळालं तर आहाहा.....

अजुनही आज्जीचा फोन आला की ती विचारते,कराड ला कधी येणार आहेस? एकदा चकोल्यांचा बेत करुयात...माझा मन लगेच माग पोचतं.चकोल्या पार्ट्यांसोबतच इतरही अनेक आठवणी मनात फेर धरुन नाचु लागतात....आणि मग मी लगेच चकोल्या करायचा "बेत" करते..आज्ज्जी नं शिकवल्यात तश्शाच

तर अशा या माझ्या आज्जी फेम चकोल्या....खास मायबोलीच्या स्पर्धेसाठी....

साहित्यः

शिजवलेली तूरडाळं १ वाटी,
१/२ छोटा कांदा,
१/२ टोमॅटो,
१-२ काळी मिरी,
१ लवंग,
दालचिनी,
२ चमचे ओलं खोबरं किंवा सुक्या खोबर्याचा छोटा तुकडा,
भरपूर लसूण,
चिंचेचा कोळ चवीनुसार,
गूळ,
तिखट,
गोडा मसाला,
मीठ.
कणीक २ वाट्या /४-५ पोळ्यांच्या बेताची
१ मोठ्या लिंबाएवढा गूळ १/२ वाटी पाण्यात विरघळून घ्यायचा.

DSC06769_n.jpg

क्रमवार पाककृती: 

१.मीठ,तिखट,हळद,आणि थोडे गुळाचे पाणी घालून तेलाचा हात लावुन कणीक भिजवायची.

DSC06771.jpg

२. १/२ छोटा कांदा,१/२ टोमॅटो,१-२ काळी मिरी,१-२ लवंगा,थोडी दालचिनी, खोबरं,भरपूर लसूण,कोथिंबीर हे सगळं छान बारीक वाटुन घ्यायचं.
३.थोड्या तेलात मोहरी,जिरे,मेथ्या,हिंग,हळद,कढिपत्ता याची फोडणी करुन त्यात वरील वाटण नीट परतून घ्यावे.

DSC06774.jpg

तेल सुटले की त्यात शिजवलेली तूरडाळ घालावी.भरपूर पाणी घालावे ( वरणफळांना पोहता आले पाहिजे).गुळ,चिंच,मीठ,तिखट,आणि गोडा मसाला घालावा...व उकळी येउ द्यावी.

४.आता भिजवुन ठेवलेल्या कणकीची तेल लावुन (पीठी लावु नये नाहीतर चाकोल्या फारच गिजगोळा होतात) पोळी लाटावी...आणि छोट्या वाटीच्या सहाय्याने किंवा छोट्या डबीचे झाकण वापरुन गोल गोल फळं कापून घ्यावीत.काहीजण शंकरपाळीच्या आकारात पण कापतात..पण मला असे गोल जास्त आवडतात.

DSC06778.jpg

५.उकळणार्‍या आमटीत फळं सोडावीत...मस्त शिजु द्यावीत ..आणि भरपूर तुपाची धार सोडुन गरमगरम वरपाव्यात.

DSC06780.jpg

६.सोबतीला ताजं गोड ताक,एखादी चट्णी किंवा लोणचं अत्यंत गरजेचं...या मंडळी आस्वाद घ्यायला...

DSC06779.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१.आपल्या नेहेमिच्या चिंच,गुळ्,लसूण घालुन केलेल्या आमटीच्या वरणफळांपेक्षा असे कांदा,टोमॅटो व मसाले घालुन केलेली वरणफळं खुप चमचमीत लागतात....पण खडा मसाल्याचं प्रमाण जास्त घेउ नये त्यामुळे आमटी उग्र होउ शकते.
२.या चित्रात जरी चकोल्या बाऊलमद्धे दिसत असल्या तरी हे प्रकरण चमच्याने वगैरे खाण्याची चुक अजिबात करु नये...पाप लागेल ...हे सगळं मस्तपैकी ताटात ओतायचं,ताटाला गरज असल्यास टेकण वगैरे लावायचं आणि हातने भुरकायचं....मग कोपरापर्यंत ओघळ आला तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
आज्जी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आई पुर्वी चिंचगुळाच्या चकुल्या करायची
आता नाही करत Sad
आता लसुन खोबर घालुन करते
पण मला दोन्ही आवडतात
आणि नशिबाने माझ्या आई बाबांना पण Happy

मस्त लिहिलंय एकदम Happy चकोल्या अगदी आवडीचा पदार्थ Happy एरवी लसूण-जिरे-खोबरं वाटण आणि कांदा लसूण चटणी असाच शॉर्टकट असतो.या रेसिपीनेही करुन बघणारच आता Happy

वाह!!!!!!! Happy

एका होपलेस भटकंतीत पंढरपुरात एका मित्राच्या नातेवाइकांकडे चकोल्या हाणल्या होत्या.
त्या आठवणीनेच तोडात लाळ आली, पोटात भुक लागली. Happy

किती छान लिहिलंस गं...!!
मला पण प्रचंड आवडतात ही वरणाफळं Happy
मस्त आहे रेसिपी...... निवडक १० त Happy

डाळफळांचा धागा पूर्वी होऊन गेलेला आहे..
पण माझा 'फेव्ह'पदार्थ
सगळं आहे यात. फ्याट, कर्बोदके अन प्रथिने. भाज्या फक्त नाहियेत, त्या तोंडी लावायला कांद्याची पात, काकडी इ. करून घेता येतात.
ताकः कोथिंबिरीला हिरवी भाजी का म्हणत नाहीत?

सगळ्यांचे खुप आभार....
तुमच्या प्रतिक्रिया आज्जीपर्यंत पोचवेन मी.खरतर ही तिची पाकृ आहे Happy
(पहिल्याच पाकॄ ला मायबोलीवर इतका प्रतिसाद मिळालेला पाहून छान वाटलं खूप..खरच खूप धन्यवाद.)

मी आता करुन खातखातच लिहितोय हे.
मस्त झालाय हा प्रकार.
माझ्याकडे सेल्फ रेझिंग फ्लोअरच असते, आणि मी त्यांना मधे भोक पाडले, तर त्या
मेदू वड्यासारख्या फुगल्या.

दिनेशदा....तुम्ही माझी पाकृ करुन पहिलीत त्यामुळे फार मस्त वाटलं.
फोटो पण टाका ना प्लीज.

रच्याकने: तुमची सिझलर्स ची पाकृ हिट आहे आमच्याकडे.आणि अशा बर्याच Happy

Pages