भरवाँ करेला (कैरीचा मस्साला मारके)

Submitted by निंबुडा on 27 March, 2012 - 05:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) पाव किलो कारली
२) ओल्या वाटणासाठी एक लहान कच्ची कैरी, एक लहान कांदा, दाण्याचे कूट, मीठ, तिखट
३) कोरडा मसाला करण्यासाठी थोडेसे मेथीचे दाणे, बडीशोप, मोहरी, धने
४) फोडणीसाठी तेल, हिंग, हळद, मोहरी, जिरं
५) चवीसाठी मीठ व गूळ
६) गार्निशिंग साठी बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१) भरल्या कारल्यासाठी करतो तसे कारल्याचे तुकडे करून घ्यावेत. कारले जून असेल तर आतल्या बिया व मगज काढून टाकावा. (कोवळ्या बिया असल्यास वाटणात वापरता येतील.)

२) हे तुकडे कुकर मध्ये किंवा पातेल्यात तुकडे बुडतील इतपत पाणी घेऊन वाफवावे. वाफवून कडू झालेले पाणी निचरून टाकावे.

३) कारल्याचे तुकडे वाफेस्तोवर वाटणाची तयारी करता येईल.

३.१ कोरड्या मसाल्यासाठी दिलेले जिन्नस भाजून मिक्सरमध्ये वाटून बारीक पूड करावी.
३.२ कच्ची कैरी, कांदा, दाण्याचे कूट, मीठ व तिखट यांचे तुकडे मिक्सर मध्ये फिरवून घ्यावेत. कारल्याच्या कोवळ्या बिया वापरायच्या असतील तर त्याही यात घालाव्यात. कांद्याला पाणी सुटतेच त्यामुळे सुरुवातीला पाणी घालू नये. गरज वाटल्यास थोडेसेच घालावे.

४) कोरडा मसाला आणि ओले वाटण एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून एकजिन्नस करून घ्यावे.

५) आता वाफवलेल्या कारल्याच्या तुकड्यांमध्ये हा मसाला भरावा.

६) तेलावर मोहरी, हिंग, जिरं, हळद यांची नेहेमीसारखी फोडणी करून मसाला भरलेले कारल्याचे तुकडे अलगद यात सोडावेत. थोडा वेळ परतून पाणी घालावे. मसाला उरलेला असल्यास पाणी घालून सारखा करून भाजीत घालावा.

७) चवीसाठी मीठ व गूळ घालून झाकण टाकून कारली शिजू द्यावीत.
८) ग्रेव्ही चांगली दाट झाली आणि कारली शिजली की गॅस बंद करून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने गार्निश करावे.

वाढणी/प्रमाण: 
पाव किलो कारली, एक लहान कैरी व एक लहान कांदा यांची भाजी साधारण पणे ३-४ जणांसाठी पुरेशी होईल.
अधिक टिपा: 

१) अगदी हाच मसाला वापरून मी दम आलू ही करून पाहिले. छोटे बटाटे उकडून, साले काढून डीप फ्राय करून घेतले. नेहेमीच्या फोडणीवर बारीक चिरलेला टोमॅटो व वर दिलेला मसाला परतून त्यात बटाटे सोडले. चवीला मीठ, गरम मसाला व साखर! दोन्ही भाज्या एकदम यम् यम् झाल्या Happy
२) कैरी नसलेल्या दिवसांत कैरी ऐवजी आमचूर वापरूनही करता येईल.
३) जर भाजीला ग्रेव्ही नको असेल तर जास्त तेलाची फोडणी करून मसाला भरलेली कारली नुसती परतली तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
माझ्याकडे दिवसभर कामाला असलेली मेड उत्तर भारतीय आहे. तिने कांदा, कैरी, बडीशोप, धने हा मसाला सांगितला होता. मी माझ्या मनाने काही अ‍ॅडिशन्स करून पाहिले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मला कारली नै आवडत Sad पण तो मसाला बिनाकारल्याचा खायला आवडेल....किंवा मी सिमला मिरची स्टफ करू शकते अशा मसाल्याने Happy

मस्त!

मला पण कारली नै आवडतं.... पण मसाला आवडला... मसाला वापरून दम आलू करायची आयड्या आवडली किंवा टोकूची भरली सिमला मिरचीची आयडिया Happy

मस्त रेसिपी.

होय, उत्तरप्रदेशात कारल्यांकरता बडिशेप मस्ट आणि तेलही 'सरसो' चेच वापरावे. झक्कास चव येते.