'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर
'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
=======================================================================
=======================================================================
निवतीहुन केळुस तिठ्यावरून वेंगुर्ल्याला जायला आम्ही निघालो. इथे मात्र आमचा प्लान निघायला उशीर झाल्याने थोडासा फसला. निवतीहुन साधारण दिड-दोन वाजता निघुन रेडीचा गणपती, अरवलीचा वेतोबा, मोचेमाड समुद्रकिनारा, सागरेश्वर बीच करून मालवणला निघायचे असा बेत होता, पण निवतीमध्येच ३ वाजल्याने आणि काहि वेळ केळुसला घालवल्याने वेंगुर्ला (वेंगुर्ला जेट्टी, सागरेश्वर बीच) काही बघता आले नाही. :(.
प्रचि ०१
केळुसवरून आम्ही पहिल्यांदा अरवलीच्या वेतोबाच्या दर्शनाला निघालो. वाटेत मानसीश्वराचे मंदिर दिसलं.
प्रचि ०२
प्रचि ०३श्री वेतोबा मंदिर (आरवली)
(मंदिरात मूळ मूर्तीचे फोटो काढण्याची परवानगी नसल्याने वरील फोटो आंतरजालाहुन साभार)
वेंगुर्ल्यापासुन साधारण १५ कि.मी. अंतरावर रेडीकडे जाताना आरवली हे गाव लागते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात "हरवल्ली" नावाने अस्तित्वात असलेल्या गावाचे नाव कालौघात बदलून "आरवली" झाले. "हर" म्हणजे "शिव" आणि "वल्ली" म्हणजे "वस्ती". हरवल्ली म्हणजे जेथे शिवाची वस्ती आहे असा गाव. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर मूलतः वेताळाचे आहे. "बा" हा आदरार्थी शब्द जोडला गेल्याने "वेताळाचे" वेतोबा झाले असावे. "वेताने वेळेवर मन ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ!" दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची सुमारे १४३ मंदिरे आहेत.
मंदिरात प्रवेश करताच सुमारे सात फूट उंचीच्या श्री वेतोबाचे भव्य दर्शन घडते. एव्हढी मोठी मूर्ती क्वचितच पहावयास मिळते. श्री वेतोबाची मूर्ती पूर्वी फणशी लाकडाची होती. त्यामुळे या गावात बांधकामात व इतर व्यवहारात फणसाचे लाकूड वापरत नाही. कालांतराने १९९६ मध्ये भक्तांच्या साह्याने मूर्ती पंचधातूची करण्यात आली. श्री वेतोबाच्या हातात साडेतीन फूट लांबीची तलवार आहे. गावची ती रक्षक देवताच आहे. विशेष म्हणजे या देवास नवस म्हणून केळीचे घड आणि चपला वाहण्याची प्रथा आहे. सभामंडपात अशा मोठ्या आकाराच्या चामड्याच्या चपलांचा ढिगच पाहावयास मिळतो. गावात फिरण्यासाठी त्या देवाला वाहिलेल्या असतात. देवासमोर केवळ नवस म्हणून ठेवलेल्या चपलांचे तळ दुसर्या दिवशी झिजलेले आढळतात. श्री वेतोबाची यात्रा वर्षातून दोनदा कार्तिक वद्य पौर्णिमा आणि मार्गशिर्ष शुद्ध तृतीया या दिवशी भरते.
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
श्री वेतोबाला वाहिलेल्या वहाणांचे जोड
प्रचि ११
आरवलीच्या श्री वेतोबाचे दर्शन घेऊन आम्ही रेडीच्या गणपती मंदिराकडे निघालो. इथे आमच्य अपेक्षापेक्षा जास्त वेळ गेला. रेडी हे लोहखनिजांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे येथे ट्रकची वाहतुक मोठ्या प्रमाणावर आणि रस्ता अरुंद. यात बराच वेळ गेला.
श्री गणेश मंदिर — रेडी
१८ एप्रिल १९७६ रोजी इथल्या खाणीत ट्रक ड्रायव्हर म्हणुन कामास आलेल्या सदानंद कांबळी यांनी रात्रपाळीचे काम संपल्यावर आपला ट्रक डोंगरावर आणून लावला. थोड्या वेळाने घरी जाण्यासाठी ते ट्रक सुरू करू लागले; पण खूप प्रयत्न करूनही ट्रक सुरू होत नाही हे पाहून ते ट्रकमध्येच झोपले. त्या रात्री श्री गजाननाने त्यांना दृष्टांत दिला कि, 'मी येथे आहे. मला बाहेर काढ.' भयचकित होऊन त्यांना जाग आली तेंव्हा पहाटेचे चार वाजले होते. घडला प्रकार गावकर्यांना सांगावा म्हणून त्यांनी ट्रक सुरू केला आणि काय आश्चर्य रात्री बंद पडलेला ट्रक सकाळी विनासायास चालू झाला. गावातील जुन्याजाणत्यांच्या मताने रेडीचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीलला कौल लावण्यात आला. तेंव्हा "मूर्ती दिसेपर्यंत खोदा" असा कौल दिला. खोदकाम सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी मूर्तीच्या तोंडाकडचा व कानाकडचा भाग दिसू लागला. बारा दिवसांनी संपूर्ण मूर्ती खोदून बाहेर काढण्यात आली. अखंड जांभ्या दगडात कोरलेली हि मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मूर्तीचा एक हात आशीर्वाद मुद्रेत असुन दुसर्या हातात मोदक आहे. समोरच एक भला मोठा उंदीरही आहे. तोही याच खोदकामात , पण मूर्तीनंतर सव्वा महिन्यांनी सापडला. मूळ मूर्तीला आता ऑईलपेंटचा थर लावला आहे.
प्रचि १२(प्रसन्न मंगलमूर्ती)
प्रचि १३
मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने मंदिराचे फोटो काढता आले नाही. श्रींचे दर्शन घेतल्यावर श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी निघालो.
श्री देवी माऊली मंदिर, रेडी
श्री माऊली देवीच्या स्थापनेचा इतिहास श्रीदेवीकोशामध्ये सापडतो. श्री माऊली देवीच्या जागृतपणाची आख्यायिका सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे - पोर्तुगिजांनी १८१७ साली डोंगरावरून या मंदिरावर तोफा डागल्या. तेंव्हा गावकर्यांनी देवीला कौल लावला. दुसर्या दिवशी लक्षावधी गांधीलमाश्या तेथे उत्पन्न झाल्या व पोर्तुगीज सैन्याच्या दिशेने घोंघावत गेल्या. पोर्तुगीजांनी घाबरून तेथुन पळ काढला आणि परत कधीही फिरकले नाही. असे हे श्री देवी माऊलीचे जागृत देवस्था गणपती मंदिरापासुन जवळच असुन अवश्य भेट देण्यासारखे आहे. याही मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम चालू होते आणि देवीला कौल लावण्यात आला असल्याने फोटो नाही काढला. पण कौल लावण्याचा विधी मात्र व्यवस्थित पाहता आला.
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
जवळच असलेला एक पुरातन वाडा
रेडीवरून आम्ही परत निघालो वाटेत पुन्हा त्या अरुंद रस्त्याव वेळ गेला. सूर्यास्त होण्यासाठी काहिच अवधी बाकी होता आणि आम्हाला अजुन मोचेमाड व सागरेश्वर बीच किंवा जेट्टी पहावयाची होती. दोन्ही एकदम शक्य दिसत नव्हते. शेवटी सगळ्यांच्या पसंतीनुसार मोचेमाड समुद्रकिनारी जाण्याचे ठरले आणि आमचा हा निर्णय योग्यच होता हे मोचेमाडला पोहचल्यावर समजले. मोचेमाड हे वेंगुर्ल्यापासुन साधारण सात कि.मी. अंतरावर आहे. मी पाहिलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या समुद्रकिनार्यांपैकी अतिशय सुंदर असा हा समुद्रकिनारा. त्या समुद्रकिनार्याकडे जाणारी वाटही अगदी मस्त होती. कौलारू घरांच्या मागुन, काजुच्या झाडाखालुन, आंबा मोहराचा सुवास घेत, लाल मातीतुन जाणारी होती. वाट संपताच मऊशार शुभ्र वाळु पायाला गुदगुल्या करते. हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि अवर्णनीय आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या भटकंतीतील हा मनाला भावलेला अतिशय सुरेख समुद्रकिनारा होता. वेळेअभावी जास्त वेळ येथे देता आला नाही पण जेव्हढा वेळ इथे व्यतित केला तो कायमचा आठवणीत राहणारा असणार आहे.
आधीच्या भागाव सांगितल्याप्रमाणे मोचेमाडच्या संध्याकाळचेही काही फोटो गंडलेत त्यापैकी जे बरे आले आहेत तेच येथे प्रदर्शित करतोय.
कितने गहरे हलके शाम के रंग है छलके
परबत से यूं उतरे बादल जैसे आँचल ढलके
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो......
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
वेंगुर्ल्याहुन साधारण ८ वाजता आम्ही मनिषच्या घरी कांदळगावात (मालवण) जायला निघालो तेंव्हा मी ड्रायव्हरच्या बाजुला बसलो होतो. साधारण साडेनऊच्या दरम्यान मालवण-आचरा रस्त्यावर हेडलाईटच्या प्रकाशात मला काळ्या रंगाचा मांजरीपेक्षा थोडासा मोठा एक प्राणी अंधारात हळुहळु जाताना दिसला. ड्रायव्हरने तो "कांडेचोर" असल्याचे सांगितले. तो स्वतः कोकणातला असल्याने त्याला कांडेचोर माहित होता म्हणुन सगळ्यांनी त्याला गाडी थांबवायला सांगुनही त्याने गाडी थांबवली नाही. :राग:. साधारण दहाच्या सुमारास आम्ही मनिषच्या घरी पोहचलो. हातपाय धुतले, बॅगा खोलीत व्यवस्थित लावल्या आणि गरमागरम जेवणावर ताव मारला. या दोन दिवसात बरीचशी ठिकाणे बघितल्याने रविवारचा दिवस फक्त सिंधूदुर्ग किल्ला, तारकर्ली-देवबाग हिच ठिकाणे करण्याचे ठरले.
(तटी: मंदिरासंबंधित माहिती "कोकण पर्यटन" पुस्तकातुन साभार)
(क्रमशः)
सर्वच फोटो छान आहेत. या
सर्वच फोटो छान आहेत.
या वेतोबाची मूर्ती एकदम जिवंत होऊन बोलेल अशी आहे.
<< योगेश व भाउ नमसकर - रेडी
<< योगेश व भाउ नमसकर - रेडी येथे लोह किंवा लोखंड खनीज नसुन - मँगेनीज वा मंगल तसेच बॉक्साईट ही खनीजे सापडतात >> अतुलनीयजी, मला वाटतं आपण दोघानीही हा मुद्दा तपासून पहाणं आवश्यक आहे. मी खूप फिरलोय त्या भागात व तिथल्या बंदर अधिकार्यांशी व उषा इस्पातच्या अधिकार्यांशी चर्चा पण केलीय. इथलं खनीज लोखंड कांहींसं निकृष्ट असलं [ लोखंडाचं प्रमाण कमी असल्याने] तरीही जपानला तें निर्यात होत असे व त्याकरतां रेडी बंदरातच खास व्यवस्थाही करण्यात आली होती, ही माहिती त्यावेळीं मिळाल्याचं निश्चित आठवतं.
>>>>
भाउ - तुमचा दुसरा मुद्दा मलाही मान्य आहे, कारण तेरेखोलजवळची जेट्टी मी स्वतः साधारणपणे शेवटी १९८५-८६ मध्ये पाहिल्याचे स्मरते. तेथून जपानला बोटी जात येत असत. पण तेथील खनीज माझ्यामते मँगेनीजच आहे. आयर्न ओअर व बॉक्साईट सुध्धा शक्य आहे.
जिप्सी, मी गेल्याच वर्षी
जिप्सी, मी गेल्याच वर्षी वेंगुर्ल्याला गेले होते. खूप खूप खूपच रमणीय असा प्रदेश आहे तो. मन परत कोकणाकडे धाव घेऊ लागले.
खुप्पच सुंदर!!! मस्त सफर
खुप्पच सुंदर!!!
मस्त सफर घडवतोय्स कोकणाची
आज वेतोबाची जत्रा म्हणून धागा
आज वेतोबाची जत्रा म्हणून धागा वर काढतेय
Pages