खांडवी

Submitted by मंजूडी on 24 February, 2012 - 02:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळाचा रवा - २ वाट्या
बारीक चिरलेला गूळ - २ वाट्या
ओलं खोबरं - १ वाटी शीगोशीग भरून
पाणी - चार वाट्या
दोन मोठे चमचे साजूक तूप
किंचीत मीठ
जायफळपूड किंवा सूंठपूड - अर्धा चमचा
बदाम/ काजू/ आक्रोड इत्यादी सुकामेवा सजावटीसाठी आवडीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत पूर्ण वाळवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रवा काढतात. असा रवा दोन वाट्या घ्यावा. किंवा असा घरी रवा काढायच्या ऐवजी इडली रवा दोन वाट्या घ्यावा. इडली रवा वापरणार असाल तर तर तो मोजून घेऊन स्वच्छ धुवून पूर्ण वाळवून घ्यावा.
रवा कढईत मंद आचेवर कोरडाच खमंग भाजावा.
२. चार वाट्या पाणी मोजून घेऊन उकळण्यास ठेवावे.
३. रवा खमंग भाजला गेला की त्यावर उकळते पाणी सावकाश ओतत नीट ढवळून घ्यावे.
४. आच मंद ठेवून रव्यावर झाकण ठेवून द्यावे.
५. एक दणदणीत वाफ आली की झाकण काढून त्यात गूळ घालावा. साधारण पाव चमच्यापेक्षा किंचीत कमी मीठ घालावं. एकदा नीट ढवळून ओलं खोबरं आणि जायफळ किंवा सूंठपूड घालावी. सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून त्यावर झाकण ठेवून द्यावं.
६. आवश्यक वाटल्यास रवा शिजण्यासाठी पाण्याचा हबका मारावा. चांगल्या दणदणीत वाफा आल्या की मिश्रणाच्या कडेने तूप सोडावं.
७. एका ताटाला थोडं तूप लावून त्यावर तो सांजा थापावा. साधारण पाव इंच जाडी असू द्यावी. गरम असतानाच त्यावर सजावटीसाठी आवडीप्रमाणे सुकामेवा किंवा ओलं खोबरं पेरून दाबावं. गार झाल्यावर आवडीच्या आकारात वड्या कापाव्यात.

वाढणी/प्रमाण: 
दोन वाट्या रव्याच्या साधारण २५ ते ३० वड्या होतील.
अधिक टिपा: 

नारळाचा सढळ वापर केलेलं हे खास कोकणातील पक्वान्न आहे.
खायला देताना खांडवीवर पातळ साजूक तूप घालून देतात.

माहितीचा स्रोत: 
आजी, आई, मावश्या, माम्या
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फार करुन बघावीशी वाटतेय खांडवी. अनायसे घरात इडली रवा आणि खवलेला नारळ असे दोन्ही आहे.

रच्याकने, श्यामच्या आईमध्ये श्याम आणि त्याची आई लाडघरच्या समुद्रावर जातात तेव्हा ज्यांच्याकडे उतरतात ते जेवायला खांडवी करतात असा उल्लेख आहे.खांडवी ह्या पदार्थाची पहिली ओळख तिथे झाली. कोकणातले हे सगळे पदार्थ मी एकतर श्यामची आई मध्ये वाचले आहेत नाहीतर महादेवशास्त्री जोश्यांच्या कथांतून Happy काही पदार्थ नंतर खाण्याचाही योग आला तर काही अजूनही फक्त वाचनमात्र !

काकडीच्या उल्लेखावरून आणखी क्लीअर झाले .. हा काकडीचा प्रकार होतो आमच्याकडे .. कमी गोड असल्याने आवडीचाही आहे आणि भरपूर खालाही जातो

आमच्याकडेपण गोड पातोळे करतात. माहेरी ओले खोबरे नाही घालत. काकडीचा कीस, गुळ, वेलची, तांदूळ पीठ. सासरी ओले खोबरे घालतात.

आरती :).

नागपंचमीच्या सणाचं कोकणात हमखास केलं जाणारं पक्वान्न म्हणजे खांडवी . कोकणात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या तांदूळ, नारळ आणि गूळ या पासून बनलेलं .

मी नागपंचमी साठी केलेली खांडवी आणि घरी कढवलेलं ताजं कणीदार तूप .

IMG_20170727_111005.jpg

Pages