दहावी/बारावी मनःस्थिती निरिक्षण/उपाय

Submitted by अशोक. on 9 February, 2012 - 01:53

शैक्षणिक विश्वात नित्यनेमाने होत असलेला तसेच केवळ संबंधित विद्यार्थीच नव्हे तर त्या त्या पालकांच्या दृष्टीनेही अतिशय संवेदनशील असलेला विषय म्हणजे 'दहावी' आणि 'बारावी' परीक्षा. गेल्या काही वर्षापासून सीईटीला आलेले महत्व विचारात घेऊनही असे म्हणावे लागेल की या दोन परीक्षांच्या चाळणीतून यशस्वीरित्या पार पडल्याशिवाय मुलगा/मुलगी आपले शैक्षणिक भवितव्य निश्चित करू शकत नाही. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीच्या परीक्षा होणार आहेत. तर १ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पूर्वपरीक्षा तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी अटीतटीचे तसेच शर्थीचे प्रयत्न केले जातात. यासाठी ग्रामीण भागातच नव्हे तर विविध शहरातील नावाजलेल्या शिक्षण संस्थातूनही कॉपीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जातो.

अर्थात या लेखाचा मुख्य विषय "कॉपी" नसून यंदा प्रविष्ठ होणार्‍या परीक्षार्थींना पालकांनी (कौटुंबिक स्तरावर) ज्या काही सूचना देणे क्रमप्राप्त आहे त्याचा उहापोह करणे हा आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्यात, प्रामाणिकपणे अभ्यास करून [यांची संख्या खूप असतेच] परीक्षांना सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या उपद्रवी घटकांकडून कोणत्याही प्रकारचा मानसिक/शारीरिक त्रास होऊ नये यासाठी दोन्ही बोर्डाकडून शिक्षण क्षेत्राशीच संबंधित असलेल्या व्यक्ती नव्हेत तर अन्य शासकीय अधिकार्‍यांचाही वेळोवेळी समावेश करून त्यांच्याकडे शहर आणि ग्रामीण भागातील विविध केन्द्रावर निरिक्षक या नात्याने या संदर्भात पाहाणी करण्याची जबाबदारी सोपविली जाते. अशा या गटास 'भरारी पथक' म्हणून सर्वसाधारणपणे ओळखले जाते. भरारी पथकाने फक्त 'कॉपी' प्रकाराकडेच लक्ष द्यावे असे नसून परीक्षार्थींविषयी त्या त्या केन्द्राने केलेल्या सोयी, त्याचा वापर, प्राथमिक औषधोपचार, तणावमुक्त वावर, वाहन व्यवस्था, पोलिस बंदोबस्त आदीबाबीकडेही लक्ष दिले पाहिजे अशा सक्त सूचना असतात. गेली काही वर्षे मी अशा पथकातील एक सदस्य म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात वसलेल्या जवळपास साठ ते सत्तर केन्द्रांना भेटी दिल्या असून या दरम्यान परीक्षार्थींच्या मनःस्थितीचा जवळून अभ्यास करता आला आहे. ज्या काही नोंदी केल्या आहेत त्या आधारे मार्गदर्शनपर काही बाबी तिथल्या तिथे संबंधित मुलांना जरी सांगता येत नसल्या तरी या क्षणी या व्यासपीठाचा वापर करून यंदाच असे नव्हे तर यापुढेही ज्या पालकांचे पाल्य दहावी/बारावीला प्रविष्ठ होणार असतील त्यांच्यासाठी काही सूचना देण्याचा हा प्रयत्न.

१. घरातील वातावरण :
परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान आठदहा दिवस घरातील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे तसेच तणावविरहीत ठेवावे. आजकाल एकत्र कुटुंबाचे प्रमाण जरी कमी होत असले तरीही जिथे अशी स्थिती आहे त्या ठिकाणी तर कोणत्याही कारणाने कसलेही वादाचे प्रसंग उदभवणार नाहीत याची दक्षता घेणे नीतांत गरजेचे आहे. जरी त्या घरात दहावी/बारावीसाठी प्रविष्ठ होणारा एकमेव विद्यार्थी असला तरीही त्याच्यासाठी इतर सर्व घटकांनी प्रसन्नतेचे वातावरण निर्माण करणे फार गरजेचे असते. विशेषतः मुलगी असेल तर जास्तच काळजी घ्यावी. आठदहा दिवस "ईडियट बॉक्स" कडे कुणीच फिरकले नाही तरी कोणत्याही मालिकेतील कथानकाचा भाग एका इंचानेही पुढे सरकत नसल्याने परीक्षा कालावधीपुरता तरी त्या कुटुंबाने रीमोट कंट्रोल लॉक केला तरी काही बिघडत नाही. याचा परीक्षार्थीच्या दृष्टीने खूप फायदा होतो.

२. आहार :

कित्येक कुटुंबात संतुलित आहार ही तशी फार महत्वाची बाब मानली जात नाही असे मी पाहिले आहे. पण या कालावधीत शक्यतो घरी सात्विक आहाराचे प्रयोजन असावे. अभ्यासामुळे परीक्षार्थीची भूक मंदावते असे आढळले आहे, त्यामुळे त्याला/तिला फलाहार करायला सांगणे फार उपयोगाचे होते. हिरव्या पालेभाज्या या दिवसात खूप चांगल्या (आणि बहुतेक ठिकाणी स्वस्तही) मिळतात. हलके मसाले वापरून स्वयंपाक केल्यास त्यामुळे विद्यार्थ्याच्या अंगी या दिवसात जडपणा येत नाही. कोणत्याही 'पार्टी' चे आयोजन करू नये. अगदी घरातील एखाद्या बंटी वा बबलीचा वाढदिवस जरी या दरम्यान येत असला तरी तो टाळावा. सकाळी उठल्यानंतर विद्यार्थ्यास चहा लागत (च) असल्यास द्यावा अन्यथा या दिवसास गरम दूधासारखे सात्विक अन्य काही नसते. कोल्ड्रिन्क्स आणि आईस्क्रिमचा मोह टाळावा.

३. अभ्यासाची वेळ आणि लिखाणाची सवय
परीक्षेपूर्वी 'जाग्रण' करून अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही. एक लक्षात ठेवावे की रात्रीचे तास हे झोपण्यासाठीच आहेत. रात्री दहाला झोपल्यानंतर किमान सहा तास गाढ झोप घेतल्यानंतर पहाटे साडेचार वा पाचला उठून त्या कमालीच्या शांत वातावरणात केलेला अभ्यास फार लक्षणीय ठरतो. वर्गात दोन बाकांच्या रांगेतून फिरताना परीक्षार्थींच्या लिखाणाच्या सवयीत मला असे आढळले आहे की, मुलांपेक्षा मुली फार सहजतेने (तसेच वेगाने) उत्तरपत्रिकेत लिखाण करत असतात. हा सातत्याच्या सवयीचा परिणाम. ऑर्कुट, फेसबूक, ब्लॉग्ज आदी नवनवीन माध्यमाची ओढ लागलेल्या दहावी/बारावीच्या विद्यार्थ्यांना (मुले) निबंधस्वरूपाचे प्रदीर्घ लिखाण करणे जिकिरीचे होत चालले आहे असे दिसते. त्यामुळे पालकांनी अगदी अन्य स्वरूपाचे जरी नसले तरी क्रमिक पुस्तकातीलच काही उतारे 'लिखाणाची सवय' म्हणून आपल्या पाल्याकडून लिहून घेण्याचे प्रयत्न करावेत. तो एक अभ्यासाचा भाग असे समजून लिखाण केले तर प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी त्यामुळे झाली तर एकप्रकारची चांगली मदतच होईल. हस्ताक्षर सुंदरच असले पाहिजे असा काही दंडक नाही, पण ते नीट आणि स्वच्छ असले पाहिजे याची दक्षता विद्यार्थ्याने घ्यावी. काही परिक्षक मंडळी माझे मित्र आहेत. ते उत्तरपत्रिका तपासत असताना त्यांचे हावभाव मी टिपले आहेत. गठ्ठ्यात ज्याचे/जिचे हस्ताक्षर प्रसन्न करणारे आहे असा पेपर आढळला की तो तपासणार्‍याची मानसिक स्थितीही सकारात्मक होत जाते हे मी नोंदविले आहे.

४. प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस
परीक्षा आखणीबाबत बोर्डाच्या ज्या काही सुधारणा असतील त्यामधील सर्वात चांगली कुठली असेल तर परीक्षार्थीला शक्यतो त्याच्या सध्याच्या शाळा/क.महाविद्यालयाच्या आसपासच्या परिसरातीलच परीक्षा केन्द्र दिले जाते. म्हणजे ज्या ठिकाणी तो अगदी पाचवी पासून शिक्षण घेत असतो अगदी तीच इमारत नसली तरी तिथून ज्याला 'वॉकेबल डिस्टन्स' म्हटले जाते अशा संस्थांच्या आवारातीलच केन्द्र मिळते. आदल्या दिवशी बैठक व्यवस्था खुली केली जातेच, शिवाय त्या त्या केन्द्रावरील अधिकारी तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी विद्यार्थ्यांना अचूकपणे संबंधित बैठक व्यवस्थेबद्दल मार्गदर्शन करतो. याबद्दल कुणीही गोंधळून जाऊ नये.

५. प्रश्नपत्रिका सोडविताना
एकदा परिक्षार्थी स्थानापन्न झाला की त्याने/तिने सर्वप्रथम स्वच्छ रुमालाने आपला चेहरा तसेच हाताचे तळवे पुसून घ्यावेत. बाजारात यासाठी मिळत असलेले 'टिश्यू पेपर्स' ही वापरले तरी चालतील. यामुळे फ्रेश वातावरणाची निर्मिती होते शिवाय पहिल्या पेपरच्या अगोदर आलेले "अनअव्हॉयडेबल टेन्शन' ही कमी होते. तहान लागली असेल तरच पाणी प्यावे. उगाच घसा कोरडा करावा म्हणून नको. गरज नसताना पाणी पिताना ठसका लागला म्हणून आसन बाकवरूनच घाबरून खाली पडलेली एक मुलगी मी पाहिली आहे. हकनाक तिची दहा-पंधरा मिनिटे वाया गेली होतीच शिवाय तिचे रडणे पाहून सारा वर्ग अस्वस्थ. काही मुलामुलींत पेपर सोडविताना "च्युईंग गम" चघळण्याची सवय असलेली मी पाहिले आहे. कित्येक पालकांना आपल्या पाल्याची ही सवय माहीतही नसते. माहीत असो वा नसो, तरीही त्यानी असे न करण्याची सूचना त्याना वेळीच द्यावी. एरव्ही ठीक असेल, पण पेपर सोडविताना असे काहीबाही चघळत राहणे फार विचित्र आणि तितकीच धोकादायक आहे.

६. बोटे मोडण्याची सवय
गेल्या दहाबारा वर्षात मी निरिक्षण केलेली विद्यार्थ्यांची सर्वात मोठी सवय कुठली असेल तर दर प्रश्नानंतर वा दर पंधरावीस मिनिटांनी पेन खाली ठेवून "बोटे मोडणे". हे प्रमाण मुलींत जास्त आढळून आले आहे. अत्यंत नैसर्गिकरित्या ही क्रिया घडत असते. इतकी की त्या मुलीला आपण कशासाठी हा बोटे मोडण्याचा प्रकार करत आहोत याचेही भान नसते. एका प्रश्नाचे उत्तर लिहून झाले की हवेतर एखादा मिनिटे आपल्या हाताचे तळवे एकमेकावर घासले तरी चालेल, रुमालाने पुसून घ्यावेत, पण कोणत्याही स्थितीत बोटे मोडत बसू नकोस हे पालकांनी या विद्यार्थ्याला सांगावेच. लिखाणात मग्न असताना मधूनच विविध ठिकाणाच्या चार ते सहा परीक्षार्थींनी अशा बोटे मोडून घेण्याच्या सवयीने आपला अंगठा तात्पुरता का होईना 'बधीर' करून घेतलेला मी पाहिले आहे. त्यातील तिघांना (एक मुलगी) मी स्वतः केन्द्रप्रमुखांच्या खोलीत आणून तिथे उपलब्ध असलेल्या साहित्यावर औषधोपचार केले आहेत [प्रत्येक केन्द्रावर प्राथमिक औषधोपचाराची पेटी असते, ठेवावी लागतेच]. त्या मुलीचा तर तो इंग्रजीचा पेपर होता व फक्त १२.३० झाले होते. उत्तरपत्रिका पाहिली तर केवळ तीन प्रश्न (त्यातही एक अर्धवटच) पूर्ण झाले होते आणि इकडे ती तर त्या वेदनेने अगदी ओक्साबोक्शी रडत होती. आयत्यावेळी 'लेखनीक' देता येत नाही (त्यासाठी अगोदर रितसर अर्ज करावा लागतो. किचकट आहे तो सारा प्रकार) त्यामुळे मला वा केन्द्रप्रमुखानाही काही मार्ग सुचेना. शेवटी त्या कॉलेजच्या क्रिडा विभागात उपलब्ध असलेले 'मूव्ह पेन किलर स्प्रेयर' काही प्रमाणात उपयोगात आले व तिचा अंगठा निदान उरलेल्या एक दीड तासासाठी कसाबसा 'उपयोगा'त आणला गेला असणार.

अशीच एक टाळता येण्यासारखी सवय म्हणजे 'नखे कुरतडणे". एखादा प्रश्न काहीसा अवघड आहे असे वाटले की मुलगीच काय पण मुलगाही अस्वस्थपणे पेन बेंचवर ठेवून दाताने नखे कुरतडत बसल्याचे मी पाहिले आहे. यात कसल्या प्रकारचे समाधान मिळत असेल ही बाब गौण असली तरी बोटाचे पेर (विशेषतः मध्यमा) नाजूक असल्याने चावताना चुकून ते हळवे झाले तर नंतर पेन धरताना होणार्‍या वेदनेचे भाव त्याच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसून येतात. [असे जर झालेच तर संबंधिताने शिपायाकडून पाणी मागून घ्यावे व ते बोट एक दोन मिनिटे थंड करावे. वेदना कमी होतात.].

७. वाहन
आजकाल सर्वत्रच वाहनांचा सुकाळ झाला असल्याने तसेच अगदी वर्षभर दहावी/बारावीची मुले शाळेला/कॉलेजला तसेच खाजगी क्लासेसना जाता येता अगदी सहजतेने दुचाकींचा वापर करतात. यात गैर काही नाही, पण परीक्षेच्या त्या आठवड्या/पंधरवड्यापुरते तरी घरातील थोरल्या भावामार्फत, मित्रामार्फत वा अन्य ज्येष्ठ नातेवाईकांमार्फतच परीक्षा केन्द्रावर जावे. एकट्याने वाहन चालविताना परीक्षेचा ताण ड्रायव्हिंगवर पडू शकतो. केन्द्रावर सोडविण्यास कुणी उपलब्ध नसेल तर रिक्षा हा पर्याय चांगला होतो. ही बाब पालकांनी पाहणे गरजेचे आहे.

शेवटी, विद्यार्थ्याकडे असला पाहिजे तो आत्मविश्वास. हा गुण असून त्याचे पोषण पालकांनाच करावे लागते. परीक्षेला प्रविष्ठ होणार्‍या मुलास मुलीस पालकांनी याचे शिक्षण देणे गरजेचे आहे की त्या दोन-तीन तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास थेट इन्व्हिजिलेटरशी लागलीच संपर्क साधावा. ही मंडळीदेखील एरव्ही 'पालक' च असतात त्यामुळे ते 'सुपरव्हिजन' करतात म्हणजे प्रश्नपत्रिका/उत्तरपत्रिका वाटणे, तसेच फक्त कॉपी पकडण्यासाठीच त्यांची ड्युटी नसून परीक्षार्थीला सर्वतोपरी मदत करणे आणि आवश्यक त्याप्रसंगी धीर देण्याचेही काम करतात. त्याना बोर्ड आणि केन्द्रप्रमुखांकडूनही तशा सूचना दिलेल्या असतातच.

२०१२ च्या या परीक्षांना सामोरे जाणार्‍या इथल्या सदस्यांच्या पाल्यांना वा नात्यातील मुलामुलींना देदीप्यमान यशासाठी हार्दिक शुभेच्छा !

अशोक पाटील

गुलमोहर: 

सहसा १०/१२ वी परिक्षा केंद्रे म्हणजे नेहमीच्या शाळा महाविद्यालये असतात परंतु सी.ई.टीला मात्र अपरिचित शाळा, त्यावरचा समजुन न येणारा पत्ता यामुळे पहिल्या दिवशी गोंधळात पडण्याची स्थिती येते सबब पालकांनी आदल्या दिवशी जाऊन किंवा किमान पहिल्या दिवशी लवकर जाऊन खात्री करुन घ्यावी.

माझ्या मुलीच्या १२ वी सी.ई.टी.च्या वेळी चुकुन काही मुलांचे सी.ई.टी.चे फॉर्म पाठवण्याचे राहुन गेले. परिक्षेला ३ दिवस राहिले असताना ही मुले त्यांचे पालक आणि संबधीत ज्यु.कॉलेजचे अधिकारी पुण्याहुन मुंबईला गेले. विशेष प्रयत्नाने परिक्षेला बसण्याची परवानगी मिळवुन परिक्षेच्या आधी फक्त काही तास या गोंधळातुन सुटले.

पालकांनी /विद्यार्थ्यांनी इअतर विद्यार्यांच्या कडे चुकशी करुन आपलेच्च हॉल तिकीट का नाही आले याची चौकशी करावी.

अगदी माझे परिक्षेचे दिवस आठवले. घरातल्या मंडळींनी खुपच सहकार्य केले होते.
आताचा परिक्षेचा पेपर आणि त्याचे स्वरुप कसे असते याची कल्पना नाही, पण घड्याळ लावून सराव म्हणून अनेक प्रश्नपत्रिका सोडवणे, याचा खुपच फायदा होतो. आमच्या शाळेनेच, हा उपक्रम राबवला होता.

@ नितीनचंद्र

~ सीईटीसाठी एक स्वतंत्र अशी यंत्रणा आहे. तुम्ही म्हणता तशी सीटिंग अरेंजमेन्टची गोंधळाची परिस्थिती सुरुवातीच्या काळी नक्कीच होती, पण खात्याच्या अधिकार्‍यांनी आता त्यावर चांगली उपाययोजना केली असून सीईटीच्या फॉर्मसोबतच त्या त्या शहरातील संभाव्य केन्द्रांची नावे ज्युनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षकांना (हे पद प्राचार्याच्या दर्जाचे असते. स्केलमध्ये फरक असतो) कळविली जातात. संबंधित पर्यवेक्षक हे मूळचे त्याच कॉलेजमधील अध्यापक असल्याने ते आपल्या अन्य सहकार्‍यांच्या मदतीने अशा केन्द्रांची नावे त्या विद्यार्थ्यांना वर्गात तासांच्या वेळीच वेल इन अ‍ॅडव्हान्स सांगत असतात. ग्रामीण भागात अजून सीईटीचे केन्द्र दिलेले नाही, पण तिथेही तिथल्या पर्यवेक्षकांनी अशी माहिती विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित असते, व तशी ती वेळीच दिलीही जाते. त्यामुळे आता 'केन्द्र ठिकाण' या बाबत गोंधळ होत नसल्याचे आढळत आहे.

तरीही पालकांनी याबाबत आवश्यक ती काळजी घेतली तर ते विद्यार्थ्याच्या दृष्टीने हिताचे ठरते.

खूप उत्तम लेख. घरातील वडिल धार्‍यांनीच मुलांना सेंटर वर सोडावे. त्यांनी घरून लवकर निघावे व जरा लवकर पोहोचले तरी हरकत नाही. आयत्यावेळी ट्रेफीक जाम वाहन खराब होणे इत्यादी साठी वेळ अ‍ॅलोकेट करावा. लिखाणाच्या सवयीचा मुद्दा बरोबर आहे. तसे प्रयत्न करवून घेइन. असे लेख अजून लिहा. मदत होते आहे.