"तू गातोस का ? तुला गाता येतं का ?"
एका सायंकाळी कामात गर्क असताना माझ्या भ्रमणध्वनीवर सईचा हा प्रश्न ऐकून मी जरा गोंधळून गेलो. हो म्हणावे तरी पंचाईत ... नाही म्हणावे तर अवघड. कारण कधीकधी गप्पांच्या मैफिलीत मी आवाज साफ करुन घेतलेला आहे.
याउलट हो म्हटल्यावर थेट स्टूडिओमधे नेले असते तर परिस्थिती अवघड झाली असती.
दुसरे म्हणजे पार्श्वभूमी काहीच माहिती नसताना एकदम काय उत्तर देणार. म्हणजे माझ्या मनात या प्रश्नाच्या रोखाने पार जाहिरातीमधे काही जिंगल्स म्हणण्यापासून ते एखाद्या बाळासाठी अंगाईगीत म्हणण्यापर्यंत अनेक प्रयोजनं चमकून गेली. ... कशासाठी 'गाता येतं का?' ... काही कळेना !!
मी मला जमेल तितके आणि जमेल तसे टाळण्याचा प्रयत्न करत होतो.
शेवटी तिनेच खुलासा केला. मायबोलीकरता शीर्षक गीत बनवत आहेत. बरचसं काम झालेलं आहे. परंतु एकुणात गीताचा समतोल साधण्यासाठी काही पुरूष गायक हवे आहेत. तर तू योगेश जोशीला मेल कर आणि त्याला सांग तुला ह्या प्रकल्पामधे भाग घ्यायचा आहे म्हणून.
आता आली का पंचाईत !! म्हणजे वाचकांच्या पत्रव्यवहारामधे चार-दोन पत्र लिहुन, छापुन आल्यावर लगेच, साहित्य संमेलनात मिरवण्यासारखे झाले.
"ओ, मला गाता येतं हो." ... म्हटल्यावर योगेशने थेट 'सा' लावायला सांगितला तर काय घ्या !! त्यामुळे "हो" म्हणण्याचे माझे धाडस होईना. शेवटी मी तिला सांगितले की मी काही योगेशला मेल करणार नाही, मला काही ते जमेल असे वाटत नाही.
मग, का कोण जाणे, तिनेच योगेशला मेल करून माझा संपर्क क्रमांक व ई-मेल पत्ता दिला. यथावकाश - म्हणजे तासाभरातच - योगेशचे उत्तर सुद्धा आले. मार्दवतेने ओतप्रोत भरलेल्या सुरात, पण जरा धमकीच्या शब्दात त्याने त्याच्याबद्दलची आमच्या मनात असलेली भीती काढून टाकण्यास सांगितले. नंतर फोनवरही पुढील कार्यवाही बद्दल चर्चा केली.
. . . . .
. . . . .
जोशी नावाच्या व्यक्तींच्या स्वभावविशेषांच्या अनुषंगाने अनेक व्यंगचित्र, विनोद सतत येत असतात. त्यायोगे जोशी आडनावाच्या व्यक्ती सहसा उर्मटपणे वागण्या-बोलण्याबद्दल जास्त प्रसिद्ध झाले आहेत. पण योगेश जोशी ही व्यक्ती ह्या समजाला छेद देऊन जाते. बोलण्यात इतकी मार्दवता की शिव्या दिल्या तरी समोरच्याला वाईट वाटणार नाही. काय करायचे आहे आणि ते कसे करायचे याची पुर्ण कल्पना असल्याने आणि समोरच्याला समजेल अशा भाषेत सुचना, चुका सांगण्याची हातोटी, यामुळे योगेशबरोबर लगेचच सुर जुळले.
अर्थात वागण्या-बोलण्यातले सुर जुळले तरी गाण्यात ते जमेल की नाही हे मात्र शेवतपर्यंत गुलदस्त्यातच होते.
ह्या प्रकल्पाची थोडक्यात माहिती देण्यासाठी किंवा गायनातली आमची उंची बघण्यासाठी एक-दोन वेळा स्काईपवर भेट झाली. आमच्या आवाजाची गुणवत्ता (?), पोत वगैरे बघुन त्याने काही मौलिक सुचना केल्या, कुठल्या ओळी कोणी म्हणायच्या हे सुद्धा पक्के केले, आणि थेट ध्वनिमुद्रणाची तारीख पक्की केली. अर्थात त्या वेळेपर्यंत गीताचे बरेचसे काम झालेले असल्याने आम्हाला कुठे सामावून घेता येईल, किंवा कुठला भाग आम्ही गाऊ शकू याचा त्याला अंदाज आलाच होता.
त्यावेळेपर्यंत ध्वनिमुद्रित झालेले गाणे पाठवले आणि पुढच्या वेळेपर्यंत गाणे ऐकुन तयारी करुन ठेवायला सांगितले.
. . . . .
. . . . .
तसा ह्या प्रकल्पात माझा सहभाग खूपच उशीरा झाला. ऑक्टोबरपासून ह्या गीतावर काम सुरु आहे, हे आमचे ध्वनिमुद्रण झाल्यानंतर मला समजले. मायबोलीवर फार कमी चकरा होत असल्याने सध्या नवीन काय चाललय, हे कळायला काही मार्गच नव्हता. सईकडून याविषयी माहिती मिळाली नसती तर आज हा दिवस उगवता ना !!
गाण्याची आवड भरपुर ... म्हणजे एकांतात म्हणण्याची आणि जास्त करुन ऐकण्याची. जसे बरेच जण विनोदाने म्हणतात, तसे आम्ही 'कानसेन'. कधीतरी मित्रांच्या गप्पांमधे गळा साफ करुन घेणारे. गाताना श्वास कमी पडला म्हणून स्वतः गायक आणि समोरील श्रोतृवर्ग .. कुणालाच काही न वाटणारे, काळी ५, पांढरी २ हे शब्द नुसते ऐकुन माहिती असणार्यांच्या कुळातले आम्ही. कुणी गाण्यासाठी, ध्वनिमुद्रणासाठी विचारेल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. त्यामुळे थेट ध्वनिमुद्रणाची तारीख पक्की केल्यावर पोटात गोळा आला.
'कस्सं होईल ... काय होईल !!'
खरोखर आपण त्या गीताला, त्यातील शब्दांना, भावार्थाला न्याय देऊ शकू का ? खरच आपल्याला तालासुरात त्या ओळी म्हणता येतील का ? तोपर्यंत बरेच जणांचे ध्वनिमुद्रण झालेले होते. त्यांच्या आवाजाची उच्च गुणवत्ता ऐकलेली असल्याने, आपले ध्वनिमुद्रण ही त्या गुणवत्तेचे होणे गरजेचे होते. सतत मनात धाकधूक होती.
'कस्सं होईल ... काय होईल !!'
त्यातून त्याच सुमारास कंपनीमधेही प्रचंड काम होते. रात्री घरी आल्यावर जेवण करुन कधी एकदा झोपतोय असे व्हायचे. त्यामुळे गाण्याचा सराव वगैरे करणे खूप अवघड जात होते. २-४ वेळा गाणे ऐकायला वेळ मिळाला. पण तेवढ्याने थोडेच भागणार होते.
. . . . .
. . . . .
३१ डिसेंबर, शनिवार.
अंबरने त्याच्या मित्राचा स्टूडिओ बुक केलेला होता. योग मुंबईहुन सकाळी १० च्या सुमारास पुण्यात पोचणार होता. पण मला काही कामांमुळे जरा उशीर होणार होता. त्यामुळे १२ वाजता भेटून जेवण करुन थोडावेळ अंबरच्या घरी जरा सराव करुन मग स्टूडिओमधे ध्वनिमुद्रणासाठी जायचे असे ठरले.
त्याप्रमाणे मी व योग एका हॉटेलात गेलो. थोड्याच वेळात अंबर सुद्धा आला. भरपेट जेवण करुन जवळच अंबरच्या घरी सरावासठी गेलो.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकलो . . . की गाणं म्हणण्यापुर्वी कधीही पोट तुडुंब भरेपर्यंत जेवू नये. प्रचंड आळसावल्यासारखे झाले होते, डोळे चांगलेच जड झाले होते आणि आवाज तर चढतच नव्हता. कसेबसे एकदोनदा आपापली कडवी गायल्यानंतर स्टूडिओमधे जायची वेळ झालीच.
. . . . .
. . . . .
स्टुडिओ हा प्रकारसुद्धा नवीनच होता. कधी संबंधच आला नव्हता. त्यामुळे उत्सुकता खूप होती. गायनाचा अनुभव मजेदार होता. सततचे टेक-रिटेक, आवाजातले चढ-उतार, स्वच्छ शब्दोच्चार आणि भावना ... या सगळ्या गोष्टी यथासांग घडत एक कडवे २-३ वेळा माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित केले गेले, आणि त्यातील सगळ्यात चांगले पुढील सोपस्कार करण्यासाठी वापरले जाईल असे समजले. पण ते ध्वनिमुद्रण ऐकल्यावर मात्र "योगेशला यात काय आवडले?" ते काहीच कळेना. मला तर त्यात काहीच फरक जाणवत नव्हता. फक्त माझा आवाज फारच खरखरीत वाटला. नंतर अंबरच्या आवाजातही एक कडवे ध्वनिमुद्रित केले. अशा तर्हेने ध्वनिमुद्रणाचा कार्यक्रम पार पडला.
आता सगळे सोपस्कार आणि संस्कार झाल्यावर ते गीत कसं वाटतय ते आता सादरीकरण झाल्यावर कळेलच.
पण तिथे अजुन एक गोष्ट समजली म्हणजे नुसते सुर-ताल यांची जाण असणं किंवा कधीतरी गाणं म्हणणं आणि स्टूडिओमधे गाणं म्हणणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. स्टूडिओमधे बारिकसा श्वाससुद्धा खूप प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे लहान-सहान गोष्टींची पण खूप काळजी घ्यावी लागते. अर्थात या गोष्टी एरवी कधी समजल्या नसत्या हे खरच.
पण माझ्या दृष्टीने योगची झालेली ओळख हीच मोठी जमेची बाजू होती. एकतर खूप उशीरा या प्रकल्पात सहभागी झाल्याने बाकी कुणाची ओळख होउ शकली नाही. त्या वेळेपर्यंत कुणी कुणी, किती आणि काय काय कष्ट घेतलेले आहेत याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी मायबोली शीर्षकगीत म्हणजे योगेश हेच समीकरण होते. दुसरे म्हणजे मायबोलीचे शीर्षकगीत मायबोलीसारखेच जागतिक करण्याची अफलातुन कल्पना, त्यातही लहानांपासुन मोठ्यांपर्यंत विविध वयोगटातील हौशी व्यक्तिंकडुन ते गाऊन घेण्याची कल्पकता, ती प्रत्यक्षात आणंण्यासाठीची धावपळ, दुबई-मुंबई-पुणे असा प्रवास, आणि गीताच्या शब्दांबरोबर चपखल बसेल असा चढवलेला संगीताचा साज ... या सगळ्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात. गीतकार उल्हास भिडे यांचेही यानिमित्ताने हार्दिक अभिनंदन. त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा हा अविष्कार, योगेशने दिलेल्या सुमधुर संगीताचा साज लेऊन मायबोलीचे शीर्षकगीत म्हणुन सगळ्यांसमोर जेव्हा येईल, तेव्हा होणार्या कौतुक-सुमनांच्या वर्षावात माझ्याही अंगावर काही फुले पडतील, हे माझे भाग्यच.
गायक, वादक यांच्याबरोबर ध्वनिमुद्रण संचातले तांत्रिक सल्लागार, व्यवस्थापक आणि अॅडमिन सर्वांची तोलामोलाची साथ या प्रकल्पाला मिळाली असल्याने, हा प्रकल्प अपेक्षेपेक्षाही अधिक यशस्वी होणार, यात शंकाच नाही.
सर्वांचे यानिमित्ताने हार्दिक अभिनंदन !
फक्त एकाच गोष्टीची उणीव राहुन गेली. ती म्हणजे बाकी मायबोलीकर गायकांची ओळख होऊ शकली नाही.
मिहीर, योगेश
नुसत्या ध्वनिमुद्रणातच इतकी मजा आली. तर प्रत्यक्ष गीत सादर झाल्यावर होणारा आनंद अवर्णनीय असेल हे मात्र निश्चित !!!
- मिहीर देशपांडे
मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:
झलक मधील गाय़कः
१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)
>>तू गातोस का..? निश्चीतच!
>>तू गातोस का..?
निश्चीतच! आणि चांगला गातोस
बाकी,
>>बोलण्यात इतकी मार्दवता की शिव्या दिल्या तरी समोरच्याला वाईट वाटणार नाही.
ठीक! पुढील भेटीसाठी लक्षात ठेवतो..
ह्म्म........ मिहीर.........
ह्म्म........ मिहीर......... झकास लिहिलं आहेस
तू जी उणीव बोलून दाखवलीस तीच माझीही आहे रे......... किंबहुना जरा जास्तच तीव्र आहे. मला पण कुणालाच भेटता आलं नाही. योगेश सोबत खरं तर इतक्या वर्षांपासून बोलतेय पण त्यालासुद्धा मी अजूनपर्यंत भेटले नाहीये. पण लवकरच तोही "योग" येईल असं वाटतंय
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
मिहिर, अगदी मनापासून लिहिलंत
मिहिर,
अगदी मनापासून लिहिलंत ..... खूप छान वाटलं वाचताना.
या गीताच्या निमित्ताने तुमच्यासारखे जुने मायबोलीकर परत अॅक्टिव्ह झाले
ही आम्हा नवीन सभासदांसठी आनंदाची गोष्ट.
वा!!! मिहिर तू गातोस ?? हे
वा!!! मिहिर
तू गातोस ?? हे मात्र मला आजच समजले
मिहिर मस्त लिहिलयस, तुम्ही ही
मिहिर मस्त लिहिलयस, तुम्ही ही आमच्या बरोबर असता तर अजुन धमाल आली असती
छान झालंय मनोगत
छान झालंय मनोगत
(No subject)
(No subject)