अमेरिकेनी जगाला काय दिलं?
या प्रश्नाच्या उत्तरांची वर्गवारी करता येईल. आणि प्रत्येक उत्तराकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघतील. पण आजच्या काळात बरेच लोक अमेरिकेनी जगाला नको त्या गोष्टी दिल्या या विचारलाच दुजोरा देतील. भारतात गेल्या दोन दशकांपासून चाललेल्या "सांस्कृतिक अध:पतनासाठी" बरेच लोक अमेरिकेला आरोपीच्या पिंजर्यात उभे करतात. अर्थात, त्यात चूक काहीच नाही. अमेरिकेनी जगाला एक नवीन संस्कृती दिली. आणि सुसंस्कृत समाजानी या अतिक्रमणाचा वेळोवेळी निषेध केला.
तर काय बरं नाव देता येईल या नवीन संस्कृतीला? माझ्या मते अमेरिकेनी जगाचं "मॅकडॉनाल्डीकरण" केलं. आणि यात फक्त जिथे तळलेले बटाटे आणि बर्गर मिळतात त्या एकसारख्या दिसणार्या खानावळींचा समावेश नसून, त्यामागून येणार्या विचारधारेचाही समावेश होतो. यावर लिहिलेलं "फास्ट फूड नेशन" हे पुस्तक माझ्या नुकतच वाचनात आलं. मॅकडॉनल्ड्सचा जन्म, आणि आजपर्यंतचा प्रवास यावर हा पुस्तकवजा प्रबंध एरिक श्लॉसर यांनी लिहिला आहे. यात प्रामुख्याने मॅकडॉनल्ड्सचा इतिहास असला तरी अमेरिकेतील इतर फास्ट फूड चेन्सचा देखील धावता अभ्यास केला आहे.
फास्ट फूड या खाद्यशाखेचा जन्म हा पेट्रोलवर चालणार्या चारचाकी गाड्यांच्या उदायाशी निगडीत आहे. अमेरिकेत चारचाकी गाड्या सामान्य माणसांच्या हातात आल्यावर, गाडीत बसून हवं ते मागवता आणि खाता यावं, या "गरजेतून" ड्राइव इन रेस्तरांचा "शोध" लागला. गाडीचालक मुलखाचा आळशी असतो. आणि त्याच्या आळशीपणाचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल, या भावनेतून मॅकडॉनल्ड बंधूनी पाहिलं मॅकडॉनल्ड्स उघडलं. ते साल होतं १९४५. पण पहिली अमेरिकन वडापावची (हॉट डॉग) गाडी कार्ल नावाच्या जर्मन-अमेरिकन तरुणांनी लॉस एंजलीसमध्ये त्याच सुमारास टाकली. याचं रुपांतर पुढे कार्ल जुनियर या प्रसिद्ध फास्ट फूड चेनमध्ये झालं. फास्ट फूडचा जन्म आणि जागतिक उद्योगीकरण यांचा फार जवळचा संबंध आहे. अन्न पदार्थ घावूक प्रमाणात कसे बनवता येतील, हा प्रश्न त्याकाळी खूप महत्वाचा मानला जायचा. आणि ते त्या प्रमाणात बनवताना त्यांची क्वालिटी कुठेही कमी पडणार नाही अशी हमी देऊ शकणारे उद्योजक श्रेष्ठ मानले जायचे. सुरुवातीला मॅकडॉनल्डमध्ये आखूड फ्रॉक घालून वाहनचालकांकडून ऑर्डर घेणार्या तरुण वेट्रेसेस असायच्या. आणि सर्व पदार्थ काचेच्या बशा, धातूची कटलरी वापरून पेश केले जायचे. पण हळू हळू वेळ आणि पैसा वाचवण्याच्या हेतूने वेट्रेस आणि कटलरी दोन्हीवर काट मारण्यात आली.
मॅकडॉनल्डच्या स्थापनेपासूनच जोरदार चालणारा खाद्य पदार्थ म्हणजे त्यांचे प्रसिद्ध फ्रेंच फ्राईज. फ्रान्समध्ये देखील हे "फ्रेंच" फ्राईज इतके प्रसिद्ध नाहीत जितके ते मॅकडॉनल्डमुळे झाले. मॅकडॉनल्डच्या प्रत्येक बर्गर बरोबर फ्राईजचं एक पाकीट विकण्यात येतं. साधारण एका बोट रुंदी आणि लांबी असलेले बटाट्याचे तुकडे एका विशिष्ट पद्धतीने तळण्यात येतात. ही तळण्याची पद्धतदेखील खूप प्रयोग करून नियमित करण्यात आली आहे. मॅकडॉनल्डची फ्राईज प्लांट्स दिवसागणिक दोन मिलियन पौंड फ्रोझन फ्राईज बनवतात. १९६६ सालापासून मॅकडॉनल्डनी फ्रोझन फ्राईज विकत घेऊन आयत्या वेळी तळून ग्राहकांना पुरवायला सुरवात केली. यात नुसता वेळ आणि पैशाचा हिशोब नव्हता. १९६० च्या दरम्यान मॅकडॉनल्डच्या साखळीने संपूर्ण अमेरिकेला वेढा घातला होता. प्रत्येक मॅकडॉनल्डमधले फ्रेंच फ्राईज एकसारखे दिसावेत आणि चाविलादेखील सारखे असावेत हा ही हेतू या बदलामागे होता. पण असा नियमितपणा आणताना, हे गोजिरवाणे बटाटे एकदा तळून गोठवण्यात येतात. आणि विक्रीच्या ठिकाणी पुन्हा एकदा तळण्यात येतात! या एका पदार्थाने अमेरिकन शेतीमध्ये खूप मोठी क्रांती घडवून आणली. आणि अमेरिकेच्या पोटी आलेल्या या बटाटेसुराची भूक भागवण्यासाठी शेतकर्यांनी रसेट बटाटे उगवायला सुरुवात केली. पण या क्रांतीतून (नेहमीप्रमाणे) शेतकर्यांचा फार कमी फायदा झाला.
मॅकडॉनल्डनी अजून एका क्षेत्रात क्रांती घडवली. ती म्हणजे "टीनएजर" एम्प्लॉयमेंटमध्ये. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे अठरा वर्षाखालील मुलांना पार्ट टाईम कमी पैशात (मिनिमम वेज) काम करता येते. याचा सगळ्यात मोठा फायदा मॅकडॉनल्डनी करून घेतला. बिगारीवर काम करणारी लाखो तरुण मुलं मुली रोज सकाळी सहा वाजता वेगवेगळी मॅकडॉनल्ड उघडत असतात. यातील बरीच अजून आई बाबांच्या घरी राहत असतात. त्यामुळे मिळणार्या पैशातून गाडी घेणे, चैनीच्या वस्तू पालकांचा जाच न होता विकत घेणे अशा गरजेमधून हा रोजगार चालतो. मॅकडॉनल्डचा दुसरा कामगार वर्ग म्हणजे अनस्किल्ड इमिग्रंट्स. परदेशातून आलेले (मुख्यत्वे मेक्सिकोहून), इंग्लिश न येणारे, गरिबीत राहणारे कित्येक लोक मॅकडॉनल्डच्या आश्रयाला येतात. पण त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती (विशेष करून वैद्यकीय) दिल्या जात नाहीत. कामगारांनी कुठल्याही प्रकारचा कामगारसंघ बनवू नये यासाठी मॅकडॉनल्ड खूप प्रयत्नशील आहे. तिथलं काम इतकं नियमित केलं आहे की कुठल्याही कर्मचार्याच्या सोडून जाण्यामुळे नुकसान होत नाही. मॅकडॉनल्डकडे तिथे काम करणारे सगळे लोक पुढे जाण्याची एक पायरी या हेतूनेच बघतात. आणि त्यामुळे मॅकडॉनल्डचा "टर्न ओव्हर रेट" खूप जास्त आहे.
फ्रेंच फ्राईजनी जशी अमेरिकन शेतीत क्रांती घडवली तशीच अजून एक क्रांती मॅकडॉनल्डने बीफ उद्योगात घडवली. मॅकडॉनल्डला घावूक प्रमाणात बीफ पुरवता यावं या हेतूने बीफ उद्योगाने बरीच तांत्रिक प्रगती केली. बीफ आता छोट्या, संपूर्णपणे मानवी कौशल्याने चालणार्या उद्योगांकडून न येता, मोठ्या संपूर्णपणे मेकॅनाईझ्ड कारखान्यांमधून येऊ लागलं. बोनलेस बीफ खीम्याच्या स्वरूपात, तापमान नियंत्रित वाहनातून मॅकडॉनल्डला पोहोचवण्यात येऊ लागलं. या बदलामुळे बीफ उद्योगातील कामगारांच्या मिळकतीवर विपरीत परिणाम झाला. एके काळी भरपूर पैसे मिळणारा हा उद्योग अचानक आजारी झाला. आज जसे डेट्रॉइटमध्ये ओस पडलेले गाड्यांचे कारखाने दिसतात तसेच त्या काळी आजारी होऊन बंद पडलेले बीफचे कारखाने दिसायचे. बीफ उत्पादन महाग असायचं अजून एक कारण म्हणजे इथे काम करणार्या कामगारांना प्रचंड जोखीम पत्करावी लागायची. बर्याच कामगारांना अपघात व्हायचे आणि कधी बोटावर तर कधी संपूर्ण हातावर बेतायचं. एका अर्थाने बीफ उत्पादन मशिनरी वापरून होऊ लागलं हा चांगला बदल म्हणता येईल. पण त्या बदलाचा कामगारांच्या मिळकतीवर परिणाम झाल्यामुळे हे चांगलेपण झाकोळून गेलं. या उद्योगातील प्रत्येक कामगारसंघाला अगदी शांतपणे चिरडून टाकण्यात आलं. कधी कधी कारखान्यातल्या सगळ्या कामगारांना एकाच वेळी नोकरीवरून बरखास्त करण्यात यायचं आणि त्यांच्या जागी जवळपास ४०% कमी पगारात काम करणार्या नवीन लोकांना नेमलं जायचं. संपावर गेलेल्या कुठल्याही कामगाराला पुन्हा नोकरीवर घेतलं जायचं नाही.
हल्लीच्या काळात मॅकडॉनल्डवर केलेला अजून एक आरोप म्हणजे त्यांच्या जाहिरातींमधील लहान मुलांवर केलेलं छुपं प्रोग्रामिंग. लहान मुलं पालकांवर मानसिक दबाव आणू शकतात या अगदी साध्या "सत्यातून" मॅकडॉनल्डनी त्यांच्या जाहिराती लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी बनवल्या आहेत. मार्केटिंग विश्वात आई बाबांकडे हट्ट करण्यार्या मुलांचं वर्गीकरण करण्यात येतं. यात नुसती भुणभुण करणारी, पुन्हा पुन्हा आठवण करून देणारी, प्रेमानी गळ घालणारी आणि तमाशा करणारी असे सोपे वर्ग केले आहेत. मॅकडॉनल्डच्या हॅपी मीलवर खूप टीका झाली. हॅपी मीलमधून लहान मुलांसाठी मॅकडॉनल्ड वेगवेगळी खेळणी वाटू लागलं. काही खेळण्यांचे संपूर्ण सेट वेगळ्या वेगळ्या डब्यांमध्ये विखुरण्यात आले. त्यामुळे पालकांवर ही खेळणी मुलांना जमवता यावीत यासाठी खूप तणाव येऊ लागला. मग अशा वेळेस आपल्या मुलाला मीलमधून मिळणार्या खेळण्यासाठी, पूर्ण दिवसासाठी लागतील इतक्या कॅलरीज एकाच वेळेच्या जेवण्यात देऊ करायच्या का, असा साहजिक प्रश्न सुजाण पालकांना पडतो. पण मुलं शाळेतून घरी येतात आणि इतर मुलांची उदाहरणं देतात. अशा वेळेस पालकांनी काय करायचं? नुकताच सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये अशी खेळणी विकण्याविरुद्ध कायदा करण्यात आला आहे. पण त्यावर दहा सेंट्सला ही खेळणी वेगळी विकण्याचा "जालिम उपाय" मॅकडॉनल्डनी शोधून काढला आहे.
अमेरिकेतल्या कित्येक स्टेट्समध्ये हल्ली मॅकडॉनल्ड शाळांमध्ये सुद्धा जाहिराती करतात. शाळेतल्या कॅन्टिनमध्ये मुलांना फास्टफूड विकण्यात येतं. आणि कित्येक शाळा या जाहिरातींच्या मोबदल्यात मिळणार्या पैशांसाठी या निर्णयाचं समर्थन करतात. अशा जाहिराती करून मॅकडॉनल्डनी एक अख्खी अमेरिकन पिढी वाढवली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात जे नवीन पालक आहेत, त्यापैकी काहींच्या मनात मॅकडॉनल्डच्या नॉस्टॅलजिक आठवणी आहेत (हे साधारण भारतीय लोकांना मॅगी बद्दल असलेल्या भावनांसारखं म्हणता येईल). त्यामुळे आता मॅकडॉनल्डशी एक भावनिक धागासुद्धा जुळला आहे.
पण या सगळ्याचा परिपाक काय? या पुस्तकातली मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे लेखकानी हे पुस्तक नि:पक्ष होऊन लिहिलं आहे. अर्थात मॅकडॉनल्डमुळे लोकांच्या खाण्याच्या संकल्पनेलाच एक नवीन वळण मिळालं. आणि ते चांगलं नक्कीच म्हणता येणार नाही. अमेरिकन समाजावर या व्यवस्थेचे बरेच वाईट परिणाम झाले. स्थूलता, आळशीपणा, हृदयविकार, डायबेटीस अशा बर्याच व्याधींचं मूळ हा आहार मानला जातो आणि यावर बरंच संशोधनदेखील झालं आहे. पण मॅकडॉनल्ड ही संकल्पना अतिशय नवीन होती आणि ती इतक्या दूरवर नेण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे हे मात्र निश्चितपणे म्हणता येईल. मॅकडॉनल्ड बाहेरच्या देशांनी सुरुवातीला साफ खोडून काढलं. प्रत्येक नवीन राष्ट्रात आणि त्याच्या समाजात मॅकडॉनल्डला पुन्हा नव्यानी सुरुवात करावी लागली. भारतात बिग मॅकचा महाराजा मॅक झाला. जपानमध्ये श्रिम्प बर्गर "कात्सु" सॉस बरोबर विकण्यात येऊ लागले. चिलीमध्ये केचपऐवेजी ग्वाकामोली देण्यात येऊ लागलं. ग्रीसमध्ये बन ऐवेजी पिटा विकण्यात येऊ लागला. इस्राएल मध्ये मॅकशवर्मा विकण्यात येऊ लागला. प्रत्येक देशातील लोकांच्या आवडी निवडी ओळखून आणि त्यांच्या धार्मिक भावना समजून मेन्यू आखणे आणि तो शक्य तितका नियमित करणे हे खरोखर अवघड काम आहे. हे काम करताना मॅकडॉनल्डला बरेच आर्थिक फटकेही बसले आहेत.
जरी पुस्तकातील इतर गोष्टी वाचून माझ्यातील डावी बाजू संतापली असली, तरी त्यांच्या या सृजनशीलतेचं आणि उद्योगशीलतेचं माझ्यातील उजव्या आणि कल्पक बाजूकडून कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. शेवटी इथे खायचं किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. मॅकडॉनल्डनी आपल्यावर अतिक्रमण केलं आहे असा विचार करताना, त्या जोडीला आपण मॅकडॉनल्डमध्ये का जातो, हा विचारही झाला पाहिजे.
आजकालच्या जगात टु बी ऑर नॉट टु बी वळणावर आणून ठेवणार्या इतरही बर्याच गोष्टी आहेत. त्यामुळे विरोधच करायचा असेल तर नुसताच या कंपन्यांना न करता आपल्या आतील आहारी जाणार्या मनालाही केला पाहिजे. नाही का?
ता.क. नवीन मराठी ब्लॉग इथे सुरू केला आहे.
छान लिहिलयसं.
छान लिहिलयसं.
छान लिहिलयस, सई. नविन
छान लिहिलयस, सई.
नविन ब्लॉगकरता शुभेच्छा!
'आपल्या आतील आहारी जाणारे मन
'आपल्या आतील आहारी जाणारे मन '......रोगाचे अचूक निदान !
छान आहे लेख .. मी पुर्वी
छान आहे लेख ..
मी पुर्वी मायकल मूर ची (?) फास्ट फूड नेशन नावाची documentary बघितली होती .. त्यातही खूप संतापजनक गोष्टी दाखवल्या होत्या ..
छान आहे लेख. मॅकडोनाल्ड साठी
छान आहे लेख.
मॅकडोनाल्ड साठी हट्ट करणारी लहान मूले मी बघितली आहेत, एखादवेळी तिथले अन्न बरे वाटायचे, पण आता बरीच वर्षे, मी ते खाल्लेले नाही.
काही दिवसांपुर्वी मॅकडोनाल्ड
काही दिवसांपुर्वी मॅकडोनाल्ड मधल्या खेळण्यां विषयी एक डॉक्युमेंट्री बघितली होती, हा लेख वाचल्यावर त्याची आठवण झाली. हि खेळणी चिनमधून येतात. हि खेळणी तयार करताना लहान मुलां-मुलीकडून सलग १६-२० तास काम करून घेतात. आठवड्याच्या कोणत्याही दिवशी सुट्टी नसते. पगार तुटपुंजा असल्याने हि मुले वेळच जेवण देखिल टाळतात.
लिंकः http://topdocumentaryfilms.com/santas-workshop/
मस्त लिहिलय!
मस्त लिहिलय!
मॅक डी व कोकाकोला हे अतिशय
मॅक डी व कोकाकोला हे अतिशय निकृष्ट दर्जाचे खाणे आहे. प्रचंड प्रिजर्वेटिवस व फॅट्स असतात. शिवाय साखर. ही जगाला देणगी वगैरे काहीही नाही. इतर फास्ट फूड चेन्स मध्ये पण अति हाय कॅलरी अन्न मिळते. स्ट्रेसफुल व फास्ट जीवनशैलीमुळे तिथे स्वयंपाक करणे जमत नसेल कदाचित पण हे चांगले अन्न नक्कीच नाही. पहिले अमेरिका हा अंग मेहनत करणार्या लोकांचा देश होता. खाण काम , बांधकाम इत्यादी करत असत. तेव्हा मीट पोटॅटो बेस्ड क्रीम- डेअरी बेस्ड डायेट ठीक होती. पण आता इकॉनमी सर्विस ओरिएंटेड आहे. आधिच शारिरिक हालचाल कमी व त्यात असे अन्न हे फार वाइट काँबो आहे. वजनाची समस्या बघता सरकारी कायदा करून लोकांना हाय फॅट शुगर खाणे बंद करवावे असेच मला वाटते. त्यातही अगदी लहान मुलांना बळेच डोनट्स, बर्गर्स इत्यादीची सवय लावणे फार वाइट. त्यांच्या तब्येतीवर दूरगामी वाइट परिणाम होतात.
परदेशातून आलेले (मुख्यत्वे मेक्सिकोहून), इंग्लिश न येणारे, गरिबीत राहणारे कित्येक लोक मॅकडॉनल्डच्या आश्रयाला येतात. पण त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती (विशेष करून वैद्यकीय) दिल्या जात नाहीत. कामगारांनी कुठल्याही प्रकारचा कामगारसंघ बनवू नये यासाठी मॅकडॉनल्ड खूप प्रयत्नशील आहे.>> त्याशिवाय प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करता येणार नाही.
त्यामुळे आता मॅकडॉनल्डशी एक भावनिक धागासुद्धा जुळला आहे.>> काहीही. इतके भावनिक दैन्य का बरे. अर्थात हा वैयक्तिक मामला आहे. यादें सिनेमात रती अग्निहोत्री मेल्यावर सर्व कुटुंब एका कोक
चिन्ह असलेल्या कीचेन ला आईची आठवण मानत असते.
खेळणी तर अत्यंत निरुपयोगी असतात. मी पाहिले आहे, मुलांसमोर अन्न असले तरी ती त्या थिक प्लास्टिक पॅकिन्ग मधून खेळणे बाहेर काढायच्याच नादात असतात. ती ब्रँडेड कार्टून कॅरेक्टर शी संबंधित असतात त्यामुळे हे खाणे व ते पाहणे असे दुष्ट चक्र सुरू राहते व मुलांची कल्पना शक्ती डेवलप होत नाही.
असा साहजिक प्रश्न सुजाण पालकांना पडतो. पण मुलं शाळेतून घरी येतात आणि इतर मुलांची उदाहरणं देतात. अशा वेळेस पालकांनी काय करायचं? >> लोकॅलरी संपूर्ण आहार भाज्या घातलेले सँडविच किंवा इतर पर्याय, फळे इत्यादी देता येते. भाजी घातलेली इडली, पराठे इत्यादी आपल्या मुलांना देऊ शकतो. असे पर्याय सर्व कल्चर्स मध्ये आहेतच.
हॅपी मील नैसर्गिक रीत्या डी काँपोज होत नाही याला कंपनीने नेहमीप्रमाणे स्मार्ट उत्तर दिले आहे.
http://news.yahoo.com/blogs/upshot/mcdonald-happy-meal-resists-decomposi...
जी कंपनी इतका मोठा उद्योग चालविते तिला असे पुस्तक बाहेर आणणे अति सोपे आहे. ते वाचून कंपनीचे कौतूक वाटेल कदाचित पण स्वतःचे आरोग्य व महत्त्वाचे म्हणजे मुलांना उत्तम आहाराच्या सवयी लावण्या साठी घरगुती स्वयंपाक, लोकॅल, सकस चौरस आहार याला पर्याय नाही
एक चांगली गोष्ट म्हणजे आजची प्रीटीन, टीन मुले नेट वर शोधाशोध करून स्वत:च्या आरोग्यासाठी चांगले पर्यायही शोधतात. चेन रेस्ट. च्या पिझा व बर्गरच्या वाटेस जायचे नाही असा निर्णय आमच्या टीन ने स्वतःपुरता घेतला आहे.
छान लेख. मॅकडीचा उपयोग
छान लेख. मॅकडीचा उपयोग कोणताही पर्याय उपलब्ध नसेल (आडवाटेतील एअरपोर्टवर अडकलो असेन) तरच केला आहे पण नुकतीच स्टेट ऑफ कॅलिफोर्नियाने प्रसारित केलेली वॉरनिंग बघितल्यावर ते ही नको असे वाटायला लागले आहे. ब्राउन रंग असलेल्या फ्रेंच फ्राइजमध्ये अक्रिलमाइड तयार होते ज्यामुळे कॅन्सर किंवा जन्मतः दोष उद्भवू शकतात. कॅलिफोर्नियात सर्व मॅकडीमध्ये ही वॉरनिंग दाखविली जाते.
अश्विनीमामीशी
अश्विनीमामीशी १००००००००००००००००० + सहमत..
लेख आहे चांगला पण डाव्या बाजूचा संतापही लेखातून यायला हवा होता! I hate Mc'd.. कारण वरील २ प्रतिक्रियातच आलं आहे.
नेहमीप्रमाणेच छान
नेहमीप्रमाणेच छान लिखाण.
आवडलं.
अश्विनीमामी, >> लोकॅलरी
अश्विनीमामी,
>> लोकॅलरी संपूर्ण आहार भाज्या घातलेले सँडविच किंवा इतर पर्याय, फळे इत्यादी देता येते. भाजी घातलेली
>> इडली, पराठे इत्यादी आपल्या मुलांना देऊ शकतो. असे पर्याय सर्व कल्चर्स मध्ये आहेतच.
इथे इंग्लंडमध्ये काय परिस्थिती आहे ते सांगतो. इथे घरी जेवण फक्त म्हातार्यांनाच (६०+) बनवता येतं. पन्नाशीहून कमी वय असलेल्यांना अन्न शिजवणे म्हणजे काय हे ठाऊक नाही! इंग्लिश कल्चरमध्ये पर्याय जवळजवळ नाहीत. नाही म्हणायला इंग्लिश ब्रेकफास्ट अजूनही आपलं नाव राखून आहे. मात्र तोही अतिशय तेलकट आणि चरबट असतो.
याला कारण ढासळलेली कुटुंबव्यवस्था हे आहे. कामावरून घरी परतल्यावर आईबाप आपल्याच नादात असतात. मुलांचं जेवणही बाहेरून मागवलं जातं. कमी वयातली अशी मुलं गरमागरम घरगुती जेवणाला मुकतात. सहाजिकच जेव्हा पौगंडवयात (टीनएज इयर्स) येतात तेव्हा क्लबिंग, पबिंग, नाईटआउट, इत्यादिमुळे बाहेर खाणं अपरिहार्य होतं. सर्वात स्वस्त आणि पॉकेटमनीत बसेल असं जेवण म्हणजे मॅकडोनल्ड.
घरी जेवणच नाही मिळत, मग काय करणार! मॅकवर आख्खी पिढी पोसली गेली आहे. असे लोक मग आपल्या घरगुती जेवणावर तुटून पडतात. साधी मुगाची खिचडी अमृतासमान भासते त्यांना.
तर मॅकच्या विस्तारात कुटुंबव्यवस्थेच्या अध:पतनाचा सिंहाचा वाटा आहे.
आ.न.,
-गा.पै.
मी आजवर मोजून २ वेळा मॅक-डी
मी आजवर मोजून २ वेळा मॅक-डी मधे गेले असेन! काय खाल्लं ते आता आठवतही नाही! फार हौस आली होती जायची, पण मग आपोआपच आलेली लहर गेली.
मॅक्-डी सोडाच, साधं सीसीडीतही तीन वर्षांपूर्वी गेले, भीषण वाईट्ट कॉफी घशाखाली उतरवली, आणि मग बंद केलं सीसीडीपण!
असो!
मैद्याचे/ बेकरी प्रॉडक्ट्स बघूनही हल्ली खायची इच्छा होत नाही. बरंय तेही.
त्यामुळे डोनट्स, कुकीज, पेस्ट्रीज, क्रीमरोल्स वगैरे खाल्लेच जात नाहीत. कधीतरी खायला ब्रेड हाच एक अपवाद.
(अवांतर झालाय का प्रतिसाद? झाला असेल तरी राहूदेत!
)
सई, आवडला लेख ह्या सगळ्या
सई, आवडला लेख
ह्या सगळ्या फास्ट फूड चेन्सपासून लांबच राहायला हवं खरं तर. सगळी प्रक्रिया मेकॅनिकल करण्याच्या नादात ते वापरत असलेल्या भाज्या, मीट हार्मोन्स वापरुन पैदा केलेलं असतं. पण त्यातल्यात्यात टाको बेलचा पर्याय बरा वाटायचा. आता त्या भाज्याही बराच वेळ कापून ठेवल्यामुळे पोषणमूल्य वगैरे टिकण्याची शक्यताच नाही पण बाहेरचं खायचं तेव्हा 'पोषणमूल्य, आरोग्य' हे शब्द विसरुनच खायचं. केवळ सोय, जिभेचे चोचले किंवा घरी बनवण्याचा आळस म्हणून.
माझा नवरा हाडाचा मॅक्डोनल्ड
माझा नवरा हाडाचा मॅक्डोनल्ड भक्त.. पुण्यात जेएम रोडवरील मॅक्डीमध्ये त्यानं मॅक व्हेजी घेतलं बर्गरच्या आत व्हाईट सॉस लावायचा म्हणून त्याने ते उकललं, तर आत एक हिरवी आळी अँटेना हलवत होती.. त्याने ते बर्गर पुन्हा काउंटरवर नेवून दाखवले, तर तिथल्या एका मुलाने ते बर्गर हातातून हिसकावून घेऊन आत पळाला, आणि सॉरी म्हणत बर्गरचे पैसे परत केले..
नंतर मात्र आमच्या साहेबांनी कधीच मॅक्डीची पायरी चढली नाही..
अतिशय छान लेख आहे, आता पुस्तक
अतिशय छान लेख आहे, आता पुस्तक वाचावेसे वाटतेय.
बापरे सारिका, खरं की काय??
नेहमीप्रमाणे छान लिहिलंस सई.
नेहमीप्रमाणे छान लिहिलंस सई. मनुष्यप्राण्याची मानसिकता, औद्योगिक क्रांती, चतुष्चक्री इ. इ. अनेक कंगोरे फास्ट फूड मागे आहेतच! याबद्दल टेड टॉक्स वर पाहिलेले हे जेम्स ऑलिव्हरचे भाषण : http://www.dailymotion.com/video/xnopeq_ted-talk-jamie-oliver-s-ted-priz...
हा पुस्तक "परिचय" आहे.
हा पुस्तक "परिचय" आहे. त्यामुळे माझी वैयक्तिक मतं मी इथे मांडलेली नाहीत. पुस्तक वाचून काय वाटलं ते लिहिलं आहे. @मामी, लो कॅल पर्याय मला माहिती आहेत. पण इथे सर्वसामान्य लोकांची द्विधा प्रस्तुत केली आहे. आणि हा पूर्णपणे पुस्तकाचा सूर आहे. मॅक डी मधील अन्न हेल्दी नाही हे गृहित धरून हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे त्यातील लोकांना माहित नसलेले मुद्दे मांडायचा प्रयत्न केला आहे. आणि मॅक डीत जाणार्या लोकांना हे पर्याय माहिती आहेत का? आणि असले तरी त्याना ते करायची इछा आहे का? अमेरिकेत बाजारात जंक फूड जास्त स्वस्त आहे. त्यामुळे लो इन्कम ग्रूप फास्ट फूडच्या आहारी जाणं साहजिक आहे. नुसत्या आयत्या जेवणाला हे लागू नाही तर दूध, दही, मीट या इंटरमिडिएट्सना सुद्धा लागू आहे. दुधात हॉर्मोन्स आणि अॅन्टीबायोटिक्स असतात. ज्या गाई हे दूध देतात त्यांना मका, सोयाबीन (जे त्यांचं नैसर्गिक खाणं नाही) चारण्यात येतं. संपूर्णपणे ऑर्गानिक दूध अशा दुधाच्या तिप्पट किमतीला मिळतं.
घरात रोज स्वैपाक करायला, भाज्या आणायला, फळं आणायला नुसतेच पैसे नाहीत तर मेहनत, शिस्त आणि संस्कृती लागते. मायबोलीचा सगळाच वाचक वर्ग सुसंस्कृत आहे. त्यामुळे इथल्या लोकांना मॅकडीचा तिटकारा असणे योग्य आहे. पण हा मॅकडीचा क्लाएन्टेल नाहीच! म्हणून जे लोक तिथे जातात त्यांचा दृष्टीकोन घेतला आहे.
त्यामुळे आता मॅकडॉनल्डशी एक
त्यामुळे आता मॅकडॉनल्डशी एक भावनिक धागासुद्धा जुळला आहे.>> काहीही. इतके भावनिक दैन्य का बरे. अर्थात हा वैयक्तिक मामला आहे. यादें सिनेमात रती अग्निहोत्री मेल्यावर सर्व कुटुंब एका कोक
चिन्ह असलेल्या कीचेन ला आईची आठवण मानत असते.
हा वैयक्तिक मामला मुळीच नाही. कारण हे माझं किंवा लेखकाचंही वैयक्तिक मत नाहीये. हे सायकॉलॉजिकल अनॅलिसिस आहे. In one of the sections of the book, the author explains the psychological association behind the two golden arches of the McDonald logo. When McD was purchased from its original owners, they wanted to get rid of the golden arch M logo. But when they consulted a designer, he advised them to keep the logo. Because he said that the golden arches would have a subconscious association with consumers because they appear to be like breasts. So people would see it as a place which nurtures.
हे वाचल्यावर मी कपाळावर हात मारून घेतला. पण अशा प्रकारचं सायकॉलॉजिकल असोसिएशन मार्केटिंगमध्ये सर्रास वापरलं जातं. आपल्याकडे सुद्धा काही जाहिराती लोकांना नॉस्टॅल्जिक करतात. काही ब्रॅन्ड्स लहानपणीची आठवण करून देतात (अमूल, मॅगी, धारा). माझ्यासाठी वैशाली असं ठिकाण आहे. आणि घरच्या जेवणापेक्षा वैशालीत वडे चापायला जाणं माझ्या आईलादेखील मॅक्डीमध्ये खाण्यासारखंच वाटायचं. पण माझ्या सगळ्या मित्रमंडळाचा वैशालीशी धागा जुळला आहे. तिथल्या कॉफीचा सुगंध आम्हाला आमच्या कॉलेजची आठवण करून देतो. आम्ही जर ते दिवस मॅक्डीमध्ये घालवले असते, तर आम्हीपण नॉस्टॅल्जिक झालो असतो. यात मुद्दा मॅक्डीमध्ये आम्ही काय खातो हा नसून आमच्या आयुष्यातील छान काळ आम्ही तिथे घालवला आहे हा आहे.
त्यामुळे तुमचं भावनिक "दैन्य" अगदीच रिलेटिव आहे.
सई, पुस्तक परिचय वाचला.पण
सई, पुस्तक परिचय वाचला.पण परिचयापेक्षा ते पुस्तक वाचून तुझी प्रतिक्रिया काय झाली आणि तू त्यावर काय विचार केलास हे वाचायला जास्त आवडलं असतं जे तू वरच्या २ प्रतिसादांमधून लिहिलं आहेस तेच मला लेखात वाचायला छान वाटलं असतं..
Super Size me नावाची एक
Super Size me नावाची एक documentary पहा.
त्याच्या special features मध्ये In-N-Out Burger हे एकमेव फास्ट फूड जरा त्यातल्या त्यात चांगले आहे असे म्हणाले आहे. त्याचे french fries, ज्याला ते फ्रेश कट potato म्हणतात ते गोठवलेले नसतात.
त्यामुळे तुमचं भावनिक "दैन्य"
त्यामुळे तुमचं भावनिक "दैन्य" अगदीच रिलेटिव आहे>> भावनिक दैन्य हे वाक्य तुम्हास किंवा लेखकास उद्देशून आजिबात नाही. आपल्या मानसिक परिस्थितीनुसार कुठल्याही गोष्टीशी भावनिक नाते जुळू शकते. जसे उदा.आपले मायबोलीच्या म शी आहे. मीही संपूर्ण सोसायटी बद्दलच विचार करून बोलत आहे. अति मोठ्या कंपनी जेव्हा मार्केटिंग करतात जसे डिस्ने, वायकॉम ( एम टीवी कलर्स ) कोक, मॅक्डी इत्यादी तेव्हा ग्राहक मानसिकतेचा विचार करतातच कि. पण अमेरिका हे एक खरोखर ग्रेट राष्ट्र आहे व तिथे भावनिक नाते जुळण्यासाठी खूप सुरेख व सेन्सिटिव गोष्टी, वस्तू, स्मारके, जागा इत्यादी आहेत. डंबिंग डाऊन ऑफ अमेरिका असा सर्च केल्यास हे मॅक्डी शी नाते, व मिकी माउस बरोबर भावनिक नाते इत्यादी वर जास्त स्ट्रेस होतो एवढेच. पण जनरल पब्लिक - ज्यांच्यासाठी हेच कल्चरल रेफरन्सेस आहेत त्यांचे नाते असेच असणार. जजमेंट पास करायचा मला हक्क नाही म्हणूनच मी तो प्रत्येकाचा वैयक्तिक मामला आहे असे लिहीले आहे.
पदार्थ तळताना जे बुड्बुडे येतात त्यामुळे जागा जाते व सर्विंग मधला वेळ जातो म्हणून तेही येऊ नयेत म्हणून मॅक मध्ये संशोधन होउन उपाय शोधण्यात आले आहेत. या व अश्या प्रकारच्या स्टेप्स मुळे एक
सीमिंगली खायला सोपे व सहज उपलब्ध पण लॉन्ग टर्म आरोग्यावर डॅमेज करणारा अन्न पर्याय
दिला गेला आहे. जग भरातील फूड डायवर्सिटी हळू हळू नाहिशी होत जाते आहे यालाही हे कारण आहे. अर्थात एक स्लो फूड मुवमेंट पण आहे ती याला थोडी टक्कर देण्याचा प्रयत्न करते आहे पण
बिग कॉर्पोरेशन्स जनरली विन. गॉड कंट्री व कोकाकोला हे पुस्तक पण वाचावे उत्तम फॉलो अप रीडिन्ग आहे.
जाहिरात क्षेत्र, वैशालीशी भावनिक लागेबांधे यावर मी आणिक काय लिहू. बाहेर जेव्हा गार्डन होते तेव्हा तिथे बसून झाडाची बारकी पिवळी पाने अंगावर घेत निवांत कॉफी प्यायलेली आहे.
मॅकडी अमेरिकन संस्कृतिचा
मॅकडी अमेरिकन संस्कृतिचा महत्वाचा भाग झाला याचा "स्पीलओव्हर" परिणाम असा झाला असावा कीं अमेरिकन संस्कृतिशी नातं जोडायला अधीर झालेल्या इतर देशातील [ भारतासहित] तरूण पिढीतील बर्याच जणाना मॅकडीशी जवळीक करणं केवळ त्याच कारणामुळें सुखावह, प्रतिष्ठेचं व अभिमानास्पद वाटूं लागलं; मॅकडीचा जागतिक प्रसार होण्याला हेही महत्वाचं कारण असावं.
"बर्गर"ची जन्मकहाणी फार पूर्वी 'रिडर्स डायजेस्ट'मधे वाचली होती. फ्रान्समधील एका कारखान्याच्या समोरील छोट्या हॉटेलाबाहेर कामगार मधल्या छोट्या सुट्टीत पत्ते खेळत खात बसत. पत्ते धरायला हात मोकळा हवा म्हणून ते दोन पावात बरोबरचा पदार्थ कोंबून हातात धरून खात. हॉटेलच्या मालकाने तीच कल्पना उचलून , सुधारून, जाहिरातींद्वारें 'रोमँटिसाईज' करून एक अवाढव्य उद्योग उभा केला ! तात्पर्य : डेनिमच्या जीन्स, बर्गर, मॅकडी इ. उदाहरणं असावीत साध्या, सोईच्या गोष्टीना कल्पक जाहिरातींद्वारें "फॅड' बनवण्याचीं !!! [अर्थात अंगीभूत गुणवत्तेपेक्षां अशा वस्तूंचं लोकांच्या मनातलं 'इमेज' हाच त्यांच्या लोकप्रियतेचा पाया असावा ]. पण, तसं करताना यातून कांही अपायकारक होत नाही ना, याची दक्षता घेतली तर कल्पकता व उद्योजकता याचीं तीं चांगलीं प्रतिकंच म्हणावी लागतील !!!
अमेरिकन संस्कृतिशी नातं
अमेरिकन संस्कृतिशी नातं जोडायला अधीर झालेल्या इतर देशातील [ भारतासहित] तरूण पिढीतील बर्याच जणाना मॅकडीशी जवळीक करणं केवळ त्याच कारणामुळें सुखावह, प्रतिष्ठेचं व अभिमानास्पद वाटूं लागलं; मॅकडीचा जागतिक प्रसार होण्याला हेही महत्वाचं कारण असावं.>>>>
एकदम सहमत. चवीचे कितीही भारतीयीकरण केल तरी ते ब्लॅण्ड चवीचे बर्गर इतके जास्त पैसे मोजून घेण माझ्या एका बॉसला अजिबात पटत नसे. ते म्हणत "साला तिथे गेल ना की खिसा ही रिकामा होतो अन पोटही रिकामच रहात!!" कारण चव आवडत नसल्यान जास्ती खावसं वाटत नाही अशी परिस्थीती, पण बालहट्ट / स्त्री हट्ट कुणाला चुकला आहे?.
@श्रीकांत भारतातलं मॅक्डी आणि
@श्रीकांत
भारतातलं मॅक्डी आणि इथलं मॅक्डी यात बराच फरक आहे.
१. तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे भारतात मॅक्डी जास्त महाग आहे. याचं कारण भारतात भारतीय खाद्यपदार्थ जास्त स्वस्त मिळतात. भारतातल्या किमतींशी मॅक्डीला स्पर्धा करता येत नाही.
२. भारतातलं पारंपारिक जेवण हे जगभरात प्रसिद्ध आहे. ते बनवताना मानवी कौशल्याचा वापर अपरिहार्य आहे. आणि त्याच्याशी "इंडस्ट्रियल ग्रेड" जेवण टक्कर देऊ शकत नाही. पण अमेरिकेत "जेवणातील कला कुसर" खूप कमी बघायला मिळते. इथे प्रसिद्ध झालेल्या क्विझीन्स इटली, चीन, जपान, भारत अशा देशांतून आल्या आहेत. आणि मॅक्डी इथे स्वस्त आहे.
भारतातली कपड्यांची बाजारपेठ देखिल काबीज करणे आणि स्वस्त करणे अवघड आहे. आणि याचं कारणही त्या उद्योगांमध्ये वापरली जाणारी "कला" हेच आहे. कितीही मॉल्स निघाले तरी लक्ष्मी रोड कधीही बंद पडणार नाही. =)