मायबोली शीर्षक गीत - माझा सहभाग (अगो)

Submitted by अगो on 19 January, 2012 - 10:39

मायबोली शीर्षक गीताची निर्मिती होणार आहे असं वाचलं तेव्हाच आपलाही ह्यात सहभाग असावा असं तीव्रतेने वाटलं होतं. ऑक्टोबरच्या सुरुवातीला योगने आम्हां सगळ्या इच्छुक मायबोलीकरांना पहिला रॉ ट्रॅक ऐकण्यासाठी आणि चाल शिकण्यासाठी पाठवला. पहिल्यांदा ऐकतानाच चाल अतिशय आवडली. पाच कडवी असली तरी प्रत्येक कडव्याची चाल वेगळी असल्याने गाण्याचा उठाव शेवटपर्यंत टिकून राहत होता.

मुंबई-पुण्याची लोकं स्टुडियोत जाऊन रेकॉर्डिंग करणार होती. मी युकेत असल्याने ऑडॅसिटीवरुन रेकॉर्ड करुन फाईल्स पाठवायच्या आणि योग त्यातला निवडक भाग फायनल रेकॉर्डिंगसाठी घेणार असं ठरलं होतं. एकदोन स्काईप सेशन्स करुन बसवलेली चाल योगला म्हणून दाखवली. त्याने आवश्यक त्या सुधारणा दाखवून देत आता तू फाईल्स पाठवायला हरकत नाही असा ग्रीन सिग्नल दिला. दरम्यान मुंबईतल्या लोकांचे रेकॉर्डिंग झाले होते. आता आलेल्या नवीन ट्रॅकवर प्रोफेशनल वादकांनी म्युझिक पीसेस वाजवले होते आणि कोरस अ‍ॅड झाला होता ( नंतरची रेकॉर्डिंग्ज झाल्यावर अजून आवाज कोरसमध्ये मिसळले जाणार होतेच. )

तयार कॅरिओकी ट्रॅकची पट्टी उंच पडत असल्याने आत्तापर्यंत कधी ह्या प्रकारे गायलेच नव्हते. आता गायला घेतल्यावर लक्षात आलं की एरवी तुम्ही तुमच्या मर्जीने थांबता, परत गाणं चालू करता. इथे वेगवान प्रवाहात काठावरुन सूर मारुन डायरेक्ट पोहायलाच लागायचं होतं. एखादी हरकत किंचित जास्त झाली तर समोरासमोर तबलावादक ताल अ‍ॅडजस्ट करुन घेतो किंवा आलाप लांबला तर सरळ ते आवर्तन सोडून पुढच्या आवर्तनाला गाणं उचलता येतं असं इथे होणार नाही. योगकडून ह्या बाबतीत खूपच मोलाचं मार्गदर्शन मिळालं.

इथे एक गोष्ट सांगायलाच हवी की फायनल टेकमध्ये बरेच गायक असल्याने प्रत्येकाच्या वाट्याला एक-दोन ओळीच येणार होत्या. पण योगने प्रत्येकाकडून सगळं गाणं अत्यंत संयमाने बसवून घेतलं आणि पूर्ण रेकॉर्डिंग करुन घेतलं. प्रत्येक टेक परतपरत ऐकून त्यात सुधारणा सुचवत राहिला. नवीन टेक पाठवण्यासाठी प्रोत्साहन देत राहिला. त्यात त्याने इतका वेळ खर्ची केलाय की बस्स ! पण त्याने हे केलं म्हणून माझ्यासाठी हे गीत एक सुंदर शिकण्याची प्रक्रिया झाली.

घरात रेकॉर्डिंग करणं हा अजून एक मजेशीर अनुभव होता. आमच्या घराशेजारीच शहराचे मुख्य हॉस्पिटल आहे. रेकॉर्ड करताना पाच-सहा वेळा तरी असं झालं की गाणं मध्यावर आलेलं असताना बाहेर अ‍ॅम्ब्युलन्स ठणाणत जायची की ये रे माझ्या मागल्या :) पण मग रेकॉर्डिंग झालं.

Maayaboli geet recording 1.jpg

इतरांचीही रेकॉर्डींग्ज चालू होती. ट्रॅकवर नवीननवीन आवाज अ‍ॅड होत होते तसा मायबोली गीताचा 'फील' हळूहळू येऊ लागला होता. विशेषत: शेवटच्या कडव्यात सर्वांचेच आवाज अतिशय खुबीने वापरले आहेत ते ऐकताना फार छान वाटतं. टीम स्पिरिट अगदी पुरेपूर जाणवतं.

उल्हासकाकांनी इतकं उत्तम गीत लिहिलं आणि योगने त्याला अनुरूप अशी अतिशय सुरेख चाल लावली म्हणून आम्हाला अशा वेगळ्या प्रकल्पात सहभागी व्हायची संधी मिळाली. ज्यांनी ह्या गाण्याच्या व्हिजुअल्सची जबाबदारी घेतली आहे त्यांचेही मनापासून आभार. मायबोली प्रशासकांनाही अनेकानेक धन्यवाद. 'मायबोली गीताचा' एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो :)

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाणं मध्यावर आलेलं असताना बाहेर अ‍ॅम्ब्युलन्स ठणाणत जायची की ये रे माझ्या मागल्या>> Happy
अगो तू खरच मातृमुखी आहेस !

मस्त लिहिलयसं. <<आता गायला घेतल्यावर लक्षात आलं की एरवी तुम्ही तुमच्या मर्जीने थांबता, परत गाणं चालू करता. इथे वेगवान प्रवाहात काठावरुन सूर मारुन डायरेक्ट पोहायलाच लागायचं हो>> १००% अनुमोदन.

अगो, छान वाटल वाचुन.. तुम्हा सगळ्यांचे खुप खुप अभिनंदन.. आम्ही काहिही न करता (उगिच) खुप काही केल्याचा फिल येतोय.. Happy तुमच्या सारख्यानां (जे प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत) त्यांना तर किती छान वाटत असेल.. ग्रेट!!!

अगो, छान लिहिलं आहेस गं !!
तुझी माझी एकदम सारखीच परिस्थिती होती म्हणायची Happy
आता कुठे कुठे कोणाचा आवाज आहे ते ऐकायची फार उत्सुकता आहे.

सही !
गाणं मध्यावर आलेलं असताना बाहेर अ‍ॅम्ब्युलन्स ठणाणत जायची की ये रे माझ्या मागल्या>>> Lol

फारच छान!
गाणं सुरेख लिहिलं आहेच काकांनी, त्याला चालही सुंदर आणि समर्पक आहे.
खूप मस्त वाटलं गाणं ऐकताना.
जयवी म्हणतात तसं कोणाकोणाचे आवाज कुठे कुठे आहेत हे ऐकायची उत्सुकता आहे.

अवांतर-
ऑडेसिटीत रेकॉर्ड करताना वेगळा (स्पेशल या अर्थी)माईक वापरला होता का?
फोटोत नॉर्मल व्हीडिओ चॅटसाठी वापरतात तसा वाटतोय. पण त्याने इतकं छान रेकॉर्डिंग होऊ शकतं का?
(अर्थात, एडिटिंगमुळेही फरक पडू शकतो, पण तो थोडाच.)

सहीच...

तुझा अनुभव सुध्दा वेगळाच आहे.... घरात रेकॉर्डिंग, स्काईपवरून प्रॅक्टिस सेशन्स...... वेगळाच फील असेल.

तुझा आणि अनिताताईंचा आवाज ओळखता येईल इतका सिमिलर आहे.... मी त्यावरूनच तुझा आवाज ओळखला होता. तुला घरीच इतका मस्त गुरू मिळाला, तुझं भाग्यच.... !

अश्विनी, थोडक्यात पण छान लिहिलेस तुझे अनुभव.

तुझ्यासारख्या मायभूमीपासून दूर असलेल्या ‘मायबोली’करांनी ’मायबोलेली’ला आत्मीयतेने घातलेली साद आणि ’मायबोली’ने दिलेली दाद/’ओ’ ...... मन भरून येतं हे पाहिलं की.

रेकॉर्ड करताना पाच-सहा वेळा तरी असं झालं की गाणं मध्यावर आलेलं असताना बाहेर अ‍ॅम्ब्युलन्स ठणाणत जायची की ये रे माझ्या मागल्या Happy >>>
बरं झालं...त्यामुळे गाणं जास्त घोटलं गेलं!!! Biggrin रागाऊ नको हाँ.

अगो, खरंच त्या हॉस्पिटलने तुझं गाणं घोटून घोटून म्हणून घेतल Wink
बाकी छान आणि नेमकं लिहिलं आहेस Happy

छान लिहिलं आहेस अगो.. तुझा अनुभव वेगळाच आहे.

धन्य ते तंत्रज्ञान!
गाणं पूर्ण तयार झाल्यावर तुम्हाला सगळ्यांनाच एक वेगळंच फिलिंग आलं असेल ना? Happy

अगो,

छान व नेमकी व्यक्त झाली आहेस.. मुलाची शाळा, घर, बाजूचे हॉस्पिटल Happy सर्व संभाळून ज्या जिद्दीने तू सर्व पूर्ण केलेस ते कौतुकास्पद आहे! ईथे या पोस्ट मधून तुझी पडद्यामागची मेहेनत कदाचित सर्वांना दिसणार नाही पण १००% अचूक होण्यासाठी जो ध्यास, मेहेनत तू घेतलीस ती संपूर्ण गीत प्रकाशित होईल तेव्हा तुझ्या आवाजातील ओळी ऐकल्यावर ती अगदी स्पष्ट होईल हे निश्चीत!! Happy

>>बरं झालं...त्यामुळे गाणं जास्त घोटलं गेलं!!!
घरातूनच असं मोटीवेशन असेल तर संगीतकाराचं काम सोपं होतं Happy

वा मस्त!
>>>बरं झालं...त्यामुळे गाणं जास्त घोटलं गेलं!!!<<< Happy

रेकॉर्ड करताना पाच-सहा वेळा तरी असं झालं की गाणं मध्यावर आलेलं असताना बाहेर अ‍ॅम्ब्युलन्स ठणाणत जायची की ये रे माझ्या मागल्या >>> Lol

(मी इतके दिवस समजत होते तू यू.एस.मधे असतेस. Uhoh )

मंजूला अनुमोदन. धन्य ते तंत्रज्ञान.
इंटरनेटला निव्वळ नावं ठेवण्यातच समाधान मानणार्‍या महाभागांना दिवसातून तीनवेळा चमचा-चमचा मायबोली पाजलं पाहिजे.

ललिता ------- चमचा चमचा मायबोली Happy
योग...... भुंग्याची तान ....... अनुमोदन Happy

अश्विनी,
छान नेमके लिहीले आहेस..सगळ्यांचा हा एका गाण्याचा सांगितीक प्रवास ,प्रत्येकाची लेखनशैली व अनुभव वेगवेगळे असल्याने वाचायला खुपच छान वाटते आहे..राहुल ने दोन महिन्यापुर्वी" कॉयर सिंगींग" मधे भाग घेतला होता..असेच वेगवेगळ्या जागेहुन गायक होते..प्रत्यक्ष प्रोग्राम च्या वेळेस स्टेज वर १५० गायक वादक तर ५००० प्रेक्षक होते..खुपच वेगळा अनुभव..त्याची आठवण झाली..

मनःपूर्वक धन्यवाद सर्वांना Happy
चैतन्य, वेगळा माईक नाही हो. तुम्ही म्हणताय तसा वेबचॅटचाच माईक होता. स्टुडिओतले आवाज vs अशा ऑडियो फाईल्स ह्या मध्ये गुणात्मक दॄष्ट्या काय फरक जाणवला हे योगला आणि साऊंड रेकॉर्डिस्टलाच विचारायला हवे.
रागाऊ नको हाँ. >>> असं नको बाई म्हणूस. त्यापेक्षा आळस करायचे तेव्हा पट्टी दाखवायचीस ( गाण्यातली नव्हे Wink ) ते जास्त बरं वाटतं.
चमचा चमचा मायबोली आणि लसीकरण >> भारी Lol
सुलेखाकाकू, मस्तच अनुभव Happy

अगो, सह्हीये!! तंत्रज्ञानाच्या करामतीमुळे आणि तुम्हां सर्वांच्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले! गो मायबोली!! Happy

अगो छान लिहिलय्स.
घरात प्रॅक्टीस / रेकॉर्डिंग करुन पाठवण खरच अवघड आणि वेगळा अनुभव Happy

छान!

>>चैतन्य, वेगळा माईक नाही हो. तुम्ही म्हणताय तसा वेबचॅटचाच माईक होता. स्टुडिओतले आवाज vs अशा ऑडियो फाईल्स ह्या मध्ये गुणात्मक दॄष्ट्या काय फरक जाणवला हे योगला आणि साऊंड रेकॉर्डिस्टलाच विचारायला हवे.

मुळातच अगो चा आवाज "पॉवरफुल" आहे तेव्हा तीच्याशी चॅट करताना लोकांनी हे लक्षात ठेवावे Happy
विशेष फरक काही नाही.. घरी ईतर आवाज (पंखा, एयरकंडीशन.. अगदी लॅपटॉप च्या पंख्याचा आवाज सुध्दा, आणी हो अँब्युलंस चा सुध्दा!) हे गाण्याबरोबर रेकॉर्ड होवू शकण्याचा धोका असतो.
पण मुळात आवाज चांगलाच नसेल तर मात्र घरी काय वा स्टूडीयो मध्ये काय ए़कूण एकच.
अर्थात बाकी अनेक टेक्निकल गोष्टि आहेतच पण ते पुनः केव्हातरी..

>>त्यापेक्षा आळस करायचे तेव्हा पट्टी दाखवायचीस ( गाण्यातली नव्हे )
अर्थातच आळसाची पट्टी वेगळी, गाण्यतली वेगळी नाही का.. Happy मला खात्री आहे तुझ्या गाण्याच्या शिकवण्यांचे एक वेगळेच मनोगत अनिताताईंकडे असेल Wink

मस्त !! आता पूर्ण गाणं ऐकायची उत्सुकता शिगेला पोचलीये Happy .

<< रागाऊ नको हाँ. >>> असं नको बाई म्हणूस. त्यापेक्षा आळस करायचे तेव्हा पट्टी दाखवायचीस ( गाण्यातली नव्हे )

अनिताताई आणि तुझा इथला संवाद वाचून मजा वाटली . आपण लहान असताना ओरडणार्‍या आया , आपण लांब आलो की त्यांचं म्हणणं कित्ती गोड शब्दांत सांगतात आणि पुन्हा रागावू नकोस म्हणतात ( माझी आई सुद्धा असंच सांगते Happy ) आपल्याला मात्र त्यांचं ते ओरडणंच किती योग्य आहे / होतं हे सतत जाणवत राहतं Happy .

रागाऊ नको हाँ. >>> असं नको बाई म्हणूस. त्यापेक्षा आळस करायचे तेव्हा पट्टी दाखवायचीस ( गाण्यातली नव्हे ) ते जास्त बरं वाटतं.
तेव्हा लहान होतीस म्हणून पट्टी दाखवू शकले..आता माझ्यापेक्षा उंच झाल्यावर कशी पट्टी दाखवणार??
ते काय ते म्हणतात ना..''प्राप्तेषु षोडशे वर्षे..'' Biggrin
आता दिवसेंदिवस मी लहान होणार आणि तू मोठ्ठं व्हायचंस!

अर्थातच आळसाची पट्टी वेगळी, गाण्यतली वेगळी नाही का.. मला खात्री आहे तुझ्या गाण्याच्या शिकवण्यांचे एक वेगळेच मनोगत अनिताताईंकडे असेल>>>
हो. हो. पण सध्यातरी ते सीक्रेट! Wink

Pages