मायबोली शीर्षकगीत-माझा अनुभव, माझे विचार (अनिताताई)

Submitted by अनिताताई on 18 January, 2012 - 01:11

खरंतर लेखन, वाचन हे माझे छंद आहेत, क्षेत्र नाही. पण संगीत हा माझा आयुष्यभराचा अभ्यासाचा, त्याहूनही सदासर्वकाळ आनंदाचा विषय आहे. वाचन व विरंगुळा यासाठी मी मायबोलीकर झाले आणि या विशाल विश्वकुटुंबातील एक सभासद झाले! जेव्हा इथे मायबोली गीतासाठी संगीतकार-गायक योग यांनी केलेलं आवाहन वाचलं, तेव्हा हा आवडीचा विषय असल्याने, यासंदर्भात कोणतंही काम करायला मिळावं, या गीतात सहभागी होता यावं या तीव्र इच्छेने योग यांना लगेच कळवलं! त्यांनीही मला या गीतात सहभागी केलं म्हणून त्यांची आणि मुळात या गीताची निर्मिती केली यासाठी अ‍ॅडमिन यांची खूप खूप आभारी आहे.

त्यानंतर या गीताचा प्रवास सुरु झाला. ह्या जहाजाची बांधणी केली उल्हास भिडे यांनी. योग हे कप्तान झाले आणि आम्ही जगभरातील माबोकर असा प्रवास सुरु झाला! अनेक हेलकावे खात हे जहाज योग यांनी अथक परिश्रम करत मार्गी लावलं. जगभरातील माबोकरांचे सूर एकत्रित होऊन हे गीत प्रसारित होईल, तो क्षण अतिशय रोमांचकारी असेल!

या गीताचे कवि उल्हासजींना मी म्हटलं, '' किती अप्रतिम काव्य आहे! मायबोलीचं अगदी सार प्रतिबिंबित केलंय तुम्ही!'' तर ते म्हणाले, '' हॅ...मी काही स्वत:ला कवि वगैरे मानत नाही! पाच-पन्नास कविता केल्या म्हणजे काही मी कवि नाही झालो!'' पण हा त्यांचा नम्रपणा झाला. आता हे गीत सर्व रसिकश्रोत्यांपर्यंत पोहोचेल, तेव्हा सर्वांकडून उत्कृष्ट गीतकार/कवि म्हणून मान्यता मिळेलच!!तेव्हा उल्हासजी , तुमच्या नावाआधी कविराज असं बिरूद लागलंच म्हणून समजा कायमचं!

हे गीत अगदी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा नेमक्या शब्दांत व्यक्त केलेलं माबोचं वर्णन आणि त्याला अनुरूप असं संगीतकार योग यांनी दिलेलं संगीत यांचा समसमा संयोग झाल्याचं जाणवलं. या गीताच्या धृवपदाची चाल सहज कोणाच्याही ओठांवर येईल, मनात रूंजी घालेल अशी आहे. गंमत म्हणजे या गीताच्या पाचही कडव्यांची चाल वेगवेगळी आहे. त्या त्या कडव्याच्या अर्थाप्रमाणे त्याची चाल आणि वेगळे व्यक्तिमत्व!दुस-या कडव्यानंतर पाश्चिमात्य वाद्यमेळाचा वापर केल्यामुळे या गीताला ग्लोबल टच आला आहे! या योजनेमुळे मराठीभाषा जगभर पोहोचली असल्याचं प्रतिबिंब गीतात दिसलं.यॉडलिंगचाही प्रयोग योग यांनी केल्यामुळे मायबोलीवर तरूणाई पसरली आहे हे जाणवतं.या तरूणपिढीनं मराठीची धुरा खांद्यावर घेतली आहे म्हणून हा प्रयोग आवडला! अप्रतिम वाद्यमेळाचं कोंदण लाभल्यावर तर, सुंदर कमळ उमलून यावं असं गीत उमलून आल्यासारखं वाटलं!!

आधी योग यांनी आम्हाला गीताचा आराखडा आणि चाल सांगणारा एक ट्रॅक पाठवला. त्यात वाद्यमेळ आणि कोरस मिसळायचं होतं. तो खुपदा ऐकून चाल तयार करायची होती. पण्.....नेमके त्या १०-१२ दिवसांत घरी भरपूर पाहुणे! त्यामुळे शांतपणे ऐकायला मिळेना. मग मनात अशांती आणि टेंशन आले. डोक्यात मूळ हरकतींच्या पेक्षा थोडे वेगळेच बसू लागले आणि मग तसे होऊन चालणार नाही म्हणून मग अजून गोंधळ वाढला!! तोच गोंधळ मनांत घेऊन एक सराव बैठक प्रमोदजी देव यांच्याकडे झाली.त्यादिवशी योग, प्रमोदजी,भुंगा , रैना असे आम्ही प्रथमच भेटलो. त्यानंतर थोडं टेंशन कमी झालं. संगीताचीअनेक दालनं आहेत. प्रत्येकाचा प्रत्येक दालनात वावर होणं ही तशी कठीणच गोष्ट आहे. जिथे आपला जास्त वावर नाही तिथे आपण नवखेच असतो! अगदी इयत्ता पहिलीतले लहान मूलच म्हणाना! मला आपलं तानपुरा छान ऐकायचा, तो ऐकत ऐकत ,आपले सूर छान ऐकत गायची सवय! तिथे माझं राज्यं. माझा सूर.[मला जो ''सा'' कंम्फर्टेबल वाटेल तो.] मला हवी असलेली लय, माझा श्वास असं गायची सवय!! रागसंगीताच्या सागरात पाऊलभर पाण्यात उभी! त्यामुळे कानातून तयार ट्रॅक ऐकत अचूक सुरू व्हायचं असा अनुभव नसल्यामुळे धडकी भरली! तितकीच हिंमत उसळी मारून वर आली....
आपल्याला हे नवं तंत्र कळलं पाहिजे आणि वळलं तर पाहिजेच!

मग प्रमोदजींनी ऑडासिटीची लिंक पाठवली. मग मी ट्रॅक ऐकत रेकॉर्डींग करून बघायचा सपाटाच लावला. सुगमसंगीतासाठी आवश्यक असलेले शब्दोच्चार आणि सुरांचे लगाव/उच्चार यांचा सूक्ष्मपणे विचार सुरू झाला! ट्रॅ़कवर गाता येणे आणि रेकॉर्डींगचे तंत्र ह्या गोष्टी नव्याने हाती लागल्या.

या गीतात पुरूष व स्त्री माबोकर एकत्र गाणार असल्याने गाण्याचा सूर फिमेल व्हॉईसच्या दृष्टीने उंचच असणार होता. मग सराव करून त्या उंच पट्टीत गायची हिंमत केली!! मग ते पण जमवलं ब-यापैकी.

आम्हा मुंबईकरांच्या दोन सराव बैठका झाल्या. एक प्रमोदजींकडे, दुसरी पार्ल्याला. तेव्हा या गीतात सहभागी व्हायला मिळाल्याचा आनंद तर होताच, त्याबरोबर गाणं चांगलं व्हावं ही तळमळ असल्यामुळे आपापल्या कुवतीनुसार आपण न्याय देऊ शकू ना अशी थोडीशी चिंताही प्रत्येकाच्या मनात होती.

योग यांना बघून तर झपाटलेपण काय असतं याची प्रचिती आली! हे गीत परिपूर्ण व्हावे म्हणून त्यांनी अथक परिश्रम केले. व्यावसायिक गायक-गायिकांना न घेता, गळ्यात सूर असलेल्या माबोकरांना घेऊन हा प्रोजेक्ट करण्याचं धाडस त्यांनी केलं!ज्यांची कार्यक्षेत्रं वेगळी आहेत, गाण्याचा रोज सराव नाही, रेकॉर्डींगचा अनुभव नाही असे हौशे,नवशे,गवशे माबोकर त्यांनी सहभागी करून घेतले! अगदी छोटुकल्यांपासून आजी-आजोबांच्या वयाच्या माबोकरांचा सहभाग ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट घडवून आणली.

एरवी माबोकरांची गटग होत असतात. या गीताच्या निमित्ताने आम्ही जे माबोकर भेटलो, त्या आमच्यात एक सुरेल धागा गुंफलेला होता. आता सर्वांचेच अनुभव वाचायला आणि मायबोली शीर्षकगीत ऐकायला कान आतुर झालेत. सर्व माबोकरांच्या प्रतिक्रिया/सूचना पण हव्या आहेत.
शेवटी एवढंच लिहिते..
सदासर्वदा ''योग'' ऐसा घडावा
सृजनी प्रभूचा वर तो मिळावा
नवोन्मेषी संगीतरचना उमलता
तयामाजि सहभाग अमुचा असावा!!!

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिताताई, तुमचा खणखणीत आवाज एकदम आवडेश Happy
तुमच्या आवाजा सारखं तुमचं लिखाण पण मस्त !!
एक मैफिल तो जरूर बनती है अब ....... हो ना Happy

वृत्तांत खूप छान. आवडला. शीर्षकगीताची झलकही आवडली. संपूर्ण गीत ऐकायला केव्हा मिळेल त्याची आतुरतेने वाट पहातो. सर्व योगदानकर्त्यांचे अभिनंदन !

वा मस्त वाटलं वाचून. प्रत्येकाचा अनुभव लिहिण्याची कल्पनाही फार सुरेख आहे.

>>>>> व्यावसायिक गायक-गायिकांना न घेता, गळ्यात सूर असलेल्या माबोकरांना घेऊन हा प्रोजेक्ट करण्याचं धाडस त्यांनी केलं!ज्यांची कार्यक्षेत्रं वेगळी आहेत, गाण्याचा रोज सराव नाही, रेकॉर्डींगचा अनुभव नाही असे हौशे,नवशे,गवशे माबोकर त्यांनी सहभागी करून घेतले! अगदी छोटुकल्यांपासून आजी-आजोबांच्या वयाच्या माबोकरांचा सहभाग ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट घडवून आणली.

>>>> अगदी अगदी. पण त्यामुळेच हे गाणं अगदी खोलवर जाऊन भिडतंय.

वा: छान कल्पना आहे सगळ्या मायबोलिकरांना एकत्र गीतात गुंफण्याची.तुमच्या या अनोख्या उपक्रमासाठी सर्वांचेच अभिनंदन.

अनिताताई,

कमीत कमी शब्दात पण फार काही मोठं लिहून गेलात. अगदी तुमच्या गाण्यासारखे- स्पष्ट, मोकळे आणि हृदयस्पर्शी!
तुमच्या भावनांचा आदर ठेवून असे म्हणेन -ज्याच्या कृपेने हा योग आपल्या सर्वांना आला त्याच्याच कृपेने सर्वांची पुढील "एकत्रीत" वाटचाल अशीच सुरेल घडो.

अनिताताई, फार सुंदर लिहिलंत हो! आधी तुमचा आवाज ऐकतांना नुसताच गोड आवाज इतकेच जाणवले होते. आता तोच तुमचा आवाज ऐकतांना त्या मागील परिश्रमांची जाणीव झाली, त्यामुळे तो अजूनच गोड आणि सुंदर भासला.
कधी ऐकायला मिळणार माबोगीत संपूर्ण? झलक ऐकून सुमधूर, सूरमयी वातावरण निर्माण होते आणि गाणे अचानकच संपतेपण...

छान

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
सानी , संपूर्ण गीत प्रसारीत होईल तेव्हा खूप गोड आवाज ऐकायचे योग येणार आहेत. कडवी तर मस्त झालीयंत. चौथ्या कडव्या दरम्यान एक सरप्राईज आहे!!
जयश्री , तुमच्या गोड आवाजाबद्द्ल खूप ऐकून आहे. आता लवकरात लवकर ऐकायला मिळावा अशी इच्छा आहे!
रैना , अगं काय हे? किती तारीफ काकुची!!:स्मित:

Pages