'माय''बोली' गीत - (रैना)

Submitted by रैना on 17 January, 2012 - 23:34

mail_1.jpg'मिले सूर मेरा तुम्हारा' सारखं बर्‍याच गायकांचा सहभाग असलेलं एक गीत करायचं ही कल्पना मला बेहद आवडते. योगेशने लावलेली चाल मस्त उडती होती. स्काईपवर आधी तालीम करायचा प्रयत्न केला पण ते तितकसं जमेना. एवढे चढे सूर माझे लागणार नाहीत याची खात्री होती. त्यामुळे हे गीत काही आपल्या नशीबात नाही असे वाटले. त्यातच माझी बदली दूरदेशी वगैरे वैयक्तिक गोंधळ सुरु होते. रात्र थोडी आणि सोंग फार. पण योगेशने, देवकाकांनी धीर दिला. पहिल्या दोन्ही तालमी झकास झाल्या. चाल शिकावी ती संगीतकाराकडुनच. त्यामुळे मी (उगाचच) निश्चिंत होते. स्टुडियोतल्या त्या बंद काचेआड पाऊल ठेवताच मात्र शब्दश: घाम फुटला. आत डाव्या बाजूला पेटीतबल्याच्या साथीने गाणार्‍या लताबाईंचे छोटेसे छायाचित्र होते. ते पाहून हदयगती धीरेधीरे वाढु लागली. बरेच दडपण आले.. तरी बरं समुहगान आधी ध्वनीमुद्रित केले त्यामुळे थोडी तरी भीड चेपली.

एकुणात सॉलिड मजा आली. एकतर गीताच्या ढांच्यामध्ये तोपर्यंत वाद्यांनी प्राण फुंकले होते. सतार/ बासरी अशा बहारदार वाजवल्या होत्या की यांच्या तोडीचे आपण कसे गाणार असे वाटावे. दिल खुश हो गया. बाकी योगेशचा पेशन्स अफाट आहे. एकेकाला सतत काय चुकले ते चांगल्या शब्दात सांगणे म्हणजे कमाल आहे खरोखर.

एकेक ओळ सुटीसुटी गाणे म्हणजे 'काय राव... असे असते होय ध्वनीमुद्रण... असे झाले होते नंतर नंतर.' शिवाय इतक्यांदा गाऊन, शेवटी कुठली चांगली आणि का ते कळायला मार्गच नव्हता. हेडफोन्सवर योगच्या सूचना येत, त्याबरहुकुम गात रहायचे. सूचना समजतात, डोक्यात असते, मनातही.... तरी गळ्यातून का निघत नाही तसेच्या तसे? भारीच गंमत. ऑस्सम अनुभव !! आतापर्यंतच्या एकुण कल्पनाविलासाला छेद देत, ध्वनीमुद्रणात तंत्राचा एक मोठा भाग असतो ते समजले.

मध्ये दीड महिना गेला आणि चक्कं पुन्हा ध्वनीमुद्रणाचा योगकृपेने योग आला. देशात असायच्या तारखाही जुळल्या. यावेळेस दडपण कमी होते पण आठवड्याभरात दोन देश, ३ शहरं करण्याचा परिणाम म्हणजे सर्दीखोकला. असो.

या गीताच्यानिमीत्ताने खूप शिकायला मिळाले. फार मजा आली. योगच्या मेहनतीला सलाम. एक गाणे करायचे म्हणजे खायचे काम नाही ते नीटच समजले. केवढा तो सव्यापसय. ९ मिनीटांच्या गाण्याला योगचे शंभर तरी तास गेले असतील खचितच.

आमची टीमही फार मस्त होती. अनिताकाकु , भुंगा, भिडेकाका, देवकाका, सृजन या टीममधल्या प्रत्येकाकडुन काहीतरी शिकायला मिळाले. एवढे ज्येष्ठ असून अनिताकाकु/ देवकाका आमच्याइतकेच (किंबहुना आमच्यापेक्षा जास्तच नेटाने) तयारी करत होते, भिडेकाका एवढ्या लांबून भावनिक आधार देण्यासाठी आवर्जून उपस्थित रहात होते, भुंग्याचीही कामाचे व्याप सांभाळून जोरदार मेहनत सुरु होती. छोट्या सृजनची आई धावपळ करत त्याला घेऊन आली होती. टीममधल्या प्रत्येकाच्या आवाजाची जातकुळी निराळी. तीच तर मजा आहे !!
MaayboliRecording-1.jpg
..अजूनही माझी लहान मुलगी मध्येच 'सहजीच जीवनाचा' वगैरे गुणगुणत असते. आणि 'आईचे गाणे' असे त्याला म्हणते. त्यामुळे आमच्यासाठी हे खरंच 'माय''बोली' गीत ठरले! भरून पावले...
धन्यवाद मायबोली व्यवस्थापन! धन्यवाद योग !

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना,
क्या बात.. तुझ्या आवाजाला साजेसं असच "गोड" मनोगत आहे :).
जेव्हा मनुष्य (स्त्री/पुरूष) गातो, बोलतो, तेव्हा त्याच्या सूरातून त्याचं व्यक्तीमत्व प्रकट होत असतं असे मी मानतो. तुझे ऊदाहरण त्याची जिवंत साक्षं आहे! जेव्हा संपूर्ण गीत प्रकाशित होईल तेव्हा तुझ्या आवाजातील गोडवा त्या गीताला अधिक मधुर करणार हे निश्चीत!

sahich!!

रैना,
तुम्ही खूप छान लिहिलं आहे हे मनोगत. वृत्तांत शीर्षकगीताची झलकही आवडली. संपूर्ण गीत ऐकायला केव्हा मिळेल त्याची आतुरतेने वाट पहातो. तुमच्यासहित सर्व योगदानकर्त्यांचे अभिनंदन !

छान गं रैना! तुझा आवाज मधुर आहे, त्यामुळे या गीताच्या निमित्ताने तो पुन्हा ऐकायला मिळण्याचा आनंद तर आहेच, शिवाय सर्वांच्या कष्टांचे, प्रयत्नांचे व प्रतिभेचे हे फलित नक्कीच अविस्मरणीय ठरणार यात तर शंकाच नाही!! तुला व सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन! Happy

Pages