आमच्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर ती राहायची. सदैव आपल्या विश्वात. मी तिला बिल्डींगच्या इतर सदस्यांशी बोलताना कधी बघितलं नाही. तसेच बिल्डींग बाहेरचे कुणी तिच्या ब्लॉक मध्ये आल्याचे देखील मला स्मरत नाही. सकाळी ९ च्या सुमारास ती घरून बाहेर पडायची. बहुदा कामाला जात असावी. आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास पायऱ्या चढताना दिसायची. पण त्या दिवसात तिने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही. सदैव मान खाली घालून जात असे. जिन्यातच काय पण बिल्डींगच्या आवारात देखील ती कधीही कुणाकडे पाहून हसल्याचे मला आठवत नाही. एक मात्र होते. ती समोरून गेल्यानंतर वातावरणात एक अस्वस्थ शांतता पसरायची. गप्पा मारत असताना समोर उभा असलेला माणूस अगर माणसं २-३ सेकंद शांत होत, एकमेकांकडे बघत आणि मग संभाषण पुढे चालू करीत. तिच्या समोरून चालत जाण्याने बायकांमध्ये कसलीशी कुजबुज चाले. पायल इनामदार ह्या मुलीचे दर्शन हे सर्वप्रथम ह्या वातावरणात झाले. पण तिच्याबद्दल जाणून घ्यायला मात्र थोडे दिवस जावे लागले.
मी माझ्या जागेत राहायला आल्याच्या दोन महिन्यानंतर बिल्डींग मधल्या काही उत्साही लोकांनी सत्यनारायणाची पूजा करायचे ठरवले. लगेच निमंत्रणे गेली आणि हौशी मंडळी कामाला लागली. मला मात्र एकूण पूजेमध्ये काहीही रस नसल्यामुळे मी लोकांना पूजेला बोलवायचे काम अगदी स्वखुशीने स्वीकारले! एक रविवार धरला आणि 'आर एस वी पी' ( म्हणजे काय माहिती नाही...आपण येणार की नाही ह्याची खात्री करणे त्याला फेसबुकच्या भाषेत असं म्हणतात! ) करायला सुरुवात केली. तीन मजले झाले आणि चौथ्या मजल्यावरच्या दुसऱ्या ब्लॉकची बेल वाजवली. दारावर कुणाच्याही नावाची पाटी नव्हती. आणि एका साधारण 'तिशी गाठत आलेली आहे' अश्या दिसणाऱ्या मुलीने दरवाजा उघडला. गोरा वर्ण,बेताची उंची आणि अगदी आकर्षक चेहरा! सुटे सोडलेले केस आणि दुपारचे बारा वाजत आलेले असताना देखील अंगावरचा 'नाईट- गाऊन', आज रविवार आहे ह्याची साक्ष देत होता! पण मला पाहता त्या चेहऱ्याने आश्चर्याचे रूप धारण केले. आणि अनपेक्षितता दर्शवत मला प्रश्न केला, " काय हवंय?" "काही नाही, मी आपल्याला बिल्डींग मधल्या सत्यनारायाणाचे आमंत्रण द्यायला आलो आहे! पुढच्या रविवारी आहे. या नक्की!" तिने उत्तरादाखल फक्त मान डोलावली. मीच थोडे संभाषण पुढे न्यायचा प्रयत्न केला. " मी इथे दोन महिन्यापूर्वी राहायला आलो. सध्या एकटाच आहे. आपल्याला बऱ्याचवेळेस पहिले आहे. पण आज ओळख करून घेऊ म्हंटल", असं म्हणत मी माझे नाव सांगितले. तिची देहबोली, कधी एकदा दरवाजा बंद करते, हे दर्शवत होती! " मी पायल. पायल इनामदार." तिने आपली ओळख करून दिली. काही सेकंद शांततेत गेले. पुढे काहीच बोलणे होत नाही हे समजून मी परत एकदा पुजेची आठवण करून देऊन जिना उतरणार तेवढ्यात चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या करमरकरांनी मला पहिले. त्यांच्या कपाळावरच्या सदैव असणाऱ्या आठी आणखीनच घट्ट झाल्या आणि आपली मान हलवीत ते आपल्या घरी शिरले.
" काय हो! तुम्ही पूजेला आला नाहीत!" पूजेनंतर काही दिवसांनी ती मला बस मध्ये भेटली. ऑफिस मधून घरी येत होतो. "बरीच लोकं आली होती आपल्या बिल्डींग मधली. छान झाली पूजा!" ( आता पूजा ही छान वगैरे कशी होते माहिती नाही....एक चेहऱ्या वरची सुरकुती न हलत धडाधड बोलत सुटणारा पुजारी....त्यातून ती प्रसाद खाल्ला नाही तर तुमच्या घरी दारिद्र्य येईल अशी वैचारिक दारिद्र्य दाखवणारी ती सत्यनारायणाची कथा....तरी पूजा झाली ह्याचा उल्लेख 'छान झाली' असाच करायचा असतो! असो...) "नाही, नाही आले", असे एवढे माफक उत्तर तिने दिले. वास्तविक पाउण तासाच्या त्या बस प्रवासात निदान वेळ घालवायला तरी काहीतरी बोलणे शक्य होते. पण उतरेपर्यंत ती एक अक्षर बोलली नाही. तेच कशाला, उतरून झाल्यावर बिल्डींगपर्यंत तो पंधरा मिनिटांचा रस्ता देखील तिने न बोलताच तुडवला. फक्त एक औपचारिकता म्हणून ती माझ्याबरोबर चालत होती. आणि गेटपाशी आमच्या शेजाऱ्यांनी, म्हणजेच कांबळे काकांनी आम्हाला पाहिले. एरवी हसण्याचा थोडासा प्रयत्न करीत माझं स्वागत करणारे कांबळे आज मात्र, ज्याला थंड चेहरा म्हणतात, तश्या चेहऱ्याने माझ्याकडे बघत होते. पायलचे आमच्या कुणाकडेच लक्ष नव्हते. नंतर जिना चढताना मी परत काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. " तुम्ही कुठे आहात नोकरीला?" मी कुठे नोकरी करतो हे तिला सांगितले आणि ती जाता जाता म्हणाली. " मी गोदरेज मध्ये आहे. सेल्स मैनेजर आहे."
त्या दिवशी पायल इनामदार बद्दल थोडी माहिती तर मिळालीच पण तिच्याबद्दल असलेल्या उत्सुक्तेबद्दल वाढ देखील झाली. एवढ्या चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असलेली ही मुलगी एवढी एकाकी का? बिल्डींगच्या कुठल्याही समारंभात हिचे येणे नाही, कुणाशी बोलणे नाही आणि घरी देखील ही एकटी. नक्की प्रॉब्लेम काय आहे? आणि माझी उत्सुकता थोडी अजून वाढू देण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. रविवार सकाळ. आरामात उठून समोरच्या दुकानातून ब्रेड आणायला बाहेर पडलो आणि येता येता कांबळे भेटले परत. " काय म्हणताय काका!" ?(आमची आपली जुनी सवय....समोरच्या व्यक्तीचा चेहरा कितीही 'थंड' वगैरे असेल किंवा आपल्याला निरुत्साही करणारा असेल तरीही 'काय म्हणताय' हे विचारायचे! वास्तविक हे असले चेहरे काहीही म्हणत नसतात....नुसते वेड लागल्यासारखे आपल्याकडे पाहत असतात!) "काही नाही...कुठे दुकानात का? आणि एकटाच चालला आहेस?" आता ह्यांच्या प्रश्नातील रोख न कळण्याइतका मी बावळट नक्कीच नव्हतो. काल पायल बरोबर चालत येणे त्यांना आठवत असणार! " अहो काका, मी एकटाच राहतो, तुम्हाला चांगलेच माहिती आहे की!" ( मी तरी उत्तरं देणे कशाला सोडतोय!) माझ्या चेहऱ्यावर किंचित हास्य असावे. नाहीतर कांबळे काका असे उखडले नसते. " तुम्हाला मजा वाटेल. पण तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय. तुमच्यासारखा आधी सुद्धा होता एक. कुठे गेला तो आता? दिसतोय? दोन महिन्यापूर्वी आला आहात. तुम्हाला आधीचे माहिती तरी आहे का काही? पण मी तरी कशाला बोलू. त्यांच्या घरी तुम्ही देखील जात असाल! आम्हालाच काळजी!" मोठ्या माणसांबद्दल मला नितांत आदर आहे. परंतु ज्या काही लोकांचे बोलणे ऐकून हिंसक विचार मनात येतात त्यात मला कांबळे काकांचा उल्लेख नक्कीच करावा लागेल. कसाबसा राग आवरत मी तिथून घरी आलो. पुण्यात राहणाऱ्या ह्या माझ्या शेजाऱ्याला मुंबईत राहणाऱ्या माझ्या आई-बाबांपेक्षा माझी काळजी अधिक...मी तरी काय करणार म्हणा! त्यातून मी 'bachelor ' आणि नोकरी निमित्त आलेला आणि एकटा रूमवर राहणारा. माझ्यावर संशय घ्यायला वाव अधिक! पण ब्रेड-आम्लेट खाताना 'माझ्यासारखा आधीसुद्धा होता' ही काय भानगड आहे ह्याचा विचार मी करू लागलो!
पायल आणि माझी घरी यायची बस ही एकच आहे हे काही दिवसात मला कळले. इतकेच काय, माझ्या कंपनीपासून बस सुरु झाली की काही मिनिटे पुढे ती चढायची. पण तरीही बोलण्यात काहीच प्रगती नव्हती. हां, नुसतं बघणं इथपासून किंचित हसण्यापर्यंत प्रगती झाली होती. पण एकदा मी तिला बसायला जागा दिली तेव्हापासून कदाचित ती माझ्याशी बोलू लागली. अगदी मनमोकळ्या गप्पा नव्हे पण माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागली. माझ्या सांगण्यावर प्रतिक्रिया देऊ लागली आणि कधी कधी तर खळखळून हसू देखील लागली! आणि नंतर आमच्या गप्पा वाढू लागल्या! ऑफिसचे किस्से, बॉसच्या गोष्टी, पगारवाढीची अपेक्षा हे सर्वश्रुत विषय यायला लागले हळू हळू. पण घर जसे जवळ येई तशी ती थोडी सावध होत असे. आणि उतरायच्यावेळी तर अगदी गप्पं! एवढेच काय, तर बिल्डींग मधल्या कुणाचाही विषय निघाला तरी ती एकदम गप्पं होई! एरवी तेंडुलकर श्रेष्ठ की द्रविड ह्या विषयावर द्रविडची बाजू उचलून धरणारी ( शेवटी मुलगीच ती!) ही, करमरकर काका, पाटील काकू किंवा कांबळे काकांचा विषयात अजिबात भाग घेत नसे! एकूण चमत्कारिकच वागणं होतं हे! पण हळू हळू बोलणे वाढले. आणि पुढील एक दोन आठवड्यात मला अगदी चिडवेपर्यंत वगैरे हिची मजल गेली! मला देखील हिच्याशी गप्पा मारण्यात मजा येऊ लागली! आणि त्या दिवसात पायलचा उलगडा होऊ लागला.
" काय विचित्र शर्ट घातला आहेस तू! हा काय तुझ्या ऑफिसला शोभेल? आणि म्हणे मिटिंग आहे!" सकाळी ऑफिसला जाता जाता पहिली प्रतिक्रिया मला ही मिळाली. आदल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे माझी मिटिंग होती आणि मला फैशन फारशी कळत नाही ह्याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला! एकंदर टाप-टीप राहणे वगैरे माझ्या स्वभावात कमीच. पण मुलीचा सहवास या स्वभावात बदल आणू शकतो हे काही दिवसात मला जाणवू लागले. तिने मला शर्टबद्दल सांगितल्यापासून मी देखील आरश्यासमोर जा-ये करू लागलो, पण तरीही अगदी भरपूर बदल घडला नाही माझ्यात. तिच्या लेखी मी outdated कपडे घालत होतो आणि मला फैशन अजिबात कळत नव्हते! " काय रे! हे असे कपडे घालतात का! जरा थोडा ट्रेंडी राहत जा की!"
वास्तविक मी त्या दिवशी चांगला टी-शर्ट घातला होता. पण बाईसाहेबांना त्याचा रंग नाही आवडला! " अरे, मुंबईत राहतोस ना! तरीही फैशनचे देणे नाही तुला! तुझ्या बायकोचे काय होईल रे! ह्या असल्या वातावरणात कुजेल बिचारी", जोर-जोरात हसत पायल मला म्हणाली! ह्यावर मी काही बोलत नाही हे कळताच लगेच तिने मला विचारले, " काय रे, आहे वाटतं कुणीतरी! सांग की, लपवतोयस कशाला?"
" अगं, नाही आहे कुणी. आणि असल्या फैशन नसलेल्या मुलाला कोण पसंत करेल? मी आपला आहे तसाच बरा आहे!" ह्या विषयात एकमेकांकडे थोडी वाक्य फेकली जात असतानाच मी तिला विचारले, " तुझा आहे का कुणी बॉयफ्रेंड?"
"होता रे!" अगदी निर्विकार चेहऱ्याने तिने मला उत्तर दिले.
"होता म्हणजे?" मी अगदी आश्चर्याने विचारले. आधी कुणीतरी बॉयफ्रेंड होता आणि तो आता नाही हे धीटपणे सांगणारी ही पहिली मुलगी मी पाहत होतो!
" प्रसाद नाव होते त्याचे. ४ महिन्यांपूर्वी आम्ही ठरवले की आम्ही मित्रच राहिलेले बरे. त्याचे आता लग्न झाले."
" हो का. बर,बर!" ही भलतीच बिनधास्त होती तर. "कुठे राहायचा तो? इकडे पुण्यातच का?" मी आपला संवाद पुढे नेला थोडा.
" हो रे. तो तुमच्या मुंबईचाच होता. इकडे आला होता नोकरीला.माझ्याच कंपनीत होता तेव्हा ओळख झाली. नंतर त्याने दुसरीकडे नोकरी धरली."
" कुठे जवळच होती का नोकरी? भेटायचे वांदे झाले असतील ना मग?" मी विचारले.
" नाही रे. आम्ही एकत्रच तर राहत होतो."
माझ्या हातातून सामानाची पिशवी एकदम खाली सरकली. मला एकदम कांबळे काकांचे वाक्य आठवले. मी तिच्याकडे काही सेकंद पाहत राहिलो.
http://www.maayboli.com/node/31961 - भाग २ येथे आहे!
अतिशय सुंदर...तुमच्या लेखाची
अतिशय सुंदर...तुमच्या लेखाची वाटच बघत होते..
खुप आवडली.
धन्यवाद! भाग २ देखील वाचा!
धन्यवाद! भाग २ देखील वाचा! खाली लिंक दिली आहेच.