तीळाच्या वडया

Submitted by सुलेखा on 12 January, 2012 - 04:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

tilachya vadya-22222.JPG
२ वाटया तीळ भाजुन त्याचे मिक्सर वर जाडसर कुट करुन घ्यावे..
१ वाटी [सपाट] भरुन भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कुट..
२ वाटी साखर..
साखर भिजेल इतके अर्धी वाटी पाणी..
वरुन लावायला खोबरा बुरा अर्धी वाटी..[बाजारात मिळणारा तयार बारीक खोबर्‍याचा किस.]

क्रमवार पाककृती: 

दोन ताटांना व एका वाटीला खालुन तुपाचा हात लावुन ठेवावा..या ताटात च वडयांचे मिश्रण टाकुन वडया पाडायच्या आहेत..तुप लावल्याने वडया सहज सुटतील..साखरेत पाणी घालुन गॅसवर दोन तारी पाक करावा..सतत ढवळावे..लाडुसाठी करतो तसा पाक करायचा आहे..
पाक तयार झाला कि गॅस बन्द करुन त्यात शेंगदाणा कुट टाकुन ढवळावे .नंतर तीळाचे कुट थोडे थोडे टाकत ढवळावे..सगळे मिश्रण एकत्र ढवळले कि घट्टसर गोळा तयार होईल..
तुप लावलेल्या ताटात मिश्रणाचा अर्धा गोळा टाकुन तुप लावलेल्या वाटीने ताटभर एकसारखा पसरावा..उरलेला गोळा ही असाच दुसर्‍या ताटात पसरावा..त्यावर खोबरा किस भुरभुरावा व वाटीने दाबावा.हे मिश्रण कोंबट असतानाच त्याच्या वडया पाडाव्या..
tilachya vadya-111111.JPG

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तितक्या..
अधिक टिपा: 

या प्रमाणात भरपुर वडया तयार होतात.आधी दाणेकुट नन्तर तीळ कुट टाकावे ..मिश्रण ढवळत असताना तीळ्कुटाचा अंदाज येतो..माळव्यात अशा साखरेच्याच वडया करतात..तर गुळाच्या पाकात भाजलेले तीळ घालुन पातळ पापड करतात..तसेच गुळाच्या पाकातली तीळ व दाणे घालुन गुड-दानी करतात..

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजुडी.या वड्या खुपच खस्ता असतात..नाजुक हातानेच ताटातुन सोडवाव्या लागतात नाहीतर वडीचे तुकडे पडतात..दाण्याचे कुट घातल्याने वडी मऊसर रहाते.खमंगपणा येतो...नुसत्या तीळाची तितकीशी चवीला छान लागत नाही..

अरे वा, मस्त दिसत आहेत वड्या. आमच्याकडे गुळाच्या मऊ वड्या करतात ( म्हणजे मी नाही करुन पाहिल्या अजून Wink पण सासरी माहेरी दोन्हीकडे )

ओके, म्हणजे दोन तारी पाक केला तरी वडी खुसखुशीत होते का? म्हणजे कवळीवाल्यांना खाता येईल अशी होते ना?

मी गूळाच्या कच्च्या पाकाच्या करते. गूळ विरघळला की लगेच माल घालायचा आणि ढवळून वड्या थापायाच्या.

मंजुडी ,दोन तारी पाक केला कि [च] ती वडी पाडतायेण्याजोगी होईल..नाहीतर पाक कच्चा राहील ..जर कधी चुकुन असे झाले तर एक वाटी साखरेचा पक्का पाक तयार करायचा त्यात एक वाटी तीळ कुट व हे कच्च्या पाकाचे मिश्रण टाकुन भराभर ढवळायचे ..सगळे मिश्रण पटकन घटट होते..लगेच तुप लावलेल्या ताटात ओतायचे व थापायचे[अर्थात ही ताट पुन्हा एकदा तुप लावुन तयार केलेली असावी.. म्हणुनच शेंगदाणे कुट व तीळ कुट थोडेसे जास्त करावे..
कवळी वालेच नाही तर दात न बसवलेल्यांना मस्त खाता येतात..एकतर त्यांनाच गोड फार आवडते..अन या वड्या खाताना त्यांच्या चेहर्‍यावरचा असीम आनंद पहाणे व अनुभवणे अवर्णनीय आहे..[माझे सासरे व साबा ना तर फारच आवडायच्या...

अर्ध्या प्रमाणात करून बघते.
तीळाच्या वड्याना खोबरे लावलेले पाहिले नव्हते कधी.
आता करुनच बघेन.

लाजो, अगदी सेम सेम..माझी आई सुद्धा असेच करायची.तेव्हा हलवा घरीच करायची ना..पांढर्‍या तीळ-खोबर्‍यात लाल-पिवळी-हिरवी चांदणी खुपच छान दिसायची ती वडी..

मी आत्ता साखरेच्या पाकातल्या केल्या, पण एकदम भुगा झाला.
असं का झाल असेल ?
परत पाक करून त्यात टाकून केल्या. बघू काय होते ते.
पण गुळाच्या पाकातल्या केल्या त्या छान जमल्या.

दोन तारी पाकाची परिक्षा काय? तिळाच्या वड्या केलेल्या बहुतेक भुगा होणार .. :|

वरच्या अशिनीच्या छान ओलसट दिसत आहेत ..

मी केल्या. मस्त झाल्यात. झटपट होतात त्यामुळे यावेळी गुळाला कल्टी मारुन याच केल्या. @ मंजूडी, लहान (दात तुटलेले) व म्हातारे (दात पडलेले) सगळ्यांनी खाल्या. Happy

सशल, हे मिश्रण लगेच सुकू लागतं. त्यामुळे पाकात दाण्याचं कूट आणि भरडलेले तीळ टाकले की पटपट हलवून लग्गेच थापायचं, डोळ्यादेखत भुगा होतो नाहीतर ! दोन तारी पाक म्हणजे चिमटीत थोडा पाक घेऊन बोटं दूर केल्यास दोन तारा दिसतात. समजा सगळं मिश्रण सुकं झालं, तर ते कढईतच मोकळं करुन त्यात अर्धी वाटी पाणी घालून गॅसवर नीट ढवळून घ्यायचं. थापण्याजोगं छान ओलसर होतं.

ह्या वड्या ठिसूळच असतात.

काल भाऊ आला होता, त्याने डबाच समोर ठेवून घेतला Proud

मी पण काल जरा वेगळ्या पध्दतीने केल्या. ३ वाट्या कुट ( १ वाटी दाण्याचे व २ वाट्या तीळाचे कुट), ५० ग्रम मिल्क पावडर, एक वाटी साखर व साखर बुडेपर्यंत दूध ( मी बहुतेक लाडू, वड्यांच्या पाकासाठी दूधच वापरते). पाक दोन तारी झाला की गॅस बंद करुन त्यात दूध पावडर व कुट घालावे. पातेल्यात हे मिश्रण थोड्यावेळ ढवळत राहावे. घट्ट झाले की तूप लावलेल्या ताटात थापावे. मिश्रण सैल वाटल्यास थोडे कुट अजून मिसळावे. अश्या पध्दतीने केलेल्या मऊ व खुटखुटीत वड्या सर्वांना खाण्यायोग्य होतात.

धन्यवाद अश्विनी .. Happy

माझ्या वड्यांपैकी ताटाच्या मधल्या भागातल्या जरा व्यवस्थित झाल्या आणि कडेच्या अगदी भुगा .. पण चव छान आली आहे ..

दुधाची पावडर आणि पाण्याऐवजी दुध वापरून वेगळी चव येत असेल .. करून बघायला हवं ..

मधल्या भागात जाड थापल्या गेल्या असतील म्हणून व्यवस्थित झाल्या. या वड्या थोड्या जाडच थापायच्या. चिक्कीप्रमाणे पातळ थापू नये.

मी पण कधी दूध पावडर आणि दूध वापरलं नाहिये. पुढची बॅच ते वापरुन करेन.

प्रज्ञा१२३,पुन्हा एकदा पक्का पाक करुन केल्या तर जास्त गोड होतील..
सशल ,वडी थापण्यापुर्वीचे पाक व तीळ-दाणे कुटाचे मिश्रण अगदी कोरडे नको..थोडेसे ओलसरच हवे .ताटात ओतुन नीट पसरवेपर्यंत ते आळायला लागते..नुसत्या तीळ्कुटाची वडी केली तर भगरा होते..दाण्यामुळे गोडी येते ..माळव्यात खवा/मावा घालुन ,तील-मावे कि बर्फी करतात तसेच ड्रिंकिंग चॉकोलेट व कोको पावडर आणि मिल्क पावडर घालुन चोकोलेटी वड्या करतात..त्याही छान असतात चवीला.
[तेव्हा दाण्याचे कुट घालत नाही] तसेच स्पेशल डायबेटीक वड्या सुद्धा मिळतात..[????????]
अश्विनीके.अगदी बरोबर या वड्या जाडसर च करतात..अशाच नुसत्या शेगदाणेकुटाच्या खुपच छान लागतात..खवा न घालता ही खवा घातलाय का असे खाणारा विचारतो..

मंजुडी ,मंजुडी खवा कुटाच्या ,कमीत कमी १/२ किंवा १/४ तरी असावा..खवा नसला तर पेढ्यानेही तशी चव येईल..जर खवा घेतला तर वेगळा भाजुन घ्यावा..दोन तारी [लाडु चा]पाक तयार झाला कि आधी खवा घालुन पाकात एकसार करावा..वेलची पुड किंवा मोठ्या मसाला वेलचीचे दाणे घालावे. नंतर लगेचच तीळ कुट घालुन ढवळावे व वड्या पाडाव्या.
कोणत्याही प्रकारचे लाडु केले तर ते वळण्याऐवजी मी बरेचदा वड्या पाडते किंवा मुदाळ्याने [ते प्लास्टीकचे पिवळे मुदाळे तयार मिळते ना ते--प्रसादासाठी व भातासाठी असे ३ साईझ चे मिळते] मुदी पाडते..भराभर एकसारख्या मुदी पडतात..दिसायलाही छान..वेळही कमी लागतो.
मंदार जोशी-मनापासुन धन्यवाद..

गेल्यावर्षीपर्यंतचे तीळाचे लाडू करण्याचे बरेच असफल प्रयत्न केल्यानं यावर्षी तीळकूटाची वडी करायची ठरवलं आणि यावेळी इतकी खस्ता वडी जमलीये की Happy

शुगोल पाकृ बद्दल थँक्यू Happy

भाजलेल्या तीळाचे कुट - २ वाट्या
भाजलेले खोबरे कुसकरून - १ वाटी
भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट - १ वाटी
किसलेला गुळ - ३ वाट्या (मी गुळाची पावडर अशा स्वरूपात तयार मिळते ती घेतली) किसलेल्या गुळाचे प्रमाण जरा कमी घ्यावं.
वेलची पूड चवीप्रमाणे
३ मोठे चमचे पाणी - पाकासाठी

पाक तयार झाल्याची खूण म्हणजे गुळ जरासा फसफसतो आणि चिकट लागतो. त्यानंतर लगेच त्यात वरील गोष्टींचे मिश्रण टाकावं आणि मंद आचेवर नीट सारखे करावं. कोरडे वाटल्यास तूप घालावं. तूप लावलेल्या थाळ्यात जरा जाडसरच थापून गरम असतानाच वड्या पाडाव्या.

सर्वांना तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला Happy
IMG_2103.JPGIMG_2104.JPG

Pages