नमस्कार.....
कालचा चेन्नईमधला हरिप्रसाद चौरासियांचा कार्यक्रम फारच सुरेख झाला. माझा नवरा म्हणतो ते खरं वाटतयं मला. सध्या आमच्या दोघांच्याही पत्रिकेत `संगीत-घबाड-योग` चालू आहे. शुभा मुद्गलांचा कार्यक्रम चेन्नईत नुकताच होऊन गेला होता. त्यापाठोपाठ कलापिनी ताई आणि वसुंधरा ताईंच्या कर्यक्रमाला जाण्याचा योग आला. कालच हरीजींची बासरी ऐकली आणि उद्याच्या उस्ताद अमजद अली खान साहेबांच्या सरोदची वाट पहातोय. आता बोला......!
चेन्नईमधे दरवर्षी डिसेंबर महीन्यात एक सांस्कृतिक महोत्सव असतो. गायन, वादन आणि नृत्याच्या बहुढंगी कार्यक्रमांचा यात समावेश असतो. हा ढंग बहुतांशी कर्नाटकीच असला तरी यंदा पं. हरिप्रसाद चौरसिया आणि उस्ताद अमजद अली खान यांचे हिंदुस्तानी वादन देखील आहे.
तर...कालच्या हरीजींच्या वादनाबद्दल काय बोलावं!!! केवळ अप्रतिम!!! आज ते काय वाजवणार याची तर आम्हाला उत्सुकता होतीच पण या वयात ,हात कापत असताना दोन-अडीच तासांचे कर्यक्रम ते कसे काय देऊ शकतात असा प्रश्नही पडला होता. पडदा अलगद बाजूला झाला आणि आम्ही आधी हरीजींना डोळे भरून पाहून घेतलं. साथीला तबल्यावर पं. विजय घाटे आणि पखवाजावर पं. भवानीशंकर. मनातलं पहिलं अवतरण होतं...`वाह! क्या बात है!` अवतरणांचा हा सिलसिला पुढचे दोन तास चालू होता. भीमपलासच्या सुरांनी संध्याकाळ खुलायला सुरुवात झाली. आलाप, जोड आणि झाला अशा मांडणीने हरीजींनी भीमपलास मांडला. तबला आणि पखवाजावरचे हात फिरत दाखवत होते. हरीजी मधूनच सह-बासरी वादकाकडे बघत होते, मिश्कीलपणे हसत होते आणि राग उलगडून दाखवत होते. मनात असं वाटत होतं की यांच्या बासरीचा षड्ज संवादाची सुरुवात करतोय. पण स्वरांची गती मनापेक्षा शीघ्र असावी; कारण मन षड्जावर रेंगाळलेलं असताना बासरीनं संवादाचा गाभा गाठलेला होता.
साधारण तासभर आलाप आणि झाला वाजवल्यावर हरीप्रसादांनी मत्त तालात भीमपलास वाजवायला सुरुवात केली. आता मात्र विजय घाटे आणि भवानीशंकर यांची कमाल जाणवत होती. बासरीसारख्या एवढ्या मृदु वाद्याला सुद्धा तबला आणि पखवाज किती ऐटदार साथ करतात!!! ९ मात्रांचा मत्त ताल आपले नाव सार्थ करतो. या तालाकडे स्वत:चा एक दिमाखदार झोल आहे. यानंतर खास लोकाग्रहास्तव हरीजींनी यमन वाजवला. साहित्य-शास्त्राचा अभ्यास करत असताना शिकलेल्या `औचित्य` या गुणाची मला आठवण झाली. योग्य प्रसंगी योग्य रसाची उत्पत्ती व्हायला हवी. यमनचे सूर सांजेचे लालित्य अचूक साधून येत होते. मग पहाडीतल्या एका सुरावटीने हरिप्रसादांनी कार्यक्रमाची सांगता केली. वेळेचं, आजूबाजूच्या गर्दीचं भान राहू नये असं गारूड या तिघांनी सगळ्यांवर घातलं होतं. मला स्वतःला शास्त्रीय संगीतातलं फारसं काही कळत नाही. अगदी अजिबात कळत नाही म्हटलं तरी चालेल , पण तरीही बासरीच्या त्या स्वरांनी मला मनःपूत आनंद दिला. सुरांच्या तंत्रशुद्ध चिकित्सेचा आणि सूरांतून मिळणार्या आनंदाचा काहीही संबंध नाही.
या सर्वच कार्यक्रमांनी आम्हाला भरभरून दिलं. सात स्वरांमध्ये स्वर्ग उभा करण्याची अफाट ताकद आहे याची आत्ता कुठे प्रचिती येऊ लागली आहे. खूप मागे विवेकानंदांचा एक लेख वाचला होता. त्यात ते म्हणतात की पूजा-अर्चा, उपास-तापास, कर्मकांड या मोक्षाच्या मार्गातल्या बालवाडीच्या शाळा आहेत. सूरांचीच उपासना करणार्या या लोकांनी अशा शाळेची पायरीही न चढता मोक्ष गाठलेला आहे. `शब्दं ब्रह्म` असं उपनिषदं सांगतात. त्या शब्दाकार तत्त्वाला हरीजींसारखे साधक कवळतात.
गायकाचा आवाज असो किंवा वादकाचे वाद्य असो, त्यातून आम्हाला मिळालेल्या आनंदाचं चपखल वर्णन करण काही मला शक्य नाही. तुमच्यासारख्या समानशीलांबरोबर तो आनंद वाटला तर द्विगुणीत होईल म्हणून हा लेख-प्रपंच!
धन्यवाद!
स्वरमुग्धा
रसरंगी
Submitted by स्वरमुग्धा on 25 December, 2011 - 04:32
गुलमोहर:
शेअर करा
व्वा स्वरमुग्धा! छान
व्वा स्वरमुग्धा! छान लिहिलंयस.
लोकं शब्दचित्र उभं करतात तर
लोकं शब्दचित्र उभं करतात तर तू शब्दश्रुती उभी केलीस अगदी! बहोत खूब! बढिया!!
स्वरमुग्धा- अतिशय सुरेख लेख.
स्वरमुग्धा- अतिशय सुरेख लेख. शास्त्रीय संगीत कळणे आणि ते स्वानंदासाठी अनुभवणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपण ते अनुभवलेत. आणि आमच्या पर्यंत पोचवलेत धन्यवाद.
सुंदर !!
सुंदर !!
पुरंदरे काका, शांकली, किंकर
पुरंदरे काका, शांकली, किंकर आणि पंत... प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
उस्ताद अमजद अली खा साहेबांचा
उस्ताद अमजद अली खा साहेबांचा कार्यक्रमही फार सुंदर झाला.
श्यामा गौरी, झिला काफी, बागेश्वरी, चारुकेशी आणि गणेश कल्याण असे दुर्मिळ राग त्यांनी वाजवले.
गणेश कल्याण हा त्यांनी स्वतः तयार केलेला राग ! अतिशय सुरेख!
चैतन्या - तू नमूद केलेले हे
चैतन्या - तू नमूद केलेले हे जे दुर्मिळ राग आहेत ते ऐकण्यासाठी काही लिंक मिळू शकेल का ? खूप उत्सुकता आहे या रागांबद्दल.
स्वरमुग्धालाही संगीत आवडतंय म्हणजे चांगलेच सूर जुळलेत तुमचे - छान छान... अनेक शुभेच्छा.
वा छान लिहिलय्स स्वरा
वा छान लिहिलय्स स्वरा

वर्षानंतर वाचतेय तेव्हा क्षमस्व