खोपा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 November, 2011 - 01:26

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला |
देखा पिलासाठी तिने, झोका झाडाले टांगला ||


खोपा म्हणजे सुगरणीचे घरटे दिसले की बहीणाबाई चौधरींच्या वरील पंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत. खरच मानवी जीवनालाही किती सार्थक ओळी आहेत ह्या. आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी ह्या पंक्ती जीवाला घोर लावून जातात.

ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहीणाबाईंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. पक्षांबाबत वाचनात आल आहे की नर पक्षी हे घरटे तयार करतात व मादी पक्षी ते निरखून पाहतात व ते ठिकठाक आहे की नाही हे पाहून त्यात रहायच की नाही हे त्या ठरवतात.

हे सुगरण पक्षी घरटी विणतात त्यावरून मला नेहमी प्रश्न पडतो हत्ती, घोडे, बैलांसारखे मोठ्या शरीराच्या प्राण्यांना आपले स्वतःचे घर बनवता येत नाही पण हे चिमुकले पक्षी आपल्या चोचीत गवत-पात्या गोळा करुन सुंदर विणीचा खोपा तयार करतात.

झाडाच्या फांदीला धरून ह्यांच्या पायाभरणीला (विणण्याला) सुरुवात होते.

किती बारीक लक्ष आहे पहा, ही मादी सुगरण असावी. आपल घरकुल व्यवस्थित झाला की नाही ते पडताळून पाहात आहे.

हा सुगरण बिचारा विणून विणून थकलेला दिसतोय. एकदाच जोर मारला असेल त्याने खोपा लवकर तयार होण्यासाठी.

खोप्यांच्या इंटेरियर व डिझाइन्स मध्ये थोडा फार फरक जाणवतो.

हे सुगरण पक्षी एखाद्या झाडावर जणू आपले गावच वसवतात. एखादे लांबचे म्हणजे रहदारी जिथे कमी असेल किंवा आपले गाव दिसणार नाही अशा ठिकाणी असलेले झाड बहूतेक निवडतात असा माझा अंदाज आहे. एकाच झाडावर ह्यांची १५-२० जणांची वस्ती विसावते.

ह्या सुगरणी तसेच बरेच घ्ररटे करणारे पक्षी आपल्या पिलांना जन्म देतात आणि बाळे स्वावलंबी झाली की नंतर घरटी सोडून देतात. खास आपल्या बाळांच्या जन्मासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हे सुगरण पक्षी किती मेहनतीने ही घरटी बनवतात. एकच इश्वरचरणी प्रार्थना आहे की आजच्या ह्या सिमेंटच्या जंगलात ह्यांच्या वस्तीला कुणाची नजर न लागो उलट अधिकाधिक त्यांच्या हिरव्या वस्त्यांची ठिकाणे त्यांना उपलब्ध होवोत.

(हे लेखन जालरंग प्रकाशनाच्या दिपोत्सव ह्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशीत झाले आहे. जालरंगच्या टिमचे आभार)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त आहे Happy

मलाही नेहमी प्रश्न पडतो, की इतर पक्षांचे घरटे नॉर्मली खोलगट गोलाकार व झाडाच्या बेचक्यात असते. या पक्षांना कसं कळतं की आपलं घरटं असं वेगळंच बांधायचं किंवा कसं बांधायचं? ते वार्‍याने जोरात हलतही असेल मग त्यांची पिल्लं घाबरत असतील.

जागू, मस्त ग प्रची आणि वर्णन सुद्धा.
खरचं किती छान विणतात ना हे घरटं? त्यांच्या घरट्याच्या आकाराबद्दल निगवर वाचलं. गेल्या जन्मीचे हे इंटेरियर डेकोरेटर असावेत. Happy
एका सुगरणीने दुसर्या सुगरणीचे प्रचि काढले आहेत >>>>अनुमोदन. Lol

एका सुगरणीने दुसर्या सुगरणीचे प्रचि काढले आहेत Lol
पण दोन्ही दोन वेगवेगळ्या विषयांच्या आहेत.

शोभा, सारीका धन्यवाद.

जागु ताइ सुंदर आहेत फोटो, सेव्ह केलेत

एका सुगरणीने दुसर्या सुगरणीचे प्रचि काढले आहेत >>>>अनुमोदन.

जागू, हे फोटो कुठे काढलेस ग? (कोणत्या गावात) जवळून काढलेले दिसतायत. Happy
अश्विनी अग त्यांना भिती नसेल वाटत. उलट झोके घेतल्यासारखे वाटत असेल त्यांना.>>>>किंवा पाळण्यात झोपल्यासारखं. Proud

सुंदरच फोटो. आमच्याकडचे हेच पक्षी आकाराने मोठे असतात पण घरटे मात्र गोलाकारच बांधतात, असा सुबक आकार नसतो.
घरटे बांधायची कला नराला अवगत असली तरी पहिली एक दोन वर्षे त्याचे प्रयत्न फुकट जातात, मादीला त्याचे घरटे पसंत पडले नाही तर त्याचा घरोबा होत नाही. पण जूने जाणते नर मात्र एकाच हंगामात २/३ घरोबे करतात.

आतमधल्या खोलगट भागात कापूस वगैरे ठेवून मऊ गादी केलेली असते. त्यात पिल्ले मजेत राहतात. या घरट्यात पावसाचे पाणी जात नाही तसेच याची फांदीवरची पकड एवढी मजबूत असते कि कितीही वारा आला तरी ती सुटत नाही.
यांची घरती सहसा बाभळी वर किंवा नारळाच्या झाडावर असतात. तिही अगदी टोकाला. असे केल्याने सापापासून अंड्या पिल्लांचे संरक्षण करता येते. समुहाने राहण्याच्या फायदा हा कि एकाला जरी धोका वाटला तर कलकलाट करुन बाकिच्यांना सावध करता येते.

हे पक्षी हवे असलेले धागे कसे गोळा करतात ते पण बघण्यासारखे असते. गवताची पात अगदी मूळापासून तोडतात आणि तशीच चोचीत धरुन उडतात. कधी कधी एकमेकांचे धागे चोरलेही जातात, क्वचित एकमेकांची घरटी उसवण्याचेही प्रकार होतात.

डॉ. सलीम अलींनी या सुगरण पक्ष्यावरच आपला प्रबंध लिहिला होता. साधारण झाडाच्या ऊंचीचा मनोरा बांधून त्यावर दिवसेनदिवस निरिक्षण करत बसून सुगरणीचा संपूर्ण जीवनपट त्यांनी उलगडला.

नर साधारण अर्धवट घरटे तयार करून मादीला इंस्पेक्शनला बोलावतो. ते घरटं सिलेक्ट झालं तर मग ते पूर्ण होतं.... म्हणूनच अर्धवट विणलेली कित्येक घरटी सुगरणी वसाहत करतात अश्या झाडांखाली सापडतात. एकदा का घरटं निवडून झालं की मग ते नर पूर करतो.... मादी त्यात अंडी घालते. पिल्लांना जन्म देऊन वाढवण्याची पूर्ण जबाबदारी मादीची..... आणि नर पुढचं घरटं बांधून दुसर्‍या मादीबरोबर घरोबा करायला मोकळा.... :स्मित

मस्त माहिती. मी डबलडेकर खोपेही बघितलेत.

बेलापुरला एका ताडगोळयच्या झाडाला आधी खोपे बांधले जात. त्याच झाडाच्या पानांचे लांब हिरवेगार दोरे काढुन पक्षी एकदम हिरवीगार घरे बनवत.

साधना डबलडेकर खोपे असतात त्यात वरच्या भागात आणलेलं खाणं साठवतात पिल्लासाठी आणि खालच्या भागात पिल्ले असतात. Happy

शोभा हे उरणचेच आहेत. मी जिथे कामाला जाते त्या रस्त्यात आहेत. रानफुलांच्या शोधात गेले होते तेंव्हा हे फोटो काढले.

गार्गि, शैलजा धन्यवाद.

दिनेशदांना अनुमोदन. ही घरटी शक्यतो ताड, नारळ बाभळीवर करतात. आमच्या ऑफिसच्या परीसरात फिशटेलच्या झाडावर केली आहेत ही घरती. आमच्या वाडीत नारळावर करतात. ताडावरही बरीच पाहीली आहेत. वरची फोटोतली बाभळीवरची आहेत.

भुंगा ते सलिम अलींचे लिखाण कुठे वाचता येईल ?

साधना मी पण पाहीली आहेत डबल डेकर घरटी.

भुंग्या, तुला बरे आत डोकावायला मिळाले.... Happy

माझ्याकडे वापरुन फेकलेले ४-५ खोपे आहेत. आताच्या खोप्यांमध्ये मी पाहिले नाही काय आहे ते पण ब-याच वर्षांपुर्वी एक होता त्याच्यावर मी बरेच संशोधन केले होते. त्याच्या आत दोन खोल्या होत्या. आणि दोन खोल्यांमधली भिंत इतकी मजबुत होती की मी हाताने प्रयत्न करुनही मला ती तोडणे सोडाच, साधी विस्कळीतही करता आली नाही.

जागु, अप्रतिम!
<<<एका सुगरणीने दुसर्या सुगरणीचे प्रचि काढले आ<<<>>> ईनमिनतीन भन्नाट उपमा!

सुंदर आहेत फोटो.

आमच्या शेतावर विहिरीत बघितले होते असे खोपे. बरेच असायचे. विहिरीत मुळे जाउन फुटलेल्या फांद्यांना लटकलेले असायचे.

मस्त.
सुगरणीला घरटे बांधताना पाहन्याच्या सुखद आठ्वणी जाग्या झाल्या. Happy

सुगरण सुरक्शेसाठी शक्यतो पाण्याच्यावर घरटे बनवते.
सुगरण गोल भागात कापसाचा बेड बनवते,आत जायच्या नळीत वरच्या भागात चिकणमातीने काजवा चिटकवून प्रकाशयोजना करते. असे पिलासाठी मस्त झुल्याचे घर बनवते. Happy

Pages