एक अप्रतीम गझल मुशायरा - जळगाव - वृत्तांत

Submitted by बेफ़िकीर on 7 November, 2011 - 04:17

==================================
महाराष्ट्रातला तो कोपरा भिजला सरींमध्ये
कधी बरसात गझलांची कधी बरसात टाळ्यांची

गुणी, संयत, नेमकेपणाची आस असलेले आणि मराठी गझलेत मराठीच परंतु अनोख्या सुगंधाचे नावीन्यपूर्ण खयाल आणून जुन्या कलंदरांना स्तिमित करणारे गझलकार डॉ. ज्ञानेश पाटील यांनी आपल्या गावाला, म्हणजे धरणगांव, जिल्हा जळगाव येथे मुशायरा आयोजीत केला होता. शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी साडे सातला असलेल्या या मुशायर्‍यामध्ये गझलसम्राट सुरेश भटांचे चिरंजीव व स्वतः अत्यंत उत्तम गझलकार असलेले श्री. चित्तरंजन भट, जुने गझलकार श्री. शिवाजी जवरे, स्वतः डॉ. ज्ञानेश पाटील, अस्मादिक, डॉ. कैलास गायकवाड व सौ. सुप्रिया जाधव यांचा सहभाग होता. या अप्रतीम मुशायर्‍याचा हा वृत्तांत देताना अठ्ठेचाळीस तासांनंतरही मन गझलेच्या त्या नशेने अजूनही झिंगलेलेच आहे.

-'बेफिकीर'!

===================================

मी व श्री. अजय जोशी आयोजीत करत असलेल्या गझल सहयोगच्या मुशायर्‍यांमध्ये ज्ञानेश यांनी मागे एकदा सहभाग घेतल्यापासून ते मधून मधून विचारत होते की जळगावला असा मुशायरा करायचा का? अर्थातच 'गझलेसाठी काहीही' या सदरात मोडणारे अनेक शायर आंतरजालावर असल्याने व जवळचे मित्र असल्याने हे सहज शक्य होईल असे मीही त्यांना सांगितले. त्यातच गेल्या आठवड्यात चित्तरंजन काही कामासाठी जळगावला तीन दिवस वास्तव्य करणार असल्याने ज्ञानेश यांच्यादृष्टीने तो कालावधी मुशायरा आयोजीत करण्यास अत्यंत उपयुक्त होताच. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ज्ञानेश, मी, कैलास, चित्तरंजन, अनंत च्या, कणखर व वैभव देशमुख या सर्वांच्या भ्रमणध्वनींवर पहिल्या दहा कॉल्समध्ये व पहिल्या दहा एसेमेसमध्ये एकमेकांची नांवे कधी नव्हे इतक्या वारंवारतेने दिसायला लागली.

उपलब्धता व धरणगाव पुणे हे अंतर व त्यामुळे लागणारा वेळ या दोन्हींचा विचार करता करता 'शेवटी नक्की जाणार' अशा शायरांची यादी कधी ठरली असेल?

तर शुक्रवारी रात्री पावणे दोन वाजता!

शुक्रवारी रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी वैभव देशमुखांचा एसेमेस आला की ते येऊ शकत नाहीत. तोवर कणखर व अनंत ढवळे यांचेही येणे रद्द झालेले होते.

सुप्रिया जाधव यांचे येणे कधी ठरले तर शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता!

नक्की काय होणार याची कल्पनाच येत नव्हती. ऑफीसच्या कामामुळे चित्तरंजन भट मात्र शुक्रवारी सकाळीच जळगावला पोचून तिकडून फोन करत होते की तुम्ही येताय की नाही?

शेवटी शुक्रवारी रात्री डॉ. कैलास गायकवाड या अतीनम्र, मिश्कील व अभ्यासू गझलकाराचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून काही पैशांच्या मोबदल्यात मिळालेल्या एका आसनावरून पुण्यनगरीच्या शिवाजीनगर या स्थानकावर आगमन झाले तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजलेले होते.

माझ्या मेहुण्याच्या पुण्यातील घराची वास्तूशांत शनिवारीच असतानाही मी मुशायर्‍याला पार जळगावच्याही पुढे चाललेलो आहे यावरून झालेले वाद मिटवून आणि त्यावरचे जालीम औषध प्राशन करून मी नवी मुंबईच्या या वैद्याचे स्वागत केले व त्यांनी वहिनींना फोन लावून तो सरळ माझ्याकडे दिला. मला साधारण कल्पना होतीच की माझ्याकडच्याप्रमाणेच त्यांच्याहीकडे काहीसे गझल-मतभेद झालेले असणार! त्यामुळे मी कैलासरावांचे गझलप्रसारासाठी चाललेले अथक परिश्रम, त्यांची स्वतःची गझल, या क्षेत्रात त्यांची असलेली वादातीत प्रतिमा व त्यांच्या बोलण्यात वारंवार येणारा सौंचा उल्लेख अशी काही 'नेहमीची यशस्वी' औषधे वापरून वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या या दांपत्याचे एकमेकांशी तात्पुरते मनोमीलन करून दाखवले.

कैलास यांचे भोजन घरीच झालेले असल्याने चहा प्यायला आम्ही मंडईत गेलो व तेथे अर्धा तास गझल-कुजबूज झाली. तेथून आमच्या घरी पोचलो तेथेही अर्धा तास गझल-कुजबूज करून झोपलो. हे लिहिण्याचे प्रमुख कारण म्हणजे पुणेकरांकडे स्वागत होत नाही असे नाही हे दाखवणे हे सूज्ञांच्या लक्षात आले असेलच! कैलास यांचे भोजन घरीच का झालेले असावे हे मात्र लक्षात आले नाही.

दोन वाजता झोपून पावणे पाचला उठून आम्ही दोघे सहा सव्वा सहापर्यंत तयारही झालो, तोवर सौ. सुप्रिया जाधव यांचे आगमन झाले.

नव्यानेच गझल लिहू लागलेल्या असल्याने सुप्रिया मला व कैलास यांना देत असलेली 'दिग्गज' ही पोझिशन आम्ही कटाक्षाने पुण्यात परतेपर्यंत तशीच मेन्टेन करण्यात यश मिळवलेच.

कारण शेवटी आपण म्हणजे काय? तर....

मला जसा वाटतो तसा मी मुळीच नसतो
जगास मी वाटतो जसा मी तसा खरा तर

साडे सहा वाजता प्रवीण या युवक चालकाच्या इंडिकातून महाराष्ट्रातील तीन महान गझलकार जळगावच्या वाटेला लागले. सुरुवातीला एकमेकांच्या गझलांबाबत प्रचंड आदर व्यक्त केला गेला कारण जवळपास दोन दिवस एकत्र काढायचे होते. त्यामुळे वाद विवाद न झालेले बरे हे 'गझलकार असूनही' प्रत्येकाला पटलेले होते. थोड्या वेळाने अर्थातच जिव्हाळ्याचा म्हणजे मायबोलीचा विषय निघाला तो तोंडाचे स्नायू दमून नकार देईपर्यंत चालूच राहिला. सरदवाडीला मिसळ, चहा घेऊन 'केवढे चालणे हे मजल दरमजल, कोण जाणे कुणी आखली ही सहल' असे म्हणत आम्ही ज्ञानेश खानदेशात असल्याचा राग व्यक्त करत निघालेलो होतो. त्यातल्या त्यात या तिघांमध्ये मी जुना गझलकार असल्याने मला गझलेतले सर्व काही समजते हे मलाच काय तर 'प्रवीणलाही' मान्य झालेले होते.

कैलासराव अचानक गाऊ लागल्यावर मी शेजारी बसूनच त्यांचा एक फोटो काढला. मग गाणी सुरू झाली.

बशर नवाझ साहेब यांची भेटः

औरंगाबादला प्रवेश करतानाच ठरले की बशर साहेबांची भेट घेऊन मग पुढे जावे. हे 'बशर साहेब' कोण हे सुप्रियांना माहीत नव्हते. मग बशर साहेबांची सर्व महती मी कथन केल्यावर त्यांनाही उत्सुकता वाटू लागली. बशर साहेब जळगावच्याच वाटेवर राहात असल्याने आम्हाला 'वाट वाकडी' करावी लागली नसली तरी मुळातच आम्ही वाकडी वाट धरलेली आहे असे तिघांच्याही घरच्यांचे मत होतेच!

बशर साहेबांना प्रणाम करून आम्ही त्यांचे विचार ऐकले. हे म्हणजे अगदी शालेय विद्यार्थ्याने सहलीचा वृत्तांत लिहावा असे वाचकांना वाटत असले तरी कृपया लक्षात घ्यावेत की बशर नवाझ हे एक थोर व्यक्तीमत्व आहे गझलेतील व समीक्षेतीलही! शिक्षण न घेताही औरंगाबाद विद्यापीठाने त्यांना आयुष्यभर सन्माननीय प्राध्यापक या जागेवर ठेवलेले होते. आता ते शहात्तर वर्षांचे आहेत. करोगे याद तो ही त्यांची गझल बाजार या चित्रपटात आहे. गुलाम अलींनी त्यांच्या दोन गझला गायलेल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांबरोबरच गालिब अ‍ॅकॅडमीचाही पुरस्कार आहे व पद्मश्रीसाठी नामांकन झालेले आहे. हे झाले त्यांच्या अ‍ॅचिव्हमेन्ट्सबाबत! पण त्यांचा 'करोगे याद तो' हा देवनागरीत असलेला एक गझलसंग्रह वाचला तरी त्यांच्या काव्याचा थोर दर्जा वाचकाला समजू शकतो.

बशर साहेबांनी तिघांच्याही दोन दोन गझला ऐकल्या. कला व कारागिरी यांचा गझलेत जो संगम होतो त्याबाबत त्यांनी काही मौलिक विचार ऐकवले. सुप्रिया व कैलासराव यांच्या गझलांना त्यांनी मोठी दाद दिली. त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.

आता जळगावहून येणार्‍या फोनकॉल्सचे प्रमाण वाढू लागले. अजिंठापाशी कोठेतरी आम्ही खानदेशातील सुप्रसिद्ध शेवभाजी खाल्ली व दमलो असलो तरी दुप्पट उत्साहाने जळगावकडे निघालो.

ज्ञानेश यांनी आमचे बुकिंग कोझी कॉटेज येथे केलेले होते. तेथे पोचलो तेव्हा आम्ही पुरते दमलेलो होतो. मात्र लगेच तयार होऊन निघायचे होते.

अर्ध्याच तासात ज्ञानेश हे चित्तरंजन व शिवाजी जवरेंना घेऊन प्रकट झाले. हस्तांदोलने व परिचय (फक्त शिवाजी जवरेंशी, बाकीचे आधीच एकमेकांना परिचित होतेच - खरे तर अती परिचीत म्हंटले तरी चालेल - दिवा) झाल्यावर दोन गाड्या धरणगावच्या दिशेने निघाल्या.

या प्रवासात सुप्रिया जाधव यांच्या फायनल चार गझला कोणत्या व्हाव्यात हे तिघानुमते ठरले.

धरणगाव हे अत्यंत लोभस गाव आहे. शहर व गाव यांचा अतिशय सुंदर संगम तेथे झालेला दिसतो. प्रत्येक स्वतंत्र घराबाहेर तुळशी वृंदावन आहे. जुन्या प्रकारचे बांधकाम असूनही सर्व सोयी सुविधा व्यवस्थित आहेत. वळणावर एक ठिकाणी तिन्हीसांजेच्या गूढ वेळेला काही ज्येष्ठ कागरीक आयुष्याच्या तिन्हीसांजेला आनंदी करत गप्पा मारत बसलेले पाहून मी, सुप्रिया व कैलासराव या तिघांनाही खूप काही वाटले. असे दृष्य सहसा काय, दिसतच नाही हल्ली शहरात! धरणगाव हे मोठेही आहेच.

ज्ञानेश पाटील यांचे घरः

ज्ञानेशचे घर अत्यंत लोभस आहे. तेथेही तुळशी वृंदावन, अंगण, ओसरी सर्व काही आहे. दुमजली अशा या घराची प्रत्येक खोली भरपूर मोठी असून त्यापेक्षा घरातील लोकांची मने मोठी आहेत. धाकटा भाऊ सागर, आई व वडील हे अत्यंत अगत्याने बोलत होते. तेथे आम्हाला जो अल्पोपहार मिळाला त्याची चव रेंगाळते आहे. आजूबाजूचे काही जाणकार रसिकही तेथे जमलेले होते. मला ज्ञानेशचे घर अतिशय आवडले व मी ज्ञानेश यांना विनंती करून संपूर्ण घर पाहून आलो. वर एक टेरेस आहे ज्यावर बसल्यावर ज्ञानेश करतात तशा गझला का होणार नाहीत असे सहजच मनात आले.

येथून आम्ही सारे वाचनालयाच्या हॉलमध्ये गेलो तेव्हा अनेक रसिक प्रतीक्षा करत होते हे पाहून वाईट वाटले. कवीने कधीही रसिकाला प्रतीक्षा करायला लावू नये. कवीने रसिकाची प्रतीक्षा करावी. कारण रसिक मनाने मोठा असतो की कवीची कविता ऐकून वाहवा म्हणतो. एकंदर आम्हाला झालेला उशीर पाहून मी तरी मनात ठरवले की सहज, सुलभ व भिडणार्‍या रचना तेवढ्या सादर करायच्या आणि रसिकांना शक्य तितका आनंद द्यायचाच!

रसिकांना परिचयः

डॉ. ज्ञानेश हे त्या गावातील हिरो आहेत. त्यांच्या आगमनाने सगळेच उत्सुकतेने पाहू लागले. ज्ञानेश यांनी आम्हा कवींचा परिचय करून दिला. छायाचित्रात (जी बहुतेक कैलासराव देतील, खाली प्रतिसादांमध्ये) वाचकांना दिसेल की मी व्यासपीठाशेजारी एकटा बसलो आहे, त्याचे कारण आधीच सांगतो की मला अपघातानंतर मांडी घालून बसता येत नाही.

ज्ञानेश, शिवाजी जवरे, चित्तरंजन, कैलास गायकवाड, सुप्रिया जाधव व बेफिकीर अशा क्रमाने आम्ही सगळे बसलो.

मुशायरा:

चित्तरंजन, जवरे, ज्ञानेश, बेफिकीर, कैलास, सुप्रिया असा क्रम असलेला हा चक्री मुशायरा एकेका शेराने, एकेका गझलेने व एकेका फेरीने केवळ चढतच गेला. थांबूच नये असे वाटणारे मुशायरे मी आजवर जितके काही पाहिले आहेत त्यात या मुशायर्‍याचे स्थान बरेच वर आहे.

एक उदासी खोलीभर दरवळत राहते जणू
रक्तामध्ये दु:ख तुझे विरघळत राहते जणू

ज्ञानेश यांच्या या गझलेला प्रचंड दाद मिळाली.

मुळातच रसिक अतिशय रसिक होते. त्यातच बहुधा त्या ठिकाणी झालेला हा पहिलाच 'मराठी गझल मुशायरा' असावा. त्यातच ज्ञानेश यांचे ते होम ग्राऊंड! 'सुनता नही हूं बात मुकर्रर कहे बगैर' अशा मुडमधले रसिक ज्ञानेश यांना अनेकदा 'वन्स मोर' देत होते. शेवटी वन्स मोर चे 'मेनी अ टाईम्स मोर' होऊ लागले.

प्रथम मॉबबद्दल!

रसिकांमध्ये अनेक जण शिक्षण क्षेत्राशी संबंधीत असे ज्येष्ठ सदस्य होते. मुळात ज्ञानेश यांचे तीर्थरूपही प्राध्यापकच आहेत. तसेच रसिकांमध्ये अनेक युवा वयाचे रसिक होते. गझलेची जादू या वयोगटाला सर्वाधिक भावते हा अनुभव आहेच. या मॉबने दिलेला प्रतिसाद मुशायरा रंगवण्यास सर्वाधिक कारणीभूत होता असे म्हणायलाही काहीच हरकत नाही. काही महिला रसिकही एकीकडे बसून मुशायर्‍याचा आनंद लुटत होते. असा मॉब मिळणे हेही भाग्यच म्हणायचे कवींचे!

ज्ञानेश पाटील -

संयत सादरीकरण, पंचिंग मुद्दे आणि गझलीयत यांचा संगम असलेल्या या गझलकाराने श्रोत्यांची मने जिंकलीच.

भळभळताना जाणवले की रुतले होते टोक किती
जगण्याच्या माथ्यावर पडली तू नसल्याची खोक किती

या गझलेतील खालील शेर रसिकांनी डोक्यावर घेतला.

यंदाच्या जनगणनेमध्ये हे पण मोजुन टाका की
किती अडाणी लोक शहाणे.... शिकलेले बिनडोक किती

कोणताही मुद्राभिनय न करता केवळ अणि केवळ अर्थ पोचवणार्‍या ज्ञानेश यांना इतरत्रही असाच आणि इतकाच उत्स्फुर्त जल्लोषात्मक प्रतिसाद मिळतो हे मी स्वतः अनुभवलेले आहे.

इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते
नक्की रात्री तेथे कोणी रडले होते

या त्यांच्या गझलेतील शेवटचा पेनाचा शेर सर्वांना प्रचंड आवडला.

शिवाजी जवरे:

शिवाजी जवरे हे जळगाव - भुसावळ या मार्गावर असलेल्या दीपनगर येथे स्थायिक असून मराठी गझल रचण्याव्यतिरिक्त ते उर्दू व फारसी या भाषांचे अभ्यासकही आहेत. त्यांचे अनेक गझल संग्रह प्रकाशित झालेले असून अनेक मुशायरेही त्यांनी भूषवलेले आहेत. त्यांनी त्यांच्या चारपैकी एक गझल तरन्नुममध्ये सादर केली. (गाऊन सादर केली). शिवाजी जवरे यांच्या गझलेत समाज व ग्रामीण जीवन, तसेच शब्दांवरचे प्रभुत्व व नावीन्यपूर्ण खयाल दिसतात. रसिकांनी त्यांना उदंड प्रतिसाद दिलाच.

चित्तरंजन भटः

गझलसम्राट कै. सुरेश भटांचे चिरंजीव चित्तरंजन लौकीकास साजेश्याच गझल रचतात. या मुशायर्‍याचे प्रमुख आकर्षण असलेल्या चित्तरंजन यांच्या गझलेला तितकीच उत्तम दाद मिळाली.

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास... वाटले बरे किती

तूच सांग आजकाल चालले कसे तुझे
चार शब्द बोललीस... वाटले बरे किती

हे त्यांचे शेर मोठी दाद मिळवून गेलेच.

पण दिसू लागले स्पष्ट जेवढे ही संपूर्ण गझलच रसिकांनी डोक्यावर घेतली.

या गझलेतील काही शेर येथे देत आहे.

कणा वाकल्यावर तो शिकला विनायास कोलांट्या घेणे
आधी तो माणूसच होता, त्याचे माकड नंतर झाले

फूल, पाकळ्या, कळ्या, ऋतू, दवबिंदू, तारे, चंद्र वगैरे...
खूप पाहिली वाट तुझी मी, खूप खूप विषयांतर झाले

चुकली माझी वाट म्हणूनच मला मिळाले स्थान आपले
जोवर होता मार्ग बरोबर तोवर हाल भयंकर झाले

कधी अचानक फूल उमलले, कुठे विजेची रेघ उमटली
माझ्या साध्या ओळीचेही कसे कसे भाषांतर झाले

जुन्या घराच्या अंगणातल्या कडुनिंबाला म्हणेल वारा,
"तिथे तरी तो कुठे राहतो ज्या गावी त्याचे घर झाले"

तुला पाहिले आणि एकटक, एकसारखा बघत राहिलो
बघता-बघता माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर झाले !

चित्त अतिशय वेगळे सादरीकरण करतात. सादरीकरण करताना जणू ती गझल ते पुन्हा जगतात.

त्यांची 'बोलण्याने बोलणे वाढेल आता' ही गझलही मनमुराद दाद मिळवून गेली.

कैलास गायकवाडः

कैलास यांनी एकंदर मूड बघून रचना सादर केल्या. तंबाखू ही त्यांची हझल टाळ्यांच्या कडकडाटातच पार पडली. चेहर्‍यावर काहीसे लाजरे हसू, डोळ्यात मिश्कील भाव असा मुद्राभिनय असलेले त्यांचे सादरीकरण श्रोत्यांना क्षणोक्षणी मनस्थिती पालटायला भाग पाडते हे त्यांच्या गझलेचे यश!

अताशा शब्दही माझा जगाला वाटतो फतवा
मला तर हात जोडूनी तुला विनवायचे होते

दिशेला कोणत्या जावे?,सवालच राहिला नाही
तुझ्या गंधाळल्या वार्‍याकडे सरकायचे होते

हे त्यांचे शेर रसिकांना अतिशय आवडल्याची पावती मिळाली.

लाख फाडशील पत्र्,खोडशील ओळही
आठवेल तोच शब्द्,आठवेल ''अवतरण''

वाचलेस पत्र वापरुन चाळिशी जरी
मी कसा दिसेन जर तपासशील व्याकरण?

वीज्,नोकरी,निवास्,रोजगार्,भाकरी
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण

हे त्यांचे शेर तितकेच आवडले असले तरी खालचा शेर मात्र 'हॉल' दुमदुमवून गेला.

दाद वाहवा मिळे सुमार शायरीसही
आपलेच लोक आपलेच सादरीकरण.

सुप्रिया जाधवः

यांचा हा बहुधा पहिलाच 'सिरियस मुशायरा' असावा. मात्र तसे मुळीच वाटले नाही. व्यासपीठावरील सहज वावर, एक स्त्री असूनही आत्मविश्वासाने इतक्या सर्वांमध्ये आपले शेर सादर करणे याच बरोबर शेरांच्या आशयाने वाहवा मिळवणे हे त्यांनी अगदी सहज करून दाखवले. प्रवासात वा वास्तव्यात किंचितही अवघडलेपण न दाखवता अत्यंत तन्मयतेने केवळ आणि केवळ गझलेवर चर्चा केली सुप्रिया यांनी! रसिकांनी सुप्रिया यांच्या गझलेतील आशयाच्या प्रामाणिकतेला प्रामाणिक दाद दिली.

सावलीचा दिलासा रवीला कुठे? रोजचे चालणे एकटे एकटे...
सोबतीचा भरवसा न धरता तसा शीक तू राहणे एकटे एकटे

श्वास येतो तसा श्वास जातो पुन्हा, या क्रियेने खरी चालते जिंदगी ...
दु:ख येते सुखा मागुती मागुती, सौख्य ना लाभणे एकटे एकटे

गाव उध्वस्त करते त्सुनामी जरी, वादळाची दिशा आज ठरवून घे....
भीक घालू नको संकटांना ’प्रिया’, सोड खंतावणे एकटे एकटे

'सोड खंतावणे एकटे एकटे'! वा वा!

सुप्रिया यांच्या या गझलेला तितकीच सुंदर व जाणकार दाद मिळाली. सुप्रियांमुळे व्यासपीठाला आलेली झालर काही वेगळीच होती.

निष्प्राण देह झाला, आत्म्यास त्रास अजुनी !
हा कोणत्या दिशेचा, आहे प्रवास अजुनी ?

माझा स्वभाव मजला समजायचाच आहे
आयुष्य संपलेले करते प्रयास अजुनी !

सर्वस्व वाहिल्यावर निर्माल्य का ठरावे ?
कोमेजल्या फुलांना पुसतो सुवास अजुनी !

दु:खा लुटून यंदा, दसरा तसाच गेला.....
ना तोरणे सुखाची माझ्या घरास अजुनी !

'तरही उपक्रमासाठी' त्यांनी रचलेली ही गझल सभागृहात फारच भाव खाऊन गेली. काहीसे सलज्ज सादरीकरण आणि प्रामाणिक आशय यांचे सुप्रिया यांनी सादर केलेले मिश्रण किंवा रसायन स्वतःची वेगळी जागा निर्माण करून गेले.

मुशायर्‍यात धरणगाव येथेच स्थायिक असलेल्या शिक्षण क्षेत्रातील एक ज्येष्ठ अधिकारी असलेल्या एका गृहस्थांनी गझलसदृष रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. या मुशायर्‍यात मलाही काही गझला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो.

मुशायर्‍यानंतर सर्वच कवींना रसिकांनी घातलेला गराडा अजूनही डोळ्यासामोर आहे. एक अतिशय ज्येष्ठ गृहस्थ चित्त यांना भेटून गेले. त्यांनी अनेक थोरामोठ्यांच्या सह्या जमवलेल्या होत्या व १२ नोव्हेंबर १९८८ रोजी मिळवलेली कै. सुरेश भटांची सही त्यांनी चित्तरंजन यांना दाखवली. आनंदलेल्या चित्तरंजन यांनी स्वतःही एक स्तुतीपर मजकूर लिहून व त्यावर सही करून तो कागद आजोबांना दिला. त्यानंतर चहापान झाले. सर्वजण मुशायर्‍याने आनंदलेले दिसत होते.

सलग दुसरा व फक्त कवींचा मुशायरा:

सुप्रिया जाधव यांना हॉटेलवर सोडून ज्ञानेश, त्यांचे एक सहकारी डॉक्टर मित्र, कैलास, मी, चित्तरंजन व शिवाजी जवरे हॉटेल सायली या मोकळे अंगण असलेल्या हॉटेलवर जेवायला गेलो. तेथे खरे तर एक दुसरा मुशायराच झाला. तोही अतिशय आनंददायी होता. ज्ञानेश पाटील यांची गझलेतील भाषा ही टांकसाळी मराठी आहे असे गौरवोद्गार श्री. चित्तरंजन यांनी काढले. तसेच गझलेशी व गझलेच्या प्रसाराबाबत कार्यरत असलेल्या इतरही काही जणांबाबत त्यांनी प्रशंसोद्गार काढले.

दुसरा दिवसः

आदल्या दिवशी गझलेच्या गप्पा मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चालल्यामुळे अर्थातच दुसर्‍या दिवशीचे ठरवलेले वेळापत्रक कोलमडले. सकाळी आठ वाजता आम्ही निघणार होतो ते साडे दहाला निघालो. त्यातही तासभर पुन्हा हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये गझलेवर सकाळी सकाळी चर्चा झाली. साडे दहाला जळगावला सुरू झालेला प्रवास रात्री पावणे आठला पुण्यात संपला तर कैलासरावांसाठी बहुधा अकराच्या आसपास मुंबईत संपला असावा.

मायबोलीकर गझलकार शाम यांची भेटः

प्रवास संपता संपता आम्हाला आणखीन एक सुखद शिडकावा झेलता आला. अहमदनगरमधील पारनेर येथे राहणारे मायबोलीकर गझलकार शाम हे खास नगर शहरात आम्हाला भेटायला आले. त्यांच्या समवेत जेवताना आम्ही शाम यांची कहाणी ऐकली. थक्क झालो आम्ही त्यांची कहाणी ऐकून! आजूबाजूच्या दहा किलोमीटरमध्ये एकही जण लिहू वाचू शकत नाही. अशा ठिकाणी असलेल्या एका डोंगराच्या मधोमध असलेल्या एका शाळेत ते शिक्षक आहेत. नेटाने किल्ला लढवत ते अनेक दलित विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. ही शासकीय नोकरी नक्कीच गलेलठ्ठ पगाराची नाही, पण त्यात शाम यांच्यातील सहृदयी माणूस समाधानीच आहे असे नाही, तर झुंजायला तयारही आहे. शासनाकडून मदत मिळत असली तरीही ती तुटपुंजीच पडते. चेहर्‍यावर दिलखुलास हास्य विलसत असले तरी शाम यांच्या आयुष्यात लढायांची चळत आहे. कौटुंबिक आयुष्यात एका मोठ्या दु:खाला ते सामोरे जात आहेत. मोठ्या मुलाची, जो सहा वर्षांचा आहे, त्याची काहीशी ट्रीटमेन्ट बरेच दिवस चालू आहे. डॉ. कैलास यांनी शाम यांना खूप काही मदत देण्याची आश्वासने तर दिलेली आहेत्च, पण त्यांच्या लौकीकाप्रमाणे ते ती मदत निश्चीत करतीलच! शाम यांनी मागे कॅनडा येथील एका 'तिसर्‍या जगातील गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत देणाया' संस्थेशी बोलून स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी तीस किट्स मिळवली. यात रेनकोट, टोपी, स्वेटर, अभ्यासाचे सर्व साहित्य, दप्तर, कपड्यांचे सेट्स अशा अनेक गोष्टी होत्या. मुंबई आणि पुण्याला जाऊन ते शाळेच्या विकासासाठी अनेक प्रयत्न करत असतात. त्यांना एक लहान मुलगाही असून त्यांच्या सौ. गृहिणी आहेत. अत्यंत प्रतीकूल परिस्थितीत शाम मायबोलीवरही नित्यनेमाने सहभागी होतात. दहा दहा तास भारनियमन असलेल्या ठिकाणी शाम झगडत झगडत शिक्षणही देतात आणि कवीत्वही प्रकाशित करतात.

हा लेख लिहिताना शाम यांचा उल्लेख राहिला हे माझ्याकडून घडलेले पातक मोठे आहे. खरे तर ऑफिसच्या कामामुळे मी घाईघाईत लेख संपवला त्यामुळे असे झाले.

मी शाम यांच्यासाठी मायबोलीकरांनी आणि प्रशासकांनी कौतुकाचे दोन शब्द बोलावेत अशी विनंती करतो. प्रशासकांनी यासाठी, की अत्यंत उत्कृष्ट गझला रचणारा हा युवा गझलकार एका अतिशय प्रतीकूल परिस्थितीवर मात करून मायबोलीकरांना आपल्या काव्याची दखल घ्यायला भाग पाडत आहे.

शाम यांच्यासाठी जोरदार टाळ्या!

छायाचित्रे कोण देणार हे मला माहीत नाही. एका अविस्मरणीय मुशायर्‍याचे आयोजन करणार्‍या डॉ. ज्ञानेश पाटील यांचे मनापासून आभार व त्यांची गझल 'चौदहवी का चाँद' प्रमाणे अधिकाधिक सुंदर होत राहो ही प्रार्थना!

काही उल्लेख राहिलेले असल्यास ते माझ्या विस्मृतीचे पातक!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

बेफीजी मस्तच..
पण माझी एक तक्रार आहे
जर तुम्हाला हे व्रतांत लिहायला वेळ असतो तर
आपल्या गटगचे व्रतांत का लिहीत नाहीत Happy

छोट्या छोट्या विनोदांची बहार आणि मुशायर्‍याचा प्रवास सरूप पोहचला,,,,,,,,

आपल्या सर्वांची गझल अशीच मोठी होत राहो ह्याच सदिच्छा!!!

Happy
...............................................................................................................................

(अवांतर- मीही तुम्हा सगळ्यांना प्रत्यक्ष भेटल्याच्या त्या क्षणाच्या धुंदीत आहे!!)

वाह...बेफि..
तुमच्या या मुशायर्‍याच्या निमीत्ताने एका ग्रेट माबोकराची महती कळली. शामराव... तुम्हाला वाकुन मानाचा मुजरा !

अरे छोडो यार...........!

दुनियामें कितना गम है
मेरा गम कितना कम है... Happy

इतक्या तातडीने जळगावच्या मुशायर्‍याचा वृत्तांत उपलब्ध करून दिल्याबद्दल भूषणरावांचे मनापासून आभार मानतो. Happy

केवळ एका आठवड्यात- हा कार्यक्रम करण्याची संकल्पना जन्माला येण्यापासून, ते माबोवर त्याचा वृत्तांत प्रकाशित होण्यापर्यंत, सर्व काही घडले आहे. हे सर्व इतके वेगात आणि तरीही इतके देखणे घडले, की अजूनही विश्वास बसत नाही.

चित्तरंजन त्यांच्या काही कामानिमित्त जळगावात तीन दिवस येणार असल्याचे कळले, आणि माझ्या मनात ही कल्पना आली. अगदी हक्काचे आणि जवळचे गझलकार म्हणून मी सर्वात आधी बेफिकीर आणि कैलास यांना फोन लावले. अपेक्षेप्रमाणे त्यांनी निराश केले नाही. यानंतर श्री. अनंत ढवळे, वैभव देशमुख, विजय पाटील (कणखर)- यांनाही फोन गेले, पण काही अडचणींमुळे तिघांनाही येता आले नाही. शिवाजी जवरे हे ज्येष्ठ गझलकार जळगाव जिल्ह्यातलेच असल्यामुळे, त्यांनी आनंदाने आमंत्रण स्वीकारले. अगदी शेवटच्या क्षणी सुप्रिया जाधव या नव्या दमाच्या शायर मुशायर्‍यात सहभागी झाल्या !

या सर्व लोकांच्याप्रती मी अत्यंत कृतज्ञ आहे. केवळ एक फोन कॉल- एवढ्या भांडवलावर हे लोक चार-पाचशे किलोमीटर अंतरावरून धरणगावसारख्या आडवळणावरच्या गावात (स्वखर्चाने !) धावत येतात आणि मुशायर्‍यात रंग भरतात यावरून त्यांचे गझलेवर किती उत्कट प्रेम आहे हे दिसून येते. तसाच दिसून येतो तो यांचा माझ्यावरचा प्रगाढ स्नेह ! हे गझलेने जोडलेले बंध आहेत. या विशुद्ध मैत्रीला अन्य कसलेही कारण नाही. मुशायर्‍यात मंचावर बसलेले सहाही लोक- व्यवसाय, गाव, वय, शिक्षण... कुठल्याच बाबतीत एकसारखे नव्हते. केवळ गझलेचा (आणि मायबोलीचा) धागा सर्वांना एकमेकांशी जोडणारा होता.

मित्रांचे औपचारिक आभार मानत नसतात. पण या सर्वांचा ऋणनिर्देश केला नाही तर मला चुकल्यासारखे वाटेल. Happy

------------------------------

मुशायर्‍याबद्दल-

माझे धरणगाव हे जळगावपासून ३० किमीवर असलेले तालुकाप्लेस गाव. काव्याशी संबंध सांगायचाच झाला तर बालकवी ठोंबरे यांचे जन्मगाव ! मात्र या गावात आजवर एकही मराठी गझल मुशायरा झाला नव्हता. परवाच्या कार्यक्रमाने ही उणीव संपली. मुशायरा अपेक्षेबाहेर रंगला ! गेले दोन दिवस अनेक रसिकांचे फोन येत आहेत. या सगळ्याचे श्रेय मी वरील सर्व गझलकारांना देईन.
बाकी वृत्तांत वर भूषणरावांनी दिलेला आहेच, त्यामुळे पुनरुक्ती करत नाही. त्यांच्या वृत्तांतात असलेली मोठीच त्रुटी म्हणजे त्यांनी स्वतःच्या गझलांबद्दल काहीच लिहिले नाही. चित्त यांच्यानंतर सर्वात जास्त दाद त्यांनाच मिळाली. फोनवरही अनेकांनी त्यांची चौकशी केली आहे. बेफिकीर यांना परत एकदा धरणगावी यावे लागेल, अशी चिन्हे मला दिसत आहेत. Wink

भूषणरावांच्या या शेरांनी सर्वात जास्त दाद घेतली-

"वाट होती, तिथून गेले ते..
वाट झाली, जिथून गेलो मी !

एक रस्ता असून पर्यायी,
काल गावामधून गेलो मी !"

तसेच-

"वाटायचे उडणार नाही, पण उडाला शेवटी
हा पिजरा जाळून पक्षी मुक्त झाला शेवटी.."

याच गझलेतल्या- "काही म्हणा, मुद्दा तिच्या लक्षात आला शेवटी" हा शेर विशेष दाद घेऊन गेला !

त्यांची पहिलीच, प्रदीर्घ वृत्तातली ('प्रदीर्घ' हे वृत्ताचे नाव नाही, विशेषण आहे ;)) गझल- "पालखीत पादुका, जिवंत लोक चालतात..." अनेकांना आवडली. तसेच "शेर गुंफायची प्रेरणा देऊनी एक मिसरा तरी ऐकला पाहिजे" ही सुद्धा ! (मला 'मजल-दरमजल' ही गझल ऐकायची होती, ते मात्र राहिले !)

एकंदर कार्यक्रम बराच रंगला. असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत !

--------------------------------
(फोटोज अद्याप उपलब्ध झाले नाहीत. मला मिळाल्यावर इकडे पोस्ट करण्याची व्यवस्था करतोच !)

अगोदरच माहित होते की उपस्थित न राहू शकल्यामुळे आपण काय गमावणार आहोत.

इतका अप्रतिम मुशायरा ज्याचा आपण भाग होऊ शकलो नाही ह्याची खंत किती असते हे अनुभवतो आहे.

असो, यापुढे कधीतरी तो योग येईलच.

आमंत्रणाबद्दल ज्ञानेशरावांचे आभार, उपस्थित न राहू शकल्याबद्दल दिलगीर.

बेफींची

"शेर गुंफायची प्रेरणा देऊनी एक मिसरा तरी ऐकला पाहिजे"

आणि ज्ञानेशजींची...

"कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा..."

या दोन गझलांना ईतकी अफाट दाद मिळाली....की जणू मुशायराच धन्य झाला.

शतशः आभार मंडळी...

-सुप्रिया.

छान

वृत्तांताबद्दल धन्यवाद बेफी...! आमच्या खान्देशात जाऊन आलात तर! Happy

<<भळभळताना जाणवले की रुतले होते टोक किती
जगण्याच्या माथ्यावर पडली तू नसल्याची खोक किती<<

<<इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते
नक्की रात्री तेथे कोणी रडले होते <<

अ प्र ति म शेर आहेत ज्ञानेशजींचे!
शामरावांच्या जिद्दीला आमचा सलाम!
सुप्रियाजींचीही गझल आवडली. Happy

सर्व दिलदार मायबोलीकरांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद! ह्या धाग्यात बशर साहेबांचा फोटो असल्यामुळे धागा वर आणला.