सुट्टी संपली -

Submitted by विदेश on 31 October, 2011 - 15:32

सुट्टी संपली दिवाळी झाली
घण घण घंटा ऐकायची
दप्तर पाठीवरती टाकुन
तुरू तुरू घाई पळायची !

पाठांतर अभ्यास परीक्षा
वेळच गुंतुन जाण्याची
शुद्ध न राहिल शाळेमध्ये
डबा उघडुनी बघण्याची !

नवीन कपडे खेळ नवे
नीट नेटके जपण्याची
सुट्टीमधली सवय रहावी
रोज पहाटे उठण्याची !

शंकरपाळी चिवडा लाडू
चकली शेव करंजीची
वर्षामधला धमाल सण
आठवण नुसती करायची !

शाळेमधुनी दमून येता
निवांत स्वप्ने पहायची
पुढल्या वर्षी किती फटाके
चक्रे झाडे आणायची ?

गुलमोहर: