स्थविरवादामध्ये पारमितेला ‘पारमि’ असे संबोधले आहे. पूर्णत्व अथवा पूर्णत: असा त्याचा अर्थ होतो. पारमिता हा पाली शब्द आहे. ‘पारम’ म्हणजे दुसरा किनारा व ‘मिता’ म्हणजे जाणे, म्हणजेच दुसर्या किनार्याला जाणे असा त्याचा अर्थ होतो. मुशल कर्माच्या सहाय्याने दुसर्या किनार्यावर जाणे म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रामधून विमुक्त होऊन निब्बाण अर्थात निर्वाण अवस्थेला पोहचणे होय.
पारमिताचा शीलमार्ग अथवा सद्गुणाचा मार्ग असाही अर्थ होतो. ह्या मार्गाने दु:ख दूर होण्यास मदत होते. पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री अशा या दहा गुणांचा अंतर्भाव होतो. बोधीसत्वाला बुध्द होण्यासाठी या पारमिता पार कराव्या लागतात. तेव्हाच बोधीसत्व बुध्द होतात.
१) शील
शील म्हणजे नितिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे व चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी न करणे म्हणजे शील. शील म्हणजे पापकर्म करण्यापासून दुर राहणे. ज्यांचे बोलणे, चालणे नितीला धरुन आहे, त्याला शीलवान म्हटल्या जाते. थोडक्यात शील म्हणजे माणसाच्या मनाची स्थिती ज्यामुळे मनुष्य पापकर्म, अकुशल कर्म करण्यापासून दुर राहतो. पुण्यकर्म, कुशल कर्म संपादीत करतो.
शील हे काचेसारखे असते. एकदा कां त्याला तडा गेला की त्याला जुडविणे कठिन जाते. तसेच शीलाचे आहे. एकदा कां कोणी शील गमावून बसले की त्याला पुन्हा ईज्जत कमाविणे कठिन होऊन बसते.
२) दान
स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या कल्याणासाठी स्वत:ची संपती, रक्त आणि देह अर्पण करणे म्हणजेच दान होय. गरजू आणि गरीब लोकांचे दु:ख नाहिसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक आहे. दानामध्ये नेत्रदान, देहदान, रक्तदान, शरीराच्या अवयवाचे दान याचा सुध्दा अंतर्भाव होतो.
दानाचा अर्थ म्हणजे देणे. उदारता, निर्लोभीपणा, त्याग म्हणजेच दान होय. मनात त्यागाची भावना निर्माण होणे म्हणजेच लोभाची वृती नष्ट होणे होय.
दान केव्हा फलदायक होते याबाबत भगवान बुध्दांनी धम्मपदात तिनशे छप्पन ते तिनशे एकोणसाठ या गाथेत सांगितले की-
तिणदोसानि खेत्तानि रागदोसा अयं पजा ।
तस्मा हि वीतरागेसु दिन्नं होति महफ्फलं ॥
याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष राग आहे, त्यामुळे वीतराग (रागरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.
तिणदोसानि खेत्तानि दोसदोसा अयं पजा ।
तस्मा हि वीतदोसेसु दिन्नं होति महफ्फलं ॥
याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष द्वेष आहे, त्यामुळे वीतद्वेष (द्वेषरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.
तिणदोसानि खेत्तानि मोहदोसा अयं पजा ।
तस्मा हि वीतमोहेसु दिन्नं होति महफ्फलं ॥
याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष मोह आहे, त्यामुळे वीतमोह (मोहरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.
तिणदोसानि खेत्तानि इच्छादोसा अयं पजा ।
तस्मा हि वीगतिच्छेसु दिन्नं होति महफ्फलं ॥
याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष इच्छा करणे हा आहे, म्हणून इच्छा-रहित मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.
राजा बिंबीसारने भगवान बुध्दास वेळूवन दान दिले. अनाथपिंडकाने सोन्याच्या मोहरा जमिनीवर अंथरुन ती जमीन विकत घेतली व तेथे जेतवन नावांचे विहार बांधून भगवान बुध्दास दान दिले.
३) उपेक्षा
उपेक्षा म्हणजे औदासीन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली मनाची स्थिती होय. फल प्राप्तीने विचलित न होणे; परंतु सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा होय. नि:स्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता आहे. वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक आहे. उपेक्षा म्हणजे उदासीनता नव्हे.
एकदा भगवान बुध्दांना विचारण्यात आले होते की, मानवाचे कल्याण कश्यात आहे? तेव्हा त्यांनी अकरा प्रकारचे कल्याण (मंगल) सांगितले आहे. त्याला महामंगल सुत्त म्हणतात. त्यापैकी अकरावे कल्याण लोकस्वभावाला धरुन सांगितले आहे. हे सुत्त उपेक्षेच्या दृष्टीने एक उदाहरण असून अत्यंत महत्वाचे आहे.
फुट्ठ्स्स लोकधम्मेही, चितं एस्सं न कंपत्ती ।
अशोकं विरजं खेमं, एतं मंगल मुत्तमं.॥
याचा अर्थ म्हणजे लोकस्वभावासंबंधीचे लाभ आणि हानी (Gain and loss), किर्ती आणि अपकिर्ती (Fame and defame) काही ठिकाणी किर्ती आणि अपकिर्तीच्या ऎवजी यश आणि अपयश ((Success and unsuccessful) असा उल्लेख केला आहे. स्तुती आणि निंदा (Praise and blame), सुख आणि दु:ख (Happiness and pain) असे जीवनात प्रसंग आल्यानंतर आपले चित्त थोडेही विचलीत होउ न देणे, शोक न करता चित्त शांत व निर्मळ ठेवणे हेच उत्तम मंगल आहे.
लाभ आणि हानी ही लोकस्वभावाची पहिली जोडी आहे. एखादा व्यक्ती लाभ झाला की आनंदीत होतो व हानी झाली की दु:खी होतो. अशावेळी शांत राहून लोकस्वभावाच्या आहारी जाऊ नये. त्यावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.
बुध्दाच्या वेळची एक गोष्ट आहे. एक स्त्री भन्ते सारीपुत्त आणि त्यांच्यासोबत आलेल्या भिख्कूंना भोजनदान देत असतांना तिला एक निरोप येते की, तिचा पती आणि मुलगा एका अपघातात मारल्या गेले आहेत. तरीही तिने जेवन वाढण्याचे काम न थांबविता भिख्कूंचे पुर्ण जेवण होऊ दिले. तसेच तिच्या नोकराणीकडून तूप वाढत असतांना तिच्या हातून ते भांडे खाली पडून फुटले. त्यामुळे ती दु:खी झाली होती. भन्ते सारीपुत्तानी तिची समजूत घालून सर्व फुटणार्या वस्तू फुटणारच... त्यामुळे वृथा शोक करु नको असे सांगितले. (All breakable things are bound to break) जेव्हा त्या स्त्रीचा पती आणि मुलगा मरन पावले आहेत. तरीही तिने जेवन वाढण्याचे काम न थांबविता भिख्कूंचे पुर्ण जेवण होऊ दिले. हे भन्ते सारीपुत्तांना कळताच त्यांनी तिच्याबाबतीत गौरवाचे उदगार काढून म्हटले की, “ या धेर्यवान स्त्रीचा हा एक महान पराक्रम असून ती या स्तुतीस पात्र आहे.” (Such values on the part of courageous women is highly commendable.)
किर्ती आणि अपकिर्ती ही लोकस्वभावाची दूसरी जोडी आहे. किर्ती होते तेव्हा आपणास आवडते. पण बदनामी मात्र आवडत नाही. आपण सतत किर्तीमान होत राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र अपकिर्ती झाली की लगेच खचून जातो. आपल्या हातून जोपर्यंत चांगले कार्य घडत असते तोपर्यंत लोक मान-सन्मान देतात. परंतू जर कां आपल्या हातून एखादी चुक झाली की तेवढ्याच मोठ्या प्रंमाणात बदनामी करतात. अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.
स्तुती आणि निंदा ही लोकस्वभावाची तिसरी जोडी आहे. थोड्याशा स्तुतीने आपण स्वत:ला फार मोठे समजायला लागतो आणि निंदेने मात्र हिरमुसले होतो. भगवान बुध्दाने सांगितलेल्या लोकस्वभावाला ध्येर्याने सामोरे जाणारे ते महापुरुष होते. शंभर टक्के कोणिही चांगले अथवा वाईट असू शकत नाही. जेथे स्तुती आहे तेथे निंदाही असू शकते. निंदेचा प्रसंग आला असतांना सहनशिलता व संयम कायम ठेवणेच योग्य असते. निंदेमुळे मनस्थिती जर बिघडवून घेतली तर तो तेथेच थांबून जाऊ शकतो. त्यामुळे त्याचे हातून घडणारे कुटुंबाप्रती व समाजाप्रती पुढील चांगल्या कार्याला तेथेच खिळ बसण्याची फार मोठी शक्यता निर्माण होत असते. म्हणून अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.
सुख आणि दु:ख ही लोकस्वभावाची चवथी जोडी आहे. आपण रोज जे कर्म करतो ते सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. इंद्रिय सुखाच्या प्राप्तीसाठी आपण नेहमी धडपडत असतो. संपत्ती, पैसा, पद, सौंदर्य, सत्ता, लग्न, कुटुंब, गाडी, बंगला इत्यादी आपल्या सुखाच्या कल्पना असतात. याची प्राप्ती झाली की जीवनात सर्व सुखे मिळालीत असे वाटते. सर्व भौतील बाबी सुखाचे साधने आहेत. ते साध्य नाहीत. म्हणून सर्व सुख आणि दु:खाच्या प्रसंगात आपले चित्त ढळू न देता आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. हीच भगवान बुध्दानी शिकवन महामंगल सुत्तामध्ये दिली आहे.
४) नैष्कर्म
नैष्कर्म म्हणजे ऎहिक सुखाचा त्याग करणे होय.
राजपूत्र गौतमाने राजगृह सोडले. सर्वच ऎहीक सुखाचा त्याग करुन मानवाच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटलेत.
५) विर्य
विर्य म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे विर्य होय.
आपल्यामधिल शक्तीला पुर्णपणे जगृत करणे, विरता, साहस व उत्साहपुर्वक कार्य करणे म्हणजे विर्य होय. भगवान बुध्दांनी आपल्या मनाला स्थिर ठेऊन उद्दीष्टाची पुर्तता केली. थोर व्यक्ती कितीही कष्ट पडलेत तरीही ध्येयपूर्तीसाठी पूर्ण शक्ती पणाला लाऊन यशाचे शिखर गाठतात.
६) शांती
शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेष वाढत असते. द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होउ शकतो.
भगवान बुध्द म्हणतात-
नही वेरेन वेरानी सम्मन्तीध कुदाचनं।
अवेरेनच सम्मन्ति एस धम्मो सनन्ततो ॥ (धम्मपदातील पांचवी गाथा)
याचा अर्थ, वैराने वैर कधिच शमत नाही. ते अवैरानेच शमते, हाच जगाचा सनातन नियम आहे.
तसेच धम्मपदात तिसर्या गाथेत म्हटले आहे की-
अक्कोच्छि मं अबधि मं अजिनि मं अहासि मे ।
ये च तं उपनय्हन्ति वेरं न सम्मति ॥
याचा अर्थ, ‘मला शिवी दिली;’ ‘मला मारले;’ ‘मला हरविले;’ ‘मला लुबाडले;’ जो अशा गोष्टींचा विचार करीत असतो, त्याचे वैर कधीच शमन पावत नाही.
तसेच धम्मपदात चवथ्या गाथेत म्हटले आहे की-
अक्कोच्छि मं अबधि मं अजिनि मं अहासि मे ।
ये तं न उपनय्हन्ति वेरं तेसूपसम्मति ॥
याचा अर्थ, ‘मला शिवी दिली;’ ‘मला मारले;’ ‘मला हरविले;’ ‘मला लुबाडले;’ जो अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्याचे वैर शमन पावते.
वैराने वैर आणखी वाढत जाते. म्हणून अशांती सोडून बंधुभाव जोडा असा आशय या गाथेचा आहे. वैरावर प्रेमानेच मात करता येते. म्हणून ‘शांती’ ही पारमिता अत्यंत महत्वाची आहे.
जगामध्ये जेव्हा युध्दसदृश्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा शांततेने वाटाघाटी करुन आपसातील भांडणे मिटवील्या जाऊ शकतात. युध्दामुळे होणारी जीवीतहानी, वित्तहानी रोखल्या जाऊ शकते.
भगवान बुध्दांनी गृहत्याग करण्यापुर्वि त्यांच्या जीवनातील एक महत्वपुर्ण घटना आहे. सिध्दार्थ गौतम शाक्य संघाचे वयाच्या २० व्या वर्षी सभासद झाले होते. ते २८ वर्षे वयाचे झाले असतांना त्यावर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या मध्ये वाहणार्या रोहिणी नदिच्या पाण्यावरुन मोठा संघर्ष निर्माण झाला होता. म्हणून शाक्यांच्या .सेनापतीने कोलियांशी युध्द पुकारण्याचा ठराव संघाच्या अधिवेशनात मांडला. सिध्दार्थ गौतमांनी या ठरावाला विरोध केला. त्यांनी सांगितले की, ‘युध्दाने कोणताही प्रश्न सूटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसर्या युध्दाची बीजे रोवली जातील. जो दुसर्याची हत्त्या करतो त्याला त्याची हत्त्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसर्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. म्हणून संघाने कोलियांच्या विरुध्द युध्दाची घोषणा करण्याची घाई करु नये, असे मला वाटते. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पांचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पांच जणांनी हे भांडण मिटवावे.’
सिध्दार्थ गौतमांनी मांडलेली सुचना त्यावेळेस मान्य करण्यात आली नव्हती. परिणामत: सिध्दार्थाला परिव्रजा घेऊन देशत्याग करावा लागला होता. मात्र त्यानंतर सिध्दार्थांनीच मांडलेल्या सुचनेनुसार शाक्यवासीय लोकांच्या चळवळीचा दबाव येवून हा प्रश्न सामोपचाराने व शांततेच्या मार्गानेच लवाद नेमून नेहमीकरीता सोडविल्या गेला होता.
७) सत्य
सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलू नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्यखेरीज दुसरे काहीही असता कामा नये.
सत्याशिवाय शीलाचे पालन करता येत नाही. कुशल कर्माच्या प्राप्तीसाठी सत्याचे आचरण करावे लागते. वैज्ञानीक दृष्टीकोणातून जे सिध्द करता येते ते सत्य होय.
८) अधिष्टान
अधिष्टान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय होय. यालाच अथक प्रयत्न, दृढ संकल्प असेही म्हणता येईल.
९) करुणा
करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता होय. सर्व प्राणीमात्रावर दया करणे म्हणजेच करुणा होय.
जेथे दारिद्र्य आणि दु:ख आहे त्याकडे लक्ष देऊन ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक आहे. प्रज्ञा आणि शीलासोबत करुणेची जोड असते. म्हणून प्रज्ञा-शील-करुणा असे म्हटल्या जात असते.
देवदत्ताने घायाळ केलेल्या पक्षाला सिध्दार्थ गौतमाने वाचविले. म्हणून मारणार्यापेक्षा वाचविणारा अधिक श्रेष्ट असतो हे त्यांनी सिध्द केले.
एकदा एका भयानक दुर्गंधी येणार्या रोगाने त्रस्त झालेल्या, वयस्कर असलेल्या भिक्खुजवळ कोणी जात नसतांना भगवान बुध्दांनी त्याला आंघोळ घालून धुवून स्वच्छ केले व त्याच्यावर उपचार केले. म्हणून भगवान बुध्दांना करुणेचा महासागर म्हटल्या जाते.
१०) मैत्री
मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे होय. तसेच शत्रूंविषयी देखील बंधुभाव ठेवणे होय. माणसाने माणसावर प्रेम करणे आवश्यक आहे. केवळ प्रेम करणे पुरेसे नाही तर खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ माणवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणिमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा खरा अर्थ आहे. मैत्री ही केवळ माणवापुरती मर्यादित नाही. आपले मन नि:पक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. आपणा स्वत:ला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणिमात्रांना अशा मैत्रीमुळेच मिळू शकते.
भगवान बुध्दांच्या करुणा व मैत्रीमुळेच देशा-देशात, माणसा-माणसात संघर्ष निर्माण होणार नाही. जगातील युध्दाची भाषा नश्ट होत जाईल व त्यामुळे जगाचा विनाश टळेल. आज जगाला युध्द नको तर बुध्द हवे अशीच भुमिका सर्व विचारवंत घेत आहेत.
या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची-बुध्दीची जोड दिली पाहिजे. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुध्दीला प्रज्ञा असे म्हणता येईल. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक आहे, याचे आणखी कारण असे आहे की, दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे.
अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा दिसणार नाही. म्हणूनच प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे.
आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने आपल्या दैनंदीन जीवनात भगवान बुध्दांनी सांगितलेल्या या दहा पारमिताचे-सद्गुणांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आपले जीवन निष्कलंक राहण्यास मदत होईल. परिणामत: आपण सुखी, समाधानी व आनंदीत राहू शकतो. म्हणूनच या दहा सद्गुणांना पारमिता म्हणतात. पारमिता म्हाणजे पूर्णत्वाच्या अवस्था होय.
अशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व ईतरांना धम्मदिक्षा देवून मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमिवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेंच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”