दगड तरंगला नाही

Submitted by rkjumle on 8 October, 2011 - 04:01

मी त्यावेळी निळोण्याच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. शाळेच्या पाठ्यपुस्तकात ‘रामाच्या नांवाने कोण वाया गेले ?’ अशा शिर्षकाचा एक धडा होता. त्या धड्यात दगडावर ‘राम’ असे लीहून पाण्यात सोडला की तो दगड पाण्यात तरंगते असे लिहले होते.
त्यादिवशी हा धडा गुरुजी शिकवायला लागले होते. खरंच दगड पाण्यावर तरंगतो कां ? असं अकल्पीत कधी घडत असते कां ? रामाच्या नांवात एवढी जादु आहे कां ? अश्या नाना प्रकारच्या प्रश्‍नाने माझ्या मनात प्रचंड गदारोळ माजवीला होता.
म्हणून हा प्रयोग करुन पाहण्यासाठी माझं मन अधीर झालं होतं.
माझं मन गुरुजी काय सांगतात, त्यापेक्षा मनात चालू असलेल्या घालमेली सोबतच अनेक गतस्मृती माझ्या मनात पिंगा घालू लागल्या होत्या. गुरुजींनी माझं नांव कसं शाळेत टाकलं या प्रसंगापासून ते त्यानंतरच्या सर्व घडामोडी माझ्या नजरेसमोर धाऊ लागल्या होत्या.
आमच्या गांवात शाळा नव्हती. आमच्या गांवापासून एक-दिड कोसावर निळोणा या गांवला पहिली पासून ते चवथी पर्यंतची प्राथमीक शाळा होती. हे गांव वाघाडी नदीच्या पलिकडे यवतमाळला जाणार्‍या रस्त्यावर होते.
एकदा शाळा सुरु होण्यापुर्वी बबन गुरुजी आमच्या गांवात आले होते. त्यावेळेस मी खेळत होतो.
‘अरे ईकडे ये...तुझे नांव काय आहे.’ गुरुजींनी मला जवळ येऊन विचारले.
‘हे पहा माझ्या हातावर लिहिले आहे.’ कोणी मला माझे नांव विचारले की माझ्या उजव्या हातावर गोंदलेले नांव दाखवायला मी हरकून जात असे.
‘रामराव…'
‘हो.’
‘शामरावचा भाऊ कां ?’
‘हो.’
‘चल तुझ्या घरी.’ आम्ही घरी आलो. माझ्या सोबत खेळणारे मुलेही माझ्या मागेमागे आलेत.
‘याला शाळेत टाकता का ?’ गुरुजींनी माझ्या बाबाला विचारले.
‘लहान आहे. अजुन त्याचा हात पाठीमागून कानाला लागत नाही.’
‘किती वर्षाचा आहे.’
‘असेल सहाक वर्षाचा. घेता कां त्याला शाळेत.’
‘नाही. त्याला आठ वर्षाचा दाखवावा लागेल.’
‘दाखवावा ना आठ वर्षाचा… काय बिघडते ?’
‘त्यांची जन्म तारीख माहित आहे ?’
‘नाहीजी... तारीख माहित नाही पण तो श्रीकृष्णदेव जलमला त्यावेळेसचा आहे.’ आई म्हणाली. म्हणून माझे पाळण्यातले नांव ‘श्रीकृष्ण’ व दुसरे नांव ‘रामराव’ असे ठेवले होते, अशी आई सांगत होती.
‘बरं मी कोतवालाच्या बुकात पाहून घेईन.’
‘उद्यापासून येरे शाळेत... चांगले कपडे घालून ये.’ माझ्या मळकट कपड्याकडे पाहून गुरुजी म्हणाले.
गुरुजींनी गांवातील आणखी काही मुलांचे नांव टाकून घेतले.
तेव्हापासून मी निळोण्याच्या शाळेत जायला लागलो.
आमचे गुरुजी एकटेच पहिला ते चवथ्या वर्गापर्यंत शिकवीत होते.
ते पांढरा शर्ट व पांढराच पैजामा घालत असत. त्यावेळी प्राथमीक शाळेचे सर्वच मास्तर असाच पोषाख घालत असल्याचे दिसत असे.
आम्ही सहा-सांत मुले निळोण्याच्या शाळेत जायला एकत्र निघत होतो. त्यात माझी मामे बहि्ण चित्राबाई, सुदमताबाई, माझी मोठी बहीण-जनाबाई, सरस्वती, चांगोणा, भगवान, धनपाल व बंजार्‍याचे वामन, रामसिंग, वाल्ह्या असे मुलं-मुली राहत असत.
शाळेत रमत गमत रस्त्याने जातांना-येतांना डोळ्यांना सुखावणारा निरव, रंगतदार, आणि रमनिय निसर्ग, आभाळात दाटून आलेले ढग, चिलकीचे व नदीचे झुळझुळणारे व खळाळणारे पाणी, झाडीवेली-झुडपं, मस्तीत उडणारे, बागडणारे पक्षी पाहतांना आम्हाला खूप मजा यायची. आम्ही मुले एखाद्या उंडाळणार्‍या वासरासारखे रस्त्याने जात होतो.
आम्ही एकमेकाशी ‘अ’ व ‘ची’ ची भाषा बोलत होतो. ‘मला’ म्हणायचं असलं तर ‘अ’च्या भाषेत ‘अला...म’ व ‘ची’च्या भाषेत ‘चिला…म’ म्हणत असे. तसेच ‘तूला’ म्हणायचं असलं तर ‘अ’च्या भाषेत ‘अला...तू’ व ‘ची’च्या भाषेत ‘चिला...तू’ म्हणत असे. ही भाषा बोलतांना आम्हाला इतकी इतकी सवय झाली होती की आम्ही सहजपणे न अडखडता ही भाषा बोलत होतो.
आम्हाला शाळेत पोहचयाला गांवापासून एखादा तास तरी लागत असेल! गांवातून पायवाटेने निघालो की पहिल्यांदा लांडग्याचं वावर लागायचं. त्यानंतर किसन्याचे दोन्ही वावरं, त्यापैकी एक आंब्याचं, नंतर भगवानचं वावर लागायचं. त्यानंतर मात्र बैलगाडीचा रस्ता लागायचा तो थेट वाघाडी नदीच्या अलीकडील हुडाच्या वावरापर्यंत. हा गाडी रस्ता दोन वावराच्या मधातून यवतमाळकडे जाणारा होता.
पावसाळ्यात पायाच्या घोट्यापर्यंत तर कुठे कुठे टोंगळ्यापर्यंत गाडण राहायच. अशा वेळेस धुर्‍याच्या काठा-काठाने किवा शेतात घुसून रस्ता पाडत असे. कुठे कुठे रस्त्यावर घसरण असायची.
रस्त्याच्या दोन्हीही काठाला पळस, पांजरा, हिवरा. बाभूळ, येण, धावडा, चिल्हाटी, भराडी, कडूनिंब इत्यादी निरनिराळ्या जातीचे पण सागाच्या जातीचे जास्त झाडं असायचे. सागाचे मोठेमोठे पानाचा पाऊस आला की डोक्यावर धरायला छत्री सारखी उपयोगात होत असे. त्याच्या पानाला घासले की, रक्तासारखा घट्ट रस निघायचा.
आम्ही मुले निसर्गसौंदर्य न्याहळत, डोळ्यात साठवत जात होतो. चिल्हाटीचा गुलाबी, बाभळीचा पिवळा, हिवर्‍याच्या झाडाचा पांढरा असा रंगबिरंगी मखमली फुलोर मनाला भुरळ पाडत असे. आजुबाजूचा हिरवेगार परिसर पाहून आमचे डोळे सुखाऊन जात असे. जणू काही डोंगर, जमिनीने हिरवा शालू पांघरलेला आहे असच वाटायचं..
पाहा ना, हिरव्या रंगाच्या किती विविध छटा असतात नाही कां ? शेतातल्या तुरीच्या तासाचा हिरवेपणा वेगळा तर त्याच शेतातल्या पर्‍हाटीचा वेगळा ! रस्त्याच्या बाजूला ऊगवलेल्या गवताच्या प्रत्येक पात्याचा हिरवेपणा वेगळा आणि झाडांच्या पानांचासुध्दा वेगवेगळा ! नदी-नाल्या जवळचा लुसलुशीत पोपटीपणा, शेताच्या धुर्‍याजवळचा गर्द हिरवा, तर डोंगर-कड्यावरचा गच्च हिरवेपणा !
निसर्गाने सुध्दा झाडा-वेलींना एक शिस्त लाऊन दिली आहे असच म्हणावं लागेल ! उगवायचं, फुलायचं व परागीभवन होऊन पुढील पिढी तयार करायचं हे काम त्यांच नेटाने चालू असतं.
सृष्टीमध्ये प्रत्येक जीवांचं, वनस्पतीचं वंशवाढीचं, पुनर्निमीतीचं कार्य अव्याहतपणे सुरु असते. यासाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते.
डार्विनच्या सिध्दांताप्रमाणे- निसर्गात जो सक्षम आहे, त्यालाच जगण्याचा हक्क आहे.
म्हणून आपला वंश निर्वेधपणे पुढे चालू राहावा अशी सृष्टीतील प्रत्यके जीवांची धडपड चालू असते.
झाडा-फुलांना किडे, पक्षी, वारा यांच्याकडून परागीभवन करुन घ्यावे लागत असते. मग किडे, पक्षी यांना आकर्षून घेण्यासाठी आपल्या फुलां-पानांचा रंग, आकार व गंध याचा वापर करण्याची युक्ती ते वापरतात. ज्यांना जो रंग आवडतो तो तो रंग आपल्या फुलांत भरत असतात.
असे म्हणतात की मधमाश्यांना निळा रंग आवडतो म्हणून काही फुलांच्या जाती आपला रंग निळा करून मधमाश्यांना बक्षीस देण्यासाठी त्यात भरभरून मधाची निर्मिती करतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पळस, पांगरा, सावर हे झाडे लाल रंग धारण करीत असतात. त्याचं कारण असं सांगतात की पक्ष्यांना लाल रंग स्वछ आणि उठवून दिसत असतो.
एवढं मात्र खरं की फुलांच्या दृष्टीने त्यांचे हे रंग माणसाना आकर्षीत करण्यासाठी नाहीतच मुळी !. कारण फुलांना माहीत आहे की परागीकरणात माणसाचा कोणताच उपयोग होत नाही. परंतु माणसंच फुलांच्या या वैविध्याचा मनसोक्तपणे उपभोग घेत असतात हे त्यांना कुठे माहित असते ?.
रस्त्याला लागून असलेल्या एखाद्या भुईमूंगाच्या वावरात कुणी नाही असं पाहून, धुर्‍यावरच्या काट्या सरकवून चोर पावलानं आंतमध्ये घुसत असे. त्या वावरातल्या भुईमूंगाच्या भरलेल्या शेंगाच्या डहाळ्या मुळासकट उपटून रस्ताभर खात खात जात होतो. कधी मुंगाच्या, उडदाच्या पाटाच्या शेंगा, तर कधी वाळकं, काकड्या तोडून खात होतो.
हिवाळ्यात धान निघाल्यावर पेरलेल्या हरभरा व वटाण्याच्या शेंगाचे हिरवेगार शालू नेसल्यासारखे डुंगे दिसले की आम्ही हरकून जात होतो. मग हिरवा घाट्यांनी भरलेला हरभरा व वटाण्याच्या शेंगाचे सोले खायची मजा येत होती.
कधी तुरीच्या तासात शिरुन हिरव्या टर्रऽऽ भरलेल्या शेंगा ओरबाडून खिश्यात भरुन घेत होतो. मग रस्त्याने जात जात खात होतो.
बैलगाडीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी होती. त्यात येणाचे, खैराचे, भराडीचे, धावड्याचे, सागाचे, बाभळीचे, पळसाचे, पांजर्‍याचे, चिल्हाटीचे, हिवर्‍याचे झाडे होते. येणाच्या झाडाला हमखास रेशमाचे कोष लटकलेले दिसत असत. त्याला तोडून आम्ही त्याचं मखमली सूत काढण्याचा प्रयत्‍न करीत होतो. याच कोशातून फुलपाखरं बाहेर पडत असल्याचे आम्ही पुस्तकात वाचले होते. धावड्याचा, बाभळीचा डिंक खात होतो. कडूनिंबाचा डिंक कडू लागायचा. तो पुस्तकाचे पाणे चिकटवायला वापरत होतो.
झाडावर कधी बसलेले तर कधी उडत असलेले निरनिराळ्या जातीचे पक्षी पाहण्यात आम्ही गुंग होवून जात होतो. त्यांच्या सुरेख चोचीतून बाहेर पडणारा लयदार आवाज व चमकदार रंगीबेरंगी पंखाचे पिसं पाहून आम्ही मोहीत होवून जात होतो. असं म्हणतात की पक्ष्यांना लाभलेल्या विविध रंगाच्या वरदानाचा उपयोग शत्रूपासून लपून राहण्यासाठी व जोडीदाराचे लक्ष वेधून घेण्यासाठी करीत असतात.
कुहू ऽऽकुहू ऽऽ असा मंजुळ आवाज आला की त्या दिशेने आम्ही धावत जायचो. कारण ही कोकीळा गर्द झाडीत किवा पाना-फांद्याने बहरलेल्या एखाद्या मोठ्या झाडावर कोणालाही दिसणार नाही अशा अवघड जागी लपलेली आढळत असे. कदाचीत आपला काळा रंग जगाला दिसू नये म्हणूनच ती संकोचीत होती की काय !. जवळ गेलं की तिचा आवाज बंद होऊन जात असे. तिला पाहतो नं पाहतो तर ती क्षणातच भुरकून उडून जात असे.
कधीकधी दुरुनच टकटक असा आवाज यायचा. जवळ जावून पाहिले तर सुतार पक्षी आपल्या लांब चोचीने सारखं एखाद्या झाडाच्या खोडाच्या सालीला टोचे मारतांना दिसायचा. मग आम्ही त्याच्या कडेच पाहत राहत होतो.
रस्त्यावरील झाडावर बसलेला एखादं पाखरु जसा चोचीतून आवाज काढायचा, शिट्टी वाजवायचा, त्याचीच नक्कल म्हणून आम्ही पण पोरं शिट्टी वाजवत होतो. तोंडाने तसाच आवाज काढून पाहत होतो.
निलकंठ हा पक्षी पाहायला खूप सूंदर दिसायचा. त्याची पोपटासारखी हिरवी हिरवी चोच मन मोहून टाकत असे. हाच पक्षी एखाद्या वेळेस सकाळीच झुंजूमुंजूला मस्त जोरात आवाज काढत उडत जात असल्याचे मी पाहिले होते.
एखाद्यावेळेस रस्त्यावर सावली पळतांना दिसायची. वर पाहिले तर आकाशात उंच उडणार्‍या घार किंवा गिधाडासारख्या मोठा पक्षांची ती सावली असायची. मग आम्ही त्या सावलीच्या दिशेने उगाच पळत राहत होतो.
एखाद्यावेळेस केणेच्या वावरातल्या मोहाच्या झाडावर दिसलेल्या घुबडाला पाहून आम्ही घाबरुन जात होतो. कारण तो म्हणे लहान मुलांचे कपडे नदीवर नेवून धुतो व झाडावर वाळू घालतो. ते जसं जसं वाळायला लागतं तसं तसं तो मुलगा वाळायला लागतो अशी एक दंतकथा या घुबडाच्या बाबतीत खेड्यात सांगितली जात होती.
पावसाळाच्या तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला माकोडे आपले घरं बांधण्यात गुंग राहत असल्याचे दिसायचे. जमिनीच्या आतून माकोडे इतकूला मातीचा कण आपल्या तोंडात धरुन आणीत व बाहेर बाजूला टाकून त्याचा कणावर कण ढिग रचत असत. त्यांच ते अविरत व सततचं काम पाहतच राहावे वाटे.
उन्हाळ्याच्या तेवढ्यात एखाद्या उलट्या भोवर्‍यासारखे गुळगूळीत मातीचे भक्के जागोजागी दिसायचे. त्यात बारिक गवताची पाती हळूच टाकली की त्यात विसावलेला इवलासा गुबगूबीत हत्ती त्या काडीला तोंडाने पकडून बाहेर आलेला दिसला की आम्हाला मजा वाटायची.
रस्त्याच्या गुळगूळीत मातीत तुरुतूरु चालणार्‍या निरनिराळ्या प्क्षांच्या पायाचे ठसे एखाद्या चित्रकाराने नक्षिकाम करावे तसे दिसायचे.
कधी आमच्या समोरुन रस्त्याने एखादा सरडा तुरुतूरु धावत येऊन धुर्‍याकडे जातांना दिसायचा तर कधी एखादी खारुताई, खेड्यात आम्ही तिला खिराडी म्हणत होतो ती आम्हाला पाहत मध्येच थांबत व पुन्हा पळत जावून धुर्‍यावरच्या झाडावर चढत असे.
पांडू लभानाच्या वावराला लागून असलेल्या बैलगाडीच्या रस्त्याने रांगोळीचा काचे सारखा दिसणारा दगड आम्हाला नेहमी खुणावत राहायचा. आम्ही त्याला खोदून दप्तरात टाकून घरी नेत होतो. मग त्याला बारीक करुन व फडक्याने गाळून रांगोळी बणवीत होतो.
शनिवारी सकाळची शाळा असायची तेव्हा दुपारी घरी येतांना वावरातील आंब्याच्या झाडावर आम्ही चाप-डुबल्याचा खेळ खेळत होतो.
रस्त्याने जास्तीत जास्त दूर कुणाचा दगड जाऊन पडतो याची आम्ही मुले शर्यत लावत होतो.
पावसाळ्यात रस्त्यात लागणार्‍या चिलकीचे पाणी आम्ही उडवत उडवत जात होतो. आकाशाच्या दिशेने उडणारे पाण्याचे तुषार पाहतांना मंत्रमुग्ध होऊन जात असे.
ह्या चिलकीत खडकावरुन पडणारं वाहतं पाणी खाली डोबर्‍यात पडलं की पांढराशुभ्र फेस यायचा. हा फेस एखाद्या फुलाप्रमाणे हाताच्या ओंजळीत धरुन त्याला तोंडाने फुका मारली की विरुन जात असे किंवा कोणी जवळ उभा असलं की त्याच्या अंगावर फेकून मारण्यात मजा वाटायची.
हे चिलकीचे पाणी गाडी रस्त्याने वाहत वाहत थेट वाघाडी नदीपर्यंत जात असे. चिलकीत कुठे कुठे वरुन ओघळत आलेले पाणी गिरक्या घेत खाली पडत असे.
त्यात पोहणार्‍या बारीक बारीक माश्यांच्या मागे आम्ही लागत असे. बेंडकाचे बारीक माशासारखे दिसणारे पिल्ले दिसायचे. काही दिवसाने त्या पिल्लाचे तोंड बेंडकासारखे व्ह्यायचे. शेपटी मात्र माशासारखे दिसत असे. त्यानंतर ते शेपटी गळून पुर्ण बेंडकाचा त्याला आकार यायचा. काय हे सृष्टीची किमया म्हणून आम्ही विस्मयचकीत होत होतो.
कधी लहान लहान व मध्यम आकाराचे खेकडे दिसत असत. कधीकधी त्या चिलकीत एखादा सळसळत पोहत जाणारा साप दृष्टीस पडायचा.
आमच्या गांवावरून येणारा असा हा रस्ता पायवाटेचा तर कुठे कुठे बैलगाडीचा, खासराचा होता. रस्त्यावर विखुरलेल्या बारीक खड्याने आमच्या पायाच्या तळव्याची आग होत असे.
नदीचा तीराचा परिसर हिरव्या रंगाने, नानाविवीध मखमल रान फुलांनी नटलेला होता. करकरीच्या वनस्पतीला लागलेलं लाल-पिवळ्या रंगाचं उठून दिसणारं फुल आमच चित्त वेधून घेत असे.
अलीकडच्या तिरावर हिरव्यागार पानांन लदबलेलं एक धामण्याचं झाड होतं. त्याचे गाभुरलेले बारिक फळे आंबट-तुरट लागत असे. ते आम्ही चवीने खात होतो.
एका वावरातून पायवाटेने वाघाडी नदीत उतरणारा निसरडा रस्ता होता. एखाद्यावेळेस पावसाची सर येऊन गेली तर त्या रस्त्यावर घसरण तयार व्ह्यायची. मग तोल सावरत सावरत, जवळच्या झाडाच्या फांद्याना पकडत किंवा पायाच्या बोटाचे नखं जमिनीत रुतवत नदीत उतरावे लागे.
पावसाळ्यात नदीत उतरण्यापूर्वी वरच्या बाजूला कानोसा घेऊन पुराचे लोंढे येण्याचा आवाज येतो काय, त्याचा अंदाज घेतल्यावरच आम्ही नदीत उतरत होतो.
नदीच्या पाण्यात पाय टाकला की थंड पाण्याचा स्पर्ष सर्वांगाला उत्तेजीत करीत असे. त्या नदीच्या वाहत्या धारेचं थंड पाणी तोंडावर शिंपडून तोंड धुतलं की चालल्याने शरिरात आलेला थोडाफार थकवा निघून गेल्यासारखं वाटत असे. हळूच वाकून हाताच्या ओंजळीने पाणी पिल्यावर तहानेने कासावीस झालेला जीव शांत होवून जायचा. त्या पाण्याची चव ख्ररंच गोड लागायची.
माझ्या मोठ्या आईला खूप कथा येत असत. कथेच्या आमिषाने आम्ही तिच्या घरी मुड्याचे पाने चवडून देत होतो. मग ती पाने चवडता चवडता एक-एक कथा सांगत होती. कधी भुता-खेतांच्या, चकवा-लावडीनीच्या, कधी बहिण-भावाची तर कधी राजा-राणीची तर कधीकधी मजेशीर, गमतीदार... अश्या गोष्टी ती सांगत होती.
नदीच्या पाणी पिण्यावरुन अशीच तिने सांगितलेली एक गोष्ट आठवली.
एका बाईची ती मजेशीर गोष्ट होती.
एक बुटका नवरा असतो. त्याची बायको पण बुटकी पण बह्याड स्वभावाची असते. तिच्या बह्याडपणाला तो पार वैतागला असतो.
एकदा असंच तो तिला म्हणते, ‘लोकांच्या बायका कशा देवासारख्या असतात ?’ नवर्‍याचं अस बोलणं ऎकून ती देवळात जाऊन बसते. तो तिला जिकडे-तिकडे शोधत असते. शेवटी ती देवळात जाऊन बसलेली दिसते.
नवरा म्हणतो, ‘येथे कशाला येऊन बसलीस ?’
‘तुम्हीच तर म्हणाले होते की देवासारखी राहा. म्हणून मी येथे देवळात येऊन देवासारखी बसली. माझं काही चुकलं काय ?’
‘अवं माह्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही. फारच बह्याड बाई दिसते तू...! लोकांच्या बायका कशा घरं चालवतात? तसं तु आपलं घर कां नाही चालवत?’ एवढं बोलून तो बाहेर निघून जातो.
झालं... तिने आपलं घर चालवायला हातात पुराणीची काडी घेतली.
‘चल घरा, चल...’ अशी तोंडाने म्हणत ती घराला ढोसायला लागली. नवरा घरी आल्यावर पाहतो तर ही घराच्या भिंतीला पुराणीने टोचून टोचून जिकडे-तिकडे छिद्र पाडत आहे. हे पाहून नवरा आणखीच कातावत म्हणतो, ‘ हे काय करीत आहेस तु.’
‘तुम्हीच तर म्हणाला होता की लोकांच्या बायका घर चालवतात. म्हणून मीही घराला चालवत आहे.’
‘फारच बह्याड दिसते तू बाई... ! बहिणमायमी आता ईचं कायच करावं कां ? जा लोकांच्या बाया कशा बाजार करुन आणतात ? तसं तू पण बाजार करून आण...’ असं वैतागून म्हणून नवरा तिला बाजारात धाडतो. बाजार करून येत असतांना सर्व बाया वाघाडी नदीचं पाणी पितात. ही सुध्दा त्या बायाप्रमाणे पाणी पिते.
या बाईच्या मनात येते की, ‘किती गोड पाणी आहे या नदीचं! गुळाच्या चवीसारखं... माहा नवरा पिला की किती खुष होतील!’ म्हणून ती बाजारातून शिशीत भरुन आणलेलं तेल नदीत उबडून देते व त्या शिशीत पाणी भरून घरी नवर्‍यासाठी आणते. असं त्या वाघाडी नदीच्या पाण्याची गोष्ट आहे. हे पाणी नदीतून जाता-येता आमच्या गांवचे सर्वच लोकं पित असत.
नदीच्या वाहत्या प्रवाहात थांबून आम्ही पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत असे. नदीत कुठे चापट व पाण्यातून वर आलेले खडकं दिसायचे. कुठे पाण्याच्या वर थरचे थर तर कुठे पाण्यात पाय फसणारे किंवा पायाला मऊ मऊ लागणारी रेती सुखावून जात असायचे. कधी भाकरीचा एक लहानसा तुकडा तुकडा पाण्यात टाकला की लहान लहान माश्यांचा थवाच्या थवा धावून यायचा. आमच्या पाण्यातील पायाला ते हळूच स्पर्श करीत तेव्हा पायाला गुदगूल्या होत असे. मग आम्ही त्याच्या मागे धाऊन जाण्यात रंगुन जात होतो. अस त्या पाण्यात किती खेळावं नं किती नाही, असे होऊन जात असे! कुठे कुठे संथ वाहणारा तर कुठे खळखळ आवाज करणारा प्रवाह मनाला भुरळ पाडून जात असे. नदीच्या प्रवाहाच्या खालच्या व वरच्या दिशेने दुरवर पाणीच पाणी दिसत असे.
नदीत वार्‍याच्या झोताने माना डोलावणार्‍या पण पूराच्या पाण्याने न डगमगणार्‍या लव्ह्याळ्या आम्हाला आकर्षीत करुन जात असे. खडकाला चिकटलेला चिल्हा कधी कधी आम्हाला घसरुन खाली पाडत असे.
पोळ्याच्या सणाच्या जवळपास नदीच्या उथळ पाण्यात किंवा एखाद्या शेताच्या बदाडात गवताच्या जातीचे उंचच उंच वाढलेल्या पड्याळाचा घोळका मोठ्या दिमाखाने डोलत असलेले दिसायच्या. त्यांचे ते पांढरेशुभ्र तुरुंबे जणू काही तरूणींच्या डोक्याच्या केसाच्या बुचड्यात खोवलेले आहेत असं ते विलोभनीय दृष्य वाटायचं. नदीकाठावर बरेच रानकांद्याचे बुडं एखाद्या कोरफडीच्या झाडासारखे दिसायचे.
दूरवर त्या नदीत टिटवीचं मन उसवून टाकणांर ‘टिटीव-टिव’ असं तिचा आकांत सुरु राहायचं. तिच्या मागे धावायला आम्हाला मजा वाटायची. मग ती तुरुतुरु ओरडत पळायची. जवळ गेलो की उडून जायची.
कावळे व आणखी काही पक्षी पाण्यात डुबक्या मारुन आपले अंग धुत असायचे.
पांढर्‍या शुभ्र रंगाचे बगळे मासे पकडण्यासाठी बराच वेळ एका पायावर एकटक ध्यान लाऊन उभे राहात असत.
एखाद्या वेळेस नदीच्या पाण्यात काठाजवळ पाणकोंबडी नजरेस पडे. आमची चाहूल लागली की ती झाडीत जाऊन लुप्त होऊन जात असे. मग तिचा माग काढत कितीही शोधले तरी दिसायची नाही.
नदीत आम्ही मुले चापट दगडाचे चिपोरे पाण्यात असे काही भिरकावत असे की तो चिपोरा दोन-चार ठिकाणी टुन...टून... उड्या मारत जात असे. मग कुणाचा दगड जास्त उड्या मारत दूर जाते याची शर्यत आमच्यात लागत असे.
असंच एकदा पावसाळ्याचे दिवसं होते. शाळेत दुपारचा वर्ग चालू होता. उकाड्याने घाम येत होता. त्यामुळे खूप पाउस येईल असंच चिन्ह दिसत होतं.
खरंच, काही वेळाने आभाळ भरून आल्यामुळे वर्गात थोडा अंधार पसरत चालला होता. आता जबरदस्त पाउस येईल असंच वाटायला लागलं होतं. सर्वांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटायला लागल्या होत्या आणि मनात कालवाकालव सुरु झाली होती. अशी सर्वांची अवस्था पाहून गुरुजींनी वर्ग सोडून दिला. आम्हाला पाऊस सुरु होण्यापूर्वीच लवकर घरी जाण्यास सांगितले.
एरवी एखाद्या वेळेस खूप पाऊस आला, वाघाडी नदीला पूर आला, असे वाटले की गुरुजी आम्हाला आमच्या गांवला जाऊ देत नसत. तेव्हा ते शाळेतच आम्हाला रात्रभर थांबायला सांगत. आमच्या घरच्या लोकांना काळजी लागून जायची. कारण त्यांच्यापर्यंत निरोप पाठविण्याची काहीही सोय नव्हती.
अशावेळी गुरुजी बाब्याच्या आईला आमच्यासाठी भाकर व चूण करायला सांगत. बाब्या माझ्या वर्गात शिकायला होता. तो आणि त्याची आई असे दोघेजन निळोण्याला राहत असत. आमच्या शाळेच्या पाठीमागे त्याची शेती होती. तो ‘भाटी’ समाजाचा होता. सहसा या समाजाचे लोकं शहरामध्ये राहतांना दिसतात. बाब्याच घर खेड्यामध्ये असणं म्हणजे अपवाद वाटत होता.
कधीकधी पाऊस येऊन गेला असेल किंवा गुरुजींना वाटले की नदीला पूर आला असेल, तेव्हा ते आमच्या सोबत नदीपर्यंत येत असत. पुराचं पाणी ओसरण्याचे चिन्ह दिसले की ते तेथेच आम्हाला थांबवून ठेवत. पूर कमी झाला की एकतर लहान मुलांना खांद्यावर बसवून किंवा हात धरुन आम्हाला दुसर्‍या काठावर पोहचवून देत.
आम्ही चौधर्‍याचे सर्व मुले पाटी-दप्तर घेऊन त्या दिवशी लगबगीने शाळेच्या बाहेर पडलो. नदी पर्यंत त्या गोटाळ पांदणीने धावत, पळत सुटलो. नदी वाहत असलेल्या वरच्या बाजूला खूप आभाळ भरुन आले होते. त्यामानाने इकडे आभाळ कमी होते. परंतु ते आभाळ खाली खाली सरकत येत होते. त्यावरून वर निश्चीतच पाणी पडत असावे व पुराचे लोंढे आता लवकरच वाहत येतील असा आम्ही अनुमान लावला होता. त्या लोंढ्याचा दुरुनच गडगडऽऽ असा आवाज पण येत होता. त्यामुळे आम्हाला भिती वाटायला लागली होती. ते लोंढे धडकण्यापूर्वीच वाघाडी नदी ओलांडून जायला पाहिजे म्हणून जिवांच्या आकांताने आम्ही सर्व मुलं पाण्यात उतरलो. पलीकडच्या काठावर पोहचतो न पोहचतो तर आमच्या डोळ्यासमोरुन पूराच्या गढूळ पाण्याचे लोंढेच्या लोंढे धडधडऽऽ करत वाहत गेले. पाहतां पाहतां नदी पुराने टम्म फुगून गेली होती. दोन्ही थड्या भरभरून वाहू लागल्या. एका क्षणात वाढलेलं ते पुराचं अगडबंब पाणीच पाणी पाहून आमची बोबडीच वळली. आम्ही थोडा वेळ जरी उशीर केला असता तर आमचे काय झाले असते ? या कल्पनेने आम्ही भेदरुन गेलो होतो.
आम्ही जरी मनातून घाबरलो असलो, तरी तो पूर पाहण्यासाठी आमचे पाय मात्र थोडावेळ तेथे थबकले होते. ते अवर्णीय व विहंगम असे दृष्य आम्ही आमच्या डोळ्यात साठवत होतो. पुराचे ते तांडव. अथांग पाणी, अक्राळविक्राळ रुप छातीत धडकी भरवीत होती.. त्या पूरात मोठमोठे उन्मुळून पडलेले झाडं, खोडाचे ओंढके, पाला-पाचोळा, काड्या-फांद्या असे काहीबाही त्या पूरात वाहून जात होते. मध्येच एखाद्या भोवर्‍यात सापडले की ते गिरक्या घेऊन आंतमध्ये गुडूप व्हायचे व काही अंतरावर वर निघून परत वाहायला लागत असे. नदी पाण्याला कधी आक्रसून घेई तर कधी आणखी फुगवत असे. .
थोड्यावेळाने धाडधाड पाऊस सुरु झाला. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरु झाला. आम्ही मुलांनी मोठ्या दांड्याच्या व आकोड्याच्या त्या छत्र्या ऊघडून वेगवान वारा आणि बेधुंद पावसाच्या धारा झेलत, रस्ता तुडवत, मोठ्यामोठ्याने पाय टाकत गांवला चालत गेलो.
खरंच पाऊसाचे अनेक रुपे आहेत... नाही कां? कधी अल्लड बाळासारखा झेपावतो. तर कधी दुष्ट राक्षसारखा बरसतो. तर कधी सुकुमार तरुणीसारखा लचकत, मुरडत रिमझिमतो. तर कधी दानगटासारखा कोसळतो. असं त्यांच त्या त्या वेळी ते ते रुप आपल्याला भावतंदेखील!
कधीकधी श्रावण महिन्यात तर एक वेगळाच नजारा पाहायला मिळत असे. आम्हाला अभ्यासाला बालकविने रचलेली एक कविता होती.
‘श्रावण मासी, हर्ष मनाशी, हिरवळ दाटे चोहिकडे !
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात येऊनी उन पडे !! अशी ती कविता होती.
खरोखरच क्षणात पाऊस यायचा तर क्षणातच उन्ह पडल्याचे दिसत असे. त्या रिमझिमणार्‍या धारा कलत्या सूर्यप्रकाशात न्हाऊन जरतारी होत जातांना आपण हुरळून जात होतो. अशावेळी क्षितीजावर अचानक इंद्रधनुष्य उमलू लागत असे. सात रंगाचं उधळण केलेलं ते तोरण वाटत असायचं. असे ते विलोभनीय दृष्य मनात साठवतांना उर भरुन येत असे.
एखाद्यावेळेस नदीच्या काठावर परसाकडे बसलो की वाहत्या पाण्याची खळखळ पाहत असे किंवा त्यावेळेस नदीच्या पाण्यात लहान लहान दगडं फेकत असे. कुठे आवाज कमी येतो... कुठे जास्त येतो... त्यावरुन कुठे खोल पाणी आहे... कुठे उथळ पाणी आहे... याचा अंदाज घेण्याच्या खेळात आम्ही वेळ घालवित होतो.
एके दिवशी मी असाच खेळात रमलो असतांना एकदम गुरुजी शिकवत असलेल्या त्या धड्याची आठवण जागी झाली. दगडावर ‘राम’ असे लिहून पाण्यात फेकून पाहण्याच्या त्या उर्मीने उचल खाल्ली.
मी जवळचा एक लहानसा दगड उचलला. त्यावर लेखणीने ‘राम’ असे अक्षर लिहीले व तो दगड खोल पाण्यात फेकला. मला वाटलं आता चमत्कार होईल व दगड तरंगेल. म्हणून मी उत्कंठतेने डोळे फाडून त्याकडे पाहू लागलो. पण तो दगड पाण्यात बुडला.
मी आणखी एक दगड घेतला. त्यावर ‘राम’ असे लिहीले व दुसरीकडे पाण्यात फेकला. पण तोही दगड बुडला. असा प्रयोग मी पुन्हा पुन्हा करुन पाहिला. पण कोणताही दगड काही केल्या पाण्यावर तरंगल्याचं मला आढळले नाही. माझे रामाच्या नांवाचे दगडं फेकण्याचे सारे परिश्रम वाया गेले. पण ‘रामाच्या नांवाने कोण वाया गेले ?’ याचा मला काहीही अर्थबोध झाला नाही. तेव्हा त्या धड्यातील खोटेपणा माझ्या लक्षात आला. पुस्तकात असे खोटं खोटं लिहून लहानग्या, चिमुरड्या मुलांच्या डोक्यात अशा प्रकारच्या अंधश्रध्दा कां भरतात कुणास ठाऊक ? याचं मला आश्चर्य वाटलं.

गुलमोहर: 

खरं म्हणजे ही दिर्घ कथा आहे, ३५०० शब्दाचे वर. म्हणून मी कादंबरीमध्ये टाकली आहे. कथेमध्ये टाकली असती तर कदाचित वाचकांना कंटाळ्वाणे झाले असते.