माझ्या चिऊच बाळं....

Submitted by सत्यजित on 7 August, 2008 - 00:43

चिऊताई चिऊताई गातेस का गं गाणे
एक उडी, दोन उडी, टिपत जाते दाणे

चिऊ चिऊ खिडकीतून टकामका पाही
हळुच येशी घरात पाहता कुणी नाही
मला पाहता तुझी कशी धांदल उडते
इकडे उडत, तिकडे उडत, बाहेर पळते

कुठुन आणलस गवत? नी कुठुन आणलास चारा?
अरे देवा! कपाटावर मांडलास किती हा पसारा
अस्सं नक्को करु बाई, तुला आई गं रागवेल
सांगतो तिला तुझ्यासाठी बेड ती मागवेल

ह..म.. इवल्या इवल्या बाळाला मऊ बेड हवा
कपाटवर झोपेल खात फॅनची मस्त हवा
मऊ मऊ पिसांवर लोळत बसत छान
मला बोलवत असत काढुन बाहेर मान

दाणे हवे तुला? का हव तुला पाणी?
आता घेउन खाउ, आई येईल, गं राणी
चिऊ चिऊ करत बाळ कीत्ती कीत्ती रडे
चिऊ चिऊ बाळाला हवे होते कीडे

चिऊ चिऊ करत बाळ केवढं मोठ्ठ झालं
चिऊ चिऊ करत बाळ आभाळात उडालं
चिऊ चिऊ बाळ गातं, चिऊ चिऊ गाणे
एक उडी, दोन उडी, टिपत जातं दाणे

एक उडी, दोन उडी, टिपत जातं दाणे.... सत्यजित.

गुलमोहर: 

सत्यजीत मी तुमच्या बाल कवितांच्या फॅन आहे
आल्या आल्या तुमची चिऊताई भेटली, तिनदा मोठ्याने वाचली कविता
छानच् जमलीये पण म्हणताना लय जमवण्यास थोडी अडचण येते १ ठिकाणी ...
बघा कसे वाटतयं..... आता माझी मुलगी शाळेतून आली की लग्गेच तीला वाचून दाखवतो.....मोठ्यांनी

अस करु नको बाई, तुला आई गं रागवेल - च्या ऍवजी
अस्सं नक्को करु बाई, आई तुला गं रागवेल

हे बाकी माझं मत आहे हं
गोदेय

गोदेय मस्त.. तुम्ही सुचवलेला बदल केला आहे...

आणि हो तुमच्या चिमणीला म्हणुन दाखवताना हावभाव करुन दाखवा..
एक उडी, दोन उडी, टिपत जातं दाणे.. ला एक उडी, दुसरी उडी मारुन दाणे टिपायची ऍकशन नक्की करून दाखवा...

सही है भिडू!
एकूणच तुझा जीवनप्रवास कवितेतून व्यक्त होतो म्हणायचा! Happy
कमीत कमी कडवी वापरली तर पोरांना पाठ करायलाही सोपे जाईल! (एक आगाऊ सूचना!)
भाच्याला शिकवताना उड्या मारून दाखवीन नक्कीच!:)
_________________________
-Man has no greater enemy than himself

पुन्हा एकदा छानच! Happy

छान Happy