उड जायेगा हंस अकेला- फुलोंकीघाटी, हेमकुंड ४

Submitted by रैना on 3 October, 2011 - 23:46

भाग १
भाग २
भाग ३

उड जायेगा हंस अकेला, जगदर्शन का मेला..
Collage-ValleyOfFlowers1-1.gif
Clockwise
1. Trailing Geranium (Geranium procurrens) 3. Himalayan knotweed (Persicaria wallichii)
4 Woolly Pearly Everlasting (Anaphalis triplinervis) 5.Alpine Forget me not (Myosotis alpestris) (The blue flower) 6. River Windflower (Anemone rivularis) (The white flower)

कोंबडं आरवायच्याही आधी पहाटे चारला दार वाजले. गरम पाणी च्यामारी. हीऽऽ थंडी.. दात वाजत होते. शैलजातै अंघोळीला गेल्या, म्हणजे मलाही पंधरा मिनिटांत उठण्याशिवाय गत्यंतर नव्हते. हातपाय हलवून पाहिले. सर्व व्यवस्थित हलत होते आणि इगो वगळता कुठे फारशी इजा झालेली दिसत नव्हती. रिकीब टोचून टोचून पायावर काळेनिळे वळ पडले होते तेवढेच. श्वास चालत होता. एकंदरीत बरे होते सर्व. साहेब आले वेकप-कॉल द्यायला आणि हालहवाल विचारायला. त्यांनाही तेच सांगितले की बरी आहे परिस्थिती.
एव्हाना जीवात जीव आल्यामुळे भिंतीचा रंग भयाण निळा आहे, फरशीवर घाणेरडी लाल सतरंजी आहे ते दिसले, ओल दिसली. रुमावतार दिसला. जिथे फक्त वर्षातून तीन महिने पर्यटकहंगाम असतो, तिथे एवढे होते हेच नशीब. पाऊण बादली गरम पाणी चवथ्या मिनीटाला थंड होते इतकी थंडी. न्हाणीघरात शैलजाच्या टॉर्चचा आणि स्वतःचाच काय तो उजेड पाडणे अपेक्षित होते. त्या घोळात घड्याळ हातातून पडून काच फुटली. तरी जाताना नवरा म्हणालाच होता की नेऊ नकोस घड्याळ. पण इतरांना 'पहा, मी सांगितले नव्हते?' असे म्हणायला वाव तरी मिळाला पाहिजे की !

बाहेर थंडी, रिपरिप पाऊस आणि जरासे कुठे फटफटल्यासारखे. शैलजाने प्रेमाने तिची एक्स्ट्रॉ स्वेटर, कानटोपी उसनी दिली. स्वातीला मळमळत होते आणि उलटी झाली. उंचीच्या त्रासाचा करिष्मा सुरूच होता. काळजी वाटत होती.

खाली न्याहरीला उतरलो. कालच्या चढाईच्या दास्तां बयाँ होत होत्या. हल्दीराम नावाचे दुसरे सद्गृहस्थ आर्डरी घेत होते आणि घोळ घालत होते. जळके टोस्ट. म्हणजे खास काळजीपूर्वक जाळलेले.

आता मला पुन्हा धाप लागणे सुरू झाले. राजेश्रीकडे (आमच्या टीमची सर्वांत सिनीयर व्यक्ती) डायमॉक्स नावाच्या उंचीच्या त्रासासाठी गोळ्या होत्या. त्या तिने ट्रेकलीडरला विचारून स्वातीला आणि मला दिल्या. आम्ही घेतल्या.
'गुनगुना' पानी (काय गोड शब्द आहेत ना? 'गुनगुना' म्हणजे प्यायचे गरम पाणी. अगदी उकळते नाही. घशाला सोसवेल इतपत गरम), साखरेचा पाक असलेला चहा (एक घोट घेतला की कॅलरीमापक खळकन फुटलाच पाहीजे), जळके टोस्ट.. न्याहरी, गप्पा सुरू होत्या. रमण्यांनाही फार त्रास झाला होता चढताना. राजेश्री चढली होती व्यवस्थित. तिचे वय पाहता तिच्या फिटनेसला खरोखर सलाम.

निशांत म्हणत होता, काल शेवटच्या टप्प्यात त्याच्या पायात भयानक गोळा आला होता. त्याने दुर्गेशला पुढे जायला सांगितले आणि तो जरा बसला. पण उठताच येईना. बराच वेळ बसला होता. मिट्ट काळोख पडला होता आणि थंडी वाढली होती. तेवढ्यात एक सरदारजी आले, ते गुरुद्वाराचे कसले तरी पदाधिकारी होते. त्यांनी त्याच्या पायाला काहीतरी करून दिले, त्यामुळे निशांतला बरे वाटले आणि तो पुढे चढून येऊ शकला. त्या गडबडीत सरदारजींचे नाव विचारणेच राहून गेले त्याचे. सुजय म्हणत होता की तो बर्‍यापैकी एकटाच चढला होता आणि इलेक्ट्रॉल आणि दोन अ‍ॅपल वगळता काहीही न खाता-पिता चढला होता. उंचीच्या त्रासामुळे कधीकधी मेंदूला सूज येऊ शकते असे बोलता-बोलता साहेब म्हणाले.. झालं..
झालं तो शब्दप्रयोग लगेच हिट झाला. कोणी फार मंदपणा किंवा बधीरपणा करू लागला की 'मेंदूला सूज आलीये का?' अशा येता-जाता टवाळक्या सुरू झाल्या. आजचा ट्रेक अगदी सोपा आहे असे ट्रेक-लीडर म्हणाला आणि जराश्या आशा पल्लवीत झाल्या.

रहायच्या ठिकाणापासून घाटीच्या प्रवेशद्वाराच्या चढणीपर्यंतचे सातएकशे मीटर कापले. ढिस्स...
दम.. नाव घाटी आणि मग एवढं चढवतात कशाला च्यामारी? घाटी म्हणजे खरंतर उतार नको? (आठवा - हिमालयातील बाळटेकड्या. घाटी असेल हो, पण हिमालयातील पर्वतरांगामध्ये आहे. तिथपर्यंत चढावेच लागते.)Valley to upload.jpg

किंचित भुरभूर पाऊस, खरंतर स्वच्छ सूर्यप्रकाशाची वेळ पण एक प्रकारचा निराशादायी कोंदट उजेड होता. थंडी, खेचरांना घातल्या गेलेल्या हाळ्या, त्यांच्या गळ्यातील घुंगरं, हेमकुंडाला निघालेले जथ्थे, 'पिथ्थु घ्या, पिथ्थु घ्या' म्हणून मागे लागलेले स्थानिक लोकं. घाटीत खेचरांना परवानगी नाही. फक्त पिथ्थु. 'मॅडम आपकी साँस कितनी फुल गयी है, पिथ्थु ले लो,' असे फारच मागे लागले. चढू सुद्धा देईनात, सारखे पायात पायात. प्राण गेला तरी पिथ्थुबिथ्थुत बसायची तयारी नव्हतीच. डोकंच सरकलं. 'आप प्लीज मुझे तंग मत कीजिए, चलने तो दीजिए, एहसान होगा, प्लीज' असे सणकून सांगितले, तसे माश्यांसारखे घोंघावणारे जथ्थे पांगले. नंतरच्या दोन दिवसांत बर्‍याच जणांचे फ्युज उडत होते ते बहुतेक मेंदूला सूज आल्यामुळेच.
(दुसर्‍याच्या पाठीवरल्या पिथ्थुत न बसून आपण मानवीहक्कांबाबत सावधान असतो की त्या गरीब लोकांच्या उपजिवीकेच्या मार्गात फुकटची बुद्धीजीवी धोंड? या प्रश्नाचे न बोचणारे उत्तर मिळाले तर मलाही सांगा.)

Collage-ValleyOfFlowers3-1.gif
Clockwise
1. Green BellflowerVine. 2. Himalayan Cinquefoil
प्रवेशद्वारापाशी रमण्यांनी पिथ्थु केला सामानासाठी आणि त्या म्हणाल्या, 'दे तुझीही सॅक'. अजिबात मनात नव्हते पण पब्लिकने तब्येतीची चौकशी करकरून मला त्यात सॅक टाकायला भाग पाडले. सुजय म्हणाला, 'हे पहा, श्वास घ्यायला त्रास होतोय तर काय करणार? घाटी पहायची आहे की नाही तुला? ऐक जरा, सॅक दे,' शैलजा, सुजय, ट्रेक-लीडर, स्वाती यांच्या संयुक्त दबावामुळे ती सॅक मी अत्यंत नाखुशीने दिली आणि ते बरेच झाले एकुणात.

'फुलों की घाटी राष्ट्रीय उद्याना'च्या प्रवेशद्वारापाशीच 'माऊस हेअर' दिसला. कसला गोड होता. लुचूलुचू गवत खात होता.
http://www.treknature.com/gallery/photo145593.htm
आत शिरताना शर्मिलाचे शब्द आठवले. ती म्हणाली होती, 'फार जास्त अपेक्षा ठेवू नकोस गं व्हॅलीकडून!!' सत्यवचन. नोंदवून ठेवा. उपयोगी पडेल. आपल्या डोक्यात कधीकाळी पाहिलेला सुंदर फोटो असतो. पण तिथवर जायला, पोचायला आणि उत्तम प्रकाश मिळून छायाचित्र काढायला किती सव्यापसव्य असतो ते केल्याशिवाय कळत नाही. व्हॅली अप्रतिम सुंदर आहेच, पण ती तशी दिसणे हे हवामानाच्या लहरीवर, नशिबावर आणि तुमच्या फिटनेसवर अवलंबून आहे.

डोक्यात ती 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' वाली ट्युलिप्सची बाग असेल, आणि आपण अगदी सुंदर झुळझुळीत साड्यांचे पदर फलकारत तिकडे आरामात गाणी म्हणत बागडू अशा काही येडचॅप फिल्मी कल्पनांची कमीअधिक आवृत्ती नकळत जरी असेल, तरभ्रमनिरासनिश्चित. पहिले स्वतःचा अवतार पहावा. थंडीचे, पावसाचे कपडे, कानटोप्या, काठ्या, सॅक असले सोंग पाहता तिथे स्वतःचा जीव मुठीत धरून घाटी मनसोक्त पाहता आली तरी 'शाब्बास!' असली गत होऊ शकते. किंवा अगदी हा स्वर्गच असेही काही डोक्यात असेल तरीहीभ्रमनिरासनिश्चित.. कदाचित ती तुम्ही आतापर्यंत पाहिलेली जगातली सर्वात सुंदर जागा असेलही. अ‍ॅनरँडतापातील एक अविस्मरणीय वाक्य - 'contradictions don't exist, check your premises'..
Valley Upload.jpgएकूणच छायाचित्रांवरून तसेही जागा आजमावू नयेत. Don't judge a place by the photographs (that someone else may have taken and to be truthful not even by your own photographs. Remember that photographs are pale imitations of what you saw, and one tends to believe it is the other way round.) 'धोबीघाट'मधील फ्रेम्समध्ये मुंबई सुद्धा सुंदर वाटते. (पळाऽऽऽ)
तात्पर्य: तुझेवाचूनघाटीतगेलोआणिझकमारली अशी माझ्या नावाने बोंब मारू नका!
डिस्क्लेमर खतम.
आता जालावरचे फोटो पहा. गेल्याशिवाय राहवेल? असे फोटो मिळायला चाळीस तरी वेळा जावे लागेल ते सोडा !

आता जरा चांगला प्रकाश होता, पाऊस थांबला होता, वरती निळेशार आकाश होते आणि खळखळत येणारा पांढराशुभ्र प्रवाह आणि? ढलन... थोडा रस्ता बदलावा लागला. पिथ्थुवाहक काकांनी मार्ग दाखवला. एक आजोबा दुसर्‍या पिथ्थुत बसले होते. त्यांना तशा कोनातून आकाशाशिवाय नक्की काय दिसत असेल ते कळेना. शिवाय हे वाहक बिचारे एवढे वजन कसे काय उचलतात हेही.

तो पहिलाच प्रवाह इतका सुंदर होता की 'दिल गिरा वहीपे दफ्फतन'. शैलजास्वातीकडे पाहिले, त्यांनाही तेच वाटत होते हे लख्ख समजले. इतर सर्वांनाही. त्या तिथे वर चढताना मला तोच भाव प्रत्येकाच्या चेहर्‍यावर परावर्तीत दिसला. लोक (काही आमच्यातले आणि काही इतर ट्रेकर्स) आणि आपणही इतके प्रसन्न क्षण क्वचितच अनुभवतो. एक शब्दही बोलायची जरुरी नव्हती. कितीसुंदरआहे हे म्हणणेही फालतू वाटले असते, कारण इतर वेळी आपण शब्द कॅरमबोर्डावरच्या गोट्यांसारखे सटासट मारत असतो. साध्या साध्या शब्दांच्या घनघोर अर्थछटांशी आयुष्यात फारच उशिरा परिचय होतो. (खंडेरावांची तीच तर समस्या आहे. जगाचा अर्थ शब्दकोशात गावत असता तर अजून काय हवे होते राव?) 'सुंदर' आणि 'अप्रतिम' या शब्दांवर तर दणकून कर लावला पाहिजे अक्षरशः !!! असो. तर त्याक्षणी डझनभर अनोळखी लोक एका अलौकिक गूढ सौंदर्याने एकत्र बांधली गेली. प्रत्येकाच्या गळ्यात तो एक अदृश्य माणिक अलगद जाऊन विसावला आणि चंद्रकोरीसारखा लखलखला हे त्या क्षणी पक्के कळले. Then I go and spoil it all by sayin something stupid like 'I love you' . माझी मुलगी कधीकधी 'मी थँक्यू नाहीये', 'मी सॉरी नाहीये' म्हणते. म्हणजे तिला अगदी उलट म्हणायचे असते, आणि म्हणले पाहिजे हे माहिती असते. तर.. आपणही तसेच म्हणूया.. 'घाटी सुंदर नाहीये.' !!!!!!

simple%20collage%201.jpg
तिथून पुढला रस्ता माझ्यातरी क्षुद्र आयुष्यातील सर्वात ___ (कर!!) रस्ता होता निश्चित. चढ येत होते, जात होते, प्रत्येक चढावर बरगडीत सुरा खुपसल्याइतके दुखत होते आणि खोकला आणि धाप. आलं, पाणी, शैलजाकडच्या चोखायच्या गोड गोळ्या, कोरेक्स, कापराचा वास काय वाट्टेल ते घ्यावे लागत होते. पहिल्याच ठिकाणी - जिथे एका दगडावर जिथे जागा दिसेल तिथे मी भसकन बसले तिथे - शेवाळ्याची ओल होती. तिचा रंग कपड्यांना चांगला पक्का लागला. (दाग अच्छे है!!) विविध प्रकारच्या फुलांचे लहानमोठे ताटवे, त्यांचे पांढरे, पिवळे, निळे, जांभळे, काळपटलालचुटुक, फक्कं गुलाबी, क्वचित हिरवेही रंग त्या राखाडी दगडवाटांमध्ये ____ ___ (कर!!).
(जांभळ्या आणि निळ्या रंगाचे गारूड मला घाटीत पहिल्यांदा समजले.)
Pinkbrowed Rosefinch (पक्षी) कसली भारी दिसते. साधारण गुबगुबीत चिमणीसारखा आकार आणि राणीरंगात पाणी कालवले तर कसा दिसेल असा रंग. टनावारी Blue Whistling Thrush & Rosefinch दिसले.

महामूर्खपणा क्रमांक ३: आत्ता पाहूयात, येताना उतार असेल तेव्हा फोटू काढुयात! अत्यंत अक्कलशून्य निर्णय.
महामूर्खपणा क्रमांक ४: पिथ्थुमध्ये पुढे दिलेल्या बॅगेत माझे सर्व पैसे होते. ते जर गेले असते तर वाट लागली असती. पैसेगेलेतरकायकरु? असा विचार बैलाला टोचलेल्या आरीसारखा टोचून जात असे.

..पूर्ण ट्रेकमध्ये शैलजा आणि मी बर्‍यापैकी बरोबर होतो.. मला ठायी ठायी बसल्याशिवाय चालता येत नाही आणि शैलजा एकाच गतीने न थांबता पुढे चालत असे. तरीही आमच्या चालण्याची आणि मुख्य म्हणजे पाहण्याची ,संवादाची आणि शांततेचीही लय सम पुढेमागे करत का होईना, पण उत्तम जुळली. प्रवासात यासारखं दुसरं भाग्य नाही. स्वातीचा चढण्याचा वेग मस्तं आहे. ती झपाझप चढते.

बाकी ज्यांना जाईजुईसायलीच्या पाकळ्यांवरही जीव ओवाळावासा वाटतो त्यांना घाटीत गेल्यावर वेड लागायची वेळ येणार. रानफुलांचे ताटवे.. फुलपाखरं, रंगांचा जल्लोष असतो आणि त्या राखाडी दगडाच्या कॅनव्हासवर तो दिवाळीच्या आतिषबाजीसारखा भासतो. Something snaps inside you.
जाईजुईसायली सुद्धा अतिपरिचयाची असली म्हणून 'हूं' करायची घाई नको. आठवा 'मोगरा फुलला' कोणी लिहीले? असले काहीतरी चमत्कारीक विचार येतजात होते.

जंगली फुलांचे सौंदर्य आखीवरेखीवसुवासिकगोंडस नाही. ते नुसते फुटत असते. पानापानातून, पाकळीपाकळीतून, उत्फुल्ल. त्यांच्या आकारांचे, घाटांचे सपकारे बसतात पाहणार्‍याला (क्वचित घणही). पिंड जर शिस्तबद्ध रेखीव सुबकपणावर अकारण पोसला गेला असेल (ट्युलिप!!) तर टू बॅड.
आणि घाटीत म्हणाल तर काय तो चमत्कार. वर्षातून फक्त दोनेक महिने फारफारतर पूर्ण घाटी बहरते. उग्र हिमालयाच्या पर्वतरांगांवर एकाच वेळी लाखो फुलं, शेकडो रंगांची, ३००+ जातींची, राखाडी दगड आणि भू-स्खलन, मध्येच हिरवाजर्द गवताचा तुकडा, ग्लेशियर, शेवटी गंगेला जाऊन मिळणारे शुभ्र प्रवाह, शीळ घालणारे पक्षी, कित्येक वर्षे जुने वृक्ष, सर्व एकत्र पाहणे हे सुद्धा स्तिमित करून टाकणारे.

...मध्येच आम्ही एक वृक्ष पाहिला. त्याच्या सर्व फांद्यांवर, खोडावर बॉटलग्रीन शेवाळं, चांगलं जुनं, पक्कं. लाकुड सुद्धा दिसेना. शेवाळ्याचे झबले घातल्यासारखा तो वृक्ष आणि पिंपळपानांच्या आकाराची पोपटीजर्द पानं आणि त्यातून झिरपणारी किरणे !! शैलजा आणि मी तो वृक्ष पहात कितीतरी वेळ थांबलो होतो. झाड आणि वृक्ष यातला फरक म्हणजे 'छोटाखयाल' आणि 'बडाखयाल' मधलाच की !!

वाटेत जपानी दिसणार्‍या टुरिस्टांनी वात आणला होता. प्रत्येक मिनिटाला दोन या गतीने ते फोटू काढत होते. आजूबाजूचे नाही, स्वतःचे!! तशा बाया चांगल्या होत्या, शैलजाला एका ठिकाणी त्यांनी कापराचा अर्कही हुंगायला दिला. पण मधून-मधून वाटा इतक्या चिंचोळ्या होत्या की यांच्या मॉडेलिंगसाठी वाहतूक थांबत होती. तेवढ्या फोटो काढण्यावरून आणि चेहरेपट्टीवरून जपानी वाटत होत्या, पण भाषा जपानी नव्हती येवढे नक्की.

पिथ्थुतले आजोबा मधूनच पिथ्थु थांबवून खाली उतरून झाडांना हुंगत असत. पण चांगले होते. त्यांनी बरीच झाडं दाखवली. एक भूर्जपत्राचा वृक्षही दाखवला. आणि भूर्जपत्र म्हणजे काय ते समजावून सांगत होते. मी पण ऐकली शकुंतला-दुष्यंताची कहाणी गुपचूप. म्हातार्‍या माणसांना काय सांगणार माहितीये ते? आणि सांगून उपयोग शून्य. ऐका निवांत. त्यांचा पिथ्थुवाला हळुच म्हणला 'बुढ्ढा बहोत बात करता है. हरसाल आता है'.

कानावर मराठी पडले. एक जोडपं लेन्स बदलावी की नाही, आणि कास पेक्षा बरंय यावर चर्चा करत होते. शैलजा बोलली त्यांच्याशी थोडी. त्यांनी पिथ्थुमध्ये सर्व सामान टाकले होते आणि शाही इतमामाने फोटू काढत होते. जर शिष्ट वाटले. बोलायची तसदी घेतली नाही.

उन्हं डोक्यावर आली होती. श्वासाचा त्रास वाढला. चालत होतो. मध्येच एका ठिकाणी पुष्पावती नदीवरचा पूल होता. ही पुढे जाऊन लक्ष्मणगंगेला मिळते. सुरुवातीला, मध्ये, शेवटी, असे चौघेजण आम्ही पुलावर उभे होतो. निशःब्द. खाली फेसाळत्या शुभ्र पाण्याची रौद्र शांतता. तोही क्षण चौघा व्यक्तींचा म्हणून चांगला लक्षात आहे. असे म्हणतात की पांडवांना त्या प्रवाहात फुलं दिसली म्हणून त्यांनी त्या नदीचे नाव पुष्पावती ठेवले.
http://en.wikipedia.org/wiki/File:Pushpawati_bridge.jpg
पुलाच्या बाजूला दगडावर चक्क Voltaire चे वचन Nature has always had more force than education. उत्तराखण्ड सरकार की जय! फलकप्रतिभेला मानले पाहिजे. ठिकठिकाणी लिहीलेली काही वाक्यं खरंच चांगली होती.

स्वातीला वाटेत मूर्तीकाका भेटले. त्यांच्या हातात 'Flowers of Himalayas' नावाचे पुस्तक होते. ते त्यांनीच लिहीले होते. (स्वतःचेच पुस्तक हातात घेऊन का फिरत होते कोण जाणे !!) काका लै भारी होते. हातात कॅननचे अद्ययावत मॉडेल होते, ट्रायपॉड होता आणि झपाझप चालत होते. साठीचे असतील- नसतील. एका ठिकाणी मी बदकन बसले तसे वसकन ओरडले.. 'Don't sit here, move, move.. landslide'. अरे रामा! इतकी दमले होते की वरून हळुहळू दगड पडताहेत ते काही लक्षातच आले नव्हते. काकांनी 'जीव कसा जपावा' वर चार वाक्ये सुनावून पुण्य संपादन केले, आणि माझ्या पडेल चेहर्‍याकडे पाहून ए क पोलोची गोळी काढून दिली. ए क !!! With Compliments म्हणे.. एव्हाना मला मनातल्यामनातही तिरकस शेरा (किंवा लिमयेजोक्स) मारण्याइतकी एनर्जी नव्हती.

IMG_3242.JPG

वाटेतला एक ग्लेशियर. काय दिसतंय ते विवर. बर्फावर पाय घसरायची भिती.
दोहोबाजूंनी अजस्त्र डोंगर. मधूनच एखाद्या बर्फाच्छादित शिखराचे दर्शन व्हायचे. भान हरपून पहा. खाली बसा. श्वास घ्या. अंगावरची, चेहर्‍यावरची उन्हाची किरणे धमण्यांपर्यंत पोचली की उठा. चाला. हातापायाला आणि विचित्र म्हणजे चेहर्‍याला मुंग्या येऊ लागल्या. आजूबाजूला लोक होते. विविध भाषांत चित्कारत होते. शांततेची लय बिघडू लागली. प्राची सुद्धा फार थकली होती. तिचीही हालत चांगलीच टाईट होती. एका क्षणी वरपर्यंत जाऊ शकू याची खात्री वाटत नव्हती. आम्ही एकमेकींना धीर दिला आणि पुढे निघालो.
20110809124452(1).jpg
'और कितना दूर है?' हे विचारत विचारत, फुलं पहात, वारा खात, श्वास मोजत चालत होते. शेवटच्या टप्प्यात अगदी एकटीच होते. आता पल्याडच्या उजवीकडच्या डोंगरावर घाटी, ती काय तिकडे... असे मूर्तीकाका म्हणाले. ते गेले झपाझप पुढे. मी थोडावेळ बसले आणि कसातरी शेवटचा रेटा असे म्हणून हिम्मत केली. अगदी शेवटी एका चारेक फुटाच्या लांब फळकुटावरुन प्रवाह पार करायचा होता. तो हात धरून पार करून द्यायला आले.. कोण? तर मोहनबाबू. अजिबात गरज नव्हती, पण तेवढेही बोलायची ताकत नव्हती, त्यांची वायफळ बडबड ऐकत फळकुट पार केले... फळकुटाखालच्या प्रवाहाचा आवेग, फळकुटावर चालताना सुद्धा स्पष्ट जाणवत होता. ते डगडगत नव्हते पण फळकुट नक्की वजन पेलू शकेल ना?

वर एका दगडापाशी सगळेजण बसले होते. एक कोंडाळ करून आम्ही खायला बसलो. लीर्डरसाहेबांनी सगळ्यांसाठी ब्रेडजॅम पॅक करून घेतले होते. आणि प्रत्येकाकडचा खाऊ निघाला. सुसंगती नसलेले येडचॅप पदार्थ होते ब्रेडजॅम, शेंगदाणे, अंडी, खाकरा, चॉकलेट, चिक्की की लाडू, निंबुझ... मज्जाच!! माझे एक सँडविच पिथ्थुवाल्याला देऊन टाकले. फार थकले होते आणि चेहर्‍याला मुंग्या येत होत्या, हात कापत होते. मेंदूला सूज की काय कोण जाणे... अर्धवट ग्लानीत गप्पा ऐकत होते.

'काल प्राची बाथरूममध्ये पडली. आँ.. ? अगं पाय घसरला.'
'अरे, कसले आहे हे. इथे शुटींग कसे काय होत नाही?'
'इथपर्यंत येईस्तोवर मरतील ना म्हणून.'
'खेचरं नाहीयत ते बरंच आहे. किती स्वच्छ आहे त्यामुळंच.'
'हो, टपर्‍याही नाहीत, कॅम्पिंगलाही बंदी आहे, त्यामुळेच स्वच्छ आहे अगदी व्हॅलिपर्यंतचा रस्ता.'
'इथपर्यंत फक्त तीन किलोमीटर आहे. विश्वास बसत नाही. हालत होते अगदी येईपर्यंत.'
'यांचे किलोमीटर आणि आपले किलोमीटर एकच आहेत ना? हो जगात सगळीकडे किमी एकसारखेच मोजतात. व्हेरी फनी. हॅ. हॅ. हॅ.'
'अंडी. वा! मीठ आहे का?
'पलीकडे ते शिखर दिसतंय का, ती हनुमान चिट्टी.'
'रोमिला कुठाय?'
'ती गेली असेल हनुमान चिट्टीपर्यंत चालत. हो ती जाऊ शकते.'
'खोलीत जेवढे कमी पहावे लागेल तेवढेच चांगले आहे. लेन्स काढून ठेवल्यात.'
'पिपलकोटीपेक्षा चांगली आहे हाँ यांची सर्व्हिस.'
'काल फारच पिट्ट्या पडला. आज बरंय त्या मानाने. पण उद्या हेमकुंड कसे काय करणार?'
'आधी खाली तर उतरू. उद्याचे उद्या पाहू.'
'अरे हे काय क्रेझी आहे. फारच सुंदर.'
'वेदर बरंय.'
'पुढे जाऊयात का?'
'नको आता बास. हीच तर फुलं आहेत पुढे सगळीकडे. आता चालवत नाहीये.'
'ओऽऽऽय, अजून पुढे काय आहे आता? स्वर्ग असला तरी एक पाऊल टाकणार नाही आता...'
'इथून पुढे तर खरी घाटी सुरू होते. आत्ता आपण अकरा हजार चारशे फुटांवर आहोत.' (आँ. आतापर्यंत चढलो तो काय झिम्मा होता?)
'उद्या काय होईल हेमकुंड चढताना.'
'काय होईल' काय? मर थोडी जायेंगे.. चलो यार.. क्या तुम लोग '..

हो, नाही, याँव, ट्याँव करता करता प्राची(१), राहुल, शैलजा आणि मी तिथेच थांबायचे ठरले. आम्ही एक बारकुशी झोप काढणार होतो. बाकीच्या टीमला 'ओ, येताना आम्हाला विसरू नका. नक्की घेऊन जा,' असे तिसर्‍यांदा सांगितले, तेव्हा साहेब म्हणाले, 'तुम्हाला सोडून गेलो का काल? काळजी करू नका.' ते खरंच होतं म्हणा. तास-दीडतासात इथेच भेटायचे ठरले. फुलांच्या घाटीत ते सगळे दिसेनासे झाले. आम्ही ऊन मिळेलशी मोक्याची जागा हेरली आणि अंगावर गरम कपडे चढवून सॅक उशाशी घेऊन गुडुप झोपून गेलो. अंगावर उन्हाची किरणे, भोवताली बेदम वारा, पलीकडे दिसणारी बर्फाच्छादित शिखरे.. वार्‍यासोबत निवांत हलणारी हजारोहजारो फुलं, एका कातळाच्या खोबणीत निवांत झोपलेलो आम्ही. साप वगैरे असतील का वगैरे वर क्षीण विनोद झाले, पण भिती वाटायला सुद्धा एनर्जी लागते. तेवढी कोणाकडे होती?
(घरी परतल्यावर श्रीकृष्ण हताश होऊन म्हणले, 'कमाल आहे.. घाटीत जाऊन झो प ला तुम्ही. लाज नाही वाटली?' 'हॅ! उगाच आमच्यामुळे आख्खा ग्रुप अडकला असता तर वाटली असती लाज. तेवढी विश्रांती घेतली म्हणून उतरू तरी शकलो.' !!)

काही वेळाने उन्हं किंचित कलली आणि थंडीने हुडहुडी भरली म्हणून उठले. डोक्यावरची अद्भूत निळाई पाहून पहिले आठवले ते 'पिघलें नीलमसा बहता हुवा ये समा' आणि 'असे रंग आणि ढगांच्या किनारी, धूक्याची निळी भूल...' कवितेच्या ओळी आठवल्या म्हणजे मेंदू चालतोय बहुतेक. ढँट्ढँ!! मुंग्याही गेल्या होत्या. उठून बसले. वारा खात होते. आजूबाजूला क्षितिजापर्यंत पसरलेली तर्‍हेतर्‍हेच्या आकाराची, रंगांची रानफुलं, भणाण वारा, अवतीभोवती काही सेकंद स्थिरावणारे पक्षी, त्यांचे कूजन, सगळ्या फुलांचा मिळुन काहीसा उग्र वेगळाच गंध. ...एक साहसी गिर्यारोहक एका मोहिमेवरून येताना वाट चुकला आणि या फुलांच्या प्रदेशात चुकून येऊन थडकला. त्याने या भ्युंदर (लक्ष्मण) घाटीचे नाव 'फुलांची घाटी' ठेवले. काय वाटले असेल त्याला? आपण चुकून मेलो आणि स्वर्गात आलो, असे?
तूर्तास मी 'Frank Smythe: Valley of Flowers Myths and Reality' या पुस्तकाची वाट पाहते आहे.
स्थानिक लोकांना माहीत असणारच अर्थात. त्यांनी का नाही लिहिले याआधीच...
रामायण आणि महाभारत दोहोंच्या आख्यायिका याच प्रदेशात का गोवल्या गेल्या असाव्यात?

उरलेले तिघे शांत झोपले होते अजून. पलीकडे कातळावर पिथ्थुवाले बसले होते. नवीन तरुण ग्रुपचा हिंदीइंग्रजीबंगालीत कलकलाट सुरू होता. केवळ काही फुटांवरचे त्यांचे हसू त्या वार्‍यात आम्ही बसलो त्या ठिकाणापर्यंत वायुलहरींसमवेत पोचेस्तोवर भेसूर ऐकायला येत होते.

घाटीचे सौंदर्य soothing तलम शांतवणारे नाही. ते चांगलेच अंगावर येते, तरूवेलींसारखे हळुहळू हातपाय बांधून आपल्याला वेढून टाकते. फार थांबल्यास आवळेल की काय.. 'कळा- ज्या- लागल्या- जीवा' जागा आहे ती!
इथे कँम्पिंगला बंदी आहे ती का, हे त्याक्षणी समजले. परतल्यावर आख्यायिका वाचल्या त्यात ती अनामिक भिती अगदी नेमकी गोवली गेली आहे असे वाटले. पर्‍यांचा देश, जास्तवेळ घाटीत थांबल्यास पर्‍या उचलून नेतात... ऋषीमुनी तपश्चर्येसाठी इथे येत असत... हनुमानाने संजीवनी बुटी इथूनच आणली.. देवांनी पुष्पवृष्टी केलेला प्रदेश.. सॉलिड आहेत आख्यायिका.

सगळे उठले.. आता जरा टवाळक्या करायची ताकद आली होती. व्हिडीयोवर 'तुमच्या भावना व्यक्त करा, झोपा काढल्यावर कसे वाटतेय'..
'आधी पाहिले, मग झोपा काढल्या हाँ- प्राची.'
Collage-ValleyOfFlowers2-1.gif
1. Himalayan Campion 2. Himalayan Fleabane 3. Trailing Bellflower 4. Entire leaved Cotoneaster

थोडे पाय मोकळे केले, फोटो काढले, लोकांची वाट पाहिली.
नजर ठरत नव्हती, चारेक फुटांच्या उंचीची वार्‍यावर झगमगत डोलणारी फुलंच फुलं. आम्ही गेलो त्या दिवशी प्रामुख्याने पसरला होता तो गुलाबी तेरडा. कंटाळा येईपर्यंत माजल्यासारखा रासवट तेरडा आणि जांभळी बेलफ्लावर्स (महाबोर!! धोतर्‍याच्या फुलांइतकी बोर. काँग्रेसगवताइतकीही), गेंदेदार पांढरे झुबकेदार Hogweed. तिथल्या भणाण वार्‍यावर डोलावे ते Knotweed च्या पांढर्‍या मंजिर्‍यांनीच ! काय लयीत सुरेख झंकारतात त्या मंजिर्‍या. पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि काळपटलालगुलाबी धमन्या. तानपुर्‍याच्या तारा छेडल्यासारखे. Alpine Forget Me not मात्र अगदी अगदी अपूर्व. काय तो आकाशी रंग. सामान्य माणसासाठी हेच तर कवित्वाचे क्षण. देवत्वाचेही!!
बोरकरांनी पाहिला असता तर त्यांच्या हिवटीच्या निळा कवितेत अजून एक कडवे गोवले गेले असते.
'जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा, अशा कालिंदीच्या काठी एक इंदिवर निळा'
किती फुलांचे वर्णन करू? माझी झोळी दुबळी (आणि शिवाय फाटकी ) आहे. प्रत्यक्षच पहायला हवे.
सगळी फुलं ओळखणे तर वनस्पतीशास्त्रज्ञांनाही शक्य होणार नाही. आणि आपल्यासारख्यांना पहिल्या चाळिस जाती ओळखता आल्या तरी है शाब्बास!
इथली (http://www.flowersofindia.in/catalog/himalayan.html) माहिती उत्तम आहे आणि या मुलांचेही खरोखर कौतुक आहे. कासशी तुलनेचा मोह होईल, पण हे म्हणजे एका रागाची दुसर्‍याशी तुलना करण्यासारखे आहे. म्हणजेच तुलना होणे नाही. असो.

पलीकडे आता धुक्याआड गायबलेली हनुमानचिट्टी. उन्हं उतरत होती, क्षितीज अलगद, थबकत एकेक पाऊल टाकत जवळ येत चालले होते, अंगावर काटा येऊ लागला. टीममधले बरेच जणं परतले होते.
"कुठंवर गेला होता रे? पुढे काय आहे?
फुलं आहेत अशीच अजून एक्याऐंशी एकर. आम्ही फक्त त्या बाईंच्या थडग्यापर्यंत गेलो. "(Joan Legge या वनस्पतीशास्त्रज्ञ बाई तिथे १९३९ मध्ये घसरून मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या बहिणीने त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या थडग्यावर बायबलमधील हे वचन कोरले आहे म्हणतात -
I will lift up mine eyes unto the hills
From whence cometh my help)

एक ग्रुपफोटो काढला आणि ट्रेकलीडरने अक्षरश: तिथून सर्वांना हाकलले. मी यावेळेस आठवणीने एका छोट्या पिशवीत पैशाचे पाकीट घेतले. कॅमेरा घेतला आणि पहिल्याच फुलाचा फोटो थांबून काढला, तो पावसाचे थेंब!! ट्रेक-लीडर ओरडला, 'ती पिशवी माझ्याकडे दे आणि चला लवकर.. ही काय फोटो काढायची वेळ आहे? येताना काय करत होता तुम्ही?' शैलजाही ओरडली. त्या दोघांच्या दबावामुळे शैलजाच्या सॅकमध्ये पिशवी टाकली आणि मुकाट चालायला लागले. तंतरली होती चांगली. (देवापुढच्यावेळेसमीएकटीयेईन. यांनाकोणालाआणणारनाही !!! as if..) अशी मनात फणफण केली पण त्यात काही दम नव्हता. त्यांचे बरोबर होते. केवळ काही मिनिटांत हवेची लहर पूर्ण फिरली होती. प्रकाश कमी होत होता आणि येताना मनोहर दिसणारी चमचमणारी शिखरे आता भीषण रौद्र भासायला लागली होती. काही प्रकाशकिरणांचा काय तो फरक.

शक्य तेवढ्या झपाझप चालत होतो. सगळीच जनता झपाझप चालत होती. वाटेत तंद्रीत आम्ही एक वाट चढलो, तो रस्ता चुकीचा होता.. पल्याडच्या काही अनोळखी ट्रेकरलोकांनी ओरडून ओरडून आम्हाला योग्य रस्ता दाखवला. त्या जागेवर उतरणे बरेच कठीण होते. पाय घसरला तर पुष्पावती नदीत समर्पयामि. काही झाले तर माझ्यामागे मुलीचे काय होईल? शैलजाच्या चेहर्‍यावरही ताण स्पष्ट दिसत होता.
उतरून योग्य रस्त्यावर लागलो तेव्हा जरा हृदयगती आटोक्यात आली. अनोळखी लोकांनाही मदत करणे हा तर ट्रेकर्सचा अलिखीत आणि सर्वात महत्त्वाचा code of conduct.. यावर बोलत आम्ही चालत होतो. चालण्याच्या लयीचे आणि माझे तसे अजिबात बरे नाही ते पुन्हा एकदा समजले. पाय ओढत चाललो होतो.

वाटेत मुर्तीकाका भेटले. "So you are fine?
हसले. Oh it was amazing..
You know what they say.. You come here once, you are hooked. You will come here many times, mark my words. Next time will be easier.
How many times have you been here?
Many times. Every monsoon. I live here for 40 days.
Every day you climb this terrain?" (काय पण बिनडोक प्रश्न).
हसले चक्कं. म्हातार्‍याला हसता येते? आँ?
"Where are you from uncle?"
त्यांनी एका वळणात ५ मिनीटांत आपली जीवनकहाणी सांगितली. सगळीच इथे लिहीण्यात हशील नाही. तरीपण त्रोटक लिहीते. एका प्रतिष्ठित शाळेचे हेडमास्तर होते. वनस्पतीशास्त्रज्ञ. सगळे सोडून दिले. गेली काही वर्षं अविरत फिरत असतात. इथून अरुणाचलला जाणार होते. तिथल्या फुलांचे निरीक्षण करायला. ऐकूणच हात जोडले मनोमन.
(एकदा अरुणाचलला जायलाच हवे, पण आपल्याला त्यातले काय कळते डोंबल.. तरीही एकदा पहायलाच हवे असे अनेक विचार...)
माझ्या कुर्मगतीने ते काय चालणार कप्पाळ... निरोप घेतला.
"Best of Luck. You have my blessing. You will come here again. " (मनात म्हणले Amen).
पुढे एक वयस्कर जोडपे होते त्यांच्याशी ते पाच मिनीटं बोलले आणि पुढे गेले झपाझप.
त्या काकू साडीशालस्वेटरात कशा काय चढून आणि उतरून आल्या होत्या त्यांनाच माहिती. फार त्रास होत होता त्यांना. त्यांचे कॉलरबोन्स ज्या रितीने वरखाली होत होत्या त्यावरून त्यांना भयानक दम लागत होता ते स्पष्ट दिसत होते. बसत उठत कशातरी पुढे पाय टाकत होत्या. त्यांची हालत काही फारशी ठीक दिसत नव्हती. तरीही 'Please go ahead. We will be fine' म्हणत होते.
शैलजाही थकली होती. मलाही पुन्हा त्रास सुरू झाला होता. चालत होतो कसे तरी. आता कधी एकदा परततोय असे झाले होते. झाडीतून किर्रर्र आवाज सुरू झाले होते. पुष्पावतीच्या त्या पुलावर पुन्हा एकदा थांबलो, त्यावेळेस आम्ही दोघीही भावविभोर झालो होतो. अक्षरश: झोकून द्यावे असा फेसाळता प्रवाह दिसत होता. शैलजा म्हणत होती. 'पाण्याची आस धरू नये गं. माझी आई म्हणते, पाणी ओढ लावते'
हे राम !! काय पण टायमिंग. असल्या भयप्रद गप्पा आम्ही तिथं का मारत होतो?

'उद्या हेमकुंडाला जायच्या ऐवजी इथेच येऊ का गं मी?'
'एकटी? वेडी आहेस का?'

चार वाजता प्रवेशद्वार बंद होते. सिंडरेलाटायमाच्या अर्धातास आधी कसेबसे चेकपोस्टपाशी पोचलो. तिकडे ट्रेकलीडर, धोघी प्राची, राहुल वगैरे आमची वाट पहात बसले होते. बाकावर फतकल मारली काही वेळ. पुन्हा माऊसहेअर दिसला. आतून शेवटचे तुरळक लोक बाहेर पडत होते. कोणीतरी बातमी आणली की त्या काकाकाकूंना घ्यायला जावे लागणार. चेकपोस्टवरील गार्ड लगेच गेलेही. चुकून कोणी आत राहिलेच तर काय होत असेल?

पाय घासत गेस्टहाऊसवर पोचलो. परतताना गरमागरम आटीव रबडीच्या, गुलाबजामाच्या, जिलब्यांच्या टपर्‍या दिसत होत्या. पहायची सुद्धा वासना नव्हती. शैलजा म्हणाली, 'उद्या नक्की खाऊयात.'
रमण्यांनी पिथ्थुचे पैसेही घ्यायला नकार दिला. अगदीच अवघडल्यासारखे वाटले, पण त्या ऐकेचनात. चहा, गुनगुना पानी ढोसले. अपूर्व एकटाच कॅननवाला होता आमच्या ग्रुपमध्ये. त्याचे गौचरपर्यंतचे फोटो फार सुंदर होते.
"You got good shots?
Yeah. You want to see? ये लो."
कॅमेरा हातात घेतला खरा, पण फोटो पहायची ताकद नव्हती.
"I don't think you are in any state to see that.
That's true..I will see them later. Am glad you got good shots.
कल का क्या सीन है? हेमकुंड का रास्ता खतरनाक है. तुम लोग तो खच्चरसे चले जाओगे. हमारा क्या होगा?
क्यों, तुमको किसने मना किया है. तुमलोग भी चलो खच्चरसे..Big Deal. (मुलगे !!)
हम कैसे जा सकते है?"
(समानतेवर भाषण द्यायला श्वासाने साथ द्यावी लागते. साँस है तो भाषण पचास. जाऊदे. जा मग चालत एवढे आहे तर!! सकाळी मला शहाणपणा शिकवणार्‍या सुजयनेच नंतर अपूर्वचे ब्रेनवॉश करून त्याला चढायला भाग पाडले दुसर्‍या दिवशी.)

खोलीत आलो. औषधं घेतली. थेट आडव्या झालो तिघी. स्वातीने बातमी आणली होती की रोमिलाच्या मागे मोहनबाबू लागले होते म्हणे.. तिच्या मागेमागे घाटीभर हिंडत होते म्हणे.
'हसता काय कारट्यांनो. कोणाला प्रेम कुठे भेटेल सांगता येत नाही.' - शैतै.
'होतर.. शिवाय घाटी चढण्याइतके प्रेम म्हणजे बरेच दाट असणार नाही?' - मी
हसून हसून दमलो... दिवसभराचा वृत्तांत सांगितला एकमेकींना. बराच टीपी केला. पाचेकवेळा पुन्हा दार उघडावे लागले कशानाकशासाठी. सहनशक्ती अगदी संपली. खोकल्याची ढास लागली होतीच. शेवटी मोहनबाबूंना म्हणले, 'ओ, कृपया झोपू द्या. थोडावेळ दार वाजवू नका'. त्यांना भलताच राग आला. सहाला स्लाईडशोसाठी जायचे होते. शैलजा आणि मी दोघीही झोपलो होतो. स्वाती जाऊन आली. शो चांगला होता असे स्वाती म्हणाली. साधारण आठाच्या सुमारास खाली जाऊन काहीतरी पोटात ढकलले. माझ्या हातून शैलजाची कानटोपी हरवली होती. एरवी मी इतकी वेंधळी नाही, पण कशी काय हरवली ते कळेना. बरीच शोधली पण सापडेनाच. बिचारी शैलजा म्हणाली, 'जाऊदे गं टोपीच आहे. पण उद्यासाठी दुसरी विकत घे मात्र तुला.' दुसरी तातडीने घ्यायला हवी होती, हेमकुंडावर अफाट थंडी. पुन्हा खाली जाणे आले.

कानटोपी घेतली. मग घरी फोन करायला गेले. बराच वेळ फोन लागेना. एकदाचा फोन उचलला गेला आणि आवाज ऐकून नवरा म्हणला.. 'अगं काय झालं? आवाज का असा येतोय.' तसा बराय तो!! प्रत्येक मिनिटाला वीस रुपये असला अचाट दर. भडाभडा तीन मिनीटांत कर्मकहाणी सांगितली. फोटोबिटो काही चांगले आले नाहीत म्हणले. नवरा म्हणला 'पैशाकडे पाहू नकोस अजिबात, खेचर घे चढायला. औषधं घेत रहा व्यवस्थित.' घरी सगळे ठीक होते.

खोलीत येऊन काहीतरी खिदळत झोपलो. आल्याआल्या दोघींनी विचारले, 'काय सांगितले घरी?' काय सांगणार, आवाजावरून ओळखले.
स्वातीचे म्हणणे उद्या नऊजणं खेचर घेणार आहेत. फक्त बरेच मुलगे आणि रोमिला चढणार आहे. बिचारा ट्रेक-लीडर वैतागला असणार. महान ग्रुप होता आमचा एकुणात. सगळेच फिटले होते एव्हाना. झोपताना घाटीतले अद्भूत नजारे अस्वस्थ अस्वस्थ करत डोळ्यापुढून आपोआप सरकत होते. तेव्हापासून म्हणजे गेला दीड महिना विचार करते आहे, पण शब्द सापडत नव्हते. लिहिताना अचानक सापडले. आपण ना धड टुरिस्ट, ना धड ट्रेकर! तीच तर एक मोठ्ठी सिव्हीलियन समस्या आहे. एक हजार गोष्टी दिसतात, पण त्यांची संगती लावता येत नाही. टुरिस्टांना 'वॉव सुंदर!' म्हणले की बास, ट्रेकरना चालायचा, चढण्याचा उरक. वनस्पतीशास्त्रज्ञांना फुलांच्या जाती, प्रजातींचे, औषधी उपयोगांचे गारूड. छायाचित्रकारांना प्रकाश आणि उत्तम फ्रेम्सचे. आणि आपल्याला सगळ्याच गोष्टींचे. कठीण आहे!

मनःपूर्वक आभार
मुशो : गजानन
फुलांच्या नावांसाठी मार्गदर्शन: माधव
कोलाज- अमित, शैलजा
काही प्रकाशचित्रे: प्राची (१),राहुल,प्राची(२),स्वाती,सुजय

गुलमोहर: 

कोणाकडे कोलाजच्या साईज साठी काही उपाय आहे का?
फुलांच्या इमेज clear आहेत मुळात, पण इथे टाकताना साईज कमी करताना grainy होतायेत. काय करु?

भारी लिहीलयस. Happy
फोटो काढण्यावरून आणि चेहरेपट्टीवरून जपानी वाटत होत्या, पण भाषा जपानी नव्हती येवढे नक्की.>> ते थाई होते.
उद्या नऊजणं खेचर घेणार आहेत. फक्त बरेच मुलगे आणि रोमिला चढणार आहे. बिचारा ट्रेक-लीडर वैतागला असणार. महान ग्रुप होता आमचा एकुणात.>> ह्या वरुन भारी जोक्स झाले डीनर टेबलवर.
नीशांतने दोन टीम पाडून टाकल्या "जॉनी वॉकर" आणि "नाईट रायडर्स" .

त्या मोहन बाबूंवरुन भारी जोक झाले. ईथे लिहीणे शक्य नाही. Wink

बाकीच्या लेखांची पण लिंक देता येइल का इथे?

सब्र का फल मीठा होता है म्हणतात ते खरंच बाई. इतके दिवस वाट पाहायला लागली त्याचं चीज झालं.

नविन भाग बघितल्यावर झडप घालुन वाचला. वर्णन वाचताना प्रत्यक्ष तिथे असल्याचे जाणवत होते. खुप छान लिहिलंयस, रैना ! Happy

रैनातै.. कोलाज काहून टाकलेत... सुटे सुटे फोटोच टाकायचेत की...
लेख मस्तच..

रैना,फार छान लिहिलेस.आता हेमकूंडाच्या वर्णनाच्या प्रतिक्षेत.हेमकुंडात माझ्या नवर्‍याने आंघोळ केली होती.तिथल्या गुरुद्वारातला वाफाळ्लेला वेलदोडा चहा म्हणजे त्यावेळेस अमृत वाटले होते.

कितीसुंदरआहे हे म्हणणेही फालतू वाटले असते, कारण इतर वेळी आपण शब्द कॅरमबोर्डावरच्या गोट्यांसारखे सटासट मारत असतो. साध्या साध्या शब्दांच्या घनघोर अर्थछटांशी आयुष्यात फारच उशिरा परिचय होतो. (खंडेरावांची तीच तर समस्या आहे. जगाचा अर्थ शब्दकोशात गावत असता तर अजून काय हवे होते राव?) 'सुंदर' आणि 'अप्रतिम' या शब्दांवर तर दणकून कर लावला पाहिजे अक्षरशः >>>
"अप्रतिम" लिहीतेस रैना तू ! (लावा कर आता आमच्यावर :P)
फोटोही मस्तच आहेत...पण अजून मोठ्या आकारात पहायला आवडले असते. पिकासा वापरून पहावे.

बापरे! फारच सही वर्णन आहे! फोटो पण मस्त.
>>समानतेवर भाषण द्यायला श्वासाने साथ द्यावी लागते. साँस है तो भाषण पचास.
Happy

कारण इतर वेळी आपण शब्द कॅरमबोर्डावरच्या गोट्यांसारखे सटासट मारत असतो. साध्या साध्या शब्दांच्या घनघोर अर्थछटांशी आयुष्यात फारच उशिरा परिचय होतो >>
प्वाईंटाचा मुद्दा आहे .

मस्त लिहितेस. खरंच इतका त्रास होतो का सगळ्यांना ? अन तरी इतक्या चिकाटीने इतके लोक जातात ? पुन्हा पुन्हा जातात ? काय गारूड असेल

जंगली फुलांचे सौंदर्य आखीवरेखीवसुवासिकगोंडस नाही. ते नुसते फुटत असते. पानापानातून, पाकळीपाकळीतून, उत्फुल्ल. त्यांच्या आकारांचे, घाटांचे सपकारे बसतात पाहणार्‍याला (क्वचित घणही). पिंड जर शिस्तबद्ध रेखीव सुबकपणावर अकारण पोसला गेला असेल (ट्युलिप!!) तर टू बॅड.<<<<
यावर खूप सारी गावे इनाम! Happy

मस्त लिहिलंयस. आधीच्या तिन्ही भागांपेक्षा हा आवडला मला. Happy

रैना, तुझ्या लिहिण्याची शैली इतकी मस्त आहे की तुझ्याबरोबर गप्पा मारत मारत हा प्रवास करतोय असंच वाटतं. छान लिहिते आहेस. मनावरच्या गारूडाबद्दल तर अगदी अगदी. आयुष्यातील बाकीचे गुंते अगदी चिल्लर वाटतात निसर्गाच्या विशाल रौद्र सौंदर्यासमोर!

रैना, तुझ्या लिहिण्याची शैली इतकी मस्त आहे की तुझ्याबरोबर गप्पा मारत मारत हा प्रवास करतोय असंच वाटतं. >>> +१

Pages