दगडाची गोष्ट

Submitted by पाषाणभेद on 30 September, 2011 - 18:13

दगडाची गोष्ट

(सदरची कविता शिक्षकांनी अंगविक्षेपासहीत विद्यार्थ्यांच्या पुढे सादर केली तर परिणामकारक होते.)

प्रास्ताविक:
निट बसा सगळे लक्ष द्या इकडे
एक गोष्ट सांगतो लक्ष द्या तिकडे

आरंभ:
एक खेडेगाव असते
तिथे एक नदी वाहते

विषयविवेचन:
त्या नदीत असतो एक दगड
मोठ्या दगडांसारखाच छोटा दगड
इतर दगड खुष असत
हा मात्र असतो सतत रडत

नायकाचे आत्मकथन:
"मी काही कामाचा नाही
कोणाच्या उपयोगाचा नाही
देव करण्याइतका मोठा नाही
वाळूत मावण्यासारखा छोटाही नाही
कुणाच्याही पायात मी येतो
पावसाळ्यात चांगला धुतला जातो
उन्हाळ्यात नदी जेव्हा कोरडी होते
तेव्हा माझ्या अंगाची लाही लाही होते
मला कोणी विचारत नाही
मी कोणाच्या कामाचा नाही"

नायकाचे चिंतन:*
दिवसेंदिवस तो दगड निराश होत गेला
वाळून वाळून बारीक होत चालला

निसर्गवर्णन:
असेच उन्हाळ्याचे दिवस होते
नदीत पाणी काहिच नव्हते

कथेत दुसर्‍या व्यक्तीचा प्रवेश:
एका माणसाला दुसर्‍या गावी जायचे होते
त्यासाठी त्याला हि नदी ओलांडणे भाग होते

माणसाचे निसर्गाकडे गेले पाहिजे - पर्यावरणाचे भान:
नदीवर आल्यानंतर त्या माणसाला जोराचा कार्यभाग आला
आता कसे अन कोठे कार्यभाग उरकावा प्रश्न त्याला पडला

कर्म करण्याबद्दल आस्था:
एक आडोसा बघून त्याने आपला कार्यभाग उरकला
नदी कोरडी आहे म्हणून त्याने नेमका तोच दगड वापरला

कर्तव्यपुर्तता:
दगड मनात म्हणाला, 'सालं, मी नेहमी कोणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून रडत बसलो
शेवटी अशा तर्‍हेनेका होईना मी कुणाच्यातरी उपयोगी तर पडलो'

गोष्टीतला बोध:
तर मित्रांनो गोष्ट तर संपली पण या गोष्टीतून काय बोध मिळतो?
नसेल सांगत तर ऐका, 'ऐनवेळी बिगरकामाचा दगडही कामी पडतो'

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०९/२०११

कठीण शब्द:
बोध = मोरल ऑफ द स्टोरी

सुविचार: *जास्त चिंतन चिंतेत रूपांतरीत होते व आपणाला ती चिंता चितेकडे नेते

प्रश्नोत्तरे:

दिर्घोत्तरी प्रश्न
खालील प्रश्नांची आठ-दहा वाक्यांत उत्तरे द्या.

१) वरील कवीतेत कोणकोणते संदेश आपणाला मिळतात? (मार्च २००२, नुमवि अपेक्षीत प्रश्नसंच २०१०, बालविकास प्रशाला अपेक्षीत प्रश्नसंच २००९)
२) 'दगडाची गोष्ट' ह्या कवितेत मानवाचे कोणकोणते स्वभाववैशिष्ठ्ये कविने चितारले आहेत.
३) सदरची कविता ही कविता असूनही 'दगडाची गोष्ट' अशा नावाने प्रसिद्ध केली आहे. का? आपाआपसात चर्चा करा.
४) वरील कविता वाचून आपणा काय वाटते यावर आठ वाक्यात टिप्पणी करा.(ऑक्टोबर २००७)

एका वाक्यात उत्तरे लिहा
१) अंगाची लाही लाही होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.(मार्च २००५)
२) या गोष्टीतील दगड कशाचे प्रतिक आहे? (ऑक्टोबर २००९)

उपक्रम:
(शिक्षकांनी या उत्तरांचे कागद एखाद्या फाईलमध्ये लावणे. वार्षीक परिक्षेत उपक्रमासाठी १० गुण आहेत.)
१) या कवितेचे गद्यात रुपांतर करा.
२) या कवितेवर वार्षीक स्नेहसंमेलनात एक छोटी नाटूकली सादर करा.

(धिस पार्ट ऑफ द प्रोग्राम स्पॉन्सर्ड बाय - डेलीऑनलाईनबॅकअप.कॉम - जिंदगी सवार दे!)

शब्दखुणा: