मायबोली.कॉम आणि दै. कृषीवल यांनी ऑगस्ट महिन्यात रसग्रहण स्पर्धेचं आयोजन केलं होतं. १ ऑगस्ट, २०११ ते ३१ ऑगस्ट, २०११ या कालावधीत स्पर्धकांनी मायबोली.कॉमवर आपल्या प्रवेशिका प्रकाशित करायच्या होत्या. एकूण २९ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. श्रीमती सुजाता देशमुख आणि श्री. संजय आवटे या ज्येष्ठ संपादकांनी स्पर्धेचं परीक्षण केलं.
गुणांकन करताना कुठली प्रवेशिका कोणी लिहिली आहे, हे परीक्षकांना माहीत नव्हतं. पुस्तकाचं नाव, लेखक-लेखिका / कवी-कवयित्री यांची नावं आणि प्रकाशकाचं नाव, यांखेरीज अधिक कोणतीही माहिती परीक्षकांना देण्यात आली नव्हती.
पुस्तकाचं आकलन, भाषा (म्हणजे भाषेचा सुयोग्य वापर), लिखाणाची शैली आणि विषय मांडण्याची हातोटी या चार निकषांवर गुणांकन केलं गेलं. गुणांकन करताना स्पर्धकानं रसग्रहणासाठी कोणतं पुस्तक निवडलं आहे, ते कोणी लिहिलं आहे, प्रकाशक कोण, या गोष्टींना अजिबात महत्त्व देण्यात आलं नाही. अशा प्रकारची स्पर्धा मायबोलीवर पहिल्यांदाच होत असल्यानं शब्दमर्यादेचा निकषही शिथिल करण्यात आला.
विजेत्या स्पर्धकांची निवड परीक्षकांनी एकमतानं केली आहे.
प्रथम पारितोषिक (रु. १५००/-) - नंदन - वाचणार्याची रोजनिशी - लेखक सतीश काळसेकर
दुसरं पारितोषिक (रु. १०००/-) - पौर्णिमा - 'समुद्र' : लेखक- श्री. मिलिंद बोकील
तिसरं पारितोषिक (रु. ७५०/-) - सन्जोप राव - सुनीताबाई - मंगला गोडबोले आणि अरुणा ढेरे
पंचवीस वर्षांखालील विद्यार्थ्यासाठीचं खास पारितोषिक (रु. १०००/-) - आर्फी
सर्व विजेत्या स्पर्धकांचं हार्दिक अभिनंदन!!! सर्व विजेत्यांना पुढील २/३ दिवसांत मायबोली खरेदीची गिफ्ट सर्टीफिकेट्स पाठवण्यात येतील.
या विजेत्या प्रवेशिकांखेरीज mrunalpotnis21, Adm, शर्मिला फडके (कुहू), ललिता-प्रीति आणि अवल यांच्या प्रवेशिकांचा परीक्षकांनी आवर्जून उल्लेख केला आहे. झरबेरा यांच्या प्रवेशिकेचंही परीक्षकांनी विशेष कौतुक केलं आहे.
***
श्रीमती सुजाता देशमुख यांचं मनोगत -
‘मायबोली’ आणि ’कृषीवल’तर्फे घेण्यात आलेल्या रसग्रहण स्पर्धेत परीक्षक म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. हे आभार अशासाठी की, या निमित्तानं वेगवेगळ्या पुस्तकांची नव्यानं ओळख झाली.
पुस्तक परीक्षणाबाबतचा एक सर्वसाधारण अनुभव असा असतो की, आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबद्दलच सहसा वाचक परीक्षण लिहितो आणि ते लिहिताना भारावलेपणाच्या नादात पुस्तकाच्या काही अंतर राखून ओळखीऐवजी स्वत:च्या मतांवर, पर्यायानं ‘आवडलेपणावर’ भरपूर भर देतो. स्पर्धेसाठी ज्या अंतिम २९ प्रवेशिका आल्या होत्या, त्यात अशा प्रवेशिका कमी होत्या, हे विशेषत्वानं नमूद करावंसं वाटतं.
या प्रवेशिकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पुस्तकाबाबत उत्सुकता वाटेल इतपतच सर्वसाधारणपणे त्याची रूपरेषा, त्याच्यातले भिडलेले मुद्दे, ते का आवडले यांचं विश्लेषण, अशा अतिशय योग्य पद्धतीनं आणि तरीही ओघवत्या शैलीत ही परीक्षणं लिहिली गेली आहेत. पुस्तकाचं आकलन अधिक चांगल्या पद्धतीनं होणं आणि आवडण्यामागची कारणं अधिक स्पष्टपणे लिहिणं अपेक्षित असलं, तरी या प्रयत्नाबद्दल सर्व सहभागी स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन! (अपवाद फक्त एका पुस्तक परीक्षणाचा. ‘हे पुस्तक का वाचू नये’, हे सांगणारं परीक्षण लिहिण्यात आलं होतं.)
इथं आणखी एक मुद्दा आवर्जून नमूद करावासा वाटतो. ‘मायबोली’चा सभासदवर्ग हा सर्वसाधारणपणे विशीच्या पुढचा आणि पन्नास-पंचावन्नच्या आतला असावा. या अनुमानामागचं साधं कारण असं की, हाच वर्ग सध्याच्या ‘नेटिझन’ वर्गात मोडतो. या पार्श्वभूमीवर ‘मराठी भाषेला भवितव्य आहे की नाही’, या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे ‘आहे’ असं द्यावंसं वाटतं. कारण, प्रत्येक पुस्तक परीक्षणातली ‘मराठी’ भाषा ही ‘उत्तम मराठी’ तर आहेच, शिवाय इंग्रजीचा अजिबात वापर झालेला नाही. अगदी सहज, चपखल बसतील असे इंग्रजी शब्दसुद्धा वापरलेले नाहीत, याबद्दलही सहभागी स्पर्धक कौतुकाला पात्र आहेत.
इतकं सगळं चांगलं असूनही काही खटकणार्या गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही.
पहिलं म्हणजे, र्हस्व-दीर्घाच्या, शुद्धलेखनाच्या फार मोठ्या प्रमाणात दिसणार्या चुका. त्या ‘टायपो’ सदरात मोडणार्या असोत किंवा ‘माहितीच नसणार्या’ सदरात मोडणार्या असोत, जेवताना घासाघासागणिक दाताखाली येणार्या खड्यांसारख्या बोचतात. एरवीही शुद्ध लिहिणं महत्त्वाचं आहेच, पण स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना शुद्धलेखन तपासणं अत्यावश्यक होतं.
काही परीक्षणांमधली लक्षात येणारी आणखी मोठी त्रुटी म्हणजे, ‘ग्रांथिक’ आणि ‘बोली’भाषेची केलेली सरमिसळ. ‘सारखंच’, ‘असं’, ‘वाटतं’ अशी बोलीभाषा असणार्या वाक्यांनंतर लगेचच ‘चवीचवीने’, ‘मतमतांतरे’, ‘उत्सुकतेने’ अशी ’ग्रांथिक’ शब्दांची वाक्यं येतात आणि ती फारच खटकतात.
नवीन मुद्द्यासाठी नवीन परिच्छेद, हा मला वाटतं, शालेय जीवनापासून भाषाशिक्षणातला अविभाज्य भाग आहे. तो इथे अजिबात पाळण्यात आलेला नव्हता. परिच्छेदांची जोडणीही व्यवस्थित नव्हती. अपवादात्मक काही परीक्षणांत परिच्छेदांमध्ये काळाचं भान सुटलं होतं.
या आणि अशा चुका टाळण्यासाठी लिखाण पूर्ण केल्यानंतर किमान तीनचार वेळा नीट, लक्षपूर्वक वाचणं आवश्यक आहे. शब्दांच्या, वाक्यांच्या, शुद्धलेखनाच्या बर्याच चुका या नंतरच्या वाचनांतून दुरुस्त करता येतात. चुकीचा शब्द वापरला असेल, तर तो दुरुस्त करता येतो. वाक्यरचना बदलता येते. एखादा मुद्दा सुटला असेल, लिखाणातून निसटला असेल, तर तसे बदल करता येतात. लिखाणाबाबत किमान एवढं गांभीर्य दाखवायलाच हवं.
’मायबोली’वर अतिशय सुरेख लेखन करणारे अनेकजण आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा अनुभव आला. इथल्या लेखनाचा दर्जा अधिक चांगला व्हावा, केवळ याच हेतूनं या सूचना केल्या आहेत.
एका दर्जेदार स्पर्धेचा अनुभव देऊ केल्याबद्दल ‘मायबोली’ आणि ’कृषीवल’ला धन्यवाद!
***
श्री. संजय आवटे यांचं मनोगत -
या स्पर्धेचं आयोजन आणि परीक्षण हा एक सुखद अनुभव होता. यापुढेही 'मायबोली'च्या मदतीनं अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला निश्चित आवडेल.
या स्पर्धेच्या निमित्तानं काही मुद्दे नोंदवावेसे वाटतात.
१. अनेक स्पर्धकांना आपल्याला पुस्तक का आवडलं, हे नीटसं कळलेलं दिसत नाही. म्हणजे त्यांना पुस्तक आवडलं आहे, पण ते का आवडलं, हे सांगताना त्यांची जरा पंचाईत झाली आहे. गोंधळ उडाला आहे. ज्या कारणांसाठी ते पुस्तक आवडलं, तीच कारणं नेमकेपणानं परीक्षणात यायला हवीत. त्यासाठी थोडा विचार करणं आवश्यक आहे. नाहीतर पुस्तकावर अन्याय होतोच, पण परीक्षण वाचणार्यांवरही अन्याय होतो.
२. पुस्तक का आवडलं, हे सांगताना स्पर्धकांनी काही मुद्दे मांडले आहेत. हे मुद्दे एकत्र जोडताना त्यांचा गोंधळ झाला आहे. या मुद्द्यांची जोडणी व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळं सगळे मुद्दे सुटे होऊन समोर येतात, आणि पुस्तकाचं एकसंध असं चित्र उभं राहत नाही. कुठलंही परीक्षण किंवा लेख वाचताना रेल्वे रूळ बदलते तेव्हा जसा खडखडाट होतो, तसं वाटायला नको. सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेखनात प्रवाहीपण असायला हवं. महत्त्वाचं म्हणजे, लिहून झाल्यानंतर ते लिखाण लगेच प्रकाशित न करता त्यावर विचार करायला हवा. वाचताना काही शब्द किंवा वाक्यं खटकतात का, परिच्छेद बदलल्यावर वाचनाची साखळी तुटते का, हे काळजीपूर्वक तपासायला हवं.
३. अलंकारिक, बोजड भाषेचा अतिरेकी वापर काही स्पर्धकांनी केला आहे. तर क्वचित एखाद्या प्रवेशिकेत कमालीची सपक भाषा वापरली आहे. भाषेचं सौष्ठव राखणं खूप महत्त्वाचं असतं. बोजड, चटकन न समजणारे शब्द, संज्ञा, उपमा, वाक्यं यांतून तुम्हांला काय म्हणायचं आहे, ते तुमच्या वाचकांपर्यंत पोहोचतच नाही. ’ह्यांचं वाचन किती ग्रेट आणि वेगळं’, असा ग्रह एकवेळ काही वाचकांचा होऊ शकतो, पण त्यातून कोणाच्याच हाती काहीच लागत नाही.
४. पुस्तकावर लिहिण्याऐवजी काहींनी त्या त्या साहित्यप्रकारावर परिच्छेद लिहिले आहेत. कविता म्हणजे काय, नाटकाचं स्वरूप कसं असावं, कादंबरी कशी असते, यांवर लिहिल्यामुळं त्या पुस्तकातून काय मिळालं, यावर साहजिकच कमी लिहिलं गेलं आहे.
अनेक प्रवेशिका वाचून असं लक्षात आलं की, पुस्तकं वाचायला सगळ्यांनाच आवडतात, पण ही पुस्तकं आपल्या अनुभवविश्वाशी किती आणि कशी रिलेट झाली, हेच सांगण्याचा प्रयत्न होतो. पुस्तकं तशी रिलेट झाली म्हणून फक्त ती आवडली आहेत का? आणि पुस्तक आवडण्याचं तेच एकमेव कारण आहे का? तशी ती आवडली असतील तरी बिघडत काहीच नाही, पण पुस्तक वाचून आपल्या अनुभवविश्वात काय बदल झाला, हेही तपासून बघायला हवं. असा प्रयत्न केला नाही, तर पुस्तकाची वाचकाशी नाळच जुळणार नाही. तसंच एखाद्या पुस्तकाशी रिलेट करता आलं नाही, त्या पुस्तकातली मतं पटली नाहीत तर ते पुस्तक वाईट, असं नसतं. उलट अशी पुस्तकंही आवर्जून वाचली जायलाच हवीत.
मराठी माणसाच्या भौगोलिक कक्षा रुंदावल्या आहेत. हा बदल वाचनात आणि लेखनातही दिसून यायला हवा. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धकाला बोचकारणार्या, विचार करायला लावणार्या पुस्तकांबद्दल वाचायला मला आवडलं असतं. स्पर्धेत आलेली बहुतेक पुस्तकं ही त्या स्पर्धकाला गोंजारणारी आहेत, त्याच्या कम्फर्ट झोनमधली आहेत. प्रवेशिका वाचून काढलेलं हे माझं अनुमान आहे. विशिष्ट लेखक किंवा त्याचं साहित्य हेच अभिजात, आणि इतर लेखकांचं लेखन तकलादू, असा माझ्या या म्हणण्याचा अर्थ नाही. साहित्याचं मूल्यमापन अतिशय सापेक्ष असतं. एखादं पुस्तक का आवडलं याची कारणं व्यक्तिनिहाय बदलतात. आपल्याकडे पुस्तकांबद्दल जरा विचित्र समज आहेत. सर्वसामान्य वाचकांना न समजणार्या, दुर्बोध भाषेत लिहिलेल्या पुस्तकांना ’अभिजात’ असा दर्जा काही वाचक बहाल करतात. बाजारात भरपूर खपणारं पुस्तक हे वाचायच्याच लायकीचं नाही, असाही या वाचकांचा समज असतो. पुस्तकांचं, लेखकांचं असं कुठलंही वर्गीकरण न करता ’आवडेलच’ अशी खात्री असलेलं पुस्तक निवडण्यापेक्षा जरा वेगळं पुस्तक निवडून त्याबद्दल लिहिणं, किंवा आवडत्या पुस्तकांचं ’आवडणं’ नीटपणे मांडणं, या दोन गोष्टी अधिक ठळकपणे या स्पर्धेत व्हायला हव्या होत्या, एवढंच मला वाटतं.
***
या स्पर्धेचं प्रायोजकत्व स्वीकारल्याबद्दल 'दै. कृषीवल'चे मनःपूर्वक आभार. तसंच अतिशय व्यग्र असूनही स्पर्धेचं परीक्षण केल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख आणि श्री. संजय आवटे यांचेही आभार. या स्पर्धेच्या संकल्पनेपासून शेवटपर्यंत भरघोस मदत केल्याबद्दल चिनूक्स (चिन्मय दामले) यांचे आभार. या स्पर्धेत सहभागी होऊन पाठिंबा दिल्याबद्दल सर्व स्पर्धकांना आणि वाचकांना धन्यवाद.
वाचनसंस्कृती दृढमूल करण्यास मदत करतील अशा प्रकारच्या स्पर्धा यापुढेही 'मायबोली'वर आयोजित करण्याचा विचार आहे. त्या दृष्टीनं आपल्या काही सूचना असल्यास जरूर कळवा.
***
शाब्बास ऐशू. सगळ्या
शाब्बास ऐशू.
सगळ्या विजेत्यांचे, स्पर्धकांचे, अॅडमिन, परिक्षक यांचे अभिनंदन.
सर्व स्पर्धकान्चे,
सर्व स्पर्धकान्चे, विजेत्यान्चे हार्दीक अभिनन्दन
श्रीमती सुजाता देशमुख आणि श्री. संजय आवटे यांची मनोगते स्वतन्त्ररित्या कायमस्वरुपी मार्गदर्शक म्हणून अत्यंत उपयोगी आहेत.
यातिल काही मुद्दे, शालेय शिक्षणक्रमात असतीलही, पण त्या त्या वेळी शिकायला मिळतातच असे नाही, सबब ही उत्कृष्ट पथदर्शी मनोगते इथे दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
ही मनोगते वाचून त्यातिल मुद्द्यांचे अनुकरण केल्यास, मायबोलीवरील माझ्या दैनंदिन "पोस्टिंच्या" मजकुरात देखिल भरीव सुधारणा घडवुन आणता येईल असा विश्वास मला वाटतो आहे, अन म्हणूनच, त्या दोघांचे पुन्हा आभार.
स्पर्धेचे आयोजक-प्रायोजक व ज्या कुणाला स्पर्धेची ही कल्पना सुचली व ज्यांचा ज्यांचा ती प्रत्यक्षात आणण्यात सहभाग होता, त्या सर्वांचे आभार.
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
या स्पर्धेनिमित्त अनेक छान रसग्रहणे वाचायला मिळाली. सहसा लक्ष गेले नसते, अशा, वाचायच्या असलेल्या, राहून गेलेल्या, चांगल्या पुस्तकांची यादीही तयार झाली. आता पुढच्याही रसग्रहण स्पर्धेची वाट बघणार.
परीक्षकांचे मनोगत पुन्हा पुन्हा वाचले. विचार करायला लावणारे आणि नेमके.
अरे वा.. निकाल आला तर..
अरे वा.. निकाल आला तर..
सर्व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन.
आणि मायबोलीचे आभार. या स्पर्धेमुळे ऐशूने मुद्दाम पुस्तक विकत घेऊन त्यावर लिहिण्याचा विचार केला. आजवर वर्तमानपत्रातली परीक्षणे वाचली होती, पण आपणही परीक्षणे लिहावे हा विचार तिने कधी केला नव्हता.
परीक्षकांचे मनोगतही विचार करायला लावणारे आहे.
मामी, जागू धन्स गं...
परीक्षकांचे, आयोजकांचे आणि
परीक्षकांचे, आयोजकांचे आणि माबोवरच्या मित्रांचे (त्यात लिहायला उद्युक्त करण्यापासून प्रोत्साहनपर प्रतिसाद देणारे - सारेच आले) मनःपूर्वक आभार!
पूनम, रावसाहेब आणि आर्फी - हार्दिक अभिनंदन! अशा उपक्रमांतून नवीन पुस्तकांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख यापुढेही होत राहो.
विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन!
विजेते ~ नंदन, पौर्णिमा,
विजेते ~ नंदन, पौर्णिमा, सन्जोप राव आणि आर्फी यांचे तसेच परिक्षकांनी खास उल्लेख केलेल्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
[त्यातही वैयक्तिकरित्या "सतीश काळसेकर" प्रथम क्रमांक ही बाब सुखावणारी आहे.]
दोन्ही परीक्षकांनी स्पर्धा आणि प्रवेशिका यावर केलेले भाष्य फार बोलके तसेच नव्याने लिखाण करू इच्छिणार्यांसाठी तितकेच उपयुक्त ठरणारे आहे.
या दोघानीही 'भाषेचा डौल आणि शुद्धलेखनाचे महत्व' यावर जे परखडपणे लिहिले आहे त्याचा स्पर्धकांनी गंभीरपणे विचार करावा इतके ते महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे संयोजकांनादेखील त्यात एक छुपा संदेश आहे, तो असा की पुढील वर्षाच्या नियमावलीत त्यानी 'शुद्धलेखन' काटेकोरपणे तपासले जाईल असे अग्रक्रमाने सूचीत करणे आवश्यक आहे.
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
मायबोली प्रशासनाला एक विनंती....मायबोलीवर शुद्धीचिकित्सक तथा मुद्रितशोधनाची सोय केल्यास इथल्या लेखकांना त्याचा उपयोग करून आपले लेखन जास्तीत जास्त अचूक करण्यास मदत होईल.
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! मायबोलीचे विषेश आभार! या उपक्रमामुळे बर्याच नवीन पुस्तकांची ओळख झाली!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन... आणि ही सुरेख स्पर्धा घेतल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे ही अभिनंदन... अशीच स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जावी..
दोन्ही परीक्षकांची मनोगते आवडलेली आहेत...
सर्व विजेत्यांचं मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
मायबोली प्रशासनाचे, टीमचे अन्
मायबोली प्रशासनाचे, टीमचे अन् परीक्षकांचे आभार.
नंदन, पौर्णिमा, सन्जोप राव आणि आर्फी यांचे अभिनंदन तसेच सर्व स्पर्धकांचे ही अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. असा
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
असा उपक्रम उत्तमरित्या राबविल्याबद्दल संयोजक, अॅड्मिन टीम आणि चिनुक्स यांचे आभार. यानिमीत्ताने अनेक नव्या पुस्तकांची ओळख झाली. सर्व स्पर्धकांचे उत्स्फुर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार.
नंदन, पौर्णिमा, संजोप राव आणि
नंदन, पौर्णिमा, संजोप राव आणि आर्फी यांचं हार्दिक अभिनंदन.
परीक्षकांची मनोगतं आवडली.
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
सर्वाचेच हार्दिक अभिनंदन.
सर्वाचेच हार्दिक अभिनंदन.
उत्तम स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आभार.
सर्व विजेत्यांचं हार्दिक
सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!
परिक्षकांचं मार्गदर्शन खूपच उत्तम!
स्पर्धा संयोजकांचे मनापासून आभार!
सर्व स्पर्धकांचे आणि
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन !
विजेत्या प्रवेशिका खरोखरच अतिशय सुरेख होत्या.
परीक्षकांचे आणि मायबोली प्रशासनाचे आभार.. दोन्ही परीक्षकांच्या मनोगतांमधले बरेच मुद्दे पटले.
मंजूडीला अनुमोदन.
नंदन, पौर्णिमा, सन्जोप राव
नंदन, पौर्णिमा, सन्जोप राव आणि आर्फी - अभिनंदन!
सर्व विजेत्यांचं तसच भाग
सर्व विजेत्यांचं तसच भाग घेणार्या सगळ्यांचच अभिनंदन! हा उपक्रम यशस्वी करणार्या प्रत्येकाचच कौतुक !!
सगळ्या प्रवेशिकांची लिंक एकत्रित दिसेल का? काही प्रवेशिका वाचल्या आहेत.. काही उल्लेखनीय वाचल्या की नाही ते स्मरत नाही. पुन्हा एकदा वाचायला आवडेल.
सर्व स्पर्धकांचं
सर्व स्पर्धकांचं अभिनंदन!
मायबोलीला साजेसा उत्तम उपक्रम!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! मायबोली टीमचे, परिक्षकांचे अनेक आभार.
सर्वांचे खुप खुप अभिनंदन ...
सर्वांचे खुप खुप अभिनंदन ...
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!
या स्पर्धेनिमित्त अनेक छान रसग्रहणे वाचायला मिळाली. सहसा लक्ष गेले नसते, अशा, वाचायच्या असलेल्या, राहून गेलेल्या, चांगल्या पुस्तकांची यादीही तयार झाली. >> हा एक मोठ्ठाच फायदा झाला माझापण
सर्व विजेत्यांचे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
संजय आवटेंचे मनोगत आवडले.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन!
अभिनंदन.......
अभिनंदन.......
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!!
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!!
Pages