वडा कांदा रस्साभाजी

Submitted by तृप्ती आवटी on 17 September, 2011 - 10:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी हरभरा डाळीचे वडे (सांडगे), २ मध्यम कांदे, २ चमचे दाण्याचा कूट, कोथिंबीर, १ चमचा तिखट, १ चमचा गोडा किंवा काळा मसाला, मीठ, गरम पाणी, फोडणीसाठी साहित्य- हळद, हिंग, मोहरी, एक डाव तेल.

क्रमवार पाककृती: 

तेल गरम करून हळद-हिंग-मोहरीची फोडणी करावी. त्यातच वडे/सांडगे घालून लालसर परतून घ्यावेत. मग कांदा, दाण्याचा कूट, तिखट, मीठ, मसाला घालून कांदा अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. गरम पाणी घालून, कोथिंबीर घालून उकळी काढावी. कांदा, वडा नीट शिजला पाहिजे पण अगदी गाळ नको. साधारण अंगाशी रस्सा होईल इतपत पाणी घालावे.

ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
२ मोठे
अधिक टिपा: 

_आम्ही नेहमी हरभरा डाळीचेच वडे करतो. मुगाचे कसे लागतील विचारु नये, भाजी करुन बघावी.
_गार पाणी घातले की कांदा विचित्र प्रकारे तरंगतो भाजीत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंगाशी म्हणजे, ताटात वाढल्यावर वाहुन जाणार नाही इतपतच Happy
मी सांडगे आधी तळुन घेते, त्यामुळे शेवटच्या घासाअर्यंत कुरकुरीत रहातात.

असेच, गाजराचे सांडगे पण करतात. त्याची भाजी पण छान लागते आणि नुसते तळुन खायला पण.

सोपी रेसिपी ..

माझ्याकडे बाजरीचे वडे (मुग डाळीच्या वड्यासारखे) होते .. ते अजून शिल्लक असले तर करून बघते .. (सांडगे फार खाल्लेले नाहेत कधी) ..

आई अगदी थोड्या तेलावर परतुन घेते सांडगे. आरती म्हणतेय तसे कुरकुरीत रहातात.
मस्त रेसिपी. ह्या भारतवारीत आईकडुन घेवुन येईन सांडगे.

काय भयाण चविष्ट बोलताय रे !

ल्हान पणी मी एक दोन लालसर परतलेले सांडगे पळवून खात बसत असे. स्वयंपाक होई परेन्त. किशोर मासिका बरोबर अंमळ भारी लागत.>>> मी पण ..मी पण. मी पापड पण पळवत असे.

सशल, बाजरीचे वडॅ म्हणजे खारवड्या. त्या तर पापड्यांसारख्या तळून किंवा भाजून शेंगदाण्याबरोबर खायच्या.

मी लहान असताना एकदा माझ्या खोडसाळ भावाने अगदी प्रेमाने ( ? ) जेवायला बोलावलं
" जेवायला चल पटकन. आईने आज लांडग्यांची भाजी केली आहे "....
तेव्हापासून सांडग्यांचा आणि माझा संबंध संपला होता.
पण वरची ' भयाण चविष्ट ' Proud चर्चा वाचून तोंडाला पाणी सुटल्याने पुन्हा एकदा सांडगे-लांडगे खायला सुरूवात करावी लागणार...

छान. करावी लागेल एकदा आता. पण सांडगे करण्यापासून तयारी.. Happy अजून एक सांडगे करून बघा. कलिंगडा (टरबूज) चे लाल तुकडे खाऊन झाले की पांढरा भाग किसायचा. मावेल तितके पोहे घालून (तिखट, मीठ सुध्दा) मुटके वळून खणखणीत वाळवा. तळा. (आमच्याकडे अर्धे नुसते खाऊनच संपायचे) ह्यात ह.डाळ वाटून घातलीत तर हलके वडे होतील, अन अशी भाजी खाताना बाधणार नाही.
अल्पना, काय मस्त आठवण काढलीस ग? खारोड्या कित्येक वर्षात बघितल्या सुध्दा नाहीत. यावर्षी करवते आता .:)

बास अरे... इतकी चविष्ट चर्चा वाचल्यावर आजच वड्यांची भाजी केल्याशिवाय काही पर्याय नाही. नाही तर आमचे पोटोबा रुसून बसणार बघा. Happy

sandge.jpg

हे सांडगे आहेत असे वाटून मी त्याची अशी भाजी केली Happy

vadakanda.jpg

मस्त झाली होती, फक्त कोथिंबीर नसल्याने ओलं खोबरं घातलं होतं Uhoh Wink

श्या.. टोमॅटो चीझ सँडविच खात वाचलं आणि ते सँडविच एकदम ब्लांड लागायला लागलंय.. म्हणून त्यात चिलि फ्लेक्स सीझनिंग ओतले.. तरी काळ्या मसल्याची मज्जा नाही.. आईला फर्माईश द्यावी लागणार..
(आमच्या कडे मटकीचे सांडगे असतात.)
मस्त रेसिपी..

मंजुडी , अगं जरा जास्त शिजली का भाजी. सांडगे शिजले पाहिजेत पण अख्खे राहिले पाहिजेत ना?

आई अशीच करते फक्त कांदा घालत नाही.आणि रस्सा अजुन थोडा जास्त असतो. सांडगे , भारतातुन आले कि भाजी करुन फोटो टाकेन.

सिंडीने दिलेले सांडगे अन अंजलीने दिलेला मसाला घालून केली ही भाजी रविवारी.
जास्त रस्सा ठेवला नाही मी . सांडगे एकदम मस्त कुरकुरीत राहिले . भाकरी करण्याचा उत्साह नव्हता पण पोळीबरोबर मस्त लागली. पुढच्या वेळेस उडीद-कोहळ्याचे सांडगे वापरुन करुन पहाणार

Pages