बृहन्महाराष्ट्र मंडळात दर दोन वर्षांनी अधिवेशनाच्या वेळेस खांदेपालट होतो. यंदाही नवीन कार्यकारिणीने सूत्रं हातात घेतली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेलावेअरचे श्री. आशिष चौघुले निवडून आले.
शिकागो येथील अधिवेशनात बृहन्महाराष्ट्र मंडळाचे बोर्ड ऑफ ट्र्स्टीजचे सदस्य व नवीन कार्यकारिणी: डावीकडून - श्री ठाणेदार, मोरेश्वर पुरंदरे, आनंद जोशी, आशिष चौघुले, नमिता दांडेकर, सुनील सूर्यवंशी, राहुल कर्णिक, सुचिता कुलकर्णी-लांबोरे व वसुधा पटवर्धन.
(श्री, जयंत भोपटकर अधिवेशनास उपस्थित राहू न शकल्याने व श्री. अजय दांडेकर यांना लवकर परतावे लागल्याने ते या फोटोत नाहीत)
श्री. आशिष चौघुले १९९४ पासून डेलावेअरमधे असून उत्तर अमेरिकेतील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. आशिष हे डेलावेअर व्हॅली मराठी मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य असून सध्या ते मंडळाचे अध्यक्षही आहेत. त्यांना मराठी साहित्य, कला व नाटकांची आवड असून अनेक ठिकाणी त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. गेली ४ वर्षे सातत्याने त्यांना United States President's Voluntary Service Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जगभरातील विना-नफा संस्थांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आशिष Citigroup साठी काम करतात व आपली पत्नी डॉ. अश्लेषा व मुलगी अनुष्का यांच्यासमवेत होकेस्सीन, डेलावअर येथे त्यांचे वास्तव्य आहे.
कार्यकारिणीवरील अन्य पदाधिकाऱ्यांची यंदा बिनविरोध निवड झाली.
कार्यवाह श्रीमती नमिता दांडेकर यांनी २००३ व २००५ मध्ये टोरॉन्टोच्या मराठी भाषिक मंडळाच्या कार्यकारिणीवर काम केले असून २००७ ते २०१० त्या सल्लागार समितीच्या सदस्य होत्या. २०१० साली सल्लागार समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. २००८-०९ साली त्यांनी मंडळाच्या Constitution Review Committee वर काम केले होते, व मंडळापुढील प्रश्नांवर विचार करण्यासाठी चर्चासत्रही आयोजित केले होते. सध्या त्या २०१२ साली टोरॉन्टोत भरणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी काम करत आहेत.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीत गेली दोन वर्षे खजिनदार असलेले श्री. अजय दांडेकर हे पुढील दोन वर्षांसाठी तेच पद सांभाळणार आहेत. अजयनी लॉस एंजेलिसच्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीवर २००१ ते २००३ काम केले असून २००४ साली ते मंडळाचे अध्यक्ष होते. सध्या ते लॉस एंजेलिस मंडळाचे विश्वस्त आहेत.
श्री. राहुल कर्णिक यांनी डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीवर काम केले आहे. डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या ‘लख लख चंदेरी’ या विशेष कार्यक्रमाच्या कार्यकारिणीवरही त्यांनी काम केले होते. ‘मराठी मित्र मंडळ’ व ‘याती’ या सेवाभावी संस्थांमधेही त्यांचा सहभाग आहे.
पिट्स्बर्गच्या श्रीमती सुचिता कुलकर्णी-लांबोरे यांनी २००७ ते २००९ पिट्स्बर्ग महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीवर काम केले आहे. गेली ७ वर्षे पिट्स्बर्ग येथे दर रविवारी भरणाऱ्या मराठी शाळेत लहान मुलांना शिकवत असून गेली २ वर्षे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत.
श्री. सुनील सूर्यवंशी कनेटीकट महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष असून हे मंडळ स्थापन करण्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून २००६-०८ व कार्यकारिणी सदस्य म्हणून २००९-१० मध्ये काम केलेले आहे. ते ग्रेटर डॅनबरी इंडियन असोसिएशनचे २००९-१० मध्ये उपाध्यक्ष होते.
बे एरियाच्या श्रीमती वसुधा पटवर्धन या व्यवसायाने शिक्षिका आहेत. त्या २००६ सालापासून बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्य असून २०१० साली मंडळाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी २००७-०८ मध्ये बृहन्महाराष्ट्र वृत्ताच्या सहसंपादक म्हणून काम केलेले आहे. ‘सखी ग सखी’ या मराठी महिलागटाच्या त्या संयुक्त संस्थापिका आहेत.
श्री. जयंत भोपटकर यांनी सिअॅटलच्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीवर काम केले असून ते मंडळाचे अध्यक्षही होते. २००७ साली बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सिअॅटल येथे भरलेल्या अधिवेशनाचे ते निमंत्रक होते. जयंत सिअॅटलमध्ये मराठी शाळा चालवतात. त्यांनी शिकागो व सिअॅटल येथील आपल्या २५ वर्षांच्या वास्तव्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून अनेक स्थानिक व बाहेरून येणाऱ्या कलाकारांना स्वतः तबल्यावर साथ केली आहे. तसेच ३० हून अधिक नाटकांत भूमिका केल्या असून मराठी समाजातील अनेक उपक्रमांमधे त्यांचा सहभाग असतो.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या Board of Trustees वरील एका रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत बे एरियाचे श्री. मोरेश्वर पुरंदरे विजयी झाले. श्री. मोरेश्वर पुरंदरे यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे खजिनदार व अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत (१९९७-९९) सॅन होजे येथे अधिवेशन झाले होते. बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे कार्यक्रमांचे आयोजन, वृत्त, मंडळाची वेब साईट, मैत्र अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता.
श्री. अजय दाण्डेकर, जे नाव वर
श्री. अजय दाण्डेकर, जे नाव वर लिहिलेले आहे, हे सज्जन कधी कुमुद विद्यामन्दीर ह्या शाळेत होते का ?
त्वरित प्रतिसाद द्यावा......आभार,
परब्रम्ह,
नवीन कार्यकारिणी मंडळास
नवीन कार्यकारिणी मंडळास हार्दिक शुभेच्छा.
नवीन कार्यकारिणीस हार्दिक
नवीन कार्यकारिणीस हार्दिक शुभेच्छा.