"अहो, आपण गणपती बघायला जाऊयात ना!" इति सौ. उवाच.
"जाऊ ना, आपल्या एरियात खूप सारे गणपती आहेत. चालत चालत बघितले तरी तासाभरात आटोपतील".
"इथले नाही काही, पुण्यातले! आपल्या सांगवीत असून असून किती गणपती असणारेत?"
"पुण्यातले? शक्य आहे का?"
"का, काय झालं? पुण्यात गणपती नाहीयेत का?"
"आहेत ना, पण मरणाची गर्दी आहे!"
"मग काय झालं? आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी गाडी पार्क करु आणि बघू गणपती!"
"थांब मला विचार करु दे!"
"तुम्ही नंतर विचार करत बसा, आधी जायचं की नाही ते सांगा!"
"बरं जाऊ!"
मला आठवायला लागलं आम्ही लहानपणी गणपती बघायला जायचो ते. बाबांना ते सकाळी ऑफिसला निघाले असतील तेव्हाच आठवण करुन द्यायची,"बाबा, संध्याकाळी लवकर याल ना? आपल्याला गणपती बघायला जायचंय!" बाबांचा चेहेरा क्षणभर विचारमग्न व्ह्यायचा! पण लगेच ते म्हणायचे,"चालेल, मी येतो लवकर, पण तयार रहा हं, लगेच निघूयात!" इतका आनंद व्हायचा सांगू! तेव्हा वाटायचं की बाबा इतका कसला विचार करतात हो म्हणायला, आता कळतंय, की आज जर लवकर यायचं तर ऑफिसमधल्या कामाची संगती कशी लावायची याचा ते विचार करत असायचे. बिचारे अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी दुस-या दिवशी लवकरच ऑफिसला जायचे. आमच्या चेहे-यावरचा आनंद लोपू नाही म्हणून ते काहीही करायला तयार असायचे.
संध्याकाळी पाच-साडेपाचला आम्ही शाळेतून आलो की आई म्हणायची, "लवकर आटपा रे, आत्ता बाबा येतील!" आम्ही पटापट हातपाय धुवून मस्तपैकी नवे कपडे घालून पटकन तयार व्हायचो. आमची तयारी झाल्याझाल्या बाबा आले नाहीत तर लगेच आमची टकळी चालू, "आई.... बाबा केव्हा येतील? आम्हाला तयारी करुन ठेवायला सांगीतली आणि अजून स्वत:च आले नाहीत!"
आई सांगायची, "येतील रे पाच मिनिटात, काही काम आलं असेल!"
"नाही काही, त्यांनी लगेच यायला हवं!"
"अरे काम असतं ना ऑफिसात, येतीलच इतक्यात!"
तेवढ्यात बाबा पोचायचेच! आम्ही लगेच, "बाबा चलायचं ना!"
"अरे हो, बाबांना हातपाय तर धुवू देशील!" आम्ही नाखूषीनेच बाबांच्या तयारीची वाट बघत बसायचो.
लगेच आम्ही घराला कुलूप लावून निघायचो! निघतांना चेहे-यावर असा आनंद असायचा की जसं आम्ही वर्ल्डकप जिंकून आणलाय!
"बाबा, आज साता-यातले बघू ना! (सातारा हे आमच्या गावातल्या एका भागाचं नाव आहे) जामनेर रोडचे उद्या बघू!" बाबांचे कितीही पाय दुखत असले तरी त्याची पर्वा न करता आम्ही दोघं भाऊ आपले त्यांना ओढतच साता-यात घेऊन जायचो. रस्ताभर नुसते गणपती बघणारे लोक सांडलेले असायचे. कुणी गाडीवरुन अख्ख्या फॅमिलीला फिरवत असायचे,(मी विचार करायचो, इथे इतक्या गर्दीत चालता येत नाहीये, आणि हे लोक गाडीवरुन कसे काय फिरु शकतात? चालवणा-याचीही कमाल आहे. गावातले रस्ते असून असून किती रुंद असणारेत?)कुणी पायीच फिरत असायचे. आमच्यासारख्या पोराटोरांचा आनंद तर गगनात मावत नसायचा! हा गणपती बघू की तो, असं व्हायचं. ब-याच ठिकाणी कापडी गुहा केलेली असायची. त्यात आत जाऊन गणपतीचं दर्शन घ्यावं लागायचं. तिथेही रांग असायची. आतलं डेकोरेशन मात्र खरंच डोळ्याचं पारणं फेडणारं असायचं. काही ठिकाणी ट्रीक सीन्स असायचे, जसं एखाद्या मुलाचं फक्त मुंडकच दिसायच, बाकी शरीर गायब! नळातून जोरात पाणी वाहतांना दिसायचं पण फक्त नळ दिसायचा, बाकी जोडणी दिसायचीच नाही! पूजेच्या ताटातून फक्त पंजापर्यंतचा हात वर यायचा, ते ताट एखाद्या स्टूलावर ठेवलेलं असायचं, पण तो हात कुणाचाय हे दिसायचंच नाही! असे अनेक ट्रीक सीन्स असायचे. आम्ही ते बघतांना अगदी दंग होऊन जायचो. काही ठिकाणी कठपुतळ्यांचा खेळ असायचा. त्यांचा नाच बघून खूप खूप हसू यायचं. जिथे आम्हाला काही दिसायचं नाही तिथे बाबा आम्हाला कड्यावर घेऊन डेकोरेशन दाखवायचे. सगळीकडे अगदी जत्रेसारखं वातावरण असायचं. बाबांच्या मागे लागून एखादा फुगा, बासरी असं काहीबाही आम्ही विकत घ्यायचोच! बासरी म्हणजे माझा जीव की प्राण होती. लहानपणी किती बास-या घेतल्यात त्याची गणतीच नाही. कालच विकत घेतलेली बासरी दुस-या दिवशी माझाच पाय पडून चकनाचूर व्हायची, आणि मी पायात काच घुसल्यासारखा भोंगा ताणायचो!
गणपती बघून आम्ही रात्री साडेनऊ-दहाच्या आसपास घरी पोचायचो. येताना पूर्ण रस्ताभर कुठला गणपती छान होता आणि कुठलं डेकोरेशन मस्त होतं यावर चर्चा चालत असे. घरी आल्यावरही तेच. आई जबरदस्तीने आम्हाला जेवायला उठवायची. जेवण करुन आम्ही गणपतीबद्दल गप्पा करत झोपून जायचो.
सकाळी शाळेत मुलं एकमेकांना फुशारक्या मारत सांगत आम्ही काल असा गणपती पाहिला आणि तसा गणपती पाहिला. एखादा भारी वर्णन करु लागला तर बाकीचे त्याच्याकडे कौतुकमिश्रित आश्चर्याने बघायचे. मग सांगणा-यालाही चेव चढायचा. तोही असं अतिरंजित करुन वर्णन करायचा. पूर्ण दहा दिवस शाळेत मुलांना गप्पांना दुसरा विषय नसायचा.
लहानपणी गणपती बघायला जाताना जो आनंद असायचा तो हळूहळू कमी होत गेला, पण जेव्हा केव्हा काही वर्षांनी माझी मुलं मला म्हणतील,"बाबा, आज लवकर याल ना? आपल्याला गणपती बघायला जायचंय!", तेव्हा मीसुद्धा मनाने माझ्या बालपणात जाऊन येईन आणि परत एकदा "गणपती बघायला" जाऊन येईन!
गणपती... एक पाहणे
Submitted by आदित्य चंद्रशेखर on 5 September, 2011 - 23:30
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान्...मुल म्हणेपर्यंत वाट
छान्...मुल म्हणेपर्यंत वाट बघु नका...तोपर्यंत सौ. ला घेउन जा....:)