सगळंच संपलेलं होतं! स्वप्नांचा चक्काचूर झालेला होता. बेभानपणे उमेश पुण्याकडे धावला होता.
मिळेल ते वाहन, मागेल ते भाडे, कोणतीही वेळ, काहीही असो!
अक्षरशः तीन तासात पुण्यात पोचल्यावर त्याने पहिल्यांदा वाड्याकडे धाव घेतली. पण तेथे गस्त असणार हे लक्षात आल्यावर निवेदिताला कोणत्या हॉस्पीटलमध्ये ठेवलेले असावे याचा विचार करू लागला. रात्रीचे दिड वाजलेले होते. अशा वेळेस रिक्षा मिळणे असंभवच होते. शिवाजी पुलावरून तो अक्षरशः वादळी वेगाने चालू लागला. पळताना कुणी पाहिले तर आणखीनच अडकू अशा विचाराने पळत मात्र नव्हता. दिशा ठरलेली होती. अशा केसेस ससूनमध्ये जातात हे त्याला माहीत होते. जवळपास वीस मिनिटांनी घामाघूम होत तो ससूनपाशी पोचला.
सापळा!
समोर सरळ सरळ सापळाच होता. एका कोपर्यात एक पोलिस, त्याच्या मागे काही अंतरावर दुसरा आणि असेच त्या दिशेने मागे मागे जात राहिल्यावर ठराविक अंतरावर काही पोलिस आणि अगदी शेवटी नितुचे आईबाबा आणि चक्क....
... चक्क आजोबा????
तिथे कसे पोचू शकू आपण? वेडा विचार मनात आला. स्वतःला स्वाधीन करायचेच आहे तर सरळ आत घुसू सापळ्यात! नितुला फक्त दिसूयात आणि लगेच स्वाधीन होऊ पोलिसांच्या!
मूर्ख मुलीने हे काय केले?? आपल्यावरचे आरोप अजून स्पष्ट नाहीत, शिक्षा काय होणार हे माहीत नाही, तोवर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला???
याचा अर्थ उघड होता. तिला तिच्या वाड्यातल्या बोलण्याचा प्रचंड पश्चात्ताप झालेला होता. केवळ स्वतःच्या वडिलांपासून संरक्षण व्हावे म्हणून ती असे बोललेली होती.
अंधार्या कोपर्यात जवळजवळ वीस मिनिटे नुसता उभा राहिला उमेश! आणि शेवटी ताण सहन न होऊन अत्यंत शांतपणे वॉर्डकडे चालू लागला. अपेक्षित तेच झाले. पहिल्याच पोलिसाने सरळ गचांडीच धरली. ते पाहून बाकीचे पोलिस धावले. उमेशने नितुचे वडील पोचेपर्यंत स्वच्छपणे सांगून टाकले की मी स्वाधीन होत आहे. मात्र नितुच्या वडिलांनीही अपेक्षित तेच केले. नितुच्या वडिलांनी उमेशला सरळ सरळ बुकलायलाच सुरुवात केली. तोवर आजोबा तेथे धावले. आजोबांनी नितुच्या वडिलांना धरताच इतर पोलिसांनी त्यांना बाजूला केले. तोवर नितुच्या आईनेही उमेशला काही फटके मारून घेतले. नको ते घडत होते. उमेश मार खातानाही विचार करत होता की आपल्या प्रेमाची कथा येथेच संपलेली आहे. आपण एक अट्टल गुन्हेगार ठरणार आहोत. आणि फटके तर सहन होत नव्हते. आजोबा आता थकल्या अंगाने जमेल तसा प्रतिकार मोडून काढत नितुच्या वडिलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत होते. आता आरोपीला इथेच इतकी मारहाण झाली तर नवीन प्रकरण निर्माण होईल हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर तीन पोलिसांनी नितुच्या वडिलांनाही धरून ठेवले. अत्यंत जळजळीत नजरेने उमेशकदे पाहात नितुचे वडील घुसमटत्या स्वरात त्याला शिव्या देत होते. नितुची आई मात्र अजूनही उमेशच्या अंगाशी झोंबतच होती.
आजोबांच्या डोळ्यात पाणी आले होते. उमेश कसाबसा उठून उभा राहिला. वेदनांनी अंग ठणकत होते. त्याहूनही जास्त अपमानाची बोच होती. असह्य होत होते सगळे! हे हॉस्पिटल असल्याने हा प्रकार लगेचच थंबवावा लागला होता हे उमेशचे सुदैवच!
डोळ्यातून गालांवर घरंगळणार्या सरी अपमानाला व्यक्त करत असतानाच अपमानाचे प्रमाणही वाढवत होत्या.
"पाणदर्यालाही कट केलाय अख्तरने"
अत्यंत जखमी स्वरात उमेशने कसेबसे उच्चारलेले ते वाक्य क्षणभर सगळ्यांनाच चक्रावून गेले. या मुलाचा माहिती मिळवण्यासाठी उपयोग होणार हे सर्वांनाच माहीत होते. मुख्य म्हणजे दिवसभराच्या चौकशीतून समोर आलेली सत्ये अशी होती की जुनैद अख्तर हाच एकमेव आरोपी आहे. उमेश राईलकर, राहुल आणि विनीत यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आप्पाचा तर अजिबातच नाही. विनीतने मोटरसायकल देणे हा केवळ एक मैत्रीचा प्रकार होता. राहुलने तर पहिल्याच दिवशी जुनैद अख्तरचा जॉब सोडलेला होता. उमेशला बळीचा बकरा करण्यासाठी अख्तरने त्याचे नांव विविध हिकाणी लिहून टाकलेले होते. वास्तविक पाहाता ही सर्व चांगल्या घरातील मुले असून त्यांचा या कशाशीही संबंध नाही. मात्र जुनैद अख्तरबाबत उमेश काय माहिती सांगतो हे त्यांच्यादृष्टिने आता महत्वाचे होते. आणि आत्ताचा नितुच्या वडिलांचा आणि आईचा क्रोध हा केवळ आमच्या मुलीला अशा प्रसंगातून तुझ्यामुळे जावे लागले याबाबतचा वैयक्तीक क्रोध होता.
वास्तविक पाहता काही दिवसातच चौकशी पूर्ण झाल्यानंतर उमेशच्या नावावर बसलेला कलंक मिटणार होता.
मिटल्यातच जमा होता.
पण तो कलंक होता अपराधाचा! सामाजिक अपराधाचा! जो कलंक त्याच्यामुळे सब इन्स्पेक्टर आपट्यांच्या नावावर लागलेला होत तो कदापी मिटणार नव्हता.
नितुला एक क्षणही भेटू न देता अर्थातच उमेशला पुन्हा चौकीवर आणण्यात आले. तेथे आई बाबा आणि क्षमा होते.
आईने इतके जळजळीत नजरेने उमेशकडे पाहिले की उमेशची नंतर मान वर करायचीसुद्धा हिम्मत झाली नाही. चौकशीसाठी दोन वरिष्ठ अधिकार्यांनी त्याला आतल्या खोलीत न्यायला सुरुवात केली तेव्हा मात्र उमेशच्या आईने हंबरडा फोडला की त्याला मारू नयेत. अर्थात, अधिकार्यांनी तिला सांगितले की तुमच्या मुलाचा अपराध नसून तो चुकून अडकला गेला असल्याने फक्त माहिती घ्यायची आहे. ते पुढे हेही म्हणाले की उद्याच्याच पेपरात तुमच्या मुलाच्या निष्पापपणाचा खुलासाही छापून येणार आहे.
उमेशला चक्क खाऊ पिऊ घालण्यात आले. पोटभर खाऊन झाल्यावर त्याला तरतरी आली. मग त्याने स्वतःच तो का पळून गेला होता, कुठे थांबला आणि त्याला काय समजले हे सगळे सांगून टाकले.
तपासाच्या आधीच पळून जाण्याचा आरोप फक्त दाखल झाला. तोही आरोप रद्द करावा असे खात्यातीलच काही लोकांना वाटले कारण एक प्रकारे उमेशच्या पाणदर्याला जाण्याने कटाचे व्यापक स्वरूपही समजलेले होते. पण कायद्यात भावनिकतेला वाव नसल्याने तेवढे करावेच लागले. या गोष्टीचा जामीन भरणे शक्य असल्याने उमेश पहाटे पहाटे अडकला आणि दुपारी सुटलाही. काही महिने मात्र त्याला तेथे रोज यावे लागणार होते. त्या दिवशीचे पेपर मात्र वाचनीय होते.
कसबा पेठेतील युवकाला कटात अडकवले.
उमेश राईलकर निरपराध
प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न, जीव वाचला
पुण्यात ब्रॅन्ड न्यू लव्ह स्टोरी
इत्यादी इत्यादी!
परिणाम व्हायचा तोच झाला.
आपट्यांनी रास्ते वाडा सोडला. ते डेक्कनपाशी एक महागाची जागा भाड्याने घेऊन तिथे राहायला गेले.
पंधरा दिवस! पंधरा दिवस उमेश त्याच्या पुण्यातल्याच हॉस्टेलवर राहणार्या एका मित्राकडे राहात होता.
सरळ होते. त्याला आईने घरातून काढून टाकलेले होते. तो कसा जगत आहे हे बघायची त्याच्या वडिलांची इच्छाच नव्हती. क्षमा रडून रड्न अर्धमेली झाली तरी कोणीही उमेशला पाहायला जात नव्हते.
इकडे उमेश मात्र वेगळ्याच परिस्थितीत राहत होता.
अत्यंत गलिच्छ अशा त्या होस्टेलच्या रूमवर एकंदर तिघे राहात होते त्यातच चवथा उमेश जाऊन पोचला.
तो का आला आहे हे सहज समजलेलेच होते. अर्थातच, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 'हा कधी एकदा जातोय' असाच होता. पण एखाद्याला हाकलून देणे ही त्या होस्टेलच्या मैत्रीतील प्रथा नव्हती. त्यामुळे त्याच्याशी कोणीही बोलत नसले तरीही त्याला त्यांनी तिथे ठेवलेले होते. तिघांच्याच डब्यातले तो थोडेसे खात होता. कुठे घर आणि कुठे वसतीगृह हा विचार क्षणोक्षणी त्याच्या मनात येत होता. पर्याय नव्हता. तिथे पोचल्याच्या तिसर्याच दिवशी रात्री त्याने तिघेही अभ्यासाला बसण्याचा अभिनय करत असताना आणि अभ्यास सोडून भरपूर गप्पा मारत असताना स्वतःची संपूर्ण कहाणी सांगितली. सुरुवातीला कटकट, नंतर नवलाई, नंतर कुतुहल आणि शेवटी उमेशसाठी सहानुभुती असे रंग बदलवत ती कथा संपली. कथा संपली तेव्हा त्यांच्यतील एक जण उत्स्फुर्तपणे म्हणाला:
"कुछ भी कहो यार, तेरे जैसी मेहबुबा तो किसीको नसीब होती नही है, जिसने जहर खा लिया"
खट्टकन छातीत उलथापालथ झाली उमेशच्या! कळवळून तोही उत्स्फुर्तपणेच म्हणाला:
"मला तिला एकदाच भेटायचंय यार"
अशक्य कोटीतील बाब होती ही!
पण प्रेम आंधळेच!
निघाले चौघे!
रात्रीचे अकरा वाजलेले! हे नवीनच तिघे आपल्या प्रेमकहाणीत आपल्याला का मदत करत आहेत हा विचारही उमेशच्या मनात येत नव्हता. जायचे म्हणजे फक्त जायचे.
पण कुठे जायचे? माहीतच नव्हते की आपते कुठे गेले राहायला? कुणाला विचारायची सोय नव्हती. मागे गुरुवार पेठेत त्यांनी जागा पाहिलेली होती तिकडे जाण्यात काही अर्थच नव्हता. कारण ती जागा आपल्याला माहीत आहे म्हंटल्यावर ते तिथे जाणारच नाहीत हे समजत होते.
काहीच अंदाज नसल्याने सगळे पुन्हा परत आले.
त्यानंतरचे दिवस मात्र उमेशसाठी अतिशय अवघड होते. कारण एक तर सगळे सकाळी कॉलेजला निघून जायचे. त्यांच्या नजरेत सारखे 'हा इथे कोणत्या बेसिस वर आणि किती दिवस राहणार आहे, आणि परवानगी नसताना याला आपण ठेवून घेतल्याचे समजले तर अॅक्शन घेतली जाईल यावर काय करायचे' असेच भाव होते. कुजबूज वाढत होती. तिरकस उत्तरे येऊ लागलेली होती. पण तरी डबा आला की त्याला दोन घास दिले जातच होते. 'तू आता जा' असे कोणीही म्हणत नव्हते. पण उमेशला ते समजू लागलेले होते.
आज त्याने संपूर्ण रूम लख्ख करून ठेवली. आपण आपली गरज निर्माण करायला पाहिजे हे त्याला समजले. वास्तव आयुष्य खूप वेगळे आहे हे लक्षात येत होते. घरी असताना कामाला हातही लावायचा नाही. रूम पाहिल्यावर नकळत सगळ्यांनीच त्याचे कौतुक केले. उमेशने चक्क एकाचे लिखाण करायला त्याला मदत केली तशी मात्र त्यची उपयुक्तता बरीच आहे हे एकेकाच्या लक्षात येऊ लागले. त्या सर्वांपेक्षा उमेश एक दोन वर्षांनी मोठाच होता. तो पुण्यातलाच आहे आणि त्याचे प्रॉपर घर आहे म्हंटल्यावर त्यांना हे माहीत होते की काही दिवसांनि का होईना पण तो जाणार! त्यात आता त्याने कामे करायला सुरुवात केलेली दिसत असल्यामुळे स्वीकारार्हता वाढली.
आणि आनंदात गप्पा मारत डबे संपवत असताना...... दार वाजले...
"आत्ता कोण आलं?? आत्ता आतही घेत नाहीत गेटमधून... साडे दहा वाजलेत" एक रूममेट दार उघडायला जाताना म्हणाला.
त्याने दार उघडल्यावर अवाक झाला उमेश!
एकेक जण आत येऊ लागला.
आप्पा.... पाठोपाठ राहुल्या... शेवटी विन्या...
"काय रे?? इथे काय करतोयस??"
आप्पाच्या त्या प्रश्नावर काय म्हणावे तेच उम्याला समजेना!
"चल लेका... आईने बोलावयलंय तुला... "
विन्याने ते वाक्य उच्चारले मात्र.....
.....
आईने?? आईने बोलावलंय??
आई!
खळ्ळकन डोळ्यात पाणी आले उम्याच्या! आप्पा, विन्या, राहुल्या, रूमच्या भिंती, एकेक गोष्ट अंधुक दिसू लागली.
आईने बोलावलंय! परत घरी बोलावलंय! दहा दिवस रागवली होती. आपला इगो आपल्याला सांगत होता. उमेश, पुन्हा कधीही घरी जायचं नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला दोनशे हाका मारणार्या आईला नाही सहन झाले आपण घरी नसणे! तिने तिचा इगो दूर सारला.
वयं लहान होती पोरांची! प्रेम बसण्याची असली तरी घरची उबदार माया हवीच होती.
'आईने बोलावलंय तुला परत' हे वाक्य ऐकल्यावर उमेश राईलकर दोन्ही हात चेहर्यावर ठेवून ढसाढसा रडले. रडू लागले.
आप्पा पटकन त्याच्या जवळ येऊन त्याला थोपटू लागला. विन्याला रडता यायचं नाही. तो नुसताच दिवाणावर बसून जमीनीकडे बघत राहिला. कुठल्याकुठे गेले होते सगळे प्रकरण! राहुलचे मात्र उम्यावर स्पेशल प्रेम होते. दोघे बरोबरीचेच होते. राहुल भिंतीला चिकटून स्वतःलाच आधार द्यायला लागला. त्याच्याही डोळ्यात पाणी आलं!
"चल ना लेका उम्या... तू नसलास की वाड्यात कसंतरीच होतं रे"
राहुलचे ते पाणावलेले वाक्य उम्याला आणखीन रडवू लागले. आप्पा त्याच्या पाठीवरून हात फिरवत होता.
"आप्पा... विन्या... अरे... अरे माझ्यामुळे... माझ्यामुळे... मारलं का रे तुम्हाला???"
ढसाढसा रडत उम्याने विन्याकडे बघत तो प्रश्न विचारला. आप्पाचा थोपटणारा हात थांबला. नक्कीच काहीतरी झालेलं होतं! उम्याने वेदनेच्या अतिरेकाने आप्पाकडे वळून पाहिलं! हमसून हमसून रडत त्याने आप्पाला विचारलं.
"आप्पा... खरं सांग ना... मारलं तुम्हाला???"
आप्पा खाली मान घालून बसला होता. उम्याने विन्याकडे पाहिले आणि आजवर न घडलेला प्रकार त्याला पाहायला मिळाला.
विन्या डोळे पुसत होता.
"काय रे विन्या... विन्या... ए विन्या... सांग ना...??? मारलं????"
"तुझ्यासाठी.... दोन चार फटके म्हणजे... काहीच नाही रे... "
विन्याला मिठी मारून रडला तरी उम्याचे रडणे थांबेना! आप्पाही हवालदिल झाल्यासारखा उभा राहिला होता नुसता!
उम्याने आता आप्पाला मिठी मारली. आप्पाला गदागदा हालवत उम्याने विचारलं!
"कोणी मारलं???? सांग ना??? नितुच्या बापाने??? सांग ना आप्पा... "
"मला... मला अन विन्याला.. हेरंबने फटके टाकले..."
"आप्पा... मी काय करू रे?? म्हणजे माझ्यावरचे हे पाप मिटेल??? सांग ना विन्या... "
"प्रश्न तो नाही आहे उम्या... "
राहुलचा आवाज असा गंभीर कधीतरीच व्हायचा.. उमेशने मागे वळून पाहिले...
"काय झाले?? काय झाले आहे?? कसला प्रश्न आहे मग???"
"नितुच्या बा.... वडिलांनी.. ..."
"..... क... काय केले???"
"आजोबांवर.... हात उगारला.... शिव्या दिल्या त्यांना... म्हणूनच तुझ्या आईने तुला हाकलले... "
".. आजो..."
उमेशच्या हाताच्या मुठी वळत होत्या. संतापाने थरथरत होता तो! आप्पाने त्याला धरून ठेवलेले होते. आजवर उम्याने कधी शिवीगाळ केलेली नव्हती कुणालाही! आज त्याने नितुच्या वडिलांच्या आणि जुनैद अख्तरच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली.
"घरी चल उम्या... आई थांबलीय दारात... "
ते ऐकून होस्टेलवरचे एक पोरगे बडबडले.
"याला आई बोलावतीय तरी... माझी तर सावत्रच आहे.. तिनेच काढले घरातून"
'आई'! पुन्हा एकदा त्या भावनेने उम्याचे मन व्यापले. तो पुन्हा रडू लागला.
"कोणत्या तोंडाने जाऊ मी राहुल्या घरी??? काय तोंड दाखवू बाबांना आणि आजोबांना??
आप्पाने होस्टेलवरच्या तिघांना उद्देशून सांगितले...
"आमच्या मित्राला सांभाळलंत म्हणून थॅन्क यू... केव्हाही काही लागलं तरी आम्हाला सांगा... "
आता उमेश त्याच्या मित्राकडे आणि इतर दोघांकडे पाहात आप्पाला उद्देशून म्हणाला...
"आप्पा... अरे शर्ट पॅन्ट पण यांचे वापरले मी..."
होस्टेलवरचा हिंदीभाषिक मुलगा म्हणाला...
"तो क्या हुवा??? कभीभी रहनेका होगा तो आजा इधर... क्या??"
होस्टेलवरच्या नव्या मित्रांना मिठी मारून ..... उमेश आपल्या जिवाभावाच्या मित्रांबरोबर ... आपल्या घरी निघाला...
रस्त्यात कोणीही एक शब्दही कोणाशीही बोलत नव्हते. उमेश जणू डायरेक्ट तुरुंगातूनच घरी चालला असावा तश्या चेहर्याने चालत होता.
आणि कसबा गणपती आला तसा मात्र त्याचा चेहरा रडवेला झाला. केवळ एक मिनिट! केवळ एका मिनिटाच्या अंतरावर आपले घर! दारात आई उभी असेल! आतमध्ये बाबा! क्षमा तर वाड्याच्याच दारात थांबलेली असेल. आणि आजोबा??
आजोबा आपल्याशी बोलणार नाहीत. कधीच बोलणार नाहीत. आपल्यामुळे त्यांच्यासारख्या चारित्र्यवान व कित्येक पावसाळे पाहिलेल्या प्रेमळ माणसाला अपमान सहन करावा लागला.
आप्पाकडे बघत उम्या म्हणाला...
"आप्पा... मला नाही रे यायचं ... मला तोंड नाही दाखवता यायचं आजोबांना आणि आईला.. "
"उम्या... काकू रडून रडून वाईट अवस्था करून घेत आहेत.. तुला सगळ्यांनी आधीच माफ केलेलं आहे... म्हणूनच आम्हाला पाठवलं आहे तुला आणायला... आता तू न येणं चुकीचं होईल.. "
"नि.... निवेदिता... निवेदिता कशी आहे???? बरी आहे का???"
इतक्या वेळात 'प्रेम' हा विषयच कोणाच्या डोक्यात नव्हता. पण आता घरच्यांनी माफ केल्याचे उमेशला समजताच त्याला नितुबद्दल काळजी वाटली.
"अजून कॉलेजला जात नाही म्हणे.... घरीच विश्रांती घेत आहे"
राहुल्याने माहिती पुरवली. तीनही चेहरे त्याच्याकडे वळले.
"तुला कसे कळले?"
विन्याने हा प्रश्न फारच चकीत होऊन विचारला होता. कारण इतके सगळे झाल्यावर निवेदिताची माहिती काढणे हा प्रकार कोणीच करणार नाही याबाबत त्याला खात्री होती.
"तिची एक मैत्रीण वर्षाला ओळखते, वर्षाने सांगितले"
वर्षा हि आपली होणारी बायको असूनही तिने ही माहिती राहुल्याला दिली याचा अर्थच वर्षाला आपण आता या प्रकरणात पडु नये असे वाटत आहे हे विन्याला समजले. अबोलपणे चौघे चालत वाड्याच्या दारात आले...
.....
क्षमा!
उमेशकडे बघत एक शब्दही न बोलता वाड्याच्या दारातून काहीशी बाजूला सरकली क्षमा! उमेशला तिचे ते बघणे अत्यंत अपरिचित वाटले.
अशीच रिअॅक्शन सगळे देणार असतील तर घरात कशाला जायचे या विचाराने तो घराकडे बघत होता तेव्हा...
......
खाड!
काहीहि अपेक्षा नसताना शैलाताईने, म्हणजे राहुल्याच्या बहिणीने आणि आप्पाच्या बायकोने उमेशचे थोबाड फोडले होते.
"वयं आहेत का ही प्रेमं करण्याची??? मैत्री मैत्री म्हणजे असली???तुझ्यासाठी या तिघांनी मार खायचा?? "
शैलाताईला क्षमाने आणि आप्पानेच काय, राहुल्यानेही सावरले नाही. मुकाट मार खाल्ला उमेशने! सख्ख्या मोठ्या बहिणीने मारले असावे तसा!
मान खाली घालून उमेश तिच्यासमोर उभा राहिला.
"आत जा आता... आजोबांच्या पाया पड... "
शैलाताईने सुनावले. शैलाताईची थोरली जाऊही हा प्रकार पाहून थक्क झालेली होती.
घर! उंबरा!
मान छातीला चिकटेल इतकी खाली घालून उमेशने आत पाय टाकले. निवेदिता आपटे, आप्पा, विन्या, राहुल्या, शैलाताई, होस्टेल, पोलिस केस, जुनैद अख्तर...
..... सगळे सगळे मनाने क्षणात विस्मरणात टाकलेले होते.... एकच नजरानजर !
आई!
खुर्चीवर आई बसलेली होती.
डोळ्यांची नदी वाहवत उम्या आईसमोर खाली वाकला आणि... पुढच्याच क्षणी... आईच्या उबदार हातांची जुडी पाठीवर टेकली...
रास्ते वाडा रडला त्या रात्री! उमेशच्या आईने मुलाला मारलेली मिठी पाहून!
बाबा अजूनही पाठच करून बसलेले होते. त्यांना त्यांच्या वडिलांचा झालेला अपमान विसरताच येत नव्हता.
"चुकलो... ब.. बाबा. मी चुकलो.. "
"आजोबांना सांग आधी...."
उमेश कशीबशी पावले टाकत आतल्या खोलीत गेला... तर.......
"अरे?? व्वा वा वा वा... आलास का घरी एकदाचा?? असे घर सोडून् जायचे नसते कधी बाळा... आपल्या आईचे मन तरी कळायला नको का?? बाकी माझी माफीबिफी मागायची गरज नाही हां?? एक सांग... त्या मुसलमानाची नोकरी करताना तुला हे काहीही माहीत होते का?? अजिबात नाही... प्रेम करणे ही चूक आहे का??? अज्जिबातच नाही... ये... बस इथे.. वेडायसा का??? रडतोस काय मुलासारखा मुलगा असून???"
"तुम्हा... ला... काहीतरी... वाईट्साइट बोलला ना तो... नाला... यक??"
"अरे अरे??? सासर्याला असे बोलायचे नाही बरे?? तुझी आई बोलते का कधी??? हा हा हा... चल.. झाले ते झाले.. "
"सांगा ना आजोबा... काय केले त्याने??"
"अरे जे काय केले ते लग्नाच्या मानपानात सव्याज परत करून टाकू... चल... आजीच्या फोटोला आणि देवाला नमस्कार कर... आणि जेवायला बस..."
आप्पा, विन्या आणि राहुल्या या तिघांनीही दोन दोन घास खाल्ले. शैलाताईने तिच्याही घरातून काही अन्न आणलेले होते.
काहीश्या खिन्न मनस्थितीत आणि काहीश्या सुटकेच्या भावनेने जेवणे झाली. आता क्षमाही एखाददुसरा शब्द बोलतच होती.
शेवटी खूप खूप वेळ गप्पा मारल्या सगळ्यांनी! अगदी वर्षा आणि तिची आईही आल्या होत्या.
पहाटे अडीच वाजता निजानिज झाली. आजोबांच्या समोरच्या पलंगावर आडवा होताना उमेशने दिवा विझवायला हात वर केला....
अचानक आजोबांचा कुजबुजता प्रश्न कानांवर पडला...
"तुला काय ते सर्दी वगैरे झाल्याचे सांगितले नाहीस तू???"
"म्हण... जे??... सर्दी??? "
"जाताना ती हा रुमाल टाकून गेली नाक पुसण्यासाठी... आता आजे सासरा असताना रुमाल टाकायचा का खिडकीतून??"
वेड्याचा बाजार झाला उमेशच्या डोक्यात नुसता! लाजत लाजत रुमाल हातात घेतला त्याने! स्पर्श काही वेगळाच वाटत होता म्हणून घडी उघडली तर...... कागद???
"आत कागद होता तो मी नाही वाचला बरं??? काहीतरी ती तुझ्याशिवाय जगू बिगू शकणार नाही असे म्हणत आहे ते मी अजिबात वाचलेले नाही, विष खायच्या आधी इतके लिहीले आणि विष खाल्लं.... काय हल्लीच्या पोरी"
वैतागलेल्या नजरेने आजोबांकडे पाहात उमेशने दिवा लावून कागद वाचला.
"तुला वाचवण्यासाठीच खोटे बोलले मी! माझ्या वडिलांपासून तुला वाचवण्यासाठी! पण इतके झाल्यावर तर आपण मुळीच मागे हटायचे नाही. एक चांगली नोकरी पकड आणि मला पळवून ने. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही - तुझी आणि फक्त तुझी - निवेदिता"
सूर्यकिरणे रास्ते वाड्याची गरीबी जगासमोर स्पष्ट करेपर्यंत तेच शब्द घोळत होते त्याच्या मनात.....
'तुझी आणि फक्त तुझी.... फक्त तुझी.... फक्त तुझी"
=======================================================
-'बेफिकीर'!
........
........
झकास.....मस्त झालाय हा भाग...
झकास.....मस्त झालाय हा भाग...
अरे वा................टेंशन
अरे वा................टेंशन आलेले कमी झाले आता...........एक घाट पार झाला..हिंदकोळे देत का असेना झाला हे महत्वाचे
सही.................!
सही.................!
आवडला हा भाग.
आवडला हा भाग.
मस्त एकदम मस्त शब्द नाहित.
मस्त एकदम मस्त
शब्द नाहित. रडवले यार.
धन्यवाद बेफिकीर -
हुश्..........श्श! उमेशच्या
हुश्..........श्श! उमेशच्या प्रेमातील एक अडथळा तर दूर झाला. खूपच छान .
जबरदस्त भाग...... सर्व टेन्शन
जबरदस्त भाग......
सर्व टेन्शन दूर.....
आजोबा असावे तर असे असावेत.
हा भाग लवकर टकल्यांबद्द्ल धन्यवाद. . .
पुढील भागांसाठी वेळ लावू नये.
मस्त
मस्त
मस्त मस्त...
मस्त मस्त...
पहिले वाचक जे असतात त्यांनी
पहिले वाचक जे असतात त्यांनी लक्षात घ्यावे की
मी पहिला असे लिहिण्याची गरज नाही.
"मी पहिला" याला काय प्रतिसाद म्हणतात ?
वाचनाबद्द्ल प्रतिसाद द्या.
हा भाग संपूर्णपणे वाचला.
हा भाग संपूर्णपणे वाचला. आवडला.
>>सूर्यकिरणे रास्ते वाड्याची गरीबी जगासमोर स्पष्ट करेपर्यंत तेच शब्द घोळत होते त्याच्या मनात.....
'तुझी आणि फक्त तुझी.... फक्त तुझी.... फक्त तुझी"
सही!!!!
मस्त आहे. डोळे पाणावले. पण
मस्त आहे. डोळे पाणावले.
पण संपली......? की पुढिल भाग येणार आहे.......
@ मी मनी म्यांऊ ....पहिले
@ मी मनी म्यांऊ ....पहिले वाचक जे असतात त्यांनी लक्षात घ्यावे की
मी पहिला असे लिहिण्याची गरज नाही.
"मी पहिला" याला काय प्रतिसाद म्हणतात ?
वाचनाबद्द्ल प्रतिसाद द्या>>>>>>>>>>>>>
ज्याचा लेख आहे त्याने बोलावे....आणि वाचनाबद्द्ल प्रतिसाद द्या...बाकिच्यांच्या प्रतिसादाला प्रतिसाद नको....
परत एकदा टर्न व्वा! दमदार
परत एकदा टर्न


व्वा! दमदार लेखन
अन लेखक
प्रतेक भागात रडवता राव तुम्हि
"तुला काय ते सर्दी वगैरे झाल्याचे सांगितले नाहीस तू???">>
अन शेवटी हासवता बि
मस्त.. मजा आली. ह्या
मस्त.. मजा आली. ह्या कादंबरीचा हा भाग सगळ्यात आवडला.
पुढिल भाग येणार आहे की
पुढिल भाग येणार आहे की नाही???????????????????????