जागेचा मालक

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 August, 2011 - 14:40

गावामध्ये काही ठराविक क्षेत्रात एक जागेचा मालक असतो. तो जागेचा रक्षणकर्ता असतो असे म्हणतात. ह्याला देवही मानतात. कधी कधी हा मालक दर्शनही देतो. भितीदायक असला तरी जमिनिचा रक्षणकर्ता व देवासमान म्हणून ह्याला कोणी कधी मारत नाही. हा मालक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन जागेत वावरणारा साप असतो.

आमच्या जागेतही आहे एक जागेचा मालक. मधुन मधुन आम्हाला आपले भव्य दर्शन देत असतो. आमच्या घराभोवती फिरताना आमच्या वास्तुचा हा सोबती.

साळुंख्या आणि कावळे कर्कश्य आवाजात गर्जना करु लागले की बाहेर मालकांचे दर्शन होणार ही काळ्या दगडावरची रेघ असते.

जागेचा मालक हा बुजुर्ग आहे. त्यामुळे त्याची जाडी आणि लांबी विलक्षण असते. कधी कधी वेटोळे घालुनही बसलेला दिसतो.

मालक आपले भक्ष पकडण्यासाठी बिळातुन बाहेर पडतात. कधी कधी हा मालक तोंडात बेडूक पकडून ठेवतो. मग त्या बेडकाच्या बचावाच्या सादीवरुनही मालकाला बेडकाचे भक्ष सापडले हे कळते. व आवाजाच्या दिशेने गेल्यावर मालक तोंडात बेडूक घेउन बसलेला सापडतो.

जागेचा मालक असला तरी हा बाहेर मात्र साळुंख्या आणि कावळ्यांमुळे सावधगिरी बाळगुनच बाहेर पडतो. कारण पक्षांनी ढोलीत घातलेली अंडी हे साप जाउन खाउन टाकतात. त्यामुळे साप बाहेर पडताच कावळे व साळुंख्या कर्कश्य आवाजात ओरडतात. नुसते ओरडत नाहीत तर त्या चिमुकल्या साळुंख्या ह्या भयानक मालकाला टोचे घेउन सळो की पळो करुन सोडतात. ह्यात साळुंख्यांची संख्या जास्त असते तर कावळे एक दोनच असतात. साळुंख्या सरळ त्याच्या डोक्यावर टोचे मारतात.

साळुंख्या अशा त्रास द्यायला लागल्या की मग हा मालक कुठेतरी गुपचुप आडोशाला जाउन लपतो.

मग साळुंख्या आणि कावळे त्या जागी हा मालक बाहेर येण्याची वाट पाहत तिथेच कर्कश्य आवाज करत ओरडत राहतात. मग हा मालक बराच वेळ लपुन बसला की मग साळुंख्या आणि कावळे आपआपल्या निवासस्थानी जातात. मग हा मालक बाहेर पडून जागेवर नजर फिरवून आपल्या बिळात जाऊन बसतो.

सापाला कोण घाबरत नाही ? सर्पमित्र सोडून बहुतेक सगळेच घाबरतात. तसा हा मालक आजुबाजुला आहे का हे बाहेर जाताना पहावे लागते. पण तसे घाबरण्याचे काहीच कारण नसते. कारण हा मालक कधी माणसाला खोड काढल्याशिवाय इजा करत नाही. एकदा तर आमची चाहुल लागल्याने हाच मालक चक्क आमच्यासमोर उड्या मारत (अगदी डिस्कव्हरीमध्ये दाखवतात त्याप्रमाणे) उड्या मारत निघुन गेला.

सापाला खरे तर शेतकर्‍यांचा मित्र म्हणतात. खरेच आहे ते. म्हणूनच सापांना मालक आणि देव मानुन त्यांचे रक्षण केले जाते. कारण हेच साप शेतात शेतीची नासधुस करणारे उंदी खाऊन पिकांचे संरक्षण करतात. असे वास्तुचे सोबती ज्यांना आपण भितो पण ते खरच आपल्या वास्तुचे, निसर्गाचे रक्षण करत असतात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागु सापाशी वैरही चांगलं नाही दोस्तीही चांगली नाही , एखाद्या सर्प मित्राला बोलावुन त्याला लांब जंगलात सोडुन द्यायला सांग.
आय हेट साप !

जागु.. सरसरून काटा आला... नुसत्या फोटूनेच दांडी उडली ना!!! Happy
डिसकवरी वर सरपटणारे प्राणी आले तर आम्ही कोचावर पाय घेऊन बसणारी कॅटेगरी Proud

मस्त आहे Happy कस्ले मस्त फोटु ...

मला साप आवडतात पहायला.. जागु तै काळजी घ्या घराबाहेर पडताना.

वाचताना छान वाटले, पण साप आजुबाजुला वावरतोय आणि आपण तिथे राहतोय ही कल्पनादेखील मला सहन होत नाहिये... कशी राहतेस तु कोण जाने... Happy

बाप रे जागू, नुसता फोटो पाहूनच हादरले. तुझ्या घराच्या आसपासच राहतो हा साप? तुला किती वेळा दिसलाय?
आमच्या ऑफिसात पण दिसतात साप अधूनमधून. अगदी मागच्या आठवड्यात मी गेटमधून आत आले आणि सापाचं एक छोटंसं पिल्लू सरपटत निघालं होतं. मी काही सिक्यूरिटीला सांगितलं नाही, कारण आमच्या इथे साप पकडला की लगेच त्याला मारून टाकतात. Sad मग ते पिल्लू सरपटत कुठे गेलं माहीत नाही.

जागू, घराबाहेर कुंपणात वावरताना नेहमीच काळजी घ्या.

माझ्या ऑफिसातपण साप निघतात. एकदा आमचा माळी लिफ्टमधून मॉस स्टिक घेऊन आमच्या फ्लोअरवर आला. आमच्या विंगच्या एन्ट्रन्सजवळ ठेवली. मी पाणी आणायला जात होते तेव्हा मॉस स्टिकच्या बाहेर काहीतरी हलताना दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर सापसाहेब बाहेर पडत होते. एकदम स्लगिश होता त्यामुळे सिक्युरिटी येऊन त्याला पिशवीत घालून नेईपर्यंत आमची पळता भुई थोडी नाही झाली. गेल्या महिन्यात माबोकर मेधा२००२ चा फोन आला होता. तिच्याशी बोलत मी ऑफिसच्या बसमध्ये चढले आणि मागाहून चढणार्‍यांना बसखाली साप दिसला होता. नंतर बस निघाल्यावर ती विचारते, सापाचं काय झालं?

एकदा तर बसमध्ये पहिल्या सीटवर पहुडला होता.

जागु, त्याला राहुदे आजुबाजुलाच. फक्त जाणकाराकडुन हा विषारी आहे का ते विचारुन घे... साप खरेच मित्र आहेत आपले. त्यांच्यामुळे उंदरांचा त्रास कमी होतो. आणि आपण त्रास दिल्याशिवाय ते आपल्या वाटेला जातही नाहीत.

आमच्या ऑफिसात गेल्या वर्षी घोरपडीचे पिल्लु आलेले. लेडीज वॉशरुममध्ये साप आलेला. आपण त्यांच्या घरात जाऊन त्यांची हकालपट्टी केलीय. बिचार ते तरी कुठे जाणार??

बित्तुचे बरोबर आहे बहुतेक. मलाही धामणच वाटतेय. तसेही विषारी साप सहसा घरांच्या आजुबाजुला राहात नाहीत. विषारींच्या तुलनेत बिनविषारी साप खुप असतात आणि बिचारे उगीचच मारले जातात.

दिनेशदा पुन्हा ट्राय करा.

सिंडरेला, श्री, वर्षू नील, मामी, प्रितमोहर, चिमुरी, नादखुळा, अश्विनी, मनिष प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.

एवढे घाबरण्यासारखे काही नसते. हे साप मी अगदी लहानपणापासुन पाहते. साप आपल्याला कारणाशिवाय काहीच करत नाही. उलट आपली चाहुल लागली की ते पळून जातात.

निकिता प्रतिक्रियेबद्दल धन्स.

साधना तुझ्याशी पुर्णपणे सहमत.

बित्तूबंगा पाहते विचारुन जाणकारांना. कदाचित धामणच असेल म्हणून तो सावकाश जात असेल. कारण नाग हे झपाझप जातात.

जागू, लई भारी! Happy

साधना, त्या पहिल्या मजल्यावरच्या लेडिज वॉशरूममधे सापाचं पिल्लू कसं काय आलं (की आणून टाकलं) हे मोठंच कोडं आहे. रच्याकने, त्या घटनेची चौकशी अजून चालू आहे Wink

जागू जागेचा मालक जबरदस्त आहे.......
मला खुप आवडला.......
मी बित्तबंगा यांच्याशी सहमत आहे....प्रथमदर्शनी तर धामण वाटते.....(लांबी वरून)
फोटो थोडे स्पष्ट असते तर सांगता आले असते....(विषारी की बिन विषारी)
पण मला वाटते ---धामण नसेल तर हा निम-विषारी असावा....
त्यापासून तसा धोका नाही......
तुम्ही म्हणताय तसं ते आपणहून कधी कोणाला त्रास देत नाहीत ......
मला जाम आवडतात साप......याला प्रत्यक्षात पहायला उरणला याव लागेल.....
(मी आणि माझा भाऊ दोघे पकडायचो साप......दोघांनाही चावलेत .....भाऊ दवाखान्यात होता चार दिवस ........पण मला काही तशी वेळ आली नाही साप विषारी होता .....पण लहान असल्यामुळे त्याचे दात आत रक्त वाहीनी पर्यंत पोहचले नाहीत......घरी समजल्यावर त्यांनी दम दिला ....परत साप पकडला तर याद राखा .....तेव्हा पासून सोडलं (असं काही नाही ....पण या प्रसंगा नंतर आम्ही मुंबईत स्थायिक झाल्यामुळे साप दिसण्याचे प्रमाण खूपच कमी म्हणजे पाच वर्षात फक्त दोन वेळा पाहीला आहे.)

वाचताना छान वाटले, पण साप आजुबाजुला वावरतोय आणि आपण तिथे राहतोय ही कल्पनादेखील मला सहन होत नाहिये... कशी राहतेस तु कोण जाने........>>>>>अगदी अगदी. मी तर हे फक्त फोटो पाहून गर्भगळित झाले!

जागू, मस्त आलेत फोटो. अग, आपण काही केल नाही तर, ते पण काही करत नाहीत. आम्ही कोकणात असताना बरेच साप आमच्या घराभोवती असायचे. कधी कधी घरातही यायचे. आम्ही काही काम करत असताना पण ते आमच्या समोर इकडे तिकडे फिरायचे. कधी कधी तर आम्ही चालत असताना आमच्या पायासमोरच यायचे. मग आम्ही त्यांचा मान ठेवून, Happy आम्ही थांबत असू, व ते गेल्यावर आमचा नंबर लागायचा. Lol

मंजुडी, चिउ धन्स.

मानस आमच्या बाजुच्या घरात मागच्यावर्षी नाग पकडला होता सर्पमित्राने. ते फोन केला की लगेच येतात पकडायला आणी पिशवित भरुन घेउन जातात.

शोभा१२३ ,
बापरे...मला भयानक वगैरे आदर वाटतो तुमचा. Sad

मला बर्‍याचदा वाटत, मी मरेन बहुतेक साप असे समोरुन वगैरे फिरु लागले तर Wink

शोभा Lol
अग माझ्या माहेरीही आमच्या घरात यायचे साप. कधी कधी तर चक्क सुर्यकांडारी यायच्या. पण त्या यायच्या तशा निघुन जायच्या. शहरी भागात साप क्वचित सापडत असल्यामुळे शहरी व्यक्तिंना भिती वाटते. पण ग्रामिण भागात हे रोजच दिसतात त्यामुळे त्यांचे काही विशेष वाटत नाही.

वनराई, निकिता Happy

भुंगा मलाही आता तसच वाटू लागलय. आता साप मित्राला बोलवुनच खात्री करावी लागेल.

बापरे... असे मालक दुरच बरे वाटतात. तुमच्या घराजवळ असताना देखील भिती न वाटता चक्क फोटो म्हणजे कमालच.
<<डिसकवरी वर सरपटणारे प्राणी आले तर आम्ही कोचावर पाय घेऊन बसणारी कॅटेगरी >> मी पण सेम Happy

Pages