जागूकडचे मत्स्यमयी गटग - रविवार, १७ जुलै २०११, उरण

Submitted by मामी on 18 July, 2011 - 12:30

येणार येणार म्हणताना अखेर तो दिवस उजाडला. मी वर्षभर माबोकरांना भेटण्याचे विशेष मनावर घेतले नव्हते. (तरी ठमादेवी घरी येऊन टपकलीच होती. :फिदी:) आता एक वर्ष झालं, प्रस्थापित मायबोलीकर होण्याच्या प्रोसेस मधला एक ठळक टप्पा गाठला आणि मनाशी ठरवतच होते की आता मायबोलीकरांना भेटलं पाहिजे. तर एक दिवस दिनेशदांची मेल आली. ते भारतात येणार होते आणि जागूकडे काही जण जमणार होते. दिनेशदांचं आमंत्रण, जागूसारख्या सुगरणबाईकडे जेवण आणि माझी वर्षपूर्ती असा सगळा योग एकत्र जुळून आला नि आमचं घोडं एकदाचं मायबोलीच्या गंगेत न्हायला तयार झालं.

दिनेशदा, साधना, तिची मुलगी (मायबोली आयडी झरबेरा), जिप्सी, जागू आणि मी असे मायबोलीकर जमायचे ठरले. अनेक मेल्स इकडून तिकडे पाठवल्या गेल्या आणि बेत ठरला शनिवारचा. एक आठवडा आधी साधनाने गटग एक दिवस पुढे ढकलायची विनंती केली आणि सगळ्यांनीच ती मान्य केली (न करून सांगतोय कोणाला? जागूच्या हातचं जेवण मिळणार होतं ना!). गंमत म्हणजे आमच्या मेलामेलीत जागू फारशी सक्रीय नव्हतीच आणि त्याची खेद ना खंत बाळगता आम्ही जोरदार बेत ठरवत होतो. शेवटी जागूचं मौन मला फारच खटकलं तेव्हा ते मी एक मेलीत लिहिल्यावर जागूबाई जाग्या झाल्या आणि सगळ्यांना फोन करून बेताचा खुंटा हलवून पक्का केला. (न करून सांगतेय कोणाला? आम्ही तिच्या घरी पोहोचल्याशिवाय रहातच नाही हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं ना!). आता हे रविवारचे ठरल्यावर जिप्सीची पिरपिर सुरू झाली - संध्याकाळी शिवाजीपार्कात जायचंय, संध्याकाळी शिवाजीपार्कात जायचंय अशी. त्याबद्दल मी त्याला खडसावल्यावर प्राणी गप्प झाला.

दिवसाभराचा एकूण बेत आखल्यावर याला एवेएठि ऐवजी एदिअठि म्हणायची वेळ आली. म्हणजे एके दिवशी अनेक ठिकाणी. कारण प्रोग्रॅम असा होता. सकाळी (सकाळी) सात वाजता दिनेशदा आणि जिप्सी माझ्याकडे लोअर परळला येणार. आम्ही ब्रेकफास्ट करून साडेआठपर्यंत निघणार आणि नवी मुंबईला साधनाच्या घरी एक छोटा थांबा घेणार. मग तिथून सगळे उरणला - जागूच्या घरी. जागूची बाग बघणे, मासे खाणे आणि भरपूर गप्पा मारणे असे सगळे करून झाल्यावर उरणच्या समुद्रकिनारी जाणार. आणि वेळेत निघून शिवाजीपार्क गाठणार. हुश्श!

तर त्याप्रमाणे बरोब्बर सातला (न दो मिनिट आगे, न दो मिनिट पीछे) दिनेशदा घरी हजर. छानपैकी केशर आणि लेकीकरता भरपूर बिस्कीटे घेऊन आलेले. माझीही तयारी झाली होतीच. दिनेशदांना चहा देऊन मी नाश्त्याला शेवटच्या प्रोसेसिंगकरता करायला ठेवणार तेव्हा लक्षात आलं की इडलीचं पीठ अजून बसूनच आहे. फुगलचं नाही. मी नर्व्हस. नशिबाने पोटॅटो सॅंडविचेसही केली होती ब्रेकफास्टला. मग इडली ऑप्शनला टाकून केवळ सँडविचेस, गोड (केळं घातलेला) शिरा, टेबल भरलेलं दिसावं म्हणून काढलेल्या चकल्या आणि केळ्याचे वेफर्स. शिवाय माझ्या नवर्‍याच्या हातचा चहा. शिरा आणि चहा गोडच होते. त्यामुळे प्रश्न मुख्यत्वे सॅंडविचेसचा होता. पण दिनेशदा आणि जिप्सीनं तेही गोड मानून घेतले (न मानून सांगतायत कोणाला? दुसरा काही उपाय नव्हता ना!)

जिप्सीने माझ्या घरातला एकमेव फोटो काढला तो माझ्या जुईच्या फुलाचा.

ब्रेकफास्ट झाल्यावर पंधरा-वीस मिनिटात आम्ही निघालोही. माझ्याबरोबर, स्वयंप्रेरणेने सतत माझ्या नावाचा पुकारा करणारी एक पिपाणीही होती. माझी मुलगी - लारा. आमच्याकरता रथ घेऊन माझा चक्रधर तयार होताच. बरोब्बर ८ वाजून ४० मिनिटांनी खाशा स्वार्‍या नवी मुंबईकडे कूच करत्या झाल्या. अचानक जाणवलं की या दोघांना मी पहिल्यांदा भेटतेय असं मला अजिबात वाटत नाहीये. त्यांनी मला मायबोलीकरांच्या जिव्हाळ्यामुळे असं होतं आणि असं सगळ्यांचच होतं अशी खात्री दिली. कारमध्ये नेमका माझ्या बहिणीचा अमेरीकेहून उंधियोची रेसिपी विचारायला फोन. आता, (नुकताच माझ्या हातचा ब्रेकफास्ट खाल्ल्यामुळे) मला जेवणाबद्दल सल्ला विचारणारी कितपत सुगरण असेल याची दिनेशदांना कल्पना आली आणि त्यांनी सोप्या आणि रसाळ भाषेत तिला उंदियो कसा करायचा ते सांगितलं. ते होते म्हणून बरं झालं नाहीतर मी काय सांगणार होते तिला. कप्पाळ! (दिनेशदा, उंदियो झक्कास झाला बरं का!)

दिवस मात्र एकदम झकास होता. रात्रीपासून पाऊस होताच पण आता सकाळीही जोरदार नाही पण पुरेसा, हवाहवासा पाऊस पडत होता. सहलीचं छानसं फीलिंग देणारा आणि चित्तवृत्ती उल्हासित करणारा. रविवारची एकदम सकाळ असल्याने ट्रॅफिकही फारसा नव्हता. त्यामुळे तासाभरात साधनाच्या घरी हजर. वाशीला पामबीच रस्त्याला लागल्यावर जिप्सीने फोनवरून साधनाला असंख्य खुणा सांगायला सुरवात केली आणि ती प्रत्येकवेळी अजून पुढे, अजून पुढे करत राहिली. फारसे न चुकता आम्ही तिच्या घरी पोहोचल्याक्षणी दिनेशदा म्हणाले की "हो, हेच साधनाचे घर. मला माहितेय." (अरेच्चा! नुसतं घर लक्षात ठेऊन काय उपेग? घराकडे जाणार्‍या रस्त्याचं काय? :फिदी:)

साधना आणि ऐशूनं आमच्याकरता गरमागरम केक करून ठेवला होता. चहा तयार होईपर्यंत आम्ही साधनाची गच्चीतली बाग न्याहाळली. तिच्या बागेत कुंडितल्या झाडाला दोन छोटीशी कलिंगडंही लागली होती. साधना आणि ऐशूही आवरून तयारच होत्या.

फारसा वेळ न घालवता आम्ही पुन्हा कारमध्ये बसलो अन उरणच्या वाटेला लागलो. दिनेशदा कारमध्ये मागे पाय पसरून बसले (म्हणजे बिचारे अ‍ॅडजस्ट करून कसेबसे बसले असणार). चार बायका मध्ये आणि जिप्सी ड्रायवरवाल्याशेजारी. गप्पा-गोष्टी करत, सृष्टीसौंदर्य बघत आम्ही अर्ध्या तासात उरणच्या बाहेर पोचलो होतो. आमच्या रस्त्याच्या शेजारून एक फ्लायओव्हर लागल्यावर साधनाने "या फ्लायओव्हरवर खूप खड्डे आहेत. आणि फ्लायओव्हरवर खड्डे म्हणजे मोठी मोठी भोकंच." असं डिक्लेअर केलं. त्यावरून बरेच मोठेमोठे कंटेनर्स जात होते. आम्ही कुठे ती भोकं दिसतायत का ते बघत असतानाच साधनाचा गुगली आला - "आता एक वळण घेऊन आपण त्याच फ्लायओव्हरवरून जाणार आहोत." अरे बापरे! पण नशिबानं कनवाळू सरकारनं ते ऑलरेडी बुजवले होते.

उरण दृष्टीच्या टप्प्यात आलं आणि पुन्हा जिप्सीनं जागूला फोन लावून इंस्ट्रक्शन्स घ्यायला सुरवात केली. जागूनं सांगितलं की सरळ या आणि वैष्णवी हॉटेलला लेफ्ट घ्या. झालं, आम्ही वैष्णवी हॉटेल शोधण्यात रमून गेलो. दोन-तीन वळणंही झाली पण वैष्णवी हॉटेल येण्याचे नाव काढेना. दिनेशदा म्हणाले सुध्दा की "माझं घर शोधायला कठीण आहे." असं सांगणारा माणूस त्यांना अजूनपर्यंत भेटलेला नाहीये. पण दिसलं एकदाचं ते वैष्णवी हॉटेल. तिथून हाकेच्या अंतरावर होतं जागूचं घर.

जागू, तिचे मिस्टर आणि तिची छोटीशी, गोड लेक- श्रावणी स्वागताला हजरच होते. शिवाय घरी जागूच्या जाऊबाई, नणंद, पुतण्या (म्हणजे एक मुलगा. अनेक मुली नव्हेत.) आणि डॅनी होतेच. सासूबाई आणि दीर त्याचदिवशी जागूच्या दुसर्‍या नणंदेला बाळ झाल्यामुळे तिच्याकडे गेले होते. पण जे कोणी घरात हजर होते त्यांनी आमची इतकी सरबराई केली ना की बस्स! अगदी डॅनीनही आम्हाला काही चमत्कारीक पोझेस देऊन आमची करमणूक केली. घरातल्यांशी ओळख झाल्यावर आम्ही दोन मिनिटं घरात टेकलो आणि जागू स्वयंपाकघराकडे वळताक्षणी आम्ही उंडारायला बाहेर पडलो. पावसाची विशेष तमा न बाळगता आम्ही जागूच्या आवारात फिरत होतो.

सुरेख टुमदार बंगला, बंगल्याभोवती भरपूर झाडे लावलेली, मागे आंब्याचं मोठ्ठं झाड आणि त्याला पार बांधलेला, आजूबाजूला मोकळी जागा, पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवीगार झाडं, आणि हिरवंहिरवं गवत. आम्ही हरखून गेलो. आम्हाला अगणित अप्रुपाच्या गोष्टी दिसायला लागल्या. एकतर आम्ही जायच्या जरा आधीच जागूच्या मेनगेटाशी एक साप होता. आम्ही जाईतो तो नाहिसा झाला होता. तिच्या अंगणात ठेवलेल्या एका भांड्यात पाण्यामध्ये एक बाळ-खेकडा आनंदाने पोहत होता. घरासमोरच असलेल्या विहीरीत एक मोठा मासा पोहत होता. घराच्या एका बाजूला असलेल्या उंचसखल भागामुळे नाल्यातून येणारे पाणी पडून एक छोटासा धबधबा निर्माण झाला होता. तोच पुढे घराला वळसा घालून आणखी पुढे कुठेतरी जात होता. घराशेजारी कंपाउंडच्या बाहेर वॉटर लिलीजनी भरलेलं एक छोटसं तळं होतं. तिथेच शेजारी भरपूर आळूची पानं उगवलेली दिसत होती. त्या मागच्या गेटपाशी रायआवळ्याचं भरपूर रायआवळ्यांनी भरलेलं झाड होतं. जिप्सीनं लगेच गेटवर चढून बरेचसे आवळे आम्हाला काढून दिले.

जागूच्या घरची बाग. Happy

रायआवळे Happy

ब्रह्मकमळाची कळी

आंब्याच्या झाडावरची ढोली

गुलाबी जास्वंद

नारळ

डबल तगर

पेव

ख्रिसमस ट्री

अनंत

अनेकानेक पक्षीही दिसले आम्हाला. खंड्या ऊर्फ किंगफिशर, सनबर्ड, दयाळ आणि एक छोटासा पिवळसर छटा असलेला. बसल्याजागी बर्डवॉचिंग झालं. जिप्सीनं प्रयत्न केला पण फोटो मात्र चांगले आले नाहीत.

मग आम्ही जागूच्या व्हरांड्यातच मुक्काम टाकला. पाऊस आला की आत नाहीतर झाडं बघत बागेत फिरणे. दिनेशदांना माझ्या मुलीच्या रूपाने एक शिष्या मिळाली. पुढे ती त्यांची भक्तच झाली. कारण दिनेशदांनी बागेतल्या अनेक गंमतीजंमती तिला दाखवल्या. नारळाच्या झाडाच्या झावळीतील एका पानापासून साप आणि त्यालाच अ‍ॅटॅच्ड काठी, जास्वंदीच्या फांदीच्या टोकाशी असलेल्या अगदी छोट्याश्या पानाला तळहातावर चिकटवून होणारा 'झुलणारा पोपट', प्राजक्ताच्या पानाचा सँडपेपर इफेक्ट, ख्रिसमस ट्रीची लांबलांब पानं (लेक ती पानं केसात अडकवून फिरत होती), कागदाच्या तीन पट्ट्यांपासून बनवलेलं भिरभिरं असं कायकाय. पण या सगळ्यावर कडी केली ती अळूच्या देठासकटच्या पानापासून बनवलेला नेकलेस. काय देखणा नेकलेस बनवलाय दिनेशदांनी! असाच नेकलेस कमळापासूनही बनतो म्हटल्यावर लेक माझं डोकं खायला लागलेय - लोटस आण म्हणून. Happy

मधून मधून ऐशू जी साधनाची मापं काढत होती ते ऐकून आमची धमाल करमणूक होत होती. पण त्याचवेळी त्या मायलेकींत किती सुंदर नातं आहे तेही सहज लक्षात येत होतं. दोघी मैत्रिणीच आहेत असं वाटतं.

आता, चार-पाच मायबोलीकर एकत्र आल्यावर मायबोलीबद्दल बोलणारच ना! मग आम्हाला बरेच किस्से ऐकायला मिळाले. ते शिक्रेट आहेत. Proud

आता वाचक ज्या भागाची प्रामुख्याने वाट बघत आहेत त्या भागाकडे म्हणजे स्वयंपाकघराकडे आणि त्यात शिजवल्या गेलेल्या पदार्थांकडे वळूयात. आम्ही जाणार म्हटल्यावर जागूच्या अंगात बहुधा अष्टभूजा संचारली होती किंवा तिने आम्ही रावणासारखे प्रत्येकी दहा तोंडी आहोत असा पन्नासेक तोंडांचा हिशोब केला असणार (ऐशू आणि लाराची प्रत्येकी पाच-पाच तोंडं धरली आहेत.). तिने काय रांधले होते यापेक्षा कायकाय रांधले होते असं म्हणावं लागेल. धन्य आहे जागूची!

साधना, मी, ऐशू आणि काही प्रमाणात लारा हे मांसाहारी आणि दिनेशदा, जिप्सी हे शाकाहारी. त्यातही जिप्सी सेल्फ प्रोक्लेम्ड 'ग्रेव्हीटेरीयन'. म्हणजे माशाची नुसती ग्रेव्ही खाणारा. (ही नविन कॅटेगरी जिप्सीच्या कृपेनं कळली.) त्यामुळे दोन्ही प्रकारच्या जेवणाची नुसती लयलूट होती. माशांचे प्रकार - बोंबिल, हलवा आणि वागटी तळलेली (अहाहा लिहितानाही तोंपासु), हलव्याचं कालवण, खरबीचं कालवण, कोळंबीचं लिपतं. आणि शाकाहारी लोकांकरता आळूचं फदफदं, वालाचं बिरडं, अळुवडी, काजूगरांची भाजी (ही दिनेशदांनी जागूकडे गेल्यावर बनवली), तांदळाच्या मऊसूत आणि भल्यामोठ्या भाकर्‍या, भात आणि सोलाची कढी (ही जागूच्या नणंदेन केली होती आणि त्यावरून मी जीव ओवाळून टाकायला तयार आहे. इतकी चविष्ट होती ना!). सुंदररित्या सजवलेलं सॅलड. वा! एकदम भरगच्च मेन्यु! जागूनं सगळं आणून मांडल्यावर दुष्ट जिप्सीनं फोटो काढण्यात वेळ घालवून आम्हाला जेवायला पाच मिनिटं उशीर केला! Proud

मत्स्याहारी फोटो Happy

शाकाहारी फोटो Happy
मिश्राहारी फोटो Proud

जेवताना अर्थातच फारसं कोणी बोललं नाही. फक्त हे जरा इकडे द्या, हे अजून द्या इतपतच. Happy जागूने आग्रह केलाच पण अर्थात त्याची फारशी गरजही लागली नाही. एकच सांगते जागूच्या हाताला 'गजबकी' चव आहे. माश्याच्या प्रत्येक प्रकाराला युनिक चव. तळलेले बोंबिल केवळ स्वर्गीय होते. (खी: खी: खी: या स्वर्गीयचा एक अफलातून किस्साही दिनेशदांनी सांगितला. असो.) जागू ही अन्नपूर्णाच आहे याची मला खात्री आहे. (कित्ती कित्ती स्तुती केली तुझी. मला पुन्हा बोलवशील ना ग?)

जेवणं झाल्यावर जागूने ताटं भरभरून आणलेली फळं आणि सुपारी (ही ताटं भरभरून नव्हती. छोट्या बाटलीतच होती) खाताखाता पुन्हा गप्पा रंगल्या. पण तोवर चार वाजले होते. मग लगबगीनं समुद्रावर जायला निघालो. समुद्रावरून थेट मुंबईचा रस्ता पकडायचा असल्याने झाडं, भाज्या, रोपं यांची घेवाण झाली. आम्ही सगळे एका कारमध्ये आणि जागूचे कुटुंब त्यांच्या गाडीवरून असे उरणच्या समुद्रावर गेलो. अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. तिथे समुद्रकिनारी ओएनजीसीची हेलीकॉप्टर्स उतरवण्याकरता हेलीपॅड आहे. आम्ही तिथे उतरून समुद्रदर्शन केलं. पाऊस थांबला होता तरी व्हिजीबिलिटी खूपच खराब होती. त्यामुळे गेटवे वगैरे दिसले नाही. पण लाटांवर प्रचंड वरखाली होत पुढे जाणारी नाव दिसली. साधनाला तर खात्रीच होती की ती आता बुडणार. पण बघता बघता ती नाव मस्तपैकी दूरवर गेली.

आम्ही पाच वाजता उरणहून निघालो. जागूने उरणच्या चौकापर्यंत आमची सोबत केली आणि तिथून ती घरी गेली. आम्ही नव्या मुंबईच्या वाटेला लागलो कारण साधनाला तिच्या घरी सोडायचे होते. वाटेत अंताक्षरी सुरू केली. त्यात जिप्सीनं एकसे एक रोमँटिक गाणी म्हणून आम्हाला शंका यायला वाव दिला. Proud

तिच्या घराजवळ गेल्यावर जिप्सीने टूम काढली की आईस्क्रीम खाऊया. नाही अर्थातच म्हणण्याचा प्रश्न नव्हता शिवाय आईस्क्रीम जिप्सी स्पॉन्सर करणार होता. साधना आणि मुख्य म्हणजे ऐशूच्या सांगण्याप्रमाणे गाडी नेत आम्ही एका दुकानापाशी गेलो तर ते कायमचं बंद झालेलं दिसलं. गाडीत एक नैराश्याची लाट आणि त्याबरोबर येणारा सुन्नपणा दाटून आला. त्यावर साधनाने घोषणा केली की आणखी एक आहे म्हणताना मंडळी पुन्हा उत्साहित होती झाली. मग साधनाने दुसर्‍या एका आईस्क्रीमच्या दुकानापर्यंत आम्हाला नेलेच. मंडळींनी थंड वातावरणातलं थंडगार आईस्क्रीम खाऊन जिप्स्याला धन्यवाद दिले. इथे साधना आणि ऐशूनं आमचा निरोप घेतला. त्यांना बायबाय करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.

दिवस खरंच भाग्याचा. कारण रविवारची संध्याकाळ असूनही कुठेही ट्रॅफिक ज्याम नव्हता. थोडाफार चेंबुरात वेळ लागला असेल तोच काय तो. शिवाजीपार्कात केवळ दोघा-तिघांनाच मी येणारे याची कुणकुण होती. त्यामुळे दिनेशदा आणि जिप्सीबरोबर ही कोण? असा प्रश्न मी सगळ्यांच्या तोंडावर वाचला. पण आम्ही आधीच ठरवल्याप्रमाणे कोणी माझी ओळख करून दिली नाही. Happy योरॉक्स मला "मामी ना? मामी ना?" असं विचारत होता त्याला डोळ्यांनीच गप्प केला. तशी मंडळी वाटपात गर्क होती. मग जिप्सीनं मला सगळ्यांची आयडी सांगून ओळख करून दिली. त्यामुळे मी कोणीतरी मायबोलीकर आहे इतपत सगळ्यांना कळलं असणार. लेक मागून मला खेचत होती. ती बिचारी लवकर उठायला लागल्यामुळे, दिवसभरच्या दगदगीने दमली आणि कंटाळली होती. मग मी झटपट माझी आयडेंटिटी सांगितली. नीधपच्या पाठीत धपका घातला आणि दोन मिनिटात निघालेच. मला वाटतं अर्ध्या जणांना मी आल्याचे मी गेल्यावर कळले असणार. बरं आशुतोष मागे कुठेतरी गप्पा मारत बसला होता. त्यामुळे त्याची ओळखच झाली नाही. तर त्याने माझा नंबर कोठूनतरी (मला कळलंय की साधनाकडून) मिळवून दुसर्‍या दिवशी मला भरपूर झापलं. Proud असा हा मायबोलीकरांचा जिव्हाळा.

तर हे माझं पहिलं गटग (तळलेल्या बोंबलांच्या उपस्थितीमुळे याला गटगटं म्हणावं का?). कुठेही परकेपणा जाणवलाच नाही. जे भेटले ते सगळेच खूप भावले. दिनेशदांबद्दल आदर होताच तो दुणावलाय. जिप्सी एक सभ्य आणि सज्जन मुलगा आहे असं मला वाटायचं. हा माझा समज कायम ठेवण्यात तो यशस्वी झालाय. साधना आणि जागूतर जवळच्या मैत्रिणी असल्यागत वाटतय. खूप एंजॉय केलं. आता पुढच्या गटगची वाट बघतेय. Happy

(संपलं एकदाचं मामीचं पाल्हाळ!)

त.टी. हे सगळे सुंदर सुंदर फोटो ही जिप्सीची देणगी. (खूपच छान आलेत फोटो जिप्सी)

गुलमोहर: 

श्याआअ ! मला साधना आणि जागूचे फोन आले होते उरणला चलण्यासाठी. पण संध्याकाळी अजून एक छानसा प्रोग्रॅम होता (तिथे माबोकर भेटलेच) व तो टाळण्यासारखा नसल्याने मला उरण ट्रिपला नाही म्हणावं लागलं.

पण मी लवकरच येणार आहे जागू Happy

मामी, मस्त खुसखुशीत वृ लिहिलायस Happy

श्याआअ ! मला साधना आणि जागूचे फोन आले होते उरणला चलण्यासाठी. पण संध्याकाळी अजून एक छानसा प्रोग्रॅम होता (तिथे माबोकर भेटलेच) व तो टाळण्यासारखा नसल्याने मला उरण ट्रिपला नाही म्हणावं लागलं.

पण मी लवकरच येणार आहे जागू Happy

मामी, मस्त खुसखुशीत वृ लिहिलायस Happy

जागु,
कधी येउ वगैरे पण नाही विचारणार मी. तिथे आले कधी की तुझ्या घरी धडकणार.
मला तुझ घर बघायचंच आहे. Happy

आहाहा... परत एकदा तो दिवस वर्चुअली अनुभवला.. Happy मस्त लिहिलंयस गं..

जिप्स्या तु थोडे लिहिणार होतास ना?

बाकी जेवणाबद्दल काय लिहिणार?? फोटो पाहुनच लोकांना कळले काय ते.. जागु जेवण एकदम यम्मी होते. दिनेशदांनी त्यांच्या सिक्रेट मसाल्याच्या गोळ्यांनी बनवलेली काजुची उसळही एकदम बेस्ट.. फोडणी दिलेली सोलकढी पैल्यांदाच प्यायले. जागु नणंदेला विचारुन रेसिपी टाक गं...

(बाकी दिनेश इथे सगळ्या रेसिपीज टाकतात पण गोळ्यांची रेसिपी काय म्हटल्यावर असे दोनदा विचारुनही त्यांनी मला धुडकावुन लावले Happy प्रख्यात शेफ त्यांचे सिक्रेट मसाले कधीच सांगत नाहीत असे कुठेतरी वाचलेले. त्याचा प्रत्यय आला. Happy आता ते गोळे त्यांनी मलाही दिलेत पण माझी सैपाकघरातली एकंदर हुशारी लक्षात घेता त्या गोळ्यांवरुन त्यात काय काय घातलेय ते समजण्याइतपत बुद्धी मला कुठुन असणार???)

मामे Happy काय गोड..,सुंदर..,छान...,अप्रतिम...,भन्नाट.., म्हणजे एकदम तोंपासु टाईप लिहलंयस...!

झक्कास वाटलं वाचतांना.....तु समोर बसली आहेस.... आणि मी आपल्या हाताच्या तळव्यावर हनुवटी ठेवुन.... डोळे मोठ्ठे करुन.... हलके स्मित आणुन....ऐकत आहे... Happy

शाकाहारी मांसाहारी गटगं चविष्ट झाला...सारंजाम पाहुन कळते.

ते बोंबिल खर्पुस दिसतायत..... tongue0022.gif

दिनेशदा, साधना, तिची मुलगी (मायबोली आयडी झरबेरा), जिप्सी,>>> भाग्यवंत...__^__!

तो टाळण्यासारखा नसल्याने मला उरण ट्रिपला नाही म्हणावं लागलं. >>> तरीही इच्छुकांना काही लोकांनी हेतुपरस्पर टाळलेच... म्हणून मी या वृत्तांतातील प्रचिं वर मी बहिष्कार टाकला आहे. Angry

मामी, मस्तच वृत्तांत Happy

माझ्याकडुन काही ठळक घडामोडी Happy

बर्‍याच मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटलो पण कुणा मायबोलीकरांच्या घरी जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण तीनही घरात (मामी, साधना, जागू) कुठेही परकेपणा जाणवला नाही, किंबहुना पहिल्यांदाच इथे आलो असेही भासले नाही.

करीरोड स्टेशनला (रविवारी भल्या पहाटे ७ वाजता :-)) उतरताच मामीचा फोन "जिप्स्या, उठलास ना?" (हायला, इकडे मी घराच्या जवळ येऊन पोहचलो तरी मामीला अजुन "मी सकाळी लवकर उठेल का?" हिच शंका Proud ).

मस्त पावसाळी वातावरण, धम्माल गप्पागोष्टी, "आ. अ.", "स्व.मि.ठा" (कृपया लॉंगफॉर्म विचारू नये, :फिदी:), साधनाने सांगितलेलं फ्लायओव्हरची धम्माल, यावरून झालेला हास्यस्फोट, जागुच्या घरच्यांचे प्रेमळ स्वागत, निसर्गाच्या गप्पा, गेटवरु चढुन काढलेले रायआवळे आणि आवळे काढुन दिले म्हणुन माझ्याच हातावर श्रमपरीहारासाठी टेकवलेले दोन्-तीनच आवळे :(, जागू आणि फॅमिलीच्या हातचे रूचकर जेवण, त्यातल्या त्यात खास माझ्यासाठी बनवलेली अळुवडी (धन्स, जागू :-)) दिनेशदांनी बनवलेली ओल्या काजुंची यम्मी उसळ, माझ्याकडुन एकदाही फोटो न काढुन घेणार्‍या लारा आणि श्रावणी, उरणच्या समुद्रावरची भटकंती, परतीच्या प्रवासात रंगलेली अंताक्षरी (मी गाणी म्हणायला लागलो कि का कोण जाणे गाडीत बसलेल्या सगळ्यांना एकत्रच "खोकला" यायचा :अओ:), गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून झालेली माबोकरांची आठवण :फिदी:, संध्याकाळी चहाच्या ऐवजी आईस्क्रीमचा कार्यक्रम (जागू, तुझ्या वाटणीची आईस्क्रीम उधार राहिली आहे माझ्यावर :-)) , "आईस्क्रीम पार्लर ५ वाजता चालु असेल का?" या साधनाच्या प्रश्नावर ऐशुने टाकलेला बाऊन्सर :-), शिवाजी पार्कात भेटलेले मायबोलीकर. या सगळ्या गोष्टींमुळे माझा अजुन एक विकएण्ड सत्कारणी लागला.

या सगळ्या गडबडीत सकाळी इंद्राला फोन करायचा राहुन गेला आणि ........... सॉरी इंद्रा Sad

जे माबोकर उत्सुक असावेत पण 'इतर' कारणांमुळॅ येऊ शकणार नाही असे आम्हाला वाटले त्यांची आठवण काढली गेली नी त्यांच्यासाठी घास काढुन ठेवण्याचा कार्यक्रमही केला गेला याची संबंधितांनी नोंद घ्यावी व आपला बहिष्कार मागे घ्यावा........ (जिस्प्या घासाचा फोटो असेल तर टाक..)

साधना ..... Proud
हो, जिप्स्या टाक रे घासाचा फोटो. :आत जिप्सी कोणता फोटो टाकणार याची उत्सुकतेनं वाट बघणारी बाहुली:
आणि जिप्स्या तू डॅनीचा फोटू नाही का घेतलास?

आता वाचक ज्या भागाची प्रामुख्याने वाट बघत आहेत त्या भागाकडे म्हणजे स्वयंपाकघराकडे आणि त्यात शिजवल्या गेलेल्या पदार्थांकडे वळूयात. Biggrin

मस्त मज्जा मज्जा केलीत कि.. आवडलं तुमचं गटग !!!

मामी

आणखीही काही कॅटेगरीज आहेत

एगिटेरिअन - व्हेज लेकिन अंडा खानेवाला
मौकाटेरिअन - इधर देखा, उधर देखा और लाईन मे घुस गया छाप

(जिस्प्या घासाचा फोटो असेल तर टाक..) >>> नकोऽऽ फोटो पुर्रेऽऽ
बोंबिल, हलवा, वागटी, हलवा, खरबी, कोळंबी, आळूचं फदफदं, वालाचं बिरडं, अळुवडी, काजूगरांची भाजी न खाताच वृत्तांत वाचून पोट भरलं Happy

सोलाची कढी >>> आता कढीची तहान कश्यावर भागवायची बरे?

चातकाचा काय प्रतिसाद येतोय त्याची वाट बघत होतो.
या भारतभेटीत तर माझे सात गटग झाले. तोपण एक विक्रमच असेल. श्रेयस हॉटेलमधे (सई,गिर्‍या, मिहीर्,दक्षा,सचिन, प्रसाद आणि अर्थात जी एस आणि आरती.) संभाजी पार्कात (दक्षिणा, आगाऊ, ऋयाम, विवेक, शोभा, प्रज्ञा, आर्या, मगर, आशूतोष, शांकली, शशांक, विवेक--- कुणी राहिले का ? ) , आकुर्डीला, (चंपक, चंपी ), कुर्ला (मी_अमि ) काळा चौकी, (ठमादेवी) उरण, (वर उल्लेख आहेच) शिवाजी पार्क.... सगळ्यांबद्दल लिहायला हवे. शिवाजी पार्कात अनपेक्षितपणे बरेच लोक भेटले. अगदी आदल्या दिवशी, बागुलबुवाने फोन करुन सांगितले, आम्हाला उशीरच होणार होता, पण त्यानंतरही लोक येत होते. (इंद्रा आला होता का नंतर ? दुसर्‍या दिवशी दादरमधली दुकाने बंद असती, म्हणून मला लवकर निघावे लागले.) डॉक्टर पण उरणला नाही भेटले.
याशिवाय मी दुबईला भटकलो, थेटरात दोन चित्रपट बघितले, पुण्याला तीनदा जाऊन आलो आणि मुंबईतल्या आवडत्या ठिकाणांनाही (मॅजेस्टीक, र्‍हिदम हाऊस, दादर...) भेटी दिल्या. हे सगळे आठवडाभरातच !!

Pages