म्युझिक असिस्टंट - एक अप्रसिद्ध, दुर्लक्षित कलाकार

Submitted by prashant_the_one on 13 July, 2011 - 14:28

रेडिओवर किंवा घरी सीडी वरती आपल्या आवडीचे गाणे लागते. नकळत आपण गुणगुणू लागतो.. गाण्याबरोबर मन आणि मान दोन्ही डोलायला लागते... बरोबर कुणी गानवेडा किंवा गान वेडी असेल तर त्याच्या बरोबर नकळत गाण्याची तारीफ, चर्चा , गायक, कवी , संगीतकार या पैकी एक किंवा सगळ्यांचे योग्य ते कौतुक होत असते. कधी कधी शब्द अगदी सर्वसाधारण असूनही संगीतकाराने काय कमाल केली आहे वगैरे चर्चा सुरु होते. मग कुठे, काय, आणि कसे वापरले आहे, सतार काय सॉलिड आहे किंवा काय गिटार चा पीस टाकला आहे, अमुक अमुक म्हणजे अफलातून संगीतकार आहे किंवा आहेत अशी जोरदार चर्चा पण होते..... पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की हे सगळे गाण्यात वाजवलेले तुकडे एक माणूस किंवा जोडी असेली तर दोघेच जण कसे करू शकतात? तर याचे साधे उत्तर असे आहे हे की अजिबात शक्य नाही.
इथे म्युझिक असिस्टंट नामक अप्रसिद्ध आणि रसिकांनी दुर्लक्षित केलेली लोकं कामी येतात. तर हे लोकं तरी नक्की काय करतात? आणि जर ते काही करत असतील तर शेवटी गाण्याचे सगळे श्रेय संगीतकराला का जाते? या साठी आपल्याला गाणे अथ पासून इति पर्यंत कसे बनते ते पहावे लागेल. असे आहे की गायक, वादक किंवा संगीतकार यांना रसिक प्रत्यक्ष कला दाखवत असताना बघत असतात त्यामुळे ते नक्की काय करत हे लगेच जाणवते आणि त्याचे कौतुक पण त्यामुळे होते, परंतु या लोकांचे पडद्यामागचे कार्य, मेहनत आणि कलागुण कधीच लोकांपुढे येत नाहीत म्हणून हा प्रपंच. तर आता पाहूया हे लोकं काय भूमिका वठवतात -

सिनेमात परंपरेप्रमाणे ५-७ गाणी टाकायचे ठरते. जर दिग्दर्शकाला अक्कल असेल तर गाण्याला काहीतरी पार्श्वभूमी असते. आता गाण्याला पार्श्वभूमीच नसेल तर ... जाऊदेत !! तर, गाण्याविषयी संगीतकाराशी चर्चा होते. बहुतेकवेळा संगीतकाराकडे आधीच त्याच्याशी संबंधित अश्या (म्हणजे दुखी, आनंदी, लग्नाच्या, नाचाच्या वगैरे) अनेक कच्च्या स्वरूपाच्या चाली तयार असतात. फावल्या वेळात संगीतकार जसा मूड बनेल तश्या चाली बनवून ठेवत असतात. आता ते त्या कश्या बनवतात हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याविषयी नंतर सविस्तर लिहीन. माझ्याकडे सुद्धा स्वत:च्या १०-१५ नुसत्या चाली बनवलेल्या आहेत आणि स्वानुभवावरून सांगू शकतो की ते शक्य आहे. तर, काही अश्या काही चाली ऐकून झाल्या की एखादी त्यातली पक्की केली जाते आणि मग त्यावर खरे काम सुरु होते. गीतकाराला बोलावून मग त्यावर शब्द लिहिले जातात. त्या धून मध्ये शब्द जसे च्या तसे बसत नसतील तर थोडीफार धून बदलली जाते आणि शेवटी चाल असेलेले गाणे तयार होते. जर तयार असलेली चाल नाही आवडली किंवा शब्द आधी तयार असतील तर त्यावर स्वतंत्र चाल लावली जाते. सहसा पहिला प्रकार जास्त होतो. फार पूर्वी असे नसायचे शब्द आधी आणि मगच चाल लावली जायची. असो.
तर चाल, शब्द सगळे जरी एकत्र आले, तरी सुद्धा हे सगळे कच्च्या स्वरूपातच असते. कोण गाणार, सुरुवातीस, मध्ये व शेवटी काय आणि कसे वाजले जाईल, कोणकोणती वाद्ये वापरायची याचा अजूनही काहीच पत्ता नसतो. या वेळेपासून ते गाणे पूर्ण बने पर्यंत सर्व कामे ही मुख्यत: हे असिस्टंट लोकं करत असतात. यात सुद्धा मुख्य असिस्टंट, ताल असिस्टंट, मेलडी असिस्टंट अशी लोकं सुद्धा असू शकतात. मुख्य असिस्टंट लोकं काय स्वरूपाचे संगीत हे संगीतकाराला अपेक्षित आहे हे संगीतकाराशी सतत चर्चा करून ठरवत किंवा बदलत असतात. उदाहरणासाठी , असा एक संपूर्णपणे काल्पनिक संवाद कसा असेल? तर समजा की गाणे आहे अमोल पालेकरच्या गोलमाल मधले - आनेवाला पल जानेवाला है ...
आरडी - अरे भाई ये गाने की धून है और बात ऐसी है की वो हिरो जो है वो हिरोईन के घर जाता है और वोह उसको ये गाना गाने बोलती है
असिस्टंट - तो पंचमदा किस किसम की धून है ये, मजेवाली या रोना धोना?
आरडी - आरे नही यार, बहुत मजेकी है. ऐसा करो शुरुवात मे थोडा सपने जैसा फील होनेवाला गिटार, सिंथ वगैर लेके करना और बाद मे फास्ट स्पीड मे ड्रम, कोंगो साथ मे करना. गाने के दुसरे अंतरे मे, वो जो हिरोईन है उसे सपने जैसा लगता है तो वहा, ड्रीम जैसा, स्लो स्पीड वाला पीस चाहिये. और उसके बाद फास्ट ... ठीक है? मुझे बताते रहना कैसे हो रहा है..
असिस्टंट - ठीक है ..
आरडी - और सुनो , किशोर-दा को फोन करके बोल दो गाने के लिये डेट रख्खे.. वो गानेवाले है ये गाना..
अश्या काहीश्या रीतीने संगीतकार आणि असिस्टंट लोकं गाण्याच्या आजूबाजूचे सर्व संगीत बनवतात. खर तर संगीतकार स्वत: यात काहीच करत नाही पण या सगळ्याची देखरेख, असिस्टंट लोकांनी बनवलेले संगीत योग्य आहे की नाही ये फक्त बघतो आणि नसेल तर त्याला जसे आवश्यक वाटेल तश्या दुरुस्त्या करून घेतो. संगीतकारला संगीत संयोजन कसे चांगले/वाईट कळत असेल तर फारच उत्तम कारण मग तो ते एकदम चपखल, पाहिजे तसे बनवून घेऊ शकतो अन्यथा असिस्टंट जे बनवेल त्यावर विश्वास ठेवून ते तसेच ठेवावे लागते. माझ्या माहितीत फक्त एकाच संगीतकार असा होता की जो मधल्या म्युझिकचे पीसेस पण स्वत: बनवायचा. तो म्हणजे संगीतकार रवी (बहुतेक याचे कारण तो स्वत: पण एकेकाळी असिस्टंट होता)
संगीतकाराची संयोजनावर पकड असो व नसो एक गोष्ट कायम लक्षात घ्या की गाण्याच्या चाली भोवतीचे जवळ जवळ सर्व संगीत हे या असिस्टंट लोकांनीच (अर्थातच संगीतकाराच्या मान्यतेने) बनवलेले असते. जेव्हा केव्हा सुंदर तुकडा ऐकायला मिळेल तेव्हा त्या संगीतकाराच्या असिस्टंट लोकांनापण दाद द्यायला विसरू नका. त्यांनी घेतलेल्या अफाट मेहनतीमुळेच संगीतकाराचे हे गाणे तुम्हाला इतके श्रवणीय आणि सुंदर वाटत असते. फार पूर्वीपासून मला सिनेमाची टायटल बारकाईने बघण्याचा छंद आहे. त्यात मी आवर्जून काय बघत असे ते म्हणजे असिस्टंट कोण आहेत. जेव्हा नुसत्या गाण्याच्या तुकड्यावरून, वापरलेल्या वाद्यांवरून संगीतकार ओळखू यायचे त्या जमान्यातल्या या गोष्टी आहेत. शंकर-जयकिशन असेल तर Sabastian असलाच पाहिजे. लक्ष्मीकांत प्यारेलाल असेल तर शशिकांत, गोरख ही नावे हमखास सापडणार. फार कशाला, खुद्द लक्ष्मि-प्यारे हे कल्याणजी-आनंदजी कडे असिस्टंट असायचे !! सध्या असिस्टंट ऐवजी प्रोग्रामर म्हणतात कारण बहुतेक सगळे काम कम्प्युटर वरती काम करत असल्यामुळे संगीत अक्षरश: प्रोग्राम करावे लागते - एक एक नोट भरून!! तरीसुद्धा नवीन पिढीमध्ये कितीतरी चतुरपणे प्रोग्राम करणारी मंडळी आली आहेत त्यामुळे आजचे संगीत एवढे विविध स्वरूपाचे झाले आहे. दुर्दैवानी मला त्यांची फारशी नावे माहिती नाहीत आणि त्यांनाही फारसे नाव पण मिळत नाही (म्हणजे परंपरा चालू आहे) असो.

काही मला ठाऊक असलेली जुन्या काळातली असिस्टंट लोकांची नावे संगीतकारांसामेवत. तसेच त्यांच्या बद्दल काही माहिती -
शंकर जयकिशन - Sabastian , लक्ष्मी-प्यारे
पंचम - बासू मनोहारी, मारुतीराव कीर (ताल)
कल्याणजी आनंदजी - लक्ष्मी प्यारे, बाबला, विजू शाह (कल्याणजींचा मुलगा - गुप्त,त्रिदेव चा संगीतकार)
मदन मोहन/उषा खन्ना - घनश्याम, सुरी, सोनिक-ओमी (ही मामा-भाचा किंवा काका-पुतण्या जोडी. सोनिक आंधळा होता. हे स्वत: पण उत्तम संगीत द्यायचे पण यांना कायम बी/सी ग्रेड सिनेमा मिळाले - दिले फिर याद किया, धर्मा हे गाजेलेले काही), स्वत: मदन मोहन हे सी.रामचंद्रकडे असिस्ट करत होते सुरुवातीला.
लक्ष्मी-प्यारे - गोरख, शशिकांत, नरेश शर्मा (प्यारेलाल चा भाऊ) तसेच राजेश रोशननी पण ५ वर्षे त्यांच्याकडे उमेदवार म्हणून काम केले.
रोशन - इला रोशन (त्यांची बायको)
एस.डी - जयदेव, आर.डी, बासू-मनोहारी, मारुतीराव कीर. जयदेव एस.डी. कडे असल्यामुळे त्यांचे स्वत:चे संगीत अनेकवेळा स्वाभाविकपणे एस.डी/आर.डी सारखे ऐकू येते - बाप माणूस !! जयदेव ला संगीतकारांचा संगीतकार म्हणतात म्हणजे बघा!! प्रतिभा आणि यश यांचा संबंध असतोच असे नाही हे असे सिद्ध होते. याचे उलट उदाहरण म्हणजे कोल्हयासारखा कुई कुई करत स्वत: गाणारा आणि स्वत:ला प्रती-पंचम समजणारा आजकालचा ..नव्हे कालचा एक तथाकथित संगीतकार - हिमेस रेसमिया (मुद्दाम "स" वापरला आहे) !! आता काय करतो कुणास ठाऊक.... आणि ठाऊक तरी का करून घ्यावे म्हणा?
नौशाद - गुलाम मोहम्मद (यांनी पुढे पाकीझा केला)
ओ.पी. नय्यर - जी.एस. कोहली - यांनी काही चित्रपट केले. एक गाणे खूप गाजले - ओ तुमको पिया दिल दिया - जे अगदी ओपी सारखे वाटते
हेमंतकुमार - रवी (पुढे स्वत: संगीतकार झाले. खूप छान गाणी केलीत.)
बप्पी लाहिरी - अनिल-अरुण (मराठीतली संगीत जोडी) - हे एस.डी. कडे पण होते काही काळ - उदा.शर्मिली
सुधीर फडके - प्रभाकर जोग, शामराव कांबळे, अप्पा वढावकर - अप्पानी श्रीधर फडकेंची अनेक गाणी केली.

ही यादी अपूर्ण आहे याची मला संपूर्ण खात्री आहे पण उद्देश या उल्लेखित/अनुल्लेखित सर्वांच्या कामाचे थोडे कौतुक जाहीरपणे करावे एवढा आहे. यात अनवधानाने काही चुका झाल्या असतील. नाही असे नाही, पण आपण समजून घ्याल याची पण खात्री आहे.

गुलमोहर: 

लेख आवडला.. खूपच कुतुहल होतं या लोकांबद्द्ल. पण फारशी माहिती कधी मिळाली नाही.

सध्या तरी झी मराठीच्या 'सा रे ग म प' मुळे सर्वांना निलेश परब (सर्व प्रकारची तालवाद्ये) आणि अमर ओक (बासरी) माहित झालेत. आणि दोघेही माझे फेवरेट असल्यामुळे त्यांचा उल्लेख करावासा वाटला.

निलेश-तबला, बाँगो, काँगो, संबळ, ढोलकी काहीही द्या...अशक्य वाजवतो.
अमर-बासुरी वाजवणे खूपच सोपं असावं असं त्याच्या देहबोलीतून जाणवतं... पण तोही अशक्य वाजवतो.

Happy

छान लेख आहे.

अनिल अरूण, सुरेशचंद्र नाडकर्णी, लुई बँक्स हे पण असिस्टंटच होते ना ? कि म्युझिक अ‍ॅरेंजर वेगळा असतो ??

>>कि म्युझिक अ‍ॅरेंजर वेगळा असतो ??

म्युझिक अ‍ॅरेंजर वेगळा. बरेच वेळा अशाच सहाय्यक कलाकारातून म्युझिक अ‍ॅरेंजर पुढे येतात.
सर्व कलावंतांची मोट बांधून संगीतकाराच्या मनातील कल्पना, रचना, संगीत, ई. सर्वाला प्रत्यक्षात ऊतरवण्याचे मुख्य काम पहाणारा म्हणजे म्युझिक अ‍ॅरेंजर, आणि अर्थात तो स्वतः संगीतातला तज्ञ असणे आवश्यक असते. म्युझिक अ‍ॅरेंजर चा प्रवास थोडक्यात engineer-sr engineer-manager-executive- director... असा असतो.
संगीतकारला एखाद्या ceo प्रमाणे काही व्हिजन असते, संकल्पना असतात, ऊद्दिष्टे असतात वगैरे वगैरे.. त्याचं एखाद्या संपूर्ण गीतात रूपांतर करायचे "तंत्र्-कौशल्य" त्याच्याकडे असेलच असे नाही.. पण तसे कौशल्य असलेले संगीतकारच अधिक यशस्वी ठरतात हेही खरे. अगदी सलिल चौधरी पासून, पंचम, कल्याणजी, प्यारेलाल, बप्पी, अलिकडील, अन्नू मलिक, जतिन ललित, ईस्माईल दरबार ई. अनेक संगीत दिग्दर्शक हे प्रथम कुणाचे तरी सहाय्यक म्हणूनच काम करत असत.
असो.

माहीतीपुर्ण लेख. Happy

'रॉक ऑन' चित्रपटातील गाणी आधी लिहली गेली नंतर त्याला संगीत (शंकर-एहसान-लॉय) दिले गेले, असं कुठंतरी ऐकलं होतं.

लेख आवडला. मध्यंतरी ते मनोहारी इंडियन आयडॉलमध्ये आले होते. खूपच वयोवृद्ध. आशाताईंनी त्यांची ओळख आरडी बरोबर कायम साथीला असायचे अशी करुन दिली तेव्हा कळलं. त्या शो मध्ये आल्यावर एक चार पाच दिवसांत ते वारलेही Sad

उत्तम सिंग पण सुरुवातीला असिस्टंट म्हणूनच होते ना.. कोणाकडे ते काही आठवत नाही पण बहुतेक दिल तो पागल है च्या वेळेस ते चर्चेत आले..

लेख मस्तच जमलाय...

भारताचा धडाकेबाज फलंदाज संदीप पाटीलला घेऊन एक हिंदी सिनेमा बनला होता त्याचे संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग होते. सैद किरमाणी त्यात व्हिलन होता.

उत्तम माहिती. खरेच, हे पडद्याआडचे व दुर्लक्षित कलावंत... त्यांना समोर आणलेत, खूप धन्यवाद!

उत्तमसिंग अनेक लोकंकडे होते, असतील पण.. राम-लक्ष्मण बरोबर अनेक सिनेमे केलेत... सगळे राजश्री चे फेमस सिनिमे.. त्याचे अ‍ॅरेंजर तेच होते... सुरुवातीला जगदीश-उत्तम म्हणून पण त्यांनी प्रयत्न केला. वारिस म्हणून एक छान सिनेमा आला होता त्याला त्यांनी संगीत दिले - मेरे प्यार कि उमर हो इतनी सनम - आठवते का? नंतर बहुतेक जगदीश वारला म्हणून पुढे काही झाले नाही...

Pages