मी लहान असताना पहिल्यांदाच सोलापुरला माझ्या मामाकडे गेले.' श्री भगवान वासुदेव अघोर '
हे माझ्या आईचे मावस भाऊ. ते सोलापुरचे प्रसिद्ध कवि होते. आम्ही दोन तीन दिवस होतो. एके दिवशी त्यांनी काही पुस्तकं काढली अन आईला देत म्हट्ले कि ," तू भजनं म्हणतेस ना मग ह्या पुस्तकात तुला काही चांगली देवाची गाणी आरत्या वगैरे मिळतील. बघ चाली लावून म्हणता आली तर. तीन चार पुस्तकं होती. मामांनी फक्त सोलापुरचे कवि घेऊन दर वर्षी एक काव्यसंग्रह छापण्याचा उपक्रम केला होता. प्रतिपदेपासून ते द्वादशीपर्यंत त्यांनी बारा वर्षे हा उपक्रम चालवला. आई मला शाळेतल्या कवितांना चाली लावून द्यायची आणि पाठ करून घ्यायची. त्यामुळे मला कुठल्याही कविता वाचायच्या आणि चाली लावून म्हणायच्या अशी सवयच लागली होती. मामांनी दिलेली चारपाच पुस्तकंही मी अशीच वाचून काढली. सगळ्या कविता नाही समजल्या पण माझ्या त्या वयातल्या बुद्धीला समजणार्या कांही कविता होत्या त्याना चाली लावल्या ( तेही माझ्या बुद्धीप्रमाणे) आणि पाठ केल्या. त्यात एक कविता पुण्याचे पानशेतचे धरण फुटले त्यावरची कविता होती. मी लगेच आमच्या शेजारी पुण्याचे कुटुंब रहायचे त्यांच्याकडे गेले. त्यांना ती कविता दाखवली . ती वाचून त्यांना रडू फूटलं. कारण त्यांनी ते अनुभवलेलं होतं. त्यांनी तेंव्हाच्या बर्याच आठवणी सांगितल्या. त्यांनी तेंव्हाच्या प्रसंगाचं केलेलं वर्णन ऐकून मलाही रडू आलं. नंतर ती कविता मी पाठ केली. लहान असल्यामुळे कौतुकाने त्या माझ्याकडून कुणीही त्यांच्याकडे पुण्याहून आलं की म्हणून घ्यायच्या. खूप वर्ष ती कविता पाठ होती. हळू हळू विसर पडत गेला.
तीनचार दिवसापूर्वी पूर्वी पुण्यात असलेले पण आता इथे स्थायिक झालेले एक ऐंशीच्या आसपासचे गृहस्थ आले. बोलता बोलता ते म्हणाले," पुणं वाहून गेल्याला पन्नास वर्ष झाली . आमचा दीपू तेंव्हा सहासात वर्षाचा होता." असे म्हणून ते तेंव्हाच्या आठवणी सांगू लागले. मलाही ती कविता आठवली. आमच्या शेजारचे आठवले. त्यांनी सांगितलेल्या आठवणी आठवल्या. ती कविता मी पूर्ण आठवण्याचा प्रयत्न केला पण ती अर्धीच आठवते आहे. मला माहीत आहे पुणेकर ती आठवण कधीच विसरू शकणार नाहीत. पण तरीही मला ही कविता 'मायबोली'वर टाकण्याचा मोह आवरता येत नाहीय.जेवढी पाठ आहे तेवढीच लिहिते आहे. कवि मला माहीत नाहीत. आणि कुणाला विचारावे तर माझे आई आणि मामाही आता नाहीत. मी पुण्याची नाही पण लहानपणी ऐकलेले ते प्रसंग मनांत खूप खोलवर बसले आहेत.
हरहर संकट ओढवले
पुणे शहरवर विपत्ति आली
दैव कसे फिरले, हरहर संकट ओढवले,
पुणे शहरचे ऐका कथन
जुलई बारा एकसष्ट सन
प्रभात बुधवारी साताला
शतपट उंची लोंढा आला
सागर जणु का कृद्ध जाहला
हायहाय हे काय जाहले
हरहर संकट ओढवले ( दुसर्या कडव्यातल्या पहिल्या दोन ओळी आठवत नाहीत नंतरच्या ओळी)
खडकवासला तलाव भरला
पुरी पाळणा वाहत आला
जिवंत बालक त्यात निघाला
अघटित हे हो कैसे घडले
हरहर संकट ओढवले. (पुढचे आठवत नाही)
उद्या पन्नास वर्ष पूर्ण होताहेत. त्या निमित्ताने ही एक आठवण.
धन्यवाद. ह्या पुराच्या आठवणी
धन्यवाद. ह्या पुराच्या आठवणी मी आईबाबांकडून खूप वेळा ऐकल्या आहेत. आम्ही राहात होतो त्या बिल्डिन्गचे दोन मजले पाण्यात बुडाले होते. मुठा नदीचे बाकीचे पूर पावसाळ्यात खूप बघितले आहेत. पाण्याबरोबर साप, गवत वाहात जायचे. अबब केवढे ते पाणी! असे लकडीपुलावर उभे राहून म्हणायचे इत्यादी.
(No subject)