आज अण्णा-वहिनी असते तर जवळजवळ १०० आणि ९० वर्षांचे असते दोघंही. माझ्यापेक्षा अण्णा ७०हून जास्तच वर्षांनी मोठे, आणि वहिनी ६५ वगैरे वर्षांनी मोठ्या. त्यांची वयं सांगितली कारण तसे संदर्भ येतील, पण नाहीतर दोघंही कायम माझ्याबरोबर माझ्याच वयाची होऊन राहिली. असे शेजारी मिळायलाही भाग्य लागतं.
आम्ही एकाच वाड्यातले सहभाडेकरू. एरवी एखाद्या घरात ३-४ भाडेकरू वेगवेगळ्या काळासाठी राहून जातात, घरमालक एक असतो. इथे मात्र उलट होतं. अण्णांनी रहात्या वाड्याचे २ तरी मालक बदललेले बघितले होते. जुने मालक नव्यांना सांगून गेले होते, की हे वृद्ध जोडपं फार चांगलंय, त्यांना जायला नका लावू. नवीन मालकही भले, त्यांनी अण्णांना राहू दिलं तिथेच. हे सगळं ७०-८० वर्षांपूर्वीचं. अण्णा सांगायचे आम्हाला या गमती. बहुधा १९१०च्या आसपासचा जन्म असावा त्यांचा. त्यांनी पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाच्या बातम्या प्रत्यक्ष ऐकल्या-वाचल्या. नोकरी होती कुठल्यातरी ब्रिटिश कंपनीत, त्यामुळे बरीच माहिती असे म्हणे त्यांना. मला कळायला लागलं तेव्हा अण्णांनी ८० पार केली होती, त्यामुळे माझ्यासाठी ते फक्त एक प्रेमळ आजोबा होते.
त्या काळी ते ब्रिटिश कंपनीत नोकरीला होते म्हणजे खूप हुशार असणार, कारण इंग्रजी सगळ्यांना येत नसे त्याकाळी. अण्णा मात्र भारी बोलत आणि लिहीत. कर्सिव्ह रायटींगमधली त्यांची डायरी म्हणजे काहीतरी अद्भुत होतं माझ्यासाठी. ६-७ वर्षांची असताना, जेव्हा इंग्रजीचा गंधही नव्हता मला, तेव्हा माझं नाव मी "वळवलेल्या लिपीत" लिहून घेतलं त्यांच्याकडून आणि एखादं मेडल मिरवावं तसं आईला नेऊन दाखवलं होतं.
दिवसातला किती वेळ मी अण्णांकडे असे याचा हिशोब नव्हता. आईनेही कधी ठेवला नाही. कारण तिचा अण्णांवर प्रचंड विश्वास. आमच्या कुटुंबालाच त्यांच्याबद्दल खूप आदर आणि जिव्हाळा वाटे. फक्त अट एक, की त्यांच्या विश्रांतीच्या वेळी त्रास द्यायला जायचं नाही.
अण्णांनी मला इंग्रजी, बॅडमिंटन, बागकाम, पत्त्यांची रमी आणि हार्मोनिअम या गोष्टींचे पहिले पाठ दिले. सकाळी उठून दूध वगैरे प्यायले की माझा मुक्काम अंगणात. अण्णा झाडांना पाणी घालत असतील तर तिथे लुडबूड. "चला ना अण्णा, खेळूया" म्हणत बॅडमिंटन चा डाव रंगे.
"अण्णा, टाका"
"टाका नाही, खेळा म्हण"
"बरं, खेळा. अण्णा, फूल टाका म्हटलं तर काय बिघडलं?"
"टाका म्हटलेलं ऐकायला बरं वाटतं का सांग बरं!"
"हम्म्म.... नको...आपण खेळाच म्हणू"
असं करत मी बॅडमिंटन शिकले. अण्णा पावणेसहा फूटतरी उंच होते. माझी उंची बॅडमिंटन च्या रॅकेटपेक्षा थोडीशीच जास्त. अजब जोडी होती खेळगड्यांची. नेट म्हणजे तरी काय, बाबांच्या चपला घेऊन आखलेली हद्द. पण अण्णा खेळत भारी. वाटत नसे ते एवढे वयस्कर असतील. उंचीला साजेसं एकूण व्यक्तिमत्त्व. गोरा रंग, निळसर करडे डोळे, आणि किंचित घोगरा, पण गोड आवाज. टक्कल आणि टकलाच्या बाजूने शुभ्र केस. त्याच्या उलट वहिनी. बुटक्या, गहूवर्णी, किंचीत किनरा आवाज, पण एकदम तरतरीत. आमचा खेळ जास्त वेळ रंगला की हळूच मागच्या पायरीवर येऊन बसत खेळ बघायला. आणि "हरव अण्णांना. अजून हौस फिटत नाही खेळायची" म्हणून उग्गीचच काड्या घालत. अण्णा मिस्कील हसत.
मग आईची हाक आली की आमचा डाव संपे.
"अण्णा, माझं फूल ११ वेळा पडलंय. संध्याकाळी खेळू. तुमचं फक्त ३दाच पडलंय. स्कोर विसरू नका हं अण्णा. मग खेळू परत" म्हणून खेळ आटपे. अण्णा म्हतारे आहेत, स्कोअर मीच लक्षात ठेवायला हवा वगैरे विचार कधीसुद्धा मनात आले नाहीत!
मग माझी शाळाबिळा आटपून संध्याकाळी परत खेळ. किंवा रमी. मी लहानपणी अभ्यास कधी केला हेच आठवत नाहिये. कायम असल्याच उद्योगात असलेलंच जास्त आठवतंय मला!
संध्याकाळी अण्णांकडे कुणी पाहुणे असले तरी मी जात असे. सगळे पाहुणे हळूहळू मला ओळखायला लागले होते. काही आधीपासून ओळखतच होते. बाबा शाखेत जात. अण्णाही कधीकधी जात. कॉमन ओळखी होत्याच. पण कोणी नवीन पाहुणे आले की कळायचं. त्याकाळी घराची दारं कधी बंद नसत. त्यामुळे पाहुण्यांची बातमी असायची. मग घरात शिरतानाच "अण्णा..." करत शिरायचं. पाहुणे कोण ते बघायचं. स्वयंपाकघरात वहिनींजवळ लुडबुडायचं. बाहेर येऊन अण्णांना उगीच काहीतरी विचारायचं. मग पाहुण्यांचा मोर्चा माझ्याकडे वळालाच, तर काहीतरी थातुरमातुर उत्तरं द्यायची नि पळून यायचं. पाहुणे बघायची हौस भारी, नि लाजपण वाटे! मग आईची बोलणी खायची.
एखाद्या संध्याकाळी पेटीचा तास असे. अण्णा भजनं वाजवत पेटीवर. त्यांच्याकडे पेटी आमचीच होती. आईने नेऊन ठेवली होती. सारेगम...मी तिथेच शिकले. नोटेशनच्या वह्या होत्या. वाचता यायला लागल्यावर मीपण पेटीतून सूर काढायला लागले.
"पेटी वाजवताना करंगळी वापरायची नाही. आणि अंगठा काळ्या बटणांवर वापरायचा नाही, फक्त पांढर्या बटणांवर"
असं करत तिथेही हौस पुरवून झाली.
अण्णावहिनींचा रमीचा डाव बघणं म्हणजे मजा असे. दुपारच्या वेळी डाव रंगे त्यांचा, पण कोणी आलं की तितक्याच सहजपणे तो डाव मोडतही असत दोघं.
लहान असताना, जेव्हा मला पत्त्यांचे आकार कळत नव्हते, तेव्हा मी नुसतीच त्यांचा खेळ बघायचे. मग अण्णांनीच मला चौकट-किलवर-बदाम-इस्पिकची ओळख करून दिली. आणि मी पहिला खेळ शिकले तो रमीचाच! मला भिकार-सावकारही येत नसताना मी रमी शिकले होते! एखाद्या आईने मुलीचं शेजारी जाणं बंदच करून टाकलं असतं असं रमी वगैरे ऐकून...पण आमच्या मातोश्री शांत होत्या. अण्णा शिस्तीचे असल्यामुळे उगीचच काहीतरी शिकवणार नाहीत ही खात्री होती तिला. एकूणच, मी घरात दिसत नाहिये आणि अण्णांकडे आहे हे समजलं की ती निर्धास्त असे.
रमी शिकवतानाच पत्ते कसे नीट हाताळायचे, पिसायचे कसे, पिसताना त्यांची वाट न लावता पिसायचे, दुमडायचे नाहीत, भरपूर पानं असली की पंखा कसा करायचा, सगळे आकार लहान पानापासून मोठ्या पानापर्यंत किंवा उलट, पण क्रमाने कसे लावायचे हे सगळं मला अण्णा-वहिनींनी शिकवलं. मी कायम अण्णांच्या पार्टीत असे. रमीत कसली पार्टनरशिप! पण तिथेही मला अण्णांची रमी लागली की वहिनींची रमी न झाल्याचाही उगीचच आनंद होई!
पण मग वहिनी कमी तिखट-मीठाचा शिरा करत. उपमा नाही, हळद घातलेला सांजा. किंवा तांदळाची उकड वगैरे..घासभर खाऊन मी पळत असे. आईची हाक येईल म्हणून.
कधीतरी असंच बागकाम चाले. अण्णा रोज सकाळी किंवा संध्याकाळी झाडांना पाणी घालत. मीपण एक जार घेऊन त्यांना मदत करी. कधीकधी माझ्या हातून चिखलच जास्त होई.
"प्रज्ञा, असा चिखल करायचा का! नीट झाडांना घाल पाणी. अंगणात चिखल झाला तर बॅडमिंटन कसं खेळता येईल!"
असं अण्णा म्हणाले की मी नीट काम करायची. कसलीकसली अगम्य झाडं होती अण्णांच्या त्या चिमुकल्या बागेत. शोभेची जास्त होती. पण एकझोरा, लिली, तगर, जास्वंद, शेवंती, एकेरी आणि गोंडेरी झेंडू असंपण असे काय काय. अण्णा म्हणत, एकझोर्याची सगळी फुलं ४ पाकळ्यांची असतात, ५ पाकळी फूल सापडलं तर नशीबवान असतो तो माणूस! खरं खोटं देवास माहित, पण अण्णांच्या त्या एकझोर्याच्या झुडुपात मी मान खाली घालून वाकून वाकून शोधत असे ५ पाकळी फूल...
आणि गुलाब तर हमखास असे बागकामात.
मग एकदा मला गुलाबाची २ रोपं देऊन म्हणाले, जा, तुझ्या बागेत लाव! आणि मी ती २ रोपं लावली आणि पहिलं फूल अण्णांना नेऊन दिलं. त्यांच्या पूजेसाठी. त्यांची पूजा म्हणजे खरंतर मला कंटाळवाणी वाटे. तिथे मी वहिनींच्या पार्टीत असे. दोघांचे देव नि श्रद्धास्थानं निदान घरातल्या पुजेपुरतीतरी, वेगळी होती. वहिनींचे देव स्वयंपाकघरातल्या फडताळाच्या खाली कोनाड्यात असत. रांगता बाळकृष्ण, देवी वगैरे...बहुतेक शाळिग्रामही होता. आंघोळ झाली की स्तोत्र पुटपुटत पुजा चाले त्यांची. अण्णांचा सगळा कारभार वेगळा बाहेरच्या खोलीत. ते सत्यसाईबाबांचे भक्त होते. बहुतेक पुट्टपर्तीलाही जाऊन आले असावेत. साईबाबांची मोठी तसबीर होती भिंतीवर लावलेली. आजूबाजूला शिर्डीचे साईबाबा आणि अजून १-२ बाबा, कलावती आई अशांच्या तसबिरी होत्या. तसबिरींच्या खाली एक टेबल ठेवलेलं. तिथे उदबत्ती लावायची नि कसलीकसली स्तोत्रं म्हणायची. बागेत मिळतील ती फुलं तसबिरींना वहायची.
मी खूप कंटाळत असे म्हणून तेवढ्या वेळात मी माझा अभ्यास (??!!) किंवा आईने सांगितलेलं काम उरकून येत असे. माझ्याकडच्या गुलाबाला फुलं आली की मी अण्णांना नेऊन देत असे. अण्णांना फुलांच्या पाकळ्यांची सजावट करायला आवडे. तगरीच्या पाकळ्यांचं स्वस्तिक किंवा ॐ वगैरे करणं त्यांना आवडे. माझी उंची वाढून टेबलावर हात पुरायला लागला तेव्हापासून मी ही सजावट करायला सुरुवात केली. मग अण्णा डोळे मिटुन स्तोत्र म्हणत नि मी पाकळ्यांची सजावट करे.
अण्णांना एकूणच नीटनेटकेपणाचे आवड होती. वस्तू हाताळणं आणि वागणं-बोलणं सुद्धा नेटकं, रेखीव!
मला जेव्हा ५व्या यत्तेत इंग्रजी सुरु झालं तेव्हा अनेक मुलांनी क्लास लावला होता. पण मला गरजच नव्हती. दोन्ही ताया इंग्रजीसाठी अण्णांकडेच असायच्या काही अडलं तर. अण्णांइतका योग्य गुरू शोधून सापडला नसता! माझीपण शिकवणी सुरु झाली. ठरलेली वेळ अशी नसेच. शाळेतून आल्यावर अण्णांकडे जायचं, सगळ्या गमतीजमतींची पोतडी रिकामी करायची, "हे आईला नका हां सांगू आधी, मी सांगेन मग" असं एखादं सिक्रेटही असायचं त्यात.
सगळं झालं की हळूच इंग्रजीकडे गाडी वळायची. मग अण्णा बोलताबोलता कपाटातून स्क्रॅबल काढायचे. मजा यायची स्क्रॅबल खेळताना. मग थोडे दिवसांनी अण्णांनी मला डिक्शनरी कशी वाचायची, शब्द कसे शोधायचे हे शिकवलं आणि मग मी डिक्शनरी घेऊन खेळायला लागले. वोकॅबुलरी कशी वाढवावी याचं कसलंही अवडंबर न करता सहजपणे अण्णांनी हे काम करून टाकलं! (पुढे माझाच आळस म्हणून मी इंग्रजी वाचन बिचन वाढवलं नाही)
एरवी रात्री १० ही मर्यादा होती अण्णांना त्रास द्यायची, पण रात्री इंग्रजीचा अभ्यास करताना ताईला अगदीच एखादी अडचण आली तर अण्णा जागे आहेत का ते बघून ताई पुस्तक घेऊन जायची. तेवढी मुभा अण्णांनीच दिली होती.
रात्री १० वाजता पोस्टातून गुडनाईट केलं की मगच आम्ही झोपत असू. ती जरा गंमतच आहे. आमचा वाडा इंग्रजी L आकाराचा. कोपर्यातलं घर आमचं. एका टोकाला अण्णांचं, आणि आमच्या दोघांच्या मधे मालकांचं घर. दुसर्या बाजूला अजून एक भाडेकरू. सगळ्या वाड्याला वरचा मजला. त्यात एक खोली मालकांच्या आणि एक खोली अण्णांच्या घराच्या डोक्यावर. आमच्या घराच्या वर जिन्यातून निघालेला पॅसेज होता, आणि आम्हाला मिळालेली वरची खोली अण्णांच्या डोक्यावर होती. अण्णांना वरची खोली नव्हती. वयपरत्वे त्यांना जमलंही नसतं सारखं वर-खाली ये-जा करायला. त्यामुळे आम्ही झोपायला माडीवर गेलो की गॅलरीच्या गजांखालून असलेल्या गॅपमधून खाली उभे असलेले अण्णा दिसायचे. मग गुडनाईट कार्यक्रम.
२-३ दिवसांत भेट नसेल झाली, तर आईपण अण्णांची चौकशी करे. आईचा आवाज ऐकून वहिनीपण तुरूतुरू यायच्या. गप्पा मारताना आम्हाला गॅलरीत नमाजी पोझिशन घ्यावी लागे. आईपण कधीकधी तशीच उकिडवी बसून गप्पा मारायची.
अण्णांचं घर म्हणजे आमची बँक होती. खेळातल्या गाड्या ठेवायची हक्काची जागा म्हणजे वहिनींची फणी-करंडा ठेवायची फळी. आमचं एकमेकीशी भांडण झालं तर एकमेकीपासून गाड्या लपवायला तिथे ठेवायचो. किंवा कोणी पाहुणे येणार आहेत त्यांच्या मुलांसोबत, आणि त्या मुलांना आम्हाला गाड्या द्यायच्या नसतील तरी तिथेच नेऊन ठेवायचो.
"नुसत्या गाड्या ठेवायला नको जाऊ.." म्हणून मग एखाद्या दिवशी आई काही गोडाचं केलं की मला पाठवायची अण्णांकडे तो पदार्थ घेऊन. किंवा वहिनींकडून रिकामा डबा किंवा वाटी आणवून त्यात भरून पाठवायचा खाऊ.
पण सगळ्यात वहिनींनी केलेली आमटी म्हणजे डेलिकसी असे.
"काय ती फुळकवणी आमटी!" असं आई मजेत म्हणे. पण तिलाही तशी आमटी करायला कधीही जमलं नाही. पथ्यामुळे डाळ कमी नि पाणी जास्त, तिखट-मीठ-मसाला बेताचा, गूळ त्यामानाने प्रमाणात, त्यामुळे गोडसर लागे ती आमटी. पण तीच आवडायची आम्हाला. अण्णांकडे जेवायला जायचं असेल तर भारी मजा वाटायची. कधीकधी वहिनी आमच्यापुरती आमटी आणून द्यायच्या.
अण्णा तसे गोड खाणारे, नि वहिनींना जरा चटकमटक हवं असे. आईने भजी-वडे केले की पहिला कमी तिखटाचा घाणा मी वहिनींकडे देत असे. मग आई नॉर्मल भजी-वडे करायची. एकदा माझ्याकडून चुकून नॉर्मल घाण्यातली ३-४ भजी वहिनींना दिली गेली. आईला कळल्यावर जरा काळजी वाटली, की यांना सोसेल की नाही! आणि दुसर्या दिवशी थेट आईला रिपोर्टः
'काय गं, काल भज्यांमधे कमी तिखट पण झाली होती काय! मला सरमिसळ भजी लागली खाताना. चांगली चमचमीत ती मी खाल्ली, कमी तिखट अण्णांना दिली."
आईने खरा प्रकार सांगितल्यावर, "कशाला वेगळी करत्येस! तशीच पाठवत जा. मला आवडली!" म्हणाल्या!
एकदा आल्या, जरा कावर्याबावर्याच दिसत होत्या. हातात छोटी वाटी दिसत होती. काहीतरी न्यायला आल्यायत हे समजलं आईला. पण मागताना अडखळत होत्या.
"बघ हो.. हसशील....म्हणशील, वहिनी म्हातारपणाने अगदीच खुळावली...."
आईने आग्रह करून विचारलं तेव्हा म्हणाल्या,
"अगं मीठच संपलंय घरातलं. खरंच विसरले मी!"
असे अगदी अपवाद सोडले तर नशीबाने दोघांच्या शारीरिक आणि मानसिक तब्येतीत काहीही कमी नव्हतं. स्वतःला आणि एकमेकांना सांभाळून रहात दोघं.
संसारातून मोकळीक मिळाली होती. मुलगा म्हणावा तोच तेव्हा पेन्शन घेण्याइतका मोठा होता. नातवंडांची लग्न ठरली होती, २-३ वर्षांत झालीही!
मी कधीही, चुकूनही दोघांच्या तोंडी "हल्लीची पिढी" ने सुरु होणारं कोणतंही कंटाळवाणं वाक्य ऐकलं नाही! आणि "आमच्या वेळी" हेही फक्त त्या काळातल्या गमतीजमती सांगण्यापुरतंच. या काळाला नावं ठेवायच्या हेतून नाही. खरं म्हणजे दोघांनीही खूप मोठा काळ बघितलेला. अगदी पारतंत्र्यापासून ते युद्ध, महागाई, स्वातंत्र्य, आणि त्याचे अगदी सामान्य माणसावरही झालेले परिणाम...खूप मोठा कॅन्व्हास होता हा! पण ही सेकंड इनिंग रंगवायला दोघांनी फक्त आनंद देणारेच रंग निवडले.
त्यांचे २ नातू आम्हा तिघींचे खूप लाड करत सुटीला आले की. तेव्हा फक्त मुंबईत मिळणारी डेअरी मिल्क न चुकता आणत आमच्यासाठी. मग रमी, बॅडमिंटन हे खेळ होत त्यांच्याबरोबर ४ दिवस. दोघांचीही लग्नं झाली तेव्हा नव्या नवर्यांना घेऊन आले होते अण्णा वहिनींनी भेटायला. माझ्या आई-बाबांना आणि आजीलाही भेटून गेले तेव्हा.
हळूहळू मीही मोठी होत होते. अभ्यास वाढत होता. अण्णांकडे जायचा वेळ खूपच कमी झाला होता. माझी सातवीची परीक्षा संपली. तायांचीपण १०-१२वीची परीक्षा संपली. त्यांच्या पुढच्या शिक्षणाचे प्लॅन्स आखत होतो आम्ही. अण्णांच्या मोठ्या नातवाला एक मुलगी आणि धाकट्या नातवाला मुलगा झाला म्हणून त्यांच्याकडेही आनंदीआनंद होता. पणतू झाला, पणती झाली म्हणून मावंदं घालायचा बेत ठरत होता. त्या सगळ्या धार्मिक विधीची माहिती अण्णांनी आईला विचारून घेतली होती.
पण नियतीच्या मनात ते व्हायचं नव्हतं. एक दिवस मधली ताई वरच्या खोलीत आली तीच रडत रडत. आणि झोपाळ्यावर बसूनही रडतच होती. मी नुकतीच कुठूनतरी उनाडून आले तेव्हा अण्णांच्या घरी पाहुणे दिसले. वहिनींची लगबग दिसत होती. काय झालंय कळेना.
आधी वाटलं घरापासून लांब शिकायला जायचं म्हणून बहिणाबाई रडतायत...पण काहीतरी घडलं होतं खास! आई-बाबा काही बोलत नव्हते. शेवटी ताई म्हणाली,
"कोणाला सांगू नको... माधवदादा गेला...हार्टफेल"
मला हे डोक्यातून मनात पोचून अर्थ कळायला खरंच २ मिनिटं लागली. माधवदादा म्हणजे वहिनींचा मोठा नातू नि महेश धाकटा.
"महेशदादाचे सासरे आलेत दोघांना न्यायला. अण्णांना वाटतंय मावंदं करायचं म्हणून न्यायला आलेयत. सारखी पंतवंडांची चौकशी करतायत. आजच्या आज निघायला हवंय, पण चांगल्या भेटवस्तू नेऊ म्हणून अण्णा थांबा म्हणतायत त्यांना २ दिवस. मुहूर्त कधीचा विचारतायत नि ते काका काही बोलू शकत नाहियेत. अण्णांना कसं नि काय सांगायचं ते आपल्या आई-बाबांनाही कळत नाहिये. आपण रोजची माणसं अण्णांची म्हणून बाबांनी बोलावसं वाटतंय त्या काकांना...
आणि सगळ्यात काळजी वाटतेय वहिनींची. माधवदादा अगदी लाडका, ६ महिन्यांचा होता तेव्हापासून सांभाळलेला ना.... तोच जास्त राहिलाय दोघांजवळ.."
ताईने हे सगळं एका दमात सांगून टाकलं. माझ्या डोळ्यांत पाणी बघून मला जवळ घेऊन खूप रडली पुन्हा.
शेवटी कसंतरी हे सगळं अण्णांना सांगितलं बाबांनी आणि काकांनीच. देवळाच्या बाहेरच्या कट्ट्यावर बसून होते अण्णा हे ऐकून. सुन्न झालेले अण्णा.
"माझं ठीक आहे हो, वहिनीला काय सांगू मी! तिचा माधव कुठेय म्हणून सांगू!" म्हणून स्वतःचं दु:ख लपवणारे अण्णा.
जाताना उत्साहाने काठी टेकत काकांबरोबर गेलेले आणि येताना डोळ्यांतली सगळी चमक कायमची हरवलेले अण्णा.... मला त्यांच्याकडे बघवेना.
मुंबईला निघाले ते परत न येण्यासाठीच! ही वेळ मला निभावता येणार नव्हती. मी घरातून कुठेतरी गेलेच निघून. फक्त अण्णांना सांगून गेले इतकंच.
जून महिन्यातला पाऊस, आणि ही प्रेमळ म्हातारा-म्हातारी नातवाच्या १०व्याला निघालेली! किती क्रूर चेष्टा करावी नियतीने एखाद्याची!
वाटेत जाताना म्हणे वहिनींना हळूहळू कल्पना दिली. पण तरी दादा अचानक खूप आजारी पडला आहे असंच सांगितलं होतं. तो गेलाय हे मग पोहोचल्यावर कळेल असं काहीतरी...
सप्टेंबरमधे आमच्याकडे फोनवर निरोप आला, वहिनी गेल्याचा. ३-४ महिन्यातच नातवाला भेटायला आजी निघून गेली! अहेवपणी गेली! ४ दिवसांच्या तापाचं निमित्त पुरलं तिला.
नंतर एकदा अण्णा आणि त्यांची नातसून, माधवदादाचीच बायको, लहानग्या मुलीला घेऊन आली होती. बाकीची मंडळी कोणाकडेतरी उतरली होती, ही दोघं आम्हाला भेटायला आली.
अण्णा अगदीच थकले होते. आधी माधवदादा, मग जिने ७० वर्षं साथ दिली ती सहधर्मचारिणी... जवळची माणसं सोडून गेली.
अण्णांना ऐकूही कमी यायला लागलं होतं. कसेबसे तासभर होते त्या वास्तूत.. त्याहून जास्त रहावेना त्यांना. पुढेही प्रवास करायचाय म्हणून निघालेच. मी नमस्कार केला त्यांना. डोळे पुसत जवळ घेऊन म्हणाले,
"आयुष्यमान हो!"
तो आशीर्वाद ऐकून गलबलून आलं मला!
१-२ वर्षांनी अण्णाही गेले. मला माझं लहानपण हरवलंय असं वाटलं. माझ्यातली निरागसता जराही नाहीशी न करता मला मोठं केलेले अण्णा..ते गेले तेव्हा मात्र माझं लहानपणही घेऊन गेले!
**************************
नावं बदलली आहेत, कारण खूप जवळच्या माणसांबद्दल लिहिणं कठीण गेलं...
४ दिवसांपूर्वी लिहिता लिहिताच
४ दिवसांपूर्वी लिहिता लिहिताच जाणवलं की विस्कळीत झालंय. प्रयत्न केला पण अजून नीट लिहिता येणं खरंच अवघड जातंय..म्हणून मग शेवटी आता पोस्टतेय.
काही कमी वाटलं तर माझ्या लेखनातली कमतरता समजा. पण अण्णा वहिनींची ओळख व्हावी, निदान ते गेल्यावर १४ वर्षांनी तरी...असं वाटलं खूप.
खूप छान उतरलय. जवळच्यांबद्दल
खूप छान उतरलय. जवळच्यांबद्दल आपल्याला जे जे काही वाटतं ते सगळं शब्दात उतरवणं कठीण असतं, पण हे चांगलच जमलय.
छान जमलंय. वाचून न
छान जमलंय. वाचून न बघितलेल्यांबद्दल वाईट वाटलं
प्रज्ञा, खूप सुरेख लिहिलयस.
प्रज्ञा, खूप सुरेख लिहिलयस. अगदी डोळ्यासमोर चित्र उभे केलेस!
१-२ वर्षांनी अण्णाही गेले.
१-२ वर्षांनी अण्णाही गेले. मला माझं लहानपण हरवलंय असं वाटलं. माझ्यातली निरागसता जराही नाहीशी न करता मला मोठं केलेले अण्णा..ते गेले तेव्हा मात्र माझं लहानपणही घेऊन गेले!>>>> छान लिहलय..आवडलं
खूप सुंदर, ओघवत्या शैलीत
खूप सुंदर, ओघवत्या शैलीत लिहीलय. गुंतवून टाकणार लिखाण. वाचताना डोळे पाणावले.
चांगलं लिहिलंस प्रज्ञा.
चांगलं लिहिलंस प्रज्ञा.
खुपच सुंदर लिहिलंय.
खुपच सुंदर लिहिलंय.
अगदी मनापासून लिहिलयस
अगदी मनापासून लिहिलयस प्रज्ञा. अण्णा वहिनींचं तुझ्या भावविश्वातलं स्थान किती महत्त्वाचं होतं ते यावरून लक्षात येतय. खुप आवडलं.
देव त्यांना शांती देवो.. छान
देव त्यांना शांती देवो..
छान उतरलाय लेख.
छानच लिहिलयं.
छानच लिहिलयं.
सुरेख लेख्...आवडला
सुरेख लेख्...आवडला
प्रज्ञा दी अतिशय सुंदर
प्रज्ञा दी अतिशय सुंदर बालपणीच्या आठवणी सांगितल्यात तुम्ही. सगळ्यांनाच नाही जमत इतकं सहज आणि ओघवत लिहायला. तुमची आणि अण्णांची शेवटची भेट वाचताना नकळत डोळे पाणावले. खरच आपलं बालपण आजी, आजोबा, आई, बाबा.....ह्यांच्या मुले कायम असत आणि जेव्हा एक एक करून ही आपलं बालपण जपणारी माणसं आपल्यापासून दूर निघून जातात तेव्हा खर तर आपण आत्ता मोठे झालो ह्याची जाणीव होते. खरच खूप कठीण असत हे स्वीकारणं.
तुमच्या पुढील लेखासाठी शुभेछा....
छान लिहिलस.
छान लिहिलस.
खुप सुरेख लिह्ले आहे.
खुप सुरेख लिह्ले आहे.
प्रज्ञा९, सुसूत्र नसलं तरी
प्रज्ञा९, सुसूत्र नसलं तरी तुला ते दोघे किती जवळचे आहेत ते छानच उतरलं आहे गं.
प्रज्ञा, चांगलं लिहितेस ग.
प्रज्ञा, चांगलं लिहितेस ग.
आवडलं. सुसुत्र आहे नाही
आवडलं.
सुसुत्र आहे नाही ह्यापेक्षा ते मनाला भावतं , हे महत्वाचे (माझे मत)
परत ह्यावरुन वादंग नको ह्याकरिता (कंस)
अनुभवच असल्याने लेख जिवंत वाटला (म्हणजे काय ते विचारु नका)
असेच लिहीत रहा , विस्कळीत होतेय वगैरे कॉम्प्लेक्स ठेवु नका.
खुप मनापासुन लिहीलयस गं
खुप मनापासुन लिहीलयस गं प्रज्ञा. डोळे नकळत पाणावले.
हे असं लिहायला मोठ्या मनाची
हे असं लिहायला मोठ्या मनाची माणसं किंवा आपल्या अगदी जवळच्या माणसांमधेच मोठ मन शोधावं लागतं. बस हेच जमलय इथे. आवडलं ललित.
खूप सुरेख लिहिलयस प्रज्ञा.
खूप सुरेख लिहिलयस प्रज्ञा.
मस्त लिहिलंय... एकदम
मस्त लिहिलंय... एकदम मनापासून..
>>पण ही सेकंड इनिंग रंगवायला
>>पण ही सेकंड इनिंग रंगवायला दोघांनी फक्त आनंद देणारेच रंग निवडले.
हे वाक्य अतिशय आवडलं. छानच लिहिलं आहेत.
प्रज्ञा, खुप सुंदर उतरले आहे
प्रज्ञा, खुप सुंदर उतरले आहे लिखाण. न पाहता सुद्धा, खुप जवळची वाटली ही माणसे, आणि मला वाटते तेच तुझ्या, लिखाणाचे यश!
खूप सुरेख लिहिलयंत....
खूप सुरेख लिहिलयंत.... मनापसून.... मनातून आलेलं.........
खूप छान लिहील आहे प्रज्ञा.
खूप छान लिहील आहे प्रज्ञा. माणसं अन प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. पु.ले.शु.
प्रज्ञा छान लिहिलंयस! भावना
प्रज्ञा छान लिहिलंयस! भावना पोचल्या.
ललित प्रचंड आवडलं.. एकदम
ललित प्रचंड आवडलं.. एकदम गलबलून आलं
छान लिहिलंय...
छान लिहिलंय...
मनापासुन लिहिलयस म्हणुनच छान
मनापासुन लिहिलयस म्हणुनच छान उतरलंय इथे.
Pages