युगप्रवर्तक

Submitted by विनीता देशपांडे on 4 July, 2011 - 01:57

केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले, आधुनिक कवितेचा उदयबिंदू.यांच्या काव्याचे आजवर जेवढे अवलोकन झाले,तेवढे कोणाच्या काव्याचे झाले नसावे. ते नि:संदेह युगप्रवर्तक होते, पण ते युगप्रवर्तक का ठरलेत? सन १८८५ च्या सुमारास केशवसुतांनी इंग्रजी कवितांच्या भाषांतराने काव्यलेखनास आरंभ केला. त्या वेळी कविता लोकजीवनापासून दुरावली होती आणि नव्या-जुन्या वळणावर बराच वेळ घुटमळत होती.कवीने पारंपारिक विषय, ठराविक वृत्त, क्लिष्ट व अलंकारिक भाषा या बंधनात गुंतलेल्या कवितेला मुक्त करुन , व्यवहारी व रोजच्या जगण्यात मोठा आशय दडलेला असतो तसेच वैयक्तिकतेचा आविष्कार काव्याची सहज - स्वाभाविक वृत्ती आहे हे विचार रुजवून इंग्रजी वळणाची नवी मराठी कविता सर्वसामान्यांपुढे प्रस्तूत केली. केशवसुतांच्या प्रयत्नांमूळे कविता पुन्हा जनमानसात रूळू लागली. म्हणुनच तत्कालीन समीक्षांनी त्यांना "आधुनिक काव्याचे जनक " आणि " युगप्रवर्तक " कवी म्हणून संबोधिले.
माझ्या दुर्मुखलेल्या मुखामधुनिया,चालावयाचा पुढे
आहे सुंदर तो सदा सरसवांङनिष्यंद चोहिकडे !
तुम्ही नाही तरी सुतादि तुमचे धातील तो प्राशुनी !
कोणीही पुसणार नाहिं ,"कवि तो होता कसा आननी?"
केशवसुतांच्या वर्गशिक्षकांने त्यांना दुर्मुखलेला म्हंटले त्यावरून ही रचना सुचली. या ओळींतून केशवसुतांना स्वसामर्थ्य अल्पवयातच उमगले होते याचा प्रत्यय येतो. केशवसुतांच्या सुरवातीच्या रचनांमधून त्यांची उदासीनवृत्ती - भिडस्त स्वभाव - एककल्लीपणा अनुभवायला मिळतो. कवीची बेताची आर्थिक परिस्थिती, रखडत झालेले शिक्षण , संकोची व मानी स्वभाव , अर्थाजनासाठी तात्पुरती नोकरी यामुळे जीवनात स्थैर्य नव्हते.या अस्थिरतेमुळे एक उदासीनता व अंतर्मुखवृत्ती त्यांना कायम घेरून होती. कदाचित याच कारंणामुळे त्यांच्या रचनांमधे कवि विषयक रचना विपुल प्रमाणात आढळतात. "आम्ही कोण ?" या रचनेतील या ओळी :
शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ?
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ?
ते आम्हीच, सुधा कृतीमधुनियां ज्यांच्या सदा पाझरे
ते आम्हीच शरण्य,मंगल तुम्हा ज्यांपासून लाभते !
आम्हाला वगळा, गतप्रभी झणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा, विकेल कवडीमोलावरी हे जिणे !
केशवसुतांचा इंग्रजी साहित्याचा अभ्यास व्यापक होता, हे त्यांच्या भाषांतरीत व अनुकरण काव्यातून प्रचितीस येतो. त्यांच्या उल्लेखनीय अनुकरण रचनांमधे घुबड ही रचना पो या कवीच्या रेव्हन या रचने च्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित आहे, तर दोन बाजी ही रचना व्हिक्टर ह्यूगो यांची नेपोअन् पॅटीट या धर्तीवरची असून यात केशवसुतांनी व्यक्त केलेला आवेश आणि संताप मनाला चटका लावून जातो.
त्या शूराने भगवा झेंडा हिंदुस्थानी नाचविला
निजराष्ट्राचे वैभव नेले एकसाएखे बढतीला.........
आणि तुवा रे ! त्वां नीचाने पाठ आपुली दावुनिया
रणातुनी पौबारा केला, शेपुट भ्याडा वळवुनिया !"
ही रचना कवीने १६-०२-१८९५ रोजी लिहिली.आज इतक्या वर्षांनंतरही या ओळींतील आशय बोथट जाणीवा जागृत करून जातो.काळ लोटला, चेहरे बदलले,मात्र माणसाची वृत्ती तीळमात्र ही बदलली नाही.वर्षातून दोन दिवस झेंडावंदन करण्यापलीकडे आम्ही सामान्यजन देशासाठी काय करतो ?
लॉंगफेलो च्या कवितेचे घडयाळ हे अनुकरण एक नवा रचनात्मक प्रयोग आणि मोजक्या शब्दातले प्रबोधन ठरले.
"वार्धक्य जर सौख्यात जावया, व्हावे पश्चाताप नुरूनिया , तर तरूणारे! मला वाटते, ध्यानी आपुल्या आण ,घडयाळ हे जे अविरत वदते, आला क्षण गेला क्षण. तर कवीची "सतारीचे बोल" ही ड्रायडन कवी च्या अलेक्झेंड्र फीस्ट ऑफ द पॉवर ऑफ द म्युझिक् या रचनेच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित आहे. कवितेत व्यक्त कवीच्या कल्पना जरी परकिय असल्या तरी त्यात व्यक्त शब्दसंपदा-लय-ताल-आशय-अभिव्यक्ती ही सर्वस्वी केशवसुतांची आहे.
ही भाषांतरे आणि अनुकरणे करतांना कवीने अनेक काव्य प्रयोग केलेत, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाच्या अभ्यासातून नव नवे वृत्त प्रयोग करत शार्दुलविक्रिडीत या अक्षरगणवृत्तात १४ ओळींचा सुनीत हा काव्यप्रकार निश्चित केला.या वृत्तात पूर्वार्धात कल्पना योजुन उत्तराधार्त विचांरांचे आरोह अवरोह मांडले. कवीने शेक्सपीअर् सॉनेट व मिल्टन सॉनेट यांचा संयोग साधत विचार आणि कल्पना असा द्विप्रधान सुनीत काव्यप्रकार मराठीत रूजवला. आणि इथेच नव्या जुन्या वळणांवर घुटमळणार्या कवितेला एक दिशा मिळाली. पुढे सुनीत हा प्रकार रविकिरणमंडळाने समर्थपणे हाताळला.
केशवसुतांना काव्यलेखनातून फारसा आर्थिक लाभ झाला नाही. त्यांच्या रचना करमणूक , मासिक मनोरंजन या मासिकांमधे प्रसिध्द झाल्यात. सुरवातीच्या कविता " कृ.के.दामले ", " कुणी तरी ", " कोणी एक कवी " अश्या नावे प्रसिध्द झाल्यात, त्यामुळे ही केशवसुतांची कविता आहे अशी ओळख लोकांत झाली नव्हती.नंतर काव्यरत्नावलीकार यांनी केशवसुत हे काव्यनाम छापण्यास सुरू केले, सन् १९०० पासून मासिक मनोरंजन यांनी ही केशवसुत असा उल्लेख करण्यास सुरवात केली. काव्यलेखन सुरू केल्यानंतर जवळ जवळ एक तपानंतर केशवसुत हे नाव प्रचलित झाले.
केशवसुतांच्या प्रेम कविता आणि निसर्ग कविता म्हणजे आधुनिक कवितेला वरदान आहे. प्राचीन साहित्यात प्रासंगिक वर्णनांखेरीज स्वतंत्र असे प्रेमकाव्य व निसर्गकाव्य कुठेच आढळत नाही. या काव्याची सहज सोप्या भाषेत अनुभुती प्रथम केशवसुतांनी व्यक्त केली.
विसर तर झणी व्यवहाराला विसर शहाणपणाला
आणिक वेडी होऊनि वद जे व्हावे या वेड्याला
म्हण मला आपला प्रिय जिवलग हे मधुरे
वद असे मजवरी प्रेम तुझे ग तारे !
" प्रणयकथन " या रचनेतील या ओळी.या रचनेत प्रणय धुंद असला तरी तो आसक्त नाही. त्यात कुठलाही उन्माद जाणवत नाही. हे काव्य सन१८९७-९८ च्या सुमारातील आहे. तो काळ स्त्रियांनी प्रेम व्यक्त करण्याचा नव्हता मात्र कवीला आपल्या मधुरे कडून या धिटाईची अपेक्षा आहे.या वरून कवीच्या प्रगत विचारांची वृत्ती लक्षात येते. त्यांच्या "प्रियेचे ध्यान", "नाहि ज्या परि डोंगळा","प्रयाणगीत" रचना पत्नीला उद्येश्युन लिहिल्या आहेत.
म्हणुनि कथितो नि:शंक मी तुम्हाते
असे सुन्दरता अढळ जरी कोठे
तर करी ती सृष्टीत मात्र वास
पहा मोहिल सर्वदा ती तुम्हास
या ओळी कवीच्या "अढळ सौंदर्य" या रचनेतील आहे. प्रत्येकाला एक सौंदर्य दॄष्टी असते,ज्याने त्याने या दॄष्टीने निसर्गातून आपआपला अनुभव घेउन त्यात रमराण होणे कवीला अपेक्षित आहे.खरे काव्य, खरे सौंदर्य, खरे सामर्थ्य मानवाला निसर्गातुन प्राप्त होते हे तत्वज्ञान केशवसुतांनी काव्यात व्यक्त केले.
कवीच्या सामाजिक कविता स्फूर्तिदायक व समर्थ आहे. या कवितांचा अंतरंग व बहिरंग सर्वस्वी केशवसुतांचा आहे.तत्कालीन सामाजिक स्थितीचा आढावा घेता, समाजात पाश्चात्य संस्कृतिचे आकर्षण,रूढ़ी-परंपरा यात गुंतलेला मानव, समाजरचनेतील दोष व अन्यांयांविरूध्द मुक संघर्ष,असे अनेक कारणांनी समाज अस्थिर होता.या अस्थिर स्थितीत सत्तापिपासूंची सत्तेसाठी धडपड आणि यात साधारण मानवाची अगतिकता ,या सर्वांचा संताप व्यक्त करतांना कवी म्हणतो,
रूढ़ी जुलूम यांची दुमर्द
संताने राक्षसी-हंत हा !
खादाड तुम्हा खातात पहा!
जल्शाचा का समय असे हा?
तुतारिने या व्हा सावध तर !
केशवसुतांनी जनजागृतीची तुतारी फुंकली. तसेच स्फूर्ती, नवा शिपाई या सारख्या तेजस्वी रचनांमधून मानवाच्या बोथट जाणीवांना चेतना दिली.कवीची सामाजिक जाण, अन्याची चीड त्यांच्या या संतप्त भावनांचा उद्रेक या रचनांमधे प्रत्ययास येतो. अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न आणि मजुरावर उपासमाराची पाळी यात कवीचा समाजहिताचा दॄष्टीकोन व्यापक झाल्याचा लक्षात येतो.पण लक्षात कोण घेत ?च्या कर्त्यास उद्देश्यून लिहिलेल्या या रचनेत कवीची स्त्री-दास्याबद्दल तळमळणार्या मनाची कल्पना येते.
उत्तरोत्तर कवीच्या रचना आशय व भावनांच्या दॄष्टीने अधिक चिंतनशील आणि गहन होत गेल्याचे प्रत्ययास येते.जीवनातील अनआकलनीय सत्य शोधण्याचा प्रयत्न कवीने केला. कोणीकडून ! कोणीकडे ! या रचनेत आपल्याच भोवती घडणार्या पण कधी कधी न उमगणारे हे गूढ कवीला पण उमगले नाही.
कोणीकडून! कोणीकडे ?
’इकडुनि-तिकडे"म्हणती गडे!
येथुनि-तेथे,मागुनि
हे तर नित्यच कानी पडे
पण समाधान का कधी तयाने घडे?जिवलगे
याच पार्श्वभुमीवरील कवीची अत्यंत लोकप्रिय रचना म्हणजे झपूर्झा आणि हरपलेले श्रेय.हरपलेले श्रेय या रचनेत कवीने मनातील उदासीन अवस्थेतील अस्वस्थ अशी उत्सुकता व्यक्त केली आहे.या रचनेतील निराशेचा सूर अधिक तीव्र असून या संवेदनशील रचनेत विचारांचे प्रतिबिंब उमटलेले दिसतात.केशवसुतांच्या कवितेत भावनांपेक्षा विचारांना श्रेष्ठत्व दिल्यामुळे त्या तात्विक ठरतात. म्हणूनच तत्कालिन समिक्षकांनी त्यांना तत्वज्ञ कवी असे संबोधिले.
केशवसुतांच्या वैचारिक लेखनामुळेच आधुनिक कवितेचा प्रवास सुरु झाला. त्यांच्या विविध काव्यप्रयोगातून आज मराठी कवितेचे स्वरुप व्यापक व विस्तारित झाले आहे.
जीवनपट
केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी रत्नागिरीजवळील मालगुंड या गावी झाला.केशवपंत हे चिपळूणला सरकारी शाळेत शिक्षक होते.त्यांना एकूण बारा अपत्य,सहा मुले व सहा मुली.कृष्णाजी त्यांचे चवथे अपत्य.कोकणात खेड गावी प्रार्थमिक शिक्षण घेत असतांना कवीला प्राचीन साहित्य वाचण्याचा छंद लागला.सन१८८९ साली ते मॅट्रीक झाले.त्या काळाच्या परंपरेनुसार वयाच्या १५व्या वर्षी त्यांचा विवाह श्री.केशव चितळे यांच्या कन्येशी झाला.नंतर केशवसुत मुंबई येथे नोकरी साठी गेले.तिथे त्यांनी "न्यू इंग्लिश स्कुल","मिशनरी स्कुल","ज्ञानोदय"अशा अनेक ठिकाणी तात्पुरत्या नोकर्या केल्या. मुंबईच्या वास्तव्यात त्यांचा अनेक साहित्यिकांशी परिचय झाला."मनोरंजन"मासिकाचे श्री.रघुनाथ मित्र यांनी केशवसुतांची कविता उचलुन धरली. सन१८९० सालापासून ह.ना.आपटे यांच्या "करमणूक" मासिकात कवीच्या रचना प्रसिध्द झाल्यात.केशवसुतांचे साहित्यस्नेही म्हणजे ना.वा.टिळक,वासुदेव बळवंत फडके,कवि गोविंद,माधवानुज अर्थात हरि मोडक,कवि किरात अर्थात कृष्णाजी लक्ष्मण सोमण,कवि विनायक,"प्रभाकर"मासिकाचे जगन्नाथ भांगले यांचा परिचय मुंबईच्या सन१८९० ते १८९६ या वास्तवात झाला.पुढे सन१८९७ ते१९०४ पर्यंत त्यांचा मुक्काम खानदेशात होता.आधी फैजपूर येथे शाळेत हेडमास्तर म्हणून रुजू झाले.परन्तू तेथिल प्लेग च्या साथी मुळे ते धारवाडला गेले.त्यांच्या मातोश्रींच्या निधनाची वर्ता ऎकुन कवि हुबळीला गेले असता तेथे प्लेगच्या साथीत त्यांना व त्यांच्या पत्नीला प्लेग झाला. ७ नोव्हेंबर १९०५ रोजी केशवसुतांचा आणि आठ दिवसांनी १५ नोव्हेंबे १९०५ रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले.कवीच्या पश्चात त्यांच्या तीन्ही मुलींचे पालन त्यांचे वडिल बंधु चिंतोपंत व सीतारामपंत यांनी केले.केशवसुत व त्यांच्या काव्याची कोणाशीच तुलना होउ शकत नाही.ते एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि ओजस्वी कवि होते. या युगप्रवर्तकाला कोटी कोटी दंडवत.

गुलमोहर: 

केशवसुतांचा विषय काढलात त्याबद्दल अभिनंदन आणि आभार. Happy

लेख थोडा अजून प्रासादिक हवा होता, त्यात जरा अजून 'जान' हवी होती असे वाटले.