साहिलच्या चेहर्याकडे पाहून त्याच्या आईला गलबलून आलं. पुन्हा तेच. काय केलं की हे थांबेल हेच समजत नव्हतं. गेला महिनाभर सातवीतला साहिल शाळेतून आला की त्याचा अस्वस्थणा, चिडचिड, आदळआपट यातून त्याला बाहेर कसं काढायचं ते पालकांना उमजत नव्हतं. आजूबाजूला घडणार्या, वर्तमानपत्र, दूरदर्शनवर पाहिल्या जाणार्या आणि भारतीयांच्या बाबतीत असं काही घडत नाही असा समज असणार्या या गोष्टी आता त्यांच्याही घरात शिरल्या होत्या. मुल चिडवतात, गे, फॅगेट, स्टुपिड इंडियन, गो बॅक टू इराक, गळा आवळू आम्ही तुझा, लांब राहा आमच्यापासून, विचित्रच आहेस असं एक कुणीतरी म्हणतं आणि बाकिचे त्याला साथ देतात. हळूहळू तो एक समुदाय बनतो आणि साहिल एकटा पडत जातो.
साहिलला शाळेत जावंसच वाटेना. सकाळ झाली की पोट दुखणं, उलटीची भावना काही ना काही कारणं काढून शाळा नको हेच टुमणं. सुरुवातीला दुर्लक्ष कर, त्यांच्या भानगडीत पडू असंच म्हटलं पालकांनी. पण ह्या प्रकाराने कळस गाठल्यावर त्याच्या आईने शिक्षकांना पत्र लिहिलं, ते त्यांनी मुख्याध्यापकांना दाखवलं. चिडवणार्या मुलांना मुख्याध्यापकानी बोलावून समज दिली असावी कारण हळूहळू हा प्रकार कमी झाला. त्यातल्या एका मुलाने तू चुगली का केलीस असं दरडावून विचारलं साहिलला, त्यावरुन त्या मुलांना शाळेकडून समज मिळाली असावी असा पालकांचा अंदाज. साहिलचे पालक सुटकेचा श्चास सोडतायत तोच एका मुलाने मी तुला मारुन टाकेन असं फेसबुकवर लिहिलं, साहिलनेही त्याला उत्तर म्हणून तसंच काहीतरी लिहिलं. प्रकरण दोघा मुलांच्या पालकांपर्यंत पोचलं. साहिलच्या पालकांनी त्याला फेसबुकवर जायलाच बंदी घातली. आता सारं मार्गाला लागलं आहे असं साहिलच्या पालकांना वाटतं.
अशीच आणखी एक घटना. इथेच जन्म झालेली सानिका. तिचं पाचवीपर्यंतचं शिक्षण झालं आणि पालकांनी भारतात परतायचा निर्णय घेतला. काही कारणाने तीन वर्षांनी ते परत आले तेव्हा सानिकासाठी सारंच बदलंलं. मुख्य म्हणजे बोलण्याची पद्धत (अॅक्सेंट) . तिच्या उच्चारांची टिंगल होई. आधीच्या मैत्रींणीचं वर्तुळ बदललेलं, वर्गातल्या मुलींचे गप्पाचे विषय तिला बाजूला पाडत. नववीतली सानिका एकटेपणाला तोंड देत प्राप्त परिस्थिती्शी जुळतं घ्यायला शिकते आहे. तिच्या भावाला शाळेच्या बसमध्ये मेक्सिकन मुलं त्रास देत जसं साहिलला चिडवलं जाई तसाच काहीसा प्रकार. त्याबद्दल त्यांनाही शाळेकडे तक्रार करावी लागली.
सुदैवाने यातून या दोन्ही मुलांसाठी मार्ग काढता आले. पण कुठल्या तरी कमकुवत क्षणाला ज्या मुलांना आयुष्यं अर्ध्यावर संपवणं हाच मार्ग सुचला अशा घटना कितीतरी. वेदनेला संपवून टाकण्याचा अखेरचा मार्ग. गेलेला जीव सुटतो, मागे राहिलेल्यांसाठी उरते ती अश्वत्थाम्याची वेदना आणि अनुत्तरित प्रश्नाची सोबत. अशाही परिस्थितीत काहीवेळेला आत्म्हत्या केलेल्या मुलांचे पालक विलक्षण, अनाकलनीय वाटणारी पाऊलं उचलतात, स्वत:ला सावरत पोटच्या मुलांच्या आत्महत्येला कारणीभूत झालेल्या मुलांनाही क्षमा करतात. त्यातल्याच ह्या काही जीवनकथा....
धाय मोकलून तिने रायनच्या बाबांना मिठी मारली. पण तिला जवळ घ्यायला त्यांचे हात पुढे होईनात. चीड, दु:ख, पराभव अशा भावनांचा कल्लोळ मनात उडालेला. सातवीतल्या त्या मुलीचा शोक खोटा नाही हे पटत होतं पण समजून घेणं जड जात होतं. त्यांच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या त्या मुलीच्या थाडथाड थोबाडीत द्याव्यात ही आंतरिक ऊर्मी त्यांनी कशीबशी आवरली. आपल्या भावनांवर काबू मिळवत त्यांनी तिला हळूवारपणे थोपटलं. तिला भेटण्याचा निर्णय चुकीचा नव्हता या समाधानाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. मनातून त्यांना खात्री होती की असा काही परिणाम होईल याची तिला कल्पना असती तर तिने हे केलंच नसतं. ते तिला समजावं म्हणूनच ही भेट होती. तिने हेतुपुरस्सर हे केलं नाही याची त्यांना खात्री आहे, हे त्यांनी त्या मुलीला समजावून सांगितलं. हुंदक्यांनी गदगदणाऱ्या मिठीतून तिचं दु:ख आणि पश्चात्ताप त्यांना कळत होता. कळत नव्हतं ते हेच की या एवढय़ाशा लहान जिवांमध्ये कुठून येत असावा हा क्रूरपणा? आणि का? का वागतात ही मुलं अशी? आज त्यांना दोन गड सर करायचे होते. आणखी एका मुलाला भेटायचं होतं. रायनच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दुसऱ्या मुलाला. अपेक्षेप्रमाणे त्या मुलाचे ओठ घट्ट मिटलेलेच राहिले सुरुवातीला. अगदी निगरगट्टपणाचा कळस वाटावा इतका तो मुलगा गप्प आणि शांत. पण शेवटी रायनचं दु:ख, वेदना त्या मुलापर्यंत पोहोचवणं त्यांना जमलं. त्याने रायनच्या बाबांची क्षमा मागितली ती मनापासून.
रायनच्या आत्महत्येची घटना प्रत्येक पालकाच्या उरात धडकी भरविणारी आहे. पाचवीतला रायन एक दिवस शाळेतून घरी आला तो रडतच. शाळेत चिडवतात म्हणून तो रडतोय हे समजल्यावर कोणतेही पालक करतील तेच रायनच्या आई-बाबांनी केलं. त्याला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. बाबांनी समजावून सांगताना म्हटलं, ‘नुसते शब्दच तर आहेत. मनावर नाही घ्यायच्या अशा गोष्टी.’ रायनने तेच केलं पण चिडवण्याचे हे प्रकार चालूच राहिले. पूर्वीसारखी तीव्रता त्यात राहिली नसावी असं काही कालावधीने घरी वाटायला लागलं; कारण रायन या बाबत घरी फारसा बोलेनासा झाला. तो सातवीत गेल्यावर तर आश्चर्याची गोष्ट घडली. त्या चिडवणाऱ्या मुलांपैकीच एकाशी चांगली मैत्री झाल्याचं रायनने आनंदाने सांगितलं. हे समाधान फार काळ टिकलं नाही. त्या मित्राने रायन ‘गे’ आहे अशा अफवा ऑनलाइन पसरवल्या. थट्टेच्या जीवघेण्या या प्रकारात खूप मुलं सामील झाली. रायनला कितीतरी अश्लील ई मेल यायला लागली. पण आता रायनने हे घरी सांगणंही थांबवलं होतं. दरम्यान ऑनलाइन चॅटमध्ये त्याची शाळेतल्याच एका मुलीशीही दोस्ती झाली. अस्वस्थ रायनला तिच्याशी ऑनलाइन गप्पा मारणं हाच एक विरंगुळा वाटायला लागला. चिडवणं, अश्लील पत्र यांचा विसर पाडणाऱ्या गप्पा. पण रायनचं हे समाधानही फसवं निघालं. त्या मुलीने रायनची केलेली फजिती अंगावर शहारा आणते.
त्या दिवशी अतिशय उत्साहाने रायन शाळेत गेला. त्या मुलीशी ऑनलाइन गप्पा झाल्या की त्याला खूप मोकळं झाल्यासारखं वाटायचं. दु:खावर हळूवार मलमपट्टी केल्यासारखे तिचे ते शब्द. हसऱ्या चेहऱ्याने तो तिला भेटायला गेला. मैत्रिणीच्या घोळक्यात उभ्या असलेल्या तिने मात्र त्याला तोंडघशी पाडलं. तिला त्याच्याशी मैत्री करण्यात काडीचाही रस नाही हे सांगून ती थांबली नाही, त्याच्याबरोबर ऑनलाईन केलेल्या गप्पा म्हणजे ठरवून केलेली मजा होती हे सांगून ती खो खो हसायला लागली. तिच्या मैत्रिणी तिला साथ द्यायला विसरल्या नाहीत. त्या हसण्याने, त्यांच्या खिदळण्याने रायन शरमेने चूर झाला. घरी आल्यानंतर ऑनलाइन चॅटमध्ये त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या.
‘या मुलीमुळेच आत्महत्येचे विचार माझ्या मनात डोकवायला सुरुवात झाली आहे.’ त्याच दिवशी त्याने गळफास लावून आपलं जीवन संपविलं. रायनच्या आत्महत्येनंतर त्याच्या आई-वडिलांना त्याची निराशा, वैफल्य या गोष्टी किती टोकाला गेल्या होत्या ते त्याच्या ऑनलाइन अकाऊंटमुळे समजल्या. ही घटना आहे २००३ सालातील. आता तर सायबरबुलींगने कळस गाठला आहे. रायनचे बाबा मन मोठं करून सांगतात, ‘शेवटी आपण हे विसरून चालणार नाही की या मुलांची वयं कोवळी आहेत. त्यांच्या कृतीने काय होईल याची त्यांना पूर्वकल्पना असेल तर ही मुलं नक्की असं काही करणार नाहीत. मी माझ्या मुलाच्या मृत्यूला यातल्या कुठल्याही मुलाला जबाबदार धरत नाही. वैफल्यग्रस्तता हेच कारण मी मानतो. चिडवण्यातून आलेलं वैफल्य. खेद याचाच वाटतो की, ते समजून घ्यायला पालक म्हणून आम्ही असमर्थ ठरलो. पण अशी कितीतरी मुलं आहेत की त्यांना समजून घ्यायला हवं.’
चेझला आत्महत्या हा पर्याय पटत नाही. तेरा वर्षांचा हा मुलगाही भेदरलेला, चेहरा बावचळल्यासारखा. पटकन कुणी बावळट असा शिक्का मारून मोकळं होईल असा. प्रसारमाध्यमांसमोर त्याला कसं चिडवतात हे सागणं म्हणजे त्याने केलेलं मोठं धाडसच. चिडवण्याचा प्रकार तोच ‘गे’, ‘बावळट (लुझर)’ अशा हाका मारणं. आठवडय़ातून एकदा तरी असा प्रकार टोकाला पोचतो आणि त्याच्या आईला शाळेत जावं लागतं. यापुढे मी हे सहन करू शकत नाही हे त्याचं बोलणं त्याच्या आईच्या मनात अनामिक भीती निर्माण करतं. चेझ मात्र म्हणतो की आत्महत्येचा विचार मनात आला तरी त्यातून निष्पन्न काय होणार हा ही विचार डोकावतो. मी माझा जीव गमावून बसेनच पण माझे आई वडील, शाळा आणि मला चिडवणारी ती मुलं सर्वानाच त्याचा त्रास होईल याची जाणीव होते आणि मी स्वत:ला थांबवतो, अशा कार्यक्रमातून आपलं दु:ख व्यक्त करण्याचं स्पष्टीकरण चेझ देतो.
‘माझी अपेक्षा एवढीच आहे की, मला चिडवणाऱ्या मुलांनी हा कार्यक्रम बघितला तर कदाचित माझ्यावर होणारे परिणाम त्यांना जाणवतील. त्यांचं चिडवणं बंद होईल. माझ्यासारख्या अनेक मुलांची वेदना सर्वाना समजावी म्हणूनच मी हे सगळं जाहीरपणे सांगतोय.’
पण खरंच समजेल हे त्या मुलांना? मानसोपचारतज्ज्ञांच्या मते जी मुलं चिडवतात त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं कठीण आहे. कारण त्यांची मानसिकताच हे समजून घ्यायची नसते. कदाचित चेझचा त्रास आणखी वाढेल. चेझच्या हातात आहे ते दुर्लक्ष न करता ठामपणे त्या मुलांच्या चिडवण्याला प्रतिकार करणं, त्यांना थांबवणं. ते तो शिकतोय.
चेझला आत्महत्या हा पर्याय नाही, असं वाटलं तरी जहीमने नेमकं तेच केलं. अकरा वर्षाच्या जहीमला नवीन गावात आल्यावर मुलांनी सामावून तर घेतलं नाहीच. पण तू किळसवाणा आहेस, गे आहेस याचाच भडिमार केला. सुरुवातीला जहीम अतीव दु:खाने त्याला होणारा त्रास घरी सांगत असे. पण हळूहळू हे रोजचंच झालं आणि तो काही सांगेनासा झाला, त्या विषयावर विशेष बोलेनासाच झाला त्यामुळे आता तो रमला असावा असंच घरातल्यांना वाटलं. त्या दिवशीही तो घरी आला ते प्रगतीपुस्तक नाचवीत. त्याच्या आईने त्याचे गुण बघून कौतुकाने शाबासकी दिली. तोही खूश झाला. तेवढय़ात त्याच शाळेत जाणाऱ्या त्याच्या लहान बहिणीने काही मुलं त्याला ‘गे’ म्हणून चिडवीत होती त्याचा उल्लेख केला आणि जहीम अस्वस्थ झाला. आईने त्याला समजूत घालून खोलीत पाठवून दिलं. थोडा वेळ तो खोलीत खेळला की सर्व सुरळीत होत असे. काही वेळाने त्याच्याशी बोलण्यासाठी ती खोलीत गेली. समोरच्या दृश्याने तिला काय करावं तेही सुचेनासं झालं. पुढच्या गोष्टी तिने कशा पार पाडल्या त्या तिलाही आठवत नाहीत.
"दार उघडलं तर समोर होतं गळफास लावून घेतलेलं माझं बाळ." तिचं बाळ म्हणणं, त्याच्याबद्दल बोलताना तो अजूनही या जगात आहे, अशा पद्धतीनेच त्याचा उल्लेख करणं अंगावर काटा आणतं. भूतकाळात डोकावताना जहीमच्या आईला त्याची वैफल्यग्रस्त अवस्था लक्षात येते. शाळेत जायचं नाही, केस विंचरायचे नाहीत किंवा दातच घासायचे नाहीत, असं तो अचानक कधी कधी करायचा. जहीम असा विचित्र वागला की, त्याला बरं वाटत नसावं, असंच तिला वाटायचं. त्याला चिडवायचे ते घरात तो सांगायचाच. नंतर तो त्यावर बोलायचा नाही पण त्यामुळेच तसं काही आता घडत नसावं किंवा तो दुर्लक्ष करायला शिकला असावा, असंच तिला वाटत आलं. कदाचित यामुळेच तो ही पायरी गाठेल हे समजलं नसावं.
तज्ज्ञांच्या मते फार लहान वयात मुलांना जाहिराती, टीव्ही, चित्रपट अशा माध्यमांतून सेक्स, गे, लेसबियन असे निरनिराळे शब्द समजतात. बऱ्याचदा अर्थ न समजताही त्याचा वापर केला जातो. बहुतेक वेळा ‘पॉप्युलर’ मुलं चिडवण्यात आघाडीवर असतात आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या गटात घ्यावं म्हणून बाकीची मुलं त्यांना साथ देतात, अशा मुलांनी एखाद्याला चिडवायला सुरुवात केला की, बाकीची मुलं त्यात सामील होतात आणि जे मूल या क्रूर थट्टेला बळी पडतं ते अधिकच एकाकी बनतं.
१० वर्षाचं कोवळं वय. अभ्यास, खेळ, मित्र-मैत्रिणी यात रमणारं. पण हसतमुख कार्लला हा आनंद उपभोगता आला नाही. शाळेत गेलं की मुलं चिडवत. ‘गे’ या शब्दाचा धड अर्थही ना त्या चेष्टा करणाऱ्या मुलांना समजत होता, ना कार्लला. पण कुणी तरी असं म्हणालं की, बाकी सारे हसायला लागायचे. कार्लला त्यांच्या त्या हसण्याने रडायलाच यायचं. हे रोजचंच झालं. तसं त्याच्या आईने त्याला वर्गशिक्षिकेशी बोलायला भाग पाडलं. थोडे दिवस बरे गेले पण हळूहळू कार्ल कॅफेटेरियात जेवणाचा डबा खायलाही जायला धजावेना. शेवटचा उपाय म्हणून त्याची आई अधूनमधून त्याच्याबरोबर शाळेत जायला लागली. त्याच्याबरोबर गप्पा मारत डबा खायला तिलाही आवडत होतं. त्याच्या मनावरचं मळभ तेवढय़ापुरतं दूर झालेलं बघणं यातच ती समाधान मानून घेत होती.
त्या दिवशी कार्ल घरी आला तो अस्वस्थ, घाबरलेला, थोडासा चिडूनदेखील. त्याचं दप्तर चुकून शाळेतल्या टीव्ही स्टँडवर आपटलं. हललेल्या स्टँडचा धक्का एका मुलीला बसला. त्या मुलीने कार्लला जीवे मारण्याची धमकी दिली. आधीच इतर मुलं चिडवत होती. त्यात ही भर. कार्ल घरी आला तो दोन दिवस शाळेत न येण्याची शिक्षा (सस्पेन्ड) होईल या भीतीनेच. त्याच्या आईने त्याची समजूत घातली तसा तो खोलीत निघून गेला. कार्लच्या बाबतीत पुढे काय करता येईल या विचारात त्याची आई कामाला लागली. तासाभराने ती कार्लला जेवायला बोलावायला गेली. उद्या तीदेखील त्याच्याबरोबर शाळेत येईल हेही सांगायचं होतंच. कार्लसाठीच ती पालक-शिक्षक संघटनेची सभासद झाली होती. ती त्याला तिच्याबरोबर त्यांच्या मीटिंगला नेणार होती. त्यानंतर मुख्याध्यापकांशी बोलायचंही तिने ठरवलं होतं. त्याच्या खोलीचं लोटलेलं दार तिने अलगद उघडलं आणि तिचं उभं अंग थरथरायला लागलं. समोर होता वायरने गळफास लावलेला लोंबकळणाऱ्या स्थितीतला कार्ल. तिच्या जीवघेण्या किंचाळीने तिची पुतणी, मुलगी धावत आल्या. पुतणीने ९११ नंबर (तातडीच्या मदतीसाठी) फिरवला. मुलीने कात्रीने वायर कापली, पण तोपर्यंत सगळंच संपलं होतं.
"जे जे मला सुचलं ते ते मी कार्लसाठी करत होते. याव्यतिरिक्त आणखी मी काय करायला हवं होतं? हा प्रश्न मला अद्याप सोडविता आलेला नाही." आतल्या आत ती हुंदका जिरवते. त्याने आत्महत्या ठरवून केली असावी असं तिला वाटत नाही, पण ‘गे’, ‘बायल्या’ असं सातत्याने चिडवणारी मुलं हेच त्याच्या आत्महत्येचं कारण आहे यावर तिचा ठाम विश्वास आहे. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याचं अतिशय आवडतं खेळणं त्याने बहिणीला घ्यायला सांगितलं आहे. त्याने आपल्या लहान भावाला सांगितलं आहे की, माझ्यासारखा त्रास तुला होऊ नये म्हणून मी तुला शाळेत जपायचा प्रयत्न करत होतो. गळफास लावून घेत असल्याबद्दल क्षमेची याचनाही त्याने केली.
कुठून सुचतं हे या भाबडय़ा लहान जिवांना? आणि कसं समजतं इतक्या लहान वयात स्वत:चा जीव कसा घ्यायचा ते? या आत्महत्या आणि त्याची कारणं ऐकताना जीव भरून येतो. त्यांच्या आई- वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकतो.आत्महत्येचं टोक गाठणाऱ्या मुलांची वयं आणि ज्यांच्यामुळे ही मुलं हे टोक गाठतात त्या मुलांचा निष्ठूर क्रूरपणा पाहून हताश व्हायला होतं. या पिढीचीच काळजी वाटायला लागते. आपण या काळात जन्माला आलो नाही याचा आनंद मानायचा की आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करायची हे कोडं सोडविता येणं मुष्कील होऊन जातं.
हॅमिल्टन हायस्कूल! चार विद्यार्थ्यांनी एकामागोमाग एक चार महिन्यांच्या कालावधीत गळफास लावून आत्महत्या केलेली शाळा. माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘नो चाईल्ड लेफ्ट बिहाईंड’ कायद्यावर सही केली त्याच शाळेत घडलेल्या या प्रकाराबद्दल मुख्याध्यापकांना या मुलांच्या आत्महत्येला शाळा जबाबदार आहे असं वाटत नाही कारण शाळा शैक्षणिक प्रगती आणि मुलांची हजेरी यावर भर देतात. मुलांच्या भावनिक समस्या समजल्या नाहीत तर दूर कशा करणार? त्याची लक्षणं दाखविणारी काही तरी यंत्रणा हवी. बहुतांशी पालक नोकऱ्या करणारे असतात. संध्याकाळी दमून भागून परत आलेले पालक मनात असलं तरी मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, त्याचं मन जाणू शकत नाहीत हे कटू सत्य आहे. मुलाचं मन समजून घेणं ठरवलं तर शिक्षकांनाच सहज शक्य आहे असं सांगणार्या मुख्याध्यापकानी, चार तरुण गमावलेल्या या शाळेने मुलांच्या मनाचा तळ गाठायचा हे ध्येय ठेवलं आणि त्या दिशेने पावलं उचलली, एक नवीन प्रवास सुरू झाला. त्यातलं पहिलं पाऊल होतं मुलांच्या भावना जाणून घेणं. एक दिवस शाळेने सर्व विषयांच्या वर्गाना सुट्टी दिली ती मुलं भावनिकदृष्टय़ा किती सबळ आहेत याची शहानिशा करायलाच. शाळेत बरेच खेळ खेळले गेले. मुलांनी एकमेकांशी जमवून घ्यावं, समजून घ्यावं एवढीच अपेक्षा.
त्यातलाच एक खेळ- ‘तुम्हाला माझी खरी ओळख असेल तर..’
"...तर तुम्हाला कळेल की मी फार लहान असतानाच आईपासून माझी फारकत झाली आहे."
"... तर तुम्हाला कळेल की माझे वडील रोज दारू पिऊन घरी येतात. वडील म्हणजे काय हे मला कधी समजलंच नाही."
"... तर तुम्हाला कळेल की माझे आई-बाबा त्यांच्या करिअरमध्ये गुंतलेले आहेत की, त्यांना आम्हा भावंडांसाठी वेळच नाही. मला फार एकटं वाटतं. कुणाशी तरी हे सगळं बोलावंसं वाटतं.."
मुलं फार सहज मोकळी होत जातात. हातात हात, गळ्यात गळे घालून पटकन एकमेकांना समजून घेतात. हॅमिल्टन शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या खोलीच्या बाहेर निळ्या रंगानी हाताचे पंजे उमटविले आहेत. हेल्पिंग हँड! मुलांना गरज असेल तर ‘आम्ही आहोत’ हे सांगणारे पंजे. शाळेने एक प्रश्नावलीही मुलांसाठी केली आहे. सुरुवातीलाच त्याच्यावर लिहिलं आहे. स्वत:साठी किंवा तुम्हाला माहित असलेल्या इतर विद्यार्थ्यांसाठीही ही प्रश्नावली भरू शकता. तेही निनावी.
ही सुरुवात आहे ती या देशात आत्महत्येला प्रवृत्त होणाऱ्या तरुण मुलांना परावृत्त करण्याची. इथे गेल्या साठ वर्षांत तरुण मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण तिप्पट झालं आहे. दर आठवडय़ाला जवळजवळ २८ तरुण मुलं स्वत:चं जीवन संपवितात. निराशा, वैफल्यग्रस्तता हेच याचं मुख्य कारण आहे. मूळ शोधण्याचा प्रयत्न झाला नव्हता, पण आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरवर्षी सात ऑक्टोबरला ‘नॅशनल डिप्रेशन स्क्रीनिंग डे’ बऱ्याच शाळांमधून राबवितात. अशा वेळेस शाळांमधून मुलांना निराश, असहाय्य वाटतं का, आत्महत्येचे विचार मनात घोळतात का याचा अंदाज घेतला जातो. मुलांना दिलेल्या प्रश्नावलीच्या सुरुवातीलाच मदतीची गरज असेल तर फोन नंबर आणि संपर्कासाठी व्यक्तींची नावं दिलेली असतात. काही शाळांनी तर बदलत्या काळाची पावलं ओळखत बेवसाईट सुरू केली आहे. पालकांसाठी स्वतंत्र आणि मुलांसाठी वेगळी. इथे मुलं, पालक त्यांच्या समस्या, भावना व्यक्त करू शकतात. निनावी, हेतू एकच की शाळांना अशा मुलांना मदत करायची इच्छा असली तरी गवतातून सुई शोधण्याचाच तो प्रकार असतो. वेबसाइटमुळे सर्वच मुलांना मन मोकळं करायला एक जागा मिळते. अशा वेबसाईटवर तरुणांसाठी बऱ्याच विषयांची माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन चॅटने सल्लागारांपाशी गप्पा मारता येतात. स्टेपस्ला मिळालेल्या (STEPS Screening, Treatment and Education to Promote Strength) प्रतिसादातून नक्की याबाबत काय करता येईल याचा अंदाज येऊ लागला आहे. मुलांना आपल्याशा वाटणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर हे स्टेपस्चं यश आहे. सध्या फक्त न्यूयॉर्कच्या शाळांतून याचा वापर होत आहे, पण हळूहळू बाकी शाळाही अनुकरण करतील असा विश्वास स्टेपस्च्या निर्मात्यांना वाटतो. नुकताच काही राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात अॅन्टी बुलिईंगचा (यासाठी मराठी शब्द?) समावेश केला आहे. लव्ह अवर चिल्ड्रेन सारख्या संघटना यासंर्दभात कार्यरत आहेत.
तसंच http://www.google.com/alerts मध्ये जाऊन आपल्या मुलांची नाव घातल्यास ई मेलने त्या नावांबाबत दैनंदिन माहिती म्हण्जे मुलांनी काय केलं आहे किंवा त्याच्यांबाबतीत इतर कोणी काही पोस्ट केले आहे अशाप्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते.
मार्ग कुठलेही असले तरी अकाली स्वत:च्या भविष्याचाच अंत करणाऱ्या, संबंधित व्यक्तींच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या कोवळ्या जिवांना फुलायची संधी मिळते आहे याचंच तुमच्या आमच्या सारख्यांनी समाधान मानायचं. नाही का?
खुप अस्वस्थ, अंतर्मुख करायला
खुप अस्वस्थ, अंतर्मुख करायला लावणारा विषय, चांगला लेख आहे.
हे भयंकर आहे.मला वाचवलंच
हे भयंकर आहे.मला वाचवलंच नाही.
आम्ही सध्या सूपात.
पाल्याला या जगात जगायला कसं तयार करावं हे समजत नाही.
खरच खुप अस्वस्थ होतो वचुन
खरच खुप अस्वस्थ होतो वचुन आपन, हे इकडे पन पोहोचायला लागले अआहे.
बापरे. असे काहीतरी वाचले की
बापरे. असे काहीतरी वाचले की सुन्न व्हायला होते.
<<आपण या काळात जन्माला आलो
<<आपण या काळात जन्माला आलो नाही याचा आनंद मानायचा की आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करायची हे कोडं सोडविता येणं मुष्कील होऊन जातं.>> खरच
ईथे नुसत वाचताना ईतक अस्वस्थ होतय, ज्यांच्यावर असे प्रसंग ओढवले असतील त्यांचे काय होत असेल
ईथे नुसत वाचताना ईतक अस्वस्थ
ईथे नुसत वाचताना ईतक अस्वस्थ होतय, ज्यांच्यावर असे प्रसंग ओढवले असतील त्यांचे काय होत असेल >>> अगदी अगदी.
वत्सला <<<<लेकीला एक मुलगी
वत्सला <<<<लेकीला एक मुलगी ईंडीयन फुडवरुन चिडवते हे कालच तिच्या टीचरच्या कानावर घातले आहे.
खुप अस्वस्थता आली आहे सध्या! टीचर लक्ष ठेवुन असणार आहे.>>>>>माझ्या मुलाला झालेला
हा त्रास. थोडे दिवस मी त्याला भारतीय पदार्थ देणं बंद केलं. दुसरीत होता तेव्हा. तुमची मुलगी कितवीत आहे माहित नाही. पण पाचवीत गेल्यावर माझा मुलगा अभिमानाने न्यायला लागला भारतीय पदार्थ. कुणी चिडवलं तर म्हणायचा आधी खाऊन तर बघा.....
आर्क <<<<<इथे ज्या मुलांवर
आर्क <<<<<इथे ज्या मुलांवर अन्याय होतोय त्यांच्याबद्दल चर्चा होते पण ,जे अन्याय करताहेत अशा मुलांची आणि पर्यायाने त्यांच्या पालकाम्च्या जाबाबदारीबद्दल कुणीच बोलत नाही.>>>>> ह्ळुहळू तेही
व्हायला लागलं आहे. त्या मुलांच्या मानसिकतेची चिकित्सा करणारे लेख वाचनात आले होते. पण पालक काय करत असतात, किंवा त्यांना आपल्या मुलांची अशी कर्तबगारी केव्हा समजते, त्यानंतर ते काय करतात हे समाजायल हवं.
भयंकर आहे पण हे वास्तव आहे
भयंकर आहे पण हे वास्तव आहे आणी भारतात पोचलेले आहे.
मी गेली काही वर्षे निवासी शाळात शिकवतो आहे. ज्या गोष्टीबद्दल मी बर्याचवेळा लिहायचा विचार करुनही टाळले असा हा विषय. निवासी शाळात ठेवण्याचे कारण शिस्त संस्कार न राहता, पैसा आहे पण वेळ नाही, किंवा घरात जे चालले आहे ते मुलाने पाहू नये ही इच्छा हे झाले आहे. १० ते १५% मुले शाळेनेच अपॉईंट केलेल्या सायकॉलॉजिस्ट्कडे नियमितपणे जातात हा याच वास्तवाचा परिपाक आहे.
अशा वातावरणात शिक्षक म्हणून काम करताना सतत अत्यंत सजग राहणे आणि आपल्या नैतिकतेच्या फुटपट्ट्यांनी या मुलांची मोजणी न करणे ही पथ्ये मी तरी पाळतो.
आगाऊ- <<<<मी गेली काही वर्षे
आगाऊ- <<<<मी गेली काही वर्षे निवासी शाळात शिकवतो आहे. ज्या गोष्टीबद्दल मी बर्याचवेळा लिहायचा विचार करुनही टाळले असा हा विषय.>>>>>>
लिहा ना तुम्ही. काय परिस्थिती आहे हे कळलं की आपणही त्याला तोंड द्यायची तयारी करतो.
कालचाच प्रसंग - मुलीला पोहायला नेलं होतं. दुसरी मुलगी, तिची मैत्रीण तिला काहीतरी खेळणं
देत नव्ह्ती. तिच्या आईने, मी सांगितलं की थोडा वेळ दे, मग परत घे. उत्तर नाही. तिच्या आईने माझ्या मुलीला म्हटलं, तिला सांग मी खेळणार नाही मग तुझ्याबरोबर... नुकताच हा लेख लिहला त्यामुळे मनात येऊन गेलं ही
पण छोट्या प्रमाणावरची धमकीच की, आपणच अशी बीजं रुजवतो की काय?
काही प्रतिक्रिया वाचुन अजुनच
काही प्रतिक्रिया वाचुन अजुनच कसेतरी झालेय
खूप अस्वस्थ झाले या
खूप अस्वस्थ झाले या लेखाने...
इथे भारतातही अशा प्रकारच्या समस्या खूप वाढत आहेत. परवाच एक ११ वर्षाच्या मुलीची केस आली. तिच्या आर्थिक स्तरावरून तिच्या वर्गातला एक पॉप्युलर गट तिला चिडवत असतो. हिने बोलणंच बंद केलं. शाळेत कोणाशीच नाही बोलत. मोकळ्या वेळात ही चिमुरडी वाचनालयात एकटीच जाऊन बसते आणि खिडकीतून बाहेर बघत रहाते !!!
प्रत्येक शाळेत शालेय समूपदेशक असावा हे अजून आपल्याकडे पचतच नाही. मी ज्या शाळांमध्ये स्कूल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करते तिथे एवढं प्रचंड काम आहे ! पण शिक्षक त्यांचे तास बुडवून माझ्याकडे मुलांना येऊ द्यायला तयार नसतात. पालक आपल्या मुलाला काही समस्या आहेत हे मान्य करायला तयार नसतात. या सगळ्यात मुलं बिचारी घुसमटत रहातात...
मितान शाळेतल्या या आर्थिक
मितान शाळेतल्या या आर्थिक स्तराच्या फरकाबद्दल मलाही भिती वाटते नेहेमी. मुलांना बघावं तर महागड्या , ब्रँडेड वस्तु, फोन्स, गेमिंग डिव्हायसेस, आईबाबांच्या गाड्या , फॅशनेबल कपडे हे सगळं मिरवणे चालु असते काही ठिकाणी. ज्या पालकांना असे काही मुलांना इतक्यात द्यायचे नाही त्यांना दोन्ही कडून त्रास. दिले तरी नाही दिले तरी .
सावली <<<<<काही ठिकाणी. ज्या
सावली <<<<<काही ठिकाणी. ज्या पालकांना असे काही मुलांना इतक्यात द्यायचे नाही त्यांना दोन्ही कडून त्रास. दिले तरी नाही दिले तरी .>>>>
अगदी खरं, माझ्या मुलाला आम्ही हे काही जाणूनबूजून दिलं नव्ह्तं. त्यावेळेस त्याला बाकिच्यांकडून किती त्रास झाला माहित नाही पण अर्थातच तो कटकट करायच की सर्वांकडे आहे फक्त माझ्याकडेच नाही म्हणून, पण आता तो म्हणतो की म्हणूनच त्याला वाचनाची गोडी लागली. तो हायस्कूलमध्ये आहे आता आणी हल्लीच त्याला प्राथमिक साळेतला मुलगा म्हणाला, तुझ्याकडे हे असलं काहीच कसं नाही, मला तर तुझी दयाच येते. माझा मुलगा म्हणाला मला त्याचीच दया आली. तो किती गोष्टींना मुकतो आहे या उपकराणांमुळॅ. खूप बरं वाटलं तेव्हा, आम्ही केलं ते बरोबर करत होतो या भावनेने.
वा. मोहना छान खरच तुम्हाला
वा. मोहना छान
खरच तुम्हाला किती बरं वाटलं असेल हे ऐकुन आणि तुमचे संस्कार काम करताहेत हे बघुन.
सावली - हो ना. अगदी. मितान -
सावली - हो ना. अगदी.
मितान - <<<<<प्रत्येक शाळेत शालेय समूपदेशक असावा हे अजून आपल्याकडे पचतच नाही. मी ज्या शाळांमध्ये स्कूल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करते तिथे एवढं प्रचंड काम आहे >>>
आम्ही शाळॅअत असताना भाडंणं, चिडवणं होतं, वरच्या काही प्रतिक्रियाप्रमाणॅ काही काही मनात खोलवर्ब रूजून्ही राहिलेलं असतं पण इतक्या टोकाला गेलेलं नाही पाहिलं कधी. कदाचित परिस्थिती हाताळण्याच्या पद्धती निराळ्या असतील. आता सायकॉलॉजिस्टची गरज वाढू लागली आहे म्हणजे किती बदललं आहे सारं.
मोहना, अस्वस्थ वाटलं वाचून.
मोहना, अस्वस्थ वाटलं वाचून. असं जगात घडतं हे बातम्यांतून वगैरे कळतं, पण बरेचदा त्या निराळ्या जगातल्या गोष्टी वाटतात. आपल्याला नाही असलं काही होणार अशी एक वेडगळ समजूत घेऊन वावरत असतो आपण. आपलं बालपण आणि आपल्या मुलांचं बालपण यात अक्षरशः एका युगाचा फरक आहे. इन्टरनेटच्या प्रसारामुळे आणि प्रभावामुळे कुठल्याच गोष्टी कुंपणाबाहेरच्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्या मुलाशी सुसंवाद ही म्हटलं तर साधी आणि नैसर्गिक वाटणारी बाब किती जीवनावश्यक आहे हे लक्षात घेऊन पदोपदी सजग राहणं एवढंच हातात आहे आपल्या.
त्यामुळे आपल्या मुलाशी
त्यामुळे आपल्या मुलाशी सुसंवाद ही म्हटलं तर साधी आणि नैसर्गिक वाटणारी बाब किती जीवनावश्यक आहे हे लक्षात घेऊन पदोपदी सजग राहणं एवढंच हातात आहे आपल्या.>>> पूर्णपणे अनुमोदन. परवाच टॉक शोवर हा कार्यक्रम पाहिला. मुलांना सक्षम बनवणं, त्यांना विश्वासात घेणं महत्वाचं. तसंच बाकी मुलांबरोबर त्यांची तुलना न करणं, मुलांचं खुल्या दिलानं कौतुक करणं, आवश्यक तिथे रागावणं हेही महत्वाचं आहे. आपण जसे वाढलो -काका, काकू, आत्या, मावशी, आजी आजोबा, मामा मामी, सगळी भावंडं.. आपलं व्यतिमत्व घडवण्यात या लोकांचा फार मोठा हात होता हे आज जाणवतं. फक्त वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक साधनं मुलांना देऊन आपण चूक तर करत नाही आहोत ना असं वाटत रहातं.
स्वाती <<<<<<आपलं बालपण आणि
स्वाती <<<<<<आपलं बालपण आणि आपल्या मुलांचं बालपण यात अक्षरशः एका युगाचा फरक आहे. इन्टरनेटच्या प्रसारामुळे आणि प्रभावामुळे कुठल्याच गोष्टी कुंपणाबाहेरच्या राहिलेल्या नाहीत.>>>>>>>>> काय वाट लागली आहे ना सगळ्याची?वाईट याचंच वाटतं की या पिढीला आपण काय गमावलं हेच कळणार नाही कारण ते काय होतं तेच त्यांना माहित नाही.
मोहना, तुमचा लेख प्रचंड
मोहना,

तुमचा लेख प्रचंड अस्वस्थ करुन गेला. एक असहायताही जाणवली कि मुलांना जन्म देण, चांगले संस्कार देण, प्रेमाने वाढवण हे जरी केल तरी मुलांच नशीब आईवडिल नाही ठरवू शकत. त्यांना कशी बरोबरीची लोक भेटतील हे त्यांच्या हातात नाही. प्रत्येक क्षणाला तरी आईवडिल बरोबर असण शक्य नाही आणि प्रत्येक मुलाची या गोष्टींना हॅन्डल करायची क्षमता वेगळी. आई जरी डॉमिनन्ट पर्सनॅलिटीची असली तरी मुलगी असेलच अस नाही. तिला सांगुनही तस वागता येण अवघड आहे.
या मुलांना अस कुणाला चिडवुन, वाळीत टाकून काय मिळत देव जाणे. पण हे ट्रेट्स मोठ्यांमधेही सापडतात, अगदी शिकलेल्या, सुज्ञ म्हणवणार्या लोकांमधेही.
काय करु शकतो आपण. इथे तर अशी परिस्थीती आहे कि मोठ्यांनाच आपणही अस कुणाला अजाणतेपणी दुखवत नाही ना याच भान नसत तिथे या लहान मुलांना काय बोलणार.
जिथे नशीबावर कंट्रोल नाही तिथे इतकच म्हणावस वाटत, परमेश्वरा, असला काहीही त्रास असेल तर तो सगळा माझ्या वाट्याला दे. मी सगळ आनंदाने सहन करेल. एकवेळा नाही लाख वेळा. पण असल्या त्रासाची, दु:खाची झळ माझ्या पिलांना नको लागू देऊ.
मोहना, मिडीया, नेट हे प्रकार
मोहना, मिडीया, नेट हे प्रकार अति होताहेत असे नाही का वाटत. समलिंगी संबंध अनेक युगांपासून अस्तित्वात असतील, पण आज जे चाळीशीच्या पुढचे आहेत, त्यांना लहानपणी हे असे काही असते, याची कल्पनासुद्धा नव्हती. आता मूलांना नको त्या वयात ते कळतं आणि त्यामागची शारिरीक / मानसिक कारणे समजून घ्यायची त्यांची कुवतच नसते. जे काही दूष्यरुपात त्यांना दिसते ते इतके ओंगळवाणे असते, कि त्यांना चिडवण्यासाठी, एखाद्याला टार्गेट करण्यासाठी एक शब्द सापडतो इतकेच.
खरं आहे पण असं काही होत असेल
खरं आहे पण असं काही होत असेल तर आपण काळजीपोटी इकडून तिकडून तेच तेच विचारतो मुलांना त्यामुळे ती नकळतपणे अधिकच स्वत:च्या कोशात जातात. आधीच त्यांना लाजिरवाणं वाटत असतं त्यात पालकांना काळजी वाटू नये ही धडपड....असे बरेच मुद्दे एकत्रित होत असावेत असं वाटतं.
मोहना शी सहमत आहे. या विषयावर मुलांना १०व्या वर्षा नंतर बोलत ठेवणं हे मला फार मोठं च्यॅलेंज सहमत
समर्पण <<<<इथे तर अशी
समर्पण <<<<इथे तर अशी परिस्थीती आहे कि मोठ्यांनाच आपणही अस कुणाला अजाणतेपणी दुखवत नाही ना याच भान नसत तिथे या लहान मुलांना काय बोलणार.>>> अगदी खरं.
दिनेशदा - खरं आहे तुमचं म्हणणं. पण मिडीया, नेट प्रकारापासून मुलांना दूर कसं ठेवणार? आजकाल दुसरी तिसरीतल्या मुलांचं इ मेल अकांऊट असतं, कशासाठी? भारतीय पालक तर याबाबत अग्रेसर आहेत दुर्दवाने.
<<<<आता मूलांना नको त्या वयात ते कळतं आणि त्यामागची शारिरीक / मानसिक कारणे समजून घ्यायची त्यांची कुवतच नसते. जे काही दूष्यरुपात त्यांना दिसते ते इतके ओंगळवाणे असते, कि त्यांना चिडवण्यासाठी, एखाद्याला टार्गेट करण्यासाठी एक शब्द सापडतो इतकेच.>>>
मुलं जाहिराती, कार्यक्रम पाहून त्या त्या शब्दांचे अर्थ विचारता, काय सांगणार? आणि सांगायचा प्रयत्न केला तरी ते त्यांच्या आकलनापलिकडच. मग ती असं कुठेही वापरुन मोकळे होतात, परिणामांचा विचार न करता, जी मुलं त्याला बळी पडतात त्यांना तरी कितपत अर्थ समजतो? पण सगळे एकत्र येऊन काहीतरी म्हणतायत म्हणजे ते चिडवणं असं वाटत असावं त्यांना. असं असावं, पण ही पिढी इतकी पुढे गेली आहे की ह्या देखील आपल्याच भ्रामक समजुती असण्याची शक्यता आहे.
मोहना, माझी लेक सहा वर्षाची
मोहना, माझी लेक सहा वर्षाची आहे. मी सध्या तिला उपमा सोडुन ईतर भारतीय पदार्थ डब्यात देत नाहीये पण टीचरने सांगितले की तू ते देणं बंद करु नकोस, मी वर्गात या विषयावर पुन्हा बोलते.
नक्कीच अंतर्मुख करायला
नक्कीच अंतर्मुख करायला लावणारा लेख आहे. बर्यापैकी विश्वव्यापक आहे. भारतात काय किंवा अन्य देशात काय सुजाण पालक होण अवघड झालय.
पण त्याच वेळी एखादी त्या वासाची चाहती पण असते.
"I love Indian food, it is just yummy." अशी comment पण येते तेव्हा माझ्या मुलीला आपण एकटे नाही अस वाटत. शिक्षक समजावून सांगतात की प्रत्येक अन्नाला वास असतो. त्याची आपल्याला सवय नसते इ. इ. पण इतरांचा आदर करायला शिकवातात. आता लहानपणी ठीक आहे हे सगळ पण पुढे काय हा प्रश्न भेडसावतोच.
माझी लेक - वय ७ - फ्रेन्च अमेरिकन शाळेत जाते जिथे बर्याच देशातील मुले आहेत. म्हणून असेल कदाचित पण रेसिझ्म खूपच कमी आहे. जसा भारतीय accent असतो तसा चीनी, मेक्सिकन, किंवा अनेक प्रकारचा असु शकतो याची या मुलांना लहानपणी जाणीव असते. म्हणून बोलण्यावरून चिडवाचिडवी होत नाही. झालीच तर शिक्षक मधे पडून समजावतात. ते सुध्दा फ्रेन्च भाषिक आहेत त्यामुळे त्यांच ईन्ग्रजी accent युक्तच असत.
डब्यातील पदार्थांवरून कधी कधी ठिगणी पडू शकते - विशेषतः माक्रोवेव्ह मधे अन्न गरम करताना (आमटी-भात-तूप, उपमा, कोणताही हिंग, जिरे, हळद वाला पदार्थ) एखादी म्हणते, "ew, what's that smell!!"
गेल्याच वर्षी आमच्या
गेल्याच वर्षी आमच्या शेजारच्या गावातील मुलाने शाळेतील छळाला कंटाळुन आत्महत्या केली. या लेखामुळे पुन्हा एकदा खपली निघाली.
आमच्या स्कुल डिस्ट्रिक्ट मधे बुलिंग रोखण्यासाठी एलिमेंटरी स्कूल पासून हायस्कूल पर्यंत प्रोग्रॅम आहे. गेल्याच महिन्यात स्कुल बोर्डाने हायस्कूलसाठी गे-स्ट्रेट अलायन्सला मंजूरी दिली.
गावातील लोकं बर्यापैकी कॉन्झर्व्हेटिव आहेत. आपल्या कडे असलेल्या महागड्या गोष्टींचा दिमाख दाखवणे हे एकंदरीतच शिष्ठाचाराला धरुन नाही अशी शिकवण घरातूनच दिली जाते. शाळेत वेळोवेळी आयोजित केल्या जाणार्या फूड ड्राइव मुळे दुसर्याला मदत करणे महत्वाचे हे एलिमेंटरी स्कूल पासून ठसवले जाते. त्यामुळे आर्थिक स्तरावरुन चिडवणे होत नाही. आम्हाला परवडत नाही किंवा आम्हाला सरकारी मदत घ्यावी लागते असे मुले बिंधास्त सांगू शकतात. बरीच कुटुंब हौसेने परदेशी एक्सचेंज स्टुडंटचे तात्पुरते पालक होतात. पाकिस्तान पासुन ब्राझिल पर्यंत वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी येत असल्याने मुलांना त्यांच्यापेक्षा वेगळ्या संस्कृतेची ओळख होते. माझा मुलगा मिडलस्कुलपर्यंत बरेचदा भारतीय पदार्थ शाळेत न्यायचा. त्यावरुन कधी चिडवणे झाले नाही. बरेचदा मुलं पदार्थ चाखायला मागायची. आवडला तर पुढच्या आठवड्यात जास्त घेऊन यायला सांगायची. आता हायस्कूलमधे तो शाळेचेच जेवण जेवतो पण टिमसाठी आफ्टरस्कुल स्नॅक म्हणुन भारतीय खाऊचीच फर्माइश असते.
Pages