तुम्हे याद हो के न याद हो - १०

Submitted by बेफ़िकीर on 21 June, 2011 - 03:29

संतापाने थरथरत आपटे आपल्या पत्नीकडे पाहात होते. सकाळी उठल्या उठल्या त्यांनी जाहीर केले होते की अकरा वाजता गुरुवार पेठेत शिफ्ट व्हायचे आहे. आणि ते ऐकून रडवेला चेहरा करून निवेदिता सरळ कॉलेजलाच निघून गेली होती. शिफ्टिंगमध्ये मी काडीचा हातभार लावणार नाही हे तिने कृतीतून स्पष्ट केलेले होते. आणि आपटे मात्र युद्धपातळीवर पहिल्याच आठवड्यात ही जागा सोडायच्या मागे लागलेले होते.

एक आठवडा! फक्त एक आठवडा! काय होऊ शकते एका आठवड्यात? प्रेम जमू शकते? हिंदी चित्रपटासारखे??

शक्य आहे. आवडणे हा प्रकार आकर्षणातूनच निर्माण होत असला तरीही त्या त्या क्षणापुरता आणि परिस्थितीपुरता तो प्रामाणिकच असतो. काळ हे त्यावर औषध असते म्हणा! पण प्रेमाची एक अशीही पातळी येऊ शकते की विवाहाला चाळीस वर्षे झालेली आहेत, आता मुलाबाळांचीही लग्ने झालेली आहेत आणि नातवंडे खेळत आहेत, अशाही परिस्थितीत एखाद्या क्षणी, एखाद्या गोष्टीमुळे एक अंधुक आठवण मनाला चटकन स्पर्शून जाते. आणि मग व्यथित मनाने काही क्षण तो सगळा काळ पुन्हा आठवावा लागतो. त्याहीवेळेस आजूबाजूला घरातील नेहमीचे आनंदी वातावरण असतेच! पण आपण मात्र पोचलेलो असतो पार पार आपल्या तरुणाईत! जेव्हा ती नजरानजर झालेली होती, एका क्षणाच्या दर्शनासाठी कित्येक तास खोळंबण्याची सवय लागलेली असायची. एका स्मितहास्यावर एकेक आठवडा पार होऊ शकायचा. नुसत्या लांबून बघण्याने हृदयाचे ठोके वाढायचे. एक अक्षरही न बोलताही फक्त एकमेकांसाठीच वागले जायचे. सर्वत्र भिरभिरणारी नजर एकमेकांच्या डोळ्यांमध्ये स्थिरावली की दिवसाचे सार्थक झाल्यासारखे वाटायचे.

या पातळीला निवेदिता आणि उमेश अर्थातच पोचलेले नव्हते. खरे तर सिंहगडावरील रम्य निसर्ग आजूबाजूला शिंपडला गेलेला पाहून एकमेकांच्या नवथर, उत्सूक आणि अपरिचित आलिंगनात विसावताना आणि असहाय्य झाल्याप्रमाणे एकमेकांच्या ओठांना ओठांनी स्पर्शताना कोणतेही अक्षर न उच्चारता शपथा घेतल्या गेलेल्याच होत्या. आज तरुण झालेल्यांना कदाचित चुंबनाचे काही वाटत नसेलही! पण निवेदिता आणि उमेश अशा काळात होते जेव्हा फक्त दोघांनी बाहेर फिरायला जाणे हेही वादग्रस्तच ठरले असते.

आणि आपटेंनी जाहीर केले तरीही निवेदिताची आई ढिम्म हालत नव्हती. आपटेंच्या हे लक्षात आले तेव्हा ते संतापाने बायकोकडे बघत राहिले.

"हालत का नाहीयेस?? निघायचंय आत्ता... टेम्पो येणार आहे"

"किती जागा बदलणार?"

"म्हणजे??"

"एक मिनिट इथे बसा... मला बोलायचंय..."

फार कमी वेळा निवेदिताच्या आईचा चेहरा असा व्हायचा. आपटेंनाही काहीतरी वेगळेपणा जाणवला. पोलिसखात्यात असले तरी ते एक गृहस्थ होतेच! घरातील समस्या किंवा योजना यावरील चर्चेत पत्नीचा सहभाग असणारच व तेही एका तरुण मुलीची आई असलेल्या पत्नीचा तर असणारच असणार हे त्यांना माहीत होते, मान्यही होते.

"काय झालं? अशी का बसलीयस?"

नितुची आई त्यांच्याकडे बघत म्हणाली...

"आपलं लग्न झालं त्या आधी तुमच्याकडचे मला बघायला आले होते. पसंती झाल्यावर तिथल्यातिथेच बैठकही झाली. त्या वेळेस आपल्या दोघांना एकमेकांना फार तर अर्धा मिनिट बघता आलं असेल. सर्व मते आणि निर्णय तुमच्या आमच्या घरच्या मोठ्या माणसांचे होते. देणंघेणं, मानपान सगळं तिथल्यातिथेच ठरलं! आठवतंय ना? तुमच्या काकांनी मधेच मुद्दा ताणून धरला. बारा हजार पाहिजेत! कसले बारा हजार? तर म्हणे आमचा मुलगा शिकलेला आहे, कदाचित पोलिस खात्यात नोकरी पक्की होईल! आता इतके चांगले घर तुमच्या मुलीला मिळणार म्हंटल्यावर त्यांच्या संसारासाठी काही उपयोगी वस्तू वगैरे घ्यायला मुलीकडच्यांनीही हातभार नको का लावायला! "

"हे सगळं ... आज का काढतीयस?? "

"ऐका... सगळ्यांनाच सगळं सोपं वाटत असतं! कारण त्यात स्वतःचं काहीच जाणार नसतं! तुमच्या काकांबद्दल तुमच्या आईवडिलांना आदर वाटू लागला होता. कारण त्यांची हिम्मत नव्हती मुलीकडच्यांकडून काहीही मागण्याची! पण काकांना सोबत आणल्यामुळे आपोआप परस्परं तेरंभारे काम झालेले होते. माझे आई, वडील आणि आमचे काका वगैरे सगळे गंभीर होऊन बसले होते. मुलाला मुलगी पसंत होती इतकेच! मुलीला मुलगा पसंत आहे का नाही हे विचारलेले नव्हते. मला अर्थातच तुम्ही पसंत होतातच! पण विचारण्याची गरज वाटलीच नव्हती. चर्चा बारा हजारांवर ठप्प झालेली होती. आमच्याकडचे एकमेकांकडे बघत होते. मी आणि माझी मैत्रीण आतमध्ये निश्चल बसलेलो होतो. तुम्ही स्वतःही एक शब्द न बोलता काय होते त्याकडे उत्सुकतेने बघत होतात असे मला मैत्रीण म्हणाली. इतकेच काय, तर तुमच्या आईंच्या बोलण्यातून तर हेही जाणवल्याचे म्हणाली की त्यांना पैसे नसते मिळाले तरीही मुलगी हवी असावीच! पण हे सगळं ती मला नंतर म्हणाली. त्या क्षणी माझी परिस्थिती कशी होती माहितीय तुम्हाला? माझ्या मनस्थितीचा अंदाज फक्त माझ्या आईला एकटीलाच होता. मला मी एक वस्तू वाटत होते. अशी नकोशी वस्तू, की जी या घरातून त्या घरात पाठवायची असेल आणि जन्मभर तिकडेच ठेवायची असेल तर त्याचे पैसे मोजावे लागतात. मान खाली घालून बाबा बसलेले होते. माझे काका आणि आत्याचे यजमान तुमच्या काकांशी घासाघीस करत होते. जणू जनावरांचा बाजारच! आईचा चेहरा पडलेला होता. सकाळपासून मला नटवण्यासाठी आणि घर आवरण्यासाठी ती राबत होती. मला बघायला आलेले दुसरेच स्थळ! पहिल्या स्थळाला मीच नकार दिलेला होता. आणि तेवढ्याच गोष्टीवरून आईला वटू लागले होते की ही कदाचित माहेर सोडायचे नाही म्हणून शक्य तितक्या स्थळांना नकारच देईल! म्हणून बिचारी मला अखंड सल्ले देत होती. मी हासण्यावारी नेत होते सगळे बोलणे! पण तुम्ही मला बघायला आलात आणि एकदा वाड्यातून आत येताना आणि एकदा तुमच्या हातात चहाचा कप देताना इतकेच मी तुम्हाला पाहिले आणि मला असे वाटले की हा मुलगा आपल्याला पसंत आहे. अर्थातच त्या जमान्यात मुलाच्या पसंतीला पहिले महत्व! ती पसंतीही उरकल्यानंतर अगदी मुहुर्तापर्यंत बोलणी आली तेव्हा तुमच्या काकांनी हा हुंड्याचा विषय काढून पराक्रम गाजवला. मला तर वाटत होते की सरळ बाहेर येऊन ओरडावे आणि म्हणावे की मला हे स्थळ पसंत नाही. पण मला आठवले आईने माझ्यासाठी केलेले अखंड प्रयत्न! तिच्या मनात माझे लग्न ताबडतोब ठरावे अशी भावना होती. बाबांचेही तेच मत होते. मला त्यांच्या मनातील विचारांची जाणीव झाली. वाटले, कदाचित एक पुरुष म्हणून तुम्ही उठुन बोलाल मोठ्यांच्यामधे! म्हणाल, की मला मुलगी पसंत आहे, ही हुंड्याची चर्चा आत्ताच्या आत्ता थांबवा! पण तुम्ही तसे काही केलेच नाहीत. तरीही मला वाटले, की कदाचित तुमच्या मनात असेल की बोलावे, पण मोठी माणसे आहेत म्हणून बोलत नसाल. तसे असल्यास तर मला अधिकच पसंत होतात तुम्ही! कारण तुमच्याबरोबर एकदा संसार सुरू झाला की मग आपलेच राज्य येण्याची शक्यता होती. पण तुम्ही तसे काहीही बोलला नाहीत. अर्धा तास! तब्बल अर्धा तास खंड पडलेला होता चर्चेत! कुणी उठून जातही नव्हते आणि बसून धड बोलतही नव्हते. जो तो आपापली बाजू कसोशीने मांडत होता.."

"एक मिनिट... एक मिनिट... आत्ता या सगळ्याचा संबंध काय आहे??"

" तुम्हाला आज माझे संपूर्ण बोलणे ऐकावे लागेल.. आमचा मुलगा किती रुबाबदार, देखणा, शिकलेला आणि कर्तबगार आहे हे तुमचे काका ठासून सांगत होते तर आमची मुलगी कशी गाय आहे, कशी चारचौघांच्या घरात मिळून मिसळून वागेल आणि कशी गुणाची आहे हे आमच्या आत्याचे मिस्टर सांगत होते. आपण दोघेही विकले जात होतो. लिलाव मांडला जात होता आपला! बारा हजार आम्हाला परवडण्यासारखे नव्हतेच! पाठीवर अजून दोन बहिणी होत्या माझ्या! एक लहान भाऊ, त्याचे शिक्षण! आणि बाबा तर दोन वर्षांनी निवृत्त होणार होते. हा बारा हजाराचा मुद्दा आता फारच ताणला जात होता. तो ताण असह्य होत असूनही माझे आई बाबा मुलाकडच्यांचा आदर ठेवून तिथेच बसून होते. एक वेळ तर अशी आली, हे मला आईने नंतर सांगीतले, की तिला त्या क्षणी वाटले की हे लग्न मोडून तुमच्याकडच्यांनीच निघून जावे. पण तिच्या तोंडातून एक शब्दही उलटा आला नाही. मला तर आतमध्ये धरणीने दुभंगून आपल्याला आत घ्यावे असेच वाटू लागले होते. शेवटी तुमचे काका बारावरून अकरा हजारांवर आले. का तर अजून तुमची नोकरी कन्फर्म्ड नव्हती हे आमच्याकडच्यांनी नम्रपणे पण ठासून अनेक वेळा सांगीतल्यावर पटले म्हणून! आणि आम्हाला तर अकरा हजारही परवडत नव्हते.

इतके सगळे चांगले ठरलेले असताना हा मुद्दा अचानक निघाला आणि सगळ्यांची तोंडेच काळवंडली. शेवटी माझे काका, आत्याचे मिस्टर आणि बाबा या तिघांनी मिळून एकमेकांत चर्चा केली आणि सर्वांनी मिळून दहा हजार उभे करण्याचे ठरवले व तसे आश्वासन तुमच्याकडच्यांना दिले. अजून एक हजार कमी झाले याचे स्पष्ट दु:ख चेहर्‍यावर वागवत आणि जणू मुलगी घेऊन जातायत म्हणजे उपकारच करतायत असा चेहरा करत सगळे ठरवून तुमच्याकडचे निघून गेले.

लग्नातही त्याच काकांनी तमाशा केला! मानपानावरून! भेटीगाठींमध्ये ते तुमच्या बाबांचे मोठे भाऊ असूनही आमच्या बाबांच्या लहान भावाशी भेट घालून दिली म्हणून! आता व्याही व्याही भेटणार म्हंटल्यावर भाऊ भाऊच भेटणार ना? पण तुमच्याकडच्यांचे काकांसमोर कधीच चालले नाही. आणि पाच वर्षांपुर्वी याच काकांच्या आजारपणात मी राब राब राबले आणि शेवटी मरताना त्यांच्या तोंडातून वाक्य आले. की जयश्री मी तुझ्याबाबतीत खूप खूप चुकलो, मला माफ कर!

मला एक सांगा... त्यांचे हे वाक्य ऐकणे आणि त्यात सर्व काही श्रेय एकदाचे मिळाल्याची भावना स्वतःच स्वतःच्या मनात तयार करून घेऊन त्याबाबत आनंद मानणे... इतकेच माझे आयुष्य??? इतकेच माझे कर्तव्य? माझ्या अस्तित्वाला इतकेच महत्व? की एका घरातील एक पसंत पडलेली मुलगी घरी आणली. आणताना तिला आणि तिच्याकडच्यांना प्रचंड मनस्ताप दिला. आल्यानंतरही ती घरात कधीही स्वतःचे अस्तित्व वेगळे जपू शकली नाही. आणि फक्त मरताना तिला आशीर्वाद दिला? तिने एका मुलीला जन्म दिला, स्वतःचा संसार सांभाळतानाच घरातील इतरांनाही सांभाळले. याला काहीही अर्थ नाही? तुम्ही शिकलेला होतात तशी मी शिकलेली नव्हते ? तुम्ही आयुष्यभर नोकरी करून नवरेगिरी करू शकलात तसा मी संसार सांभाळल्याबद्दल कधी आराम करू शकले? लग्नानंतरच्या पहिल्या पाच वर्षात तर एकत्र कुटुंब असल्यामुळे मला जे करावे लागले ते केल्याबद्दल तुमच्याकडच्यांनी कधी बारा हजार दिले आम्हाला? माझ्या दोन्ही बहिणींच्या लग्नात तुमच्याकडचे काही ना काही कारणांवरून मानपानावरून टोमणे मारत होते तेव्हा तुमच्याकडच्या एकालाही लाज वाटली नाही?

तेव्हाच्या काळात स्त्री म्हणजे एक बाहुली होती सासरच्यांच्या हातातली! दोन वेण्या घातल्या तर कुजबूजच काय पण टोमणे मारले जायचे बिनदिक्कत! तुम्हीच त्या कुठल्या पिक्चरला मला घेऊन गेला होतात त्यावरून रामायण झालेले होते. आणि त्या पिक्चरमधल्या हिरॉईनसारखे फुग्याच्या बाह्यांचे ब्लाऊज घालायला मला तुम्ही सुचवलेले होतेत. त्यावरून महाभारत! नुसते सुचवलेत म्हणून! कधी चुकून वेणी आणलीत तर शिव्या बसायच्या.

स्त्रीचे हे अस्तित्व तुमच्या पोलिसखात्याला मान्य कसे होते? माणूस म्हणून वागवायला हवे ना? तुमच्या बायकोने तुमच्या बरोबर पिक्चरला यावे असे तुम्हाला वाटते ना? मग त्यानंतर बसणार्‍या शिव्यांपैकी अर्ध्या तुम्हीही का खात नाही? का धीराने म्हणाला नाहीत की अगं मीच तिला घेऊन गेलो होतो?

आज वेगळे जग आलेले आहे. आज मुली कॉलेजला शिकतात. पंजाबी ड्रेस घालून रस्त्यावर जातात. फॅशन करतात. मुलांबरोबर वर्गात बसतात. मुलांशी गप्पा मारतात, हासतात. तुम्हाला माहितीय? हे आत्ताचे जग पाहून माझ्यातल्या त्या पुर्वीच गाडल्या गेलेल्या तरुण जयश्रीला मनातून हेवा वाटतो हेवा! पण आपलीच मुले असतात. त्यांचा आनंद हाच आपला आनंद असतो. नाहीतर मग त्यांना जन्माला कशाला घालायचे?

काय केले निवेदिताने? तर त्याच्याबरोबर सिंहगडला गेली. या वयात! कुठले वय? तर एकोणीस! आणि आपले लग्न झाले तेव्हा मी किती वर्षांची होते? सतरा! म्हणजे माझ्यापेक्षा दोन वर्षे मोठी असतानाही नितूचे लग्न झालेलेच काय, तर अजून आपण ठरवायचेही मनावर घेतलेले नाही. सतरा वर्षाच्या मुलीचे लग्न होताना तिला सगळे समजत नसले तरीही स्त्रीसुलभ भावना जागृत झालेल्या असतातच! मग एकोणीस वर्षाच्या, तेही आजच्या जगात वाढलेल्या मुलीला काय समजत असेल, नसेल हे तिच्या आईपेक्षा कोण अधिक जाणेल?

आणि जेव्हा आपण तिच्या लग्नाचे मनावर घेऊ, म्हणजे साधारण दोन वर्षांनी, तेव्हा आपण कशा प्रकारचे स्थळ बघू तिच्यासाठी? तर चांगला शिकलेला, चांगल्या घरातला, आर्थिक परिसस्थिती व्यवस्थित असलेला, हुंडा न मागणारा, घरात फार जबाबदारी नसलेला, दिसायला ठीकठाक आणि नितूला शोभेलसा, तिला पसंत पडलेला, आपल्याच जातीतला, चारचौघांकडे चौकशी केल्यानंतर चांगुलपणाचे सर्टिफिकेट मिळालेल्या घरातला आणि निर्व्यसनी! हेच सगळे ना?

मग...... हेच सगळे असलेला मुलगा............ आत्ताच नजरेत असला..... तर ????????????"

आजवर आपटे सलग दहा मिनिटे एकाच जागी जमीनीकडे पाहात कधीही बसलेले नव्हते. आज बसले. विचारांच्या लाटा मेंदूला धडकून मेंदूवरील जुनाट विचारांच्या रेतीला उध्वस्त करून परत जात होत्या. त्या भग्न झालेल्या रेतीच्या किल्यांचे अवशेष समुद्रात वाहून जात होते आणि स्वच्छ झालेल्या काठावर नव्या जमान्याच्या तत्वांची लखलखीत रेती आकार घेत होती.

पोलिस सारख्या रुक्ष खात्यात वर्षानुवर्षे नोकरी करून मनावर चढलेली मग्रूरीची, शिस्तीची आणि हुकुमशाहीची पुटे पत्नीने आयुष्यात पहिल्यांदाच केलेल्या पाणउतार्‍याने निघालेली होती खरवडून! राईलकरांचे घर आता सर्वच बाबींमध्ये आपल्यापेक्षा सरस असल्याचे जाणवत होते. नितूचे लग्न तेथे झाले तर खरे तर काहीही प्रॉब्लेमच नाहीये हे लक्षात येत होते. उमेशबरोबर सिंहगडावर एकट्याने जाणे ही भावना केवळ तारुण्यसुलभ असू शकेल आणि त्यामागे बदलत्या जगाची बदललेली तत्वे असतील हा दृष्टिकोन पत्नीने आयुष्यभर साथ देताना सहन केलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या उल्लेखामुळे मिळाला होता याचे वैषम्यही डोळ्यांमध्ये दिसत होतेच!

पण तरीही दुराभिमान तसाच राहिलेला होता. बोलण्याच्या ओघात पत्नीने सगळाच इतिहास काढला होता, आपल्याकडच्यांचे उल्लेख करताना टीका केलेली होती हा संतापही होता.

द्विधा मनस्थितीत असतानाच टेम्पोवाला आला. हा टेम्पोवाला दोन तास आधीच कसा काय आला या विचारात आपटे त्याच्याकडे बघत असतानाच....

निवेदिताच्या आईने त्याला शांत स्वरात... पण अत्यंत ठामपणे सांगीतले...

"आमचं जाणं रद्द झालंय"

अत्यंत अचंबीत नजरेने टेम्पोवाला आपटे साहेबांकडे बघत असतानाच आपटे आपल्या पत्नीकडे तशाच अचंब्याने बघत होते. टेम्पोवाल्याला बरेचसे पॅक केलेले सामानही दिसत होते. हे शिफ्टिंग रद्द कसे काय झाले हे त्याला समजत नव्हते.

त्यातच नितूची आई आपटेंना डायरेक्ट म्हणाली...

"आज संध्याकाळी राईलकरांना भेटून सॉरी म्हणा.... आणि... पुढचं... सुतोवाचही... करून ठेवा.... असं स्थळ मिळत नाही... "

'ही बया काय बोलतीय' असा चेहरा करून आपटे बघत बसलेले होते.

टेम्पोवाल्याला स्वतःचाच प्रॉब्लेम होता.

"साहेब जायचं नाहीये का?"

आपटेंनी त्याच्याकडे बघून मग खिडकीबाहेर पाहिले.

आपल्या स्वतःच्या घरापेक्षाही दोन मोठ्या खोल्या, व्यवस्थित राहणी, चांगली आर्थिक परिस्थिती! पण आपली मुलगी तर नक्षत्राहून सुंदर आहे. तिला यापेक्षाही चांगले स्थळ नाही का मिळणार?

मात्र टेम्पोवाल्याला नितूच्या आईने आता निक्षून सांगीतले..

"मी सांगतीय ना? नाही जायचंय म्हणून?? पुन्हा त्यांना काय विचारतोयस?? "

तो स्वर ऐकून टेम्पोवाला सटकला. बाहेर जाताना त्याला एक मोठीच शिकवण मिळालेली होती.

'माणूस खात्यात काम करताना वाघ का असेना, घरात बायकोपुढे शेळीच असतो'

आपटे गपचूप बसलेले होते.

काही वेळाने ते उठले आणि हळूहळू चालत चालत राईलकरांच्या दारात गेले. आता नवीन नाटक होणार या भीतीने नितूची आईदेखील मागोमाग गेली. वाड्यातील पब्लिक पुन्हा स्तब्धपणे पाहू लागले.

उमेशच्या घरात फक्त त्याची आई आणि आजोबाच होते.

आजोबांना पाहून आपटे पुन्हा काहीसे चरकले. ते खरे तर सॉरी म्हणायला गेलेले होते. पण समोर नेमका तोच म्हातारा पाहून त्यांना कळेना आता काय करावे?

आजोबा नुकताच चहा पीत बसलेले होते. त्यांचे लक्ष आपटेंकडे गेले.

"अगं अरुणा? चहा टाक गं??"

उम्याची आई भडकून मागे वळली आणि म्हणाली...

"अहो काय चाललंय काय बाबा? अजून आत्ताचा चहा पिऊन होतोय ना तुमचा?"

आणि आजोबांनी टाकलेले पुढचे वाक्य ऐकून उम्याची आई, नितूची आई आणि आपटे एकमेकांकडे खिळल्यासारखे बघतच बसले. आजोबा मात्र ते वाक्य टाकून शांतपणे पेपर वाचू लागलेले होते.

"अगं मुलीचे आई वडील आलेत... व्याह्यांना चहा तरी विचारशील की नाही????"

गुलमोहर: 

कहानी मे ट्विस्ट................................... छान आहे

जरा लवकर लवकर टाका भाउ राव

आज वेगळे जग आलेले आहे. आज मुली कॉलेजला शिकतात. पंजाबी ड्रेस घालून रस्त्यावर जातात. फॅशन करतात. मुलांबरोबर वर्गात बसतात. मुलांशी गप्पा मारतात, हासतात. तुम्हाला माहितीय? हे आत्ताचे जग पाहून माझ्यातल्या त्या पुर्वीच गाडल्या गेलेल्या तरुण जयश्रीला मनातून हेवा वाटतो हेवा! >> अगदी अगदी!

अगं मुलीचे आई वडील आलेत... व्याह्यांना चहा तरी विचारशील की नाही????" >> Rofl

आज्जोब्बा इझ ग्रेट... Happy

अप्रतिमच. नितुच्या आईचे विचार आवडले. खुप समजुतदार आणी छान. आजच्या काळात पण अश्या खुप स्त्रीया पहाते की ज्यांचे रोजचे आयुष्य असे असते.

अरेच्चा.....
सगळं जमुन आलं डायरे़क्ट ???????
सगळा संघर्षच संपला कि, पोरीचा बाप पाघळला म्हणजे.

आता पुढे काय ?????

नविन भाग कधी येणार..........
लवकर लवकर.............. टायपाना......