तीन दिवसाची हिरोशिमा ट्रीप. त्यातला एक दिवस पूर्ण मियाजीमाला जायचे असे ठरवूनच गेलो होतो.
मियाजीमा म्हणजे म्हणे देवाचे बेट.इथले इत्सुकुशिमा नावाचे देऊळ फार प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षापासून हे बेट पवित्र बेट म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्य लोकांना या बेटावर येण्यासही बंदी होती.केवळ भिक्षु आणि साधू यांनाच या बेटावर प्रवेश होता. या बेटाचे पावित्र्य जपण्यासाठी या बेटावर म्हणे मृत्यू आणि जन्म दोन्ही गोष्टींना मनाई होती आणि आहे. अजूनही प्रेग्नंट स्त्रिया आणि अतिशय म्हातारी किंवा खूप आजारी माणसे बेटावरून हिरोशिमाच्या मुख्य भागाकडे जातात अशी माहिती गुगल सांगते.या बेटावर स्मशानही नाहीये. मृत्यू आणि जन्म अपवित्र का आणि चुकून एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय हे मात्र अनुत्तरीत आहे.
इथल्या जंगलातली झाडे तोडायलाही पूर्ण बंदी होती. ती बंदी अजूनही आहे कि नाही हे माहीत नाही. पण नसावी कारण त्याशिवाय रस्ते, दुकाने हे झालेच नसते. बेटावर हरणे भरपूर आहेत. त्याशिवाय आम्हाला एक कोल्ह्यासारखा दिसणारा प्राणी दिसला पण नक्की ओळखता आला नाही.इथले जंगल अजूनही दुर्गम आणि अतिशय सुंदर शांत आहे.
बहुतेक जपानी देवळांच्या दरवाज्याच्या समोर एक उंच लाकडी किंवा दगडी गेट सारखे वाटणारे खांब असतात. बहुतेक वेळा केशरी रंगात रंगवलेले हे खांब बघितले कि मला देवळासमोर तोरणं लावलेली आहेत असेच वाटते. या खांबाचा अर्थ भौतिक जगातून पवित्र जगात जाणारा रस्ता असा काहीसा होतो असे ऐकले आहे. या गेटला जपानीमध्ये तोरीइ म्हणतात.
तर या इत्सुकुशिमा मधली ओ तोरीइ खूप मोठ्ठी आहे आणि ही समुद्रात आहे.ओहोटीच्या वेळेत या ओ तोरीइ पर्यंत चालत जाता येते. मात्र भरतीच्या वेळेस ही समुद्रात तरंगत असल्यासारखी दिसते. पूर्वी बेटावर येणाऱ्या लोकांना या तोरीइ मधून बोट घेऊन यावे लागे. हे मंदिरही एखाद्या बंदराप्रमाणे आहे. बोट घेऊन आल्यावर उतरायला धक्का सुद्धा आहे. भरतीचे पाणी ओ तोरीइ पार करून पार इत्सुकुशिमाच्या देवळाच्या खालपर्यंत पोचते. त्यावेळी हे सम्पूर्ण देऊळ पाण्यावर उभे असल्यासारखे दिसते. भौतिकाकडून आधी भौतीकाकडे असा प्रवास दाखवण्यासाठीच हे देऊळ जमिनीपासून दूर पाण्यावर असल्याप्रमाणे बांधले आहे असे म्हणतात.
युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नोंदलेले देऊळ आणि ओ तोरीइ दोन्ही लाकडी आहेत. ओ तोरीइ camphor (म्हणजेच कापूर का?)च्या लाकडापासून बनवली आहे. त्याशिवाय या ओ तोरीइचे वैशिष्ठ असे म्हणतात कि ती जमिनीमध्ये गाडलेली नाही. ती नुसती समुद्राच्या वाळूवर ठेवलेली आहे. रुंद तळ असल्याने स्वत:चा भार तोलत ती शेकडो वर्षे उभी आहे. समुद्राच्या भरती ओहोटीचा तिच्यावर काही परिणाम होत नाही.
या ठिकाणी भेट द्यायचे बरेच दिवसापासून मनात होते. आम्ही बोटीमधून आलो तेव्हा ओहोटी होती आणि ओ तोरीइ च्या जवळ लोकही दिसत होते. पण बोटीतून उतरून तिथे जाई पर्यंत भरतीचे पाणी चढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे ओ तोरीइला हात लावता आला नाहीच. अक्षरश्: सेकंदा सेकंदाला पाणी पुढे येत होते. इथे यायचे म्हणून मी मुद्दाम गमबुट घालून आले होते. त्यामुळे थोड्याफार पाण्यात उभे राहून फोटो काढता आले. पण फार वेळ उभे रहाण्यात अर्थ नव्हता.अगदी आत्ता वाळू दिसत असलेला भाग क्षणात घोटाभर पाण्यात बुडून जात होता. आजचा बहुतेक वेळ अगदी पावसाळी हवा आणि आकाश भरून आलं होतं. असलं आकाश असलं कि फार खराब फोटो येतात. पण नशिबाने थोडीशी साथ दिली आणि काही मिनिटे तरी निळ्या आकाशाचा एक तुकडा दिसला.त्या निळ्या तुकड्यांबरोबर ढगाळ हवे मुळे एक वेगळाच कुंद असा परिणाम मिळत होता.
पाणी नुकतेच चढत असताना या दगडावरून सहज जाता येत होते. आम्ही इथून दोन चार मिनिटात देवळाच्या आत पोचलो तोपर्यंत मात्र हे दगडही पाण्यात बुडून गेले होते. अजून देऊळ मात्र वाळूतच दिसत होते.
संध्याकाळी सहा वाजता पुन्हा भरती असणार होती त्याआधी पुन्हा एकदा देवळात गेलो. यावेळी मात्र हे देऊळ पूर्ण पाण्यात उभे होते आणि ओ तोरीइ अगदी पार समुद्राच्या मध्ये असल्यागत वाटत होती. इथे सूर्यास्त बघण्याचा माझा प्लान होता. पण सूर्य अधिक ढगात लपल्याने सूर्यास्त काही दिसलाच नाही.
-------------------------
हे लेखन इथेही पाहता येईल
लेखनाचे आणि फोटोंचे सर्व प्रताधिकार सुरक्षित.
मस्त आहेत फोटो. ती कमान
मस्त आहेत फोटो. ती कमान नुसतीच वाळूत उभी आहे, म्हणजे कमालच आहे !!
मस्त पहिला आवडला जास्त.
मस्त
पहिला आवडला जास्त.
फोटो आणि वर्णन खुपच छान
फोटो आणि वर्णन खुपच छान आहे...
बेटावर हरणे भरपूर आहेत>>>>कुठ दिसत नाहीत ती....
सावली, छान फोटो आणि माहिती !
सावली,
छान फोटो आणि माहिती !
ज्यांना जपान मधे भटकंती
ज्यांना जपान मधे भटकंती करायची असेल त्यांनी खालील संकेतस्थळ पहावे.
मियाजिमा करीता http://www.japan-guide.com/e/e3401.html
जपानमधे तिन ठिकाणे "निहोन सानकेई" म्हणून प्रसिद्ध आहेत त्यापैकी मियाजिमा हे एक.
निहोन सानकेई करीता http://www.japan-guide.com/e/e2250.html
मी या तिन्ही ठिकाणांना भेट दिलेली आहे.
मस्त फोटो आणी लेखही! >>फोटो
मस्त फोटो आणी लेखही!
>>फोटो कमी टाकले कारण जे दाखवायचे होते ते या फोटोत दाखवले असे मला वाटले. खुप फोटो टाकले की नेमके काय दाखवायचे होते त्याकडे दुर्लक्ष होते << .... १००% सहमत!
Pages