... अगदी निघेपर्यंत कोकणाचं आभाळ डोळ्यांत साठवून घेत होतो...
परवाच्याच पावसाने स्वच्छ झालेल्या निळ्याभोर आकाशात अगदी शुन्यात डोळे लावून बसावं, तरी ध्यान लावून बसण्याचं सुख मिळतं…!
...ही समाधी तुटली ती स्टेशनवरच्या अनाउन्समेंटने...!
मुंबईकडे जाण्याची ट्रेन अगदी बघता बघता समोर येउन थांबली अन् खांद्यावर पिशव्यातलं भरलं कोकण घेउन मी ट्रेन मध्ये चढलो...
गाडीत लगबगीने आपापल्या पिशव्या, आंब्य़ाच्या पेटया जपून ठेवणारा कोकणी माणूस...! बरोबर असणारया म्हातारया आजी आजोबांना आधी जागा करुन देणारा कोकणी माणूस...! गाडी सुटताना स्टेशनवर सोडायला आलेल्या घरच्यांच्या हातात, निरोपाचा...प्रेमाचा हात ठेवणारा कोकणी माणूस...! सारं विस्मयकारक...!
गाडी स्टेशनातुन सुटताना, खिड़कीतनं बाहेर काढलेल्या हातातून जेव्हा आपल्या माणसांची बोटं सुटतात तेव्हा नात्यांचा खरा अर्थ उमगतो...
आमच्या ट्रेन ने वेग पकडला होता... पण मन मात्र मागेच कोकणात अडकून पडलं होतं...! गेले कित्येक वर्ष मी हे अनुभवतोय...! शरीराच्या बाहेर मन रेंगाळलं की बैचेन व्हायला होतं. मागे पडणारया झाडांगणिक, आणि मागे पडणारया जामिनीगणिक या मातीतल्या जुन्या आठवणी पुन्हा डोक्यात जमा होतात. जुन्या दिवसांतला कोकणातला पाऊस भरल्या डोळ्यातून बरसू लागतो...!
शाळेच्या दिवसांत तर आम्ही कोकणात जून उजाडेपर्यंत राहत असू. कोकणातून में महिन्यात निघालेला मुंबईकर मागे राहिलेल्या मुंबईकरांना " पाउस घेवन येवा रे मुंबईत " असा मालवणीत गमतीदाखल म्हणायचा.
“ कोकणातला पाऊस म्हणजे एक चित्रच आहे माझ्यासाठी ”. कोकणात पाऊस हा मुंबईच्या जरा आधीच यायचा...! नित्यनेमाने...! अगदी वचन दिल्यासारखा...! पण पावसाच्या आधी मात्र सारं कोकण लगबगायचं त्याच्या तयारीसाठी. वाडीवाडीतली माणसं येत्या पावसात घरात कुठे पाणी ठिबकू नये म्हणून लगबगीने घरावरची कौलं परतताना दिसायची. घरासमोरच्या अंगणातला नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेला माटव (छत) काढला जायचा. पावसाच्या आधीची पूर्वतयारी म्हणून चुलीसाठी लागणारी सुकी लाकडं घराबाजुच्या पडवीत शाकारलेल्या जागेत, भिजणार नाहीत अशी ठेवण्यात येत. में महिन्यात झाडावरुन काढलेल्या रतांब्याची सुकून कोकमं होईपर्यंत सारं अंगण लाल व्हायचं. पाऊस घराच्या पडवीपर्यंत येऊ नये म्हणून कौलांना धरून झावळ्या (नारळाच्या सुकलेल्या फांद्या) बांधण्यात येत. कोकणी माणसांच्या पायांना ह्या दिवसांत थारा नसायचा.
ह्या सगळ्या लगबगीतच त्या दिवसांत आभाळात अचानक गाजू लागे. वाडीतली माती उडवत सोसाट्याचा वारा यायचा. परसातली नारळ-सुपारयांची झाडं हवेबरोबर जोरजोरात हालत. सारं आभाळ पाखरांचं होउन जायचं. भर दिवसा वाडीमध्ये काळोख दाटायचा...! कोकणातलं आधीच काळोख घर अगदी मिट्ट होउन जायचं. गाजणारया ढगांबरोबर घरातली लाईट गेली की गावची काकी रॉकेलच्या छोट्या छोट्या बाटल्यांचे दिवे अगदी घरभर लावी...!
कोकणातला पाऊस मी कधी शांत येताना पाहिलाच नाही. ढगांचे प्रचंड आवाज करीत " मी आलोय " अशी बहुतेक गर्जनाच करत तो यायचा… आणि बघता बघता आभाळातून सारा आनंद पावसाच्या रुपात कोकणावर बरसू लागे. सारं कोकण वर्षाची आंघोळ केल्यासारखं हर्षभरित होउन जायचं...! पावसालाही कोकणात बरसताना मुक्त मोकळी जागा मिळायची. त्यालाही येथल्या मातीचं होताना बहुदा आनंद होत असावा…! लाल मातीच्या रस्त्यांवरून लाल पाण्याचे छोटे छोटे ओहळ रस्त्याबाजूने आपली जागा करुन वाहू लागत. वाडीमध्ये कुठेतरी फिरत असलेला घरातला तांबडा कुत्रा पावसातून धावत येउन अंगणात जोरात अंग झाडून हळूच पडवीत घातलेल्या उबदार गोणपाटात शिरायचा. सुकत घातलेल्या कोकमांनी लाल झालेलं उन्हाळ्यातलं अंगण स्वच्छ धुवून जायचं. अंगणातल्या परसातला फणस पावसामुळे धुतला गेल्याने नवा कोरा दिसू लागे. घरातली पांढरी मांजर अंग चोरून शेपटी जवळ घेउन कोपरयात बारीक डोळे करुन बसून राही. शेणाने सारवलेल्या जमिनीला हलकासा ओलावा यायचा. आईच्या हाताला धरून मग मी आतल्या स्वयंपाकघराच्या चुलीजवळ जाउन बसायचो. चुलीतल्या निखारयांची धग पावसात अंगाला हवीहवीशी वाटायची.
लाल- नारिंगी निखारयांवर राख जमली की गावची काकी मग कोपरयात ठेवलेल्या कळकट्ट लोखंडी नळीने फुंकून निखारयातून आग फुलवायची. नळी फूंकताना त्या नळीतून येणारा आवाज मला प्रचंड आवडायचा. मग मी पण काकीच्या हातून ती नळी घेउन निखारयांवर धरून ती फूंकत असे. गावचे काका तेवढयात कुठून तरी वाडीतून पावसातून भिजुन येत. भिजल्या अंगावरची थंडी जावी म्हणून मग काकी त्यांच्या सोबत आम्हालाही चुलीवरून उतरवलेला गरम कोरा (बिना दुधाचा) चहा देत असे. बाहेर पाऊस सुरु असताना, हा कोरा चहा पितानाची गंमतच न्यारी असायची. दुपारी सुरु झालेला पाऊस संध्याकाळ पर्यंत यथेच्छ बरसायचा. पावसात, गावच्या झाड़ीझुडूपातून सरपटणारी जनावरं बाहेर पडतात म्हणून गावचे काका आम्हांला घराबाहेर पडू देत नसत. रातकिडयाचे आवाज संध्याकाळ पालटली कि तीव्र होवू लागायचे... घराच्या पाणवठयावर नळाजवळ बेडकांचं ओरडणं सुरु होई…
रात्रीची जेवणं झाली कि रॉकेलच्या दिव्याजवळ बसून आई-बाबा, काका-काकीच्या गप्पा रंगायच्या. आईच्या उबदार मांडीवर डोकं ठेवून, सारवलेल्या जमिनीवर पाय पसरून झोपताना आयुष्य कसं सुरक्षित वाटायचं?
या सगळ्या ओल्या दिवसांमध्येच एक दिवस मुंबईला परतण्याचा दिवस उजाडे. गावची काकी गावाकडची भेट म्हणून कागदांच्या पुडयामध्ये घरची कोकमं, तांदळाच्या पिठाचे लाडू, चुलीत भाजलेले काजू, सुकवलेले फणसाचे गरे वगैरे वगैरे बांधून द्यायची. विकत घेउन दिलेल्या महागड्या गिफ्ट्सपेक्षा या सारया गोष्टीत कित्ती कित्ती प्रेम असतं? एकीकडे काका घरच्या कलमाचे हिरवट आंबे पेटीमध्ये भरण्यात दंग असत. गावातला कोणी एक गावकरी, जायच्या दिवशी कोकमाचा रस बाटलीत भरून आम्हाला द्यायला म्हणून घेउन यायचा. शेजारच्या घरातली आजी प्रेमाने बनवलेले शेंगदाण्याचे लाडू, फणसपोळी वगैरे बांधून आपल्या पुतण्याकड़े वगैरे माझ्यासाठी पाठवायची. कावराबावरा होवून या सारयाकड़े मी पाहत राही. या सर्व खाऊचा आनंद न वाटता, आता ही सगळी माणसं, हे घर वर्षभरासाठी तुटणार या विचाराने मन गहिवरून जायचं. घराच्या देवासमोर नारळ ठेवून, पाया पडून आई-बाबा भरल्या पिशव्या खांद्यावर टाकायचे. घरातली काकी-काका, भाऊ-बहिण आम्हाला वाडीबाहेरच्या एस.टी. थांब्य़ापर्यंत सोडायला येत. घरातला तांबडा कुत्रा शेपटी हलवत अध्येमध्ये अस्वस्थपणे घुटमळत असे. पावसाची रिपरिप चालु असायची. खांद्यावरचा पदर तोंडावर धरून गावची काकी माझ्या डोक्यावरून हात फिरवून स्वत:चे पाणावलेले डोळे पदराने पुसायची. काका अचानक कसे शांत शांत व्हायचे. उगाच इकडे तिकडे घुटमळत फिरायचे. आजूबाजुच्या झाडांझाडांत, पानापानांत, महिनाभर खेळलेल्या, फिरलेल्या मातीत सारा जीव विखुरला जायचा...! पावसातून भिजून नवी कोरी झालेली, मुंबईला जाणारी एस.टी. समोर येउन थांबायची. आणि आम्ही एस.टी. सुटेपर्यंत घरच्यांना हात दाखवित बसायचो...!
चालू झालेल्या एसटीत बसून मी खिड़कीतून मागे पडणारं गाव पाहत बसे. हातातून काही निसटुन जातंय असं काहीसं वाटायचं. शेजारच्या आजीने दिलेला लाडू, आई जेव्हा पुड़ी खोलून मला द्यायची तेव्हा लाडू खाताना गावी गेल्यागेल्या कवटाळून घेणारी आजी सतत डोळ्यासमोर दिसायची...! “ सारं कोकण एक चित्र बनून रहायचं डोळ्यासमोर ”. माणसांचं चित्र...! नात्यांचं चित्र...! निसर्गाचं चित्र...! आठवणींचं चित्र...!
- या कोकणानेच मला डोळसपणे सौंदर्याचा आस्वाद घ्यायला शिकवलं. मधाळ माणसं दाखवली. दरवर्षी नित्यनेमाने कोकणातल्या घरी घेउन जाणारया आई-बाबांमुळे मला कोकणातल्या मातीची ओढ़ लागली. येथल्या मालवणी भाषेशी, संस्कृतीशी, भजनांच्या सुरावटींशी, सण-उत्सवांशी, घराशी, निसर्गाशी, माणसांशी मी कायम स्वत:ला जोडत राहिलो. चित्रकार म्हणून माझं चित्र या सारया जगण्यात शोधत राहिलो.
आपल्यापैकी प्रत्येकाचंच जगणं हे असंच एखाद्या चित्रासारखं असतं. प्रत्येकाचा मुलुख वेगळा, माती वेगळी, माणसं वेगळी...! पण चित्र हे असंच काहीश्या अनुभवातनं आकार घेत घेत पुढे सरकणारं....!
स्पर्धेच्या या धावपळीत, गतिमानतेच्या युगात आपण सारेच जेव्हा आपल्या मनाला हवी असलेली शांतता हरवू लागतो, तेव्हा पुन्हा एकदा आपल्या माणसांत जावं. आपल्या मातीत रुजावं...! निसर्ग पाहावा. जुनी नाती नव्याने वाचावीत...! स्वत:शीच शांतपणे बोलावं…! या सारया गोष्टी आपल्या जगण्याला नवे रंग देतात. आपलं प्रत्येकाचं चित्र पुन्हा नव्याने रंगवण्यासाठी.....
- एव्हाना ट्रेनच्या खिड़कीतून दिसणारया हिरव्या रंगाच्या जागी आता मुंबईचे ब्रिज अन् इमारती दिसू लागल्या होत्या. उतरण्यासाठी ट्रेन मधल्या प्रवाशांची लगबग वाढली होती. महिनाभरात पाहिलेलं कोकणातलं सारं आभाळ डोळ्यांत भरून राहिलं होतं.....
- कल्पेश गोसावी.
(अक्षरसुलेखनकार)
सुरेख !
सुरेख !
क्या बात है कल्पेश. खुप छान.
क्या बात है कल्पेश. खुप छान. आवडले.
प्रत्येक कोकणी हा इतर कुठेही
प्रत्येक कोकणी हा इतर कुठेही राहिला तरी तिथे तो मनाने उपराच असतो, हा माझ्यासारख्या अनेकांवरून मी मांडलेला सिद्धांत आहे ; कल्पेशजी, तुम्ही त्याला पुष्टी दिलीय ! आम्ही मुंबईला निघालो कीं
आमच्या आजोळचा कुत्रा गावातल्या एस्टीच्या पुढच्या स्टॉपवर जाऊन उभा रहायचा; आमच्या स्टॉपवरच्या कुटूंबियांच्या निरोप-गर्दीमधे त्याच्या शेपटी हलवून दिलेल्या निरोपाकडे आमचं लक्ष जाणार नाही म्हणून !!
फार छान मांडल्यात तुम्ही हृद्य आठवणी !
अशक्य लिहिलयस, शरीराच्या
अशक्य लिहिलयस,
शरीराच्या बाहेर मन रेंगाळलं की बैचेन व्हायला होतं. >>या आणि अश्याच काही वाक्यांना...मनापासून दाद.
खुपच सुंदर लिहिलयं. मनापासुन
खुपच सुंदर लिहिलयं.
मनापासुन आवडल
कल्पेशा... सर्रास लिहीले आहेस
कल्पेशा... सर्रास लिहीले आहेस अगदी.. शब्दाशब्दांतून चित्र डोळ्यासमोर येत होते.. मस्तच
विकत घेउन दिलेल्या महागड्या
विकत घेउन दिलेल्या महागड्या गिफ्ट्सपेक्षा या सारया गोष्टीत कित्ती कित्ती प्रेम असतं? >> आवडल...
लेखही अप्रतिम!
>>>आईच्या उबदार मांडीवर डोकं
>>>आईच्या उबदार मांडीवर डोकं ठेवून, सारवलेल्या जमिनीवर पाय पसरून झोपताना आयुष्य कसं सुरक्षित वाटायचं? ..... एकदम खरय.
फारच सुंदर लिहिलय. वाचताना जेव्हा केव्हा कोकणातल्या गावी गेलो होतो ते सगळ वाचताना डोळ्यासमोर येत होत....
फार सुंदर.
फार सुंदर.
मस्त लिहीले आहे. अगदी
मस्त लिहीले आहे. अगदी चित्रदर्शी.
<<शरीराच्या बाहेर मन रेंगाळलं
<<शरीराच्या बाहेर मन रेंगाळलं की बैचेन व्हायला होतं.>>
अगदि खरय...हि अवस्था कोकणात गेल्यावर प्रत्येकाचीच असते.
<सारं कोकण वर्षाची आंघोळ केल्यासारखं हर्षभरित होउन जायचं...!>> हो ना अगदि..
<<विकत घेउन दिलेल्या महागड्या गिफ्ट्सपेक्षा या सारया गोष्टीत कित्ती कित्ती प्रेम असतं?>> हो खरय.
खुप छान न कोकणच्या आठवणी अगदि हृदय!!!!
कल्पेश, सुरेख लिहिलं आहेस..
कल्पेश,
सुरेख लिहिलं आहेस..
आवडल.. खुप सुंदर लिहलं आहे..
आवडल..:)
खुप सुंदर लिहलं आहे..:)
छान लिहिलंय अगदी.
छान लिहिलंय अगदी.
कल्पेश, किती छान लिहिलयस.
कल्पेश, किती छान लिहिलयस. म्हणजे मला तुझ्या जागी मीच दिसत होतो ईतकं मनाला भिडलं.
आपलं गांव म्हणजे आपल्यासाठी एक अमूल्य ठेवाच असतो नाही ? मग आपला जन्म तिथे झाला असेल, नसेल पण जिथे आपल्या आधीच्या पिढ्या राहिल्या, राबल्या त्या मातीशी एक अतूट नातं निर्माण होतं खरं. माझ्या गावी आता कुणी नसतं, पण गणपतीला जातो तेव्हा परततांना असंच गलबलुन येतं.
(No subject)
छान प्रयत्न. गाडीत लगबगीने
छान प्रयत्न.
गाडीत लगबगीने आपापल्या पिशव्या, आंब्य़ाच्या पेटया जपून ठेवणारा कोकणी माणूस...! बरोबर असणारया म्हातारया आजी आजोबांना आधी जागा करुन देणारा कोकणी माणूस...! गाडी सुटताना स्टेशनवर सोडायला आलेल्या घरच्यांच्या हातात, निरोपाचा...प्रेमाचा हात ठेवणारा कोकणी माणूस...! सारं विस्मयकारक...! >>>
माफ करा पण यात काय विस्मयकारक आहे ? कोकणी नसणारे पण इतर भागातील लोकंही हेच करतात की.
सारं कोकण एक चित्र बनून रहायचं डोळ्यासमोर ”. माणसांचं चित्र...! नात्यांचं चित्र...! निसर्गाचं चित्र...! आठवणींचं चित्र...! >> हे आवडलं.
अप्रतिम रे सगळ चित्र डोळ्यात
अप्रतिम रे सगळ चित्र डोळ्यात उभ राहील..
शेवटी गाव वेड लावतच ना...
मस्त कल्पेश!!! अगदी सगळे
मस्त कल्पेश!!! अगदी सगळे डोळ्यासमोर उभे राहिले.
ह्म्म चांगलं लिहिलंय. >>>
ह्म्म चांगलं लिहिलंय.
>>> गाडीत लगबगीने आपापल्या पिशव्या, आंब्य़ाच्या पेटया जपून ठेवणारा कोकणी माणूस...! बरोबर असणारया म्हातारया आजी आजोबांना आधी जागा करुन देणारा कोकणी माणूस...! गाडी सुटताना स्टेशनवर सोडायला आलेल्या घरच्यांच्या हातात, निरोपाचा...प्रेमाचा हात ठेवणारा कोकणी माणूस...! सारं विस्मयकारक...!<<<
यातलं विस्मयकारक आणि केवळ कोकणातल्या माणसाचंच वैशिष्ठ्य काय ते मलाही समजलं नाही. आंब्याची पेटी वगळता.
कल्पेश, मस्त वर्णन.
कल्पेश, मस्त वर्णन. धन्यवाद.
<<<पण पावसाच्या आधी मात्र सारं कोकण लगबगायचं त्याच्या तयारीसाठी. वाडीवाडीतली माणसं येत्या पावसात घरात कुठे पाणी ठिबकू नये म्हणून लगबगीने घरावरची कौलं परतताना दिसायची............कोकणी माणसांच्या पायांना ह्या दिवसांत थारा नसायचा.>>> लहानपण अगदी डोळ्यासमोर ऊभं राहील.
<<<दुपारी सुरु झालेला पाऊस संध्याकाळ पर्यंत यथेच्छ बरसायचा. पावसात, गावच्या झाड़ीझुडूपातून सरपटणारी जनावरं बाहेर पडतात म्हणून गावचे काका आम्हांला घराबाहेर पडू देत नसत. रातकिडयाचे आवाज संध्याकाळ पालटली कि तीव्र होवू लागायचे... घराच्या पाणवठयावर नळाजवळ बेडकांचं ओरडणं सुरु होई… >>>> तंतोतंत वर्णन. बेडकाचे डराँव डराँव गीत कानात घुमू लागले.
<<<नळी फूंकताना त्या नळीतून येणारा आवाज मला प्रचंड आवडायचा>>>आमच्याकडे लोखंडाची नळी (फुंकणी ) होती.
<<<गाडी स्टेशनातुन सुटताना, खिड़कीतनं बाहेर काढलेल्या हातातून जेव्हा आपल्या माणसांची बोटं सुटतात तेव्हा नात्यांचा खरा अर्थ उमगतो... >>>खरचं.
<<<शरीराच्या बाहेर मन रेंगाळलं की बैचेन व्हायला होतं. मागे पडणारया झाडांगणिक, आणि मागे पडणारया जामिनीगणिक या मातीतल्या जुन्या आठवणी पुन्हा डोक्यात जमा होतात. जुन्या दिवसांतला कोकणातला पाऊस भरल्या डोळ्यातून बरसू लागतो...! >>>अगदी अगदी खर.
>>>चालू झालेल्या एसटीत बसून मी खिड़कीतून मागे पडणारं गाव पाहत बसे. हातातून काही निसटुन जातंय असं काहीसं वाटायचं>>>१०००००% अनुमोदन.
आता कोकणात जायलाच पाहीजे. तेही पावसात.
कल्पेश... अतिशय
कल्पेश... अतिशय सुंदर!
जन्माने मुंबईकर, गावचा पत्ता नाही... तरीही आमची गावची ओढ काही कमी होत नाही... तुझे अनुभव वाचताना लहानपणीच्या आजोळच्या आठवणी ताज्या झाल्या... मस्तच
मस्त कल्पेश. डोळ्यातलं आभाळ
मस्त कल्पेश. डोळ्यातलं आभाळ भरुन आलं वाचताना.
सुरेख.
सुरेख.
अतिशय सुंदर शब्द नि
अतिशय सुंदर

शब्द नि मनातल्या भावना एकदम स्वच्छ , नितळ .. अगदी पाऊस पडून गेल्यावर झालेल्या आभाळासारखे .... खुप मनापासून आवडले
वाचताना नकळत डोळ्यात पाणी आले...
माझ्या आवडत्या दहात नक्कीच ...
<<नळी फूंकताना त्या नळीतून
<<नळी फूंकताना त्या नळीतून येणारा आवाज मला प्रचंड आवडायचा>>मला सुद्धा तो फुकणीचा फुss
फुss आवाज फार आवडतो.मी तर चुलीत आग असली तरी उगाच फुss फुss करत बसते.
बाकी काय बोला,प्रत्येक मालवणी माणसां वागंडा ह्याच होता.मीव राजापुर येय तागत गावची-घराची आठवण काढुन रडत असतय.
विकत घेउन दिलेल्या महागड्या
विकत घेउन दिलेल्या महागड्या गिफ्ट्सपेक्षा या सारया गोष्टीत कित्ती कित्ती प्रेम असतं? >> अप्रतिम!!
गावाला सुट्टीमध्ये दोन दोन महिने जाउन राहायचो त्याची आठवण झाली...मस्त लेख...
मस्त!
मस्त!
मस्त..!!!! शैलू लेखकाची
मस्त..!!!!
शैलू लेखकाची परवानगी घेऊन हा लेख पण जमा करूया का?
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
Pages