एक बोचरी आठवण (पूर्वार्ध)

Submitted by प्रज्ञा९ on 3 June, 2011 - 11:38

३१ मे २००१. वेळ सकाळ उलटून दुपार होतानाची, पण माझ्या नशीबातली अगदीच काळोखी. त्या दिवशी माझा १२वीचा रिझल्ट होता. मी मजेत होते, की ८५% च्या आसपास गृपला तरी मिळतील. त्याहून जास्त अपेक्षा नव्हती, कारण २ पेपर जरा कठीण गेले होते.

पण मार्कशिट बघून मी बेशुद्ध पडायची बाकी होते. Maths -35, Phy- under 45, Chem- under 45, Bio- under 45. English- 68, Sanskrit- 78. हे नक्की माझे मार्क्स होते?? माझा विश्वासच बसेना. मी कितीतरी वेळा वर नाव तपासलं. माझंच नाव, माझाच सीट नंबर. माझ्या बरोबर ताई आली होती, तिलाही काही सुचेना. माझी मैत्रिणही हैराण.
मला एकदम रडूच फुटलं. ८५ ची अपेक्षा आणि ५०% सुद्धा नाहीत?? असं कसं झालं? आणि गणितात ३५ मार्क???? नक्कीच काहीतरी घोळ होता. आम्ही घरी फोन लावून कळवलं सगळं. (मी ११-१२वी पुण्यात स प कॉलजमधून करत होते. आई-बाबा रत्नागिरीला. ताई आर्किटेक्चरच्या तिसर्‍या वर्षाला, आणि मोठी ताई मुंबईत आयुर्वेद शिकायला होती.)

मी फोनवर खूप खूप खूप रडले. आई-बाबासुद्धा काही बोलू शकत नव्हते. एकच अतिशय महत्त्वाची गोष्ट ही, की सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता, की मी पेपर कसेचतरी लिहून मग आता खोटं काही रडत नाहिये! बाबांनी लगेच हालचाल करायला सुरुवात केली. त्यांनी काही वर्ष कोल्हापूर बोर्डात पेपर सेटर, पेपर चेकर पासून अगदी महत्त्वाचं असं बोर्ड मेंबर हे पद.....इतकं काम केलं होतं. कॉपी केसमधे पुरावे गोळा करून निकाल देणं, ज्यूरी, वगैरे कामं केली होती, त्यामुळे काहीतरी मेजर घोळ आहे हे त्यांच्या लगेच लक्षात आलं होतं. त्यांच्यातला तत्त्वनिष्ठ शिक्षक कामाला लागला होता.
इकडे ताईने कशीबशी समजूत घालून मला मामाकडे आणलं. मामाचं घर नव्यानेच झालं होतं सहकारनगरात. आमचा मुक्काम तिथेच असे सुटीत. तिथे गेल्यावर, चार घास पोटात गेल्यावर मामीने वगैरे समजूत घातली खूप. बरीच फोनाफोनी चालू होती. दुसर्‍या दिवशी आम्ही शिवाजीनगरला जाऊन बोर्डाच्या ऑफिसमधून पुनर्तपासणीचे फॉर्म घेतले, पैसे भरले आणि फॉर्म सबमिट केले. सामान्यपणे काहीही बदल होत नाही हे माहिती होतं, त्यामुळे आलेला रिझल्ट स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पुढे काय हा मोठ्ठा प्रश्न होता.

मी सपमधेच प्रोव्हिजनल अ‍ॅडमिशन घेतली बीएस्सीला. मला Electronics and Telecom करायचं होतं. ८५% च्या आसपास मार्क असतान अ‍ॅड्मिशन कुठे मिळेल वगैरे अंदाज घेतला होता. ते पुरेसे मार्क्स नव्हते, पण अगदी कमिन्स/ व्हीआयटी नाही, तरी एखाद्या बर्‍या कॉलजला तरी मिळेल असं वाटत होतं. किंबहुना ती सगळी माहिती आधीच गोळा केली होती पण सगळंच वाया!

हो-नाही करता करता परत रत्नागिरीतच येऊन, १०वीच्या मार्कांवर डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घ्यायचं ठरलं. हा निर्णय घेणं खूप जड जात होतं. कारण एकतर ११वी-१२वी ची दोन्ही वर्ष एकदमच फुली मारल्यासारखी वाया जात होती. दुसरं म्हणजे खूप स्वप्न रंगवून, चांगले मार्क्स मिळवून पुण्यात शिकायची इच्छा होती, त्यावर पाणी फिरत होतं. बरं डिप्लोमा हा स्टेट बोर्ड मधे येतो, युनिवर्सिटी चं बंधन नाही, तर मग पुणं काय नि रत्नागिरी काय...सारखंच! अ‍ॅन्युअल/ सेमिस्टर चा फरक होता, पण पुढे अभियांत्रिकीसाठी अ‍ॅन्युअल च्या मुलांना जास्त सीट्स असतात ही माहिती मावसभावाने दिली, आणि रत्नागिरीत, शासकीय तंत्रनिकेतन (GPR) ला अ‍ॅन्युअल आहे, ते कॉलेजपण तसं ठीक आहे वगैरेही सांगितलं होतं.

स्वतः मांडलेला डाव असा मोडून जायचा फार त्रास होत होता. २ वर्षांत जुळलेले मैत्रीचे धागे सोडायचे होते, कारण परत रत्नागिरीत गेल्यावर कधी भेट होईल माहिती नव्हतं. जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहिले त्या मावशी, काका, मेसचे काका-काकू-ज्यांनी मला मानसकन्या म्हटलं होतं, अनेक मैत्रिणी...
पेठेतल्या गल्ल्या, पुणे मराठी ग्रंथालय अभ्यासिका...सगळं एकदा मनात साठवून ठेवलं, तो कप्पा घट्ट्ट बंद केला, आणि पुन्हा इतके मार्क्स मिळवेन, की माझ्या मेरिटवर जशी ११वीत अ‍ॅडमिशन मिळवली तशीच अभियांत्रिकीला मिळवेन अशी जिद्द मनात ठेवून, खोलीतलं सामान आवरून पुण्यनगरीचा निरोप घेतला.

रत्नागिरीत आले आणि डिप्लोमाला प्रवेश घेतला. १०वीत उत्तम मार्क्स होते, त्यामुळे पहिल्या दिवशी पहिल्या राऊंडला पहिल्या पाचांत प्रवेश झाला आणि मी बाबांबरोबर वेळेवर घरी आले. बाबा माझ्या मार्कांच्या घोळाच्या अगदी मागे लागले होते. जरी मी पुणे बोर्डातून १२वी केली असली तरी बाबांनी कोल्हापुरात काम केल्यामुळे (रत्नागिरी कोल्हापूर मंडळाच्या अखत्यारीत येतं) त्यांचे हितचिंतक होते तिथे. आणि बाबांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि प्रामणिकपणामुळे एकूणातच अविश्वसनीय वाटणार्‍या या बाबतीत त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मदत करायचं वचन दिलं आणि ते करतही होते.

जुलै-ऑगस्टच्या दरम्यान "No Change in your marks" असं लिहिलेलं पुणे बोर्डाचं एक चिठोरं आमच्या पत्यावर थडकलं. अपेक्षितच होतं. बाबा मात्र कोल्हापुरात, पुण्यात फोनाफोनी करत होते. शेवटी सप्टेंबरात समजलं ते असं, की माझ्या आणि कुणा 'क्ष' मुलाच्या/ मुलीच्या उत्तरपत्रिकांच्या पहिल्या पानाची अदलाबदल केली गेली होती. अर्थातच मुद्दाम. फक्त पहिल्याच पानाची अदलाबदल, जिथे आपण आपला सीट नंबर लिहितो. त्यामुळे माझ्या सीट नं. च्या पानाखाली क्ष ची उत्तरपत्रिका, आणि क्ष च्या सीट नं च्या पानाखाली माझी. त्यामुळे मी लिहिलेल्या उत्तरांचे सगळे मार्क्स क्ष ला आणि क्ष चे मला. त्यामुळे माझे खरे मार्क्स मला समजलेच नाहीत. जे होते ते माझे नव्हते. बरं एवढं करूनही, उपयोग काहीच होणार नाही हेही समजलं. कारण कोर्टकेस जरी केली तरी तेव्हा नियम इतके विचित्र होते, की हस्ताक्षरतज्ञ वगैरे बोलवून फेरतपासणी होत नाही, तशी परवानगी नाही असं बाबांना समजलं होतं. तरीही एक प्रयत्न म्हणून माझ्या २-३ वह्या त्यांनी काही संबंधित लोकांकडे दिल्या होत्या. त्यांनी स्वतः माझे पेपर बघितले म्हणे. म्हणजे खरे पेपर, पण नियमांच्या बंधनामुळे ते काहीच करू शकले नव्हते. त्यांनी जी मदत केली तीही चाकोरीबाहेर जाऊन, बाबांच्या साठी कोल्हापुरात कोणीतरी शब्द टाकला म्हणून केली होती.

त्यातल्यात्यात समाधान एकच, की निदान मी पेपर नीट लिहिले होते हे पुन्हा एकदा समजलं. तसा अविश्वास कुणीच नाही दाखवला. पण ते अभद्र मार्क्शिट बघून माझाच आत्मविश्वास पूर्ण डळमळला होता, त्यावर जरा मलमपट्टी झाली. पुढे त्याबाबतीत अशी सविस्तर माहिती मिळाली, की, माझ्या शास्त्र विषयाच्याच पेपर्स ना असं ट्रीट केलं. आणि ते उघड होतं. इंग्रजी-संस्कृत मार्कांमधे काही घोळ नव्हता. त्याचं कारण असं, की शास्त्र शाखेच्या मुलांचे भाषा विषयाचे पेपर तपासणीच्या प्राध्यापकांना घरी नेण्याची परवानगी असते. पण शास्त्र विषयाचे पेपर कॉलजमधेच तपासले जाणं अनिवार्य असतं. आणि कॉलजमधे हजारो पेपरांत हा घोळ घालायला सोपा गेला 'क्ष' च्या संबंधितांना. त्यांनी काही प्राध्यापकांना पैसे देऊन मार्क बदलतील अशी सोय केली. कारण क्ष ला पुढे जेव्हा कमी मार्क मिळतील(ज्याची त्यांना परीक्षा झाल्यावरच कल्पना आली असणार!) तेव्हा लाखो रुपये भरून पेमेंट सीट घेण्यापेक्षा इथे काही हजार दिले की अ‍ॅडमिशन सहज मिळेल असेच मार्क पाडता/ आणता येतील.

ही सगळी माहिती आम्हाला अगदी आतल्या गोटांतून समजली. 'क्ष' चा शोध नाही लागला, पण ज्यांनी ही माहिती सांगितली त्यांनी स्वतःचं नाव आमच्यापर्यंत येणार नाही याची काळजी घेतली. बाबांना हे सगळं कोल्हापुरात मुद्दाम बोलावून सांगितलं तिकडच्या लोकांनी. तेही केवळ गुडविल म्हणून, आणि खुद्द बाबांनी बर्‍याच कॉपी केसेस किंवा अशी प्रकरणं हाताळली होती म्हणून. दुसरा एखादा असता तर तेही नसतं केलं म्हणाले. बाबा अगदीच खनपटीला बसले होते, आणि कोल्हापुरातले लोक भले होते. अन्यथा अशी पैसे खाऊन केलेली प्रकरणं कधीच त्या चार भिंतींबाहेर येत नाहीत.

एकूण जे सगळं झालं ते खरं सगळं कळूनही खोटंच वाटत होतं. मी बाबांना म्हटलं, "फक्त एकदा, एकदाच, ज्या कोण 'क्ष' ने माझे मार्क्स घेतले आहेत, त्याचं मार्कशिट बघून माझे खरे मार्क्स किती होते हे मला कळेल का हो? आता काही उपयोग नाहे हे खरं, पण वर्षभर जीव आटवून केलेल्या मेहेनतीला किती चांगलं फळ आलं होतं, जे दुसर्‍याला माझ्याकडून हिसकावून घ्यावंसं वाटलं ते तरी कळूदेत मला!"
हे ऐकून इतके दिवस, महिने खंबीरपणे याचा छडा लावणारे बाबा आणि माझी समजुत काढणारी आई- दोघंही बांध फुटल्यासारखी रडली होती.

मधल्या काळात मी इतकी खचले होते, की "बाई गं आता गप्प बसायला काय घेशील" असं मला रागवायला लागत असे, ती आता "काहीतरी बोल गं" असं म्हणण्याइतकी शांत झाले होते. आतल्या आत दु:ख करत होते. त्या काळात आई-बाबा आणि तायांनी खूप समजून घेतलं, सावरलं.....

स्वतःवर संकट आलं तर न डरणारे आई-बाप लेकरावर संकट आलं की कसे हळवे होतात ते बघितलं मी. अजिबात अंधश्रद्ध नसलेल्या दोघांनीही हल्लक झालेल्या मनाला आधार म्हणून माझी पत्रिका वगैरे दाखवली होती. प्रयत्न न सोडता, दैववादी न होता, केवळ एक उपाय म्हणूनच, पण त्यांना गरज वाटली. "तू जेव्हा ३१ तारखेला रिझल्ट कळवलास तेव्हा बाबांचा चेहरा बघवेना इतका काळाठिक्कर पडला होता आणि ते तडक आजोबांकडे गेले होते. आजोबांनी त्यांना समजावलं होतं" असं आई म्हणाली मग मला. मी जेव्हा आजोबांना नंतर भेटले तेव्हा "अज्ञ, जित्ती आलीस हेच खूप हो पोरी!" असं, डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाले होते.

कदचित आत्ता हे सगळं जरा अति वाटेल, पण स्वतःची काही चूक नसताना, केलेल्या मेहेनतीवर असा कोणी येऊन परस्पर पाणी फिरवतो आणि आपली झोळी रिकामीच रहाते तेव्हा काय अवस्था होते ते ज्याचं त्यालाच ठाऊक. कधी कधी वाटतं, की सगळं खरं समजलं नसतं तर 'नशिबाचे खेळ' म्हणून सोडून दिलं असतं. पण कुणाच्यातरी लाचखाऊपणामुळे माझं नुकसान झालं ही चीड, बोच अजूनही आहे मनात.

हे सगळं आत्ता लिहायचं कारण, की नुकतेच काही दिवसांपूर्वी १२वीचे निकाल लागले. आता एकूण सिस्टीममधे बदल झालाय, सीट नं च्या ऐवजी बार कोड आणि गुण द्यायच्या पद्धतीतही बदल झालाय जरा. त्यामुळे अशा केसेस घडतील असं नाही. पण कुणाच्या माहितीत, प्रामाणिक आणि मेहेनती मुलाच्या बाबतीत असं घडलेलं दिसलं तर लगेच मत नका बनवू कोणी Sad

बाबा म्हणाले होते, की एखाद्याचा अपघाती मृत्यू व्हावा तसं झालं होतं घरातलं वातावरण माझ्या या रिझल्टनंतर. सावरायला वेळ लागला होता. पुढचे मार्ग दिसू नयेत इतकं सगळं धूसर झालं होतं!

आता सगळं अर्थातच निवळलंय. मी खरोखरीची B.E. झाले तेव्हाही तीच ताई (आणि मधल्या काळात तिचंही लग्न झालं, त्यामुळे जिजाजींबरोबर) बरोबर होती. तिच्याबरोबर असतानाच नाशिकहून मैत्रिणीचा फोन आला आणि तिने मला डिस्टिन्क्शन मिळाल्याचं सांगितलं. ताई आणि मी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून मनसोक्त रडलो. एक चक्र पूर्ण झालं होतं.
त्यावेळी तिच्याबरोबर जाउन रिचेकिंगचा फॉर्म भरला होता, यावेळी हलवायाकडे जाऊन मलई पेढे आणले!
रत्नागिरीला फोनवर कळवलं. दोन्ही रिझल्ट्च्या वेळी पुण्यातच होते मी, दोन्ही रिझल्ट भर दुपारीच समजले, जेवणाच्या आधी!
एकाने भूक करपली होती, दुसर्‍याने पोट तुडुंब भरलं होतं!
एकाने सगळे रस्ते अडवले होते, दुसर्‍याने हाताला धरून नवा रस्ता दाखवला होता. बाबांनी तर तिकडे दिवाळी साजरी केली. लगोलग दोघंही पुण्यात निघून आली. तेच घर, मामाकडे.

काही वर्षांपूर्वी कसेबसे चार घास खाउ शकलेली मी, या वेळी मामीने केलेले गोड घास घेत होते.
जे घडत होतं ते नक्की स्वप्न नाही ना....माझा हा आनंद आता कोणी हिसकावून घेणार नाही ना....माझं मार्कशिट नक्की माझंच आहे ना... हजार शंका होत्या, पण नेटवर मी स्वतः माझा नंबर डिस्टि. च्या यादीत बघितला. तीपण टायपो असेल असं वाटून, नाशिकला कॉलजमधे फोन करून खात्री करून घेतली लगेच, आणि मगच रत्नागिरीला कळवलं! आणि पुढे सगळं चांगलं घडलं!

आयुष्यात खूप चढ्-उतार येतात...अगदी आपण मुळापासून उखडले जातोय असं वाटण्याइतके प्रसंग येतात, पण घरातल्यांचा आधार आणि आपला आत्मविश्वास, जिद्द असेल तर आयुष्यात काहीही कमी पडत नाही हे हळूहळू समजतंय आता मला!

खरंतर ही कहाणी एवढयात नाही संपलेली, पण आत्ता इथेच थांबते. हे लिहून मला कोणाचीही सहानुभूती नाही मिळवायची, किंवा माझ्या बाबतीत अगदी काहीतरी जगावेगळं घडलंय असंही नाही.

पण जे घडलं त्याने मला एक नवी नजर दिली हे खरं. कुठलाही भला-बुरा प्रसंगा आला तरी खंबीर रहायचं हे मी यातून शिकले.

एक बोचरी आठवण (उत्तरार्ध)

गुलमोहर: 

इतक्या भयंकर कठीण परिस्थितीतून मार्ग काढणार्‍या तुम्हा सर्वांचं कौतुक.

शिक्षणक्षेत्राबद्दल काय म्हणावं? शिक्षणक्षेत्राच्या बैलाला....

प्रज्ञा९> "माझ्या सोबत असे झाले असते तर ....." कल्पना करुनच अंगावर काटा आला.
कदाचित दुसरा मार्ग निवडला असता.
तुझ्या जिद्दीला,धैर्याला सलाम.

खरच भयंकर आहे हे !!! वाचल्यावर प्रथम सर्व सिस्टीम आणि त्या क्ष व्यक्ती विषयी आणि त्या क्ष व्यक्तिच्या पालकांविषयी प्रचंड चीड आली. आपली चूक नसताना असं भोगावं लागणं खूप क्लेशकारक आहे. Sad

तुझ्या जिद्दीचे कौतुक आणि तुझ्या घरच्यांचही ईतका आधार दिल्याबद्दल कौतुक.

शैलू तू पण काळजी करु नकोस. होईल नीट.

बापरे Sad हे असं एखाद्या पेपर बद्दल झालें ऐकलं आहे. (डिप्लोमा ला असताना मझ्या मैत्रीणीला एका पेपर मधे ० मार्क्स मिळाले होते. अशक्य आहे ना.) पण सगळ्याच . खूप वाईट वाटलं गं प्रज्ञा.

तुला निदान खरं काय ते समजलं तरी. तिच्या बाबतीत तर आम्ही अजूनही गेस च करतोय की काय झालं असावं.

बापरे! हे वाचून वाईट वाटलं आणि धक्काही बसला. पण हार न मानता बीई होणार्‍या तुझ्या जिद्दीला सलाम. आपल्या स्वार्थासाठी दुसर्‍याशी जीवघेणा खेळ करणारा हा क्ष व त्याचे आईबाप अत्यंत नालायक असणार. त्यांना सामील असलेले प्राध्यापक तर त्याहून नालायक.

अवघड आहे. आज इतकं महत्व नाही वाटत बारावीच्या मार्कांना पण तेव्हा मार्क कमी आणि खासकरुन जर एरवी चांगले मार्कं पडत असतील आणि पुढे परिक्षेत असं काही झालं की एकदम "स्टिगमा" आल्यासारखा होतो. त्या वयात खुप अवघड जाऊ शकतं हे पेलायला. एखादी हुशार व्यक्ती नैराश्यामुळे पार रसातळाला जाऊ शकते.
असो... तुझं तसं काही झालं नाही त्यामुळे बरय! शब्बास!
वर बर्‍याच लोकांनी लिहीलय तसं, घरच्यांचा आधार, पाठिंबा खुप महत्वाचा आहे अशा वेळेस. त्यांनी ज्या प्रकारे हँडल केलं तेही कौतुकास्पद आहे. Happy

भयंकर आहे हे.. ... Sad

माझा मित्र Maths Olympiad साठी बिजिंगल भारताचे प्रतिनिधित्व करून जिंकून आला होता बारावीमधे, बारवीमधे मॅथ्समधे १०० होते तो Eng Maths I मधे १० मार्क्स मिळवून फेल झाला होता, त्याचे मार्क्स बघून सगळे वेडे झाले होते, ते आठवले. रिचेकींग करून बदल झाला नाहि तेंव्हा Univ. Chancellor कडे जाऊन सगळे बघण्यात आले तेंव्हा कळले कि पेपर चेक न करता असेच random आकडे टाकण्यात आले होते. :(. बरे असेच करायचे होते तर कमीत कमी चांगले तरी मार्क्स द्यायचे ना ?

प्रज्ञा, तुझ्या जिद्दीचं कौतुक आहे. आणि विशेष कौतुक तुझ्या घरच्यांचं. ज्यांनी तुला खचू न देता साथ दिली.
माझ्या नात्यातल्या एका मुलीच्या बाबतीत असचं साधारण घडलं. बारावीला फिजिक्स मध्ये नापास असा रिसल्ट लागला. टेस्ट सीरीज आणि इतर आधीच्या परिक्षांमध्ये कायम ९४-९५ मार्क्स मिळवणारी अतिशय हुषार मुलगी नापास होणं शक्यच नव्हतं. रीचेक ला टाकला पेपर. दुर्दैवाने तिथेही निगेटीव्ह रिझल्ट आला. बोर्डाचा अतिशय बेशिस्त कारभार. तिने अन तिच्या वडलांनी किती खेटे घातले असतील बोर्डात पण कायम उडवाउडवी व्हायची. कुणी दाद लागू दिली नाही. ती मुलगी तर डिप्रेशन मध्ये जाता जाता वाचली. वर्ष वायाच गेलं Sad पुन्हा परिक्षा दिली तिने. त्यावेळी ९३ मार्क्स मिळाले. बीएस्सी, एमएस्सी पूर्ण करून अमेरिकेत पीएचडी झाली. आणि आज इथे नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर आहे.

माझ्या भावाला डिप्लोमाला मॅथ्स मध्ये शून्य मार्क्स मिळाले. अक्षरशः मार्कशीट वर शून्य आकडा होता. आम्हाला सगळ्याना तर आधी हसूच आलं होतं कारण १०० मार्कांच्या पेपरात निदान एखादे तरी गणित बरोबर आलं असेल तर ४-५ तरी मिनिमम मार्क्स यायला हवे.शून्य काय? Proud रीव्हॅल ला टाकल्यानंतर कळलं की आधीचे ७ छापलेच गेले नव्हते Happy ७० मार्क्स होते त्याला.

प्रज्ञा, खूप वाईट वाटलं वाचून .. वाचताना सारखं वाटत होतं की पुढे तुला तुझे खरे मार्क फायनली कळतील किंवा ऑफिशियल होतील ..

खरोखर तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या हिम्मतीला सलाम आणि जिद्दीचं कौतुक!

खरं टॅलेंट कधीही लपून रहात नाही हे अगदी खरं!

सगळ भयंकर आहेच. कोण कधी बळी होईल ते सागता येत नाही. तू ज्या जिद्दीने मार्ग काढलास, आणि घरचेही सगळे कायम मागे उभे राहिले ते वाचून छान वाटल.

> सगळ भयंकर आहेच. कोण कधी बळी होईल ते सागता येत नाही. तू ज्या जिद्दीने मार्ग काढलास, आणि घरचेही सगळे कायम मागे उभे राहिले ते वाचून छान वाटल.

१००% अनुमोदन !! अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

आई गं कसली चीड आली असेल! फार भ्रष्टाचार बुजबुजला होता या बोर्डाच्या परीक्षांमधे. बरेच किस्से ऐकलेत असे. Angry

प्रज्ञा Sad खरच किती वाईट आहे हे. वर्षभराची मेहेनत अशी वाया गेलेली बघायची म्हणजे...

<< तो "क्ष" विद्यार्थी तसेच करेल का?
आणी तुम्हाला जेवढा आनंद झाला तेवढा त्याला होणार का ?? त्याने कितीही पैसे मोजले तरी त्याला तो विकत नाही घेता येणार...>> पण त्याने प्रज्ञाला काय मिळणार. तीला त्रासच झालाय. त्यामुळे क्ष ने नंतर आयुष्यात काय केले किंवा केले नाही तरी काय फरक पडतो.

पण प्रज्ञा तु सगळे विसरुन किंवा मागे टाकुन पुढे चांगले शिक्षण घेतलेस हे खरच छान आहे Happy

प्रज्ञा. हा अनुभव अत्यंत वाईट, पण सुदैव इतके कि सत्य समजले तरी. पुढे हि जखम बूजत जाइल एवढे नक्की. आणि आता खंबीरपणा आलाच आहे, तर तिच बक्षीस समजायचे.

मी पण याच अनुभवातून गेलो आहे. दहावीला मला इंग्रजीमधे केबळ ६८ मार्क आहेत. माझ्या शाळेतील शिक्षिका, माझा पेपर मुद्दम वर काढून आधी तपासत. नववीत असतानाचा, मुख्याध्यापिकांनी माझ्याच वर्गाला शिकवायची जबाबदारी माझ्यावर टाकली होती (आमच्या शिक्षिकांना अचानक २ महिने रजेवर जावे लागले होते.) बाकी मार्क उत्तम असल्याने माझी टक्केवारी उत्तम होती. त्या काळात फेरतपासणीची सोय होती, पण त्याबद्दल तितकी माहीती नव्हती. मला आजही खात्री आहे कि ६८ नसून ८६ मार्क होते.

आता केवळ आठवण उरलीय.

प्रज्ञा, तुझं प्रचंड कौतुक!! आणि या अश्या दुर्दैवी प्रसंगात तुझ्या आई-बाबांनी जो तुझ्यावर विश्वास दाखवला तो अतिशय अभिमानास्पद आहे.

बाप रे किती भयंकर प्रकार आहे हा...एकदम असहाय्य चिडचिड झाली बघ !
तुझ्या जिद्दिला सलाम...!
जाता जाता अगदी सहजच विचारते,
>>"फक्त एकदा, एकदाच, ज्या कोण 'क्ष' ने माझे मार्क्स घेतले आहेत, त्याचं मार्कशिट बघून माझे खरे मार्क्स किती होते हे मला कळेल का हो? आता काही उपयोग नाहे हे खरं, पण वर्षभर जीव आटवून केलेल्या मेहेनतीला किती चांगलं फळ आलं होतं, जे दुसर्‍याला माझ्याकडून हिसकावून घ्यावंसं वाटलं ते तरी कळूदेत मला!">> ह्याचे उत्तर मिळाले का ग? खूपच भिडले ग ते वाक्य्...फार अस्वस्थ करून गेलं...

बारावी शास्त्र विषयात खुप मुलांना ह्या प्रकाराला तोंड द्यावे लागते की काय??? Sad

माझ्या आधीच्या बॉसच्या मुलालाही सेम हेच भोगावे लागले. हा बॉस मला नी ऑफिसात सगळ्यांनाच मित्रासारखा होता. मी तर परिक्षा चालु असताना मुद्दाम नेटवरुन रामचंदरचे expected questions त्याला प्रिंट करुन द्यायचे नी दुस-या दिवशी बॉस सांगायचा की त्यातले ९०% प्रश्न परिक्षेत आलेले. मुलाचा अभ्यास मजबुत होता. त्याला माझ्या प्रिंटचीही गरज नव्हती, प्रिंट पाहिल्यावर त्यातल्या सगळ्यांची उत्तरे त्याला ठाऊक असत. असे अस्तानाही त्याला तीनही शास्त्र विषयात ३५-३५-३५ इतकेच गुण मिळाले. इतका प्रचंड धक्का आम्हा सगळ्यांना, बॉसला नी त्याच्या मुलाला. मुलाचा मित्र जो त्याच्यासोबत अभ्यास करत होता व त्याच्यापेक्षा हुशार होता तो तर दोन शास्त्र विषयात नापास झाला. त्याची आजी बोर्डात होती, पण ती रिटायर्ड झालेली. तिने खुप खटपट केली, बॉस खुप जणांना भेटला. शेवटी वर जे प्रज्ञाने लिहिलेय तेच सत्य बाहेर आले - उत्तरपत्रिकांची अदलाबदल. काही उपयोग झाला नाही. Sad

मुलाला ऑटोमोबाईल इंजीनीअरींगच्या ध्यास लागलेला. लोकांनी वाट्टेल ते सल्ले दिले. अगदी आता आर्टसला घाला त्याला पर्यंत लोक पोचले. सगळ्यांकडे खंबीरपणे दुर्लक्ष करुन प्रायवेट कॉलेजात इंजीनियरींगसाठी अ‍ॅडमिशन घेतली. तिथे डिग्री झाल्यावर लंडनला १८ महिन्याचा कोर्स करायला गेला. तिथे तो मुलगा दुसरा आला. आज दिड वर्षे तो tcs मध्ये चांगल्या पदावर काम करतोय आणि अतिशय चांगले करीअर समोर दिसतेय. आजही त्याचा बारावी रिझल्टचा दिवस आठवला की अंगावर काटा येतो.

अशी अद्लाबदल करुन ज्यांचा फायदा होतो त्यांना आपण असे करुन कोणाच्यातरी आयुष्याशी खेळतोय हे लक्षात घ्यायची गरजही वाटत नाही. इतके आपमतलबी झालेले असतात ते.

Pages