भाषा : प्राकृत, संस्कृत, मराठी वगैरे

Submitted by dr.sunil_ahirrao on 29 May, 2011 - 01:31

भाषा हे संपर्कासाठी एक माध्यम आहे. त्यासाठी शब्द अवश्यक असतात असे नाही .भाषेचा शोध घ्यायचा तर मानवाच्या उत्क्रांतीच्या काळाशी जावे लागते.तेव्हा एकटा दुकटा राहणारा आदिमानव कोणती भाषा बोलत होता? हातापायांनी केलेल्या खाणाखुणा,हालचाली,डोळ्यांची उघडझाप,आणि बहुदा प्राणी व पक्षी यांच्या अनुकरणातून काढलेलेले अर्थहीन चित्रविचित्र आवाज हीच त्याची भाषा होती. गुहेत राहणारा शिकार करणारा हा मानव जेव्हा इतर मानवांच्या वा मानवी समूहांच्या संपर्कात येऊ लागला तेव्हा त्याची हीच भाषा होती.नंतर त्या त्या समुहानुसार ठराविक आवाजाला ठराविक अर्थ प्राप्त झाला. मग शब्दांची ठराविक रचना विशिष्ट अर्थाने वापरली जाऊ लागली. अशा प्रकारे काही शब्दसमूह म्हणजे वाक्य तो वापरायला शिकला. त्या त्या मानवी समुहाच्या प्रमुखांनी वाक्य कशा प्रकारे वापरले म्हणजे त्याचा कसा परिणाम होतो,याचे निरिक्षण करून ते कोणत्या प्रकारे वापरावे याचे एक उच्चारशास्त्र बनवले. कारण एकच वाक्य वेगवेगळ्या प्रकारे वापरले की त्यातून वेगवेगळा भाव प्रकट होतो,असे त्यांच्या लक्षात आले. उदा. एकच शब्दसमूह राग,लोभ,द्वेष,प्रेम आदी गोष्टी प्रकट करतो. याला कारणीभूत त्या त्या मानवांची देहबोली,डोळ्यातील भाव,अश्रू ,हास्य इत्यादी कारणीभूत होते. म्हणून उच्चारासोबत ठराविक शब्दसमूह विशिष्ट भावना व्यक्त करण्यासाठी आणि भूत,वर्तमान,भविष्य याचा विचार करताना त्यात कसे बदल करावेत,याचे काही नियम त्या-त्या समुहाने बनवले.आणि येथून तत्कालीन भाषेचे व्याकरण जन्माला आले. ही भाषा संस्कृतच्या आधी हजारो वर्षे अस्तित्वात होती.आणि पृथ्वीवर सर्वत्र वेगवेगळ्या भाषा अशा प्रकारे उदयास आल्या. या भाषा फक्त त्या त्या मानवी समूहांपुरत्या मर्यादीत होत्या. हे समूह जेव्हा इतर समूहांशी जोडले गेले,तेव्हा एकमेकांच्या भाषेतील शब्दांची देवाणघेवाण होऊन आणखी वेगळ्याच भाषा जन्माला आल्या.संस्कारित होत गेल्या,त्यातील शब्दसंपदा वाढत गेली. या दृष्टीने पाहिल्यास आदिमानवाच्या उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यातील भाषा सोडल्यास इतर कोणतीच भाषा अशी उरली नाही की जिला नैसर्गीक किंवा प्राकृत म्हणावे. संस्कृतचा इतिहास तर फारच अलीकडचा आहे. वेदिक संस्कृतीत तत्कालीन विद्वानांनी संस्कृतला व्याकरणाचे काटेकोर नियम घालून अतीशय सूबक आणि बांधीव बनवले. ही भाषा आधुनिक काळातील सर्वात प्रगत भाषा होती;आणि आजही आहे,असे म्हणता येईल.कारण यात बरेच साहित्य उदा.वेद,रामायण,महाभारत इत्यादी काव्ये निर्माण झाली. आणि संस्कृत ही 'देवांची' भाषा गणली जाऊ लागली. खरे म्हणजे इथे देव-बिव प्रकार हा साहित्यापुरता मर्यादीत होता.आपल्या वेदिक संस्कृतीत पूर्वीपासूनच म्हणजे निदान 'मनूच्या'काळापासून चातुर्वर्ण्य व्यवस्था अस्तित्वात त होती.तत्कालीन विद्वानांनी शुद्र लोकांना संस्कृतच्या ज्ञानांपासून,अभ्यासापासून,वेदादींच्या पठणापासून वंचित ठेवले. यामुळे हा वर्ग तसेच इतर तीन वर्गातील काही लोक जरी त्यांना संस्कृतच्या बाबतील बंधने नव्हती;तरीही इतर अनेक कारणाने किंवा संस्कृत अवघड वाटल्याने-बाकीच्या तीन वर्गांतील लोकांनी आपल्या नेहमीच्या पूर्वापार चालत आलेल्या भाषांमध्ये किरकोळ बदल करून महाराष्ट्री,शौर्यसेनी,पाली आणि मागधी या भाषांना जन्म दिला.या भाषांना व्याकरणाच्या नियमांचे काटेकोर बंधन नव्हते,आणि त्या सर्वसामान्य लोकांना अवघड वाटल्या नाहीत.कालौघात अपरिहार्यपणे संस्कृतचा ह्या चारही तथाकथित प्राकृत भाषांवर प्रभाव होता आणि त्यातून आणखी नवनवीन भाषांचा उदय झाला. मराठीची निर्मिती महाराष्ट्रीपासून झाली,असे मानले जाते. काही लोक असाही दावा करतात की मराठी तमीळपासून निर्माण झाली. मात्र मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये शेकडो शब्द संस्कृतशी साम्य दाखवणारे आहेत.त्यामुळे या सर्व भाषांवर असलेला संस्कृतचा प्रभाव नाकारणे योग्य होणार नाही. सारांश:कोणतीच भाषा अवकाशातून अवतरलेली नाही. संस्कृत वा प्राकृत हे केवळ उपाधीभेदाने पडलेले प्रकार आहेत. प्राकृत भाषाही संस्कारित अशाच आहेत.आणि कालौघात प्रत्येक भाषा अगदी संस्कृतसह बदलत जाणार आहेत,हे निश्चित! नैसर्गीक भाषा फक्त आदिमानवाची त्याच्या उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यात अस्तित्वात होती. आजवरच्या सर्व अस्तित्वात असलेल्या मानवी भाषा या संस्कारित आहेत. नैसर्गीक म्हणावयाची असल्यास,ती भाषा फक्त प्राणी आणि पक्षी यांचीच फक्त उरली आहे.

गुलमोहर: 

भाषा राजाश्रय किंवा लोकाश्रयाने तगते आणि ज्ञानाने समृद्ध होते. संस्कृतने स्वतःच लोकाश्रय नाकारला म्हणूनच राजाश्रय नष्ट होताच ती मृतप्राय झाली. मराठी लोकाश्रयावर टिकून आहे मात्र ज्ञानासाठी इंग्रजी अनिवार्य होऊन बसली आहे...

कालाय तस्मै नमः

आपले निरिक्षण बरेचसे योग्य आहे;मात्र संस्कृतला अगदीच मृतप्राय म्हणणे कितपत योग्य होईल? काळानुसार भाषेचे गणित बदलले आहे.संस्कृतवर इतर भारतीय भाषांच्या मानाने अलीकडे अगदी नगण्य संस्कार झालेत. इतके अल्प की आता इतर भाषाच अनेकविध भाषांच्या आक्रमणामुळे,संक्रमणामुळे 'संस्कृत' बनल्या असून संस्कृत तिच्या आखीवरेखीव बांधणीच्या काळाचा तेवढा भाग सोडल्यास तेव्हा जशी होती तशीच आज आहे,त्यामुळे संस्कृत ही 'प्राकृत' भाषा म्हणून भविष्यात ओळखली गेल्यास नवल वाटू नये.

.............. काही लोक असाही दावा करतात की मराठी तमीळपासून आली....................

आश्चर्य वाटते, कारण मला जे माहित आहे की तमिळचे मुळ हे संस्कृत पेक्षा वेगळे आहे म्हणूनच तमिळ ही भाषा संस्कृत पासून आली नाही असे समजले जाते. मराठीत संस्कृत शब्द भरपूर मिळतात, उलट तमिळ शब्द किंवा त्या सदृश काही सापडत नाही.