मागील भाग -
महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...
महिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...
महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...
महिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...
महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन
महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...
शके १२५४ (इ.स.१३३२) मध्ये साष्टी - मुंबई भागात पुनःश्च सत्ता प्रस्थापित झाल्यावर नागरशा दुसरा याने आपल्या सरदारांना अनेक इनामे दिली. ह्यात एक जैतचुरी नावाचा त्याच्या विश्वासातील एक सरदार होता. त्याला नागरशा दुसरा याने त्याला साष्टी येथील बंदरकीचा मामला सुपूर्त केलेला होता. ह्या जैतचुरीस भागडचुरी आणि कमळचुरी असे २ पुत्र होते. त्यातील भागडचुरीच्या हातात बंदरकीच्या आसपासच्या जमिनीचा मामला सुपूर्त होता. ह्या भागडचुरीने नव्याने जानिमीची मोजणी केली. ७ हातांची एक काठी आणि १२ काठ्यांचा बिघा आणि १२८ बिघ्याचा एक चावर अशी नवीन पद्धत अमलात आणली. थोडक्यात त्याने एका चावर मधील बिघ्याची संख्या वाढवून नागरशा याला सरकारी उत्पन्न वाढवून दिले. ह्यामुळे नागरशा खुश असला तरी जमिनीचा सारा वाढल्याने सामान्य रयत मात्र नाराज होती.
३-४ वर्षात त्याची बुद्धी इतकी फिरली की त्याने मालाडच्या सोम देसायाच्या वहिनीला जबरदस्तीने पळवून नेण्याची भाषा सुरू केली. त्याने सोम देसाई, त्या बाईचा नवरा आणि घरातील इतर पुरुषांना बंदी केले. नशिबाने कोण्या एका आप्तेष्टाने त्या स्त्रीस रातोरात कुर्हार येथे नेऊन पोचवले. तिथून ती तिच्या माहेरी भाईंदर येथे गेली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेंव्हा ती ४ महिन्याची गरोदर होती. इथे ती सुरक्षित नाही असे कळून आल्याने तिच्या माहेरच्यांनी तिला भिवंडी येथे तिच्या भावाकडे पाठवले. भागडचुरीला ती नेमकी कुठे गेली या गोष्टीचा पत्ता लागला नाही म्हणून त्याने तिच्या नवऱ्यास ठार केले. त्या स्त्रीस भिवंडी येथे पुत्र जन्मास आला. तो १२ वर्षाचा झाल्यावर त्याला स्वतःच्या आईकडून आपल्या वडिलांच्या हत्येची सर्व माहिती कळली. तेंव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने नागरशाला 'मी भागडचुरीला ठार मारणार म्हणून कळवले.'
ह्या १२ वर्षात भागडचुरीचा उच्छाद इतका वाढला होता की नागरशाला देखील तेच हवे होते. त्याने स्वतःची संमती त्या मुलास कळवली. एके दिवशी वेळ साधून त्या मुलाने सोबतीला काही लोक घेऊन भागडचुरीला देवीच्या जत्रेत गाठले आणि हल्ला केला. झटापटीत चुरी पळाला आणि खाडीत उड्या टाकून पळायला लागला. तेंव्हा त्या मुलाने जवळच असलेल्या होडीच्या तांडेलाला सांगितले की तू भागडचुरी मारशील तर तुला हवे ते देईन. ह्या आमिषाने तांडेलाने 'मला आपल्या जातीत घ्याल तर मारतो' असे वाचन मागितले. मुलानेही त्याची अट कबूल केली. त्यावरून तांडेलाने भागडचुरीला ठार केले. प्रसन्न होवून मुलाने प्रितीभोजन घातले आणि तांडेलाला सोबत भोजनास बसवून जातीत सरता देखील केले. हे ऐकून नागरशा संतापला आणि तांडेलाला जातीत घेणारया लोकांची अधिकारपदे त्याने काढून टाकली.
पण गम्मत म्हणजे तांडेलाने भागडचुरीला ठार मारलेच नव्हते. भागडचुरी त्यानंतर अनेक दिवस लपून बसला होता. त्याने देसायाच्या मुलाचा बदला घ्यायचे ठरवले होते. दुसरीकडे त्याने नागरशा विरुद्ध नगरच्या निका मलिक बरोबर संधान बांधले. हा निका मलिक म्हणजे महंमद तुघलक याचा दक्षिणेतील हस्तक होता. भागडचुरीने त्याचा नाथराव नावाचा एक भाट नागरशाकडे पाठवला आणि निका मलिकच्या नावाने त्यावर दबाव आणायचा प्रयत्न सुरू केला. पण नागरशा काही घाबरणारयांपैकी नव्हता. त्याने नाथरावाचे नाक कापून त्याला भागडचुरीकडे पाठवून दिले. भागडचुरीने ह्याचा फायदा घेत त्या भाटास निका मलिककडे पाठवून दिले. हे सर्व ऐकून-पाहून निका मलिक फौज घेऊन साष्टीवर चालून आला. त्याच्या फौजेने ठाण्यावर हल्ला करत नागरशाच्या फौजेला मागे रेटले. शिव आणि कान्हेरी अश्या दोन्ही ठिकाणी देखील नागरशाची फौज अपयशी ठरली. तो स्वतः वाळूकेश्वरी होता. तो मलिकवर चालून आला. भायखळ्याला झालेल्या तुंबळ युद्धात नागरशा ठार झाला. अशा तर्हेने शके १२७० (इ.स. १३४८) मध्ये ठाणे - कोकणात मुसलमानी राज्य आले. मलिकने नागरशाचा पुत्र लाहूरशा याला मंडलिक बनवून घेतले.
बखर म्हणते की, 'कलियुगात असे होणार अशी भाक लक्ष्मी-नारायणाने कलीस दिली होती. ती भाक शक १२७० मध्ये पूर्ण खरी ठरली. हरिहर गुप्त झाले. ऋषी बद्रीकाश्रमास गेले. वसिष्ठ राजगुरूंनीही पाठ फिरविली. त्यामुळे सोमवंशी व सूर्यवंशी यांची शस्त्रविद्या लुप्त होऊन म्लेच्छांचा जय झाला.'
म्लेच्छांचे राज्य आल्यावर मात्र सर्व सूर्यवंशी - सोमवंशी देसाई - पाटील सामान्य रयत होऊन बसले. मलिक संपूर्ण प्रदेशाचा कारभार भागडचुरीच्या सल्ल्याने पाहू लागला.
महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...
interesting ! आधीचे सगळे
interesting ! आधीचे सगळे भागही वाचले आहेत. मुंबईत जन्म होउन, इतकी वर्ष राहुन मुंबईचा इतिहास आम्हाला माहीत नाही. संग्रहणीय माहिती.
लगे रहो दोस्त! good job
ह्यात उल्लेख केलेला निका मलिक
ह्यात उल्लेख केलेला निका मलिक याचे पूर्ण नाव निका मलिक उत्तजार असे होते हे आज अजून एका संदर्भात वाचनात आले..
ह्या निका मलिकचा पुढे कोकणात शिर्के घराण्याच्या राजाने ठार मारले असेही नव्याने कळले.
रोहन, हा निका मलिक उत्तजार
रोहन,
हा निका मलिक उत्तजार म्हणजेच इ.स. १४५० च्या आसपास ज्याला शिर्के आणी मोर्यांनी मिळून प्रभानवल्ली - विशाळगडच्या जंगलात चोपले तोच काय?
मनोज... कोकणात नेमके कुठे हे
मनोज... कोकणात नेमके कुठे हे माझ्या अजून वाचनात आलेले नाही... तुझ्याकडे कुठला संदर्भ आहे? मी सध्या 'शिवदे' वाचतोय..
सेनापती, या लढाईचे व्यवस्थित
सेनापती, या लढाईचे व्यवस्थित वर्णन बहुतेक मराठी रियासत मध्ये वाचलेलं आठवतंय..!
असेल... तसेही मी अजून
असेल... तसेही मी अजून सरदेसाईयांचे सर्व खंड वाचलेले नाहीयेत... त्यातून काही अधिक माहिती इथे देता आली तर पहा की..
स्वच्छंदी, तुमचा अंदाज आहे
स्वच्छंदी,
तुमचा अंदाज आहे तोच हा मलिक उत्तजार असावा. याचा उल्लेख बाबासाहेब पुरांदार्यांच्या शिवचरित्रात आढळतो. तिथे त्याचं नाव उत्तुजार असे लिहिल्याचे आठवते. त्याला (मोर्यांकडील?/शिर्क्यांकडील?) कोणीतरी सह्याद्रितला एक दुर्गम दुर्ग (पन्हाळगड?) जिंकवून देतो असे आमिष दाखवून जावळीच्या जंगलात खेचला होता. तिथे उत्तुजारला रक्ताची हगवण लागली नि त्यातच त्याचा अंत झाला. ही कथा शिवचरित्रात सुरुवातीच्या प्रकरणांत आहे.
आ.न.,
-गा.पै.
रोहन, आत्ता अधीक संदर्भ
रोहन,
आत्ता अधीक संदर्भ हाताशी नाहीयेत पण गा.पै. म्हणतात तसे पुरंदर्यांच्या शिवचरीत्रात याचा उल्लेख नक्की आहे... शासनाच्या रत्नागिरी गॅझेटियरमध्येही इतीहास भागात यावर एक प्रकरण आहे पण ते बरेचसे जॉन बर्गेस "फेरीस्ता" वर आधारीत लिहीले आहे...
त्या भागाचा भुगोल बघता... प्रभानवल्ली ते विशाळगड या दरम्यानच्या जंगलात ही लढाई झाली असू शकते.. तिथे आत्ता सुद्धा लढाईत वर्णील्याप्रमाणे अवघड जंगल आहे तर ६५० वर्षांपुर्वी त्या जंगलात लढाऊ सैन्य नेणे हा तद्दन मुर्खपणाच होता जो उत्तजारने केला अथवा शिर्क्यांनी त्याच्याकडून करवला...
खरे तर शिवपुर्व कालात कोकणात नांदत असलेल्या प्रभानवल्ली व शृंगारपुरचे शिर्के, खेळण्याचे मोरे, मंडणगड पालीचे दळवी, वाडी आणी कुडाळचे सावंत या घराण्यांच्या ईतीहासावर कोणीतरी लिहून प्रकाश टाकणे गरजेचे आहे... रोहन, तुझ्याकडे काही या घराण्यांच्याबद्दलची टिपणे आहेत काय?
वाडी आणी कुडाळचे सावंत ....
वाडी आणी कुडाळचे सावंत .... यांच्याबद्दल मी लिहू शकीन. त्यावर एक पुस्तकच आहे माझ्याकडे.
पुढच्या आठवड्यात घरी गेलो की नाव वगैरे सर्व देतो... जमल्यास काही तीपानाही देतो..
बाकी लोकांबद्दल वेगळी विशेष माहिती सध्यातरी मी देऊ शकणार नाही..